न्यू यॉर्क : ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल
धातूची तार वाकवून केलेली कलाकारी
जरा पुढे गेल्यावर आधुनिक गगनचुंबी इमारतींच्या जंगलात, आपल्या बांधकामशैलीच्या वैशिष्ठ्याने उठून दिसणारी, कॅथेड्रलची इमारत दिसू लागली...
कॅथेड्रलचे प्रथमदर्शन
आजूबाजूच्या गगनचुंबी इमारतींमुळे कमी उंचीच्या वाटणार्या या इमारतीचा खरा आवाका, तिच्या जवळपास गेल्यावरच आपल्या नजरेत भरतो. शहराचा एक पूर्ण ब्लॉक व्यापून असलेल्या या इमारतीची लांबी १०१.२ मी (३३२ फू), रुंदी ५३ मी (१७४ फू) आणि निमुळत्या मनोर्यांसह उंची १००.६ मी (३३० फू) आहे. ती एकवेळेस ३००० भाविकांना सामावून घेऊ शकते. मध्यभागी भव्य प्रवेशद्वार आणि दोन बाजूंना उंच मनोरे असलेली ही इमारत "डेकोरेटेड निओ-गोथिक (अमेरिकन पुनरुज्जीवन, American Gothic Revival)" शैलीत बांधलेली आहे.
सेंट पॅट्रिकच्या कॅथेड्रलचा प्लॅन (जालावरून साभार)
कॅथेड्रलचा दर्शनी भाग या कॅथेड्रलची भव्यता एकाच प्रकाशचित्राच्या चौकटीत पकडायची असेल तर त्याच्या समोरचा रुंद ५वा अॅव्हन्यू ओलांडून पलीकडच्या फूटपाथवर शक्य तितके दूर उभे रहावे लागते...
सेंट पॅट्रिकच्या कॅथेड्रलचा पूर्णाकृती दर्शनी भाग
इमारतीच्या जवळ गेल्यावर तिच्या आणि तिच्या मध्यभागच्या प्रवेशद्वाराच्या भव्यतेची खरी कल्पना आपल्याला येते. मुख्य प्रवेशद्वार पितळ वापरून बनवलेले आहे. त्याच्या दरवाजाच्या प्रत्येक फळीचे वजन ४२०९ किग्रॅ (९२८० पाउंड) आहे. मात्र, त्यांची दरवाज्यातली ठेवण इतकी संतुलित आहे की दार उघडण्यासाठी एका व्यक्तीने लावलेला जोर पुरेसा असतो. दरवाज्यावर संतमहात्म्यांची ठाशीव चित्रे आहे. दरवाज्याच्या वरच्या पितळी कमानीत येशू ख्रिस्त, हवेत उडणारे देवदूत आणि भोवताली भाविकांची गर्दी दाखवणारे ठाशीव चित्र आहेत. दरवाजाच्या दोन्ही बाजूला गोलाकार भिंतीत असलेले कोलोनेड प्रकारचे खांब प्रवेशद्वाराची भव्यता आणि सौंदर्य अधिकच खुलवतात...
कॅथेड्रलचे प्रवेशद्वार
प्रवेशद्वारावरच्या समोर उभे राहून वर पाहिल्यास वरच्या कसबी कोरीव कमानी आणि त्यांच्या दोन्ही बाजूने सुळक्यांसारखे वर जाणारे निमुळते मनोरे पाहताना डोक्यावरची टोपी सहज खाली पडेल !...
इमारतीच्या जवळून दिसणारा कॅथेड्रलचा वरचा दर्शनी भाग
प्रार्थनागृह व वेदीगृह (Altar) कॅथेड्रलमध्ये शिरल्या शिरल्या भाविकांनी पूर्ण भरलेले मुख्य प्रार्थनागृह आणि त्याच्या दूरच्या टोकाला असलेले वेदीगृह समोर आले. इमारतीचा अंतर्भाग, धार्मिक मुख्यालयच्या स्थानाला साजेसा भव्य आणि प्रभावी बनविण्यात कोणतीच कसर ठेवलेली दिसत नाही. प्रत्येक रचना... खांब, छत, भिंती, खिडक्या, आसने, इत्यादी... भाविकांच्या मनावर दीर्घकालीन छाप पाडेल अश्या प्रकारे काळजीपूर्वक काटेकोरपणे सजवलेली दिसत होती. एकंदरीत हे कॅथेड्रल सुंदर आणि सधन असल्याच्या खाणाखुणा सर्वत्र दिसत होत्या. आम्ही गेलो तेव्हा तेथे रविवारचे खास प्रवचन चालू होते. बसायच्या सर्व जागा भरल्या असल्याने अनेकजण मागच्या बाजूला उभे होते. आमच्यासारखे पर्यटक त्यांच्यामागून व त्यांच्यातून वाट काढत समारंभ आणि कॅथेड्रल दोन्ही जमेल तेवढे पाहून घेत होते. कॅथेड्रलचे सर्व भाग जवळून पहायचे असले तर रविवार टाळून तेथे जाणे जास्त चांगले हे आधी म्हटले आहे ते यामुळेच. तेथे काढलेले हे काही फोटो...
प्रार्थनागृह आणि त्याच्या दूरच्या टोकाला असलेले वेदीगृह
प्रवचन चालू असताना काढलेला वेदीगृहाचा (sanctuary) फोटो (जवळून, झूम इन करून)
गोथिक आर्केड शैलीचे छत
प्रार्थनागृहाच्या छतावरची पारंपरिक आर्केड्स असलेली गोथिक नक्षी
रोमन कोलोनेड शैलीचे खांब व गॅलेरिया
प्रार्थनागृहातील रोमन कोलोनेड शैलीचे खांब, त्यांच्यावरील गॅलेरिया
आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग प्रवचन शेवटच्या भाविकापर्यंत पोहोचण्यामध्ये प्रवचनकारापासूनचे अंतर किंवा खांब (कोलोनेड) यांचा अडथळा येऊ नये यासाठी आधुनिक दृक्श्राव्य तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग केलेला दिसत होता...
भाविकांच्या सोयीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग
रंगीत काचांच्या नक्षीदार खिडक्या पारंपरिक प्रथेप्रमाणे या कॅथेड्रलच्या खिडक्या रंगीत काचेच्या चित्रांनी सजवलेल्या आहेत. या कामासाठी, नामवंत अमेरिकन आणि युरोपियन कलाकारांना पाचारणे केले गेले होते...
रंगीत काचांच्या चित्रांनी आणि नक्षीने सजवलेल्या खिडक्या
उपमंदीरे आणि कलापूर्ण धार्मिक प्रतीके मुख्य प्रार्थनागृहाच्या भिंतींना लागून अनेक उपमंदीरे आणि धार्मिक प्रतीके आहेत. त्यापैकी प्रत्येक आपापल्यावैशिष्ठ्यपूर्ण कलाकुसरीने बघण्यासारखे आहे. त्यातील काहींचे फोटो..
एक उपमंदीर
इतर काही उपमंदीरे
भिंतीवरची एक सागवानी कलाकृती
इथले ऑर्गन्स प्रसिद्ध आहेत. त्यातल्या मुख्य ऑर्गनला ९००० पाइप्स, २०६ स्टॉप्स, १५० रॅक्स आणि १० डिव्हिजन्स आहेत. प्रार्थना (सर्विस) चालू असल्याने तो जवळून बघू शकलो नाही. एकंदरीत संपूर्ण कॅथेड्रल जवळून पहायला मिळाले नाही तरी, जेवढा भाग पहायला मिळाला तो सुद्धा पुरेसा प्रभावी होता. पुढे केव्हा शक्य झाले तर, रविवार सोडून इतर कोणत्या दिवशी या चर्चला भेट देण्याचे ठरवून बाहेर पडलो. (क्रमशः ) ============================================================================== न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका... ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ... ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३... १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१... १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय... १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१... १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास... २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन... २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२... २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वमिनारायण अक्षरधाम मंदिर... २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२... ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल... ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस... ३५ : जगातले सर्वात मोठे अँग्लिकन कॅथेड्रल, सेंट जॉन द डिव्हाईनचे कॅथेड्रल... ===============================================================================
In reply to स्टेन्ड ग्लास जब्बरदस्त आहेत. by अभ्या..
In reply to चांगला मुहुर्तावर आणलात की हा by पिलीयन रायडर
In reply to हा लेख योगायोगाने सेंट by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मला वाटलं ठरवुन टाकलात!! by पिलीयन रायडर
In reply to अजुन एक - इथे ह्या चर्चचा ३६० by पिलीयन रायडर
In reply to अजुन एक - इथे ह्या चर्चचा ३६० by पिलीयन रायडर
स्टेन्ड ग्लास जब्बरदस्त आहेत.