✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मुंबई महानगर पालिका निवडणूक २०१७

ध
धर्मराजमुटके यांनी
Fri, 01/27/2017 - 17:40  ·  लेख
लेख
नमस्कार ! महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे राज्यसरकार बनल्यापासुन अनेक कुरबुरी चालू होत्या. रोज रोज एकमेकांवर आरोप तर करायचे पण एकत्र सत्तेतही राहायचे हे पाहून माझ्यासारख्या सामान्य आणि निष्पक्ष व्यक्तींना नक्कीच उबग आला असेल. काल २६ जानेवारी २०१७ च्या मुहुर्तावर शिवसेनेने युती तोडण्याची घोषणा केली आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांना जितका आनंद झाला नसेल तितका एक सामान्य माणूस म्हणून मला झाला. प्रत्येक पक्ष आतापर्यंत बेडीकीने बैलाचे सोंग घेतल्याप्रमाणे आपली ताकद फुगवून दाखवत होता त्यांची खरी ताकद आता कळणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरात होणार्‍या पालिका / जि.प. आता भाजपा, सेना स्वतंत्रपणे लढतील तर काही ठिकाणी राष्ट्रवादी-कॉग्रेस युती करतील. शिवाय या खेचाखेचीत निवडणूकांसाठी १ महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला असल्यामुळे या वेळची निवडणूक वेगळी ठरणार आहे. प्रत्येक पक्ष वेगवेगळे लढत असल्यामुळे पक्षातील तिकिट इच्छूकांना बर्‍याच प्रमाणात वाव मिळेल त्याचप्रमाणे इंपोर्टेड इच्छूकांना देखील बर्‍याच प्रमाणात वाव मिळेल. एकंदरीत निवडणूकीच्या तोंडावर पक्ष सोडून जाणार्‍यांची संख्या घटेल असा अंदाज आहे. शिवाय एकाच वॉर्डात चार ते पाच मोठे पक्ष, स्थानिक वजनदार नेतेमंडळी निवडणूक लढविणार असल्यामुळे ऐनवेळी 'बशी घेणार्‍या' उमेदवारांना घसघशीत फायदा होण्याचा संभव आहे. पण नोटबंदी नंतरच्या या काळात हा प्रश्न वेगवेगळे पक्ष कसा सोडविणार हे पाहणे रोचक ठरणार आहे. मुंबईत मागील वेळी मराठी मतांमधे जो सेना-मनसेच्या मागे एकवटण्याविषयी संभ्रम होता तो आता बर्‍याच प्रमाणात निवळला असून मराठी मतदाराला या दोघांपैकी नेमके कोणाला मत द्यायचे हे नक्की कळाले असावे असाही एक अंदाज आहे. मात्र काही नेते, सेना-मनसे समर्थक अजुनही सेना-मनसे युती होईल असे मनातल्या मनात मांडे खात आहे. मात्र ठाकरेंचा सध्याचा पवित्रा पाहता ते कोणाशीही युती करतील असे वाटत नाही. मात्र मतदानाचे निकाल आल्यानंतर मात्र सगळ्यांनाच सगळे ऑप्शन ओपन असतील असे वाटत आहे. गुजराती, मारवाडी मतदार प्रामुख्याने भाजपचा मतदार मानला जातो. मात्र मुंबईतील बहुसंख्य गुजराती / मारवाडी समाज व्यापारक्षेत्रात गुंतला आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या व्यवसायावर नोटबंदीनंतर काय आणि किती प्रमाणात परिणाम झाला यावर त्यांचे यंदाचे मतदान अवलंबून असेल की ते काहीही झाले तरी भाजपालाच मते देतील काय हे बघणे देखील रोचक ठरेल. त्यातच कालच शरद पवार साहेबांना पद्मविभुषण जाहिर झाला असल्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर भाजपा राष्ट्रवादी अशी नवी युती होणार काय असादेखील संभ्रम उत्पन्न होण्याचा संभव आहे. मात्र अशी शक्यता निकालांअगोदर तरी दिसत नाही. कदाचित शिवसेनेने मुंबई / पुणे राखले तर ते भविष्यात राज्यसरकारमधून बाहेर पडू शकतात व त्यावेळी राष्ट्रवादी मदतीला येऊ शकेल अशीही एक शक्यता दिसते. (साहेबांना पदक अगोदरच्या कामगिरीबद्द्ल मिळाले आहे पण तो वेगळा मुद्दा आहे.) युपी बिहारी मंडळी आपापल्या राज्यात सपा, बसपा, जनता दलाला आणि काही प्रमाणात भाजपाचे पाठीराखे असले तरी एकेकाळी ही मंडळी मुंबईमधे बर्‍याच अंशी काँग्रेस समर्थक होती. मात्र सध्याची काँग्रेसची अवस्था पाहता ही मंडळी कोणामागे उभी राहतात हे पाहणे रोचक ठरेल. कदाचित बर्‍याच ठिकाणी हीच मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मुस्लीमबहूल भागात सपा ची कसोटी लागणार आहे तर ओवेसींची पार्टी काय करते यावर देखील लक्ष ठेवावे लागेल. ओवेसींनी कालच "मोदींना परदेशी दाढीवाले का आवडतात" असा वरवर योग्य वाटणारा सवाल विचारुन टीआरपी खेचून घेतला आहे. सगळ्यात कठीण अवस्था विविध आंबेडकरवादी पक्षांची आहे. आठवलेंचा पक्ष भाजपाबरोबरच राहतो की कसे हे देखील २८ जानेवारीपर्यंत माहित पडेल. मात्र सध्यातरी त्यांच्यासमोर दुसरा पर्याय दिसत नाहिये. अगदी ५०-१०० मतांनी पराभव / विजय होण्याची शक्यता असणारी यावर्षीची निवडणूक अगदी रोचक होणार आहे हे नक्की. कोण कोठे जिंकेल हे आजच सांगणे अवघड असले तरी आपण आपापले अंदाज मांडू शकता. मात्र स्थानिक उमेदवाराचे कर्तुत्व, त्याचा इतिहास पाहूनच त्याला निवडून द्यावे ही माझीतरी अपेक्षा आहे. पक्ष कोणताही असो, काही फरक पडू नये असे मला वाटते. आमच्या ठाण्यात विविध पक्षांनी आपापल्या विभागातील सोसायट्यांना भेटणे सुरु केले आहे. आम्हीही आमच्या समस्या / मागण्या त्यांच्यापुढे मांडून काही अपेक्षा ठेवल्या मात्र सध्या कोणताही उमेदवार कोणतेही वचन देण्यास राजी नाही यावरुन त्यांच्या मनाची अस्थिरता देखील दिसून येते. एकंदरीत उमेदवारांसाठीही ही निवडणूक वेगळी ठरणार आहे हे निश्चित. तुम्हाला काय वाटते ते जाणून घेण्यास इच्छुक आहे. अवांतर : मी लेखाच्या शिर्षकात मुंबईचा उल्लेख केला असला तरी धागा मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांतल्या निवडणूकींच्या चर्चांसाठी वापरला जाऊ शकतो. राज्यांच्या निवडणूकांवर इथे अगोदरच एक धागा असल्यामुळे त्याची चर्चा त्याच धाग्यावर केली तर ते संदर्भांसाठी उपयुक्त राहिल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
61133 वाचन

💬 प्रतिसाद (405)

