बौद्धिक संपदा हक्क दिवस २०१७
.
.
(प्रासंगिक)
सोशल मिडीया आपल्या बोटावर नाचायला लागल्यापासून चांगलं काय झालं याचं मोजमाप प्रत्येकाचं वेगळं असेल. सोय आणि मनोरंजनाचे साधन म्हणून ते आवश्यक झालेय. पण दुष्परिणामही कमीअधिक प्रमाणात अनुभवायला मिळत आहेत.
एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे कसलीही खातरजमा ना करता, मूळ लेखकाला डावलून (कधी कधी तर वाचायच्या आधीच) पुढे ढकलण्याची प्रवृत्ती. छापलेले ते सर्व खरेच असे मानणारा एक वर्ग आजही आहे तसेच ढकलीतून आलेली माहिती खरेच त्या व्यक्तीने लिहिलीय असे मानून थेट मते बनवणारे लोक आहेत. लोक्स कुणालाही त्याने निर्माण न केलेल्या कलाकृतीबद्दल उगाच 'चान चान' म्हणतात..बापडा तोही खूष होतो - हेही दिवस जातील, पण लोकांचं शिक्षण झाल्याशिवाय हे होणार नाही. मूळ कलाकार किंवा संशोधकाला फाट्यावर मारून त्याची कला किंवा एखादी वस्तू, पद्धत आपलीच म्हणून वापरणे ही सहज प्रवृत्ती असली तरी सुसंस्कृतपणा नक्कीच नाही. पोलीस नाही म्हणून 'नो एंट्री' गल्लीत उलट्या दिशेने घुसणे किंवा रस्त्यातले पडलेली नोट हळूच खिशात घालणे यासारखेच हे कृत्य म्हणावे लागेल. अशाने मूळ सादरकर्त्याला नक्कीच वेदना होत असणार. पण असभ्य व्यक्तींना त्याच्याशी घेणे नसते.
आपणही या हक्काची कळून वा नकळत पायमल्ली करतो का? कुठे कुठे करतो? याचा विचार व्हायला हवाय.
कदाचित अनेकदा करतो- कायप्पावर काहीही निनावी ढकलणे, प्रेझेंटेशनमध्ये तक्ते/ चित्रे, मूळ स्रोताचा नामनिर्देश न करता वापरणे, अनधिकृत सॉफ्टवेअर्स शोधणे- वापरणे, स्वस्त मिळते म्हणून नकली माल घेणे - यादी मोठी होईल.
पूर्वी २०००साली बंगळुरातल्या केम्प फोर्ट वर भलामोठ्ठा मिकी माउस लावला होता. ते पाहून म्हणे तिथल्या एका चतुर वकिलाने डिस्नीशी संपर्क साधून 'ही तुमच्या चिन्हाची चोरी आहे' हे पटवून त्यांचे वकीलपत्र मिळवले. नंतर केस दाखल करून कोर्टाबाहेर प्रकरण मिटवले. नंतर हा मिकी माऊस हटवावा लागला. २००० सालामध्ये दोनतीन कोटींची नुकसानभरपाई ही अवाढव्य होती! अर्थात याचा विदा नाही. पण आम्हाला हा विषय शिकवताना शिक्षकाने हे उदाहरण दिले होते. पण हल्ली इंटरनेटच्या प्रसारामुळे अशी दुसर्याची चिन्हे/ चित्रे वापरताना मंडळी दहादा विचार करतील, नाही का?
विपो ही जीनिव्हास्थित संस्था याविषयी जागृती आणि नियमनाचे काम करते.
आमच्या कंपनीने दहा वर्षांपूर्वी एकदम १२५ जणांना विपोच्या बेसिक प्रमाणपत्र परीक्षेला बसवले होते, आणि आम्ही ऐंशीजण उत्तीर्ण झालो होतो. जिनेव्हावरून आलेले गुळगुळीत प्रमाणपत्र आपल्याला सुखावून जातेच, पण पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क याविषयी सर्वसाधारण माहिती होते हा एक मोठा फायदा. हल्ली अन्य बऱ्याच कंपन्या हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. एक तासाच्या या परीक्षेला शुल्क नाही, साहित्य सामग्री ऑन लाईन उपलब्ध आहे - कुणीही ती परिक्षा अगदी मोफत देऊ शकतात. आजही अनेक मोफत परीक्षा उपलब्ध आहेत आणि अल्प शुल्कात कांही विशेष प्राविण्य परीक्षा देता येतात.
