कहे कबीरा (१) - हीरना समझ बूझ बन चरना-
हीरना समझ बूझ बन चरना ।।
कुणी तरी अमुक व्यक्ती चूक करणार आहे आणि ती चूक त्याच्या जिवावरच बेतणार आहे हे दुसऱ्या कुणा तमुक व्यक्तीला समजलं तर ती तमुक व्यक्ती अमुक व्यक्तीला सावध करेल. ती चूक करु नकोस म्हणून सांगेल. अमुक आणि तमुक जर खूप जवळचे असतील तर ज्या तळमळीने हे सावध करण्याचं काम होईल तीच तळमळ कबीरांची आहे आणि हे भजन गाणाऱ्या कुमारांचीही. कुमारांनी सुरुवातीचं 'हीरना'च असं काही म्हटलंय की ऐकताना ते आपल्यालाच उद्देशून आहे असं वाटतं.
हरीण हा चंचल प्राणी आहे. एका जागी फार न थांबता हरीण जंगलात विहार करीत राहते. त्या जंगलात कुठे काय आहे याची त्याला जाणीव नाही. तरीही बिनघोरपणे त्याचा संचार चालू आहे. त्याला चारा हवा आहे. एका वनात नाही मिळाला तर दुसऱ्या वनात जाईल. तिथेही न मिळाला तर जाईल तिसऱ्या वनात पण थांबणार नाही.
एक बन चरना, दूजे बन चरना ।
तीजे बन पग नही धरना ।।
कबीर हरिणाचं रूपक वापरून आपल्या चंचल मनाला समजावत आहेत. एक बन चरना...दूजे बन चरना....यातलं पहिलं वन तसं स्वतःच्या घरापासून जवळचं आहे. दुसरं जरासं दूर आहे. या दोनच वनांपर्यंत जात असलास तर ठीक पण तिसऱ्या वनात मात्र जाऊ नकोस.
मनाला सतत कोणत्या न कोणत्या गोष्टीचं आलंबन हवं असतं. त्याशिवाय ते स्वस्थ बसू शकत नाही. हे आलंबन म्हणजेच मनरूपी हरणाचा चारा. मग तो चारा कोणत्या वनातला घ्यावा ते कबीर सांगतात. पहिले वन - भगवंताच्या सगुण रूपाचे. मनाला त्या भगवद्रूपाचे आलंबन असेल तर ते अनावश्यक भरकटणार नाही. भगवंताचे सगुण रूप दिसत असल्याने आलंबन ठेवणेही सोपे.(जवळच्या वनात गेल्यावर घरी लवकर परत येणेही सोपेच).
दुसरे आलंबन भगवंताच्या नामाचे. नाम हे रूपापेक्षा सूक्ष्म असल्याने मन नामात स्थिर होणे ज़रा कठीण असते.
(ही दोन वने म्हणजे रूप आणि नामच कबीरांना अपेक्षित असतील असे नाही. पण जे रूपक वापरले आहे त्यासाठी योग्य वाटतात. अजून कुणाला वेगळी कल्पना सुचत असेल तर अवश्य सांगा).
तीजे बन पग नही धरना....पण मना, तू आलंबन म्हणून पंचेंद्रियांच्या विषयांकडे धाव घेऊ नकोस.
तीजे बन में पाँच पारधी ।
उन के नजर नही पड़ना ।।
शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय म्हणजे पारधी आहेत. पारधी छलाने हरीण किंवा तत्सम इतर प्राणी धरतात. हे रूपक या पाच विषयांना लागू होतं.
हरीण सर्वात जास्त ध्वनीकडे आकर्षित होतं असं म्हणतात.ध्वनि हा आकाशाचा गुण आहे आणि म्हणून कानातल्या पोकळीत असलेल्या आकाशतत्वाचा विषय (म्हणून कानांचा विषय). विशेष म्हणजे आपण डोळे, नाक बंद करू शकतो, त्वचा झाकू शकतो, जिभेने स्वाद घ्यायचा नाही असे ठरवू शकतो, पण कान बंद करू शकत नाही. केले तरीही सर्वगत आकाश तत्वामुळे बारिक का होईना आवाज ऐकू येतोच. त्यामुळे शब्द हा विषय (विषय म्हणून अतिसेवन केलं) तर सर्वात जास्त घातक.
कबीर म्हणतात या पारध्यांच्या दृष्टीस पडू नकोस. म्हणजेच 'आपण विषय सेवावेत, विषयांनीच आपले सेवन केले असे होऊ नये'. म्हणजेच 'अति सर्वत्र वर्जयेत्'!
समर्थ म्हणतात- 'गळ गिळितां सुख वाटे । ओढून घेता घसा फाटे । का तें बापुडें मृग आपटें । चारा घेऊन पळता ।। तसे विषय हे आरंभी गोड वाटतात पण 'अंती दुःख नेमस्त आहे'!
पाँच हीरना पच्चीस हीरनी ।
उन में एक चतुर ना ।।
इथे पाच-पंचवीस असा सांख्य मार्गाचा संदर्भ येतो, पण तूर्तास हरीण या उपमेपुरते पाहू या.
हरणांना कितीही समजावले तरी ती ऐकत नाहीत.
अनेक मनुष्यांपैकी खऱ्या अर्थाने या सर्व समजावणीचा अर्थ उमगणारा एखादाच असतो. या अर्थाने 'उन में एक चतुर ना' असं म्हटलंय.
मग अगदी शेवटचा प्रयत्न म्हणून कबीर सांगतात की
तोहे मार तेरो मास बिकावै ।
तेरे खाल का करेंगे बिछौना ।।
बा हरिणा, तुला ते पारधी मारतील रे. तुझं मांस विकतील आणि तुझ्या कातड्याचे अंथरूण करतील. जिवाला मुकशील रे, नको जाऊस त्या तिसऱ्या वनात.
मनाच्या बाबत त्याचं मांस म्हणजे त्याची विचार करण्याची शक्ती. पाच विषयांच्या तावडीत सापडलं की ती शक्ती नाहीशी होणार! आणि मग मन कुठेच स्थिर होऊ शकणार नाही.
कहे कबीरा जी सुनो भई साधो।
गुरू के चरन चित धरना ।।
हरीण म्हणतं की मला कळतंय पण वळत नाही, काय करु?
तर ऐक, सद्गुरूचे चरणकमल मनात दृढ़ धरून ठेव. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन होईल.
- चैतन्य
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चैतन्य साहेब,
अर्थ छान सांगितलाय
खूपच छान लिहिलय! वा!
धन्यवाद
अगदी आवर्जून लिहा ही विनंती.
+ ००
अरे वा!
सुनता है
सुंदर लिहिलंय
आवडते भजन आणि आवडते गाय
खुप सुरेख लेखन
तुमचे वाटणे योग्य आहे.
धन्यवाद
सुरेख लिहीले आहे,
सुरेख...
_/\_
मस्तं, पुभाप्र.
सुंदर
छान लेख. अजून लिखाण येऊ दे.
धन्यवाद
सुरेख लिहिलं आहे. अजूनही लिहा
नितांत सुंदर !
सुंदर
सुंदर!
वाह, काय सुंदर रसग्रहण केले
आपला अभ्यास दांडगा आहे. खूप