मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साक्षात्कार

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
माझ्या चित्रातले पक्षी चौकट तोडून मोकळ्या आकाशात आले तेव्हा दिसलं इंद्रधनुष्य कवेत घेण्यासाठी रिमझिमतं आभाळ तर कधीचं ओथंबून वाकलंय वीट वीट पारखून बांधलेल्या माझ्या कुंपणापलीकडे मी पाहिलं तेव्हा दिसलं मी सहज फेकलेल्या विटेवर माझं श्रेय-प्रेय तर कधीचं उभं ठाकलंय अंधार पीत पीत मी इथवर आलो उजेडाच्या प्रतीक्षेत तेव्हा दिसलं माझ्या रोमरोमात तर पहाटेचं तेज कधीचं फाकलंय

वाचने 2816 वाचनखूण प्रतिक्रिया 13

इडली डोसा Wed, 06/14/2017 - 11:02
माझ्या रोमरोमात तर पहाटेचं तेज कधीचं फाकलंय हे विशेष आवडलं

सनकी गुरुवार, 06/15/2017 - 20:31
"रिमझिमतं आभाळ तर, कधीचं ओथंबून वाकलंय". भिडलं मनाला अगदी! चौकटीबाहेरचा विचार करून आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाकायचीच काय ती खोटी... सारं जग तुमचंच आहे.

सत्यजित... Wed, 06/21/2017 - 00:43
शेवटचा बंध अगदीच क्लासिक! अवांतर—वातावरण म्हणा किंवा काय,पहिला नि तिसरा बंध वाचताना,पावसाळ्यातली एखादी ओलसर,कुंद पहाट-ऊषा,आठवुन गेली!