प्रतिक्रिया

हे छान आहे की! चांगलं वाटलं

श्रीगुरुजी
Sun, 02/19/2017 - 14:59 नवीन
हे छान आहे की! चांगलं वाटलं चांगलं म्हणाले, नाही वाटलं टीका केली, याला धरसोड म्हणायचं? म्हणजे मोदींच्या अडीच वर्षांच्या सरकारवर टीका करणारे लोकही धरसोड करतात? मोदींची एकदा स्तुती केली की कायमच स्तुती करायला हवी असा काही नियम आहे का?
आधी चांगले वाटतात आणि अल्पकाळातच वाईट वाटायला लागतात, यालाच म्हणतात धरसोड वृत्ती. आधी तोंड फाटेस्तोवर स्तुती आणि नंतर एकदम थापाडे अशी संभावना. म्हणजे मोदी जर थापाडे असतील तर ते एकदम २०१४ नंतर झाले का? आणि त्याआधी ते राजा हरिश्चंद्राचे अवतार होते का? अशी टोपी वारंवार फिरविल्यामुळेच राज ठाकरेंनी विश्वासार्हता गमावली आहे. एकीकडे म्हणतात की शिवसेनेने मुंबईत २५ वर्षे भ्रष्टाचार केला. या २५ वर्षांपैकी १४ वर्षे राज ठाकरे शिवसेनेत होते. म्हणजे यांनी २००६ मध्ये पक्ष सोडल्यानंतरच सेनेने भ्रष्टाचार केला का? दुसरीकडे म्हणतात बाळासाहेबांनी २५ वर्षे चांगले काम केले. मग नक्की भ्रष्टाचार कोणी केला?
काहींच्या काही! यात धरसोड काय?
यात धरसोडपणा असा आहे की पक्षस्थापना करताना माझा पक्ष सर्व महाराष्ट्रासाठी हा दावा आणि नंतर १-२ वर्षांनी एकदम मराठी बाणा स्वीकारून परप्रांतियांना मारहाण. एक काहीतरी ठरवा की तुमचा पक्ष सर्व महाराष्ट्रीयनांसाठी आहे का फक्त मराठी माणसांसाठी.
हो का? म्हणजे, हा टोलचा झोल आणणारे, याविरुद्ध आंदोलन न करणारे चांगले आणि त्यांच्या परीने आंदोलन करून काही प्रमाणात का होईना टोलविरोधी वातावरण करणारे वाईट (ज्याची फलश्रुती काही टोलनाके बंद होण्यात झाली)! काहीतरी चुकतंय असं नाही वाटंत?
यातली चुकीची गोष्ट म्हणजे टोलचा मुद्दा अगदी तात्पुरत्या काळासाठी उचलला, टोलनाक्यांवर जाऊन तोडफोड केली आणि नंतर अल्पकाळातच हा मुद्दा सोडूनही दिला. सवंग लोकप्रियतेसाठी असे भावनिक मुद्दे उचलून वातावरण बिघडविले जाते आणि अल्पकाळातच हे मुद्दे सोडून नवीन मुद्दा पकडला जातो.
हा विरोधाला विरोध आहे. एकूण एक पक्ष असलं राजकारण करतात. याला धरसोड म्हणतात? राज्यात सत्तेत एकत्र बसून एकमेकांचे कपडे फाडणारेपण धारसोडच करत आहेत की मग? निवडणुकीनंतर मनसे कोणाबरोबरही जाऊ देत तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. याला धरसोड कसं काय म्हणणार? भाजप सांगतंय का कि एवढे कपडेफाड केल्यानंतर काहीही झालं तरी शिवसेनेला पाठिंबा देणार नाही? शिवाय सत्तेतून त्यांनी बाहेर पडायची गरज काय, तुम्हीही घरोबा तोडूच शकता की! तर म्हणणे एवढेच आहे की माध्यमांनी आणि इतर पक्षांनी केलेल्या अप्रचाराचा मनसे हा बळी आहे. अर्थात यामध्ये मनसेचीही चूक आहेच की त्यांनी त्या त्या वेळी त्या गोष्टींना सडेतोड उत्तर देण्यापेक्षा दुर्लक्ष करण्याचा मार्ग करण्याचा मार्ग पत्करला.
राष्ट्रवादीला, शरद पवारांना, अजित पवारांना, भुजबळांना कडाडून विरोध करून नंतर त्याच पक्षाला पाठिंबा देणे व त्याच पक्षाचा पाठिंबा घेणे या काही विरोधाभास वाटत नाही का? एकीकडे शिवसेनेने प्रचंड भ्रष्टाचार केला, मुंबईची वाट लावली इ. बोलून जहरी टीका करायची आणि त्याचवेळी मातोश्रीवर फोन करून व आपले प्रतिनिधी पाठवून युतीसाठी टाळी मागायची यात काही विरोधाभास वाटत नाही का? नाशिकमध्ये महापौरपदासाठी भाजपची मदत घ्यायची, मुंबई महापालिकेत काँग्रेसच्या उमेदवाराला महापौरपदासाठी पाठिंबा द्यायचा आणि दुसरीकडे प्रत्येक सभेत सर्व पक्षांवर टीका करून ह्यांनी या शहराची वाट लावली, त्यांनी त्या शहराची वाट लावली, हे थापाडे, ते भ्रष्टाचारी अशी टीका करायची आणि दुसरीकडे त्याच पक्षांना पाठिंबा द्यायचा व त्यांचाच पाठिंबा ध्यायचा या अत्यंत बेभरवशाच्या व विश्वासघातकी राजकारणामुळेच आज मनसेची दुरावस्था झालेली आहे. यासाठी मनसे स्वतःच कारणीभूत आहे. माध्यमे व इतर पक्षांनी अपप्रचार केला असे त्यांच्यावर खापर फोडण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

काय बोलणार? परत एकदा प्रतिसाद

हतोळकरांचा प्रसाद
Sun, 02/19/2017 - 17:19 नवीन
काय बोलणार? परत एकदा प्रतिसाद वाचा माझा आणि तुमचाही! सवंग लोकप्रियतेसाठी चाललेला शिवसेना भाजपचा सावळा गोंधळ दिसत नसेल आणि वरून राज ठाकरे म्हणजे यांच्या तुलनेत कुठेच नाहीत असे वाटत असेल तर हे फक्त अंध समर्थन असू शकते. परत एकदा - भाजपने टोल आणला, तो बंद करण्यासाठी शिवसेना भाजपने काय केले? शिवसेना भाजप ने अभद्र युती केल्या नाहीत का? शिवसेनेशी युतीचा प्रस्ताव राज ठाकरेंनी लपून केला का? त्यामागचे स्पष्ट आणि एकमेव कारण त्यांनी सांगितले नाही का? भाजप आणि फडणवीस साहेब शिवसेनेवर एवढी टीका करत आहेत तर मग सत्तेत का आहेत? मनसेने विरोध करून नंतर पाठिंबा दिला तर तो प्रॉब्लेम आहे आणि एकमेकांवर चिखलफेक करून सत्तेचे लाडू खाणारे भाजप शिवसेना प्रॉब्लेम नाही? शिवसेना सत्तेत सामील होण्याच्या आधी भाजपने कोणाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले? तुम्ही ज्या मुद्द्यांना धरून मनसेला नाकारता ते मुद्दे शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या गेल्या कित्येक वर्षांच्या राजकारणाची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे ते मुद्दे वापरून मनसेला नाकारणे हे अंध राजकीय समर्थनाचे लक्षण आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

शिवसेनेच्या जाहिराती

गॅरी ट्रुमन
Sat, 02/18/2017 - 11:34 नवीन
शिवसेनेने आता शुक्रवारी उर्दू वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन मते मागितली आहेत अशा बातम्या आहेत. उर्दू वर्तमानपत्रे नक्की कुठल्या भागात वाचली जातात आणि अशा वर्तमानपत्रांचे बरेचसे वाचक कोण असतात हे सर्वांनाच माहित आहे. शिवसेनेचा अशा लोकांना धाक आहे असे काहिसे याच चर्चेत वाचल्याचे आठवते. पण कुठचे काय. बाळासाहेब हे बघायला असते तर त्यांना नक्कीच अतीव दु:ख झाले असते हे नक्की. भाजपच्या बंगारू लक्ष्मणांनी "राष्ट्रवादी मुस्लिमांनी भाजपला मत द्यावे" असे म्हटल्यावर बाळासाहेबांनीच त्यांना "हा कसला बंगारू लक्ष्मण-- हा तर बांगमारू लक्ष्मण" असे म्हटले होते. त्याच न्यायाने ते या उधोजीरावांना नक्की काय म्हणाले असते? Image removed.
  • Log in or register to post comments

बाळासाहेब असते तरी त्यांना दु

श्रीगुरुजी
Sat, 02/18/2017 - 14:13 नवीन
बाळासाहेब असते तरी त्यांना दु:ख वगैरे अजिबात झाले नसते. उलट त्यांनी या प्रकाराचे जोरदार समर्थन करून उद्धवचे कौतुक केले असते. शिवसेनाने तशीही पूर्वी मुस्लिम लीग व काँग्रेसशी अधिकृत युती केलेलीच होती. त्यामुळे एकीकडे हिंदुत्वाचा गजर करीत मुस्लिम वृत्तपत्रातून उर्दूतून जाहिराती देणे हे शिवसेनेच्या भोंदूगिरीला साजेसेच आहे. शिवसेना हिंदुत्ववादीही नाही आणि मराठीवादीही नाही. मराठीवादी असती तर तब्बल ७ अमराठी व्यक्तींना शिवसेनेने राज्यसभेवर खासदार केले नसते किंवा हार्दिक पटेलशी चुंबाचुंबी केली नसती. शिवसेनेचा हिंदुत्ववाद व मराठीवाद हे फक्त आपण लोकांना काँग्रेसपेक्षा वेगळे आहोत हे दाखविण्याकरीता परीधान केलेला बुरखा आहे. बुरख्याच्या आत शिवसेना ही प्रति काँग्रेसच आहे. सध्या उद्धव ठाकरे मोदीद्वेषाने केजरीवालांसारखेच पिसाळले आहेत. भाजपला अपशकुन करण्यासाठी ते कोणाचीही मदत घेऊ शकतील किंवा कितीही खालच्या थराला जाउन घाण भाषा वापरू शकतील. त्यांच्यासहीत सर्व शिवसेना नेत्यांना माउथ डायरीया झालेला आहे. उद्धव ठाकरेंनी दिल्लीचा इमाम बुखारीची भेट घेतली व बुखारीने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला अशी बातमी आल्यास अजिबात आश्चर्य वाटणार नाही. http://www.maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/shiv-sena-outreach-urdu-ads-for-muslim-voters/articleshow/57217176.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

भारतात असा एकही

वरुण मोहिते
Sat, 02/18/2017 - 21:19 नवीन
पक्ष नसेल कि ज्यांनी मुस्लिम समाजाकडे मत मागितलं नसेल . स्वतः मोदींच्या अनेक जाहिराती उर्दूत होत्या २०१४ ला . त्यामुळे त्यावर बोलण्यात काही पॉईंट नाही . धाक असणे म्हणजे सर्वच मुसलमान एकाच पारड्यात तोलण्यासारखे आहे . असं काही नसत .खुद्द शिवसेनेत असो वा भाजपात मुसलमान पदाधिकारी हि आहेत .उलट जेव्हा वेळ आली तेव्हा सर्वप्रथम सेनेने जाहीर विरोध करायची भूमिका घेतली होती मतांचा विचार न करता . त्यामुळे उगाच जाहिरात अली म्हणून बोलण्यात काही अर्थ नाही . बंगारू लक्ष्मण यांची कारकीर्द तर सर्वश्रुत आहे आणि वरील विधान कारगिल युद्ध्याच्या नंतर च्या वेळी काढलेले आहे तो संदर्भ होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

प्रश्न

गॅरी ट्रुमन
Sat, 02/18/2017 - 21:34 नवीन
प्रश्न इतकाच की ज्या कारणासाठी बांगमारू लक्ष्मण म्हटले गेले तेच उधोजीरावांनी केल्यावर त्याच कारणासाठी त्यांना बांगमारू उध्दव असे का म्हणू नये? (मी बाळासाहेबांसारखा विटी नाही त्यामुळे त्यांना बंगारूचा बांगमारू करता आले तसे मला काही लिहिता येणार नाही). आणि बांगमारू उद्धव असे म्हणायचे नसेल तर मग बांगमारू लक्ष्मण म्हणणेही चुकीचेच होते त्याचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

आता बाळासाहेब नाहीत

वरुण मोहिते
Sat, 02/18/2017 - 22:28 नवीन
त्यामुळे आपल्याला म्हणायचं असेल तर म्हणा कि .जाहिरात छापल्यावर बांगमारू अशी पदवी मिळत असेल तर सगळ्याच नेत्यांना बांगमारू म्हणा . कारण सामान न्याय लावायचा तर सगळे आले ज्यांनी ज्यांनी जाहिरात दिली अथवा मत मागितली .उदाहरणार्थ बांगमारू उद्धव, बांगमारू नरेंद्र ,बांगमारू राहुल . .नसेल म्हणायचं तर सोडून द्या . वरती आपण स्थानिक लोकधारा समिती ची कामे काढता ..मुद्दे नाहीत आणि आता १८ वर्षांपूर्वीच्या स्टेटमेंट वर बोलत आहात. इंटरेस्टिंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

:)

गॅरी ट्रुमन
Sat, 02/18/2017 - 22:44 नवीन
कारण एवढेच की अगदी अलीकडल्या काळापर्यंत इतर कोणीही असे केले तरी शिवसेनेचे लोक त्यावर तुटून पडण्यात सगळ्यात पुढे असायचे आणि आता स्वतःही तेच करत आहेत. १८ वर्षापूर्वीचे काय घेऊन बसलात शिवसैनिकांमुळे मुंबई १९९२-९३ च्या दंगलीत वाचली असे कट्टर शिवसैनिक अगदी १८ तासांपूर्वी पण म्हणत असतील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

हे म्हणण्यात तेच नाहीत

वरुण मोहिते
Sat, 02/18/2017 - 23:36 नवीन
गुजरातीही तितक्याच संख्येने आहेत . खाजगीत अनेक गुजराती हि गोष्ट मान्य करतात मंगलदास मार्केट पासून ते मुंबादेवी पर्यंत . कारण व्यापार त्यांच्या हातात होता आणि दंगलीत सर्वाधिक नुकसान त्यांचंच झालं असत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

फक्त मनसे

जेसीना
Sat, 02/18/2017 - 13:12 नवीन
मला वाटते या सर्व प्रचाराच्या रणधुमाळीत फक्त राज ठाकरे हे एकटे असे आहेत जे त्यांनी केलेली काम तुमच्या आमच्या समोर ठेवत आहेत, बाकी सगळे मागे सत्तेत असताना काय केले आणि पुढे निवडून आल्यावर काय करणार ह्या बद्दल एक शब्द सुद्धा काढत नाहीत. माझ्या मते फक्त आणि फक्त एकाच पर्याय उपलब्ध आहे तो म्हणजे राज ठाकरे आजच्या दादर च्या सभेची खूपच उत्सुकता आहे
  • Log in or register to post comments

सहमत आहे

गॅरी ट्रुमन
Sat, 02/18/2017 - 20:15 नवीन
मला वाटते या सर्व प्रचाराच्या रणधुमाळीत फक्त राज ठाकरे हे एकटे असे आहेत जे त्यांनी केलेली काम तुमच्या आमच्या समोर ठेवत आहेत, बाकी सगळे मागे सत्तेत असताना काय केले आणि पुढे निवडून आल्यावर काय करणार ह्या बद्दल एक शब्द सुद्धा काढत नाहीत.
माझ्यासारख्या मनसे विरोधकालाही याबद्दल सहमत व्हावेच लागेल इतकी स्वच्छ गोष्ट आहे ही. एकूणच राज ठाकरे त्यांंच्या त्या मातोश्रीमधल्या चुलतभावापेक्षा बरेच जास्त उजवे वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेसीना

एकूणच राज ठाकरे त्यांंच्या

प्रसाद_१९८२
Sat, 02/18/2017 - 21:34 नवीन
एकूणच राज ठाकरे त्यांंच्या त्या मातोश्रीमधल्या चुलतभावापेक्षा बरेच जास्त उजवे वाटतात. << सहमत ! परवा नाशिकच्या जनतेला उद्देशून केलेले त्यांचे भाषण असेच रोखठोक आणि प्रभावी होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

शिवसेनेची ढोंगं

गामा पैलवान
Sat, 02/18/2017 - 15:06 नवीन
श्रीगुरुजी, १.
शिवसेनाने तशीही पूर्वी मुस्लिम लीग व काँग्रेसशी अधिकृत युती केलेलीच होती.
अशुत्या शिवाजी आणि शहाजीमहराजांनीही केल्या होत्या. २.
मराठीवादी असती तर तब्बल ७ अमराठी व्यक्तींना शिवसेनेने राज्यसभेवर खासदार केले नसते
शिवसेनेस महाराष्ट्रात राज्य करण्यात अधिक रस आहे. त्यातूनही मराठीवादी असणं म्हणजे अमराठींचा द्वेष करणं हे कोणी सांगितलं तुम्हाला? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

अशुत्या शिवाजी आणि

श्रीगुरुजी
Sat, 02/18/2017 - 15:14 नवीन
अशुत्या शिवाजी आणि शहाजीमहराजांनीही केल्या होत्या.
म्हणजे शिवसेनेला मुस्लिम लीग, काँगेस, राष्ट्रवादी कॉंगेस असे कोणीही वर्ज्य नाही. मी तेच म्हणत होतो. शिवसेनेचे हिंदुत्व व मराठी बाणा म्हणजे भोंदूगिरी आहे.
शिवसेनेस महाराष्ट्रात राज्य करण्यात अधिक रस आहे. त्यातूनही मराठीवादी असणं म्हणजे अमराठींचा द्वेष करणं हे कोणी सांगितलं तुम्हाला?
'बजाव पुंगी, हटाव लुंगी' ही घोषणा माहिती आहे का? परप्रांतियांना मारहाणे केल्याची प्रकरणे माहिती आहेत का? राज्यसभेच्या प्रत्येक खासदाराला वार्षिक कोट्यावधी रूपयांचा निधी मिळतो. खासदाराने तो निधी त्या राज्यात खर्च करणे अपेक्षित असते. शिवसेनेने जे अमराठी खासदार निवडून दिले ते राज्याबाहेरील होते व त्यांनी आपल्या वाट्याचा निधी महाराष्ट्रात न वापरता आपल्या मूळ राज्यात वापरला. म्हणजे महाराष्ट्राच्या वाट्याचे पैसे शिवसेनेने दुसर्‍या राज्यांच्या घशात घालून महाराष्ट्रद्रोह केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

राज्यसभेच्या प्रत्येक

संदीप डांगे
Sat, 02/18/2017 - 18:41 नवीन
राज्यसभेच्या प्रत्येक खासदाराला वार्षिक कोट्यावधी रूपयांचा निधी मिळतो. खासदाराने तो निधी त्या राज्यात खर्च करणे अपेक्षित असते. शिवसेनेने जे अमराठी खासदार निवडून दिले ते राज्याबाहेरील होते व त्यांनी आपल्या वाट्याचा निधी महाराष्ट्रात न वापरता आपल्या मूळ राज्यात वापरला. ^^^ संदर्भ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

http://www.mplads.gov.in

श्रीगुरुजी
Sat, 02/18/2017 - 20:23 नवीन
http://www.mplads.gov.in/mplads/Default.aspx
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

वरच्या विधानात केलेल्या

संदीप डांगे
Sat, 02/18/2017 - 20:56 नवीन
वरच्या विधानात केलेल्या उल्लेखाचा स्पेसिफिक संदर्भ हवा आहे, तो कुठे आहे ह्यात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

राज्याबाहेरील होते म्हणून निधी

वरुण मोहिते
Sat, 02/18/2017 - 20:54 नवीन
बाहेर वापरला का अमराठी होते म्हणून. कारण प्रत्येक पक्षात अमराठी खासदार राज्यसभेवर पाठवलेले अनेक उदाहरणं आहेत .कारण पियुष गोयल पण महाराष्ट्रातून राज्यसभेवर आहेत ते पण महाराष्ट्रदोही का ? किंवा वेणुगोपाल धूत आहेत ते पण का?? नक्की काय म्हणायचंय
  • Log in or register to post comments

गुर्जि

सचु कुळकर्णी
Sun, 02/19/2017 - 01:12 नवीन
खासदाराने तो निधी त्या राज्यात खर्च करणे अपेक्षित असते. शिवसेनेने जे अमराठी खासदार निवडून दिले ते राज्याबाहेरील होते व त्यांनी आपल्या वाट्याचा निधी महाराष्ट्रात न वापरता आपल्या मूळ राज्यात वापरला. कसा ? कुठे वापरला Maharashtra बाहेर ? तांत्रीक रीत्या हे शक्य आहे का ? आमचा वाचन मोड वन्ली तोडला न बावा गुर्जि न. बंबाट लपेटुन र्हायले काईबी.
  • Log in or register to post comments

मला कम्युनिस्ट पक्ष त्यांचे

सचु कुळकर्णी
Sun, 02/19/2017 - 01:24 नवीन
मला कम्युनिस्ट पक्ष त्यांचे विचार पटत नाहि पटणार नाहि पण वास्तवात मला तरी तो एकच पक्ष दिसतो जिथे पोलिट ब्यरो निर्णय घेते, घराणेशाहि नाही. बाकी तर आनंदि आनंद आहे.
  • Log in or register to post comments

घराणेशाही कितीतरी परवडली

गॅरी ट्रुमन
Mon, 02/20/2017 - 10:29 नवीन
वास्तवात मला तरी तो एकच पक्ष दिसतो जिथे पोलिट ब्यरो निर्णय घेते, घराणेशाहि नाही.
एकवेळ घराणेशाही परवडली असे प्रकार कम्युनिस्टांमध्ये असतात त्याचे काय? तसेही घराणेशाहीला इतर लोक नावे ठेवतात तितकी वाईट आहे असे मला वाटत नाही. समजा इंदिरांनंतर राजीव, राजीवनंतर सोनिया आणि आता राहुल यांनाच नेते करायचे असे काँग्रेसवाल्यांनी ठरविले असेल तर तो त्यांचा प्रश्न झाला. काँग्रेसवाल्यांनी कोणाला नेता म्हणून नेमावे हा त्यांचा प्रश्न झाला. त्यांनी कोणाला नेता नेमावे हे इतरांनी सांगायचे काम नाही. असो. कम्युनिस्टांमध्ये घराणेशाही नसली तरी इतर देशांच्या तालावर नाचणे असते-- ते कितीतरी जास्त घातक आहे. सीपीआयवाले रशियाच्या तर सीपीआय(एम) वाले चीनच्या तालावर नाचत आले आहेत. दिल्लीच्या हिताचे काय आहे यापेक्षा मॉस्को किंवा बिजिंगच्या हिताचे काय आहे याला प्राधान्य देणारी ही औलाद आहे. त्यापेक्षा घराणेशाही कितीतरी परवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी

५ वाजण्याची आतुरतेने वाट पहात

श्रीगुरुजी
Sun, 02/19/2017 - 14:42 नवीन
५ वाजण्याची आतुरतेने वाट पहात आहे. आज ५ वाजता प्रचार संपेल आणि वातावरणात शांतता निर्माण होईल. पूर्वी एक फरफर्‍या प्रकारचा स्टोव्ह होता. तो पेटविला एका सुरात भस्स असा आवाज येत रहायचा व त्याने कान किटून जायचे. स्टोव्हची पिन सैल करून स्टोव्ह बंद केला की अक्षरशः हवीहवीशी वाटणारी शांतता पसरायची. गेले २-३ आठवडे प्रचारासाठी फिरणार्‍या रिक्षांनी वात आणला आहे. यात आघाडीवर आहे भाजपची रिक्षा. दिवसातून अनेकवेळा रिक्षा घरासमोरून जाते. जाताना एक अत्यंत इरिटेटिंग आवाज असलेल्या बाप्याच्या आवाजातले गीत मोठ्या आवाजात लावलेले असते. गीत संपल्यावर कर्णकर्कश तुतारी वाजते व नंतर मोठ्या आवाजात कोणीतरी बाप्या उमेदवारांची नावे सांगून प्रचार सुरू करतो. भाजप खालोखाल "राजाला साथ द्या" असे गाणे वाजवित मनसेची रिक्षा येते. त्यापाठोपाठ शिवसेनेची रिक्षा असते. प्रत्येक रिक्षा दर ३-४ मिनिटांनी तुतारीचे अत्यंत इरिटेटिंग रेकॉर्डिंग लावते. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या रिक्षा फारशा आमच्या भागात फिरकतच नाहीत कारण आमच्या भागातून त्यांना एकही मत मिळणार नाही ही त्यांना खात्री आहे. कालपासून एका अपक्ष महिलेची रिक्षा फिरतेय. तिचा रिक्षातला प्रचार ऐकून हसायला आलं. तिच्या रेकॉर्डेड भाषणात नोटाबंदी, त्यामुळे झालेला कथित त्रास, शेतकर्‍यांचे प्रश्न, दुष्काळ इ. मुद्दे होते. पुण्यातल्या आमच्या भागात या मुद्द्यांना शून्य महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments

राष्ट्रवादी काँग्रेस च्या

संदीप डांगे
Sun, 02/19/2017 - 15:22 नवीन
राष्ट्रवादी काँग्रेस च्या प्रचार पत्रकात पूजनिय वारसा म्हणून हेगडेवार आणि गोळवलकर ह्यांचे फटू टाकलेत... कोथरूड च्याया ब्राह्मण मतांचे लांगुलचालन करण्याचा केविलवाणा प्रयत्न.
  • Log in or register to post comments

त्याचा उपयोग होणार नाही. २००९

श्रीगुरुजी
Sun, 02/19/2017 - 15:29 नवीन
त्याचा उपयोग होणार नाही. २००९ मध्ये राष्ट्रवादीने कोथरूड विधानसभा मतदारसंघात अण्णा जोशींना उमेदवारी दिली होती. ते जनसंघाकडून २ वेळा नगरसेवक पदावर निवडून आले होते. त्यानंतर भाजपकडून ३ वेळा आमदार व एकदा खासदारपदावर निवडून आले होते. त्यांना उमेदवारी दिल्याने आपल्याला ब्राह्मणांची व संघाची मते मिळतील असा राष्ट्रवादीचा गैरसमज होता. प्रत्यक्षात अण्णा जोशींना जेमतेम २०००० मते मिळून त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

राजाभाऊ गोरडे

विटेकर
Sun, 02/19/2017 - 18:12 नवीन
यांच्या पत्नीचे ते पत्रक आहे , पूर्वी राजभाउ मनसेत होते , मी भेट्लोय त्यांना अनेकदा शाखेच्या कर्यक्र्मात , ते शिवशक्ती संगम च्या कर्यक्र्मात गणवेशात आले होते. त्यामुळे त्यांना संघ नेत्यांबद्दल आदर असणे स्वाभाविक आहे पण त्याचा राजकीय स्वार्थासाठी उपयोग करुन घेणे हा महामूर्खपणा आहे! स्वंयसेवक आणि संघ हितैषी इतके दूध्खुळे नसतात ! असाच एक जुना प्रसंग आठवला. गेली ३०-३२ वर्षे आम्ही नरसोबाच्या वाडीला दर पौणिमेच्या आसपास जात असतो, ही घट्ना साधारण ३० वर्षापूर्वीची असावी , तेव्हा संभाजीराव ( भिडे गुरुजी )सांगली जिल्हा प्रचारक होते. मंदिराकडे जाण्याच्या रस्त्यावर पेढे - बर्फीची दुकाने होती ( आजही आहेत) , त्यातील एका दुकानात डॉ़क्टर - गुरुजींचे फोटो लावले होते. स्वभाविकपणे मी त्यांच्याकडून पेढे घेण्याचा प्रयत्न करीत असे. पण त्या ही वेळी मला हे थोडेसे खटकले होतेच ! एकदा कधीतरी वाडीवरुन परताताना सांगलीत सहज राजवाड्यातील कार्यालयात डोकावले, कधी नव्हे ते संभाजीराव पत्र लिहित बसलेले दिसले, ( ते रोज सहज ३०-४० पत्र लिहित पण बहुधा रात्री , ते एकतर पत्रे लिहित किंवा सायकलवर असत ) त्यांना पेढा दिला , म्हणालो आपल्याच दुकानातून घेतला वगैरे ... ते हसले आणि म्हणाले , ..... अरे , आपण असे लावतो का फोटो अन्यत्र ? " पुढे म्हणाले, पेढे विकणारे सगळेच आपले आहेत ना ? या दोन वाक्याशिवाय ते एक शब्दही अधिक बोलले नाहीत, विषय सम्पला ( परवा सहज त्या दुकानात डोकावले , त्या प्रतिमा दिसल्या नाहीत , त्याचा व्यावसायिक फायदा होत नाही हे बहुधा आता लक्षात आले असावे ) त्यानंतर पुन्हा कधीही संभ्रम निर्माण झाला नाही आणि कोणत्याही स्वंयसेवकाला असा संभ्रम असूच शकत नाही ! संघात असल्या बेगडी अभिनिवेशाला काडीची देखील किंंमत नसते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

कमालच केली म्हणायची

विशुमित
Mon, 02/20/2017 - 11:01 नवीन
कमालच केली म्हणायची राष्ट्रवादीच्या उमेदवाराने जिंकण्यासाठी. तुच्छ लेकाचा...!! ( अति अति अवांतर : एक महान कर्ता पुरुष महात्मा आणि लोहपुरुषाचा सतत जप करत असतो, कोणाचं लांगुलचालन करतोय देव जाणे ??)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

ते 'भारत देशावर उपकार' फेम

संदीप डांगे
Mon, 02/20/2017 - 11:25 नवीन
ते 'भारत देशावर उपकार' फेम प्रभुजी हिंदू विरुद्ध मुस्लिम करत होते काल परवा... रमजान ला वीज असते तशी दिवाळीला हवी, होळीला असते तशी ईदला हवी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

मुंबई महानगरपालिका

साधा मुलगा
Sun, 02/19/2017 - 20:50 नवीन
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी खाजगी आस्थापनांनाही सुट्टी जाहीर केली आहे का? कि उशिरा येण्याची सूट दिली आहे?
  • Log in or register to post comments

बाळासाहेब आणि अन्याय

गामा पैलवान
Mon, 02/20/2017 - 02:52 नवीन
श्रीगुरुजी,
'बजाव पुंगी, हटाव लुंगी' ही घोषणा माहिती आहे का? परप्रांतियांना मारहाणे केल्याची प्रकरणे माहिती आहेत का?
स्थानिकांना डावलून खोगीरभरती करण्याविरुद्ध घोषणा दिली तर काय बिघडलं? ही मारहाण अन्यायाविरुद्ध आहे. जेव्हा श्रीलंकी तामिळींवर अन्याय होत होता तेव्हा देशभरातल्या फक्त बाळासाहेबांनीच जाहीर रीत्या लिट्टेस पाठींबा व्यक्त केला होता. अयोध्येतली वादग्रस्त वास्तू पडली तेव्हा त्यांनीच स्वत:हून जबाबदारी स्वीकारली होती. शेपूटघाल्या नव्हता तो माणूस. तसंच मोदींना जेव्हा गुजरात दंगलींच्या खोट्या आरोपांखाली बेजार करून सोडलं होतं तेव्हा आले होते मातोश्रीवर. त्यावेळेस बाळासाहेबांनीच मोदींना धीर दिला होता आणि अडवाणींना स्पष्ट शब्दांत मोदीविस्थापनाचे परिणाम सुनावले होते. हे सगळं विसरलात वाटतं? मोदींप्रमाणे जरा कृतज्ञ राहावं माणसानं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

चहापेक्षा

कपिलमुनी
Mon, 02/20/2017 - 12:59 नवीन
चहापेक्षा किटली गरम असते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

अजिबात नाही

गॅरी ट्रुमन
Mon, 02/20/2017 - 13:32 नवीन
तसंच मोदींना जेव्हा गुजरात दंगलींच्या खोट्या आरोपांखाली बेजार करून सोडलं होतं तेव्हा आले होते मातोश्रीवर. त्यावेळेस बाळासाहेबांनीच मोदींना धीर दिला होता आणि अडवाणींना स्पष्ट शब्दांत मोदीविस्थापनाचे परिणाम सुनावले होते. हे सगळं विसरलात वाटतं?
अजिबात नाही. त्याबद्दल मोदींपासून सगळेच बाळासाहेबांविषयी कृतज्ञताच बाळगून आहेत. पण बाळासाहेबांविषयीची ती सद्भावना आपोआप उधोजीरावांविषयी जाईल अशी अपेक्षा करता येणार नाही. तशीही शिवसेना घराणेशाही मानतच नाही तेव्हा घराणेशाहीतून अशी सद्भावना उधोजीरावांना मिळणार नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

स्थानिकांना डावलून खोगीरभरती

श्रीगुरुजी
Mon, 02/20/2017 - 14:54 नवीन
स्थानिकांना डावलून खोगीरभरती करण्याविरुद्ध घोषणा दिली तर काय बिघडलं? ही मारहाण अन्यायाविरुद्ध आहे. जेव्हा श्रीलंकी तामिळींवर अन्याय होत होता तेव्हा देशभरातल्या फक्त बाळासाहेबांनीच जाहीर रीत्या लिट्टेस पाठींबा व्यक्त केला होता. अयोध्येतली वादग्रस्त वास्तू पडली तेव्हा त्यांनीच स्वत:हून जबाबदारी स्वीकारली होती. शेपूटघाल्या नव्हता तो माणूस.
जर त्या काळात स्थानिकांना डावलून खोगीरभरती होत होती तर १९९५ ते १९९९ या काळात मुंबईत, राज्यात व केंद्रात युतीचे सरकार असताना स्थानिक कंपन्यात ८०% नोकरभरती स्थानिकांमधून व्हावी असे विधेयक आणून कायदा केला होता क? निदान तसा कायदा करण्याचा प्रयत्न तरी केला होता का? सरकारी जागेवर बेकायदेशीररित्या बसविलेल्या किती झोपडपट्ट्या त्या काळात नष्ट केल्या गेल्या? मुंबईत येणार्‍या परप्रांतियांना बनावट शिधापत्रिका, बनावट अधिवास दाखला देऊन १५ वर्षे वास्तव्याचे प्रमाणपत्रे देण्यामध्ये मुंबई महापालिकेचे अधिकारी व मुंबईतील सर्वपक्षीय नगरसेवक जबाबदार होते. त्यात अर्थातच शिवसेनेचे नगरसेवक सर्वाधिक होते. महाराष्ट्रातून अनेक अमराठी व्यक्तींना राज्यसभेच्या खासदारकीची तिकिटे देताना यांना खासदारपदासाठी योग्य एकही स्थानिक मराठी व्यक्ती सापडली नाही? विधानसभा व लोकसभेची निवडणुक असली की बेगडी हिंदुत्वाचा झेंडा नाचवायचा आणि महापालिका निवडणुकीच्या वेळी 'इस्लाम खतरेमें है' या हाळीप्रमाणे 'मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा केंद्राचा डाव आहे' असा कांगावा करून मराठी कार्ड खेळायचे हाच यांचा आजवरचा प्रवास. अयोध्येतील वादग्रस्त वास्तूचं म्हणाल तर बाळासाहेबांनी स्वतःहून त्याची जबाबदारी स्वीकारली ही 'मोदींनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये भरण्याचे आश्वासन दिले' या विरोधी पक्षांच्या थापेसारखीच एक लोणकढी थाप आहे. "जर हे काम शिवसैनिकांनी केले असेल, तर मला त्यांचा अभिमान वाटेल" असे जरतरच्या भाषेतले ते दिशाभूल करणारे फसवे वाक्य होते. शिवसैनिकांनी ही वास्तू पाडली याची ही कबुली नव्हतीच, उलट ही वास्तू पाडण्याचा व शिवसेनेचा अजिबात संबंध नाही असाच अर्थ त्यातून निघत होता. आपण त्याची जबाबदारी घेत आहोत असा तर त्यातून अजिबात अर्थ निघत नाही. "मी भ्रष्टाचार केला असेल तर भर चौकात मला फासावर चढवा" असे अनेक भ्रष्टाचारी पुढारी जाहीर सभेत सांगतात. त्याच धर्तीवरचे हे वाक्य होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

शिवसेनेचा पराभव हे उद्दिष्ट नव्हे

गामा पैलवान
Mon, 02/20/2017 - 02:57 नवीन
गॅरी ट्रुमन,
ज्या दिवशी शिवसेनेचा पराभव होईल तो दिवस मी स्वतः साजरा करणार आहे.
शिवसेनेचा पराभव हे उद्दिष्ट असू शकंत नाही. हवं असल्यास भाजपचा विजय म्हणा. आत्यंतिक नकारात्मक विधानांचा शिवसेनेस फायदा होत आला आहे. मागे २०१२ सालच्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या वेळेस पृथ्वीराज चव्हाणांनी शिवसेनेस संपवायची भाषा केली होती. अशी कोणी करंत नाही. त्यामुळे उलट शिवसेनेस हट्टाने निवडून द्यायच्या इराद्याने मतदान झालं होतं. तुमचा शिवसेनेवर कितीही राग असला तरी तो व्यक्त होतांना सकारात्मक पद्धतीनेच व्यक्त करावा म्हणून सुचवेन. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

:)

गॅरी ट्रुमन
Mon, 02/20/2017 - 10:41 नवीन
शिवसेनेचा पराभव हे उद्दिष्ट असू शकंत नाही.
तुमचे नसेल. पण माझे ते अणि तेच उद्दिष्ट आहे. शिवसेनेला पहिल्या क्रमांकाच्या पक्षापेक्षा एक जागा जरी कमी मिळाली तरी त्यामुळे मला समाधान वाटेल. ते समाधान मिळते का हे अजून ३ दिवसांनी समजेल.
मागे २०१२ सालच्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या वेळेस पृथ्वीराज चव्हाणांनी शिवसेनेस संपवायची भाषा केली होती. अशी कोणी करंत नाही. त्यामुळे उलट शिवसेनेस हट्टाने निवडून द्यायच्या इराद्याने मतदान झालं होतं.
ही भाऊ तोरसेकरांनी पसरवलेली लोणकढी आहे. भाऊंची शिवसेना सोडून इतर सगळ्या विषयांवरील मते मला पटतात. भाऊ शिवसेनेवर लिहितात ते बर्‍याचदा बायस्ड असते. शिवसेना-भाजप युती होण्यापूर्वी महाराष्ट्रात शिवसेनेपेक्षा भाजपची ताकद जास्त होती हे या आणि अन्य एका चर्चेत अनेकदा आकडेवारीनिशी स्पष्ट झाले आहे. भाऊंनी याविषयी काही लिहिल्याचे ऐकिवात नाही. बहुदा भाऊंनी स्वतः बाळासाहेबांबरोबर काम केले होते त्यामुळे तेव्हाचे ऋणानुबंध भाऊंना इतर विषयांवर ते जसा स्वतंत्र स्टॅन्ड घेतात तसा घेऊ देत नसावेत असा माझा तर्क. एकतर पृथ्वीराज चव्हाण बोलले तसे निवडणुकीच्या धुराळ्यात सगळेच काहीना काही बोलतच असतात. आणि ते एक 'वन-ऑफ' वक्तव्य होते. मोदींविरूध्द सतत १२ वर्षे जसा विखारी प्रचार चालला होता आणि त्यामुळे मोदींना त्याचा फायदा झाला तसे हे वक्तव्य नव्हते. दुसरे म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी काहीतरी बोलले म्हणून त्यांना धडा शिकविण्यासाठी लोकांनी मते दिली असे म्हणावे तर याचा अर्थ पृथ्वीराज चव्हाणांना लोक खूपच सिरियसली घेत होते. प्रत्यक्षात तशी परिस्थिती होती असे वाटत नाही. तिसरे म्हणजे शिवसेनेला हट्टाने निवडून द्यायच्या इराद्याने मतदान झाले असेल तर शिवसेनेच्या जागा २००७ पेक्षा कमी का झाल्या? २००७ मध्ये ८३ तर २०१२ मध्ये ७५ जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या त्याचे काय? किंबहुना १९९७ पासून प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेच्या जागा १०-१२ ने कमीच होत गेल्या आहेत तो क्रम २०१२ मध्येही कायम राहिला.
तुमचा शिवसेनेवर कितीही राग असला तरी तो व्यक्त होतांना सकारात्मक पद्धतीनेच व्यक्त करावा म्हणून सुचवेन.
अनाहूत सल्ल्याबद्दल आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

पुण्यात आमच्या हपिसात अजून

अनुप ढेरे
Mon, 02/20/2017 - 08:48 नवीन
पुण्यात आमच्या हपिसात अजून तरी उद्यासाठी सुट्टी घोषित झालेली नाही. सुटी मिळेल असं वाटत नाही. फारतर दोन तास उशीरा या असं म्हणतील. हे कायदेशीर आहे काय? आणि नसेल तर तक्रार कुठे करायची?
  • Log in or register to post comments

२ भाबडे प्रश्न होते

विशुमित
Mon, 02/20/2017 - 11:11 नवीन
२ भाबडे प्रश्न होते १) मुख्यमंत्र्यानी त्यांची वक्तृत्व शैली बदलली आहे का ? २) जर बदलली असेल तर ती बदलण्याचा सल्ला, त्याचे प्रशिक्षण आणि तयारी कोणी करून घेतली असावी? (प्रश्न विचारण्याचे कारण की पूर्वीची त्यांची शैली खरंच उत्कृष्ट होती आता जागरण गोंधळांतला भोप्या बोलतो तशी वाटली, असे आमच्या गावातील एक बुजुर्ग यांचे निरीक्षण होते )
  • Log in or register to post comments

या ठिकाणी आणि त्या ठिकाणी

गॅरी ट्रुमन
Mon, 02/20/2017 - 13:38 नवीन
पूर्वीची त्यांची शैली खरंच उत्कृष्ट होती आता जागरण गोंधळांतला भोप्या बोलतो तशी वाटली
फडणवीसांची फार भाषणे मी बघितलेली नाहीत पण जी काही भाषणे बघितली आहेत त्यातून त्यांची शैली उत्कृष्ट वगैरे काही कधी वाटली नाही. कदाचित मोदींबरोबर तुलना होत असल्यामुळे असेल. परवा त्यांचे नाशिकमधले भाषण बघितले. ते भाषण अत्यंत रटाळ आणि कंटाळवाणे वाटले. ते अगदी एकाच सुरात बोलत होते. आवाजात चढउतार नाहीत की पॉजचा कालावधी कमीजास्त केला आहे असेही नव्हते. त्यांच्या चेहर्‍यावरचा थकवा अगदी स्पष्टपणे दिसत होता. फडणवीसांच्या भाषणातील एक गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे "या ठिकाणी" आणि "त्या ठिकाणी" चा वारेमाप वापर. सुरवातीला ते किती वेळा "या ठिकाणी" आणि "त्या ठिकाणी" बोलत आहेत ते मोजायला सुरवात केली होती. पण नंतर ते इतक्या वेळा झाले की ते मोजायचा प्रयत्न सोडून द्यावा लागला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

फडणवीस अतिशय एकसुरी व खूप

श्रीगुरुजी
Mon, 02/20/2017 - 15:00 नवीन
फडणवीस अतिशय एकसुरी व खूप वरच्या पट्टीत बोलतात. मोदींप्रमाणे किंवा राज ठाकरेप्रमाणे आवाजात चढउतार आणून, योग्य ठिकाणी काही क्षण थांबून एखादे जबरदस्त वाक्य फेकणे त्यांना जमत नाही. त्यांचे भाषण अत्यंत कंटाळवाणे असते. बाहेर बोलताना "त्या ठिकाणी" आणि विधिमंडळात बोलताना "अध्यक्ष महोदय" हे शब्द असंख्य वेळा वापरतात. वक्तृत्व शैली चांगली नसली तरी त्यांचे भाषण अभ्यासू असते व समर्पक आकडेवारी देऊन ते विरोधी पक्षांचे मुद्दे खोडून काढतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

एकसुरी नाही वो... वेगळाच ठेका

विशुमित
Mon, 02/20/2017 - 15:18 नवीन
एकसुरी नाही वो... वेगळाच ठेका धरला होता यावेळेस भाषणांमध्ये... स्पीड पण खूप होते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ते विधानसभेत असे नाही बोलत .

वरुण मोहिते
Mon, 02/20/2017 - 16:13 नवीन
हल्ली प्रचारात बोलताना कोणाची शिकवणी लावलीये कोण जाणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

तेच म्हणतोय मी. जाम वैताग आला

विशुमित
Mon, 02/20/2017 - 16:34 नवीन
तेच म्हणतोय मी. जाम वैताग आला राव मुख्यमंत्रांच्या भाषणांचा. त्यावर त्यांची त्या जाहिरातीने तर कहरच केला. २ मिनिटात ३ वेळा तीच तीच जाहिरात. राज ठाकरेंचं मुद्देसूद होती भाषणं. वक्तृत्वाचा कंप्लिट प्याकेज. पण त्यांना थोडा ही व्यत्यय सहन होत नाही. झी २४ तास च्या मुलाखतीत चक्क ते पत्रकारावर व्यत्यय आणला म्हणून भडकलेच. बिचाऱ्याने नंतर शेवट पर्यंत एक पण प्रश्न विचारला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते

पत्रकारांनीही संयम बाळगणे

हतोळकरांचा प्रसाद
Mon, 02/20/2017 - 17:40 नवीन
पत्रकारांनीही संयम बाळगणे अत्यावश्यक आहे. इतके इररिटेटिंग आणि फालतू प्रश्न विचारले जात होते. मला उलट राज ठाकरे त्यांच्या याआधीच्या मुलाखतींपेक्षा खूप जास्त संयम ठेवत होते असे वाटले. आळशी नेता ते लहरी नेता ते हातातल्या अंगठ्या कोठे गेल्या ते राजकारणात तुम्ही अनफिट आहात का? असले प्रश्न विचारले जात होते. आधीचे अर्णबच्या मुलाखतीतील राज ठाकरे आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

प्रचाराच्या तोफा थंडावल्यात

धर्मराजमुटके
Mon, 02/20/2017 - 12:04 नवीन
प्रचाराच्या तोफा थंडावल्यात ! उद्या मतदान आहे. तुम्ही कोणत्या पक्षाच्या बाजुने / विरोधात आहात हे न बघता चांगले नगरसेवक निवडून देण्याचा प्रयत्न करा. आपापल्या वॉर्डातील सगळ्या उमेदवारांच्या कुंडल्या वर्तमानपत्रात जाहिर झाल्या आहेत. उद्या मतदान केंद्रावरही लावणार आहेत म्हणे. कोणत्याही परिस्थितीत खुन / खुनाचा प्रयत्न, दरोडा, खोट्या नोटा छापणारे, बलात्कारी निवडून येणार नाहीत हे बघा. एकवेळ निष्क्रीय उमेदवार निवडून आला तरी चालेल पण वरील गुन्हे करणार्‍यांना अजिबात निवडून देऊ नका. एकदा अशा उमेदवारांना निवडून देणे बंद केले की पक्ष आपोआप सरळ होतील. (थोडा वेळ लागेल म्हणा !)
  • Log in or register to post comments

राज ठाकरे

कपिलमुनी
Mon, 02/20/2017 - 12:58 नवीन
सगळ्या पक्षांमध्ये फक्त राज ठाकरे सेन्सिबल प्रचार करत आहेत. केलेली कामे दाखवून मते मागत आहेत . भाजपा सत्तेत असून सेनेवर टीका करतो आणि सेना भाजपावर !मुख्यमंत्री हे गृहमंत्री देखील आहेत हे विसरतात आणि गुंडांचे प्रचार करत हिंडतात . केलेली कामे दाखवण्यापेक्षा चिखलफेक करून टीआरपी गोळा करण्यात सीएम आणि उद्धव ठाकरे बिझी आहेत. यामुळे राज ठाकरेंना मत देण्याचा पर्याय चांगला आहे , बोलायचाच आहे तर चांगले तरी बोलले , बाकीचे अजून चिखलात लोळत आहेत
  • Log in or register to post comments

सगळ्या पक्षांमध्ये फक्त राज ठाकरे सेन्सिबल प्रचार करत आहेत.

सचु कुळकर्णी
Tue, 02/21/2017 - 03:43 नवीन
मुनिवर पुर्ण प्रतिसादाशी सहमत. कारण नोटा हा पर्याय सद्द्स्थितित वापरला काय अन ना वापरला काय (म्हणजे मतदानच नाहि केले) सारखच आहे. मि शाळेत असताना आमच्या अकोल्याला बाळासाहेबांच्या ३ सभा न चुकता ऐकल्या होत्या, अटलजिंचे भाषणे सुद्धा न चुकता ऐकले होते. माणुस साला एक प्रकारे सम्मोहित होउन जायचा, नंतर नंतर कळायला लागल्यावर म्हणजे थोडे राजकिय शहाणपण आल्यावर हे माहित होउन हि कि सगळ्यांचे पाय मातिचे असतात तरिहि ह्या लोकांचा पगडा मनावर कायम होता. तसाच मनसेच्या सुरुवातिच्या काळात राज ठाकरें कडे खेचला गेलो होतो आणि फार अपेक्षा ठेउन होतो असो. पण ह्यावेळेस ते जे दादरच्या सभेत प्रेझेंटेशन दिले त्यावरुन तरी असे म्हणता येइल कि ते केलेली कामे दाखवून मते मागत आहेत . खरेच नाशकात त्यानि तेव्ह्ढे काम केले आहे का हे कोणि नाशिक कर च सांगु शकेल. माझे मत जर मुंबईत असते मि तरी मनसे ला ते दिले असते. काय ति सेना भाजपा लाजिरवाणि चिखलफेक सुरु आहे. एक सहज ऑब्झरवेशन, आशिष शेलार ह्या व्यक्तिला २०१३ किंवा २०१४ पासुन टिव्हिवर प्रवक्त्याच्या भुमिकेत बघितलय त्यावेळेस लोकसभा आणि विधानसभा (महाराष्ट्र) निवड्णुका व्हायच्या होत्या, ज्या वेळेस शेलार टि.व्हि. वर डिबेट मध्ये असायचे धड बोलता येत नव्हत हो ह्या माणसाला, आता बघा. खरय सत्ता आत्मविश्वास (माझ्या मते माज) देते. आज सकाळ पासुन धुळवड आहे अन ४ दिवसाने रंगपचमी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

आणखि एक ईंट्रेस्टिंग कॅरेक्टर

सचु कुळकर्णी
Tue, 02/21/2017 - 04:48 नवीन
आणखि एक ईंट्रेस्टिंग कॅरेक्टर गेल्या काहि महिन्यात भयंकर अ‍ॅक्टिव्ह आहे ते म्हणजे संजय राउत... फुल्लटु लपेटत र्हायते अन बंबाट फेकते. कडेलोट, पाठित खंजिर, वाघाचा पंजा, मराठि बाणा, हे मावळ्यांच रक्त आहे असले शब्द तर निर्रा चिल्लर मधि फेकते हा माणुस. उध्दवा अजब तुझे सरकार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी

सगळ्या पक्षांमध्ये फक्त राज

गणामास्तर
Tue, 02/21/2017 - 11:09 नवीन
सगळ्या पक्षांमध्ये फक्त राज ठाकरे सेन्सिबल प्रचार करत आहेत. केलेली कामे दाखवून मते मागत आहेत . राष्ट्रवादी पण केलेली कामे दाखवत आहे. बाकी, गेल्या २-४ महिन्यात नाशिक, औरंगाबादला भेटी देऊन झाल्या, माफक २-४ दिवस राहणे सुद्धा झाले. शेवटी पिंचि मनपा या बाकीच्या मनपांपेक्षा रस्ते,पाणी इ. बाबतीत कित्येक पुढे आहे असे जाणवले. इथे राष्ट्रवादीने केलेली कामे पाहता परत राष्ट्रवादी आल्यास आश्चर्य वाटणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

मास्तर... यु मस्ट बी जोकिंग..

संदीप डांगे
Tue, 02/21/2017 - 11:30 नवीन
मास्तर... यु मस्ट बी जोकिंग... =)) बाकी, आय्याम लिटल हर्ट.. तुम्ही नाशिकला औरंगाबादच्या लैनीत नका ना बसवू. पीलीज.. लै डिफ्रंस आहे... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

नाशिक आणि औरंगाबाद मध्ये फरक

गणामास्तर
Tue, 02/21/2017 - 11:56 नवीन
नाशिक आणि औरंगाबाद मध्ये फरक असला तरी रस्त्यांच्या बाबतीत नाही हो जाणवला . आणि पिंचि मध्ये राष्ट्रवादीनी कामे केली आहेत हे नाकारणे अवघड आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

फरक जाणवला नाही? आश्चर्य आहे.

संदीप डांगे
Tue, 02/21/2017 - 13:49 नवीन
फरक जाणवला नाही? आश्चर्य आहे. पण तुमचा अनुभव, त्याचे खंडन करणार नाही. असो. बाकी पींचीबद्दल आपल्याला कायबी अनुभव नाही. मागे तुम्हीच स्थानिक लोकांनी पिंचीची वाट लावली आहे असे काहीसे म्हणाल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा