उद्यापासून भारतात ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाविरूद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना गहुंजे (पुणे) येथे गुरूवार २३ फेब्रु ते सोमवार २७ फेब्रु या कालावधीत खेळला जाईल.
मी गहुंजे येथील पहिला कसोटी सामना बघण्यास जाणार आहे. जमल्यास तिथूनच किंवा नंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर सामन्याविषयी लिहीन व काही फोटोही टाकेन. कोणी मिपाकर सामना बघण्यास येणार असतील तर त्यांची भेट घ्यायला आवडेल.
मी यापूर्वी नेहरू स्टेडिअम येथे इंग्लंडविरूद्ध खेळला गेलेला एक एकदिवसीय सामना तिकीट न काढता घुसून बघितला होता. त्याच मैदानावर काही रणजी व दुलीप ट्रॉफीचे सामनेही तिकीट न काढता पाहिले होते. कसोटी सामना प्रत्यक्ष बघण्याची ही पहिलीच वेळ आणि स्वतःच्या पैशाने तिकीट काढून सामना बघण्याची सुद्धा ही पहिलीच वेळ. या कसोटीत अनेक आवडत्या खेळाडूंना प्रत्यक्ष डोळ्यासमोर खेळताना बघणार आहे.
पुण्यात/पुणे परीसरात प्रथमच कसोटी सामना खेळला जात आहे. यापूर्वी पुण्यातील नेहरू स्टेडिअमवर काही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले गेले होते. त्यातील शेवटचा सामना २००५ मध्ये खेळला गेला होता. त्यानंतर पुण्यात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेलेला नाही. उद्यापासूनच प्रथमच गहुंजे येथील मैदान एक नवीन कसोटी केंद्र म्हणून उदयास येत आहे.
मालिकेचे वेळापत्रक असे आहे (सर्व सामने सकाळी ९:३० ते दुपारी ४:३० या वेळात खेळले जातील).
पहिला कसोटी सामना - गहुंजे (पुणे) येथे २३ ते २७ फेब्रु
दुसरा कसोटी सामना - बंगळूर येथे ४ ते ८ मार्च
तिसरा कसोटी सामना - रांची येथे १६-२० मार्च
चौथा कसोटी सामना - धर्मशाळा येथे २५-२९ मार्च
भारताने पहिल्या दोन कसोटींसाठी जाहीर केलेल्या संघात नेहमीच्या यशस्वी खेळाडूंप्रमाणे कुलदीप यादव व जयंत यादव हे नवोदीत खेळाडू आहेत. अभिनव मुकुंदचे बर्याच कालावधीनंतर संघात पुनरागमन झाले आहे. त्रिशतकी वीर करूण नायर सुद्धा संघात आहे. मात्र सातत्याने अपयशी ठरलेल्या के एल राहुलला पुन्हा एकदा संघात घेतले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघात कर्णधार स्टिव्हन स्मिथसह डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू वेड, मिचेल मार्श, शॉन मार्श, अॅश्टन अॅगर, जॅकसन् बर्ड, जॉश हॅजलवूड, पीटर हॅन्ड्सकॉम्ब, उस्मान ख्वाजा, नेथन लॉयन, ग्लेन मॅक्सवेल, स्टिव्हन ओ'कॅफी, मॅट रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप्सन इ. खेळाडू आहेत.
भारतीय खेळपट्ट्यांचे स्वरूप लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियाने संघात फिरकी गोलंदाजांचा भरणा केला आहे. अर्थात अश्विन व जडेजाच्या फिरकीसमोर ऑसीज किती टिकाव धरू शकतात ते कळेलच. त्यांच्या जोडीला अमित मिश्रा सुद्धा आहे. भारताने भारतात खेळली गेलेली मागील मालिका ४-० अशी निर्विवाद जिंकली होती. परंतु २०१५ मध्ये भारताचा ऑस्ट्रेलियात ०-२ असा पराभव झाला होता. एकंदरीत दोन्ही देश आपापल्या भूमीत जिंकतात असेच मागील २-३ दशकात दिसून आले आहे (अपवाद भारतातील २००४ मधील मालिकेचा). भारताने लागोपाठ ६ मालिका जिंकून कसोटी क्रमवारीत प्रथम स्थान मिळविले आहे. भारताने मागील सलग १९ कसोटी सामन्यात पराभव पत्करलेला नाही. त्यामुळे याही मालिकेत भारतातेच पारडे जड आहे.
उद्यापासून भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना रांची येथे सुरू होत आहे. गहुंजेप्रमाणे रांची येथे प्रथमच कसोटी सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे ५ दिवसांच्या सामन्यात खेळपट्टी कसे रंग दाखवेल हे सांगता येणे अवघड आहे. नवीन खेळपट्टी असल्याने दोन्ही संघ नाणेफेक जिंकल्यास प्रथम फलंदाजीचाच निर्णय घेतील असे वाटते.
पहिल्या दोन सामन्यानंतर मालिकेत १-१ अशी बरोबरी आहे. पहिला सामना शांततेत पार पडला असला तरी दुसर्या सामन्यात डीआरएस व बाचाबाची यामुळे वाद निर्माण झाले होते. विशेषतः स्टीव्हन स्मिथने डीआरएस मागण्याआधी ड्रेसिंग रुमकडे बघून डीआरएस बद्दल अंदाज घ्यायचा प्रयत्न करणे, इशांत शर्माने तोंड वेडेवाकडे करून स्टीव्हन स्मिथची नक्कल करणे अशा गोष्टींमुळे वातावरण बिघडायला सुरूवात झाली आहे.
भारत प्रथमच डीआरएसचा वापर करीत आहे व ते तंत्र भारताला फारसे जमलेले नाही. भारताने मागितलेले बहुतेक रिव्ह्यू भारताविरूद्धच गेले. भारताकडून कोहली व ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नर अपयशी ठरत आहे. ते पुन्हा एकदा भरात यावेत अशी अपेक्षा आहे.
स्टार्क व मिचेल मार्श दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले असून ऑस्ट्रेलियाला त्यामुळे धक्का बसलेला आहे. स्टार्कऐवजी पॅट कमिन्सला आणले आहे व मार्शऐवजी मार्कस स्टॉईनिस संघात आला आहे. स्टार्कने गोलंदाजी व फलंदाजीतही भारताला वैताग आणला होता.
उद्याचा कसोटी सामना हा ऑस्ट्रेलियाचा ८०० वा कसोटी सामना असणार आहे. स्टिव्हन स्मिथला आपल्या ५००० धावा पूर्ण करण्यासाठी फक्त ७६ धावांची गरज आहे. पॅट कमिन्स आपला पदार्पणाचा कसोटी सामना २०११ मध्ये आफ्रिकेविरूद्ध खेळला होता. त्यात त्याने पहिल्या डावात १ व दुसर्या डावात ६ बळी घेतले होते. तब्बल ६ वर्षांच्या खंडानंतर तो पुन्हा कसोटी सामना खेळण्याची शक्यता आहे. भारतीय संघात एकमेव बदल होण्याची शक्यता आहे, तो म्हणजे अभिनव मुकुंदच्या जागी मुरली विजय पुन्हा संघात येऊ शकतो.
बघूया उद्या काय होतंय ते.
चहापानापर्यंत ऑसीज ४ बाद १९४. स्टिव्हन स्मिथ ८० वर नाबाद आहे. तो मालिकेतील दुसरे शतक करण्याच्या मार्गावर आहे. डेव्हिड वॉर्नर पुन्हा एकदा १९ धावांवर बाद होऊन अपयशी ठरला. रेनशॉने पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करून ४४ धावा केल्या. यादवने २ तर जडेजा व अश्विनने प्रत्येकी १ बळी घेतला. इशांत शर्माला अजून बळी मिळालेला नाही. एकंदरीत इशांत शर्माऐवजी भुवनेश्वर किंवा शमी जास्त उपयोगी ठरला असता.
पहिल्या दिवसाखेर ऑसीजने ४ बाद २९९ अशी भक्कम मजल मारलेली आहे. स्मिथने मालिकेतील दुसरे शतक केले. तो ११७ धावांवर नाबाद आहे तर ग्लेन मॅक्सवेल ८२ वर नाबाद आहे. स्टिव्हन स्मिथ भारताला कायमच नडत आला आहे. भारताविरूद्ध त्याने खेळलेल्या मागील ७ कसोटीत (या कसोटीसहित) त्याने एकूण ६ शतके केली आहेत. २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने चारही सामन्यात शतक केले होते. या मालिकेतील पहिल्या कसोटीत आणि आजच्या कसोटीतही त्याने शतक केले आहे. अशीच फलंदाजी सुरू राहिली तर ऑस्ट्रेलिया उद्या किमान ४५० पर्यंत मजल मारू शकेल.
क्षेत्ररक्षण करताना विराट कोहलीचा खांदा दुखावला आहे. त्यामुळे तो नंतर दिवसभर क्षेत्ररक्षणाला आला नाही. आज संध्याकाळी त्याच्या उजव्या खांद्याचे स्कॅनिंग होणार आहे. त्याची दुखापत कितपत गंभीर आहे ते उद्या सकाळीच समजेल. तो उद्या फलंदाजीसाठी तंदुरूस्त झाला तरी बराच वेळ मैदानाबाहेर असल्याने त्याला भारताचे किमान ५ फलंदाज बाद झाल्याशिवाय फलंदाजीला येता येणार नाही. जर त्याची दुखापत गंभीर असेल तर त्याला या कसोटीत फलंदाजी करता येणार नाही व ऑस्ट्रेलियाच्या धावांच्या डोंगरासमोर त्याच्याशिवाय भारत अत्यंत अडचणीत सापडू शकेल.
राहुलने या मालिकेत ५ डावातील ४ थे अर्धशतक केले. प्रथमच तो इतक्या जबाबदारीने व सातत्याने खेळताना दिसत आहे. मुरली विजयने पुनरागमन करताना चांगली फलंदाजी करून अर्धशतक केले. पुजाराला सूर गवसला आहे. मागील डावात तो ९२ वर बाद झाल्याने त्याचे शतक हुकले होते. मात्र या डावात त्याने नाबाद शतक केले आहे. या मालिकेत भारतातर्फे झालेले हे पहिलेच शतक.
कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. ६ वर असताना स्लिपमध्ये झेल देऊन तो बाद झाला. आतापर्यंत झालेल्या ५ डावात त्याने फक्त ४६ धावा केल्या आहेत (सर्वाधिक १५). क्रिकेटरसिकांची त्याने घोर निराशा केली आहे. पाच डावात तो वेगवेगळ्या पाच गोलंदाजांच्या गोलंदाजीवर बाद झाला. रहाणे सुद्धा पुन्हा एकदा अपयशी ठरला. मागील कसोटीतील दुसर्या डावात केलेल्या ५२ धावांचा अपववाद वगळता इतर ४ डावात तो अपयशी ठरला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या ४५१ धावांना उत्तर देताना भारत ५ बाद ३२० अशा चांगल्या स्थितीत आहे. खेळपट्टीचा रागरंग बघता हा सामना अनिर्णित होण्याचीच जास्त शक्यता दिसते.
दुसरीकडे मायदेशात बांगलादेशाविरूद्ध खेळताना दुसर्या कसोटीत श्रीलंका अडचणीत आहे. आज चौथ्या दिवशी श्रीलंकेची अवस्था ६ बाद २०६ इतकी वाईट आहे. श्रीलंकेने पहिल्या डावात ३३८ अशी बर्यापैकी धावसंख्या रचलेली होती. परंतु बांगलादेशने पहिल्या डावात ४६७ धावा करून १२९ धावांची आघाडी मिळविली. सध्या श्रीलंकेकडे फक्त ७७ धावांची आघाडी असून त्यांचे ६ फलंदाज बाद झाले आहेत व सामन्याच्या उद्याचा दिवस शिल्लक आहे. जर हा सामना बांगलाने जिंकला तर परदेशात मोठ्या संघाविरूद्ध मिळविलेला हा खर्या अर्थाने त्यांचा पहिलाच विजय असेल (तसे त्यांनी काही वर्षांपूर्वी वेस्ट इंडीजमध्ये यजमानांवर २-० अशी मात केली होती. परंतु त्यावेळी विंडीजच्या सर्व प्रमुख खेळाडूंनी बहिष्कार टाकल्याने विंडीजला पूर्णपणे दुय्यम संघ खेळवावा लागला होता.).
भारत वि. ऑस्ट्रेलिया सामना अनिर्णिततेच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
दुसरीकडे श्रीलंका वि. बांगलादेश सामना अत्यंत चुरशीचा झाला आहे. चौथ्या दिवसाखेर श्रीलंकेकडे १३९ धावांचे आधिक्य असून त्यांचे ८ गडी बाद झाले आहेत. उद्या पाचव्या दिवशी जर श्रीलंकेने १ तास खेळून १६० च्या पुढचे लक्ष्य ठेवले तर ते बांगलादेशाला जड जाण्याची शक्यता आहे कारण बांगलादेशाचा दुसर्या डावातील फलंदाजीचा इतिहास अत्यंत केविलवाणा आहे.
तिसरीकडे द. आफ्रिकेने न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीवर हरवून सध्या आपणच कसोटीत प्रथम क्रमांकाचे आहोत हे सिद्ध केले आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ऑस्ट्रेलियाचा हरविले होते. दुसर्या देशात सर्वाधिक विजय मिळविणार्या देशांमध्ये आफ्रिका प्रथम क्रमांकावर आहे.
आता भारताने २६ धांवाची आघाडी घेतलेली आहे आणी अजूनही ४ गडी बाद व्हायचे आहेत. मला वाटते समजा आपली आघाडी १००-१२५ च्या पुढे गेली तर भारत कदाचित जिंकू शकेल हा सामना.
सहमत. बक्कीने दीडशेची आघाडी घेतली. मला दोनशेची अपेक्षा होती. पण ठीकाय. कोहलीने साताठ षटके खेळायला लावून दोन गडी उचलले ते चांगलं केलं. आता आघाडी सव्वाशेच्या आसपास आहे. ती संपायच्या आंत पाहुण्यांना उखडायचे डावपेच तयार असतीलंच.
-गा.पै.
उद्याचा पहिल्या सत्राचा खेळ पाहण्याचा बेत करतोय. पण खेळपट्टी कदाचित दुपार संध्याकाळी जास्त रंग दाखवेल असं वाटतंय.
हि कसोटी स्वतःच्या फलंदाजीच्या जोरावर वाचवलीन तर स्मिथला 'मानला'. त्याचं तंत्र आणि शैली अजिबात आवडत नसले तरी.
५ व्या दिवशी पटापट बली मिळवून भारत सामना जिंकेल असे वाटले होते. त्या दृष्टीने आज सकाळच्या सत्रात स्टिव्हन स्मिथ व रेनशॉ यांचे बळी मिळवून भारताने ऑस्ट्रेलियाला उपाहारापूर्वीच ४ बाद ६३ असे अडचणीत टाकले होते. त्यावेळी ऑसीज ८९ धावांनी मागे होते. परंतु उपाहार ते चहापान हे संपूर्ण सत्र पीटर हॅन्ड्सकॉम्ब (नाबाद ४४) आणि शॉन मार्श (नाबाद ३८) यांनी सहज खेळून काढून नाबाद ८६ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला ४ बाद १४९ वर नेऊन अडचणीतून बाहेर काढले. ऑस्ट्रेलिया अजूनही ३ धावांनी मागे आहेत. परंतु सामन्याचे शेवटचे दोन तासच शिल्लक आहेत. चहापानानंतर पुढील १ तासात जर भारताने ऑस्ट्रेलियाचे उर्वरीत ६ गडी बाद केले तरच भारताला सामना जिंकण्याची संधी आहे. अन्यथा सामना अनिर्णित राहण्याचीच दाट शक्यता दिसते.
आता मालिकेतील चौथा व शेवटचा कसोटी सामना धर्मशाळा येथे शनिवारी २५ मार्चला सुरू होईल. तो सामना २९ मार्चपर्यंत चालेल. नंतर लगेच ४ एप्रिलपासून आयपीएलचा तमाशा सुरू होईल व तो दीड महिना चालेल. नंतर लगेच १ जूनपासून इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी ही टॉपच्या ८ संघामध्ये एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा सुरू होईल. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी ८ व्या क्रमांकावर बांगलाचा संघ असून विंडीज ९ व्या क्रमांकावर असल्याने या स्पर्धेसाठी पात्र ठरलेले नाही. भारत या स्पर्धेत २००० मध्ये उपविजेता, २००२ मध्ये श्रीलंकेसह संयुक्त विजेता व २०१३ मध्ये विजेता होता. साधारणपणे दर दोन वर्षानंतर होणारी ही स्पर्धा ४ वर्षांच्या खंडानंतर ही स्पर्धा खेळली जात आहे कारण २०१४ व २०१६ मध्ये ट-२० विश्वचषक स्पर्धा खेळली गेली तर २०१५ मध्ये ११ वी विश्वचषक स्पर्धा खेळली गेली.
आजपासून धर्मशाळा येथे ४ था कसोटी सामना सुरु झाला. कोहली व इशांत शर्मा च्या जागी भुवनेश्वर कुमार व चायनामन गोलंदाज कुलदीप यादव संघात आला आहे. ऑस्ट्रेलिया आतापर्यंत ८.३ षटकांत १ बाद ४५ आहे.
पहिला दिवस रंगतदार अवस्थेत संपला. ऑस्ट्रेलियाने १ बाद १४ वरून १ बाद १४४ पर्यंत मजल मारली होती. मालिकेत पहिल्यांदाच वॉर्नरला सूर सापडला होता. स्टिव्हन स्मिथ नेहमीप्रमाणेच भारताला नडत होता. १ बाद १४४ वरून अचानक पारडे फिरले. खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साथ देऊ लागली आणि दिवस संपताना ऑस्ट्रेलियाचा डाव ३०० वर संपला. पदार्पणाचा सामना खेळणार्या चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने वॉर्नर हा आपला पहिलाच बळी मिळविला व नंतर एकूण ४ बळी मिळवून पदार्पण दणक्यात साजरे केले. त्याचे हळू फिरक घेणारे चेंडू कांगारूंना समजत नव्हते. दिवसअखेर भारत नाबाद ० आहे.
दुसरीकडे श्रीलंकेची आपल्याच देशात लिंबूटिंबू विरूद्ध वाईट अवस्था सुरूच आहे. दोन कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटल्यानंतर आजच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ५ बाद ३२४ धावा केल्यानंतर आता याक्षणी श्रीलंकेची अवस्था २३ षटकात ३ बाद ८७ इतकी वाईट आहे. बांगलाच्या फलंदाजांनी शेवटच्या ६ षटकात तब्बल ८३ धावा फटकावल्या. आपल्याच भूमीवर बांगलाकडून हरण्याची नामुष्की श्रीलंकेवर येण्याची दाट शक्यता आहे.
सामना रोमहर्षक अवस्थेत आहे. भारताने कालच्या ६ बाद २४८ वरून सुरूवात करून उपाहारापर्यंत उर्वरीत सर्व गडी गमावून सर्वबाद ३३२ धावा केल्या. गोलंदाजांना बर्यापैकी अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर ३२ धावांची छोटीशी परंतु महत्त्वपूर्ण आघाडी भारताला मिळाली. नेथन लॉयनने ५ बळी घेतले. या मालिकेतील पहिल्या कसोटीतील दुसर्या डावात ४, दुसर्या कसोटीतील पहिल्या डावात ८ आणि या कसोटीतील पहिल्या डावात ५ बळी मिळविलेला लॉयन या मालिकेत चांगलाच यशस्वी ठरला आहे.
ऑस्ट्रेलियाची दुसर्या डावाची सुरूवात वाईट झाली. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने ६ बाद १२० धावा केल्या असून ते फक्त ८८ धावांनी पुढे आहेत. उमेश यादवने सर्व कसोटीत वेगवान गोलंदाजी केलेली असून आतापर्यंत या मालिकेत त्याने १६ बळी मिळविले आहेत. भारत उद्या सामना जिंकेल असं दिसतंय. अर्थात ऑस्ट्रेलियाच्या शेपटाने त्रास दिला व लक्ष्य २०० च्या पुढे नेले तर जिंकणे तितकेसे सोपे नसेल.
भारताने आज उपाहारापूर्वीच २ बाद १०६ धावा करून सामना व मालिका जिंकली. गेल्या काही वर्षातील इतर मालिकांच्या तुलनेत ही मालिका भारताला बर्यापैकी जड गेली. मालिकेतील पहिलाच कसोटी सामना गमावल्याने भारत दडपणाखाली होता. दुसर्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाला जेमतेम १८७ धावांचे लक्ष्य मिळाल्याने सामना हरण्याची भीति होतीच. परंतु दुसरा सामना गोलंदाजांनी जिंकून दिल्याने दडपण गेले.
या मालिकेत काही रोचक गोष्टी झाल्या.
- के एल राहुलने ७ डावात फलंदाजी करून ६५.५० सरासरीने ३९३ धावा केल्या. ७ पैकी ६ डावात त्याने अर्धशतक केले, परंतु एकदाही त्याला शतक करता आले नाही.
- विराट कोहली सर्व ५ डावात अपयशी ठरला. मुरली विजय ५ पैकी ४ डावात, अभिनव मुकुंद २ पैकी दोन्ही डावात अपयशी ठरला. रहाणेला एकच अर्धशतक करता आले (५२ धावा). इशांत शर्माने ३ कसोटीतील ६ डावात फक्त ३ बळी घेतले. त्याच्या तुलनेत जडेजाने ८ डावात २५, अश्विनने ८ डावात २१ व उमेश यादवने वेगवान स्विंग गोलंदाजी करताना ८ डावात १७ बळी घेतले.
- ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने ८ डावांमध्ये एकदाच अर्धशतक केले (५७ धावा). उर्वरीत ७ डावातही त्याला फार धावा करता आल्या नाहीत. शॉन मार्शही १ डावाचा अपवाद वगळता मालिकेत अपयशी ठरला. रेनशॉने पहिल्या दोन्ही कसोटीत अर्धशतक केले होते. परंतु तो नंतर ढेपाळला. या सर्वांच्या तुलनेत स्टिव्हन स्मिथने मालिकेत सर्वाधिक ३ शतके करून ८ डावात ७१.२८ सरासरीने ४९९ धावा केल्या.
आता ५ एप्रिलपासून आयपीएलचा तमाशा सुरू होईल व नंतर १ जून पासून इंग्लंडमध्ये ८ देशांची चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा सुरू होईल.
आयुष्यात प्रथमच संपूर्ण कसोटी सामना प्रत्यक्ष मैदानात जाऊन पाहण्याचे भाग्य लाभले. गहुंजे येथील सामन्यात भारताचा दारूण पराभव झालेला असला तरी सामन्याच्या स्मृती प्रदीर्घ काळ मनात राहतील.
प्रतिक्रिया
भारत जिंकला...!!
हुर्रे. जिंकलो एकदाचे.
सुखद तोंडघशी पडलो. भारत ७५
अभिनंदन,
बक्की जिंकले.
उद्यापासून भारत व ऑस्ट्रेलिया
रेनशॉ..
चहापानापर्यंत ऑसीज ४ बाद १९४.
पहिल्या दिवसाखेर ऑसीजने ४ बाद
कालच्या मॅच दरम्यान घडलेला एक मजेदार प्रसंग ! :))
राहुलने या मालिकेत ५ डावातील
भारत वि. ऑस्ट्रेलिया सामना
आता भारताने २६ धांवाची आघाडी
सहमत
सामन्यात अचानक जीव आलाय.
उद्याचा पहिल्या सत्राचा खेळ
५ व्या दिवशी पटापट बली मिळवून
आजपासून धर्मशाळा येथे ४ था
पहिला दिवस रंगतदार अवस्थेत
India 248/6 at the end of day
सामना रोमहर्षक अवस्थेत आहे.
ऑस्ट्रेलिया सर्वबाद १३७.
कॅच सोडायची स्पर्धा
भारताने आज उपाहारापूर्वीच २
Pagination