✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विश्वाचे आर्त - भाग ८ - रेणूंपासून पेशींपर्यंत

र
राजेश घासकडवी यांनी
गुरुवार, 12/24/2015 - 20:17  ·  लेख
लेख
भाग १ - काळाचा आवाका, भाग २ - नासदीय सूक्त, भाग ३ - अस्तिस्तोत्र, भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर, भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी , भाग ६ - जंबोजेट दृष्टांत, भाग ७ - अचेतनापासून सचेतनापर्यंत पृथ्वीचा जन्म साडेचार अ-ब्ज वर्षांपूर्वी झाला. या नुकत्याच जन्मलेल्या ग्रहाचे रूपडे गोंडस गोजिरवाणे बिलकुल नव्हते. प्रचंड उष्णता, सतत होणारे ज्वालामुखीचे स्फोट, अजूनही जवळपास द्रव असलेल्या 'जमिनी'तून बाहेर पडणारे उष्ण वायू आणि वाफा यामुळे सजीव तग धरू शकतील अशी शक्यताच नव्हती. पहिल्या शंभरेक कोटी वर्षांमध्ये वरचे थर थंड होऊन घट्ट व्हायला लागले. वाफेचे बाष्पीभवन होऊन समुद्र तयार व्हायला लागले. त्याच काळात पृथ्वीचे स्वतःचे चुंबकीय क्षेत्र तयार झाल्याने वातावरणाचे शक्तीमान सौरवाऱ्यांपासून रक्षण झाले. प्लेट टेक्टॉनिक्समुळे लाव्हावर तरंगणारी जमीन एकत्र गोळा झाली, खंडांमध्ये तुटली, पुन्हा गोळा झाली. हे चित्र डोळ्यासमोर ठेवले तर आपल्याला मान्य करावे लागते की सजीव त्यानंतरच उद्भवले असणार. पण कसे? कोणीतरी अचानक नोहाच्या नौकेत प्रत्येक प्राण्याची जोडी भरून पृथ्वीवर आणून सोडली का? तसे झाले असले तरी त्या प्राण्यांचा जन्म कसा झाला हा प्रश्न सुटत नाहीच. कोट्यवधी वर्षांपूर्वी तयार झालेल्या लाव्हांमध्ये सापडणारे जीवाष्म पाहिले तर वेगवेगळ्या काळात वेगवेगळे प्राणी राहात होते हे दिसून आलेले आहे. तेव्हा प्रश्न असा येतो की आपल्याला एक काळ निश्चित माहीत आहे, जेव्हा पृथ्वीवर जीव नव्हते. आणि आता तर जागोजागी सजीव सृष्टीच्या खुणा दिसतात. त्यावरून एक उघड आहे की पृथ्वीवरच्या भौतिक पदार्थांतूनच जीवसृष्टी निर्माण झाली. पण कशी? प्राणी उत्क्रांत होतात, बदलतात, परिस्थितीशी मिळतेजुळते घेणारे टिकून राहातात हे आपल्याला पटते. पण परत प्रश्न येतो 'समजा घटकाभर मान्य केले की अगदी साध्या एकपेशीय जीवांपासून सुधारणा होत, बदल होत आजचे प्राणी आपल्याला दिसतात. पण हा पहिला एकपेशीय प्राणी कसा तयार झाला?' हे समजून घेण्यासाठी आपल्याला 'पहिला प्राणी' म्हणजे काय हे तपासून पाहावे लागेल. गेल्या लेखात आपण पाहिले की सजीव आणि निर्जीव यांच्यात काळा-पांढरा फरक नाही. किंबहुना सजीवांची व्याख्या करायची झाली तर 'जे पुनरुत्पादन करून आपल्यासारखेच इतर निर्माण करतात ते सजीव' हीच व्याख्या सर्व सजीवांना लागू पडते. त्यामुळे रेणूंपासून सजीव कसे बनले हे पाहाण्यासाठी पुनरुत्पादनाची पद्धत अगदी साध्या रेणूंमध्ये कशी आली आणि त्यातून बदल होत होत त्यांना पेशींचे स्वरूप कसे प्राप्त झाले हे पाहावे लागेल. त्यासाठी 'पहिला सजीव' ही संकल्पना आपल्याला बाजूला ठेवावी लागेल. कारण उत्क्रांती ही क्रांती नाही. एका झटक्यात, एका उडीत कुठच्यातरी रेणूपासून पेशीपर्यंत पोचलो किंवा निर्जीवांपासून सजीवांपर्यंत पोचलो असे होत नाही. हा प्रवास टप्प्याटप्प्यांनी होतो. आणि यातल्याच कुठच्यातरी टप्प्याला म्हणावे लागते की हे, यापुढचे जे आहेत त्यांना आपण सजीव म्हणू, याआधीच्यांना निर्जीव म्हणू. ही रेषा कुठे काढू हे सुनिश्चित नाही, त्यासाठी काही विशिष्ट निकष नाहीत. निव्वळ सोयीसाठी ती कुठेतरी आखावी लागते. उदाहरणार्थ, दारिद्र्यरेषा आखताना असेच काही निकष तयार करून लावावे लागतात. त्या रेषेच्या अलिकडचे गरीब आणि पलिकडचे श्रीमंत नसतात. तसंच काहीसे सजीवतेचे आणि निर्जीवतेचे असते. जेव्हा या प्रक्रियेला सुरूवात झाली तेव्हा आपल्यापैकी कोणीच तिथे नव्हते. किंबहुना त्याकाळची स्थिती इतकी उत्पाताची होती की तेव्हाचे पुरावेही हाती लागणे मुष्कील ठरते. पण आपल्यासाठी नक्की काय झाले, यापेक्षा कुठच्या मार्गांनी रेणूंपासून पेशींपर्यंतचा प्रवास होऊ शकेल हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही कथा आहे ती एका संभाव्य प्रवासाची. त्याकाळचे वातावरण ज्वलंत, अस्थिर होते. ज्वालामुखीचे स्फोट, पृथ्वीचे तापमान, कोसळणाऱ्या विजा यामुळे मुबलक ऊर्जा होती. अनेक रासायनिक अभिक्रिया होत होत्या. अनेक नवीन रेणू बनत होते, तुटत होते. परस्परांशी प्रक्रिया करत होते. आणि उर्जा मुबलक असल्या मुळे नवीन अधिकाधिक क्लिष्ट रेणू आपली हजेरी लावत होते. पण "मी इथे होतो" असे लिहिण्याची कोणताच शक्ती नव्हती. कारण चिरंतन स्थैर्य कोणालाच नव्हते. "अणू असशी अणूंत मिळशी" हा न्याय सर्वच रेणूंना लागू होता. पण या सर्व कोट्यावधी वर्षे चाललेल्या उलाढालीत एक नवीन प्रकारचा रेणू बनला. तो सर्वात मोठा नव्हता की सर्वात क्लिष्टही नव्हता. पण त्यात एक विशेष गुण होता. तो म्हणजे स्वत:च्या प्रती निर्माण करण्याचा. या गुणामुळे त्याला आपण स्वजनक म्हणू. स्वजननात खरे तर तितके आश्चर्यकारक काही नाही. अगदी साध्या पद्धतीचे स्वजनन आपण मिठासारख्या साध्यासुध्या पदार्थातही पाहातो. संपृक्त द्रावणाला उष्णता दिली की कुठच्यातरी एका कणाभोवती सोडियम आणि क्लोराइडचे आयन गोळा होतात आणि मिठाचा स्फटिक मोठा होतो. त्या एकाच रेणूच्या प्रती असतात. एकत्र चिकटलेल्या असतात इतकंच. आता तुम्ही म्हणाल की असलेलाच मीठ पुन्हा बनते व विरघळत. नवीन मीठ होत नाही. पण सजीव सृष्टीचे एरवी काय होते? असलेलेच जीव पुन्हा मातीत मिळून पुन्हा त्या मातीतून जन्म घेतात. मिठाच्या बाबतीत ही फारच सोपी प्रक्रिया आहे. पण पुनरुत्पादनाची सुरुवात ही अशाच सामान्य