Skip to main content

अर्निंग इट राइट

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 05/04/2016 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
मूल्य, शिस्त, विवेक वगैरे गोष्टींना महत्व न देणारी लोकं, महत्व देणा-या लोकांपेक्षा नेहमीच अधिक असतात. पण तरीही काही मूलभूत गोष्टी ज्या वाईट असतात हे सर्वमान्य आहे, त्या गोष्टीही लोकं अगदी समजून-उमजून करताना दिसतात तेंव्हा उद्विग्न व्हायला होतं. आणि तेवढंच करू शकतो आपण, याची जेंव्हा जाणीव होते तेंव्हा अजून जास्त उद्विग्न व्हायला होतं. उदाहरणार्थ चोरी. चोरी म्हणजे एखादी वस्तू उचलून खिशातच टाकायला हवी असं नव्हे. चोर कृतीपेक्षा विचाराने आधी चोर होतो. कार्यालयीन जीवनात अशा चो-या अनेकदा बघायला मिळतात. कार्यालयीन चोर्‍यांची उदाहरणं म्हणजे, न केलेल्या मेडिकलच्या खर्चाची बिलं दाखवून त्या पैशाचा परतावा घेणे, बसने जाऊन टॅक्सीच्या बिलाचे पैसे घेणे, सेकंड क्लास ने प्रवास करून फर्स्ट क्लासचे पैसे घेणे, कंपनी मोबाईल बिलं भरते म्हणून त्या नंबरवरून बिनधास्त एसटीडी, आयएसडी कॉल करणे, इंटरनेट बेछूट वापरणे, इत्यादी. 'कंपनी देतेय!', 'पण मी एलिजिबल आहे' अशी स्पष्टीकरणं याबद्दल विचारणा केल्यास ऐकायला मिळतात. एलिजिबल आहे म्हणून टॅक्सीभाडं १०० रुपये घेऊन १० रुपयाच्या बसच्या तिकिटावर प्रवास केला म्हणजे ९० रुपयांची चोरीच आहे. पण हे करणा-या माणसाला तो त्याचा हक्क वाटतो. इंग्लिशमधे एक शब्द आहे Integrity; तिचा अभाव या लोकांमधे असतो. चोरी पकडेपर्यंत जरी चोर चोर नसला, तरी त्याच्या मनाला ठाऊक असतं की तो चोर आहे. या लोकांनाही ते ठाऊक असतं, पण जगाला ते कसं बरोबर आहे हे पटवून द्यायचा त्यांचा अट्टाहास बघितला की कीव करावीशी वाटते. बरं, हे असं करणारी मंडळी बहुतेक वेळा बक्कळ पगार घेणारी मंडळी असतात, कमी पगारावर काम करणारे बहुतांशी या बाबतीत सज्जन असतात असं दिसतं. शेवटी जास्त मिळायला लागलं कीच हाव निर्माण होते, कमीच असतं तिथे फक्त गरज असते. मला लाकूडतोड्याची गोष्ट आठवते अशी उदाहरणं बघितली की. तो सुद्धा सोन्याच्या, चांदीच्या कुर्‍हाडीसाठी एलिजिबल ठरलाच होता की!, पण त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याला तो त्याचा 'हक्क' वाटला नाही. शेवटी वृत्ती असते एकेकाची, आणि ती अशा प्रसंगातून दिसते. असं चोरासारखं वागणार्‍या व्यक्तीने त्याच्या प्रमोशनची पार्टी अगदी 'हक्काने', दिलदारपणाचा आव आणून दिली तरी त्याचं कौतुक वाटत नाही. पण त्या व्यक्तीच्या १०% पगार असलेल्याने मुलगा पास झाल्याचे वाटलेले पेढेही कौतुकासाठी अधिक 'एलिजिबल' ठरतात. 'Everybody has a Right to Earn; but very few Earn it Right.' ब्लॉग दुवा मिपाकरांच्या मतांच्या प्रतीक्षेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 27803
प्रतिक्रिया 163

प्रतिक्रिया

In reply to by वेल्लाभट

असमानांची लढाई आहे. शक्तीबाबतची असमानता तुलनेपलीकडची असल्याने एखादं चांगलं उदाहरण केवळ वा वा म्हणण्याइतकंच परिणामकारक ठरतं हेही खरंच. अन्यायाविरुद्ध काही करु पाहणार्‍याला अनंत मनस्ताप वाट्याला येतात. दुरित गोष्टींचा विळखा सोडवण्यासाठी काय करावं याविषयी सकारात्मक काही विचार करणं निरर्थक होऊन जातं. हेही खरंच.

