Skip to main content

पिंपरी चिंचवडची खाद्ययात्रा

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 31/08/2016 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
औरंग्याचे ठाणे खादाडी धागे पाहून पिंपरी चिंचवडमधील ठिकाणांसाठी पण धागा असावे असे वाटल्याने इथल्या काही ठिकाणांची भर टाकत आहे. पिंपरी चिंचवडचे मिपाकर अजून काही ठिकाणांबद्दल लिहितीलच. १. नाशिककर कॅन्टीन - एच ए कॉलनीत, ह्याचं फरसाण खूप जबरदस्त. वडापाव पूर्वी खूप छान होता पण हल्ली सोडा जास्त मारतो. सामोसा आणि त्याबरोबर देत असलेली खोबर्‍याची चटणी मात्र अत्युत्तम. गुलाबजामपण खूप उत्कृष्ट. सकाळी ८ ते संध्याकाळी ५.३० / ६ पर्यंत चालू असतं. २. करमरकर - चापेकर चौक, चिंचवड साबुदाणा खिचडी, कोथिंबीर वडी खूप छान, पोहे, उपमा, मिसळ वगैरे मिळतात. किंचित महागडं पण दर्जेदार ३. मयुर मिसळ - चिंचवड स्टेशन पिंचिंमधली सर्वात चांगली मिसळ इथेच खाल्लीय. बाकी चिंचवडगावात नेवाळे ( हा तिखटाचे डबेच्या डबे ओतत असावा रश्श्यात इतकी तिखट), लिंक रोडवर दे धक्का, पिंपरीगावात निसर्ग, अतिथी, जनता, दिप्ती असे मिसळीचे ठेले आहेत. ४. कुदळेची भेळ - पिंपरीगाव, नवमहाराष्ट्र शाळेच्या मागे. मटकी भेळेसाठी प्रसिद्ध. भेळेची ताटली अगदी भरगच्च देतो. त्यवार मटकी आणि लिंबाच्या रसात वाफवलेल्या हिरव्या मिरच्या. अफाट लागतात. ५. महादेव पॅटिसवाला - पिंपरी कॅम्प सकाळी ह्याच्याकडे खास सिंधी पक्वान मिळतं. दाल पकवान. आणि संध्याकाळी रगडा पॅटिस (सिंधी स्टाईलचं). दोन्ही वेळा भरपूर गर्दी असते. दालवडा, मिरचीवडा, भजी ह्या अजून काही खासियती. ६. गीता स्नॅक्स सेंटर - निगडी पावभाजी आणि कॉल्ड कॉफीसाठी फेमस ७. गणेश स्वीट मार्ट - पिंपरी कॅम्प. ह्याच्यासारखी रसमलई अगदी चितळे बंधू, काका हलवाईकडे देखील मिळत नाही. माफक गोड आणि चवीला प्रचंड सुंदर. ८. यशवंत स्वीट मार्ट - चिंचवडगाव गुलाबजाम, बाकरवडी आणि इतर पदार्थ. गुलाबजाम जवळपास नाशिककरसारख्याच चवीचे. ९. कलादीप स्वीट मार्ट - चिंचवडगाव. इथला ढोकळा खूप भारी आणि त्याच्याबरोबर मिळणारी पुदिन्याची चटणीपण खूप भारी. खूप लवकर संपतो ढोकळा इथला. हाटेलं वगैरे मुद्दामच दिलेली नाहीत, मिपाकर अजून भर घालतीलच.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 38779
प्रतिक्रिया 202

प्रतिक्रिया

In reply to by अभ्या..

ए टांग बिंग दिली नव्हती बे. स्पष्ट सांगून गेलतो तसं. ते जाउदे तू ये आता इकडं. गेल्या वेळी अभक्ष्य भक्षण चालणारे/न चालणारे आणि ईतर बरेचं वर्गीकरण करून सर्वांच्या सोयीचे ठिकाण ठरवले होते. यावेळी आपल्या टाइपचा स्पेशल कट्टा करू :)

In reply to by गणामास्तर

मास्तरांच्या सामिष व्यासंगास आमचा साष्टांग दंडवत! तळेगाव हॉस्टेलला parasite राहत असताना दारू प्यायला अन मटण खायला तळेगाव ते भक्तीशक्ती (पुणे गेट हॉटेल) बोंबलत यायचे (ते ही थंडीच्या दिवसात बाईकवर) दिवस आठवले! मास्तर 1. पदमजी पेपरमिल समोर आदित्य बिर्ला कडून डांगे चौक जाताना डाव्या बाजूला एक नवे जंगी कोल्हापुरी हॉटेल उघडले होते म्हणे, ते कसे आहे? 2. नाशिक फाट्याजवळ कुठंतरी एक अप्रतिम अहमदनगरी मटण अन "मटण अळणी" देणारे हॉटेल आहे म्हणतात,ह्या दोन्ही बद्दल जमल्यास सांगा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

नाशीक फाट्याजवळचं (ते नंतर ऊड्डाण पोलाच्या रस्ता रुंदीत ऊडालं अता पुढे कुठेतरी आतल्या बाजूला आहे (कासारवाडीला) खेडशिवापुरनंतर गरमागरम तांदळाची/ज्वारीची भाकरी इथेच खाल्ली आहे, मी अट्टल शाकाहारी असल्याने इथे गेल्यावर झुणका/मसूराची उसळ्/वाटाण्याची आमटीची चव चाखली आहे.माहोल अगदी एखाद्या टपरी वजा (ष्टांण्दाशेजारच्या हाटेलाचा) पण चटणी भाकरी आणि बर्याचदा दहीकांदा एकदम फर्मास त्याच्याकडे एकदा हुलग्याचे शेंगोळेही खाल्ले आहेत. आधिच्या कंपनीत गणामास्तरसारखा अस्सल खवय्या (बाहेरून झकपक नाही तर अट्टल चवीची ठिकाणे शोधणारा) मित्र होता त्याच्या बरोबर सगळ्या समीष हाटेलास भेटी दिल्या आहेत. साध्या खोपटात असलेले हटेल एम्पायर ईष्टेटच्या जवळाच्या पंपाजवळ हे मांसाहारी हाटेल आणि मारुतीराया मंदीरात जवळ जवळ होते. रस्ता रुंदीत मारुतीराया ऊड्डाण रस्त्या पलीकडे गेले आणि हे हाटेल शाहुनगरला केसएबीपासून्च्या रस्त्यावर गेले. हाटेल्चे नाव जगुबाई शाकाहारींसाठी सावलीही चांगले ठिकाण आहे तसेच रसोईसे (मुलांना जास्ती आवडले) पेशवाई ठीक ठाक (म्हणजे मी शाकाहारी असल्याने समिष वाल्यांना चवदार वाटत असावे ,बरीच गर्दी दिसली म्हणून अंदाज) पिंगारा ९जे पुर्वी आकुर्डी ह्चौकातून प्राधिकरणात गेले तेही ठीक्ठाक्च वाटले त्याच्या शेजारी असलेले अतिथी चांगले होते. जयश्री मिसळ (बजाज टेंपोसमोर) चवीला चांगली आहे पण आधीच तयार करून ठेवत असल्याने चिखल-अनुभव येतो. मयुरला तोड नाही पण पिंपरीतील जनता आणि निसर्गही आप्ला आब राखून आहेत. किर्स्पी भज्यांसाठी चिंचव्ड एम आय डीसी हाफीसमोरचा परदेशीचा गाडा मस्त्,त्याच्याच बाजूला दोन स्वीट मार्ट आहेत एकात हातपापडी चांगली मिळते,जवळच असलेले शीतल एके काळी जबरा होते मध्यंतरी मालक खांदेपालट झाल्यावर रया गेली होती,अता जरा पुर्वपदावर येत आहे. स्टेशनच्या मल्हारचा बाजार उठला पण त्या पुर्वी जवळचे भागयश्री डाय्नीम्ग हॉल चांगले होते,माल्काला जागा वाढ्वायची (कु)बुद्धी झाली आणि जागा वाढली आणि गुणवत्ता घटली नंतर बंदच झाले. लस्सी साठी दोन्ही बहिरवाडे चांगले एक बँकेसमोर आणि दुस्र्या पो स्टेशनच्या पिछाडीला. पण अस्सल भज्यांसाठी जयश्री थिअएटराचा बाहेर एक गाडी लावीत असे (अता लावतात का ते माहीत नाही) पुर्वी कंपनीतून चालत जायच्या अंतरावर असल्याने सायंकाळी भजी अग्निहोत्र व्हायचेच. वाल्हेकरवाडी रस्त्याला बरीच हाटेले आहेत सगळीच्या सगळी समिष असल्याने कधी जेवायला गेलो नाही,फक्त एक्दा रानमळ्यात मुनीवर,मोदक आणि सौरभला भेटायला गेलो होतो. चाकणची मल्हार मिसळची घराजवळच्या चौकात नवीन शाखा उघडली आहे कशी आहे माहीत नाही (पण गर्दी अस्ते,पिंचिंमिपाकरांबरोबर एक्दा चाखून पाहू यात.)