पातळीवर झाली. हा स्वजनक रेणू मात्र मिठापेक्षा थोडा क्लिष्ट होता. त्याचा गुणधर्म असा की स्वतःच्या घटक अणूंसारखे अणू आकर्षित करून स्वतःची दुसरी प्रत बनवली की ती नवीन प्रत वेगळी होत असे. या प्रक्रियेला जरी प्रचंड वेळ लागत असेल तरीही दुप्पट, चौपट करत संपूर्ण मोकळे घटक अणू-रेणू 'खाऊन' टाकून संपून जातील. आता जरी उष्णतेने, रासायनिक प्रक्रियांनी यातले काही मोडले आणि घटक रेणू मोकळे झाले, तरी इतर स्वजनक त्यांना वापरून नवीन स्वजनक तयार करतील. या स्वजननामुळे एक नवीन प्रकारचे स्थैर्य निर्माण झाले. म्हणजे एक विशिष्ट वस्तु केव्हाही निसर्गाच्या माऱ्याने मोडू शकते, पण तिच्या प्रतिकृतींमधून तो गट शिल्लक राहातो. यातच 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट'चे - 'सर्वात लायक तग धरतात' या तत्त्वाचे मूळ आहे. एक विशिष्ट प्राणी काही वर्षच जगेल, पण ती प्रजाती टिकून राहाते. स्वजनक तयार झाला, मान्य. पण त्यापासून पेशी कशी तयार होईल? त्यासाठी पुनरुत्पादनाच्या एका महत्त्वाच्या अंगाचा विचार करावा लागतो. ते म्हणजे प्रतिकृती काढताना अनेक वेगवेगळ्या कारणाने काही चुका किंवा बदल घडतात. कुठचीच प्रतिकृती काढण्याची प्रक्रिया १००% अचूक नसते. म्हणजे समजा आपला स्वजनक अ-ब-क अशा तीन प्रकारच्या रेणूसंचांनी बनलेला असेल, तर कधीकधी त्याची प्रतिकृती अ-ब-ड बनू शकेल. (अ, ब, क, ड हे उदाहरणासाठी घेतलेले आहेत. ते कदाचित कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन वगैरे मुबलक अणूंचे बनलेले वेगवेगळे रेणू असू शकतात) आता नवीन, चुकून झालेला रेणू एकतर स्वजनक असेल किंवा नसेल. तो जर स्वजनक नसला तर प्रश्नच मिटतो. काळाच्या उदरात तो कधीतरी गडप होतो, त्याच्यासारखे इतर तयार होत नाहीत. पण तो जर स्वजनक असेल तर तो आपल्या प्रतिकृती बनवू लागेल. म्हणजे आता अ-ब-क आणि अ-ब-ड तयार होत राहात आहेत. मूलभूत अणूरेणूंसाठी आता त्यांच्यात स्पर्धा सुरू आहे. जर काही कारणाने अ-ब-ड तयार व्हायला सोपा किंवा अधिक काळ टिकून राहाणारा असेल, तर त्या विश्वात त्या अ-ब-ड ची संख्या हळूहळू वाढत जाईल आणि अ-ब-क ची संख्या तुलनेने कमी होत जाईल. एकवेळ अशी येईल की अ-ब-क ची संख्या इतकी कमी होईल, की सगळे अ आणि ब रेणूगट अ-ब-ड मध्येच अडकलेले राहातील. त्यानंतर अ-ब-क नष्ट होऊन जातील, आणि केवळ अ-ब-ड शिल्लक राहातील. या कडे बघताना आपल्याला अ-ब-क आणि अ-ब-ड मध्ये असलेली स्पर्धा म्हणून पाहाता येते. मात्र या दोन्ही रेणूंना ती 'जाणीव' नाही. ते काही अ रेणूगट आपल्यावर येऊन चिकटावा म्हणून युद्ध करत नाहीत. कारण त्यांना तशी इच्छाच नाही. कदाचित अ-ब-ड रेणूत त्यांना आकर्षित करण्याची शक्ती काही रासायनिक कारणांमुळे जास्त असेल. कशामुळे का होईना, त्या लोकसंख्येकडे आपण काळानुरुप बघत गेलो तर अ-ब-क घटताना आणि अ-ब-ड वाढताना दिसतील. ही स्पर्धा आपोआप घडते, आणि त्यात अ-ब-ड विजयी ठरतो. त्या रेणूत असे काही गुणधर्म आहेत ज्यांमुळे टिकून राहाण्यात, स्वतःच्या प्रतिकृती निर्माण करण्यात तो अधिक लायक अधिक सरस आहे. तो टिकतो, आणि हाच 'जिंकण्या'चा निकष आहे. प्रत्येक रेणूचे काही रासायनिक गुणधर्म असतात. अनेक रेणू असे असतात की ज्यांमुळे आसपासच्या विशिष्ट रसायनांच्या अभिक्रिया वेगाने होऊन त्यांची जोडणी होते. आणि नवीन रसायन तयार होते. आता पुन्हा आपण काल्पनिक अ-ब-ड आणि नवीन अ-ब-ई प्रकारचे रेणू पाहू. समजा अ-ब-ईचा गुणधर्म असा आहे की त्यामुळे एक नवीन रसायन तयार होते. आणि या रसायनामुळे अ-ब आणि ड मधला बंध मोडून पडतो, पण अ-ब आणि ई मधला बंध तुटत नाही (किंवा अगदी कमी प्रमाणात तुटतो). आता अ-ब-ई काही इच्छा करत नाही, की आपण अ-ब-ड ला तोडू आणि त्यातले अ-ब खाऊन टाकू. पण त्याच्या अस्तित्वामुळे, रासायनिक गुणधर्मामुळे हेच घडते. एका अर्थाने हा पहिलावहिला भक्षक रेणू म्हणता येईल. असा रेणू तयार झाला तर लवकरच त्या भागातले अ-ब-ड संपून जातील आणि फक्त अ-ब-ई शिल्लक राहील. यापुढच्याही पायरीची कल्पना करता येते. म्हणजे अ-ब-फ आणि अ-ब-ग हे एकमेकांना 'खाणारे' रेणू आहेत. मात्र अ-ब-ग मध्ये असे काही रासायनिक गुणधर्म आहेत की त्यामुळे इतर काही प्रतिरोधक रेणू त्याच्या आसपास जमतात. म्हणजे एक प्रकारचे कवच तयार होते. आता अशा कवचामुळे अ-ब-फने टाकलेले 'विष' कमी परिणामकारक होईल. आणि कवच नसलेले रेणू नष्ट होतील. आता जे नवीन तयार होतील ते टिकायचे तर कवच निर्माण करणारे हवे. आणि यापुढे जी स्पर्धा होईल ती कवच 'सुधारण्याची' स्पर्धा होईल. अशा कवचात बंद असलेला स्वजनक म्हणजे पहिल्या पेशी. आता हे पहिलेवहिले स्वजनक कुठे आहेत? माहीत नाही. या कवचांबरोबरच स्वजनकांतही स्पर्धा चालूच होती. सध्याचे स्वजनक पेशीच्या आत, केंद्रकात राहातात. अजूनही ते आपल्या आसपासच्या पदार्थांच्या रासायनिक अभिक्रिया नियंत्रित करून वेगवेगळ्या पदार्थांचे उत्पादन करतात. आता या पेशी म्हणजे विशिष्ट उत्पादने तयार करणाऱ्या फॅक्टरी बनल्या आहेत. इतकंच नाही, तर त्या पेशींचे समूह होऊन अवयव बनतात, अवयवांपासून प्राणी बनतो. आणि तो प्राणी अन्न मिळवतो, आपल्या पेशी जास्तीत जास्त काळ टिकवतो, लैंगिक पुनरोत्पादन करून त्या स्वजनकांची निर्मिती नवीन पेशींच्या गोळ्यात करतो. तो आपला पोटचा गोळा म्हणून वाढवतो, आणि हे चक्र चालू राहाते. आपल्याही शरीराच्या प्रत्येक पेशीच्या केंद्रात आजचे स्वजनक लपून आहेत. आपले शरीर आणि काही प्रमाणात आपली प्रवृत्ती काय आहे यावर त्यांचे अप्रत्यक्ष नियंत्रण असते. हे स्वजनक म्हणजे आपले डी. एन. ए. (मी मराठी लाइव्हमध्ये पूर्वप्रकाशित)

