Skip to main content

महाराष्ट्र दिन २०१७ : चारोळी स्पर्धा

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 25/04/2017 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो. नुकतेच भरगच्च उपक्रम पार पडलेले असल्याने थोडासा विसावा घेऊन मिपाकरांना जरा हलक्या फुलक्या लिखाणासाठी आता मस्त संधी आहे. १ मे रोजी होणार्‍या महाराष्ट्रदिनानिमित्त मिपाकरांनी चारोळ्यांची बरसात करावी अशी इच्छा आहे. शीघ्रकवी, चारोळी स्पेशालिस्ट, विडंबन, सुडंबन स्पेशालिस्ट, विनोदी कवी, प्रेमकविता अन निसर्गकवितांची झडी लावणार्‍या कवी/कवयत्रींची मिपाला कधीच कमी पडली नाही. आता विषय सोपा, जिव्हाळ्याचा अन स्पेशल आहे. तेंव्हा किबोर्डावर नाचू देत आपली बोटे. येऊ देत काही चारोळ्या. नव्हे...... चार ओळी आपल्या महाराष्ट्रासाठी. विषय : महाराष्ट्र अट एकदम सोपी: चार ओळी असाव्यात. एका ओळीत जास्तीत जास्त आठ शब्द असावेत. मिपाकरांनी आपल्या चारोळ्या या धाग्याच्या खाली प्रतिसादात लिहाव्यात. एका लेखकाने एकच चारोळी स्पर्धेसाठी द्यावी. प्रतिसादात 'स्पर्धेसाठी' असे स्पष्ट नमूद केलेले असावे. स्पर्धेसाठी नसणाऱ्या चारोळ्या याच धाग्यात देण्यास हरकत नाही. चारोळ्या देण्याचा

अंतिम दिवस दि. २९-०४-२०१७ रात्री १२.०० (भा.प्र.वे.)

असेल. परिक्षक ह्या चारोळीतून ३ विजेत्या चारोळी निवडतील. निकाल १ मे रोजी महाराष्ट्रदिनाला जाहीर केला जाईल. चला तर मग महाराष्ट्राची महती, मिपाकर गाती. ----
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 29158
प्रतिक्रिया 98

प्रतिक्रिया

स्पर्धेसाठी - कर्मभूमी अन् ज्ञानभूमी ही अजोड इथली नाती! फुलवायाला माती इथली अगणित तुटली पाती.. "महा"न इतिहासाने नटते "राष्ट्र"भिमानी छाती!! समृद्धतेच्या आकांक्षांच्या लक्ष उजळती वाती!! राघव

या चारोळीची खासियत अशी आहे की प्रत्येक ओळीचे पहिले अक्षर वाचल्यास ‘एकमेव’ हा शब्द होतो आणि प्रत्येक ओळीचे शेवटून दुसरे अक्षर वाचल्यास ‘महाराष्ट्र’ हा शब्द होतो. अर्थात दोन्ही मिळून ‘एकमेव महाराष्ट्र’ ! महाराष्ट्र एकेक नररत्न या भूमीने निपजले महा कसा वर्णावा हापूसचा गोडवा अहाहा मेखला सह्याद्रीच्या पूर्वेस देश न्यारा हा वसवूनी चित्रनगरी चमकतो महाराष्ट्र हा

शिवबा, ज्ञानबा, आंबेडकर धरले वेठीला, बळीराजा, मजूर, मौलवी बांधले दावणीला, पोळी आप आपली भाजताहेत दादा, भाऊ,राजे, साहेब, बा महाराष्ट्रा माझ्या लाव आता तरी ह्यांना रस्त्याला.

स्पर्धेसाठी, ====== मृदंगाचा नाद,शाहिराचा डफ,ढोलकीची थाप महाराष्ट्री! संस्कृतीची नदी वाहे सदोदीत,वारीचा प्रघात महाराष्ट्री! ओवी ज्ञानेशाची,तुक्याचा अभंग,सज्जनांचा संग महाराष्ट्री! दगडांचा इतिहास,ताऱ्यांचे भविष्य,माती होणे अंग महाराष्ट्री!

भर मैफलीत कालच्या,मी माघार घेतली... ते म्हणाले,चार ओळीत महाराष्ट्र बसवा!

स्पर्धेसाठी ---------- मंगल देशा, सुंदर देशा कणखर देशा, महाराष्ट्र देशा संकटघिरल्या भारताची तूच एक आशा

नभांगण जिथे झुके तारांगण जिथे फिके 'महाराष्ट्र' असे 'महाकाव्य' जिथे शब्द होती मुके !

राजा जाणता लाभू दे ,बळीराजा होवो सुखी पोटभर अन्न जावो दीन दुबळ्यांच्या पोटी अंधविश्वास सरु दे , सृजनाचे तेज मिळो महाराष्ट्रात या माझ्या स्थैर्य धैर्य सौख्य नांदो

आई मराठी, माय मराठी, अम्मा मम्मी याडी मराठी हाय मराठी हॅलो मराठी, बाय बाय टेककेअर मराठी ब्रेड मराठी, पिझ्झा मराठी, नान पराठा दोसा मराठी महाराष्ट्राची रीत मराठी, सर्वांना सामावून उरणार मराठी

अटकेपार लावले झेंडे चालवू परंपरा अशीच पुढे असो खंड वा देश कोणते गर्जते मराठी सगळीकडे

मराठी माझी असे माऊली महाराष्ट्र अन् बाप असे सातसमुद्रापारही हृदयी महाराष्ट्राची माती वसे डॉ. माधुरी ठाकुर (आनन्दिनी) अॅबर्डीन , युके