या धाग्यात बर्याच लोकांच्या प्रतिक्रिया " त्याने गाय मारली म्हणून मी वासरू मारणे हे समर्थनीय आहे" अशा तर्हेच्या आहेत. त्या त्यांना स्वतःला सुद्धा बर्याच वेळेस पटत नसतात. परंतु मिळणाऱ्या पैशाचा मोह सुटत नाही हि हि वस्तुस्थिती आहे. इतर काही जणांचे प्रतिसाद चीड किंवा संतापातून आलेले असतात. आपण लांडी लबाडी न करता राहिल्याने आपले नुकसान होते हे मान्य करण्यासाठी एक वैचारिक अधिष्ठान असणे आवश्यक असते. त्याही पेक्षा आपले सहकारी अशी लबाडी करून आपण किती चलाख आहोत हे दाखवत असताना आपण "बुळे" ठरू हीही एक चिंता त्यात लागून राहिलेली असते. यामुळे सामान्य माणूस अशी छोटीशी लबाडी करायला धजावत असतो. मूळ स्वभाव चोरीचा नसतो परंतु मोह आवरत नाही. राहिली गोष्ट कंपनी/सरकार आपल्याला काही सुविधा देत असता त्याचा वापर करण्याऐवजी त्यातून चार पैसे कसे सुटतील हे सामान्य माणूस का पाहतो ई ची कारण मीमांसा सविस्तरपणे नंतर देतो. क्रुपय माझे प्रतिसाद कोणीही वैयक्तिक घेऊ नये ते सर्वसाधारण आहेत याची क्रुपय नोंद घ्यावी.

In reply to by सुबोध खरे

१००% सहमत.
आपण लांडी लबाडी न करता राहिल्याने आपले नुकसान होते हे मान्य करण्यासाठी एक वैचारिक अधिष्ठान असणे आवश्यक असते.
थोडा मोह आवरला की ते आपोआप येतेच ! चारित्र्याची ती ताकद असते. दुर्दैवाने भारतात राष्ट्रीय चारित्र्याची वानवा आहे, आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचे पोलिसीन्ग करावे लागते. पंतप्रधानानी गेल्या १५ ऑगस्ट च्या भाषणात त्याचा उल्लेख केला आहे.

गोष्ट १ गोष्ट आहे म्हैसूर धरण बांधले त्यावेळची ! विश्वश्वरय्या सर त्या कामाची संपूर्ण जबाबदारीने काळजी वहात असत, त्या काळात वीजेचा प्रसार फारसा नव्हता, सर रात्री आपल्या मुक्कामी परत आले की मेणबत्ती लावून काही पुस्तकांचा/ कागदपत्रांचा अभ्यास करीत आणि तासाभाराने ती मेणबत्ती विझवून दुसरी मेणबत्ती पेटवून आणखी वाचन करीत. हे रोज पहात असलेल्या त्यांच्या नोकराच्या ध्यानात आले. एक दिवशी त्याने हिम्मत करुन विचारले की सर , तुम्ही असे का करता ? सरांनी टाळाटाळ केली पण आता नोकराची भीड चेपली होती आणि औत्सुक्य ही होतेच ! फारच पाठपुरावा केल्यावर सरांनी सांगितले , अरे, घरी आल्यावर मी सरकारी कागदांची पहाणी करत असतो, ते काम मी शासकीय खात्याचे मेणबत्ती वापरुन करत असतो. नंतरचे वाचन हे माझ्यासाठी , माझे ज्ञान वाढवण्यासाठी असते , त्यासाठी मी माझी मेणबत्ती वापरतो. आले का तुझ्या लक्षात? Government work is God's work ! गोष्ट २ चिनुच्या दप्तरात एकसारख्या ४ शिस्पेन्सीली दिसले, स्वाभाविकपणे बाईनी थोडे दरडावून विचारले, चिनू , इतक्या पेन्शीली तुझ्याकडे कश्या आल्या? कोणाकडच्या न विचारता घेतल्यास की काय ?, चिनु रडतच घरी गेला. दुसर्‍या दिवशी शाळेत चिनुचे बाबा ! बाई त्यांना म्हणाल्या, अहो , याने कोणाकडून आणल्या कोणास ठाऊक ? वाईट सवय लागू नये ,म्हनून मी ओरडले त्याला ! बाबा निरागसपणे म्हणाले , " छे हो म्याडम , तो नाही तसा, तुमचा गैरसमज होतो आहे ! परवा मीच आमच्या ऑफिसमधून दोन बॉक्स आणलेत , त्यातल्याच आहेत त्या पेन्शीली , आमचा चिनू नाही करणार चोरी वगैरे !"

In reply to by विटेकर

ती पर्सनल दिवा अन सरकारी दिवावाली गोष्ट जशीच्या तशी चाणक्य उर्फ़ विष्णुगुप्त ह्याच्याबद्दल सुद्धा ऐकली आहे!, खरे खोटे देव जाणे बुआ!

उदा: भारतात कार्यालयात काम करताना काम एके काम करणारे लोक युरोपात जेव्हा काम करू लागतात तेव्हा फरक जाणवतो. आरामात अधे मध्ये कॉफी सिगारेटचे ब्रेक घेत, सारखे काहीतरी ऑनलाईन पाहात आणि टाईमपास करत काम करताना वर भारताच्या ८-१० पट पगार घेताना वाटते की हे काम नैतिकतेने करतोय की पुर्वीचे. दुसरी बाजू पाहीली की वाटते काम करुन घेण्यात या कंपन्यांची नैतिकता आहे की भारतीय? काही बाबतीत आपण असलेली परिस्थीती आणि मानसिकता ही कारणीभूत ठरत असावी. एक कीस्सा. इकडे नवीन असतना आमचा हे पाहीले की सार्वजनिक वाहनतळावर गाड्या लावण्याचे पैसे भरुन त्याची पावती काचेच्या आत ठेवावी लागते. पण ती कोणी सहसा तपासायला येत नसत. मग अशीच गाडी लावायला चालू केली. आणि सहकार्‍याला पैसे भरताना पाहून सल्ला दिला की कोणी पाहत तर नाही. त्यावर तो म्हणाला ''Its my responsibility to pay for the things which I use''. हे ऐकल्यानंतर मन इतके पालटले की त्यापुढे मी कधीही वाहनतळावर फुकट गाडी लावली नाही. आजूबाजूला बहुसंख्य लोक असे असतील तर आपली पण नैतिकता बदलू शकते.

''Its my responsibility to pay for the things which I use''.
अगदी बरोबर, म्हणूनच आपण उपनगरी लोकलच्या प्रवासात तिकिट काढूनच प्रवास करतो.

लेखातील मताशी सहमत आहे. मात्र ती मर्यादा प्रत्येकाची सब्जेक्टिव्ह दिसते. १०० चा कॅब रेट लावून प्रत्यक्षात बसने जाणे मला चुकीचे वाटते, पण त्याचे रॅशनलायझेशन करणारे माझे मित्र एरव्ही एकदम "नॉर्मल" आहेत - म्हणजे चोर्‍या मार्‍या वगैरे करत नाहीत :). मग त्यांना हे का योग्य वाटते हे समजावून घेतल्याशिवाय जज करणे चुकीचे होईल. याउलट इथे अनेकांचा सूर असा गैरफायदा न घेणारे तो 'घाबरून' घेत नसतात असा आहे. मी अनेक जण पाहिले आहेत (सुबोध खर्‍यांच्या स्टॅट मधल्या १% वाले) की जे तत्त्व म्हणून जो पैसा आपल्या हक्काचा नाही तो घेत नाहीत. मी त्यात येतो की नाही हे लिहीणे महत्त्वाचे नाही. येतो लिहीले तर उगाच बढाई वाटेल, येत नाही लिहीले तर उगाच विनय वगैरे, तेव्हा जाउदे :). पण अनेक जण माझ्या ओळखीत आहेत. मात्र उच्च मध्यमवर्गीयांचा याबाबतीतील कद्रूपणा मला कधीच समजलेला नाही. आमच्या पहिल्या कंपनीत गणवेश असे. तेथे वर्षाला २ का ३ हजार रूपये पावती दिल्यावर त्या गणवेशाचे कपडे व शिलाई करता मिळत. तेव्हाच्या हिशेबाने ते असे ५-६ तरी ड्रेस घेण्याइतके होते. पण आमच्या कंपनीतील अनेक "ऑफिसर" लोक खोट्या पावत्या दाखवून वैयक्तिक कपडे त्यातून वसूल करत व वर्षभर दोन गणवेश ड्रेस कसेबसे पुरवत. हे लोक एरव्ही सज्जन होते. कंपनीचे पगारही तेव्हा कंपनीतील सर्वात खालच्या पदावर असलेल्यालाही किमान मध्यमवर्गीय जीवन जगता येइल इतके चांगले होते. 'घे की लेका चार ड्रेस युनिफॉर्म चे, बाकी पैसा जाउ दे. कंपनी काही तुला कमी देत नाही पगार' असे एक दोघांना म्हणून पाहिले होते. पण समाज असा बदलत नाही :) सगळ्यात डोक्यात जायचे म्हणजे छोट्या असाइनमेण्ट्स वर अमेरिकेत जाउन येणारे लोक. यांच्याभोवती एक 'ऑरा' असे. मात्र परत आणलेले डॉलर्स रूपयांमधे कन्वर्ट करायच्या वेळेस दीनवाणे होउन यातले अनेक लोक जास्त रेट देणार्‍यांना शोधत. कारण यांच्या कनेक्शन्स मधे काही लोक असे होते जे बँकेपेक्षा जास्त रेट ने बदलून देत. नक्कीच बेकायदा असणार तेव्हा. हा फरक बहुधा २-३ रूपयांचाच असे.

आपल्याला कंपनी किंवा सरकार काही सोयी उपलब्ध करून देते त्याचे कारण आपण त्याचा लाभ घ्यावा अशासाठी आहे. कंपनी किंवा सरकारी कार्यालये वातानुकुलीत असतात याचे कारण तापमान जर अनुकूल असेल तर आपली कार्यक्षमता वाढते. आपल्याला टैंक्सीचे भाडे दिले जाते ते बसला लटकत येण्यासाठी नाही तर आरामात कार्यलयात येऊन जास्त कार्यक्षमतेने काम करण्यासाठी. माझी दोन वर्षे नोकरी झाली असताना एक आमचे वरिष्ठ डॉक्टर मला म्हणाले होते कि If "you" are not comfortable you cant make "your patients" comfortable. हे वाक्य मी आजही सतत आठवत राहतो. ( ती एक वेगळी कहाणी आहे ते परत केंव्हातरी) याचे एक टोकाचे उदाहरण-- म्हणजे ठाण्यातील कामगार न्यायालयाचे कार्यालय इतके टिचके होते कि तेथील न्यायाधीश महाराजांना बसण्यासाठी मन अवघडून बसावे लागे. याचा सूड म्हणून एका न्यायाधीशांनी एक वर्षभर एकाही खटल्याचा निर्णय दिला नव्हता. हीच परिस्थिती सर्वांची आहे. तुम्ही जर कामाची सुरुवात उत्साहात करू शकत नसलात तर तुमची कार्यक्षमता ५०% हून कमी होऊ शकते. तुमची कार्यक्षमता वाढवण्यासाठी दिलेल्या सुविधातून तुम्ही चिंधीचोरपणे चार पैसे वाचविले तरी आयुष्याच्या शेवटी तुमच्या लक्षात येईल कि हा पैसा तुम्हाला वर घेऊन जाता येणार नाही. आज त्याच उपभोग घ्याल तर सुखी राहाल. पण लक्षात कोण घेतो. प्रामाणिक पणाचा दूरचा विचार केला असता फायदाच होतो असा माझा अनुभव आहे. २००० सालापासून मला रेल्वेच्या वातानुकुलीत प्रथम वर्गाचा प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध होती. तेंव्हापासून २००६ ला निवृत्त होईपर्यंत मी न चुकता (कुटुंबासोबत वर्षात एकदा) आणि कामासाठी सर्व वेळेस वातानुकुलीत प्रथम वर्गाने प्रवास करीत असे. त्याचे पैसे घेऊन वातानुकुलीत तिसर्या वर्गाने किंवा साध्या दुसर्या वर्गाने कधीही प्रवास करण्याचा दळभद्री पण केला नाही. पुढे जेंव्हा लष्कराविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला तेंव्हा लष्कराच्या दक्षता ( vigilance) विभागाने माझे सगळे क्लेम तपासून पाहिले होते. ( हे मला माझ्या संरक्षण लेखा नियंत्रक कार्यालयातील एका रुग्णाने सांगितले होते.) अर्थात मला घाबरण्याचे काहीच कारण नव्हते. शिवाय निवृत्त झाल्यावर मला एवढी सुती मिळणे शक्य नसल्याने आता वातानुकुलीत प्रथम वर्गाने प्रवास करण्यापेक्षा विमानाने जाणे वेळेच्या दृष्टीने "परवडते" एखादा माणूस लटपटी खटपटी करून चार पैसे वाचवून चिन्धीगिरी करतो आणि इतरांना फुशारक्या मारून सांगतो कि मी इतके पैसे वाचवले तेंव्हा बर्याच वेळेस मला मोराची आठवण येते. मोर जेंव्हा पिसारा उभारून डौलात लोकांना दाखवायला नाचतो तेंव्हा त्याचा पार्श्वभाग उघडा पडलेला असतो. एकच आयुष्य मिळाले आहे. सुखात जगा. पैसा आयुष्यात मिळून जातो. गेलेला वेळ आणि दुखावलेली माणसे परत येत नाही.

In reply to by सुबोध खरे

लैच प्रॅक्टीकल आणि योग्य असा प्रतिसाद. खूप आवडला. आमची पन विचारसरणी थेट अशीच आहे. खायचं तर तुपाशी. कोणी तुपाचे पैशे देतंय तर त्यातले पैसे वाचवून डालडा खाण्याचा नतद्रष्ट पणा करणे जमत नाही. दुसरं असं की रईसी रक्तात लागते. धरुन बांधून, घातल्या पाण्याने रईसी येत नाही. मी जी रईसी म्हणत आहे त्याचा कोणाच्याही आर्थिक परिस्थितीशी संबंध नाही.

In reply to by सुबोध खरे

तीव्र सहमत. अलीकडे जेंव्हा सेकंड होम घ्यायचे आहे यासाठी पै पै वाचवणारा एक मित्र भेटला तेंव्हा त्याला नेमक्या शब्दात कसे सांगावे हे कळत नव्हते. पण जे सांगायचे होते ते हेच असावे.

काहींनी लावून धरलेली विषयांतरं, क्षुद्र अवांतरं पाहिल्यावर ही म्हण आठवली. 'लोकां सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण.'

ट्रेनिंगला अलेला एक सिनियर डॉक्टर मला बोलली .... दोन नोकर्‍या करुन तुम्ही लेबर वर्क करताय. मी एक नोकरी करते व एक एन जी ओ चालवते. एन जी ओ ला सरकारी मदत मिळते. असु दे

ट्रेनिंगला अलेला एक सिनियर डॉक्टर मला बोलली .... तोती डॉकटर पण असेच दोन रुप घेवुन ट्रेनिंगला आलीय काय?

In reply to by इरसाल

ती डॉक्टर होती. मोबैल टायपिंग मिस्टेक

कसं? नैतिक व कायदेशीर यात गफलत करुन संभ्रमित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हा पाप लागेल, देव कोपेल याची आठवण देऊन गेला. वेभ ने नक्की कसला अभ्यास करुन हे पाल्हाळ लावले वा मालक/नोकर भूमिका नेमकी कळत नाहीं, जे कायदे आहेत त्याचा प्रासंगिक अर्थ शाबित करुन गुन्हेगार ठरतो किंवा आरोपी सुटतो तेव्हा निर्णय देणारा नैतिकतेत दोषी ठरुनही कायदा रुपी थोर दिसतो (सलमान खान -पदपथ ठोकर प्रकरण). पुढे जाऊन पाहिल्यास आजच्या दुष्काळी परिस्थितित शहरी जनतेने आंघोळ (काही वीर दिवसातनं २ दा करतात- फ्रेश वाटण्यासाठी) करण्याचे/टाळण्याचे तसेच इतर बाबीत पाणी /वीज व इतर सामयिक वस्तू वापराचे/आचरणाचे काही निर्बंध स्वतः वर घातलेत का? हा सार्वजनिक जीवनातील व्यवहार समाजातिल अपप्रवृत्तीना दुर्लक्ष करण्याचा शहाणपणा हा स्वतःला वेगळे समजणे व दुस-याना तुच्छ लेखण्याचा प्रकार जास्त वाटला. सामाजिक परिवर्तन हे कठोर आचरण, तपस्या व परिश्रमांती फक्त सुरु होते संपन्न होण्यास एक आयुष्य पुरे पडत नाहीं हे अनेक ध्येयवेड्या व्यक्तिमत्वांचा आढावा घेतल्यास आपल्या ध्यानी येते. अन्यथा क्रियेविना वाचाळता व्यर्थ! एका चळवळीच्या प्रतिक्षेत

करायचीच असेल तर दरोडे घालावेत, चिंधीचोरगिरी फार वाईट