Skip to main content

हिशेब

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 01/09/2016 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
हिशेब मागच्या रविवारी संध्याकाळी बायको बरोबर फिरायला गेलो होतो. (मुळात सगळ्या संध्याकाळी आमच्या दवाखान्यात जात असल्याने रविवारी संध्याकाळी आम्ही आवर्जून फिरायला जातो.) तेंव्हा आमची एक भाची रुचिरा तिथे फिरताना दिसली. नमस्कार चमत्कार झाल्यावर तिला विचारले एकटी इकडे कुठे फिरते आहेस. त्यावर ती म्हणाली आम्ही इथे जवळच नवीन घर घेतले आहे. आणि आग्रहाने ती आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली. सगळे घर दाखवले कुठे काय कसे घर सजवले आहे हे बोलणे चालू होते. ऋतुजा ( तिची मुलगी) आता ५ वर्षांची झाली. ती कुठल्या शाळेत जाते. रुचिराच्या घरी तीन बायका कामाला आहेत. एक दोन्ही वेळचा स्वयंपाक करते. एक झाडू मारणे लादी पुसणे, भांडी घासणे इ स्वच्छतेची कामे करते आणि तिसरी वरकामाला . घरी चहापाणी अवांतर गप्पा चालू असताना चालू असताना मी तिला विचारले चिन्मय (तिचा नवरा) कुठे आहे? ती म्हणाली तो ऋतुजाला( तिच्या मुलीला) घेऊन फिरायला गेला आहे. चिन्मय हा एका मुंबईतील मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पगारावर आहे. मी रुचिराला विचारले मग तुम्ही एकत्र का जात नाही? त्यावर ती म्हणाली कि पाच दिवस मी ऋतुजाला सांभाळते मग शनिवार रविवार चिन्मयने सांभाळायला नको का? ती त्याची ड्युटी आहे. मी विचारले म्हणजे तो काय काय करतो? ती म्हणाली त्या दोघांना सुटीचा असते. मग तो तिला उठवतो ब्रेकफास्ट करवतो अंघोळ घालतो जेवायलाही घालतो. दोन दिवस तिची पूर्ण काळजी त्यानेच घ्यायची.शनिवार रविवार मला पूर्ण फ्री माझ्या तोंडावर आले होते कि मग शनिवार रविवार तू नोकरी करायला जातेस का? पण मी थांबलो. बाहेर पडल्यावर बायको म्हणाली हि घरीच तर असते (गृहिणी) आहे. नवरा बिचारा सालस आहे पाच दिवस मानेवर खडा ठेवून काम करतो भरपूर पैसे मिळवतो. हि इथे राणीसारखी राहते. मग हा कसला हिशेब? पाच दिवस मी सांभाळते तर दोन दिवस नवऱ्याने पूर्ण वेळ सांभाळायचे. घरात कामाला तीन बायका आहेत.चांगले नउ हजार रुपये बायकांवर खर्च करते आहे.(चहा पाण्याच्या वेळेस स्वयंपाकघरात हि माहिती काढून झाली होती). मुलगी चार तास शाळेत जाते. सगळ्या कामाला बायका आहेत. पाच दिवस आरामच तर असतो. मग दोन दिवस मुलीला संपूर्ण नवर्याकडे द्यायचे हा कसला हिशेबीपणा. मी अजून विचार करतो आहे. आपलीच भाची आहे ती बरोबर का बायको म्हणते ते बरोबर? (सत्यकथा नावे बदलून)

वाचने 61435
प्रतिक्रिया 291

प्रतिक्रिया

डॉक, फ्रँक्लि स्पीकींग. तुम्हाला यशस्वी जीवनाची आणि यशस्वी धाग्याची गुरुकिल्ली गावलीय.

In reply to by अभ्या..

:) अशेच म्हणतो. आन त्या दोन्हीही किल्ल्या एकाच की चेनला लावल्या आहेत! . . . बाकी भाच्या तेव्हढ्या स्टोर्‍या. हिशेब कुणी/ कसा लावावा?