In reply to by नाखु

द मराठा, आता फ्लायओव्हर क्रॉस करून पिंपळे गुरवकडे गेले की लागते. इथे सुकी मेथी भाजी, पिठले, भाकरी, काळ्या तूराची उसळ इ. मराठी आयटम छान मिळतात. थोडे पंजाबी (जिरा राईस) वैगरे कॉम्बो करून मस्त जेवण होते.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मला कसला दंडवत घालताय बाप्पू ! सामिष खायचं म्हणलं कि आम्हाला हाटेलं धुंडाळणं भाग आहे. 'पुणे गेट' सुरुवातीच्या दिवसात चांगलं होतं पण आता बरचं बिघडलंय. त्याच्या मागेच ट्रान्सपोर्ट नगर मध्ये 'जगुबाई मटण खानावळ' आहे. तिथे गेला असतात तर कधी फिरून पुणे गेट ला गेला नसतात. तीर्थ मिळत नाही तिथे पण ट्रान्सपोर्ट वाल्यांचा एरिया असल्यामुळे आजूबाजूला ढिगानी पर्याय उपलब्ध आहेत. पदमजी पेपर मिल जवळचे तुम्ही म्हणताय ते 'पुरेपूर कोल्हापूर'. कोल्हापूरच्या नावानी निघालेल्या इतर बऱ्याच ठिकाणांसारखे हे पण गंडलेले आहे. नाशिक फाट्या जवळ कुठले म्हणताय ते शिल्पा गावरान आहे. 'मटण अळणी" भारीचं आहे तिथले शिवाय तिखट रस्सा वाटी पण एकदम झकास. 'बसणाऱ्या' लोकांसाठी खास जागा आहे ही.

In reply to by गणामास्तर

मोरवाडी चौकातून जवळच कोर्टाकडे जानाऱ्या रोडवर डाव्या हाताला 'जय मल्हार' मध्ये मस्त मटण-भाकरी थाळी मिळते. तिखटाशी ज्यांच जुळत नाही अश्यांनी विचारही करू नये.

जरा ठिकाणाच्या जवळपासच्या खुणाही सांगा. नुसतं अरिहंत म्हटल्यावर काय कळणार? आमचे मित्र मनोबा यांनी मोरया गोसावी मंदिरासमोर थालीपीठ खायला घातले होते. आम्ही गेल्यावर पीठ थापून केलेले गरमागरम थालीपीठ एकदम मस्त. (पिंचिंकर) आजानुकर्ण

In reply to by देवांग

अरिहंतची सांगली भेळ खूप छान मिळते. पोहे, उप्पीट पण छान आहेत. मिसळ थोडीशी गंडलेली आहे मात्र.

In reply to by देवांग

तिथेचं बाजूला सावंतच्या गॅरेज शेजारी ओल्या नारळाच्या करंज्या मिळतात. कधीही जा गरमचं मिळतील. ते चितळे वगैरे स्वीटमार्ट वाल्यांना वर्षभर पुरवतात. डायरेक्ट तिथून घेतल्या तर बऱ्याचं स्वस्त पडतात.

In reply to by गणामास्तर

भारीच. तिथेच जरा अलीकडे प्रेमलोक पार्कच्या चौकात पेण समोसेवाला होता. घरगुती बनवलेले सामोसे एकदम चवदार होते. हल्ली त्याची गाडी कुठे दिसत नाही.

In reply to by देवांग

तिथेचं बाजूला सावंतच्या गॅरेज शेजारी ओल्या नारळाच्या करंज्या मिळतात. कधीही जा गरमचं मिळतील. ते चितळे वगैरे स्वीटमार्ट वाल्यांना वर्षभर पुरवतात. डायरेक्ट तिथून घेतल्या तर बऱ्याचं स्वस्त पडतात.

सांगवीत शितोळे चौकातील हाॅटेल जलसा मध्ये बिर्याणी मिळते प्रत साधारण असते पण भरपूर असते बर्‍याच वेळा संपूर्ण खाल्ली जात नाही.

जुन्या सांगवी मधे आला की बँक ऑफ महाराष्ट्राच्या गल्लीत वळायचे तिथे छोटासा हॉटेल गोमंतक आहे . तिथे मासे चांगले मिळतात.अनलिमिटेड रस्सा आहे.

In reply to by कपिलमुनी

मुनिवर, अन्नपूर्णा हॉटेल च्या चौकात 'मालवण समुद्र' आहे तिथे पण मासे चांगले मिळतात. कोलंबी भात तर अफलातून एकदम.

In reply to by गणामास्तर

चव, पर्यायाने नाव आणि इज्जत घालवलेली आहे. शिळे आणि अती तळलेले मासे खाऊन लोक बोअर झाले आहेत.

सुकांता , बादशाही सारखी थाळी पिंचि मधे कुठे मिळते?

In reply to by कपिलमुनी

रामदेव थाळ -निगडी चौक हॉटेल भोला - केएसबी चौक मयुर - चिंचवड स्टेशन ( हे भलतंच महागडं आहे) श्रावण डायनिंग हॉल - आयनोक्स जय गणेश

In reply to by प्रचेतस

मयूर महाग आहे, पण सुकांतासारखे सुरुवातीला पेये देऊन उगीच अर्धे पोट भरवून नाही टाकत ;) शिवाय मालक स्वतः उभे राहून व्यवस्था बघत असतात, अगदी आग्रह करुन करुन मुलाला भरपूर जिलेब्या खाऊ घातल्या होत्या :)

In reply to by रुपी

घरगुती थाळी हवी असेल तर खरे यांचा सुहास डायनिंग हाॅल. खूप वर्षापासून आहे. अजून एक थाळी मिळण्याचे ठिकाण म्हणजे नैवेद्यम. हायवे ला आहे खंडोबाच्या माळाजवळ

In reply to by गणामास्तर

=))

In reply to by अभ्या..

बेक्कार हसलो भाऊ!!!, बाकी हे एक निरीक्षण आहे आमचे, चितळ्यांच्या बाकरवडी पुरवठा योजनेच्या लाईन मध्ये शेवटला नंबर असताना जर बाकरवडी संपली तर तो माणूस अत्यानंदाने "संपलीsssss" असं सांगतो!, त्या माणसाला त्यात कसला जबरी आनंद मिळतो देव जाणे!! =)), (मला लिहून तो भाव व्यक्त करता येत नाहीये त्या काउंटर वरल्या बाप्याचा, कधी भेटू तेव्हा साभिनय करून दाखवू) =)) =))

In reply to by विनटूविन

खुषखबर आता चितळे शाखा चाफेकर चौकातही (अगदी पुना गाडङीळ शेजारी म्म्डईलगतची इमारत. वर्षामागे प्राधिकरणात शाखा उघडलेली आहेच, आता चिंचवडातही.

१. मत्स्याहारींसाठी मालवण समुद्र:- फार झकपक नाही पण स्वच्छ आणि चव चांगली. यांच्या दोन शाखा आहेत. गावडे काॅलनीजवळ एक आणि कामिनी हाॅटेल शेजारी एक २. शिल्पा गावरान :- बसणा-यांसाठी मस्त जागा. ईथली कडक भाकरी आणि रस्सा....आहाहा. कितीही प्या, समाधानच होत नाही. पुण्याहून चिंचवडला येताना नाशिकफाट्याच्या जस्ट आधी आहे. ३. रंगोली:- राजस्थानी पदार्थ चांगले मिळतात. दाल बाटी वगैरे. राघवेंद्र स्वामी मठाजवळ. ४. बाबा रामदेव ढाबा:- रंगोलीप्रमाणेच. दाल बाटी मस्त एकदम. जयपुरी गट्टे की सबजी पण झकास. निगडी ट्रांसपोर्ट नगरीत ५. वराडेची भुर्जी:- अशक्य चव. चापेकर चाैकात संध्याकाळी साडे सातनंतर गाडी लावतो. बायको गेल्यापासून जरा अनियमित झालाय. प्रचंड अहं, पण भुर्जी आणि बाॅईल फ्रायच्या चवीपुढे सगळं माफ. याच्या हातगाडीवर तेरा सूचना असलेला बोर्ड आहे. 'सुटे पैसे असल्याची खात्री केल्याशिवाय आॅर्डर देऊ नये' ही त्यातली एक. यावरून माजाची क्लपना यावी. ६. वाघेरे यांचा रानमळा.वाल्हेकरवाडी रोडवर. भाकरी व चिकन मटन उत्तम. ७. हाॅटेल समाधान:- डांगे चाैकातून रावेत कडे येताना बकेट/बास्केट ब्रिजच्या आधी. अळणी मटण भारी. आणि अस्सल ईंद्रायणी भात. गरम गरम भात आला की मस्त सुवास येतो तांदळाचा ८. ग्लोबल ग्रिल:- सिगरी. पिंपरी सेंट्रलच्या ईमारतीत. बार्बेक्यू नेशन पेक्षा ईथली चव आणि विविधता चांगली आहे ९. जनाबाईचे मटण:- वाल्हेकरवाडी रोडला. मी खाल्लेले नाही अजून पण नाव ऐकून आहे खूप.

In reply to by चाणक्य

१०. हिंजवडीत एक 'ए वन'नावाची बिर्यानी मिळते. उच्च असते.

In reply to by चाणक्य

बाबा रामदेव ढाबा:-
चा उगाच हाईप ठेवलाय प्रचंड गर्दी आणि खूप जास्ती दर, लोक तुमच्या खाटेमागे पानात नजर ठेवून असतात.

In reply to by महासंग्राम

स्वस्त न मस्त दाल्बाटी मिळते तिथ! हा गर्दी खुप असती आजकाल. पण ती कुठे नसते?

In reply to by चाणक्य

९. तुम्हाला बहुतेक जगुबाई म्हणायचे असेल.. इथे इतरही ठिकाणच्या जगुबाई हॉटेलचा उल्लेख आहे.. बहुधा त्याचीच शाखा असावी.

शाकाहारी लोकांनी काय करावं ? स्वगत-पिंचिवाले बोलवत तर नाहीत.... फक्त आपल्या खाद्य ठिकाणांच्या झैराती करतात !

आनखी काही... होटेल पन्हाळगड, आकुर्डी चौक.. अप्रतिम फ़िश थाळी, मटण थाळी.. गुड फुड रोल हाऊस , भुमकर चौक... भज्जन सिंह दा धाबा.. सोमाट्णे फ़ाटा..

वाखू साठवली आहे. गणामास्तर यांचा प्रतिसाद वाचूनच जीभ खवळली आहे!

In reply to by इल्यूमिनाटस

थंडा मामला मध्ये सब्जी लसुनी आमचा वीकपॉईंट होता, त्या सब्जीसाठी आम्ही प्रसंगी बिर्याणी सुद्धा सोडत असू!, लोकेशन तेच, सोमाटणे फाट्याच्या थोडं पुढे खिंडीतून उतरले की :)

In reply to by प्रचेतस

आम्ही तिथे फक्त भजीच खातो! पावसात मस्त बाईक वर एक शॉर्ट ड्राईव्ह घेऊन तिथे फक्त भजी खायची आणि गरमागरम चहा प्यायची मजा औरच. पण आता हे दोन्ही पदार्थ ट्राय करण्यात येतील!

अजून काही वेगळी ठिकाणं. भक्ती शक्ती उद्यान, निगडी ह्याच्या इथे एक चाटवाला गाडी लावतो त्याच्याकडची दहीभल्ला चाट एकदम अनोखी. पाणीपुरीच्या लांबट पुरीमध्ये दहीवडा भरुन त्यावर भरपूर थंडगार दही, चिंचेचं पाणी, तिखट वगैरे भरुन जबरा प्रकार देतो. आलू टिकी चाट पण त्याच्याकडे मिळते. माउली चहा (पिंपरीगाव) आणि नीलम चहा (पिंपरी कॅम्प) अतिशय कडक चहासाठी प्रसिद्ध. मसाला अजिबात नाही. कडक चहा हीच खासियत. हॉटेल सावली, निगडी चौक इथले लसूणी पालक सूप लै भारी. बाकी पदार्थ तसे नेहमीचेच पण चव छान. सॉल्टी चायनिज - मासुळकर कॉलनी हे बहुधा पिंपरी चिंचवडमधलं पहिलं चायनिज सेंटर असेल. हातगाडीपासनं सुरुवात करुन ह्यानं आज छोटेखानी हॉटेल टाकलंय. ह्याच्याकडची अमेरिकन चॉपसुई जबरदस्त. तशी कुठेच खाल्ली नाही. कैलास डेअरी - चिंचवड स्टेशन. ह्याचाकडची ताक, लस्सी अतिसुंदर. संध्याकाळी हाच बाहेर मसाला दूधाची गाडी लावतो. साय टाकलेलं घट्ट मलईदार मसाला दूध, नशिबात असेल तर कधी कधी हा साय टाकलेली कॉफीसुद्धा करुन देतो. ती तर अजूनच भारी.