Skip to main content

सर एक श्रावणाची बरसून काय गेली!

लेखक सत्यजित... यांनी सोमवार, 15/05/2017 03:46 या दिवशी प्रकाशित केले.
सर एक श्रावणाची बरसून काय गेली गळत्या घरी गरीबी पसरुन पाय गेली! आता कळून चुकले,पाण्यात पीठ होते आई मला म्हणाली,करपून साय गेली! पिल्लू कुणी जगावे,इतकीच आस होती जमले स्तनांत तितके,पाजून गाय..गेली! वाचायचीच आहे,वाचू उद्या सकाळी... चिठ्ठी कशी उश्याला,विसरुन माय गेली! पेरुन जे उगवले वाहून जात होते... जाईल बाप..आई,लागून हाय,गेली! तो बापही जगाचा,निश्चल उभाच आहे भक्ती भुकेजलेली अन् ठाय-ठाय गेली! —सत्यजित
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 5800
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

काफिया(बहुवचन-कवाफी) म्हणजे शेरातील यमक साधणारा शब्द! गझलेत असे यमकाचे शब्द योजत असताना, 'अलामत' (एक समान स्वरचिन्ह) सांभाळणे मात्र गरजेचे असते! मतल्याच्या (गझलेचा पहिला शेर) दोन्ही ओळींमध्ये व त्यानंतर येणाऱ्या सर्व शेरांच्या किमान दुसऱ्या ओळींमध्ये कवाफी वापरणे अपेक्षित असते! ज्या गझलेच्या शेरांत असे यमक साधणारे दोन-दोन शब्द(कवाफी) लागोपाठ वापरले जातात,ती 'जुल्काफिया'गझल!

सुरेख! गझलेच्या प्रकारांची ओळख करून देत आहात हे अजून छान!

मी सहसा काव्य हा प्रकार गांभिर्याने घेत नाही. मात्र ही गझल खरंच अंतर्मुख करुन गेली.

मार्च ७ अप्रिल १२ आणि अर्ध्या मे मधे ७ अशा गझलधारांनी मिपाकरांना चिम्ब केल्यबद्दल धन्यवाद!

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!

प्रमोद,विशाल धन्यवाद!

अत्यंत ताकदीची गझल... एक एक शेर अत्यंत विचारपूर्वक रचला आहे.. फार आवडली... पिल्लू कुणी जगावे,इतकीच आस होती जमले स्तनांत तितके,पाजून गाय..गेली! सध्या उत्तमोत्तम कविता/गझल येत आहेत.. वाचायला छान वाटते, धन्यवाद! :)

शब्दबंबाळ,स्नेहांकिता,किसन शिंदे मनःपूर्वक धन्यवाद!