✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मनातल्या मनात !!

अ
अर्धवटराव यांनी
Sun, 04/02/2017 - 15:17  ·  लेख
लेख
बरेच दिवस मनाविषयी चार ओळी टंकायची इच्छा होती. पण मन मानत नव्हतं :) आता थोडं मनावर घेतोय. आजवर मनावर जितका विचार झालाय तेव्हढा कदाचीत कुठल्याच विषयावर झाला नसावा. तत्वज्ञ, कवि, साहित्यीक, वैज्ञानीक, दार्शनीक... किंबहुना अवघी मानवजात या एका विषयाचं गेली कित्येक शतकं चिंतन करतेय. पण मन बालकृष्णासारखं समस्त वैचारीक ब्रह्मांड व्यापुन दशांगुळे उरतच. मनच ते. साधारणपणे 'भावना' या विषयाला धरुन मनाचा अभ्यास सुरु होतो. 'विचार' आणि/किंवा भावना या दोन घटकांची संगती लावणं हा फार मजेदार विषय आहे. प्रचंड मोठं शास्त्र उभं आहे याचा अभ्यास करायला. अलीबाबाची गुहाच ति. यच्चयावर मानवी व्यवहारांचे धागेदोरे अत्यंत क्लीष्ट, पण तेव्हढेच नेमकेपणाने गुंफलेले आढळतात मनाच्या महावस्त्रात. आता प्रश्न येतो कि हि भावना म्हणजे नेमकं काय. सोप्या शब्दात सांगायचं तर एक विशिष्ट क्रिया करायला शरीराला सज्ज करण्याची यंत्रणा म्हणजे भावना. जीवशास्त्रं म्हणतं कि प्रेरणेला प्रतिसाद देणं हे सजीवाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. शुद्ध मराठीत आपण त्याला रिस्पॉन्स टु स्टिम्युलस म्हणतो. आहार-निद्रा-भय-मैथुन या प्रेरणा प्रकारांबरहुकूम शरीराने प्रतिक्रीया द्यावी म्हणुन शरीराला एका विशिष्ट अवस्थेत घेऊन जाण्यासाठी जे काहि रासायनीक उपद्व्याव शरीरात होतात त्याला आपण भावना म्हणतो. साधारणपणे हि क्रिया क्षणार्धात होते. संकटाची चाहुल लागली कि हरीण कान टवकारतो, नाग फणा काढतो, सरडा रंग बदलतो, भीमाचे स्नायु फुरफुरतात, धर्मेंद्रच्या जिभेवर कमिने-कुत्ते वगैरे शब्द आपापली पोझीशन घेतात. प्रेरणेची दाहकता, शरीराची घडण व इतर परिस्थितीनुसार या क्रियेची लांबि-रुंदी बदलते. उद्देश मात्रं एकच. रिस्पॉन्स टु स्टिम्युलस. मनाचा दुसरा घटक म्हणजे विचार. इतर प्राण्यांच्या मानाने मानवाला हे वैचारीक दान अगदी भरभरून देण्यामागे निसर्गाची काय इच्छा असेल कोण जाणे. पण माकडसदृश एका प्राण्याचा मेंदु एका विशिष्ट प्रकारे डेव्हलप झाला. त्या प्राण्याला आपण मानव असं नाव दिलं. शरीराचे इतर उपद्व्याप सांभाळण्यापलिकडे या मानवी मेंदुचं काम तसं बघितलं तर इतर प्राण्यांसारखच आहे. ते काम म्हणजे गणितीय समिकरणं. चित्त्याचा मेंदु भक्षावर फायनल झेप कधि घ्यायची याचं समीकरण मांडतो. एकदा झेप झाली कि भक्ष्य मिळो अथवा न मिळो त्याचे सरकारी बाबुसारखे संध्याकाळचे पाच वाजतात. धृवीय प्राणी याच न्यायाने पोटाचे पेटारे भरुन आपल्या शीतकालीन निद्रेची सोय करते. मोराचे नृत्य असो वा गोगलगाईचा विजेच्या चपळाईने केलेला प्रवास, सर्वांची समीकरणं काहि ठरावीक उद्दीष्टाच्या भोवती अगदी गच्च आवळलेले असतात. मानवाच्या बाबतीत मात्र या समीकरणांच्या जंत्रीचा परिघ फार म्हणजे फारच मोठा असतो. इतका मोठा, कि नेमका कुठल्या उद्दीष्टासाठी हि समीकरणं चालली आहेत हे कळेनासं व्हावं. हा परिघ इतका मोठा व्हायचं कारण म्हणजे मानवी मेंदुला इतर प्राण्यांच्या मानाने काळाचं अफाट भान असणे होय. चित्ता मागच्या-पुढच्या काहि क्षणांचा विचार करुन स्वस्थ बसतो. मानवी मेंदुसाठी अशा मागच्या-पुढच्या संदर्भाला काहिच मर्यादा नाहि. या परिघीय संदर्भांनाच आपण म्हणतो "विचार". या विचारांचं जंजाळ किती खोल असावं याचा काहि थांगपत्ता नाहि. हा डोलारा सांभाळायला स्मृतीची सोबत असतेच. असं हे भावना आणि विचारांचं कॉकटेल घेऊन मानवी मेंदु आपली करामात दाखवत असतं. त्याची अनेक प्रतलं असतात. कुठली भावना विचारांच्या आश्रयाने समुद्रात बुडालेल्या एखाद्या जहाजाप्रमाणे मेंदुत कुठेतरी पडुन असेल व कधि उफाळुन वर येईल याचा नेम नाहि. विचारांच्या पृष्ठभागावर मेंदु एखादं समीकरण मांडत असेल. ते तसच खालच्या प्रतलांमधे गडप होऊन आपलं उत्तर शोधत बसेल. उत्तर सापडलं कि सरसरुन परत पृष्ठभागावर येऊन "सरप्राइझ" म्हणुन कधि बोंब ठोकेल सांगता येत नाहि. ब्रेनवेव्ह वगैरे प्रकरणं याच सदरात मोडतात. हे सगळं मनुष्यप्राणी जंगलात रहायचा तोपर्यंत ठीक होतं. निसर्गाने मानवाला पक्षांप्रमाणे पंख दिले नाहि. हत्तीची शक्ती दिली नाहि. सापाचं विष दिलं नाहि. मासोळीची पोहोण्याची क्षमता दिली नाहि. हे सर्व कंपन्सेट करायला म्हणुन कि काय, एक प्रगत मेंदु देऊन टाकला... आणि लोचा झाला ना राव. माणुस झाडामाडांच्या जंगलातुन बाहेर पडला व त्याच्या मेंदुने आपलं स्वतःचं जंगल निर्माण केलं. आता शरीर टिकवायला भावना नामक सिस्टीम जुनीच, पण प्रेरणा निर्माण करणारे घटक मात्रं वैचारीक असं नवीन नाटक सुरु झालं. जंगलात असताना वाघाची डरकाळी ऐकुन भिती नामक भावना धावायची प्रेरणा उत्पन्न करायची. आता ऑफीसात बॉस ओरडला कि हिच भिती धावायला सांगते, पण प्रॉब्लेम असा कि त्याची गरजच नसते. मग आणखी नाटकं सुरु होतात. भावनांचा कंट्रोल काय, विचारांना आवरणं काय, सुख-दु:खांवर रामबाण उपाय काय, मनाला शटडाऊन करणं काय... बरच काय काय. आपलं जगणं हि अशी मनाशी केलेल्या व्यवहारांची गाथा असते. खरं तर "मनाशी व्यवहार" वगैरे काहि भानगड नसते. कारण आपण आणि मन अशी काहि विभागणीच नसते. मनाची कवाडं आपापसात कुजबुजतात फक्त. पण मनाचा व्यवहार वगैरे म्हटलं कि कसं एकदम फिलॉसॉफीकल वाटतं :) कोळ्याने स्वतःच जाळं विणाव व आपणच त्रयस्थासारखं त्यात भटकत राहावं असं काहिसं मनाचं होतं. कल्पकता, बुद्धी, भावनांचा कल्लोळ, समीकरणं सोडवताना सतत बदलणार्‍या भुमीका, त्यातनं निर्माण होणार्‍या स्व-आयडेण्टिटी, सुख-दु:खांचे प्रसंग. मग त्यावर उपाय शोधताना इतर प्रश्न निर्माण होणं. असं सगळं मस्तपैकी चाललं असतं. त्यावर खात्रीशीर उपाय काहि सांगता येत नाहि. एक मात्रं नक्की. मनाशी व्यवहार करताना त्याला उगाच चिडवु नये. उदा. प्रसंग जर दु:खाचा असेल तर उगाच मुद्दाम त्याला कुठल्या अवडंबराखाली दाबु नये, कि नकारु नये, किंवा त्याला खोटा ठरवु नये. मनाला त्याचा स्वतःचा मार्ग काढण्याची मोकळीक दिली कि ते बरोबर आपलं आनंदनिदान शोधतच. आळस, अहंकार, भिती, नैराश्य... समस्या काहिही असली तरी शेवटी आहे तो मनाचा स्वतःचा केमीकल लोचा असतो.. त्याचा त्याला निस्तरु द्यावा. तर सांगायचा मुद्दा असा... मुद्दा वगैरे काहि नाहि. झोप येत नव्हती म्हणुन कळफलक बडवायला घेतला :) . झोपतो आता.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
30732 वाचन

