✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कहे कबीरा (१) - हीरना समझ बूझ बन चरना-

म
मनमेघ यांनी
Mon, 04/18/2016 - 15:09  ·  लेख
लेख
हीरना समझ बूझ बन चरना ।। कुणी तरी अमुक व्यक्ती चूक करणार आहे आणि ती चूक त्याच्या जिवावरच बेतणार आहे हे दुसऱ्या कुणा तमुक व्यक्तीला समजलं तर ती तमुक व्यक्ती अमुक व्यक्तीला सावध करेल. ती चूक करु नकोस म्हणून सांगेल. अमुक आणि तमुक जर खूप जवळचे असतील तर ज्या तळमळीने हे सावध करण्याचं काम होईल तीच तळमळ कबीरांची आहे आणि हे भजन गाणाऱ्या कुमारांचीही. कुमारांनी सुरुवातीचं 'हीरना'च असं काही म्हटलंय की ऐकताना ते आपल्यालाच उद्देशून आहे असं वाटतं. हरीण हा चंचल प्राणी आहे. एका जागी फार न थांबता हरीण जंगलात विहार करीत राहते. त्या जंगलात कुठे काय आहे याची त्याला जाणीव नाही. तरीही बिनघोरपणे त्याचा संचार चालू आहे. त्याला चारा हवा आहे. एका वनात नाही मिळाला तर दुसऱ्या वनात जाईल. तिथेही न मिळाला तर जाईल तिसऱ्या वनात पण थांबणार नाही. एक बन चरना, दूजे बन चरना । तीजे बन पग नही धरना ।। कबीर हरिणाचं रूपक वापरून आपल्या चंचल मनाला समजावत आहेत. एक बन चरना...दूजे बन चरना....यातलं पहिलं वन तसं स्वतःच्या घरापासून जवळचं आहे. दुसरं जरासं दूर आहे. या दोनच वनांपर्यंत जात असलास तर ठीक पण तिसऱ्या वनात मात्र जाऊ नकोस. मनाला सतत कोणत्या न कोणत्या गोष्टीचं आलंबन हवं असतं. त्याशिवाय ते स्वस्थ बसू शकत नाही. हे आलंबन म्हणजेच मनरूपी हरणाचा चारा. मग तो चारा कोणत्या वनातला घ्यावा ते कबीर सांगतात. पहिले वन - भगवंताच्या सगुण रूपाचे. मनाला त्या भगवद्रूपाचे आलंबन असेल तर ते अनावश्यक भरकटणार नाही. भगवंताचे सगुण रूप दिसत असल्याने आलंबन ठेवणेही सोपे.(जवळच्या वनात गेल्यावर घरी लवकर परत येणेही सोपेच). दुसरे आलंबन भगवंताच्या नामाचे. नाम हे रूपापेक्षा सूक्ष्म असल्याने मन नामात स्थिर होणे ज़रा कठीण असते. (ही दोन वने म्हणजे रूप आणि नामच कबीरांना अपेक्षित असतील असे नाही. पण जे रूपक वापरले आहे त्यासाठी योग्य वाटतात. अजून कुणाला वेगळी कल्पना सुचत असेल तर अवश्य सांगा). तीजे बन पग नही धरना....पण मना, तू आलंबन म्हणून पंचेंद्रियांच्या विषयांकडे धाव घेऊ नकोस. तीजे बन में पाँच पारधी । उन के नजर नही पड़ना ।। शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय म्हणजे पारधी आहेत. पारधी छलाने हरीण किंवा तत्सम इतर प्राणी धरतात. हे रूपक या पाच विषयांना लागू होतं. हरीण सर्वात जास्त ध्वनीकडे आकर्षित होतं असं म्हणतात.ध्वनि हा आकाशाचा गुण आहे आणि म्हणून कानातल्या पोकळीत असलेल्या आकाशतत्वाचा विषय (म्हणून कानांचा विषय). विशेष म्हणजे आपण डोळे, नाक बंद करू शकतो, त्वचा झाकू शकतो, जिभेने स्वाद घ्यायचा नाही असे ठरवू शकतो, पण कान बंद करू शकत नाही. केले तरीही सर्वगत आकाश तत्वामुळे बारिक का होईना आवाज ऐकू येतोच. त्यामुळे शब्द हा विषय (विषय म्हणून अतिसेवन केलं) तर सर्वात जास्त घातक. कबीर म्हणतात या पारध्यांच्या दृष्टीस पडू नकोस. म्हणजेच 'आपण विषय सेवावेत, विषयांनीच आपले सेवन केले असे होऊ नये'. म्हणजेच 'अति सर्वत्र वर्जयेत्'! समर्थ म्हणतात- 'गळ गिळितां सुख वाटे । ओढून घेता घसा फाटे । का तें बापुडें मृग आपटें । चारा घेऊन पळता ।। तसे विषय हे आरंभी गोड वाटतात पण 'अंती दुःख नेमस्त आहे'! पाँच हीरना पच्चीस हीरनी । उन में एक चतुर ना ।। इथे पाच-पंचवीस असा सांख्य मार्गाचा संदर्भ येतो, पण तूर्तास हरीण या उपमेपुरते पाहू या. हरणांना कितीही समजावले तरी ती ऐकत नाहीत. अनेक मनुष्यांपैकी खऱ्या अर्थाने या सर्व समजावणीचा अर्थ उमगणारा एखादाच असतो. या अर्थाने 'उन में एक चतुर ना' असं म्हटलंय. मग अगदी शेवटचा प्रयत्न म्हणून कबीर सांगतात की तोहे मार तेरो मास बिकावै । तेरे खाल का करेंगे बिछौना ।। बा हरिणा, तुला ते पारधी मारतील रे. तुझं मांस विकतील आणि तुझ्या कातड्याचे अंथरूण करतील. जिवाला मुकशील रे, नको जाऊस त्या तिसऱ्या वनात. मनाच्या बाबत त्याचं मांस म्हणजे त्याची विचार करण्याची शक्ती. पाच विषयांच्या तावडीत सापडलं की ती शक्ती नाहीशी होणार! आणि मग मन कुठेच स्थिर होऊ शकणार नाही. कहे कबीरा जी सुनो भई साधो। गुरू के चरन चित धरना ।। हरीण म्हणतं की मला कळतंय पण वळत नाही, काय करु? तर ऐक, सद्गुरूचे चरणकमल मनात दृढ़ धरून ठेव. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन होईल. - चैतन्य
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
लेख

प्रतिक्रिया द्या
4965 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

चैतन्य साहेब,

विजय पुरोहित
Mon, 04/18/2016 - 15:29 नवीन
चैतन्य साहेब, मूळ भजन अतिशय उत्कृष्ट आहे. त्यात कुमारजींचा आवाज ही दुधात साखरच. वर तुमच्या या अप्रतिम अर्थ सांगण्याच्या शैलीने त्यात आता अस्सल केशर पडल्यासारखे झाले आहे. गेली अनेक वर्षे मी ही निर्गुणी भजने ऐकत आहे. त्यांचे अर्थ मात्र मला काही केल्या मिळत नव्हते. आज तुमच्यामुळे अतिशय सोप्या शब्दांत अचूक अर्थ समजून घेता आले. त्याबद्दल अतिशय धन्यवाद! अजून एक विनंती: १) आ कलंदर केसवा २) अवधूता गगन घटा गहरानी रे ३) उड जा जा हंस अकेला ४) झीनी झीनी चदरिया या पण अप्रतिम अर्थपूर्ण कबीर भजनांचे रसग्रहण करावे ही मनापासून विनंती.
  • Log in or register to post comments

अर्थ छान सांगितलाय

सुधांशुनूलकर
Mon, 04/18/2016 - 17:07 नवीन
भजनातला गर्भितार्थ छान उलगडून सांगितला आहे तुम्ही. विजय पुरोहित यांची विनंती घ्याच आता मनावर! शुभेच्छा. ('कहे कबीरा (१)' असं शीर्षक आहे, म्हणजे (२), (३)... असणारच बहुधा.)
  • Log in or register to post comments

खूपच छान लिहिलय! वा!

DEADPOOL
Mon, 04/18/2016 - 17:34 नवीन
खूपच छान लिहिलय! वा!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मनमेघ
Mon, 04/18/2016 - 17:53 नवीन
सर्वांचे आभार ! कहे कबीरा अशी कबीरांच्या रचनांवर लेखमाला लिहिण्याचा मानस आहे. तुम्ही दिलेल्या यादीतील रचनांचाही विचार करतो. - चैतन्य
  • Log in or register to post comments

अगदी आवर्जून लिहा ही विनंती.

विजय पुरोहित
Mon, 04/18/2016 - 18:11 नवीन
अगदी आवर्जून लिहा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनमेघ

+ ००

आनन्दा
Tue, 04/19/2016 - 15:39 नवीन
+ ००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

अरे वा!

बोका-ए-आझम
Mon, 04/18/2016 - 18:52 नवीन
कबीर ग्रेट. त्याच्या रचना संगीताद्वारे लोकांपर्यंत पोचवणारे कुमारजीही ग्रेटच. हंस अकेला आणि अवधूता ही तर मर्मबंधातली ठेव आहेत. हिरना आणि सुनता है गुरुग्यानी (संगीतबद्ध केलेलं पहिलं निर्गुणी भजन) याही रचना कुमारजींनी अजरामर केलेल्या आहेत. नक्की लिहा.
  • Log in or register to post comments

सुनता है

मनमेघ
Mon, 04/18/2016 - 18:57 नवीन
गुरु ग्यानी तर अफाट रचना आहे. कबीरांची दृष्टी काय अतुलनीय होती _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

सुंदर लिहिलंय

पैसा
Mon, 04/18/2016 - 19:51 नवीन
पुढचे लेख पटापट येऊ द्या!
  • Log in or register to post comments

आवडते भजन आणि आवडते गाय

रमेश आठवले
Mon, 04/18/2016 - 20:11 नवीन
आवडते भजन आणि आवडते गायन कुमारांनी गायलेले हे भजन येथे ऐकता येइल. https://www.youtube.com/watch?v=TTN4k_w5ZBQ
  • Log in or register to post comments

खुप सुरेख लेखन

प्रसाद गोडबोले
Mon, 04/18/2016 - 22:12 नवीन
प्रिय मित्र चैतन्य, जय जय रघुवीर समर्थ !! कबीरांच्या ह्या काव्यावरील साध्या सोप्प्या शब्दातील लेखन अत्यंत भावले. ह्या खालील कडव्याच्या अनुवादा/निरुपणाबद्दल साशंक आहे -
पाँच हीरना पच्चीस हीरनी । उन में एक चतुर ना ।।
तु म्हणाल्या प्रमाणे हा नक्कीच सांख्यांचा संदर्भ आहे. ह्या विषयावरील आपल्या श्रीधर स्वामींचे पुस्तक प्रसिध्द आहे. नेहमी प्रमाणेच हेही बहुतेक सध्या बाजारात उपलब्ध्द नसावे. ( आचार्यांचेही ह्या विषयावर पुस्तक आहे पण अद्याप ते वाचनात आलेले नाही.) असो. इथे उनमे एक चतुर ना ह्या चा अर्थ त्यातील एकही चतुर नाही असा असावा असे मला वाटते . पांच मुलतत्वे आणि त्यांच्या संयोगाने सुक्ष्म शरीरात निर्माण होणारी २५ तत्त्वे ( पांच धातु ,पाच रस, पांच जाणीवा , पाच कृती आणि पाच विकार) ह्यातील काहीच चतुर नाही अर्थात ह्या सांच्या पलिकदे असलेल्या आत्मतत्वाला जाणण्यास समर्थ नाही असा काहीसा ह्या कडव्याचा अर्थ असावा असा माझा अंदाज आहे. बाकी सविस्तर चर्चेअंती बोलुच ! पुढील लेखनास शुभेच्छा :) अवांतर १: आजोबांच्या कृपेने , घरी असलेल्या संग्रहात मला १९८४ साली प्रकाशित झालेले श्रीधरस्वामींचे पंचीकरण सापडले आहे :) भेटल्यावर सविस्तर बोलु . अवांतर २: कबीर असो की समर्थ , तुकोबा असो की माऊली , सर्वांच्याच साहित्यात एकच विचार मांडलेला दिसुन येतो तो पाहुन "साधु दिसती वेगळाले | परी ते अंतरी मिळाले || " ह्या समर्थोक्तीची फार आठवण येते :) - जय जय रघुवीर समर्थ प्रगो
  • Log in or register to post comments

तुमचे वाटणे योग्य आहे.

तर्राट जोकर
Mon, 04/18/2016 - 22:25 नवीन
तुमचे वाटणे योग्य आहे. बादवे भेल्खमभ्याक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

धन्यवाद

मनमेघ
Tue, 04/19/2016 - 07:57 नवीन
प्रिय मित्र प्रसाद (पुणे-सातारा पत्रप्रपंच आठवला:-)) तुझे म्हणणे योग्य आहे. मी इथे हरीण आणि हरिणी असा स्थूलदेहाचा संदर्भ घेऊन पुरुष-स्त्री असा भेद घेत अर्थान्वयन केलं. पंचीकरण हा विषय मोठ्या आवाक्याचा आहे. माझा तेवढा अभ्यास नाही. हे सगळं लिखाणसुद्धा अनुभवरहित शब्दजंजाळ आहे! बाकी भेटीअंती बोलूच. तुझा मित्र, चैतन्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

सुरेख लिहीले आहे,

नीलमोहर
Tue, 04/19/2016 - 10:19 नवीन
चंचल मन आणि हरिणाचे रूपक अगदीच सार्थ, फक्त ते 'पाँच हीरना पच्चीस हीरनी । उन में एक चतुर ना ' हे नीट समजले नाही. बाकी वर विजय पुरोहित यांनी लिहील्याप्रमाणे इतरही कबीर भजनांचे रसग्रहण वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

सुरेख...

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 04/19/2016 - 11:49 नवीन
हे भजन अनेक वेळा ऐकले आहे. त्याचा अर्थही माहित होता तरी सुध्दा वारीला लेख वाचताना मजा आली. सुरेख जमले आहे रसग्रहण. पुढील लेखांच्या प्रतीक्षेत आहे. कबिराचे अजून एक आवडते गाणे म्हणजे "साधो ये मुर्दों का गाँव" कबीराच्या जिवनावर दुरदर्शनने एक मालिका काढली होती त्याचे हे शीर्षक गीत. या निर्गुणी भजनांवर एक मराठी पुस्तक मध्ये एकदा वाचनात आले होते. लेखकाचे नाव आठवत नाही पण मुखपृष्ठावर कुमारजींचा फोटो होता. अनेक निर्गुणी भजनांचे अर्थासकट रसगहण केले होते या मध्ये. घरी गेलो की शोधतो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

_/\_

मूकवाचक
Tue, 04/19/2016 - 16:51 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

मस्तं, पुभाप्र.

माहितगार
Tue, 04/19/2016 - 17:15 नवीन
मस्तं, पुभाप्र.
  • Log in or register to post comments

सुंदर

वैशाली अर्चिक
Tue, 04/19/2016 - 17:32 नवीन
खूप छान. खूप आवडला लेख. पुढील लेखांच्या प्रतीक्षेत आहे.
  • Log in or register to post comments

छान लेख. अजून लिखाण येऊ दे.

वैभव जाधव
Tue, 04/19/2016 - 17:51 नवीन
छान लेख. अजून लिखाण येऊ दे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मनमेघ
Tue, 04/19/2016 - 18:05 नवीन
सर्वांना धन्यवाद. पाच-पच्चीसबद्दल प्रगोच्या प्रतिसादप्रमाणे अर्थ लावता येतो. सांख्यमताऐवजी हरिणाच्या रूपकावर जास्त फोकस केला असल्याने सविस्तर लिहिले नाही. पुढील भाग लवकरच लिहितो. ~चैतन्य
  • Log in or register to post comments

सुरेख लिहिलं आहे. अजूनही लिहा

यशोधरा
Tue, 04/19/2016 - 18:11 नवीन
सुरेख लिहिलं आहे. अजूनही लिहा.
  • Log in or register to post comments

नितांत सुंदर !

झेन
Tue, 04/19/2016 - 18:12 नवीन
नितांत सुंदर ! विषय आणि निरूपण
  • Log in or register to post comments

सुंदर

सुमीत भातखंडे
Fri, 04/22/2016 - 12:49 नवीन
छान लिहिलंय. पुभाप्र. इतर कबीर भजनांचे रसग्रहण वाचायला आवडेल. खासकरून "सुनता हैं गुरु ज्ञानी".
  • Log in or register to post comments

सुंदर!

राघव
Fri, 04/22/2016 - 22:24 नवीन
छान लिहिलंयस रे! आणि आपले अनुभव अजून तोकडेच आहेत रे..तसेही कबीरांची प्रतिभा वर्णणारे आपण कोण... ही सर्व मोठी मंडळी. आपण त्यांनी सांगीतलेले आकलन करून मार्गक्रमण करण्यावर भर दिला तर बर्‍याच गोष्टी पुढं सरकतील. :-)
  • Log in or register to post comments

वाह, काय सुंदर रसग्रहण केले

सप्तरंगी
Tue, 04/26/2016 - 17:04 नवीन
वाह, काय सुंदर रसग्रहण केले आहे चंचल मनाचे, मस्तच , पाच पारधीवाले विशेष आवडले !
  • Log in or register to post comments

आपला अभ्यास दांडगा आहे. खूप

Anand More
Wed, 04/27/2016 - 00:20 नवीन
आपला अभ्यास दांडगा आहे. खूप सुंदर लिहिलं आहेत.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा