Skip to main content

झोपडपट्टीतले दिवस: भाग एक

लेखक तर्राट जोकर यांनी गुरुवार, 22/10/2015 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही तेव्हा झोपडपट्टीत राहायचो, रेल्वेच्या जागेत अतिक्रमण झालेली अठरापगड जातींच्या सरमिसळीची गोधडी. एक मोठा निळा फडका आणि बाकीचे छोटे छोटे रंगीबिरंगी ठिगळ असलेली. शहराच्या आजूबाजूच्या शेकडो गावांतून इथे दोन-चार, दोन-चार करत आलेली, मोलमजुरी, हमालीचं काम करणारी बिर्हाडं. आवसेला न चुकता डडंग-डंग...चिक...डडंड-डंग....डडंग-डंग...चिक...डडंड-डंग करत येणारा स्वच्छ कपड्यातला, अगदी वारकरी वाटणारा मांग. परिसरात मेलेली जनावर ओढायचं, त्यांचं कातडं काढून विकायचं काम करणारे महार, कुठे कोणाच्या घरी धुणी-भांडी करणार्‍या बाया, दोन-तीन बकर्‍या घेऊन चरायला जाणारी अल्पवयीन बालकं, घराच्या लिंपणासाठी कायम चुन्याची माती शोधत असणार्‍या मुली. जयंत्या-महानिर्वाणाच्या दिवशी वाजणारे भयाण आवाजातले भोंगे, कुणाच्या पाचव्या वाढदिवशी अमक्यामामाने 'चिरंजी सिद्दार्त'ला सपरेम भ्येट दिलेले २ रुपये - अमेरिकेने युगांडाला मदत केल्याच्या थाटात - कोकलून कोकलून सांगणारे अनाउंसर. कुठे कुठे वीज पोचली होती. पण बराच भाग घासलेटच्या दिव्यांवर रात्रीचा अंधार गडद करत असे. शहरात, अगदी झोपडपट्टीच्या सीमारेषेपासून पुढे सूखवस्तूंची वसाहत सुरु होत होती. तिथे सगळा झगमगाट असे. त्या सीमारेषेवरच आमचं घर होतं. रेल्वेची जागा आहे असे ठणकावून सांगणारा मोठा दगड, आमच्या घराच्या अंगणाच्या एका कोपर्‍यात रुतलेला होता. रेल्वेची अतिक्रमित जागेची, पर्यायाने त्या दोन किमी आडव्या पसरलेल्या गोधडीची किनार, व आमच्या घराच्या अंगणाची सीमा दाखवणारा तो दगड कालांतराने जमीनीखाली गेला. भक्तांना दृष्टांत द्यायला देवाचे दगड वर येतात. आम्हाला अभय द्यायला तो दगड खाली पुरला गेला. आमचं घर, कुडाचं, पक्कं नाही. पण हवेशीर. झोपडी नाही. मोठ्या बल्ल्यांनी मजबूत बांधलेले, मातीने लिपलेल्या जाड भिंती असलेलं दहा-बाय दहा च्या दोन खोल्या असलेलं... उंच व मजबूत होतं, प्रशस्त नव्हतं, गरजेपुरतं. जागा फारशी नाही एकूण हजार-बाराशे फूट. पण झोपडपट्ट्यांमधे नसलेल्या अनेक गोष्टी आमच्या घरात होत्या. काही दिवस अंधारात, व स्टोव्हवर स्वयंपाक केल्यावर अण्णांनी खटपट करून वीज कनेक्शन व गॅस सिलेंडर कनेक्शन मिळवलं. थोडे पैसे घालून दारात बोअर मारून, हातपंप वाली कमनीय बांधा असलेली हिरवी जलदेवता उभी केली. आमच्या घरासमोर कुठलीही झोपडी नव्हती, निदान सुरुवातीचे अनेक वर्षे. दूर नजर जाईल इतपर्यंत मोकळे मैदान होते. सुखवस्तूंची वसाहत डाव्या बाजूला. उजव्या बाजुला सरकारी खात्याची जमीन. एकुण ८-१० वर्षाच्या मुलासाठी तो आजच्या काळातला स्वर्गच होता. वीज, पाणी आल्याने आम्ही खूप फेमस झालो. आमच्या हापशी-हातपंपावरून लोक रोज पाणी भरायला लागले, अतिशय गोड आणि दर्जेदार पाणी होतं. तिथे आजुबाजूला दोन-तीन हापशा होत्या. त्यातली एक आमची. हिचं पाणी, आमचा स्वभाव दोन्ही गोड. सकाळ-संध्याकाळ नुसती रीघ असायची. गर्दी फार व्हायला लागली, २४ तास. मग एका कुटुंबाकडून, पाणी भरायचे, आम्ही दहा रुपये महिना प्रमाणे पैसे घ्यायला लागलो. आमच्या घरातून वीज नसलेल्या झोपड्यांमधे वीज दिली गेली. आजूबाजूच्या किमान साठ-सत्तर घरांमधे आमच्या घरातून वीज दिली जात होती. एक तर घर चांगले सात-आठशे फुटांवर होते. इतक्या लांब वीज वाहून नेणे, त्यांच्या वायरी सांभाळणे, बरेच उद्योग होते. पैसे मिळायचे पण त्यापेक्षा महत्त्वाचे आपण ज्या लोकांमधे राहतो त्यांना कशी का होईना आपल्यातर्फे थोडी मदत होत होती. असून असून लोकांकडे एखादा बल्ब, टेबल-फॅन असायचा. वीस-पंचवीस रुपये महिना. नंतर हळूहळू सरकारी निर्बंध शिथिल होऊन राजमान्यता मिळाल्यावर सगळ्यांकडे स्वतःचे वीज कनेक्शन आले. वाढत्या वॅटेजवाल्या अप्लायंसेसनी आमच्याही घरचे फ्युज नेहमी उडायला लागले होते. एकदा तर सगली वायरींग जळली. तो धंदा आम्ही बंद केला. परिस्थिती फिरते. जिथे फुले वेचली तिथे गोवर्‍याही वेचायची वेळ आमच्यावरही आलीच, पुढे आम्हालाही काही दिवस दुसर्‍यांचे कडून महिना पन्नास-शंभर रुपये देऊन वीज घेऊन राहावे लागले. सतत उपसा होऊन आमची जलदेवता रुष्ट झाली. कपडे धुण्याइतकेही चांगले पाणी तिच्यातून मिळत नव्हते. आम्हाला दुसर्‍यांच्या हापशांवर जाऊन दहा रुपये महिन्यानी पाणी भरायला लागले. आम्ही त्याठिकाणी राहिलो उणीपुरी १२ वर्षे. घर, आणि परिस्थिती मोडकळीस आली. बहिण वयात यायला लागली तेव्हा तिथे थांबणं चुकीचं वाटू लागलं. अण्णांनी ज्या परिस्थितीत हे स्वतःचं घर मिळवलं होतं ती परिस्थिती सतत आठवून त्यांना ते विकायचे नव्हते. आम्ही हट्टाला पेटलो होतो. स्वत:च्या मोठ्या घरातून टीन-पत्र्याच्या दिडशे फुटाच्या भाड्याच्या खोलीत जाणे त्यांच्या स्वाभिमानी मनाला पटत नव्हते. इथल्या आलेल्या किमतीत चांगल्या वस्तीत घर घेणे शक्यच नव्हते. आमच्या सततच्या धोशाने वडिलांना ते घर विकणे भाग पडले. ते घरही नंतर बरेच ढेपाळले होते. ती झोपडपट्टी आणि तिथल्या बारा वर्षांनी खूप अनुभव दिले. आठवले तसे लिहितो. पण फार जास्त नाही लिहिणार. काही अजूनही आठवणारे.... असेच मनावर परिणाम करून गेलेले. काही लोक, काही वस्तू, काही घटना.... झोपडपट्टीतले दिवस. क्रमशः (सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन. प्रथम प्रकाशनः मिसळपाव.कॉम. दिनांकः २२ ऑक्टोबर २०१५) झोपडपट्टीतले दिवसः भाग दोन

वाचने 72308
प्रतिक्रिया 191

प्रतिक्रिया

सर्व दिग्गज सदस्यांनी माझ्या लेखावर आवर्जून प्रतिक्रिया दिलेल्या पाहून फार छान वाटलं. मिपावर चांगल्याला चांगलंच म्हटलं जातं ह्याचा प्रत्यय आला. या भरभरूद दिलेल्या प्रेमाबद्दल सर्व रसिक वाचकांना मन:पुर्वक धन्यवाद! दोन मुद्दे इथे स्पष्ट करतो म्हणजे पुढे वाचतांना समस्या येणार नाही. लेख आवरता घेतला: झालं काय की तर्री यांची दगड्या आणि जव्हेरगंज यांच्या दोन-तीन कथा वाचून, तसेच रामदासकाकांचे लिखाण वाचून आपणही काहीतरी लिहावे असे मनात आले. एक छोटी हजार शब्दांची कथा लिहायची होती. पहिला परिच्छेद लिहितांना असे झाले की त्या घटनेमागची पार्श्वभूमी व्यवस्थित मांडणे घटनेच्या परिणामकतेसाठी अतिशय आवश्यक होते. पार्श्वभूमी मांडायची तर चांगले तीन परिच्छेद झाले. मग वाटले की अरे, ह्यानंतर असे अचानक घटनेवर येणे सुसंगत होत नाहीये. कारण ती घटना आम्ही इथे राहायला आल्यानंतर दहा वर्षांनी घडलेली आहे. आमचा तिथून मुक्काम हलण्याला कारणीभूत असणार्‍या अनेक कारणांपैकी ती घटना होती. त्या घटनेपर्यंत येण्यासाठी आधी खूप काही सांगावं लागणार हे जाणवलं म्हणुन झोपडपट्टीचे, आमच्या राहणीमानाचे अगदी जुजबी वर्णन केले. झोपडपट्ट्यांचे विविध प्रकार असतात. पण झोपडपट्टी म्हटली की सामान्य मध्यमवर्गीय वाचकांपुढे 'चक्र' ह्या कादंबरीत वर्णन केल्याप्रमाणे, किंवा एस यांनी म्हटल्याप्रमाणे अंगावर येणारे तपशील, किळस वाटणारी वर्णने असलेली झोपडपट्टी येते. लिखाणात विभत्स-रसाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे इथे अशी पाचशे शब्दांमधे सांगितलेल्या कथेला निराळेच परिमाण लाभले असते. जे मला नको होते. त्यासाठी ह्या झोपडपट्टी-राहणीमान वर्णनाचा घाट घातला. "आहे ते असे आहे" हा भाव जपतांना कुठेही जाणून-बूजून करुण-रस, विभत्स-रस, अद्भुत-रस यांची संयोजने टाळली. लेख सरधोपट, दोस्ती-यारीत सांगितल्यासारखा केला. पुढे अजून विस्ताराने, खुलवून सांगणार आहेच, त्यामुळे इथे थोडा आवरता घेतला. प्रस्तावना समजा हवं तर.... :-) बेकायदेशीर वास्तव्यः काही सदस्यांनी झोपडपट्टीतल्या बेकायदेशीर वास्तव्य व बेकायदेशीर कृत्यांना विरोध दर्शवला आहे. त्यांची मते स्वागतार्ह आहेत. मुळात हे सगळे होणार हे मी गृहीत धरले होतेच. त्यामुळेच लिखाणात वर सांगितल्याप्रमाणे "आहे ते असे आहे" हा भाव जपला आहे. नियम, कायदे, नागरी हक्क, इत्यादी बाबींवर आपण भरपूर चर्चा करतो. पण बेकायदेशीर वस्त्यांमागचे सत्य कधी बघण्याचे कष्ट घेत नाही. घेतले तरी त्यावर कृती करण्याचे कष्ट घेत नाही. कष्ट घेतले तरी ज्यांच्यासाठी हे आपण करू ते लोकच बदलण्यास तयार नसतात. हे एक खूप वेगळे, चक्रावून टाकणारे जग आहे. इथे सर्व बेकायदेशीर बेफिकिरपणे चालते असा 'सुजाण व सुसंस्कृत' समाजाचा समज असतो. पण प्रत्येक जनसमुहाच्या आपल्या अशा समस्या असतात, त्या समस्यांच्या रेट्याने, उपलब्ध संधींचा वापर करून उपाय अंगिकारले जातात. त्यात चूक, बरोबर असे ठरवणे शक्य होत नाही. कोणी प्रयत्नही करु नये, नवे प्रश्न उभे राहतात, त्यांचीही उत्तरे मिळत नाहीत. 'झोपडपट्ट्या का तयार होतात?' ह्या प्रश्नाचे उत्तर एक वाक्यात शक्य नाही. बहुसंख्यांना ते एका वाक्यात हवे असते आणि तेही त्यांनी ठरवलेल्या एकतर्फी भुमिकेला साजेसे. माझी एकच विनंती की पुढचे भाग वाचूया आणि मग सावकाश चर्चा करता येईल. गरिबीला ग्लोरीफाय करणे, किळसवाणे आयुष्य दाखवून कारूण्यमय प्रतिसाद मिळवणे हे माझे उद्देश नाहीत. ही लेखमाला माझ्या आयुष्यातल्या त्या बारा वर्षांचे संचित प्रामाणिकपणे मांडण्यासाठी लिहितोय. काय झाले, कसे झाले, का झाले याची उत्तरे आपसूक मिळत जातील. एक वेगळं जग, फारसं पुढे न आलेलं, माझ्या अनुभवातून जगलेलं, मांडण्याचा प्रयत्न आहे. तुमच्या सगळ्यांच्या मनमोकळ्या प्रतिक्रियांमुळे हुरूप आला आहे. अजून थोडंस इतिहास-उत्खनन करतो. जमेल तसं, अधिकाधिक चांगलं लिहायचा प्रयत्न करतो. थोडा धीरज राखो.... और आनंद उठाओ.

