Skip to main content

थेट गहुंजेवरून . . .

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 22/02/2017 23:18 या दिवशी प्रकाशित केले.

भारत वि. ऑस्ट्रेलिया ४ कसोटी सामन्यांची मालिका

उद्यापासून भारतात ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाविरूद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना गहुंजे (पुणे) येथे गुरूवार २३ फेब्रु ते सोमवार २७ फेब्रु या कालावधीत खेळला जाईल. मी गहुंजे येथील पहिला कसोटी सामना बघण्यास जाणार आहे. जमल्यास तिथूनच किंवा नंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर सामन्याविषयी लिहीन व काही फोटोही टाकेन. कोणी मिपाकर सामना बघण्यास येणार असतील तर त्यांची भेट घ्यायला आवडेल. मी यापूर्वी नेहरू स्टेडिअम येथे इंग्लंडविरूद्ध खेळला गेलेला एक एकदिवसीय सामना तिकीट न काढता घुसून बघितला होता. त्याच मैदानावर काही रणजी व दुलीप ट्रॉफीचे सामनेही तिकीट न काढता पाहिले होते. कसोटी सामना प्रत्यक्ष बघण्याची ही पहिलीच वेळ आणि स्वतःच्या पैशाने तिकीट काढून सामना बघण्याची सुद्धा ही पहिलीच वेळ. या कसोटीत अनेक आवडत्या खेळाडूंना प्रत्यक्ष डोळ्यासमोर खेळताना बघणार आहे. पुण्यात/पुणे परीसरात प्रथमच कसोटी सामना खेळला जात आहे. यापूर्वी पुण्यातील नेहरू स्टेडिअमवर काही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले गेले होते. त्यातील शेवटचा सामना २००५ मध्ये खेळला गेला होता. त्यानंतर पुण्यात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेलेला नाही. उद्यापासूनच प्रथमच गहुंजे येथील मैदान एक नवीन कसोटी केंद्र म्हणून उदयास येत आहे. मालिकेचे वेळापत्रक असे आहे (सर्व सामने सकाळी ९:३० ते दुपारी ४:३० या वेळात खेळले जातील). पहिला कसोटी सामना - गहुंजे (पुणे) येथे २३ ते २७ फेब्रु दुसरा कसोटी सामना - बंगळूर येथे ४ ते ८ मार्च तिसरा कसोटी सामना - रांची येथे १६-२० मार्च चौथा कसोटी सामना - धर्मशाळा येथे २५-२९ मार्च भारताने पहिल्या दोन कसोटींसाठी जाहीर केलेल्या संघात नेहमीच्या यशस्वी खेळाडूंप्रमाणे कुलदीप यादव व जयंत यादव हे नवोदीत खेळाडू आहेत. अभिनव मुकुंदचे बर्‍याच कालावधीनंतर संघात पुनरागमन झाले आहे. त्रिशतकी वीर करूण नायर सुद्धा संघात आहे. मात्र सातत्याने अपयशी ठरलेल्या के एल राहुलला पुन्हा एकदा संघात घेतले आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात कर्णधार स्टिव्हन स्मिथसह डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू वेड, मिचेल मार्श, शॉन मार्श, अ‍ॅश्टन अ‍ॅगर, जॅकसन् बर्ड, जॉश हॅजलवूड, पीटर हॅन्ड्सकॉम्ब, उस्मान ख्वाजा, नेथन लॉयन, ग्लेन मॅक्सवेल, स्टिव्हन ओ'कॅफी, मॅट रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप्सन इ. खेळाडू आहेत. भारतीय खेळपट्ट्यांचे स्वरूप लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियाने संघात फिरकी गोलंदाजांचा भरणा केला आहे. अर्थात अश्विन व जडेजाच्या फिरकीसमोर ऑसीज किती टिकाव धरू शकतात ते कळेलच. त्यांच्या जोडीला अमित मिश्रा सुद्धा आहे. भारताने भारतात खेळली गेलेली मागील मालिका ४-० अशी निर्विवाद जिंकली होती. परंतु २०१५ मध्ये भारताचा ऑस्ट्रेलियात ०-२ असा पराभव झाला होता. एकंदरीत दोन्ही देश आपापल्या भूमीत जिंकतात असेच मागील २-३ दशकात दिसून आले आहे (अपवाद भारतातील २००४ मधील मालिकेचा). भारताने लागोपाठ ६ मालिका जिंकून कसोटी क्रमवारीत प्रथम स्थान मिळविले आहे. भारताने मागील सलग १९ कसोटी सामन्यात पराभव पत्करलेला नाही. त्यामुळे याही मालिकेत भारतातेच पारडे जड आहे.