💬 प्रतिसाद (128)

प्रतिक्रिया

वर चाललेल्या डिप्रेशन च्या

संदीप डांगे
गुरुवार, 04/06/2017 - 00:46 नवीन
वर चाललेल्या डिप्रेशन च्या चर्चेबद्दल. डिप्रेशन मधून बाहेर पडायला अध्यात्म किंवा मेडिटेशन उपयोगाचे नाही. डिप्रेशन साठी उपाय म्हणून अरा म्हटले तसे सकारात्मक प्रेरणेला प्रोत्साहन द्यावे लागते. डिप्रेशन हा आजार आहे, स्वयंनिंर्णय नाही, स्वेच्छा नाही हे लक्षात असू द्यावे. वर चाललेली दिग्गजांची चर्चा मानसशास्त्र व अध्यात्म अशा परस्परविरोधी मान्यतांचे एकमेकांशी भिडणे आहे. आउटपुट झिरो.
  • Log in or register to post comments

:)

अर्धवटराव
गुरुवार, 04/06/2017 - 00:52 नवीन
आउटपुट झिरो हे ठाऊक आहे :) सदर चर्चेत अध्यात्माबद्दल चर्चा करण्याचा अजिबात हेतु नाहि. तसंही "हे संस्थळ अध्यात्मीक चर्चा करायला अजीबात लायक नाहि" हे माहित आहे ना ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

@ संदीप ,

संजय क्षीरसागर
गुरुवार, 04/06/2017 - 12:39 नवीन
१) डिप्रेशन हा आजार आहे, स्वयंनिंर्णय नाही, स्वेच्छा नाही हे लक्षात असू द्यावे. डिप्रेशन हा मनाच्या नेगटिवीटीचा परिणाम आहे. स्वेच्छेचा अर्थ व्यक्तीची इच्छा असा होतो. जोपर्यंत व्यक्ती स्वतः डिप्रेशनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत ते कायम राहील. व्यसनमुक्तीतही स्वेच्छाच काम करते. डिप्रेशनमधे जाण्याची कारणं असंख्य असू शकतील पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग व्यक्तीनं स्वतःला सावरणं हाच आहे. जेव्हा व्यक्ती स्वतःला सावरते तेव्हा मनाची नेगटिवीटी दूर होण्याचा मार्ग सापडतो, अन्यथा नाही. २) वर चाललेली दिग्गजांची चर्चा मानसशास्त्र व अध्यात्म अशा परस्परविरोधी मान्यतांचे एकमेकांशी भिडणे आहे. अध्यात्म हा स्व-जागरणाचा विषय आहे आणि मानसशास्त्र मनाचा आभ्यास आहे. स्व-जागृतीविना मनाचा आभ्यास धोक्याचा आहे कारण सैरभैर झालेलं मन केव्हाही स्व-विस्मरण घडवून व्यक्तीला स्वतःच्या काह्यात घेऊ शकतं. ३) आउटपुट झिरो तसं वाटत असेल तर या चर्चेत भाग न घेतलेला बरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

संक्षि, तीन स्पष्ट प्रश्न.

संदीप डांगे
गुरुवार, 04/06/2017 - 13:00 नवीन
संक्षि, तीन स्पष्ट प्रश्न. १. डिप्रेशन हा आजार आहे की राग-लोभ-मोह-मत्सर ह्यासारखी भावना? २. डिप्रेशनच्या आजारात (आणि बहुतेक नशामुक्तीमध्येही) जी मेंदूत रासायनिक परिणाम घडवून आणणारी औषधे दिली जातात, त्याबद्दल काय मत आहे? ३. एखादी नशा 'चढल्यावर' व्यक्तिचं आपल्या कृती-विचारांवर पूर्ण नियंत्रण असते की नसते? (नशा चढणे म्हणजेच नियंत्रण गमावणे म्हटले जाते.) उत्तरे आल्यावर चर्चा करायची की नाही ते पुढे ठरवू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

संदीप,

संजय क्षीरसागर
गुरुवार, 04/06/2017 - 13:24 नवीन
पहिल्यांदा ` आऊटपुट झिरो' हा शेरा मागे घ्या तरच चर्चा होईल. कारण अश्या पूर्वग्रहातून प्रतिसाद वाचले तर तुमच्यासाठी आऊटपुट कायम झिरो राहील. आणि मग प्रतिसाद देऊन वेळ घालवण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

मानसशास्त्र व अध्यात्म अशा

संदीप डांगे
गुरुवार, 04/06/2017 - 13:39 नवीन
मानसशास्त्र व अध्यात्म अशा परस्परविरोधी मान्यतांचे एकमेकांशी भिडणे >> ह्यातून आऊटपूट झिरो असतो हा आतापर्यंतचा माझे वैयक्तिक अनुभव व निरिक्षणावर आधारलेला निष्कर्ष आहे. त्याच्याशी इथल्या चालू चर्चेचा संबंध नाही. दोन वेगळ्या मान्यतांचे एकमेकांशी एकाच पटलावर येणे अशक्य आहे. सो आउटपूट झिरो असेल. तेवढं सोडून द्या. मला फक्त 'रसायनांचे मेंदूवर होणारे परिणाम व त्यानुसार बदलणारी व्यक्तीची निर्णयक्षमता' या लिमिटेड मुद्द्यावर चर्चा अपेक्षित आहे. (खरेतर बाह्य घटकांमुळे घडणारा, घडवून आणला जाणारा मनोव्यापार हा लिमिटेड नव्हे तर वास्ट असा मुद्दा आहे. मार्केटींग व अ‍ॅडवर्टायझिंग हे क्षेत्र ह्याच मुद्द्यावर टिकून आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

नो !

संजय क्षीरसागर
गुरुवार, 04/06/2017 - 13:55 नवीन
मानसशास्त्र व अध्यात्म अशा परस्परविरोधी मान्यतांचे एकमेकांशी भिडणे ह्यातून आऊटपूट झिरो असतो हा आतापर्यंतचा माझे वैयक्तिक अनुभव व निरिक्षणावर आधारलेला निष्कर्ष आहे. मानशास्त्र किंवा मनोव्यापार समजल्याखेरीज अध्यात्म व्यर्थ आहे. त्यामुळे अध्यात्म हा प्रथम चरणात मनाचा उलगडा आहे. थोडक्यात, स्वतःप्रत येण्याचा मार्ग मनाचा महाल पार करुनच जातो. तुम्ही म्हणतायं तशी `रसायनांचे मेंदूवर होणारे परिणाम व त्यानुसार बदलणारी व्यक्तीची निर्णयक्षमता' यावर इथे डेटा ओतला जाईल. मग मतभेदांमुळे वाद होईल आणि निष्पन्न काहीएक होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

मानसशास्त्र, सायकॅट्री,

संदीप डांगे
गुरुवार, 04/06/2017 - 14:05 नवीन
मानसशास्त्र, सायकॅट्री, सायकॉलॉजी वगैरेंमध्ये केला जाणारा मनोव्यापाराचा अभ्यास आणि अध्यात्मात केला जाणारा मनोव्यापाराचा अभ्यास ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अभ्यासाची विषयवस्तू एक असली तरी गृहितके, प्रयोग, निष्कर्ष, परिणाम वेगवेगळे आहेत. शास्त्रज्ञ मनोचिकित्सा करतांना वेगवेगळ्या रसायनांच्या, कार्यकारणभावाच्या अनुषंगाने मनाचा (प्रत्यक्षात मेंदूचा) अभ्यास करतात. अध्यात्मात असं अजिबात होत नाही. (अध्यात्मात कसं होतं ते इथे उलगडत बसत नाही, ती शब्दांची नव्हे तर अनुभवाची गोष्ट आहे) तस्मात चर्चा निष्फळ होते कारण दोन ग्रहावर दोघे आपण अशी स्थिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

.

संजय क्षीरसागर
गुरुवार, 04/06/2017 - 15:01 नवीन
अभ्यासाची विषयवस्तू एक असली तरी गृहितके, प्रयोग, निष्कर्ष, परिणाम वेगवेगळे आहेत. सहमत आहे. शास्त्रज्ञ मनोचिकित्सा करतांना वेगवेगळ्या रसायनांच्या, कार्यकारणभावाच्या अनुषंगाने मनाचा (प्रत्यक्षात मेंदूचा) अभ्यास करतात. अध्यात्मात असं अजिबात होत नाही. मानसशास्त्र व्यक्तीला, `सोशली नॉर्मल' (समाजशील व्यक्ती) बनवण्याचा प्रयत्न आहे आणि अध्यात्म व्यक्तीला `व्यक्तीमत्त्वातून मुक्तता' देण्याचा प्रयत्न आहे. पण इथे चर्चा फार वेगळ्या विषयावर चालली आहे. लेखकाच्या मते मनंच सर्वसत्ताक आहे आणि `आपण' अशी काही मनावेगळी चिजच या दुनियेत नाही ! त्यांनी तर अशी हद्द केलीये की `मनावेगळे आपण ही मनानीच स्वतःच्या सुखासाठी केलेली कल्पना आहे !' आणि त्याहून ग्रेट म्हणजे त्यांना वाटतंय की मनावेगळे आपण ही स्प्लीट पर्सनॅलिटी आहे. आणि माझं म्हणणंय : आपण सर्वसत्ताक आहोत आणि मन हा शरीरस्थित बायोकंप्युटर आहे. आपण तो वापरु शकतो पण मन म्हणजे सर्वस्व नाही. आणि याही पुढे जाऊन माझं असं म्हणणं आहे की स्व-विस्मरण हाच मनोरुग्ण होण्याचा प्रथम चरण आहे. त्यामुळे ही चर्चा योग्य मार्गानं गेली तर सदस्यांना उपयोगी होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

@ संदीप,

संजय क्षीरसागर
गुरुवार, 04/06/2017 - 15:47 नवीन
१) १. डिप्रेशन हा आजार आहे की राग-लोभ-मोह-मत्सर ह्यासारखी भावना? डिप्रेशन हा मूड आहे. तो विचार आणि भावनांपेक्षा गहीरा आहे आणि त्यामुळे दीर्घकाळ टिकू शकतो. पण कोणताही मनोविकार उद्भवण्याचं मूळ कारण स्व-विस्मरण हेच आहे. २) २. डिप्रेशनच्या आजारात (आणि बहुतेक नशामुक्तीमध्येही) जी मेंदूत रासायनिक परिणाम घडवून आणणारी औषधे दिली जातात, त्याबद्दल काय मत आहे? अनुभव नाही. ध्यानप्रणालींचा आभ्यास केल्यामु़ळे तशी आवश्यकताही वाटली नाही. ३) ३. एखादी नशा 'चढल्यावर' व्यक्तिचं आपल्या कृती-विचारांवर पूर्ण नियंत्रण असते की नसते? (नशा चढणे म्हणजेच नियंत्रण गमावणे म्हटले जाते.) अर्थात ! पण यात एक मेख आहे. निद्रा हे पूर्ण आत्मविस्मरण आहे आणि त्यामुळे देह पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जातो. काही प्रमाणात चढलेली नशा ही निद्रा पण सतत चालू असलेले विचार यांच्या मधली स्थिती आहे. म्हणजे जागृत आणि विचारांची रहदारी कमी झालेली. अशा वेळी नव्या कल्पना सुचणं, इतर वेळी न होऊ शकणारं साहस करता येणं, वैचारिक उहापोह कमी झाल्यामुळे मूड लाइट होणं अशा गोष्टी घडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

.

संजय क्षीरसागर
गुरुवार, 04/06/2017 - 16:09 नवीन
काही प्रमाणात चढलेली नशा ही निद्रा आणि सतत चालू असलेले विचार यांच्या मधली स्थिती आहे. म्हणजे जागृत पण विचारांची रहदारी कमी झालेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

डिप्रेशन हा मूड आहे. तो विचार

सुबोध खरे
Fri, 04/07/2017 - 20:39 नवीन
डिप्रेशन हा मूड आहे. तो विचार आणि भावनांपेक्षा गहीरा आहे आणि त्यामुळे दीर्घकाळ टिकू शकतो. पण कोणताही मनोविकार उद्भवण्याचं मूळ कारण स्व-विस्मरण हेच आहे. मनोविकार हा इतका साधा सोपा विषय नाही. स्व विस्मरण न होता ही मनोविकार होतात. http://apps.who.int/iris/bitstream/10665/37958/8/9241544228_eng.pdf येथे पण ४१ वर पहा डिप्रेशन चे किती अगणित प्रकार आहेत ते. बाकी -- आपण अध्यात्मावर लिहा. आम्ही सवडीने वाचतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मेडिटेशन उपयोगाचे नाही.

अनुप ढेरे
Fri, 04/07/2017 - 11:54 नवीन
मेडिटेशन उपयोगाचे नाही.
अनलेस तुम्ही मानसशास्त्रज्ञ नाही तोपर्यंत कोणत्याही बाजूची ठाम विधानं नका करू डांगे अण्णा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

ते खरं आहे

पैसा
Fri, 04/07/2017 - 17:22 नवीन
मी एका सायकिअ‍ॅट्रिस्टकडून ऐकलं आहे. क्रॉनिक किंवा सिव्हियर डिप्रेस्ड असलेली व्यक्ती मेडिटेशनचा अनुभव घेऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

ढेरेसाहेब, शास्त्रज्ञ

संदीप डांगे
Fri, 04/07/2017 - 18:28 नवीन
ढेरेसाहेब, शास्त्रज्ञ असल्याशिवाय ठाम विधाने करु नये हे जरा विचित्र आहे, किंवा एकूणच ठाम विधाने करण्याचा अधिकार कोणाला असावा हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे. वरचे विधान ठामच आहे, भले मी मानस शास्त्रज्ञ नसलो किंवा असलो तरी त्याने फरक पडत नाही, दुसरे असे की सेवियर, किंवा इंटर्मिजीएट लेव्हल च्या डिप्रेस्ड लोकांनी मेडिटेशन करणे अधिक नुकसानकारक आहे असे मानले जाते. त्यामागे रीतसर कारणे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

मुद्दा हा की हा लय नाजूक आणि

अनुप ढेरे
Fri, 04/07/2017 - 18:40 नवीन
मुद्दा हा की हा लय नाजूक आणि महत्वाचा विषय आहे. जालावर नॉन एक्सपर्ट्सकडून आलेली असली ठाम विधानं डिप्रेस्ड लोकांची विधानं दिशाभूल करू शकतात. या केसमध्ये तुम्ही बरोबर आहात का चूक हा मुद्दाच नाही. लोकांनी डाक्टराचा सल्ला घेतलेला उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

नाजूक आणि महत्त्वाचा विषय आहे

संदीप डांगे
Fri, 04/07/2017 - 19:58 नवीन
नाजूक आणि महत्त्वाचा विषय आहे म्हणूनच विधानाच्या अर्थाकडे बघा अशी विनंती करतो. "डिप्रेशनमध्ये मेडिटेशन उपयोगाचे नाही" ह्या विधानाला एखाद्या आजारी व्यक्तीने तज्ञाकडे न जाता ब्लाइण्डली फॉलो केल्यास काय धोका उद्भवू शकतो ते मला तरी दिसत नाही. 'मेडिटेशनमुळे डिप्रेशन बरे होण्यास मदत होते' असा कोणा आजारी माणसाला नॉन-एक्सपर्टकडून सल्ला मिळाला असल्यास तर तो मात्र प्रत्यक्षात धोकादायक आहे. माझे उपरोल्लिखित विधान ह्याच्या अगदी विरोधी आहे. मी इथे कोणालाही हे करुन बघा, ह्याचा अमुक आजारात फायदा होतो असा सल्ला वा सुचना दिलेली नाही. सगळ्यात महत्त्वाचे पारंपरिक ध्यान ज्याला मेडिटेशन, एकाग्र होऊन मन स्थिर करण्याचा प्रयत्न करणे, ह्यापासून पुढच्या सगळ्या स्टेप्स ह्या मानसिकरित्या निरोगी व्यक्तीने करायच्या असतात. कोणी डिप्रेशनवर उपाय वा मदत म्हणून ह्याकडे मेडिटेशनकडे पाहत असेल तर दूरच राहावे असे म्हणेन. हे दूर राहा म्हणणे संबंधित व्यक्तीच्या फायद्याचे आहे, त्यासाठी रितसर तज्ञांकडून सल्ला घेऊन उपचार करणे हा मार्ग दिसू शकतो. त्यात जर का त्या तज्ञानेच मेडिटेशन करायचा सल्ला दिल्यास तो त्याच्या डायग्नोसिसचा विषय आहे. मी इथे कोणत्याही चुकीच्या गोष्टीची (क्वॅक थेरपीज) भलामण किंवा पाठराखण केलेली नाही हे आवर्जून नमूद करतो. तरीही आक्षेप असल्यास या क्षेत्रातले मिपावर तज्ञ असतील तर त्यांच्याकडून खुलासा होइल अशी अपेक्षा करतो. ------------------------ साधारणपणे कोणत्याही प्रकारच्या आजारावर जाल-ज्ञान वापरुन उपाय करु नये असा दंडक असावाच. जालावर मेडिटेशन हा डिप्रेशनवर उपाय म्हणून सांगणारे व त्या विरुद्ध बोलणारे अनेक आर्टिकल्स मिळतील. इथे थोडं मेडिटेशन काय याबद्दल बोलतो. आणि ते कुठे उपयोगाचे त्यावरही बोलतो. ध्यान ही एक साधना पद्धत आहे. उपचार पद्धत नाही. काही आजारांत, स्थितींमध्ये याचे सकारात्मक साइडइफेक्ट्स दिसून येतात. पण त्यासाठी ध्यान करावे असे नसते. हा पहिला दंडक. एका मानसिक निरोगी व्यक्तीला रोजच्या जीवनातल्या कटकटी, स्ट्रेस, इ. चा मनावर ताण येतो, त्यामुळे मन अस्वस्थ राहतं, निर्णयक्षमता प्रभावित होऊ शकते. अनेक प्रसंगात ओवररिअ‍ॅक्ट केल्या जाऊ शकते. तर रोजच्या जीवनात असे प्रसंग हाताळण्यासाठी मन स्थिर, चित्तदशा समतल असणे आवश्यक असते. नुकसान-फायदा-अपमान-स्तुती इत्यादी गोष्टींकडे तटस्थ भावाने बघून निर्णय घेता येणे शक्य होते. म्हणजे भावनेच्या भरावर नियंत्रण येते. हे थोडेफार वरवरचे सर्वसाधारण फायदे आहेत. जसे जसे ध्यान अधिक उत्तम होत जाते त्याचे तसतसे फायदे मिळत जातात. हे निरोगी व्यक्तीने मजबूत व्यायाम व दणदणीत खुराक खाण्यासारखे असते. असाच दणदणीत व्यायाम व मजबूत खुराक आजारी व्यक्तीला सुचवला जात नाही. त्यास हलकं-फुलकं आरोग्यास पूर्वपदाला आणण्यास मदत करेल असे प्रकार सुचवले जातात. दुसरे महत्त्वाचे की ध्यान हे गुरुंकडून शिकावे लागते. ध्यान म्हणजे डोळे मिटून बसणे, अजिबात न हलणे हे वरवर दिसणारे बाह्य रुप नव्हे. त्याशिवाय बरंच काही घडत असतं, त्या घडण्याला सहाय्यक म्हणून डोळे-मिटणे, शांत-बसणे असतं. नुसतं असे असे बसतात मग आपण पण बसुया म्हटल्याने ध्यान होत नसते. तसेच ध्यान म्हणजे एकाग्रतेचा, मनोनिग्रहाचा व्यायाम नाही. तसे समजणेही चूक आहे. ध्यानाच्या अनेक पद्धती आहेत, पण त्या शास्त्रशुद्ध शिकल्या तरच उपयोगाच्या, (शास्त्रशुद्ध म्हणजे सायंटिफिक वाले शास्त्र नव्हे, तत्सम नियमांत राहून केलेलं, उगा वाद नको) म्हणजे ध्यानाचा योग्य पद्धतीने फायदा घ्यायचा असल्यास ते शास्त्रशुद्ध पद्धतीने गुरुंकडून शिकून घेणे व तसेच करणे आवश्यक असते. त्यात आपल्या मनचे जोडून, किंवा काढून करणे चुकीचे होते. वरील दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेता, ध्यान हे निरोगी व्यक्तीने शास्त्रशुद्ध मार्गदर्शनात करायची गोष्ट आहे असे समजेल. आता तिसरी. समजा इण्टरमिजिएट किंवा क्रॉनिक लेवलच्या व्यक्तीने ध्यान करायचा प्रयत्न केला उदा: अ) स्वतःच्या मनाने डोळे मिटून बसून राहिले, फायदा शून्य. ब) शास्त्रशुद्ध शिकून ध्यानाचा प्रयत्न केला तर काही पातळ्या असतात जिथे व्यक्तीच्या मनातल्या खोल दडलेल्या, दडवलेल्या भावना ज्वालामुखीसारख्या उचंबळून बाहेर येतात, तेव्हा त्यांचे नियंत्रण करणे किंवा पू-अशुद्ध रक्त जसा वाहून जाऊ देते तसे त्याकडे बघत वाहून जाऊ देणे मानसिक आजारी व्यक्तीला शक्य होईल असे नसते. त्यातून समस्या गंभीर होऊ शकतात. शास्त्रशुद्ध ध्यान हे पूर्ण निरोगी ते सर्दी-पडसा झालेली व्यक्ती ह्या रेंजमधल्या लोकांसाठी उपयोगाचे आहे. म्हणजे स्ट्रेस, दडपण, भिती, असुरक्षितपणा, चिंता, चिडचिड, वगैरे सर्वसाधारण परिस्थितीत ध्यान केल्यास चांगलीच मदत होते. पण काही लोक हेच ताणून थेट मानसिक आजारात ध्यान उपयोगाचे असे विधान करत असतात, त्याबद्दल सावध असावे. वर उल्लेखलेल्या स्थिती ह्या निरोगी माणसांना जाणवतच असतात, त्या क्रॉनिकमध्ये डेवलप होऊ नये म्हणून ध्यान मदत करते. पण ते आजारावरचा उपाय म्हणून बिन्धास्त वापरणे हे तितकेच धोकादायक आहे जितके प्रिस्क्रिप्शन शिवाय कोणत्याही नॉन-ओटीसी गोळ्या घेणे. माझ्या विधानातून कोणतेही आर्थिक, शारिरीक, मानसिक नुकसान होत नसल्याचे दिसल्याने माझ्या विधानाच्या ठामपणाबद्दल शंका नाही. तरीही त्यात काही चुकीचे किंवा शंकास्पद आहे असे सिद्ध झाल्यास विधान नक्कीच मागे घेईन, व संपादकांना संपादित करायची विनंती करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

बाय द वे,

संजय क्षीरसागर
Fri, 04/07/2017 - 20:11 नवीन
`मेडिटेशन' म्हणजे नक्की काय याची प्रतिसाददात्यांपैकी कुणाला कल्पना आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

मेडिटेशन' म्हणजे नक्की काय

सुबोध खरे
Fri, 04/07/2017 - 20:14 नवीन
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4109098/ Neural mechanisms of mindfulness and meditation: Evidence from neuroimaging studies
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

The word “meditation” stems

सुबोध खरे
Fri, 04/07/2017 - 20:16 नवीन
The word “meditation” stems from the Latin meditari, which means to participate in contemplation or deliberation. Meditation includes a variety of practices aimed at focusing attention and awareness. Two general forms of meditation exist. These are focused attention and open monitoring[3]. Initially a practitioner will often utilize focused attention practice to enhance attentional skills[4]. Then, it will be possible to engage in open monitoring, which involves moment-by-moment awareness of whatever occurs in one’s awareness[4].
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मला विचारताय काय सर? मला

संदीप डांगे
Fri, 04/07/2017 - 20:15 नवीन
मला विचारताय काय सर? मला विचारत असाल तर अजिबात नाही, शून्य कल्पना आहे मला. आय अ‍ॅम जस्ट अ स्टुडंट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

रजनीशांच्या ध्यान विधी

मारवा
Fri, 04/07/2017 - 22:05 नवीन
सुंदर वैविधय्पुर्ण आहेत. काही वर्षांपुर्वी जपान मध्ये वास्तव्याला असतांना एका झेन ग्रुप च्या संपर्कात आलेलो होतो. ते रजनीश चे ही फॅन होते. त्यांचे रीच्युअल्स विचीत्र होते. मात्र मेडीटेशन्स टेक्नीक्स भन्नाट होत्या. काही अती प्रतिभाशाली पण तितक्याच विक्शीप्त लोकांचा भरणा त्यात होता. तेव्हाच मी तिथे पहील्यांदाच. सुंदर फुलाकडे एकटक पाहत राहणे नंतर काही काळानंतर ते फुल जणु माझ्याकडे पाहत आहे हा भाव मनात कल्पून बघणे. त्या फुलाकडुन. रीव्हर्सली ब्युटीफुली एनरजाइज होणे इ. संवेदनशील विधी तिथे प्रयोगात घेत. त्यानंतर मी रजनीश मेडीटेशन्सची पुस्तके वाचलेली. पण मुळ प्रक्रुती वेगळी असल्याने त्यांचा अंतरगत सदस्य काही होण्याचा प्रश्न नव्हता. जपान सोडल्यावर तो ग्रुप ही सोडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

डिटेल प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद

अनुप ढेरे
Fri, 04/07/2017 - 20:11 नवीन
डिटेल प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.
मी इथे कोणत्याही चुकीच्या गोष्टीची (क्वॅक थेरपीज) भलामण किंवा पाठराखण केलेली नाही हे आवर्जून नमूद करतो.
याच्याशी सहमत आहे. पण वर म्हटल्याप्रमाणे तुम्ही इथे बरोबर्/चूक यावर आक्षेप नाहीच. मला खरच नाही वाटलं की नक्की हो/नक्की नाही ही विधानं नॉन एक्सपर्ट्सकडून येऊ नयेत असं वाटलं. मेबी माझं मत चूक असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

तुमचे म्हणणे शंभर टक्के मान्य

संदीप डांगे
Fri, 04/07/2017 - 20:20 नवीन
तुमचे म्हणणे शंभर टक्के मान्य आहे, तुम्ही आक्षेप घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद, त्यामुळे मला माझी (नॉन-एक्स्पर्ट) बाजू मांडता आली. त्यावर एक्सपर्ट बाजू पडताळून गरजू व्यक्ती निर्णय घेतील अशी अपेक्षाही निर्माण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

'आपण' आणि 'मन'

गामा पैलवान
गुरुवार, 04/06/2017 - 01:13 नवीन
अर्धवटराव, मला तुमच्या आणि संक्षींच्या वादांत पडायचं नाहीये. फक्त तुमचं एक विधान दुरुस्त करावंसं वाटलं. हे ते विधान :
.... मनाचा परिघ फार विषाल आहे... त्यात "आपण" आणि "मन" अशा भिंती पाडण्यात काहि अर्थ नाहि.
गंमत अशीये की मनाचा परीघ फार विशाल असल्यानेच त्यात 'आपण' आणि 'मन' अशा भिंती पाडाव्या लागतात. आपण स्वप्नामध्ये असतांना मनसुद्धा असतंच. पण ते जागृतावस्थेपेक्षा वेगळं काहीतरी असतं. शिवाय देह कुठे असतो हाही प्रश्न आहेच. त्यामुळे 'आपण' आणि 'मन' वेगळे मानावेत अशा मताचा मी आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

ऑफ्कोर्स..

अर्धवटराव
गुरुवार, 04/06/2017 - 04:40 नवीन
विचारांच्या, अभ्यासाच्या सोयीकरता म्हणुन मन आणि आपण हे वेगळे मानावेच लागतात. 'मेरे दिल मे आज क्या है' वगैरे भाव त्याशिवाय प्रकट होऊ शकत नाहि. एखादा मानसोपचारतज्ञदेखील 'तुमच्या मनात काय चाललय ते सांगा' अशीच संवादाची सुरुवात करतो. पण हि विभागणी केवळ एक सोय आहे, हे सत्य नाकरुन कसं चालेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

स्वप्नातलं मन

गामा पैलवान
गुरुवार, 04/06/2017 - 11:45 नवीन
अर्धवटराव, स्वप्नात देह जागृत नसतांना देहाची अनुभूती देण्याइतपत मन शक्तिशाली असतं. मग स्वप्नातलं मन खरं की खोटं मानावं? देहाप्रमाणे मनाचाही कशावरून भासच होत नसेल स्वप्नात? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

गामाश्री,

संजय क्षीरसागर
गुरुवार, 04/06/2017 - 12:49 नवीन
१) स्वप्नात देह जागृत नसतांना देहाची अनुभूती देण्याइतपत मन शक्तिशाली असतं. स्वप्नातून बाहेर पडणं म्हणजे मनाच्या चित्रपटातून बाहेर पडणं आहे. मन देहाची अनुभूती देत नाही तर आपण मनाच्या कब्जातून बाहेर येतो. २) मग स्वप्नातलं मन खरं की खोटं मानावं? देहाप्रमाणे मनाचाही कशावरून भासच होत नसेल स्वप्नात? मन एकच आहे आणि त्याचा चलतपट आहोरात्र चालूच असतो. दिवसाच्या उजेडामुळे तो दिसत नाही पण रात्रीच्या अंधारात, डोळे मिटल्यामुळे तो स्पष्ट होतो इतकंच. थोडक्यात, ज्याप्रमाणे चित्रपटगृहात पडदे आणि दरवाजे उघडले की स्क्रीन धूसर होऊन चित्र अस्पष्ट होतं आणि पुन्हा अंधार केल्यावर ते स्पष्ट होऊन वास्तविक वाटायला लागतं तसा प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

मन कधिही खोटं नसतं

अर्धवटराव
Fri, 04/07/2017 - 00:43 नवीन
जागृत अवस्थेत मन शारीरीक स्टिम्युलसला रिस्पोन्स देत असतं असते तर निद्रीत अवस्थेत वैचारीक स्टिम्युलसला. तसं बघितलं तर जागृती, निद्रा, बेशुद्धी.. अवस्था कुठलिही असेना, मन आपलं काम करतच असतं. शरिराचे स्टिम्युलस विचारांत परिवर्तीत होणं, किंवा त्या उलट, हे ही मनात होत असतं. त्यापैकी एका विशिष्ट क्षणी कुठला स्टिम्युलस एक्झिक्युट होतोय याचं निदान करणं कठिण आहे. मनाची प्रतलं इतकी खोल असतात कि त्यांचा पूर्ण ट्रेस काढता येत नाहि. अर्थात, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यात नविन ते काय :) भास म्हणजे "जे उपलब्ध नाहि नाहि त्याचि जणिव" या अर्थाने म्हणत असाल, तर भासमान वस्तुचं का होईना, प्रोसेसींग होतच आहे कि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

सगळ्या सव्यापसव्यातून शेवटी

यशोधरा
गुरुवार, 04/06/2017 - 13:09 नवीन
सगळ्या सव्यापसव्यातून शेवटी काही ठरले का?
  • Log in or register to post comments

का नाही ठरणार ?

संजय क्षीरसागर
गुरुवार, 04/06/2017 - 13:29 नवीन
चर्चा जर योग्य मार्गानं गेली तर हा `मन आणि आपण' या महत्त्वाच्या विषयावर चाललेला उहापोह आहे. इट इज अपटू द मेंबर्स अँड ऑफकोर्स दि ऑथर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

संक्षी, चर्चा आहे कुठे?

यशोधरा
गुरुवार, 04/06/2017 - 15:56 नवीन
संक्षी, चर्चा आहे कुठे? नुसतेच आरोप - प्रत्यारोप आणि मी म्हणेन तेच सत्य हेच दिसते आहे धागाभर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मी तर प्रामाणिकपणे प्रतिसाद देतोयं !

संजय क्षीरसागर
गुरुवार, 04/06/2017 - 16:14 नवीन
संदीपला वर दिलेला प्रतिसाद पाहिलात तर माझा स्टँड कळेल : लेखकाच्या मते मनंच सर्वसत्ताक आहे आणि `आपण' अशी काही मनावेगळी चिजच या दुनियेत नाही ! त्यांनी तर अशी हद्द केलीये की `मनावेगळे आपण ही मनानीच स्वतःच्या सुखासाठी केलेली कल्पना आहे !' आणि त्याहून ग्रेट म्हणजे त्यांना वाटतंय की मनावेगळे आपण ही स्प्लीट पर्सनॅलिटी आहे. आणि माझं म्हणणंय : आपण सर्वसत्ताक आहोत आणि मन हा शरीरस्थित बायोकंप्युटर आहे. आपण तो वापरु शकतो पण मन म्हणजे सर्वस्व नाही. आणि याही पुढे जाऊन माझं असं म्हणणं आहे की स्व-विस्मरण हाच मनोरुग्ण होण्याचा प्रथम चरण आहे. त्यामुळे ही चर्चा योग्य मार्गानं गेली तर सदस्यांना उपयोगी होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

चर्चा पुढे नेणं म्हणजे फक्त

यशोधरा
गुरुवार, 04/06/2017 - 18:00 नवीन
चर्चा पुढे नेणं म्हणजे फक्त तुमची मतं ग्राह्य असणं आणि इतरांची मतं धुडकारुन लावणं, असं तर होत नाही ना? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

असं कुठेयं ?

संजय क्षीरसागर
गुरुवार, 04/06/2017 - 18:54 नवीन
प्रत्येकाकडे स्वतःचा किबोर्ड आहे ! आणि जो तो स्वतःची मतं व्यक्त करतोयंच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मला तर जास्त करुन एकमेकांना

यशोधरा
Fri, 04/07/2017 - 18:45 नवीन
मला तर जास्त करुन एकमेकांना खोडून काढायची स्पर्धा चालल्याचं वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आपण आहोत ही एकमात्र निर्विवाद गोष्ट आहे

संजय क्षीरसागर
Fri, 04/07/2017 - 20:50 नवीन
आणि लेखक तीच नाकारतायंत. आता मी तरी काय करणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

बघा, "चर्चा पुढे नेणं म्हणजे

यशोधरा
Sat, 04/08/2017 - 09:14 नवीन
बघा, "चर्चा पुढे नेणं म्हणजे फक्त तुमची मतं ग्राह्य असणं आणि इतरांची मतं धुडकारुन लावणं, असं तर होत नाही ना? :) " हा मुद्दा सिद्ध होतो आहे. थोडक्यात काय, इनिमिनीमायनीमो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अहो मॅडम, इथे मन स्वत:लाच खोडुन काढतय

अर्धवटराव
Fri, 04/07/2017 - 21:19 नवीन
मुद्दे किस खेत कि मुली है :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

खेत की मूली आवडत नसेल. :)

यशोधरा
Sat, 04/08/2017 - 09:43 नवीन
खेत की मूली आवडत नसेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

संदीप भाया...

अर्धवटराव
Fri, 04/07/2017 - 01:35 नवीन
अध्यात्म आणि मानसशास्त्र हे भिन्न विषय आहेत हे खरंच आहे. अधात्माचा विषय या चर्चेत मला आणायचा नव्हता. पण आता विषय निघालाच आहे म्हणुन... अध्यात्मात मनाचा 'कंट्रोल' अपेक्षीत नसुन मनाची परिपक्वता अपेक्षीत आहे... ज्याला आपण शुद्ध मराठीत मॅचुरिटी म्हणतो. मनात आत्मभाव असतोच. अध्यात्मात हा आत्मभाव विश्वात्मक आत्मभावाशी समरस होतो. एकच तत्व शरीर, मन, बुद्धी, जाणिव, सर्व प्रकाराची सृष्टीरचना, त्यांचं ट्रान्स्फॉर्मेशन... हे सर्व करत अक्षुण्ण राहाते, त्या विश्वात्मक आत्मभावाशी मनाचा आत्मभाव एकरूप होणं हे त्या परिपक्व मनाकडुन अपेक्षीत आहे. तिथे मनाला कंट्रोल करण्याची, शटडाऊन करण्याची, युटिलीटी म्हणुन वापर करण्याची शक्यताच संपते. अहो, जेंव्हा शरीर, मन, बुद्धी, चेतना, "आपण".. हे सर्व एकाच तत्वाची रुपे आहेत हा बोध झाला तिथे कोण कोणाला कंट्रोल करायची इच्छा करेल? "आनंदचे डोहि आनंद तरंग" या अवस्थेत मनाला शटडाऊन करुन मग सुखोपभोग घ्यायची बुद्धी तरी होईल काय ? जी संपूर्ण मुक्त अवस्था आहे त्यात मन बळजबरीने शटडाऊन किंवा कंट्रोल झालं असेल कि मनसुद्धा संपूर्ण मुक्ती भोगत असेल ? अध्यात्मात मन कंट्रोल / शटडाऊन अवस्थेत जात नसुन आत्मभाव विश्वात्मक झाल्यामुळे मन फुलासारखं टक्क उमललेलं असतं, स्वच्छ-पारदर्शी झालेलं असतं. मनाला जे काहि दिलं ते व्यर्थ होलं, त्यामुळे मनाला कंट्रोल करा, त्याला शटडाऊन करा म्हणजे तुम्ही स्वेच्छेने जगणारे सिद्धपुरुष व्हाल, हि एक थेअरी. ते काहि आपल्याला पटत नाहि. परिपक्व, एकदम जीवंत मनाचा आत्मभाव विश्वात्मक आत्मभावाशी एकरूप होऊ देत, म्हणजे तुम्ही आनंदविभोर व्हाल, हे माझं आकलन. किंबहुना अध्यात्म वगैरे बाजुला राहु देत, सुखी रहायला मनात प्रेम आणि मेंदुत विवेक एव्हढं भांडवल पुरेसं आहे असं मल वाटतं. अर्थात, मी मनाच्य संपूर्ण कह्यात गेलेला, गोंधळलेला, पराभूत मानसिकतेचा सामान्य माणुस आहे. मी आपला पराभव सुरुवतीलाच कबुल करतो :). तसंही, हा धागा अध्यात्माविषयी नाहि.
  • Log in or register to post comments

:-) :-)

जयंत कुलकर्णी
Fri, 04/07/2017 - 03:00 नवीन
:-) :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

अध्यात्मावर बोलायचो तेव्हा

संदीप डांगे
Fri, 04/07/2017 - 03:01 नवीन
अध्यात्मावर बोलायचो तेव्हा जाणवले की आपण अजून तैय्यार नाही. आता असं वाटतं की तैय्यार झाल्यावर काहीही बोलावेसे वाटणार नाही. सो, आपला पास.... :-) ----------------------------- मनाची गिरणी चालु द्या... दळणाचे डबे येऊ द्या. पण गिरणीमालक गिरणी बंद करतो तेव्हा कितीही आली तरी दळणे दळली जात नाहीत. गिरणीमालक आणि गिरणी वेगळे आहेत की एकत्र... हा मात्र सनातन प्रश्न आहे. - थोडी गनपावडर. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

आमची नुसतीच पावडर.

अर्धवटराव
Fri, 04/07/2017 - 04:24 नवीन
अध्यात्मावर बोलायचो तेव्हा जाणवले की आपण अजून तैय्यार नाही. आता असं वाटतं की तैय्यार झाल्यावर काहीही बोलावेसे वाटणार नाही.
खरय. पावडरः गिरणी मालक गिरणी बंद करुन, ति सोडुन, परत वापस येऊन गिरणी चालु करु शकत असेल तर ते भिन्न आहेत. अन्यथा ते एकाच गिरणी ऑपरेशनचे घटक आहेत. तसं बघितलं तर मालकपण हाच मुळी भास आहे. पण ते जाऊ दे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अर्धवटराव जी काही प्रामाणीक प्रश्न

मारवा
Fri, 04/07/2017 - 07:42 नवीन
१ अभिप्रेत असे अद्वैत साध्य झाल्यानंतर. प्रतयकश जीवनाचे काय प्रयोजन शिल्लक राहते ? २ द्वैत शिल्लक असल्याने जो नातेसंबंधाचा डोलारा होता त्याच्याशी अद्वैतस्थ व्यक्ती कशी डील करते.? विशेषतहा. .सेक्शूअल. रीलेशनशीप संदर्भात जिचा मुलाधार द्वैत भाव आहे. ३ कसोटीच्या. भौतीक जीवनातील परीस्थीतीत अद्वैतस्थ व्यक्ती जी नैतीक भुमिका धेतो त्याचा आधार त्याचा व्यापक स्व त्याच्या अनुभवातला हाच असेल तर द्वैती च्या वअद्वैतीस्थ च्या स्व मध्ये आकशेप व फरक कसा करणार ?
  • Log in or register to post comments

मारवाजी...

अर्धवटराव
Fri, 04/07/2017 - 08:10 नवीन
अगदी प्रामाणिक उत्तर म्हणजे... मला माहित नाहि. ज्याने अद्वैत साधले आहे तो या प्रश्नांची उतरं देऊ शकेल. तरि अंदाज लावायला हरकत नाहि :)
अभिप्रेत असे अद्वैत साध्य झाल्यानंतर. प्रतयकश जीवनाचे काय प्रयोजन शिल्लक राहते ?
जीवनाचे तसेही काहि प्रयोजन आहे असं वाटत नाहि. प्रयोजन संपल्यानंतर प्रायोजीत सब्जेक्ट क्लोस होतो. जीवन कधिच क्लोस होत नाहि. अद्वैत साधणे हि द्वैतातल्या जगण्याची गरज आहे. ति गरज मारुन-मुरकुटुन जबरदस्तीने पैदा करता येत नाहि. म्हणजे कसं, कि आजपासुन मी अद्वैताच्या वाटेला जाणार असं काहि ठरवुन करता येत नाहि. पण ति मनात असते कुठेतरी. काहि कारणाने ते झपाटलेपण आलेच उफाळुन कि माणुस अद्वैताची कास धरतो.
द्वैत शिल्लक असल्याने जो नातेसंबंधाचा डोलारा होता त्याच्याशी अद्वैतस्थ व्यक्ती कशी डील करते.? विशेषतहा. .सेक्शूअल. रीलेशनशीप संदर्भात जिचा मुलाधार द्वैत भाव आहे.
तसं बघितलं तर अ‍ॅब्सोल्युट अद्वैत अवस्थेत माणुस जगाच्या रहाटगाडग्यासंदर्भात निरुपयोगी होतो. म्हणजे तो लिटरली पिशाच्चवत वागेल असं नाहि, पण सामान्य सामाजीक,कौटुंबीक संकेतांप्रती तो उदासीन होऊ शकतो. काहि जण त्या अवस्थेतुन मुद्दाम स्वतःला एक पायरी मागे ठेवतात, जेणेकरुन त्यांचं काहि कार्य शिल्लक असेल तर ते संपवावं.
कसोटीच्या. भौतीक जीवनातील परीस्थीतीत अद्वैतस्थ व्यक्ती जी नैतीक भुमिका धेतो त्याचा आधार त्याचा व्यापक स्व त्याच्या अनुभवातला हाच असेल तर द्वैती च्या वअद्वैतीस्थ च्या स्व मध्ये आकशेप व फरक कसा करणार
द्वैतीचा स्व मी-तू असा सापेक्ष असतो तर अद्वैतीचा विश्वाकार. त्यांच्या नैतिक भुमीका कंपेअर करण्याचं काहिच कारण नाहि. अथवा, द्वैती अवस्थेतील नैतिकतेला कमि दर्जाचं देखील मानता येत नाहि. प्रामाणिकपणा महत्वाचा. फरक फक्त एकच कि अद्वैती आपल्या भुमिकेच्या परिणामांपासुन अलिप्त असतो. ते स्वातंत्र्य द्वैतीला नाहि.
  • Log in or register to post comments

आता निदान अध्यात्मिक अज्ञान तरी लपवाल तेवढं बरं !

संजय क्षीरसागर
Fri, 04/07/2017 - 12:41 नवीन
१) जीवनाचे तसेही काहि प्रयोजन आहे असं वाटत नाहि. एक्झॅक्टली हेच फ्रस्ट्रेशन तर मनाला सर्वस्व मानणारा अनुभवतो ! जीवन हेच जीवनाचं प्रयोजन आहे आणि आनंदानं जगणं ही त्याची निष्पत्ती आहे. २) तसं बघितलं तर अ‍ॅब्सोल्युट अद्वैत अवस्थेत माणुस जगाच्या रहाटगाडग्यासंदर्भात निरुपयोगी होतो याला म्हणतात अध्यात्मिक आंधार ! अद्वैत झालेला निवांत होतो. त्याच्यासाठी जग स्वप्नवत होतं. इतरांना त्याचं जगणं मार्गदर्शक तत्व होतं. प्रणय त्याच्यासाठी कंपल्शन राहात नाही. तो आनंद शेअर करण्याचा एक बहाना होतो. ३) द्वैतीचा स्व मी-तू असा सापेक्ष असतो तर अद्वैतीचा विश्वाकार. काहीही फेकाफेकी ! अद्वैत ही स्थिती आहे, व्यक्ती नाही. नैतिकता त्या स्थितीत `रुल्स ऑफ द गेम' इतपत वास्तविकता राहाते. तीचं बंधन राहात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

का बरं लपवांवं आध्यात्मीक अज्ञान?

अर्धवटराव
Fri, 04/07/2017 - 21:34 नवीन
मला आध्यात्म कळत नाहि हे स्वच्छ कबुल केलच आहे कि. सायकोलॉजीला अध्यात्माच्या नावाने खपवायचा स्मार्टनेस मला नाहि दाखवता येत.
जीवन हेच जीवनाचं प्रयोजन आहे आणि आनंदानं जगणं ही त्याची निष्पत्ती आहे.
म्हणजेच जीवनांच वेगळं काहि असं प्रयोजन नाहि. रिअ‍ॅक्शन देण्याची घाई विषयाचं आकलन होऊ देत नाहि. उतावीळ मन शांतपणे विचार करु देत नाहि. बिग प्रॉब्लेम.
याला म्हणतात अध्यात्मिक आंधार ! अद्वैत झालेला निवांत होतो. त्याच्यासाठी जग स्वप्नवत होतं. इतरांना त्याचं जगणं मार्गदर्शक तत्व होतं. प्रणय त्याच्यासाठी कंपल्शन राहात नाही. तो आनंद शेअर करण्याचा एक बहाना होतो.
काळ्या उजेडापेक्षा अध्यात्मीक अंधार बरा आहे कि. स्वप्नवत जगाने सत्य जगाचं मार्गदर्शन करुन काय पाडायचा तो उजेड पाडलाच आहे.
काहीही फेकाफेकी ! अद्वैत ही स्थिती आहे, व्यक्ती नाही. नैतिकता त्या स्थितीत `रुल्स ऑफ द गेम' इतपत वास्तविकता राहाते. तीचं बंधन राहात नाही.
बरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मन मनास उमगत नाही

पैसा
Fri, 04/07/2017 - 09:53 नवीन
मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा ! स्वप्‍नांतिल पदर धुक्याचा हातास कसा लागावा ? मन थेंबांचे आकाश लाटांनी सावरलेले मन नक्षत्रांचे रान अवकाशीं अवघडलेले मन गरगरते आवर्त मन रानभूल, मन चकवा मन काळोखाची गुंफा मन तेजाचे राऊळ मन सैतानाचा हात मन देवाचे पाऊल दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा ? चेहरा-मोहरा ह्याचा कुणि कधी पाहिला नाही धनि अस्तित्वाचा तरीही ह्याच्याविण दुसरा नाही ह्या अनोळखी नात्याचा कुणि कसा भरवसा द्यावा ? --सुधीर मोघे
  • Log in or register to post comments

मोघे छान लिहायचे !

संजय क्षीरसागर
Fri, 04/07/2017 - 12:11 नवीन
मन मनास उमगत नाही... हे उमगणारे आपण आहोत ! आणि एकदा मन उमगल्यावर ते आपल्या काह्यात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा