Skip to main content

अर्निंग इट राइट

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 05/04/2016 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
मूल्य, शिस्त, विवेक वगैरे गोष्टींना महत्व न देणारी लोकं, महत्व देणा-या लोकांपेक्षा नेहमीच अधिक असतात. पण तरीही काही मूलभूत गोष्टी ज्या वाईट असतात हे सर्वमान्य आहे, त्या गोष्टीही लोकं अगदी समजून-उमजून करताना दिसतात तेंव्हा उद्विग्न व्हायला होतं. आणि तेवढंच करू शकतो आपण, याची जेंव्हा जाणीव होते तेंव्हा अजून जास्त उद्विग्न व्हायला होतं. उदाहरणार्थ चोरी. चोरी म्हणजे एखादी वस्तू उचलून खिशातच टाकायला हवी असं नव्हे. चोर कृतीपेक्षा विचाराने आधी चोर होतो. कार्यालयीन जीवनात अशा चो-या अनेकदा बघायला मिळतात. कार्यालयीन चोर्‍यांची उदाहरणं म्हणजे, न केलेल्या मेडिकलच्या खर्चाची बिलं दाखवून त्या पैशाचा परतावा घेणे, बसने जाऊन टॅक्सीच्या बिलाचे पैसे घेणे, सेकंड क्लास ने प्रवास करून फर्स्ट क्लासचे पैसे घेणे, कंपनी मोबाईल बिलं भरते म्हणून त्या नंबरवरून बिनधास्त एसटीडी, आयएसडी कॉल करणे, इंटरनेट बेछूट वापरणे, इत्यादी. 'कंपनी देतेय!', 'पण मी एलिजिबल आहे' अशी स्पष्टीकरणं याबद्दल विचारणा केल्यास ऐकायला मिळतात. एलिजिबल आहे म्हणून टॅक्सीभाडं १०० रुपये घेऊन १० रुपयाच्या बसच्या तिकिटावर प्रवास केला म्हणजे ९० रुपयांची चोरीच आहे. पण हे करणा-या माणसाला तो त्याचा हक्क वाटतो. इंग्लिशमधे एक शब्द आहे Integrity; तिचा अभाव या लोकांमधे असतो. चोरी पकडेपर्यंत जरी चोर चोर नसला, तरी त्याच्या मनाला ठाऊक असतं की तो चोर आहे. या लोकांनाही ते ठाऊक असतं, पण जगाला ते कसं बरोबर आहे हे पटवून द्यायचा त्यांचा अट्टाहास बघितला की कीव करावीशी वाटते. बरं, हे असं करणारी मंडळी बहुतेक वेळा बक्कळ पगार घेणारी मंडळी असतात, कमी पगारावर काम करणारे बहुतांशी या बाबतीत सज्जन असतात असं दिसतं. शेवटी जास्त मिळायला लागलं कीच हाव निर्माण होते, कमीच असतं तिथे फक्त गरज असते. मला लाकूडतोड्याची गोष्ट आठवते अशी उदाहरणं बघितली की. तो सुद्धा सोन्याच्या, चांदीच्या कुर्‍हाडीसाठी एलिजिबल ठरलाच होता की!, पण त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याला तो त्याचा 'हक्क' वाटला नाही. शेवटी वृत्ती असते एकेकाची, आणि ती अशा प्रसंगातून दिसते. असं चोरासारखं वागणार्‍या व्यक्तीने त्याच्या प्रमोशनची पार्टी अगदी 'हक्काने', दिलदारपणाचा आव आणून दिली तरी त्याचं कौतुक वाटत नाही. पण त्या व्यक्तीच्या १०% पगार असलेल्याने मुलगा पास झाल्याचे वाटलेले पेढेही कौतुकासाठी अधिक 'एलिजिबल' ठरतात. 'Everybody has a Right to Earn; but very few Earn it Right.' ब्लॉग दुवा मिपाकरांच्या मतांच्या प्रतीक्षेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 27803
प्रतिक्रिया 163

प्रतिक्रिया

In reply to by mandarbsnl

शाळेपासून कॉलेज डिग्री नोकरी सगळं आम्ही स्वतःच्या जीवावर केलं आपले वडील पतंगराव कदम किंवा डी वाय पाटील आहेत का? शाळा कॉलेज आपल्या वडिलांनी बांधले आहे काय? मग आपण कसे म्हणून शकता कि ते आम्ही आमच्या जीवावर केले. आपल्या घरातील कचरा कुठे जातो आणि त्याची विल्हेवाट कशी लागते याबद्दल आपण काही सांगाल का? किंवा आपल्या घरातील नळाला पाणी कुठून येते? कि आपण फक्त पावसाचे वरून पडणारे पाणी साठवून वापरता? घरात वीज कशी येते? आणि त्यासाठी खांब कोण आणि कसे टाकते? सरकार आपल्याला काय काय "पायाभूत सुविधा" आणि कशा पुरवते हे आपण मुळापासून पाहीले तर आपल्याला लक्षात येईल कि आपण बर्याच गोष्टी "गृहीत" धरलेल्या असतात. राहिली गोष्ट आपल्याला ज्या गोष्टी पटतात त्या आपण करा उगाच सरकारने आमच्यासाठी काय केले नाही याबद्दल समर्थन कशासाठी देता?

लेखात लिहिलेल्या सर्व गोष्टी मी करतो (पण याहून जास्त काहीही करत नाही!) होम लोन ईमआय सुरु झाल्यापासून नैतिकतेचे सोवळे नेसणे सोडले आहे :-) मी करतोय ते योग्य असे पटवून देण्याचा माझा कोणताही अट्टाहास नाही. वेल्लाभट साहेब, एक प्रश्न आहे, समजा मी बँकेतून १० टक्के व्याजाने १०० रु कर्ज घेतले. आणि महिना २ रु ईमआय भरतोय. बँक यातली ८०% रक्कम व्याज म्हणून कापते आणि २० टक्के रक्कम प्रिन्सिपल म्हणून. १०० रु कर्जाचे शेवटी मी जवळजवळ २०० रु परतफेड करतो. नैतिकतेच्या दृष्टीने बँकसुद्धा चोरीच करते ना?