नाकात दोरी घालून घेण्याच्या अगोदर ( आज पोळा)लग्नाची गरज फक्त मलाच आहे हे कधीही जाणवून देऊ नका सर्व नवीन वळुंनो.

In reply to by कंजूस

या वाक्यात थोडीशी सुधारणा इतकीच करेन की लग्नानंतरही लग्न टिकवून ठेवण्याची गरज फक्त मलाच आहे हे जाणवून देऊ नये.

मागे एकदा एका धाग्यावर 'शहरी स्त्रिया शेफारल्या आहेत तर खेड्यातील स्त्रिया अन्यायग्रस्त जीवन जगत आहेत' असा प्रतिसाद दिला होता त्याची आठ्वण झाली.

एक वेळ धुणी-भांडी परवडली पण लहान मुले सांभाळणे तसे खूप जिकिरीचे. मुलं सांभाळणे म्हणजे फक्त त्याला खाऊ पीयु घालणे, कपडे बदलणे, त्याच्याशी खेळणे एवढंच नसून सतत डोळ्यात तेल घालून त्याच्यावर लक्ष ठेवणे आलं. भाचे जावई नोकरी करतात म्हणजे खूप मोठे तीर मारत असतील असे मी मानत नाही. बाकी चालू द्यात...!!

In reply to by विशुमित

एक वेळ धुणी-भांडी परवडली पण लहान मुले सांभाळणे तसे खूप जिकिरीचे. मुलं सांभाळणे म्हणजे फक्त त्याला खाऊ पीयु घालणे, कपडे बदलणे, त्याच्याशी खेळणे एवढंच नसून सतत डोळ्यात तेल घालून त्याच्यावर लक्ष ठेवणे आलं. उलट आहे. मी माझ्या मुलीचे बालपण खरंच एन्जॉय केलं. तिला जेवण भरवण्यापासून अंघोळ घालण्यापर्यंत सर्व काही मी आनंदाने केले. यात मला कुठेही ओझे किंवा काम वाटले नाही. ती चालायला लागल्यावर घरातील सामान चार फूट उंच ठेवायला लागले इ गोष्टी मी आनंदाने केल्या. काच सामान फुटण्यापेक्षा तिला लागेल या काळजीने. दुर्दैवाने मुलगा लहान असताना मी समुद्रात होतो. त्यामुळे त्याच्या बरोबर मला तितका वेळ देता आला नाही हि खंत आहे. ज्याला मुलांची आवड आहे त्याला हे ओझे आहे असे वाटणार नाही.

प्रेम संपतं तिथे व्यवहार सुरु होतो. अपल्यात तशी परिस्थिती तर निर्माण झालेली नाही नं हे आधी दोघांनीही तपासून पाहावे. त्या आठवडाभर मुलीला सांभाळत असतील तर त्यांच्या नवर्‍याने बायकोच्या खुशीसाठी शनिवार-रविवार मुलीला सांभाळावे. पण त्यालाही, 'ड्यूटी' लावून का द्यावी लागावी? मुलीला सांभाळणे हे मनापासून आणि प्रेमाने न होता बायकोच्या खुशीसाठी का करावे लागावे? जाता जाता असेही सुचवावे वाटते की त्या दोघांनीही तीन पैकी दोन कामवाल्या कमी कराव्यात. हाताशी कांहीच काम नसले की डोके सैतानाचे घर होते. मुलांच्या वाढीत आई-वडील दोघांचाही सहभाग 'मनापासून' असावा, ड्यूटी म्हणून नाही. लहान मुले आजूबाजूच्या प्रत्येक बारीकसारिक गोष्टीची नोंद घेत असते. आपल्याला जाणवले नाही तरी तान्ह्या बाळाचेही आजूबाजूच्या वातावरणावर लक्ष असते आणि ते नोंद घेत असते. एरवी स्वतःच्याच आनंदात खेळत (दुपट्यावर पडल्यापडल्या 'सायकल' चालविणारा) माझा तान्हा मुलगा आम्हा दोघांत कांही कारणावरून चढ्या आवाजात वाद्विवाद झाला तर आमची नजर टाळून, आढ्याकडे दूर भयभित नजरेने पाहात राहायचा. हे मी अनुभवले आणि आम्ही वादविवाद कमी केले. शाळेच्या वयापासून तर मुलं त्यांच्या मित्रांचे आईवडील आणि स्वतःचे आईवडील ह्यांची मनातल्या मनात, नकळत, तुलना करीत असतात. बालपणापासून घरात सतत प्रेमाची उब जाणवली तर मुलेही प्रेमळ होतात आणि सतत व्यवहार अनुभवत आली तर त्यांचे स्वभावही रुक्ष आणि व्यवहारी बनतात. घरात सतत भांडणं चालली असतील तर मुलेही एकलकोंडी आणि आत्मकेंद्रीत बनतात. असो. सांगण्याचा उद्देश एव्हढाच की कोणीतरी (जमल्यास तुम्ही आणि/किंवा तुमच्या पत्नीने) भाची आणि जावईबापूंना ह्या गोष्टी वेळीच समजवून्/पटवून द्याव्यात. कामाची वाटणी एकमेकांवरील प्रेमातून व्हावी, एकमेकांबद्दलच्या आदरातून व्हावी, हा संसार आपला आहे ह्या भावनेतून व्हावी. कोणाची काय ड्यूटी आहे? मी तुमच्यासाठी काय करतो? मी तुझ्यासाठी काय करते? ह्या विचारांना थारा नसावा.

In reply to by विशुमित

नवरा बायकोच्या प्रकरणामध्ये त्रयस्ताने पडू नये--- इति आमच्या आईसाहेब विशुमित साहेब आमच्या ही आईसाहेब हेच म्हणतात

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर साहेब रुचिरा आणि चिन्मय मध्ये कोणतेही भांडण नाही. त्यांचा संसार गुण्यागोविंदाने चालू आहे. चिन्मयला ऋजुता ला सांभाळण्यास कोणताही त्रास नाही. बाप लेकीचे नाते फार सुंदर आहे.आणि मुलगी बापाबरोबर दोन दिवस मजेत सगळ्या गोष्टी करत असते. केवळ आमच्या भाचीच्या तोंडून हा "ड्युटी" शब्द आल्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटले. उगाच त्यांच्या सुखी संसारात मी कशाला काडी घालू म्हणून मी "मग शनिवार रविवार तू नोकरी करायला जातेस का?" हे ओठापर्यंत आलेले शब्द मागे फिरवले. नवऱ्याला आपली ड्युटी काही जड आहे असे वाटत नाही आणि त्याची तशी तक्रारही नाही. "नवरा सालस आहे" असे बायको म्हणाली याचा हा अर्थ असावा.

In reply to by पिलीयन रायडर

नसेल तर..? आजकाल काहीही सांगता येत नाही ब्वॉ कोणाचे, वरवर सुजाण, सुसंस्कृत दिसणारी लोकं आतून कशी असतात ते देवाला तरी ठावूक असेल का नाही काय माहित! तुम्हाला म्हणून सांगतो पिरा, माझ्या बायकोच्या मामाच्या बायकोच्या बहिणीचा मेव्हणा अगदी बायकोचा बैल झालाय, काय जादू केली तिनं त्याच्यावर देवच जाणे, लग्न झाल्यावर मुलगे कसे बदलतात हो! आजची पिढी अशी बायकोभोवती नाचते, आमच्यावेळी असं नव्हतं... डोळे वटारले की बायका स्वयंपाकघरात पळून जायच्या. हल्लीच्या पिढीचं काय खरं नाय बघ...! (हुश्श!.... जमले का?)

In reply to by सुबोध खरे

डॉक्टरसाहेब, रुचिरा आणि चिन्मय मध्ये कोणतेही भांडण नाही. भांडण असेल तरच समुपदेशन करावे असे नाही. चुकीची विचारसरणी बदलण्यासाठीही करावे. पुढे त्यांच्या मुलांनाच त्याचा फायदा होईल. पूर्वी, माझा मुलगा ३-४ वर्षाचा, मला संताप अनावर व्हायचा. मुलाच्या चुकीसाठी त्याच्या पार्श्वभागी चटकन माझा हात उठायचा. पण माझ्या वडीलांच्य जेंव्हा हे लक्षात आले तेंव्हा त्यांनी मला सांगितले 'हात उचलू नकोस. नुसत्या नजरेने मुलाला कळलं पाहीजे एखादी गोष्ट तुला आवडलेली नाही किंवा त्याच्याकडून चुक झाली आहे.' हे माझे समुपदेशन त्यांनी केले. त्याचा मला आणि माझ्या मुलाला फायदाच झाला. असे समुपदेशन वेळीच केलेले चांगले असते. तसे त्यांनी केले नसते तर कळत्या वयात मुलाच्या मनांत माझ्याबद्दल अढी निर्माण झाली असती. तशी शक्यता असते. तो प्रसंग टाळला गेला हा केव्हढा मोठा फायदा झाला.

In reply to by सुबोध खरे

१. रुचिरा आणि चिन्मय मध्ये कोणतेही भांडण नाही. २. त्यांचा संसार गुण्यागोविंदाने चालू आहे. ३. चिन्मयला ऋजुता ला सांभाळण्यास कोणताही त्रास नाही. ४. बाप लेकीचे नाते फार सुंदर आहे.आणि मुलगी बापाबरोबर दोन दिवस मजेत सगळ्या गोष्टी करत असते. ५. नवऱ्याला आपली ड्युटी काही जड आहे असे वाटत नाही आणि त्याची तशी तक्रारही नाही. केवळ आमच्या भाचीच्या तोंडून हा "ड्युटी" शब्द आल्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटले. ओके डॉक. गॉट इट. एका शब्दामुळे हा सगळा काथ्याकूट. ब्वॉर्र.

जगात दोन प्रकारची माणसे असतात; पिळवणूक करणारी आणि करून घेणारी. बहुसंख्य माणसे ह्याच दोन वर्गात मोडतात. तिसरा वर्ग पिळवणूक न करणारा आणि करवूनही न घेणारा. पण हा अगदीच अल्पसंख्य. आपण कोणत्या वर्गात मोडतो हे आपली गुणसूत्रे ठरवितात, त्यामुळे पुढील आयुष्यात त्यात फारसे बदल करता येत नाहीत. कुणीतरी (नाव आठवत नाही) म्हटलंय, बहुतेक सर्व नाती पिळवणुकीवरच आधारलेली असतात, ते खरंही असेल! असो.

In reply to by रविकिरण फडके

असे नसते हो.... कुटुंबातील सर्व घटक जर प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बांधलेली असतील तर असे होत नाही.

घरात कामाला तीन बायका आहेत.चांगले नउ हजार रुपये बायकांवर खर्च करते आहे.(चहा पाण्याच्या वेळेस स्वयंपाकघरात हि माहिती काढून झाली होती). मुलगी चार तास शाळेत जाते. सगळ्या कामाला बायका आहेत. पाच दिवस आरामच तर असतो. मग दोन दिवस मुलीला संपूर्ण नवर्याकडे द्यायचे हा कसला हिशेबीपणा. >> Okay, if girl goes out for four hours on weekend and is with hubby for remaining day, will you call he was at home only for 2 days the way you are saying about his wife? She is at home, has 3 maids to work on everything. He is also at home on weekend and has 3 maids at disposal for house work. How come he becomes "bicchaaraa" with the same aid and she becomes useless (rikamtekadi)? ~ By a working mom who utterly loves her daughter and is lucky enough to have a husband who loves the daughter to the same extent and doesn't consider spending time with the daughter as a "work", but thinks of it as fun activity - just like the mom do!

In reply to by nanaba

तुमचा हिशेब गंडलाय का? खरेकाकांनी जो प्रश्न न विचारताच गिळला तो विचारल्यावर खरा हिशेब कळला असता.

घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती इथे असावा प्रेम-जिव्हाळा नकोत नुसती नाती त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी अश्रूतुनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी या घरट्यातुन पिल्लू उडावे दिव्य घेऊनि शक्ती आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती

आरी कुठे आहे ते पाहून ठेवणे आले. नेहमीचे यशस्वी कलाकार आलेकी धागा पतंग भरारी घ्यायला सुरुवात होईल.. मोदकाशेजारीच जागा पकडून बसलो आहे

हिशेबच लावायचा तर सरळ गणीती हिशेब मांडुयातः १. मुलगी रोज ४ तास शाळेत जाते म्हणजे ५ दिवसांचे मिळुन २० तास बायकोला पुर्ण फ्री. जे हवे ते करावे. ९००० रुपये मोजुन ३ बायका कामाला आहेत म्हणजे त्यांच्याकडुन सगळी कामे करुन घेत असावेत. (अर्थात त्या बायकांकडुन काम करुन घावे लागते हे मुजोर आणी आळशी पुरुष जातीच्या लोकांना कधी कळणार नाही.) थोडक्यात २० तास पुर्ण मोकळा वेळ मिळतो असे दिसते. (गरीब बिचार्‍या भोळ्या भाबड्या सरळ साध्या बाईला इतकी मेहनत करुन एका आठवड्यात काय मिळते तर केवळ २० तास मोकळा वेळ आणि माजोरडे नवरे मात्र...... जाउदेत) २. माजोरडा, आलशी, ऐदी, ऐतखाउ नवरा रोज कामावर जातो. उच्चपदस्थ आहे म्हणजे किमान १० तास काम करत असावा. ८ तास झोपण्यात जातात आणी रोजी १ तास प्रवासात आणी १ तास आन्हिकांमध्ये जातो असे धरल्यास हा माणूस रोज ४ तास फ्री असतो आणी घरी असतो. म्हणजेच याला पण २० तास पुर्ण मोकळा वेळ मिळतो असे दिसते. अर्थात ५ दिवस तो मुलीची कुठलीही जबाबदारी घेत नाही, मुलगी त्याच्याकडे आल्यास हाडहाड करुन हाकलुन देतो असे मानुयात. थोडक्यात ५ दिवसात दोघांनीही २० तास मोकळा वेळ मिळतो मात्र विकांताला सगळे नवर्‍यानेच करायचे आणि बायको पाय पसरुन बसणार (बायका आहेतच). आता वाटेल हिशोबाचे पारडे बायकोच्या बाजुने झुकले. पण एह एवढे सरळ आहे का? बाईमाणसाची या सगळ्या प्रकारात किती कुचंबणा होते हे नवरे समजु शकतात का?: १. एकतर बिचारी नौकरी सोडुन घरी बसली आहे. ती सुद्धा शिकलेली असेल. तुलाही करीयर करायचे असेल. मात्र जणु मुलगी वाढवण्याची जबाबदारी तिचीच. माजोरडा, आळशी, ऐदी, ऐतखाउ नवरा काय तो फक्त करियर करणार काय? २. बायकांकडुन काम करुन घेणे किती अवघड असते हे माजोरड्या, आळशी, ऐदी, ऐतखाउ पुरुषांना माहिती तरी असते का? वरकामाची बाई फर्निचर पुसते तेव्हा तिच्या मागे लागुन पंखे पण पुसुन घ्यावे लागतात. तिला आठवणा करुन द्यावी लागते की बाई ग ड्रेसिंग टेबल वर पण एक फडके मार गं. स्वयंपाकाच्या बाईकडुन रोजच्या स्वयंपाकाव्यतिरिक्त एक दिवस चटणी कुटुन घेउन दाखवा. १० दिवस मागे लागल्यावर ती एकदा चटणी कुटेल. १० दिवस रोज सांगायला लागणे हे पण एक कामच आहे ना? शिवाय फरशी पुसणारी बाई सोफ्याखालुन फडके मारत नाही. आठवण ठेउन तिला सांगावे लागते की बाई मागच्या आठवड्यात फडके मारले होते तिथुन आता परत मार. पेरियोडिक फॉलो अप यु सी. शेड्युल मेंटेन करणे हे काही सोप्पे काम आहे का? भांडी घासणारी बाई मधुनच दमते मग स्वयंपाकाच्या बाईला सांगुन तिघींसाठी चहा करुन घ्यावा लागतो. Optimal utilization of available resources. You see. Resource management is such a task. त्यात परत या बाया अधुन मधुन दांड्या मारतात तेव्हा थोडीशी धूळ दिसली की तो माजोरडा, आळशी, ऐदी, ऐतखाउ नवरा कुरकुर करायला तयार आहेच. शिवाय या बायका रोज येत आहेत की नाही हे बघणॅ, नाही आल्या तर त्यांना फोन करणे. चुचकारुन त्यांच्याकडुन कामे करुन घेणे. एक न अनेक. किती कामे असतात. ३. ऐदी, आळीशी नवर्‍याला काय त्रास आहे? रोज हापिसात एसी मध्ये बसतो. सहकार्‍यांवार ऑर्डर सोडतो आणि कामे करुन घेतो. Its that simple. मध्येच त्याचा बास गुरकावला तर दुर्लक्ष तर करायचे असते. शिवाय डेडलाइन्स चे टेंशन नसतेच. ऑफिल पॉलिटिक्स वगैरे प्रकार नुसतीच गंमत आहे. पीसीकडे टक लावुन बघणे हे काही काम होउ शकत नाही (बाकी काम असतेच काय?) असो. तर बिचार्‍या बायकांना या सगळ्या त्रासातुन जावे लागत असताना डॉक्टरांना असले प्रश्न पडावेत हे बघुन वाईट वाटले , गृहिणी असणे म्हणजे विश्रांतीची गरज नसणे का ?

In reply to by मीरा वैद्य

फक्त या लेखात उल्लेख आलेला नवरा आळशी,माजोरडा,ऐदी, ऐतखाउ आहे असे आपल्याला म्हणायचे आहे कि जगातल्या सर्व पुरुष जमातीबद्दल आपले हे मत आहे? बरं, फक्त या लेखातला पुरुष आळशी,माजोरडा,ऐदी, ऐतखाउ असल्याचा निष्कर्ष तुम्ही कसा काढलात हे जाणून घेण्यास उत्सुक.

In reply to by मीरा वैद्य

तुमच्या प्रतिसादाचा रोख लोकांच्या लक्ष्यात आलेला दिसत नाहीये

In reply to by मीरा वैद्य

एकुणच पुरुष जातीवर शरसंधान करण्याच्या नादात तुम्ही विवक्षित व्यक्तीवर नसती (ऐदी, ऐतखाउ, आळशी, माजोरडा वगैरे) विश्लेषणे लावली आहेत हे आपल्याला कळते आहे काय? आपण एखाद्या व्यक्तीला ओळखत नसताना त्याबद्दल असे कसे काय लिहु शकता?

In reply to by मृत्युन्जय

तो प्रतिसाद उपरोधिक आहे. पुरुषांबद्दल जो सर्वसाधारणपणे विचार केला जातो त्या कल्पनेला छेद देणारा आहे.

In reply to by मृत्युन्जय

जाऊद्या हो. .ते मज्जा घेतायत तर आपण पण थोडी मजा करू. नवे सोंग धारण केलेला जुनाचं अवतार आहे तो :)

In reply to by मृत्युन्जय

अहो, बहुधा त्यांनी तो प्रतिसाद त्यांच्या पतींसंदर्भात दिला आहे. त्यामुळे विविक्षित कसे म्हणता ?

In reply to by मीरा वैद्य

हा प्रतिसाद खरोखर उपरोधिक आहे का ? -- उपरोधीक नसेल तर मेगाबायटी प्रतिसाद देण्यास उत्सुक असलेला एक ऐदी, ऐतखाउ, आळशी, माजोरडा मिपाकर..

जर नवरा आणि बायकोला ही अरेंजमेंट पसंत असेल तर ती योग्यच म्हणायला पाहिजे. माझ्या दृष्टीनी खरा प्रॉब्लेम वेगळाच आहे. मुलीबरोबर फिरायला जाताना आईवडिलांना एकत्र जावंसं वाटंत नाही ही वस्तुस्थिती बोलकी आहे. कारण काही का असे ना, यातून चिन्मयला एक मोठा फायदा होणार आहे. बापाची आणि मुलीची नाळ प्रचंड घट्ट होईल. That is reward enough!

In reply to by स्वीट टॉकर

+१ पण ही परिस्थिती त्यानी दोघांनी ठरवूनच तयार केली असेल तर कोणी काय करू शकतो?

In reply to by पैसा

पण ही परिस्थिती त्यानी दोघांनी ठरवूनच तयार केली असेल तर कोणी काय करू शकतो? पैताई, गॉसिप करु शकतो ना? त्याचाच आहे ना धागा?

In reply to by संदीप डांगे

अगदी अगदी! पैसाताईशी सहमत.. ह्यात आपण काय करु शकतो? नवर्‍याला "बिच्चारा" का ग्रुहित धरलेलं आहे? वीकांताला मुलीचं वडिलांनी केलं का तर आई कंटाळली आहे आठवडाभर करुन तर तिला "हिशोबी" का म्हणलेलं आहे? आपल्याच लेकराचं करणं हे काही काम असतं का? आणि समजा असेलही तो बिचारा आणि ती हिशोबी, मिया बीबी राजी तो क्या करेगा काझी?!

In reply to by पिलीयन रायडर

क्या करेगा काझी?! >> अब्बीच बोला ना! खाली 'गॉसिप' करेगा करके =)) (ह्या धाग्यावर मी कुठल्याही प्रकारचे योगदान देवू शकत नाही, तस्मात् 'गॉसिप' हा शब्द जास्तित जास्त वेळा लिहायची मला संधी उपलब्ध करुन द्यावी ही तमाम मिपाकरांना विनम्र विनंती ;))

In reply to by संदीप डांगे

पैताई, गॉसिप करु शकतो ना? त्याचाच आहे ना धागा?
एक्झॅक्टली. 'आपल्याला' जी मूल्यं योग्य वाटतात तीच सगळ्यांनी पाळावीत अशा आग्रहातून आलेला धागा.

In reply to by स्वीट टॉकर

गोडबोले साहेब मुलीबरोबर फिरायला जाताना आईवडिलांना एकत्र जावंसं वाटंत नाही. असंही वाटत नाही. कारण इतर सर्व कार्यक्रमात ते एक कुटुंब म्हणून व्यवस्थित पणे आनंदात आहेत असे दिसते. शिवाय काही "कुरबुर" असेल तर नातेवाईकांत चर्चा सुद्धा होते तसंही काही दिसलं नाही.

कारण काही का असे ना, यातून चिन्मयला एक मोठा फायदा होणार आहे. बापाची आणि मुलीची नाळ प्रचंड घट्ट होईल. That is reward enough!
+१००

"मुलीबरोबर फिरायला जाताना आईवडिलांना एकत्र जावंसं वाटंत नाही ही वस्तुस्थिती बोलकी आहे." मला पण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वाटला.

In reply to by दा विन्ची

मुलगी + बाबा मुलगी + आई आई + बाबा मुलगी + आई + बाबा फक्त आई फक्त बाबा हे सगळे कोंबिनेशंस हवेतच हेल्दी नात्यांकरता. खर्यांच्या एक वेळच्या निरिक्षणावरून डायरेक्ट प्रश्नचिन्ह! बाई ही एक माणूस आहे आणि एकट असणं ही तिचीही गरज आहे हे ध्यानात घेतलत तर आजची परिस्थिती जरा बदलेल.

In reply to by nanaba

बाई ही एक माणूस आहे आणि एकट असणं ही तिचीही गरज आहे हे ध्यानात घेतलत तर आजची परिस्थिती जरा बदलेल. हे संपूर्ण मान्य आहे. पण एक "ड्युटी" असल्यासारखे दर शनिवार रविवार बापाने मुलीला सांभाळणे याबद्दल हि चर्चा आहे.

मलाही हाच मुद्दा जास्त विचाराधीन वाटला.एरवी कामामुळे दोघांना एकमेकांना वेळ देता येत नसेल तर शनिवार रविवार एकत्र घालवावा असे त्यांना वाटत नाही हे जास्त गंभीर आहे.