Book traversal links for विश्वाचे आर्त - भाग ८ - रेणूंपासून पेशींपर्यंत

  • ‹ विश्वाचे आर्त - भाग ७ - 'अ'चेतनापासून 'स'चेतनापर्यंत
  • Up
  • विश्वाचे आर्त - भाग ९ - अनैसर्गिक निवड ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
23590 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

उत्कृष्ट

याॅर्कर
गुरुवार, 12/24/2015 - 20:44 नवीन
येऊ देत अजून
  • Log in or register to post comments

अजून तेच गुर्‍हाळ चालू आहे !

विवेक ठाकूर
गुरुवार, 12/24/2015 - 22:18 नवीन
पण या सर्व कोट्यावधी वर्षे चाललेल्या उलाढालीत एक नवीन प्रकारचा रेणू बनला. तो सर्वात मोठा नव्हता की सर्वात क्लिष्टही नव्हता. पण त्यात एक विशेष गुण होता. तो म्हणजे स्वत:च्या प्रती निर्माण करण्याचा. तोच कसा बनला ते सांगा ! आता गाडी निदान लाईनवर तरी आहे. मागच्या लेखात तर बिनधास्तपणे `रूपांतरणाला' `पुनरूत्पादन' म्हणून ठोकत होतात आणि काही जण `सगळं समजल्यासारखे' माना डोलवत होते !
  • Log in or register to post comments

मागच्या लेखातली ठोकाठोकी पाहा

विवेक ठाकूर
गुरुवार, 12/24/2015 - 22:26 नवीन
एकदा पुनरुत्पादनावर लक्ष केंद्रित केले की मग आपल्याला अचेतन आणि सचेतन यांच्यातली दरी नाहीशी करता येते. कारण या प्रकारचे 'पुनरुत्पादन' अगदी सोप्या स्वरूपात आपल्याला निर्जीवांमध्येही दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

काही जण `सगळं समजल्यासारखे'

संदीप डांगे
गुरुवार, 12/24/2015 - 22:35 नवीन
काही जण `सगळं समजल्यासारखे' माना डोलवत होते त्यांनी 'दृष्टीकोनात बदल' केला असेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

>> त्यांनी 'दृष्टीकोनात बदल'

सतिश गावडे
गुरुवार, 12/24/2015 - 22:40 नवीन
>> त्यांनी 'दृष्टीकोनात बदल' केला असेल... हा बाण कुठे मारलात म्हणायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

लेख आवडला.

प्रचेतस
गुरुवार, 12/24/2015 - 22:22 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

या लेखमालेतील आतापर्यंतचा

सतिश गावडे
गुरुवार, 12/24/2015 - 22:30 नवीन
या लेखमालेतील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ठ लेख. काहिसा ललित अंगाने लिहिला आहे असं वाटतं तरी लेखाने आपली "लाईन" सोडलेली नाही. :)
  • Log in or register to post comments

या लेखमालेतील आतापर्यंतचा

सोत्रि
Fri, 12/25/2015 - 05:17 नवीन
या लेखमालेतील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ठ लेख.
१०००% सहमत! - (स्वजनक) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

आता शब्दाचे बुडबुडे कोण उधळतंय ते पाहा !

विवेक ठाकूर
गुरुवार, 12/24/2015 - 23:17 नवीन
आधी या तुमच्या `स्वजनकाला' तुम्ही `सामायिक पूर्वज' म्हटलं होतं : तो कोंबडी आणि अंड्याचाच पूर्वज नसून सर्व सजीवसृष्टीचा पूर्वज आहे. त्याला कोंबडी-अंडं यांसारखं मर्यादित नाव देऊन कसं चालेल? म्हणून त्याला 'सामायिक पूर्वज' असं नाव दिलेलं आहे. शिवाय पुनरूत्पादनासाठी नुसता `स्वजनक' असून कसं चालेल ? `स्वजननी' नको का? कारण पुनरूत्पादन म्हणजे रूपांतरण किंवा पेशीविभाजन नव्हे इतका किमान लाईट तरी या लेखात पेटलेला दिसतोयं. आणि मग बॅक टू स्क्वेअर वन ! या स्वजनकाला (किंवा स्वजननीला) तुम्ही अंडं म्हणणार की कोंबडी ?
  • Log in or register to post comments

पुनरूत्पादनासाठी नुसता

राजेश घासकडवी
Fri, 12/25/2015 - 04:15 नवीन
पुनरूत्पादनासाठी नुसता `स्वजनक' असून कसं चालेल ? `स्वजननी' नको का?
लैंगिक पुनरुत्पादन हा प्रकार तसा नवा आहे. काही अब्ज वर्षं तरी पुनरुत्पादन अलैंगिक पद्धतीनेच होत होतं. अजूनही अनेक प्रजातींमध्ये अलैंगिक पुनरुत्पादन दिसून येतं. अनेक झाडं अलैंगिक पुनरुत्पादन करतात. अनेक प्रजाती लैंगिक आणि अलैंगिक पुनरुत्पादन करू शकतात. यीस्टच्या काही प्रजातींमध्ये लैंगिक पुनरुत्पादन होणार की अलैंगिक हे दोन जीन्सद्वारा ठरतं. तेव्हा पुनरुत्पादनासाठी जनक आणि जननीची गरज नसते. https://en.wikipedia.org/wiki/Asexual_reproduction http://education.seattlepi.com/five-examples-organisms-use-asexual-reproduction-5849.html http://www.biology-pages.info/A/AsexualReproduction.html
  • Log in or register to post comments

आता निदान स्वतःचं हे वाक्य तरी लक्षात ठेवा !

विवेक ठाकूर
Fri, 12/25/2015 - 12:04 नवीन
तेव्हा पुनरुत्पादनासाठी जनक आणि जननीची गरज नसते. इतक्या भन्नाट थिअरी नंतर आता लैंगिक पुनरुत्पादनासाठी काय शक्कल लढवतायं हे बघणं मजेचं ठरेल. का तिथे पुन्हा `सार्वजनिक स्वजननी' वगैरे नवा सिद्धांत आणणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

अमिबाचं रिप्रोडक्शन हा शाळेत

अनुप ढेरे
Fri, 12/25/2015 - 12:55 नवीन
अमिबाचं रिप्रोडक्शन हा शाळेत शिकवला जाणारा विषय आहे. तिथेही मादीची गरज नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

नीट वाचत जा

विवेक ठाकूर
Fri, 12/25/2015 - 15:53 नवीन
लैंगिक पुनरुत्पादनासाठी काय शक्कल लढवतायं हे बघणं मजेचं ठरेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

हा ही भाग आवडला.

अर्धवटराव
Fri, 12/25/2015 - 04:20 नवीन
शरीररचनेचा अ‍ॅडम-इव्ह शोधणारा हा प्रवास फार रोचक आहे. हे सगळं अभ्यासायला काय टेक्नीक वापरतात हे जाणुन घ्यायची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

तंत्रं खूप वेगवेगळी वापरली

राजेश घासकडवी
Fri, 12/25/2015 - 05:38 नवीन
तंत्रं खूप वेगवेगळी वापरली जातात. वॉटसन आणि क्रीक यांनी एक्सरे क्रिस्टलॉग्राफी वापरून डीएनएची रचना शोधून काढली. त्याआधी डीएनएमध्ये काय घटक रेणू असतात हे शोधण्यासाठी बहुधा वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक तंत्रं वापरली गेली असावीत. पण एकदा चार वेगवेगळी न्यूक्लिओटाइड्स असतात हे कळल्यावर त्यात नेहमी अॅडेनाइन आणि थायमाइनचं प्रमाण सारखंच असतं हे लक्षात आलं. त्यामुळे ते एकमेकांबरोबर जोडीने येत असावे असा अंदाज आला. त्याआधी जेव्हा डीएनए म्हणजे काय हे माहिती नव्हतं, तेव्हा फक्त न्यूक्लेइक अॅसिड वेगळं काढण्यात यश मिळवलं होतं. एका शास्त्रज्ञाने एका रोग निर्माण करणाऱ्या जातीच्या बॅक्टेरियातलं हे न्यूक्लेइक अॅसिड दुसऱ्या रोग निर्माण न करणाऱ्या बॅक्टेरियात घातले. आता ही जातही रोग निर्माण करू लागली. इतकंच नाही, तर हे गुणधर्म त्यांच्या संततीत गेले. यावरून पुढच्या पिढीत गुणधर्म पोचवण्याचं काम डीएनए करतो हे कळलं. त्याहीआधी, मेंडेलने जे प्रयोग केले होते त्यातून गुणधर्म पाठवणारं माध्यम तुकड्यातुकड्यांत गुणधर्म साठवून ठेवतं (अॅनालॉग नाही, डिजिटल) हे शोधून काढलं होतं. पांढरी फुलं आणि हिरवी फुलं यांचा संकर केला तर हलक्या हिरव्या रंगाची फुलं होत नाहीत तर काही पांढरी आणि काही हिरवी तयार होतात. तो गुणधर्मही या न्यूक्लेइक अॅसिडमध्येच असला पाहिजे. वॉटसन क्रीक यांनी डीएने स्ट्रक्चर शोधले तेव्हाच साधारण प्रगो यांनी उल्लेख केलेला मिलर एक्स्परिमेंट झाला (१९५२). पाणी, कार्बनडायॉक्साइड, हायड्रोजन, मिथेन, हायड्रोजन सल्फाइड, अमोनिया वगैरे साध्या घटकांपासून शरीरात सापडणाऱ्या अनेक प्रथिनांचे घटक रेणू - अमिनो अॅसिड्स तयार होतात हे त्यातून दिसून आलं. म्हणजे रेणूंची क्लिष्टता वाढते हे दिसून आलं. जसजसा डीएनएचा अभ्यास चालू झाला तसतसं डीएनएच्या रेणूंची साखळी 'वाचून' प्रथिनं तयार होतात हे लक्षात आलं. मग हे डीएनएचं कोड काय आहे हे समजावून घेण्यासाठी तीनतीन लांबीची वेगवेगळे तुकडे घेऊन त्यावर डीएने वाचून प्रथिनं तयार करणारे रेणू सोडले. त्यावरून तीन वेगवेगळ्या न्यूक्लिओटाइड्सच्या अक्षरांपासून कुठचं अमिनो अॅसिड तयार होतं हे शोधता आलं. ही फक्त थोडीफार आणि विस्कळित माहिती आहे. कारण जेनेटिक्स या विषयात मिळालेलं ज्ञान प्रचंड आहे. आणि ते शोधण्यासाठी गेली शंभर दीडशे वर्षांत हजारो शास्त्रज्ञांनी आपापलं योगदान दिलेलं आहे. सध्याच्या लेखांमध्ये नुसत्याच संकल्पना सांगण्याचं काम चालू आहे. ते काही काळ चालू राहील. पण नंतरच्या लेखांमध्ये या संशोधनाचा इतिहास आणि त्यातली तंत्रं यांवरही लिखाण करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

धन्यवाद गुर्जी

अर्धवटराव
Fri, 12/25/2015 - 10:30 नवीन
लिखाण कराच. नुसता ओव्हरव्यु वाचुन छाती दडपुन गेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

थोड़े अवांतर

कवितानागेश
Fri, 01/01/2016 - 06:40 नवीन
२ वेळा वॅटसन आणि क्रीक चा उल्लेख आलाय ... पण वास्तविक क्रिस्टालोग्राफी वापरून रोजलिंड फ्रेंकलिन हिनी डी एन ए चे डबल हेलिक्स शोधले होते. वॅटसन नी तिची रीडिंग्स चक्क चोरली होती. स्वतः वॅटसन ला पुढे हे कायम कबूल करावे लागलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

बरोबर. वॉटसन आणि क्रीक यांना

राजेश घासकडवी
Fri, 01/01/2016 - 19:37 नवीन
बरोबर. वॉटसन आणि क्रीक यांना नोबेल मिळालं पण रोजलिंड फ्रॅंकलिनला मिळालं नाही, हा मोठा अन्याय होता. पण या लेखमालेप्रमाणेच या प्रतिसादातही कर्ता-करवता पेक्षा प्रक्रिया सांगण्याकडे भर होता. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

उत्तम लेखमाला.. थँक्स..पुढील

गवि
Fri, 12/25/2015 - 07:11 नवीन
उत्तम लेखमाला.. थँक्स..पुढील भाग लवकर येऊदेत.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