In reply to by चिनार

समजा मी बँकेतून १० टक्के व्याजाने १०० रु कर्ज घेतले. आणि महिना २ रु ईमआय भरतोय. बँक यातली ८०% रक्कम व्याज म्हणून कापते आणि २० टक्के रक्कम प्रिन्सिपल म्हणून. १०० रु कर्जाचे शेवटी मी जवळजवळ २०० रु परतफेड करतो. नैतिकतेच्या दृष्टीने बँकसुद्धा चोरीच करते ना?
ही चोरी कशी काय? व्याज आकारणीत काही आधी न सांगितलेले छुपे चार्जेस असतील तर ती चोरी नक्कीच झाली.पण नुसते व्याज घेणे ही चोरी कशी काय? याच न्यायाने कोणतेही व्याज घेणे ही पण चोरी झाली.आणि व्याज घ्यायचे नसेल तर कोणती बँक तुम्हाला कर्ज द्यायला येणार आहे?

In reply to by गॅरी ट्रुमन

बर्याच गोष्टी लिहिण्यासारख्या आहेत. त्यात एक महत्त्वाची गोष्ट हि आहे कि बहुसंख्य मध्यमवर्गीय माणसाना संस्कारामुळे पैसे खाणे जमत नाही आणी मग जो ते करतो त्याबद्दल त्याला चीड जास्त येते. याचा अर्थ असा नाही कि इतरांनी केलेली चोरी समर्थनीय आहे. एक उदाहरण म्हणून लिहितो आहे. मी २००४ साली मुलुंड ला एक बेडरूमचे घर घेतले त्याची किंमत होती अठरा लाख. यातील ३ लाख रुपये मी माझ्या भविष्य निर्वाहनिधीतून भरले आणी बाकी १५ लाख रुपये एच डी एफ सी मधून कर्ज घेतले ज्याचा व्याजाचा दर ९ % होता. माझ्या जवळ १५ लाख रुपये नव्हते किंवा मिळण्याची शक्यताही नव्हती. या १५ लाखाचे १० % प्रमाणे दर महिना व्याज १२५००/- येत होते. माझा कर्जाचा हप्ता १४००० होता. अर्थात यात १२५०० व्याज धरले कि फक्त १५००/- रुपये मुदलातून फेडले जात होते. म्हणजे पुढच्या महिन्यात माझे मुद्दल १४ लाख ९८ हजार पाचशे रुपये होते. त्यावरील व्याज १२४८३. ३३ होते. म्हणजे दुसर्या महिन्यात रुपये १५१६/ ६६-- इतके मुद्दल फेडले जात असे. हा हिशेब सरळ आहे यात चोरी काय आहे ? असे पैसे मी भरत गेलो, गेली बारा वर्षे म्हणजे आता पर्यंत मी वीस लाख साठ हजार रूपये भरले आणी अजून साधारण ८ लाख रुपयाचे कर्ज बाकी आहे. आपल्याला दिसायला मी दुप्पट पैसे भरणार आहे हि वस्तुस्थिती आहे. पण त्या घरात घर नावावर आहे तरीही मी "दुसर्याच्या" पैशाने गेली बारा वर्षे राहत आहे. आणी आता त्या घराची किमत एक कोटी वीस लाखाच्या आसपास आहे. पैशाची कालानुरूप किंमत काय?( TIME VALUE)हे समजणे अत्यावश्यक आहे.

In reply to by सुबोध खरे

खरे साहेब आणि ट्रुमन साहेब, माझा मुद्दा वेगळा होता. कदाचित तो मी व्यवस्थित मांडला नाही. असो.नंतर सविस्तर लिहीन.

वेल्लाभट, तुमच्या हे विधान वाचलं : >> एलिजिबल आहे म्हणून टॅक्सीभाडं १०० रुपये घेऊन १० रुपयाच्या बसच्या तिकिटावर प्रवास केला म्हणजे >> ९० रुपयांची चोरीच आहे. एक विनोद आठवला. पोरगा : बाबा, बाबा, मी आज पाच रुपये वाचवले. बाप : कसे काय? पोरगा : आज शाळेतून येतांना बसने येण्याऐवजी तिच्यामागून धावंत आलो. बाप : मूर्खा, रिक्षामागे धावंत आला असतात तर पन्नास रुपये वाचले नसते का? असो. पैसा लई ड्यांजर चीज आहे. कारण पैशाची चोरी केली तर लोकं खोटारडा म्हणतात, पण सचोटी (=integrity) काही पैशात मोजता येत नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by बॅटमॅन

तुम्हाला पैशाला खेळवता येत नाही. पैसा हे साधन आहे साध्य नाही असं काका म्हणतात ना???? बाकी कंपनी चे चार दोन रुपये जे आपल्यासाठी राखीव असतात ते खर्च करावेत. त्याबदल्यात आपल्याकडून कंपनीचा दोन चारशे चा फायदा करुन द्यावा

वा उत्तम जिथे 200 रु किलो तूर डाल झाले आणि मंत्री संत्री फुकटात सगळे खातात तिथे तुम्हाला काहीच वाटत नाहीये???प्रश्न बटर चिकन किंवा चहाचा नाहीये तुम्हाला मुद्दाच कळाला नाही...मुद्दा आहे दराचा...500 600 लोकांच्या जेवणाचा खर्च तो काय???तुम्ही नोकरी करत असाल ना तर तुमच्या कं कडे 15 रु मध्ये जेवण मागा पंच पक्वान्नांचे आणि व्यवसाय करत असाल तर तुमच्या हाताखालील लोकांना रोज बटर चिकन खायला घाला म्हणजे खर्च काय ते कळेल तुम्हाला...जनतेच्या पैशाची उधळपट्टी करताना त्यांना लाज वाटायला पाहिजे हा मुद्दा आहे...खाण्या पिण्याची हि प्रतिकात्मक उदाहरणे आहेत ..जी तुम्हाला समजली नाहीत...500 कोटी च्या रस्त्यासाठी 5000 कोटी टोल वसुलीचा परवानगी मिळते हे दुःख आहे..कोल्हापुरात 50 किमी चे रस्ते बांधले त्यासाठी खर्च 500 कोटी..500 कोटी?? जनतेच्या पैशाची लूट करायची ती अशी... हा राग आहे...चहा आणि बटर चिकनचा विषय नव्हे..आणि जर 500 600 (फक्त) तुमच्या म्हणण्यानुसार कमी लोक आहेत आणि 1 रु मध्ये स्पेशल चहा परवडतो मग तसे चहाचे गाडे पूर्ण भारतभर का नाही चालू करत.. देऊन टका कि कंत्राट उलट देशभर म्हणजे अजून स्वस्तात मिळेल...

आणखी एक महागाई कमी झाली आम्ही ती केली असा वारंवार सांगणाऱ्या सरकारने मग आमदार खासदार यांचा महागाई भत्ता कमी करायचा सोडून वाढतो का??..महागाई नाहीच तर या लोकांचे महागाई भत्ते का वाढतात??

टॅक्सीभाडं १०० रुपये घेऊन १० रुपयाच्या बसच्या तिकिटावर प्रवास केला म्हणजे ९० रुपयांची चोरीच आहे
यात काही चोरी आहे असं वाटत नाही. जर बसने जावूनही त्याचं काम होत असेल , वेळेवर होत असेल तर त्याने कार्यालयाचं कोणतही नुकसान केलेलं नाही. त्याने स्वतः त्रास झेलला (बसचा प्रवास टॅक्सीपेक्षा त्रासदायक आहे असे मानल्यास) आणि ९० रुपये वाचवलेत.

वर्गातील काही मुलं कॉपी करुन चांगल्या मार्कांनी पास होऊन पुढे गेलेत. ह्यात फी माफ असणारे व नसणारेही आहेत. मनाला फसवता येत नसल्यामुळे संधी मिळूनही मी कधीही कॉपी केली नाही. कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचे समर्थनही करत नाही व सामीलही होत नाही

In reply to by स्पा

तदेव कर्म कुर्वीत ह्येनात्मा सम्प्रसीदति आत्मानं पिडयेत यच्च तत प्रयत्नेन वर्जयेत

सध्या तीन आठवडे डिप्लोमा एच आय व्ही साठी अहमदाबादेत आहे. लॉजचे बिल , रिक्षाचे बिल , जेवायची बिलं ..... बील पे बील !

In reply to by lgodbole

स्वारीवर असताना पेशवे नाटकशाळेचे बिल लावायचे म्हणे. नाटकशाळेचं व्हाउचर कसं करायचं ?

In reply to by lgodbole

लगो, अतिशय गहन प्रश्न आहे. पेशवे सत्ताधारी होते. त्यांना व्हाऊचर बनवायची गरज नव्हती. तुमची गोष्ट निराळी आहे. तुम्ही पडलात पगारी नोकर ! त्यामुळे नाटकशाळांसंगे जे काही काम केलं त्याचे प्रत्यक्ष व/वा अप्रत्यक्ष पुरावे दाखवावे लागतील. आ.न., -गा.पै.

धागा आवडला. आमच्या बँकेतला एक अधिकारी एल टी सी ची खोटी बिले पास करून घेऊन पकडला गेला आणि मग निलंबित झाला, शेवट आयुष्यातून उठला ही सत्यकथा माहीत आहे. पकडले गेल्यास असेही होऊ शकते म्हणून त्या भीतीने तरी नीट असलेले बरे. बाकी मल्ल्याने ९००० कोटी बुडवून मग ४००० कोटी देऊन निसटण्याची ऑफर दिलेली आहे. ५००० कोटीची चोरी तो पचवणार असे दिसते. असल्या चोरांना खरा बडगा दाखवला पाहिजे. गरीब किंवा मध्यमवर्गीयाने केलेली चोरी ही याहून नक्कीच क्षम्य वाटते. जसे की जखमी हरीण शिकार्‍यापासून लपवून साधूने पुण्य केले की पाप हा अवघड प्रश्न आहे तशीच ही बारीक सारीक चोरी वाटते. स्वतः चोरी करण्याबरोबरच टीसीला पैसे खायला घालणे किंवा सर्कारी अधिकार्‍याना पैसे खाऊ घालणे यातही आपण चोरीला अप्रत्यक्ष मदत करत असतो. पण ऐनवेळी होणार्‍या त्रासापेक्षा ते लहान पाप परवडले असेच बहुतेकवेळा होते. होता होईल तो आपण सवयीने असले प्रकार करू नयेत हे मान्यच. पण परिस्थितीमुळे अपरिहार्य झाले तर त्यावर जास्त विचार करून आपले आयुष्य अवघड करून घेऊ नये.