२०१५ मध्ये कोरियन सॅमसंगने ऍपलला पेटंट हक्क उल्लंघन करून स्मार्टफोन बाजारात आणल्याबद्दल बिलियन डॉलर्सची नुकसानभरपाई दिल्याचे उदाहरण अगदी ताजे आहे. त्यामुळे काय झाले? तर सॅमसंग जरा शहाणे झाले. असं समजण्याचं कारण म्हणजे २०१६ मध्ये पुण्यातल्या एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या प्राध्यापकाला कंपनीच्या वकिलाचा फोन आला, की त्याचे इमेज प्रोसेसिंगसंबंधी असलेले सॉफ्टवेअरचे पेटंट सॅमसंग विकत घेऊ इच्छिते. विश्वास बसणार नाही अश्या किमतीला म्हणजे रुपयांमधे सुमारे एक कोटीला ते पेटंट विकले गेले. दुधाने पोळल्यावर ताकही फुंकून पिण्याचा प्रकार असला तरी पेटंटचे महत्वच यामुळे अधोरेखित होते.
कल्पना सुचली, नवीन आहे, तर पेटंट करून ठेवावे. अर्थात तेही दीर्घकाळीं टिकणारे नसते. मर्यादित काळानंतर कालबाह्य होते . ते जागतिक पातळीवरचे असेलच असे नाही. नुसते भारत, भारत अन चीन किंवा भारत+ युरोप असे कॉम्बो मध्ये घेता येते - त्यातले कायदेशीर मुद्दे आणि त्या संपदेचा प्रकार लक्षात घेऊन किती वर्षांसाठी संरक्षण मिळेल हे पेटंट सल्लागाराशी बोलून पहाता येते. पेटंट घ्यायचा खर्च सुमारे दहा ते वीस हजार रुपये येतो, पण आयुष्यभर सांगण्यासारखे किंबहुना मिरवण्यासारखे क्वालिफिकेशन आहे ते! आज भारतातून पन्नास हजारावर पेटंट्स दरवर्षी दाखल होतात. एकेकाळी आपल्या मागे असणाऱ्या चीनने २०१५ च्या जागतिक २९ लाख पैकी १०.१ लाख पेटंट्स दाखल करून पहिला क्रमांक पटकावला आहे. अमेरिका आणि जपान अनुक्रमे ५ आणि ४ लाखावर बरेच मागे आहेत. सरकारी पातळीवर चीन त्यांच्या आंतरराष्ट्रीय पेटंट धारकाला एक कोटी आरएमबी इतके अनुदान बक्षीस म्हणून देते. तिथले विद्यार्थी झपाटल्यासारखे पेटंट्स लिहीतायत. आपण खरंच फार मागे आणि आहोत. अश्याने नवी कल्पनासुद्धा निव्वळ उशीर झाला म्हणून आधीच दुसऱ्या कुणाच्या तरी नावावर लागते. अशी परिस्थिती मीही अनुभवली आहे.
जगभरात आजचा दिवस - २६ एप्रिल 'बौद्धिक संपदा दिवस' म्हणून साजरा होतो. कुठलीही आणि कुणाचीही निर्मिती, ही त्याची वैयक्तिक संपत्ती मानून त्याचा व्यावसायिक वापर करण्यापूर्वी परवानगी घेणे, नामनिर्देश अथवा किंमत मोजून वापरणे आवश्यक आहे, याची जागृती करण्याचा दिवस. २००० सालापासून औपचारिकरीत्या हा दिवस साजरा करतात. याच दिवशी मूर्त स्वरूपात विपो ही संस्था सुरू झाली. बौद्धिक संपदेमध्ये साहित्य, कला, संगीत, चिन्हे- आकृती, उत्पादन, त्यासाठीच्या विविध पद्धती, हे सर्व आलेच, पण त्याचा आवाका आणखीही मोठा आहे. एखाद्याच्या व्यावसायिक फायद्यावर गदा आली तर तो बौद्धिक संपदा हक्क दाखवून भरपाईसाठी उभा राहू शकतो.त्यासाठीचे नियम, नुकसानभरपाईची मोजणी , त्यासाठीच्या पद्धती -आता निश्चित केले गेले आहेत.
पेटंटची सुरुवात सव्वादोनशे वर्षांपूर्वी झाली. १० एप्रिल १७९० ला अमेरिकन पेटंट कायदा झाला. लगेच तीन महिन्यांत आधुनिक जगातले पहिले पेटंट सॅम्युअल हॉपकिन्स या अमेरिकनाला ३१ जुलै १७९० रोजी मिळाले. त्याने पोटॅश खताच्या मिश्रणासाठी हे पेटंट घेतले. पेटंटकरिता त्या त्या देशाच्या पातळीवर संघटना सुरू होणे, आंतरराष्ट्रीय संस्थ्यांशी ताळमेळ सुरू होणे, त्याचे विविध मसुदे, सामील होत गेलेले नवे देश आणि आजच्या सुदृढ अवस्थेतली १८९ देशांची विपो ही संस्था. हा इतिहास रंजक आहेच, पण तो जालावर वाचायलाही उपलब्ध आहे. प्रगत जगाला बौद्धिक संपदा हक्काची जाणीव आधी आणि जलद झाली. जोडीला परस्पर देशांतले पूरक कायदे, सहकार्य यामुळे विभागीय व्यापारात त्यांनी त्याचा उपयोग चांगला करून घेतला. जालावर माहिती घेताना असे दिसले की थॉमस एडिसनने १०९३ पेटंट्स मिळवली, त्यातली तब्बल १०८४ संशोधने, तर नऊ कलात्मक डिझाईनसाठी होती!
पेटंट म्हणले की आपल्या संदर्भात लगेच आठवते ते कडूनिंब, बासमती तांदूळ, हळदीचे पेटंट अन डॉ. माशेलकरांचा त्याविरोधात यशस्वी लढा !! परंपरागत ज्ञान या सदरात या वनस्पती आणि त्यांचे उपयोग येत असल्याने, शेकडो वर्षे घरोघरी वापरात असल्याने भारतीयांची बाजू वरचढ झाली अन अनर्थ टळला हे आपल्याला आठवत असेलच. त्या सगळ्या घटनाक्रमातून पेटंटविषयी जागृती कमी, अन देशाभिमान, आयुर्वेद कसा श्रेष्ठ याची चर्चाच जास्त झाली. म्हणजे ते कमी महत्वाचे आहे असे नव्हे, पण त्यातून बोध घेऊन आपण इतरांच्या बौद्धिक संपदेचा सन्मान करू लागलो का? तर फारसा नाही. भारतीयांचे पेटंट दाखल करण्याचे प्रमाण वाढले का? नाही - कारणे काही असोत, आपण तिथे कमी पडलो. कदाचित भरल्या पोटी ही जागरूकता अधिक चांगली जोपासली जात असेल.
मागच्या दशकात एका अमेरिकन ग्राहकाशी चर्चा करताना समजले, की आयपीआरच्या बाबतीत त्यांचा चीनपेक्षा भारतीयांवर अधिक विश्वास आहे. चिनी लोकांनी केव्हाच असा इतरांचा आदर करणे सोडले होते. त्या ग्राहक कंपनीचे उत्पादन चीनमध्ये आणि विकसन आमच्या कंपनीत होई. असे असून तिथल्या एका टिनपाट कंपनीने ते उपकरण जसेच्या तसे बाजारात आणले होते. पत्र्याच्या केसवर असलेला जुन्या डायवरचा एक अनावश्यक राहून गेलेला पंचसुद्धा जसाच्या तसा मारलेला. पण तक्रार करून फायदा झाला नाही, त्यांचे सरकार अश्या स्थानिक चोरांना मदतच करते.
कला, संगीताच्या क्षेत्रातही हे हक्क महत्वाचे आहेत. चित्रपट-नाटकाच्या पटकथा आता सुचल्या की लेखकाला त्या नोंदवून ठेवता येतात, नाहीतर लेखक राहील बाजूला अन बडे निर्माते हिट्ट चित्रपट देऊन मोकळे होतील!
चित्रपटातल्या एका प्रसंगात पार्श्वसंगीत म्हणून रेडिओवर लागलेले गाणे, अन्नू मलिकने त्याची 'प्रेरणा' घेऊन गाणे कंपोज करणे, खऱ्या रेडिओवर लागलेले तेच गाणे, पार्टीत कुणी सहज ते गाणे म्हणले तर त्या वेगवेगळ्या बाबी आहेत. पहिल्या तिघांनी व्यावसायिक उपयोग केला म्हणून परवानगी घेणे / मोबदला देणे/ उल्लेख करणे आवश्यक आहे, तर चौथे अव्यावसायिक, किंवा वैयक्तिक करमणूक असल्याने परवानगी किंवा पैसे द्यावे लागत नाहीत. अश्या अनेक घटना/ प्रसंग, चित्रे, चिन्हे, ट्रेडमार्क्स आपल्याला जाता येता रोजच दिसतात. जागृती होत जाईल तसे स्वतः संपदा हक्काचे उल्लंघन न करणे , मग दुसऱ्याला करू न देणे आणि आपल्या कलाकृतीचे हक्काने पैसे मागणे हे हळूहळू सुरू होईल.
जागतिक संघटनेकडून दरवर्षी कला, संस्कृती, उद्योग यातला एक विषय घेऊन जनजागृती केली जाते. या वर्षीचा विषय आहे- Innovation - Improving Lives. यावर्षी आपले जीवन आरोग्यपूर्ण , आरामदायी , सुरक्षित करण्यासाठीच्या कल्पना आणि उत्पादन-सेवांचा प्रसार केला जाईल. हवामान बदल, आरोग्य आणि वाढत्या लोकसंख्येचे प्रश्न हाताळण्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे . त्यासंबंधी तुमच्या कल्पना इथे फेसबुक पानावर मांडू शकता,
किंवा त्यासाठीच्या चिवचिवाटात सामील होऊ शकता .. #worldipday
बौद्धिक संपदा हक्क (IPR) आता ऐकून ऐकून आपल्या चांगले परिचित झालेत. तरी 'चलता है ' संस्कृतीतून आपण पूर्णपणे बाहेर पडलो नसल्याने हे हक्क जोपासणाऱ्यांपेक्षा ते पायदळी तुडवणारेच जास्त दिसत आहेत . त्यासाठी कायदे आहेतच, कठोर अंमलबजावणी झाली तर ओझे वाटण्याऐवजी बौद्धिक संपदेचा आदर करायला लागू अन प्रगत समाज म्हणून तसल्या सभ्यतेच्या दोन पावले जवळ जाऊ !
चला तर मग, आजच एक संकल्प करूया- येत्या काळात एक तरी पेटंट मिळवूयात ! त्यासाठी शुभेच्छा!
संदर्भ:
विपो संस्थळ
दूरशिक्षण दुवा वर्गीकरण
प्रतिक्रिया
लेख आवडला.
मस्त लिहिलेय. अतिशय आवडला लेख
खूपच छान. खरोखर या विषयात
करा की! लोकशिक्षण हाच तर
हो, विपो ची साईट पण चांगली
मस्तच खेडूत राव, आवडली माहिती
उपयोगी माहिती
इथे शोधावे लागेल.
मस्त माहिती
दुसरी बाजू
खूप छान माहिती. समयोचित लेख!
छान लेख, यावर मी देखील बऱ्याच
उत्तम लेख
काही दिवसापुर्वी , लोकसत्ता
चांगला लेख आहे.