वाचने 12932
प्रतिक्रिया 74

प्रतिक्रिया

सामना रोमहर्षक अवस्थेत आहे. भारताने कालच्या ६ बाद २४८ वरून सुरूवात करून उपाहारापर्यंत उर्वरीत सर्व गडी गमावून सर्वबाद ३३२ धावा केल्या. गोलंदाजांना बर्‍यापैकी अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर ३२ धावांची छोटीशी परंतु महत्त्वपूर्ण आघाडी भारताला मिळाली. नेथन लॉयनने ५ बळी घेतले. या मालिकेतील पहिल्या कसोटीतील दुसर्‍या डावात ४, दुसर्‍या कसोटीतील पहिल्या डावात ८ आणि या कसोटीतील पहिल्या डावात ५ बळी मिळविलेला लॉयन या मालिकेत चांगलाच यशस्वी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाची दुसर्‍या डावाची सुरूवात वाईट झाली. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने ६ बाद १२० धावा केल्या असून ते फक्त ८८ धावांनी पुढे आहेत. उमेश यादवने सर्व कसोटीत वेगवान गोलंदाजी केलेली असून आतापर्यंत या मालिकेत त्याने १६ बळी मिळविले आहेत. भारत उद्या सामना जिंकेल असं दिसतंय. अर्थात ऑस्ट्रेलियाच्या शेपटाने त्रास दिला व लक्ष्य २०० च्या पुढे नेले तर जिंकणे तितकेसे सोपे नसेल.

ऑस्ट्रेलिया सर्वबाद १३७. भारताला विजयासाठी १०६ धावांचे लक्ष्य. उद्या उपाहारापर्यंत सामना संपेल.

भारताने आज उपाहारापूर्वीच २ बाद १०६ धावा करून सामना व मालिका जिंकली. गेल्या काही वर्षातील इतर मालिकांच्या तुलनेत ही मालिका भारताला बर्‍यापैकी जड गेली. मालिकेतील पहिलाच कसोटी सामना गमावल्याने भारत दडपणाखाली होता. दुसर्‍या सामन्यातही ऑस्ट्रेलियाला जेमतेम १८७ धावांचे लक्ष्य मिळाल्याने सामना हरण्याची भीति होतीच. परंतु दुसरा सामना गोलंदाजांनी जिंकून दिल्याने दडपण गेले. या मालिकेत काही रोचक गोष्टी झाल्या. - के एल राहुलने ७ डावात फलंदाजी करून ६५.५० सरासरीने ३९३ धावा केल्या. ७ पैकी ६ डावात त्याने अर्धशतक केले, परंतु एकदाही त्याला शतक करता आले नाही. - विराट कोहली सर्व ५ डावात अपयशी ठरला. मुरली विजय ५ पैकी ४ डावात, अभिनव मुकुंद २ पैकी दोन्ही डावात अपयशी ठरला. रहाणेला एकच अर्धशतक करता आले (५२ धावा). इशांत शर्माने ३ कसोटीतील ६ डावात फक्त ३ बळी घेतले. त्याच्या तुलनेत जडेजाने ८ डावात २५, अश्विनने ८ डावात २१ व उमेश यादवने वेगवान स्विंग गोलंदाजी करताना ८ डावात १७ बळी घेतले. - ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने ८ डावांमध्ये एकदाच अर्धशतक केले (५७ धावा). उर्वरीत ७ डावातही त्याला फार धावा करता आल्या नाहीत. शॉन मार्शही १ डावाचा अपवाद वगळता मालिकेत अपयशी ठरला. रेनशॉने पहिल्या दोन्ही कसोटीत अर्धशतक केले होते. परंतु तो नंतर ढेपाळला. या सर्वांच्या तुलनेत स्टिव्हन स्मिथने मालिकेत सर्वाधिक ३ शतके करून ८ डावात ७१.२८ सरासरीने ४९९ धावा केल्या. आता ५ एप्रिलपासून आयपीएलचा तमाशा सुरू होईल व नंतर १ जून पासून इंग्लंडमध्ये ८ देशांची चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा सुरू होईल. आयुष्यात प्रथमच संपूर्ण कसोटी सामना प्रत्यक्ष मैदानात जाऊन पाहण्याचे भाग्य लाभले. गहुंजे येथील सामन्यात भारताचा दारूण पराभव झालेला असला तरी सामन्याच्या स्मृती प्रदीर्घ काळ मनात राहतील.