कमी पगारावर काम करणारे बहुतांशी या बाबतीत सज्जन असतात असं दिसतंयाच्या इतकं असत्य विधान दुसरं नसेल. रेल्वे बंद पडली कि मुलुंड हून ठाण्याला जायला रिक्षा वाला २०० ते ५०० रुपये घेतो. सणासुदीला सुतार, रंगारी वाजवून दीड पट दुप्पट पैसे घेतात. टेलर दिवाळीच्या आत शिवून द्यायला अर्जंट म्हणून जास्त पैसे घेतात. सरकारी तृतीय आणी चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी चिरीमिरी किती घेतात त्याचा हिशेब नाही. पोलीस, अबकारी, विक्रीकर जकात "खात्या"तील कर्मचारी याबद्दल बोलायलाच नको. मुंबई पुण्याहून माणूस गावाला गेला कि गाववाला अव्वाच्या सव्वा पैसे मागतात हा सार्वत्रिक अनुभव आहे. वर तुम्हाला काय "दाबून" पैसे मिळतात. थोडेसे आम्हालाही मिळाले तर काय जाते? हीच स्थिती अनिवासी भारतीयांना अनुभवास येते. मी एक गोष्ट सांगतो -- ३३% लोक भ्रष्ट आहेत ६६% लोक संधी न मिळाल्याने प्रामाणिक आहेत १% लोक संधी मिळूनही प्रामाणिक आहेत. हे माझे वैयक्तिक मत आहे. विदा मागू नये. (मागितल्यास मिळणार नाही)

In reply to by सुबोध खरे

खरे साहेब आपण नेहमी प्रमाणेच कमी शब्दात नेमके लिहीले आहे फक्त दोन प्रश्न आहेत ६६% ची वाटचाल १% असण्यासाठी काय करावे तुम्हालाही प्रथम आणि द्वीतीय श्रेणीतील सरकारी अधिकारी खरंच साजूक वाटतात का

In reply to by झेन

तुम्हालाही प्रथम आणि द्वीतीय श्रेणीतील सरकारी अधिकारी खरंच साजूक वाटतात का असा मी कुठे म्हणालो आहे जर दाखवता का? चतुर्थ श्रेणी कर्मचारी २० रुपये चिरीमिरी मागतो तृतीय श्रेणी कर्मचारी २०० रुपये चिरीमिरी मागतो द्वितीय श्रेणी कर्मचारी २००० रुपये मागतो प्रथम श्रेणी कर्मचारी २०,००० रुपये मागतो श्रेणी,अधिकार आणि कामाच्या किमती प्रमाणे किंमत वाढत जाते. सरकारी खात्यात तुमचे अधिकार(POWER) किती आहेत पेक्षा तुमची त्रास देण्याची क्षमता(NUISANCE VALUE) किती यावरून त्याला वरकड "मिळणारे पैसे" ठरतात POWER अधिकार हे लोकांचे तुम्हाला किती "भले" करता येते त्याचे मोजमाप आहे. बरेच लोक तुमच्या त्रास देण्याची क्षमता(NUISANCE VALUE)ला तुमचे अधिकार समजतात.

In reply to by सुबोध खरे

पूर्ण सहमत ! सारखी खाती सोडून द्या. आज पर्यंत बस कंडक्टर, रिक्षावाले, प्लंबर, बेंक क्लार्क ह्यांच्या कडे अगदी चुकून चांगला अनुभव येतो. आर्थिक स्तिथी आणि प्रामाणिकपणा ह्यांचा काहीही संबंध नाही. त्याशिवाय उगाच कुठल्या मूर्खता पूर्ण नियमाचे पालन करणे म्हणजे प्रामाणिकपणा असा अर्थ होतो असे नाही. LTC नियमाचे मला तेच वाटते. कुठल्यातरी हरामखोर सरकारी बाबूने आमचा हक्काचा पैसा आम्ही कसा खर्च करू ह्यावर काही बोबडे नियम काढले म्हणून आम्ही गुलाम प्रमाणे पालन करणे ह्यांत काहीही प्रामाणिकपणा नाही. गुलामगिरीचे निदर्शक आहे. LTC वाला नियम कधीच कचर्याच्या पेटीत टाकून लोकांना त्यांचा पैसा परत मिळायला हवा होता. त्याशिवाय मुंबईत जे हजार प्रकारचे कर लावले जातात तो नुसता जुलूम आहे. जे लोक कर बुडवण्याचा प्रयत्न करतात मी त्यांना अ-प्रामाणिक बिलकुल म्हणणार नाही उलट, सेवांचे पैसे कमी ठेवून ते जनतेची सेवाच करत आहेत. आमचे शेजारी एकदा कर खात्याच्या धाडीत पकडले गेले. सदर शेजारी बांधकाम व्यावसायिक असून अतिशय उत्कृष्ट दर्ज्याची घरे बांधत असत. कधीही कुठल्या client ने ह्यांनी फसविल्याचा दावा केला नाही, सगळे suppliers ह्यांच्या प्रमानिक्पानाची स्तुती करत असत. अगदी शेजारी म्हणून सुद्धा काही ह्यांन कधी कुणाचे ४ पैसे खाल्ले नाहीत. कर खात्याने धाड घातली आणि कर वाले १५ लाख लांच घेवून चालते झाले. नंतर ह्यांनी सांगितले कि ह्या आधी अगदी सर्व काटेकोर कर भारत असताना सुद्धा अशीच धड टाकून २ लाख लांच घेवून हि मंडळी गेली होती. तेंव्हा पासून ह्यांनी जास्त चांगला CA पकडला होता. धाड, लांच आणि कर बुडवण्याचा काहीही संबंध आणि हे लोक फक्त खंडणीखोर गुंडा प्रमाणे वागतात.

In reply to by सुबोध खरे

"कमी पगारावर काम करणारे बहुतांशी या बाबतीत सज्जन असतात असं दिसतंयाच्या इतकं असत्य विधान दुसरं नसेल. " = संपूर्ण सहमत. मला कुठल्याही अभिनिवेशाशिवाय ईतक्या नेमक्या शब्दात मांडता आलं नसतं.

क्रिकेटचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या केरी पॅकरचे शब्द आहेत (संंमं, त्यातील एका शब्दासाठी माफ करा) - There is a little bit of whore in all of us. Gentlemen, what's your price? थोडक्यात सांगायचं तर प्रत्येकाची किंमत असते. ५०० रुपयांची लाच न खाणारा माणूस ५०० कोटी रुपये कमवता येत असतील तर तेवढा प्रामाणिक राहील का? ५००० कोटी कमवता येत असतील तरी नाही म्हणेल का? शेवटी प्रत्येकाची किंमत असते आणि स्वतःला कितीत विकायचं हे प्रत्येकजण स्वतः ठरवतो. याला सिनिकल म्हणालात तरी हरकत नाही.

In reply to by अभ्या..

याच आशयाचा डायलॉग आहे. 'जहा लाथ मार सकता था वहा लाथ मारी...जहा आपने कहा सलाम दो, मैने कहा सलाम लो'

हे प्रवासखर्च आणि बाकीचं काय काय ते जेवढं असतं तेवढच आम्ही देतो पण म्हणून मी प्रामाणिक आहे असं म्हटलं तर खोटंच आहे असं वाटायला लागलय. ;) गेल्या शुक्रवारी भयंकर कंटाळा आला असल्यानं शेवटचा अर्धा तास कसाबसा रेटला. आजूबाजूला राहणार्‍यांचा एक नाईलाजातून करावा लागलेला व्हॉटस अप गट आहे. तो नवर्‍याच्या फोनवर आहे. (बहुतेक सगळे तेलुगु देसम आहेत ही अनावश्यक माहिती देतीये, काय करणार? सवय जात नाही!)नुकतीच म्हणे कोणतीतरी क्रिकेटची म्याच झाली. लोकांनी वर्क फ्रॉम होम, आजारपणाच्या रजा वगैरे सवलती वापरल्या. आपापल्या बेसमेंटात प्रोजेक्टर लावून भिंतीवर म्याच पाहिली म्हणे! त्याचे फोटू, मध्येच हापिसची खबरबात, तिकडे हापिसात मिटिंगा चालू असताना हिकडे कशी मजा येतिये अशा निरोपांना ऊत आला होता. हे अर्थातच नवर्‍याने सांगितले. त्यावेळी माझी व्यवस्थित जळजळ झाली. म्याचची आवडच नसल्याने ते जाऊ दे, पण वर्क फ्रॉम होम सुविधेचा असा गैरवापर सर्रास करताना पाहते व तरीही त्यांचे व्यवस्थित चालू आहे यामुळे! आमची आहे का हिंमत तसे करण्याची? रोज असले काम मलाच नाही आवडणार पण कधीतरी दमलेल्या अवस्थेत असताना नक्कीच हवेसे वाटेल, अगदी एखादा दिवस का होईना! त्यावरून असे म्हणावेसे वाटते की हे प्रत्येकाचे वेगळे आहे. घरी अठरा विश्वे दारिद्र्ये असताना नोकरीवर असलेला मनुष्य बहुतेक मानेवर खडा ठेवून काम करेल, आहे त्या पैशात भागवेल पण दुसरा तश्या परिस्थितीतला तसाच वागेल असा नेम नाही. कंपनी किती राबवून घेतिये व मानधन योग्य देतिये की नाही यावरही अवलंबून आहे. एकाच कंपनीतील प्रत्येकाचे हे वेगळे असू शकते. कंपन्याही ग्रेट नसतात आणि लोकही! आयटी क्षेत्रातील काही माहित नाही पण इथे मिपावरच अनेक धागे वाचून समजलेल्या कथा आहेत. दिवस रात्र काम करायला लावणे, विकांती बोलावून घेणे, क्लायंटला कमी वेळातील कामाचे वचन देणे, एखादा कर्मचारी परदेशी पाठवायचा असेल तर त्याला डावलून दुसर्‍याला पाठवणे वगैरे. हे वेगळ्या स्वरुपात सगळ्या ठिकाणी चालतं. सध्या आयटीचा बोलबाला असल्यानं ते उदाहरण दिलं. लोकही वर उल्लेख केल्याप्रमाणे किंवा इतर मार्गाने फसवाफसवी करतात.

एक प्रश्न मनात आला - माणूस "बदला घ्यायचा" म्हणून ऑफिसमधे फसवाफसवी करत असेल; पण याचा त्याच्या इतर आयुष्यावर परिणाम होतो का? जर त्याने ऑफिसबाहेर कुठे भ्रष्टाचार पहिला, तर तो तक्रार करण्याची शक्यता कमी होत असेल. त्याच्यातला सच्चाईचा धीटपणा निघून गेला असेल.

In reply to by अत्रे

१. 'मजबूत' पुरावा मिळत नाही २. कोर्ट-पोलीस खेटे घालायला वेळ नाही. पोटामागे धावण्यातून. हीही कारणे असू शकतील.

मुद्दा बराच पेटला म्हणायचा. असो, तशी अपेक्षा होतीच. तुरळक चार पाच जण वगळता धाग्यातल्या विचाराशी मंडळी असहमत आहेत. यात एक कळीचा सूर दिसतो तो म्हणजे, 'अमका अमका यापेक्षाही काहीतरी मोठं करतो, मग मी केलं इतकं तर काय बिघडलं?' किंवा 'माझ्यावर जो अन्याय होतो, त्याच्या तुलनेत हे काहीच नाही'. ठीक आहे, असं वाटणं स्वाभाविक आहे. पण हे वाटणं रागापोटी असतं, आणि म्हणून तसं वागणं जस्टिफाइड होऊ नये. म्हणजे वर्गातली सगळीच मुलं कमी मार्क मिळवतात म्हणून मग मलाही मिळाले, तर काय एवढं? हे उत्तर दिल्यासारखं आहे ते. आपल्यावर होणारा अन्याय. कंपनी १०० रुपयात किती राबवते... किंवा तुमच्या मेहनतीवर किती नफा कमवते हे विचारही तसेच. असं तिरिमिरीत अनेकदा वाटतं, पण म्हणून मग 'ही चोरी असेल तर आहे मी चोर' वगैरे असं म्हणणं तुम्हाला छान वाटत असेल, पटत असेल तर तो तुमचा प्रश्न आहे. आनंद आहे. ऑफिसच्या वेळेत जालावर वैयक्तिक काम करणे. मुद्दा मान्य आहे, पण तुलना मान्य नाही. गूगल मधे नावाला कोड ऑफ कंडक्ट आहे, स्पोर्ट्स रूम इज ओपन, देअर इज अ रूम व्हेअर यू कॅन रेस्ट, लिसन टू म्यूजिक डू व्हॉटेव्हर. यूट्यूब इज अव्हेलेबल, ऑल सोशल साइट्स आर अव्हेलेबल. त्याचे गोडवे ऐकले, सांगितले असतीलच की कधीतरी. अशा कंपन्या अनेक आहेत. मुद्दा हा सांगायचाय की यू आर पेड टू वर्क अँड अ‍ॅज लाँग अ‍ॅज युअर वर्क इज गेटिंग डन, इट डजन्ट मॅटर व्हॉट यू डू अदरवाइज. हे..... आणि पैशांचा मांडलेला मुद्दा, याचा संबंध मला समजत नाही. तसं असेल तर मग ऑफिसं जेल होतील, टॉयलेट चा वेळ, चहाचा वेळ, मोबाईलवर बोलायचा वेळ, जेवायचा वेळ, सगळ्यालाच चोरी म्हणावं लागेल. एम आर पी बद्दल तजोंनी व्यवस्थित व पुरेसं विवेचन केलंय त्यामुळे त्याबद्दल काही बोलायची गरज नाही. तो प्रतिवाद फारच गमतीशीर होता पण. फिल्मी डॉयलॉग्स ने प्रेरित होणा-यांसाठी आणिक अनेक उदाहरणं आहेत. गॉडफादर मधलंच घ्या, Behind every great fortune, there is a crime. देअर यू गो. असं नसतं ना भाऊ. पण मला हे मान्य आहे की प्रत्येक माणूस स्वतःची किंमत ठरवतो. मग पाच-सहाशे च्या टॅक्सी आणि मोबाईलची बिलं लाटणारे फारच स्वस्त म्हणायला हवेत, नाही का? माल्याची जीवनशैली आकर्षक, प्रश्न संधीचा आहे... एक्सलंट. बाकी धीरूभाईंचं द पॉलिएस्टर प्रिन्स वाचा जमल्यास. इन्स्पायर होता की चीड येते हे वाचायला आवडेल. अर्थात काय व्हावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. आयुष्य अवघड, लहानसहान गोष्टीत जपलेल्या तत्वांमुळे होत असेल तर बेहत्तर. नाहीतर मग सगळंच 'चालतंय रे!' म्हणून करता येईल. चुकून टिशूपेपर डस्टबिनच्या बाहेर पडला, परत फिरून उचलला तर हसतात बाजूचे; but they are not worth a damn at that moment. गोष्ट पाळायची म्हटली की त्यात छोटं, मोठं, करायचं नाही. आज ज्यांना पाचशेची अफरातफर छोटी वाटते, त्यांना उद्या (तशाच पैशांच्या सहाय्याने मोठं झाल्यावर) पाच लाख ही मोठे वाटणार नाहीत, मग पाच कोटी, पन्नास कोटी... थांबवायचं असेल तर ते पाचशेलाच. पुढे शक्य नसतं. बाकी धाग्यात म्हटल्यानुसारच ज्याच्या त्याच्या इन्टेग्रिटीचा प्रश्न आहे. हे बोलणं जर सोपं आहे असं कुणी म्हणेल तर मग तेही न जमण्यामागचं कारण सांगावं. आणि काय बोलणे? ज्याचे त्याला.

In reply to by वेल्लाभट

अर्थात काय व्हावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. हाच कळीचा मुद्दा आहे आणि येथेच गल्लत होते आहे. आपल्या बघण्यात इतके निरनिराळे लोक असतात आणि प्रत्येकाचे "जीवनविषयक सूत्र" वेगवेगळे असते. सध्याच्या काळात "आपण आपल्यापुरते आपल्या मतानुसार प्रामाणिक राहणे" हे आणि इतकेच महत्वाचे असते. पण लोकांना हे पटत नाही. ते दुसर्‍याला आपल्या मतानुसार सुधारण्याचा प्रयत्न करतात. यामुळे विचारधारांमध्ये छोटेसे युद्ध सुरू होते. त्यात प्रामाणिकपणाच्या प्रत्येकाच्या व्याख्याही वेगवेगळ्या असतात. स्वतःच्या परिघात वावरताना आपण जसे स्वातंत्र्य घेतो तसेच स्वातंत्र्य दुसर्‍याला दिले तर व्हेज-नॉनव्हेज, हिंदू-मुसलमान असे वादही तयार झाले नसते आणि तेरी कमीज से मेरी कमीज सफेद कैसी टाईप कोण किती % प्रामाणिक आहे याचा विचार करायची गरज भासली नसती. गोष्ट पाळायची म्हटली की त्यात छोटं, मोठं, करायचं नाही. आज ज्यांना पाचशेची अफरातफर छोटी वाटते, त्यांना उद्या (तशाच पैशांच्या सहाय्याने मोठं झाल्यावर) पाच लाख ही मोठे वाटणार नाहीत, मग पाच कोटी, पन्नास कोटी... थांबवायचं असेल तर ते पाचशेलाच. पुढे शक्य नसतं. हे टिपीकल तत्वज्ञान आहे. वरून गोडगोड दिसणारे, भावनांना हात घालणारे. प्रत्यक्षात निरूपयोगी आणि सदासर्वदा अनुसरणे निव्वळ अशक्य. गोष्ट पाळायची म्हटली की त्यात छोटं, मोठं, करायचं नाही प्राणीहत्येच्या विरूद्ध असणारे सर्वचजण दिवसरात्र श्वास घेताना हवेतले जीव जीवाणु मरू नयेत म्हणून जैन धर्मगुरूंसारखे मास्क लावून फिरतात का? मास्क नसताना त्या धर्मगुरूंच्याही हातून ही हत्या होतच असते. आपल्या अन्नासाठी प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे झाडांचा जीव घेतोच. रस्त्यावरून गाडी चालवताना कित्येक बेडूक, फुलपाखरे, माश्या मरतात. अशा सगळ्या गोष्टींचा विचार करत बसलो तर जगणे अवघड होईल. त्यामुळे "कोणीही १००% प्रामाणिक नसतो" हे पटले की बरेच प्रश्न पडत नाहीत.

In reply to by मोदक

स्वत:चा प्रामाणिकपणा जपावा पण दुसऱ्याच्या प्रामाणिकतेची कसोटी स्वत:च्या मापाने मोजणे, त्याला नावे ठेवणे, सुधारण्याचा प्रयत्न करणे हे योग्य कशावरून ? निसर्गाचा न्याय फार गहन आहे. छोट्या छोट्या + / - चीसुद्धा तिथे भरपाई वसूल केली जातेच जाते. तस्मात, आपल्या मताने आपण प्रामाणिक रहावे, हेच खरे !

In reply to by मोदक

प्रश्न पडायचेच मोदकशेट. त्यामुळेच तर आज ही परिस्थिती आहे. यू आर टॉकिंग अबाउट अ वल्ड विदाउट रूल्स, आय डोन्ट थिंक यू कॅन हॅव दॅट. ईव्हन जंगल हॅज इट्स रूल्स.

In reply to by वेल्लाभट

नोप.. आय अ‍ॅम नॉट टॉकिंग अबाऊट अ वल्ड विदाउट रूल्स. आय अ‍ॅम टॉकिंग अबाऊट "नॉन हायपोथेटिकल" वल्ड. (रच्याकने - सरळ मराठी लिहिणे जास्ती सोपे जाते)

In reply to by वेल्लाभट

एक प्रामाणिक शंका. असे मध्येच इंग्लिश वाक्ये का लिहिता तुम्ही? बहुतांश वाक्ये मुद्द्याच्या समारोपाच्या वेळी असतात. हे आणखी एक निरीक्षण.

In reply to by मोदक

आवडतात लिहायला, म्हणून! शेवटी आली म्हणून दाग - द फायर कातिल - द किलर डॉन - द गुंड वगैरे ऐकल्यासारखं वाटतं पण, नाही? :)

In reply to by मोदक

लेट हिम चुझ द वे टु एक्स्प्रेस हिमसेल्फ अँड हिज थॉट्स. व्हु आर वी टु टेल हिम मराठित लिवा? टेल मी राईसबॉल. =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

दॅट ओनली ना ! व्हाय हिअर देअर नोज पोकिंग अन्नेसेसरीली? उगाच आपलं हुंगत बसायचं काहीतरी.

In reply to by वेल्लाभट

व्हाय हिअर देअर नोज पोकिंग अन्नेसेसरीली? उगाच आपलं हुंगत बसायचं काहीतरी. अहो नवीन काहीतरी शिकायला मिळते. तुम्ही एखादा प्रेझेंटेशनचा कोर्स केला असेल आणि त्यात असले काहीतरी सांगितले असेल तर त्या दृष्टीने आणखी माहिती मिळवता येते. उगाच हुंगत बसत असलो तरी तुमच्याकडे काहीतरी चांगले असणार असा विचार करून हुंगायचा प्रयत्न होता. तुमचा असा पवित्रा असेल तर पुढच्या वेळी नाही विचारणार, काळजी नसावी.

In reply to by मोदक

असो. शब्दाने शब्द वाढवायचा नाही. ते फार होतं आजकाल मिपावर. त्यामुळे ठीक आहे, इतकंच म्हणतो.

In reply to by वेल्लाभट

इंग्लिशबंदी म्हटलं नाहीये मान्यच आहे वेला, पण ही वाक्यं मराठीतून लिहिता येतील ना? की तुम्हांलाही इंग्लिश येतंय?
भाऊ इंग्लिशला विरोध नाहीच आहे; उलट इंग्लिश आलंच पाहिजे हा आग्रह आहे. पण मराठीचा गळा दाबून इंग्लिशचा सूर लागतो ना; ते चूक आहे.
हे वाचलं होतं म्हणून लिहावसं वाटलं, असो. :)

In reply to by यशोधरा

मला यावर काहीही स्पष्टीकरण द्यावं असं वाटत नाही. मी म्हटलंय ते स्पष्ट आहे आणि त्यामुळे मोदकभौ काय तुम्ही काय, तुम्हाला योग्य वाटेल ते अर्थ खुशाल काढावेत असं सुचवतो.

In reply to by वेल्लाभट

साहेबा, अहो संपूर्ण प्रतिसाद हा व्यक्ति म्हणून नव्हे समाज म्हणून आपण अति-भौतिकवादी झाल्याबद्दल आहे. अति-भौतिकवादाचे समर्थन तर दूर पण आपण स्वता:चीच फसवणूक करण्यात किती कुशल झालो आहोत या बद्दल प्रतिसाद आहे. मला तर नेहमी हा प्रश्न पडतो की जी व्यक्ति अशी समर्थने करू शकते ती आपल्या मुलांना योग्य अयोग्य असे शिकवणार. व्यक्तिगत मला असे वाटते की आयुष्य संपूर्ण काळे-पांढरे फ़क्त नितीकथेत असते,  प्रत्यक्षात बराच भाग करडा(ग्रे) असतो. पण आपली दिशा करड्या काढून पांढ-याकढे असावी. उसकी कमीज मेरी कमीज से बहुत काली है याला कही अर्थ नाही. पुस्तकाचे नाव सुचवल्याबद्द्ल  धन्स जरुर वाचेन

एकूण असं दिसतं की याबाबत आपण मोठ्या प्रमाणात व्हॉटबाउटरी, "त्यांना आगोदर सांगा", "जाओ पहेले उसका साईन लेके आओ" अशा टाईपची लॉजिक्स वापरतो आणि बरंचसं जस्टिफाय करतो. आपल्याहून मोठ्या प्रमाणावर अनेकजण अमुक करतात ही वस्तुस्थिती असली तरी त्या वस्तुस्थितीचा मुख्य वापर आपण आपलं चुकीचं वागणं लीगलाईझ करुन घेण्यासाठी करतो असं म्हणता येईल. मजसहित सर्वांच्याच कॉमेंट्सवरुन एकत्रित दृश्य पाहता आता असं वाटतंय.

In reply to by गवि

ह्याचं कारण आजुबाजूला सतत मारा होत असलेल्या बातम्या. जगात सगळं कसं नालायक लोकांनाच संधी मिळते, पैसे मिळतात, कायद्याचे अभय मिळते अशी सर्वसामान्य मध्यमवर्गियांची मानसिकता झाली आहे. लहानपणापासून सचोटीने वागा, इमानदारीने वागलं तर सगळं चांगलं होते, सत्याचा विजय होतो, फसवणूकीच्या पैशाने झोप लागत नाही इत्यादी भाकडकथांतून संस्कार झालेले आपण लोक आजुबाजूला सगळी चंगळ चालू असतांना वैतागनारच. आपल्याला ते करतात तसं जमत नाही, करायची इच्छा असुनही ह्यातून चडफडाट होतो. वर खरेसर बोलले तसंच. संस्कार आडवे येतात म्हणून नाहीतर... त्यामुळे जेवढं झेपेल तेवढा भ्रष्टाचार करुन आपली वैतागवाडी साजरी करतात. असो प्रतिसाद विस्कळीत झालाय. भा पो असल्यास्तील अशी अपेक्षा आहे.

In reply to by गवि

एक निरीक्षण. अत्यंत प्रामाणिकपणे आयुष्यभर काम करून, सर्व टॅक्सेस भरून नीतीपूर्ण आयुष्य जगणारा अखेरीस दारिद्र्यात टाचा घासून मरतो. लुबाडणूक करणारे कंत्राटदार बंगले बांधून गाड्या फिरवतात. आईवडिलांची सेवा करणारी अपत्यें आईवडिलांकडूनच उपेक्षली जातात. आईवडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलांनाच आईवडील आपले सर्वस्व देतात. प्रामाणिकपणे नोकरी आणि काम करणाऱ्याना कंपनीत अपमानस्पद वागणूक मिळते. चमचेगिरी, हांजीहांजी, लाचपुरवठा करणाऱ्यांना मानसन्मान, सर्व सवलती मिळतात. हे पाहिल्यावर सामान्य माणसाचा नीतिमत्तेवर विश्वास राहील काय ?

In reply to by सस्नेह

तुम्ही नीतिमत्तेला नीतिमत्ता तरी म्हणत आहात निदान. हे चांगलं आहे. ठीक आहे, विश्वास नाही राहणार कदाचित. पण असं वाईट, स्वार्थी वागणा-यांचं भलं (शेवटपर्यंत) झाल्याची उदाहरणं तरी सांगा. असो! धागा कर्म, फळ, अध्यात्म वगैरे वळणं घेईल उगाच. तेंव्हा थांबतो.

In reply to by वेल्लाभट

अर्थात हे समर्थन नाहीच होऊ शकत. पण नीती आणि न्याय यात प्रचंड फरक आहे, हे मात्र अनेकदा जाणवलय. त्यामुळे आपण कंपनीकरिता जीव तोडून काम करत असू, सर्व कर्तव्ये व्यवस्थित पार पडत असू, तर फसवणूक न करता सर्व सुविधा घेण्याचा हक्क असावा असे माझे मत आहे. सुविधा मिळण्यात अडाणी कायदे जर आड येत असतील तर त्यातून आउट ऑफ स्कोप जाऊन मार्ग काढण्यात काहीच वावगे नाही. कंपनी जर ठरलेल्या कामापेक्षा, वेळेपेक्षा विनामोबदला जास्त काम करून घेत असेल, तर जरूर करावे. पण मग त्या बदल्यात जाल इ. सुविधा वापरल्या तर काय वाईट आहे ? थोडक्यात, तारतम्याचा काटा आपल्या मनात असतो, त्याचे भान राखावे, म्हणजे झाले.

In reply to by वेल्लाभट

फसवणूक न करता म्हणजे काय? माझे बरेच कलीग अमेरिकेत बिझनेस विसा वर यायचे. त्यांना राहण्यसाठी भत्ता म्हणून दिवसाचे ६० $ मिळायचे बहुधा.. आता ६०$ जर त्यांनी राहण्यावर खर्च केले तर ते पैसे साठवणार कधी? मग ते आमच्याबरोबर अपार्टमेंट शेअर करायचे. आमचेच लीझ अग्रीमेंट भारतात गेल्यावर आपल्या नावावर खपवून १५००$ चा भत्ता पदरात पाडून घ्यायचे. आता फसवणूक म्हणाल तर त्यांच्या मॅनेजर ना, एच आर ना या सगळ्याची कल्पना होती.. पण कंप्लायन्ससाठी बिल तर पाहिजे. मग अशी बिले करून ते १५००$ सदर कर्मचार्‍याला दिले जायचे. आता यात कोण कोणाला फसवतय? हे कायदेशीर नाही हे नक्कीच.. पण नैतिक आहे की नाही?

In reply to by गवि

आणि ही व्हॉटबाउटरी निगेटिव्ह एलिमेंट्स बद्दलच जास्त पटते सगळ्यांना. चांगल्याचं अनुकरण कमीच होत आलंय युगानुयुगे. तरी नाही म्हणायला आजही उदाहरणं दिसतात. thebetterindia, logicalindian, सारख्या साइट्स कधीतरी चाळल्या तर काही इन्स्पायरिंग इन अ गुड वे, स्टोरी वाचता येतील. तशा स्टोरी वाचून, फॉरवर्ड करून नंतर मग 'ही वेगळीच माणसं!' असं म्हणून आपण आपली गाडी पूर्वपदावर आणायची असंच चित्र दिसतं.