अरुण मनोहर
Fri, 12/25/2015 - 15:37 नवीन
राजेशजींचे अभिनदन. खूप अभ्यासपूर्ण लेखमाला वाचायला मिळाली. जरी ह्यातील बरेच काही वेगवेगळ्या लेखात आधी वाचले असले, तरी अशी सलग आणि विषय गुंफलेली मालिका वाचायला आनंद वाटला. राजेशनी विज्ञानयुक्त दृष्टीकोन कायम ठेवून, आणि मुख्यत्वे उत्क्रांतीवादाच्या धाग्यातून सगळे स्पष्टीकरण दिले आहे. ह्यात अर्थात "कोणी एक करता करविता आहे" असल्या विचारांना थारा नसतो. सगळी उत्क्रांती केवळ रेणू , पेशी ह्यांच्या रसायन शास्त्राने सांगितली की हाडामासांची उत्क्रांती कळते. सजीव अजीव ह्यात एक सलग उत्क्रांतीरेषा आहे, काळे पांढरे बॉक्सेस नव्हे हे केवळ हार्डवेअरच्या द्वारे सांगितले. पण सजीवांची कल्पना केवळ हाडामासांनी आणि पुनरुत्पादानाने पुर्ण होत नाही. सजीवांना मुख्यत: मानवाला हाडामासांखेरीज आणखी महत्वाची देणगी आहे. "दैवी देणगी" म्हणण्याचे मुद्दाम टाळीत आहे. सजीवांच्या भावना, मानवाची इच्छा शक्ती, कल्पनाशक्ती, महत्वाकांक्षा वगैरे सोफ़्ट्वेअरला कसे समजावणार? मन हे काय असते, केवळ मेंदूमध्ये न्युरोन्सची धावपळ की आणखी काही? हा सगळा पट उकलायाचा प्रयत्न केला की कुठेतरी विज्ञानाच्या मर्यादा जाणवतात. मग भले तुम्ही ओढून ताणून काहीतरी अणु रेणूचा खेळ म्हणून सारवासारव कराल. पण मन नावाची जी शक्ती आहे, तीच परमेश्वर असावी, व तिनेच सगळे जग जाणीव पूर्णक तयार केले असावे, केवळ अणु रेणूचा खेळ नव्हे..... बघा, काही पटते आहे का. शेवटी हा वाद आस्तिक नास्तिक किवा विज्ञान-अध्यात्म हा वाद कधीच न संपणारा आहे. असो.
  • Log in or register to post comments

मन हे काय असते, केवळ

राजेश घासकडवी
Fri, 12/25/2015 - 20:40 नवीन
मन हे काय असते, केवळ मेंदूमध्ये न्युरोन्सची धावपळ की आणखी काही?
'केवळ न्यूरॉन्सची धावपळ' या शब्दांमुळे त्यामागे असलेली रचनेकडे दुर्लक्ष होतं. हे म्हणजे 'ताजमहाल म्हणजे केवळ दगडावर दगड' असं म्हणण्यासारखं आहे. मन हे मेंदूतच आहे याबद्दल अनेक पुरावे देता येतात. - आपली मनस्थिती रसायनांच्या सहाय्याने बदलता येते. - मेंदूच्या विशिष्ट भागांना इजा झालेली असेल तर भाषा, विचारक्षमता, आठवणी, प्रवृत्ती बदलतात - आपल्या मनात विशिष्ट भावना/विचार येत असताना विशिष्ट भागातले न्यूरॉन्स अधिक प्रमाणात धावपळ करताना प्रत्यक्ष दिसतात - मेंदूसारख्या न्यूरल नेटवर्क्सना अनेक गोष्टी शिकवता येतात. स्वतः आपोआप शिकणारी न्यूरल नेटवर्क्सदेखील असतात मन हे मेंदूबाहेरचं काहीतरी नसण्यासाठीचा युक्तिवाद - मनाचा भौतिक जगावर कसा परिणाम होतो हे दाखवणारा एकही प्रयोग नाही. - मनाचा मनांशी व्यक्तींच्या माध्यमापलिकडे संपर्क होतो हेही प्रयोगांत सिद्ध झालेलं नाही - उदाहरणार्थ इएसपी. मेंदू उत्क्रांत झाला तसंच मनही उत्क्रांत झाल्याच्या खुणा - एकपेशीय प्राण्यांमध्ये मेंदू नसतो त्यामुळे भावभावना, विचार नसतात - आपल्याला दिसणारे सस्तन प्राणी चढत्या क्रमाने मन असल्याच्या, भावना असल्याच्या खुणा दाखवतात. नुकताच कुठेतरी जादूचा प्रयोग दाखवल्यावर खदाखदा हसणाऱ्या माकडाचा व्हिडियो बघितला. कुत्रे, गायीबैल माणसांवर व इतर प्राण्यांवर जीव लावतात, हत्ती आपल्यातलं कोणी गेलं की दुःख करतात हेही दिसलेलं आहे. पण त्यांच्या मनातले विचार, भाषा या मनुष्याइतक्या प्रगल्भ नसतात. इतकं सगळं असतानाही मन ही काहीतरी भौतिक बदल घडवून आणणारी शक्ती आहे हे मला स्वतःला पटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

रेणू आणि पेशी जशा उत्क्रांत

अरुण मनोहर
Fri, 12/25/2015 - 21:26 नवीन
रेणू आणि पेशी जशा उत्क्रांत झाल्या , त्याचप्रमाणे न्युरोंस देखील तयार झाले, व त्यांच्या हालचालीतून आणि विशिष्ट केंद्रे जागवण्यातुन भावना, दूर दृष्टी, महत्वाकांक्षा , इत्यादी तयार झाले, असे म्हणायचे आहे का तुम्हाला? मला वाटते तुमच्या प्रतिसादात माझा मुळ मुद्दा बाजूला पडला, किंवा मलाच तो नीट समजावता आला नसावा. पेशींचे हार्डवेअर समजले. पण मन, भावना ही काय चीज आहे, व ती कशी आली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

थोडे अजून

अरुण मनोहर
Sat, 12/26/2015 - 05:34 नवीन
'केवळ न्यूरॉन्सची धावपळ' या शब्दांमुळे त्यामागे असलेली रचनेकडे दुर्लक्ष होतं. हे म्हणजे 'ताजमहाल म्हणजे केवळ दगडावर दगड' असं म्हणण्यासारखं आहे.
धन्यवाद! अगदी असेच मला म्हणायचे आहे. सजीव, विशेषत: मानव म्हणजे केवळ पेशींचा गोळा नाहे, तर एक अत्यंत सुंदर रचना आहे. कारण त्या गोळ्याला भावना ही देणगी मिळालेली आहे. स्वत:चे असे काही निर्माण करायची शक्ती, त्या निर्माणमधॊन आनंद घेण्याची क्षमता, आणि कितीतरी अधिक! ताजमहाल जसा केवळ दगडावर दगड नाही, तसेच मानव देखील! एकमेकांभोवती जमून क्लिष्ट रचना तयार झाली असेल ही theory थोडा वेळ मानली, तरी पेशिंच्या गोळ्याला अशी विलक्षण अनुभूती कशी आली? आणि अनुभूती म्हणजे तरी नक्की काय? एखादा सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहून जे वाटते, किंवा एखाद्याचे दु:ख पाहून जी करुणा निर्माण होते ती काय? आणि ते दु:ख दूर करण्यासाठी जी तळमळ निर्माण होते त्याचे काय? ती तळमळ फक्त काही लोकांनाच का होते? ईश्वरभक्तीचा त्यात काय सहभाग असतो? हे सगळे गारुड केवळ रसायन शास्त्राच्या नियमांचे परिणाम असे म्हणुन टाळता येते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

हे सगळे गारुड केवळ रसायन

संदीप डांगे
Sat, 12/26/2015 - 11:15 नवीन
हे सगळे गारुड केवळ रसायन शास्त्राच्या नियमांचे परिणाम असे म्हणुन टाळता येते? जीवशास्त्रिय व रसायनशास्त्रिय पद्धतीने बघितले तर ते सहज टाळता येते. वरील प्रश्नांमधले 'असे का होते' चे उत्तर फार लांब व क्लिष्ट आहे. पण 'कळप धरून असणे, स्वतःचा वंश सांभाळणे/वाढवणे, जीव वाचवणे" ह्या मूळ भावना/गरजा यांतून आलेल्या परिस्थिती आहेत. ह्या जीव-रासायनिकच आहेत. त्यामुळे करुणा, दु़:ख, आनंद वैगेरे सामाजिक जडणघडण, व्यक्तिवर झालेले संस्कार इत्यादींचे जैव-रासायनिक प्रकटीकरण असू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

हे सगळे गारुड केवळ रसायन

राजेश घासकडवी
Sat, 12/26/2015 - 21:36 नवीन
हे सगळे गारुड केवळ रसायन शास्त्राच्या नियमांचे परिणाम असे म्हणुन टाळता येते?
इथे पुन्हा हा 'केवळ' शब्द आला. त्यातून असं सूचित होतं की केवळ दगडावर दगड ठेवून ताजमहाल तयार होत नाही. म्हणजे थोडंसं असं वाटतं की 'हो, दगडांच्या सहाय्याने बांधकाम होऊ शकतं. ते दगड नीट जोडले तर घरं वगैरे तयार करता येतात, ती सुरक्षित असतात, पण सौंदर्य केवळ दगडांनी कसं सांगता येईल?' भावना विशिष्ट रसायनांमुळे बदलतात. ड्रग्ज घेतल्यावर किंवा दारू प्यायल्यावर माणसाचं व्यक्तिमत्व बदलतं. इतकंच का, पुरेशी भूक लागलेली असली तरीसुद्धा भावना बदलतात. त्यामुळे 'केवळ' रासायनिक परिणाम असं त्यांना म्हणता येत नाही, ते खरे आहेत. किंबहुना या रासायनिक-भौतिक रचनेतून इतकं सुंदर मन कसं तयार होतं हे शोधून काढणं महत्त्वाचा प्रश्न आहे. या विषयावर संशोधन चालू आहे. अनेक क्लू हाती लागलेले आहेत. मेंदूचे कुठचे भाग भाषा, दृष्टी, प्लॅनिंग, इत्यादी हायर लेव्हल फंक्शनसाठी वापरले जातात याचं मॅपिंग झालेलं आहे. करुणा किंवा एकंदरीत निःस्वार्थीपणा आणि परोपकार हे उत्क्रांतीतून कसे निवडले जातात हेही उघड झालेलं आहे. कॉंप्युटर सिस्टिम्समध्ये माणूस करतो त्या अनेक गोष्टी करू शकण्याची क्षमता आहे. एके काळी 'हो, कॉंप्युटर साधे खेळ शिकू शकतो वगैरे ठीक आहे, पण तो ग्रॅंडमास्टरला हरवेल इतकं चांगलं बुद्धीबळ खेळू शकेल का?' असा प्रश्न तावातावाने विचारला जायचा. आता ते होऊनही दशक उलटून गेलेलं आहे. आपल्या फोनवरची सॉफ्टवेअर्स चेहरे ओळखू शकतात, चेहऱ्यावर हास्य आहे की नाही हे ओळखू शकतात, बोललेलं ओळखून टाइप करू शकतात. ज्यांवर आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचं संशोधन चालू आहे असे कॉंप्युटर प्रोग्राम्स तर याहून कितीतरी पुढे गेलेले आहेत. असो. थोडक्यात मी जी आधीच्या प्रतिसादांत कारणं दिलेली आहेत त्यावरून मन कसं होतं हे कळलेलं नसलं तरीही ते मेंदूमधल्या क्रियांनीच तयार होतं हे पटावं. मेंदू जर उत्क्रांत झाला आहे तर त्याबरोबरच मनही उत्क्रांत झालं असणार हेही पटावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

प्रतिसाद आवडला आणि पटला.

अरुण मनोहर
Sun, 12/27/2015 - 07:03 नवीन
प्रतिसाद आवडला आणि पटला. मन देखील रासायनिक क्रियांनी चालते हे आहेच. आज जरी विज्ञानाला त्यातील संपूर्ण ज्ञान नसले तरी, पुढे कधीतरी ही दरी बुजविली जाईल. थोडे विषयांतर आहे, पण तसा जोडलेला विषय वाटला म्हणुन लिहितो, - मनाविषयी आज जे विज्ञानाला माहीत नाही, त्यापेक्षा कितीतरी अधिक ज्ञान अध्यात्मात आहे. अध्यात्म म्हटले की (काही) बुद्धीवादी नाके मुरडतात. पूर्वी जेव्हा रसायन शास्त्र देखील नव्हते, तेव्हा रसायनांचे प्रयोग करणाऱ्याना हिणविले जायचे. जादूटोना अशी भलावण व्हायची. आज (काहीना) पुरेसे ज्ञान नसल्याने अध्यात्म हा असाच (त्यांच्यासाठी) थट्टेचा विषय असेल. काही सिद्ध करण्याच्या विज्ञानात काही अपेक्षित पद्धती आहेत. थिअरी आणि प्रयोग असे दोन्ही आवश्यक आहेत. आणि प्रयोग देखील repeatable हवेत. ही पद्धत अध्यात्म वापरत नाही, त्याची वेगळी पद्धत आहे. आमचीच पद्धत तुम्ही देखील वापरा असा हट्ट विज्ञानाने का धरावा? मन ही (रासायनिक) शक्ती आहे असे मान्य केले तर त्या शक्तीला नियंत्रित करून तिच्याकडून काही चांगली कामे करून घेता आली तर जगाचे भलेच होणार आहे. अध्यात्म विविध प्रकारांनी तेच करायचा प्रयत्न करीत असते. "मनावर मनाने नियंत्रण" - असेही त्याला नाव देता येईल. फक्त विज्ञान ह्या शाखेला मान्य अशा पद्धती ज्ञानाच्या ह्या दुसऱ्या शाखेकडे नाही म्हणुन ती कमी ठरत नाही. किंवा ती शाखा परमेश्वर ह्या अगम्य कल्पनेविषयी बोलते म्हणुन तिचे योगदान ज्ञान साधनेच्या मार्गात उपयोगाचे नाही, असे होत नाही. अंधश्रद्ध वगैरे ठप्पे मारून ते निकालात देखील काढता येत नाही. राजेशजी, गैरसमज करून घेऊ नका, मी हे तुम्हाला उद्देशून नव्हे, तर जे कडवे विज्ञाननिष्ठ, "ज्ञाना"च्या इतर शाखांची टिंगल करतात त्यांच्यासाठी लिहीले आहे. तुमचा लेख पुर्ण विश्वाचे आर्त शोधण्याच्या प्रयत्नांचा आढावा घेणारा होता. त्याचा आवाका फार मोठा आहे. त्यात एका महत्वाच्या वैश्विक प्रक्रियेचा आणि तिच्या उत्क्रांतीचा उल्लेख नव्हता म्हणुन देखील लिहावेसे वाटले. हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. विषयांतर केल्यासाठी क्षमस्व !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

रिचर्ड डॉकिन्स आणि दीपक चोप्रा, सतीश कुमार

आरोह
Sun, 12/27/2015 - 08:00 नवीन
ह्या विषयावर दोन debates पाहण्यात आल्या https://youtu.be/f4c_CrQzUGw https://youtu.be/19Sqt-zqmrk
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

धन्यवाद आरोह.

अरुण मनोहर
Sun, 12/27/2015 - 12:03 नवीन
धन्यवाद आरोह. दुसरा विडीयो पहिला. अत्यंत सुंदर विवेचन. असेच काहीसे म्हणायचे होते. पण मी तत्वज्ञानी नसल्याने आणि सामान्य असल्याने माझ्या मनात फक्त फझी कल्पना होत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरोह

अणु रेणु च्या खेळात

आरोह
Fri, 12/25/2015 - 19:09 नवीन
अहो पण ह्यांच्या ह्या अणु रेणु च्या खेळत आमच्या मेंदूतील नूरॉन्स ची फार धावपळ होते हो.
  • Log in or register to post comments

सुंदर लेखमाला.. येत राहू

अत्रुप्त आत्मा
Fri, 12/25/2015 - 20:07 नवीन
सुंदर लेखमाला.. येत राहू द्या पुढचे लेख समांतर:- मनोरुग्ण आणि मती मंद व्यक्तींना दुर्लक्षित करून लिहित रहा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

राजेश घासकडवी
Fri, 12/25/2015 - 21:04 नवीन
धन्यवाद.
मनोरुग्ण आणि मती मंद व्यक्तींना दुर्लक्षित करून लिहित रहा.
या बाबतीत मी गांधीजींचं धोरण अवलंबतो आहे. त्यांना शिव्यांची लाखोली वाहाणारं पत्र कोणीतरी पाठवलं. त्यातली उपयुक्त टाचणी तेवढी त्यांनी काढून घेतली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

+१. गुड. वाचतोय. पुभाप्र.

एस
Fri, 12/25/2015 - 21:17 नवीन
+१. गुड. वाचतोय. पुभाप्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

+१

अजया
Mon, 01/04/2016 - 11:53 नवीन
हा लेख आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

+२

तुषार काळभोर
Mon, 01/04/2016 - 11:58 नवीन
हे पटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

रिचर्ड डॉकिन्स आणि दीपक चोप्रा, सतीश कुमार

आरोह
Sun, 12/27/2015 - 08:01 नवीन
ह्या विषयावर दोन debates पाहण्यात आल्या https://youtu.be/f4c_CrQzUGw https://youtu.be/19Sqt-zqmrk
  • Log in or register to post comments

छान. मागील भाग व हा भाग अतिशय

sagarpdy
Sun, 12/27/2015 - 14:36 नवीन
छान. मागील भाग व हा भाग अतिशय कनेक्टेड आहेत. "काही लोकांना" जास्त प्रतिसाद युद्ध खेळण्याचा वाव मिळालेला नाही यातच सगळं आलं.
  • Log in or register to post comments

प्रतिसादाबद्दल आश्चर्य वाटले.

संदीप डांगे
Sun, 12/27/2015 - 15:50 नवीन
प्रतिसादाबद्दल आश्चर्य वाटले. ही लेखमाला ज्ञान-माहिती प्रसारासाठी नसून प्रतिसाद-युद्ध खेळण्यासाठी लिहिली जाते आहे हे माहित नव्हतं. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

हाहाहा

मितभाषी
Mon, 12/28/2015 - 17:35 नवीन
यनावालांच्या लेखाचे निमित्ताने प्रचंड भांडार खुले झाले आहे. धन्यवाद. लिहीत राहा. समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

लेख आवडला!

नरेंद्र गोळे
Mon, 12/28/2015 - 19:20 नवीन
विज्ञानाची संहिता गोष्टीरूप कथनांनी मराठीत लिहिणे म्हणजेच भाषाविज्ञानास चालना देणे होय. मराठीकरता ही प्रक्रिया प्राय: खुंटलेली आहे. ती तुमच्या ह्या लेखमालेने प्रवाही होईल ह्यात मुळीच संशय नाही.
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Tue, 12/29/2015 - 12:48 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेंद्र गोळे

सुरेख!

साती
Sat, 01/02/2016 - 15:01 नवीन
सुरेख लेख आहे. विवेक ठाकूरांचे प्रश्न सुरुवातीस इरिटेटींग वाटले होते पण आत्ता त्यांनी डोक्याला अधिकच चालना मिळतेय असे वाटतेय. राघा आणि विठा - दोघांनाही धन्यवाद!
  • Log in or register to post comments

विवेक ठाकूरांचे प्रश्न सुरुवातीस इरिटेटींग वाटले होते पण

विवेक ठाकूर
Sat, 01/02/2016 - 21:19 नवीन
आत्ता त्यांनी डोक्याला अधिकच चालना मिळतेय असे वाटतेय. मूळ प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरितच राहाणार आहेत. पहिला प्रश्न : निर्जीवातून सजीव कसा निर्माण झाला ? आणि दुसरा : ज्यात निर्मितीची प्रक्रिया घडते ते शून्य किंवा अवकाश लेखकाला मंजूर नाही तर मूळ निर्जीव कसा निर्माण झाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

दुसरा प्रश्न?

साती
Sat, 01/02/2016 - 23:56 नवीन
दुसरा प्रश्न कळला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

तो तर पहिल्याहूनही महत्त्वाचा आहे!

विवेक ठाकूर
Sun, 01/03/2016 - 07:46 नवीन
लेखमाला फक्त विविध प्रक्रियांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करते. पण कोणतीही प्रक्रिया घडण्यासाठी स्पेस ही पूर्वशर्त आहे. यू कॅनॉट हॅव अ कंटेट विदाउट द कंटेनर. आणि विश्वनिर्मितीत हा कंटेनर निराकार, अत्यंत व्यापक, आणि सार्वभौम आहे. नाही तर सूर्य आणि या असंख्य ग्रहमाला प्रकटणार कशात? पृथ्वी फिरणार कशात? राघांना त्या अवकाशाचा पत्ताच नाही! ते किरकोळ अ‍ॅनॅलिसिस करून प्रायमल कार्यकारण उलगडल्याचा दावा करतायंत, जो दुसरा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

ते किरकोळ अ‍ॅनॅलिसिस करून प्रायमल कार्यकारण उलगडल्याचा दावा

विवेक ठाकूर
Sun, 01/03/2016 - 07:48 नवीन
करतायंत, जो पहिला प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

प्रयत्न!

साती
Sun, 01/03/2016 - 12:53 नवीन
विठा, खरा वैज्ञानिक किंवा वैज्ञानिक दृष्टीकोन असणारा मला पूर्ण सत्य समजले आहे असा दावा करत नाही. माझ्यामते इथे राघाही विश्वाच्या उत्पत्तीची एक बहुमान्य (सर्वमान्य असेलच असे नाही) आपणा सर्वांना समजेल आणि रुचेल अश्या भाषेत मांडायचा प्रयत्न करतायत. माझ्यामते तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर 'अबायोजेनेसिस' या थिअरीच्या आधाराने देण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर पद्धतीने राघांनी केला आहे. आता दुसर्‍या प्रश्नासंबंधी . म्हणजे मूळात स्पेस कशी होती, का होती यासंबंधी. आपल्या लहानपणी एक गाणे होते बघा 'के सुन मेरे बेटे, जहांवालेने इन सबको है बनाया- जादूसे' तर 'जहांवालेने आणि जादूसे बनाया ' या उत्तरापुढे काहिही उत्तर द्यायची गरज पडू नये, नाही का? पण मग त्या विश्वाच्या मांडणीच्या स्पेसपर्यंत तरी जायची गरज काय होती? अगदी पहिल्याच प्रश्नाला की 'ही पृथ्वी आता आहे तशी का दिसते?' या लाच हे उत्तर देवून गप्प रहाता आलं असतं. पण वैज्ञानिक इथेच थांबले नाहीत. ते थांबले असते तर केवळ आपण का आहोत आणि कश्यामुळे आहोत या प्रश्नाच्या शोधात असताना लागलेले शोध लागले नसते. हा कंप्यूटर नसता, हे नेट नसते आणि तुम्ही माझ्याशी इतक्या लांबून संवाद साधू शकला नसता. आता याहून वेगळे आणि अधिक वैज्ञानिक/ज्ञानिक असे उत्तर तुमच्याकडे आहे असे तुमच्या एकंदर या मालिकेवरच्या प्रतिसादांतून दिसते. तर राघांच्या ज्ञाना/अज्ञानाची केवळ प्रश्न विचारून परीक्षा पाहण्यापेक्षा आपल्याला असलेले ज्ञान आम्हालाही इथे प्रदान करावे ही आपणांस विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

तुमच्या विचारांची दिशा योग्य आहे म्हणून उत्तर देतो

विवेक ठाकूर
Sun, 01/03/2016 - 16:48 नवीन
पहिली गोष्ट, आध्यात्म विज्ञान विरोधी नाही. विज्ञान रोजचं जगणं अनेकानेक प्रकारे आणि निर्विवादपणे सुलभ करत आलं आहे. तस्मात,विज्ञानाची थोरवी कमी नाही. आक्षेप दोन गोष्टींना आहे : एक, राघा अवकाश नाकारतात कारण शून्यातून निर्मिती शक्य नाही असा त्यांचा दावा आहे आणि तो उघडपणे सदोष आहे कारण आकाश सार्वभौम आहे. सर्व उत्पत्ती, स्थिती आणि लय त्यातच आहे. आकाश किंवा स्पेस नाकारल्यानं त्यांचा सर्व प्रयत्न प्रोसेसच्या (किंवा कार्यकारणाच्या) उलगड्यावर बेतलेला आहे आणि त्यातून ते दुसरी मोठी चूक करतात ती म्हणजे `कार्यकारण अवकाशाचा उलगडा करेल असा फोल युक्तिवाद मांडतात. स्पेस ही कार्यकारणासाठी पूर्व-शर्त आहे, कारण स्पेसशिवाय निर्मिती असंभव आहे. शिवाय स्पेस हाच निर्मितीचा स्त्रोत आहे त्यामुळे स्पेसचा वेध घेतल्याविना केवळ कार्यकारणाची चर्चा निष्फळ आहे. दुसरी गोष्ट : उत्क्रांती म्हणजे केवळ रूपांतरण नाही, तस्मात पुनरूत्पादनाचं रहस्य उलगडल्याशिवाय उत्क्रांतीची चर्चा व्यर्थ ठरते. त्यांचं धादांत विधान `पुनरूत्पादन हे सर्व सजीवांचं एकमेव व्यवच्छेदक लक्षण आहे', साफ चूक आहे, कारण मूळ `प्राण' हे सजीवाचं प्रार्थमिक लक्षण आहे. पुनरूत्पादन पश्चात आहे. त्यामुळे निर्जीवातून सजीव कसा निर्माण झाला हे कोडं सोडवल्याशिवाय उत्क्रांतीची चर्चा व्यर्थ ठरते. जीवनातल्या सर्व प्रश्नांकडे बघण्याचे चार मार्ग आहेत : आस्तिक (दैववाद), नास्तिक (विज्ञानवाद), अज्ञेयवाद (आज माहिती नाही पण पुढे केंव्हा तरी कळेल) आणि रहस्यवाद. पहिले तीन दृष्टीकोन सामान्य आहेत आणि बहुतेकांना त्यांची कल्पना आहे किंवा बहुतेक सर्वजण या तीन पैकी एका विचारसरणीतून जगतात. रहस्यवाद सर्वात मौलिक आहे आणि ते खरं उत्तर आहे. त्याविषयी कधी मूड आला तर जरूर लिहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

राघांनी अवकाश नाकारलेले

साती
Sun, 01/03/2016 - 19:37 नवीन
राघांनी अवकाश नाकारलेले मला अद्यापि तरी त्यांच्या लेखात किंवा प्रतिसादात दिसले नाही. पण मी अजून एक दोन भाग आणि प्रतिसाद वाचलेले नाहीत. तर ते वाचून मग लिहिते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

राघांनी अवकाश नाकारलेले मला अद्यापि तरी त्यांच्या लेखात

विवेक ठाकूर
Mon, 01/04/2016 - 08:16 नवीन
किंवा प्रतिसादात दिसले नाही ? आहो तो महान घोळ तर पहिल्याच लेखावरच्या त्यांच्या प्रतिसादात आहे ! आणि तुम्ही विषय काढलात ते बरं झालं कारण तो या लेखमालेवरचा तीसरा गंभीर आक्षेप आहे. हे पाहा : घड्याळ हे कालमापनाचं यंत्र आहे. मी काळ या राशीबद्दल बोलत होतो. पृथ्वीचं भ्रमण म्हणजेच 'आधी' इथे आणि 'नंतर' तिथे. त्यामुळे भ्रमण होतं आहे म्हणून काळाचा भास होतो हे म्हणणं योग्य नाही. काळ आहे म्हणून भ्रमण शक्य आहे. त्यांना वाटतंय काळ आहे म्हणून भ्रमण आहे! आणि हा सगळ्यात भारी ज्योक आहे. मी त्यांना साधा प्रश्न विचारला होता `घड्याळ नसेल तर माणूस चालू शकणार नाही का?' पण त्यांच्याकडे उत्तर नाही. तस्मात ते चार अब्ज, दहा अब्ज , पंधरा अब्ज अश्या काहीही फेका टाकू शकतात आणि सदस्य बावरून जातात, त्यांना वाटतं बाप्रे! इतक्या काळात गाढवाचा घोडा ऑटोमॅटीक होईल किंवा मग माणूस सुद्धा हळूहळू गाढवापेक्षा घोडा बरा म्हणून गाढवाचा घोडा बनवू शकेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

पण

साती
Mon, 01/04/2016 - 09:14 नवीन
या पिवळ्या हायलाईट केलेल्या भागात त्यांनी स्पेस नाकारलेली कुठे दिसली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा