Skip to main content

ती उत्तर मागत नाही...

लेखक सत्यजित... यांनी गुरुवार, 29/06/2017 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
निखळून स्वप्न एखादे गालावर येते तेंव्हा मी नाव टाळतो ज्याचे,ओठावर येते तेंव्हा! मी वादळातही करतो,मौजे मौजेची स्वारी ओढाळ नाव भरकटते,काठावर येते तेंव्हा! ती जाता सहजच म्हणते,'स्वप्नात आज मी येते' हलकेच झोपही माझ्या,डोळ्यावर येते तेंव्हा! सोसून कसा सोसावा! हा भार सुगंधी कोणी निष्णात कळीही कच्च्या देठावर येते तेंव्हा! हे आता उमगत आहे,माझीच गझल आहे 'ती' ती उत्तर मागत नाही,प्रश्नावर येते तेंव्हा! —सत्यजित
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2831
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

सोसून कसा सोसावा! हा भार सुगंधी कोणी निष्णात कळीही कच्च्या देठावर येते तेंव्हा..... अफलातुन :) मोहक सुगंधित हसणे हलकेच दवाने सजणे ते रुप कळीचे खुलते थेंबांनी भिजते तेव्हा.....

In reply to by जेनी...

प्रतिसादांच्या रखरखीत आपला हा काव्यमय प्रतिसाद,एखाद्या कळीने अलवार फुलून येण्याइतकाच अल्हाददायक अााहे! खूप-खूप धन्यवाद!

आपले सतत मिळणारे प्रतिसाद लेखनाचा मानस जागता ठेवतात!खूप खूप धन्यवाद!

जरी उत्तर मागत नाही,प्रश्नावर येते तेंव्हा! तो प्रश्नही असतो गहिरा, जो काळिज वि॑धत जाई!

In reply to by अनन्त्_यात्री

उसवून काळजाला,छिद्रे हजार झाली... ल्यालो नवीन जखमा..कळ आर-पार झाली! प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!