In reply to by तर्राट जोकर

प्रत्येक जनसमुहाच्या आपल्या अशा समस्या असतात, त्या समस्यांच्या रेट्याने, उपलब्ध संधींचा वापर करून उपाय अंगिकारले जातात. त्यात चूक, बरोबर असे ठरवणे शक्य होत नाही. कोणी प्रयत्नही करु नये, नवे प्रश्न उभे राहतात, त्यांचीही उत्तरे मिळत नाहीत
+१११११

कुणी काही म्हणो, तुम्ही लिहित रहा. 'झोपडपट्ट्या का तयार होतात?' ह्या प्रश्नाचे उत्तर एक वाक्यात शक्य नाही. बहुसंख्यांना ते एका वाक्यात हवे असते आणि तेही त्यांनी ठरवलेल्या एकतर्फी भुमिकेला साजेसे. माझी एकच विनंती की पुढचे भाग वाचूया आणि मग सावकाश चर्चा करता येईल.>>> सहमत.

जागा फारशी नाही एकूण हजार-बाराशे फूट. हजार बाराशे फुट आणि फारशी नाही? २३ वर्षे प्रथम वर्ग राजपत्रित लष्करी अधिकारी असून ५६० चौ फुट जागा घेताना तोंडाला फेस आलेला. सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून राजेशाही थाटात राहता येते. शिवाय पाणी फुकट उपसून वापरलेच असे नव्हे तर विकले सुद्धा. वीज सुद्धा दुसर्याला विकून त्यातूनही पैसे मिळवले. इथे प्रामाणिकपणे जर स्वतःचे जनित्र आणि डीझेल वापरून स्वतःच्या उद्योगासाठी वीज निर्मिती करायची तर सरकारला पैसे भरावे लागतात. असेच आहे दैव किती अविचारी-- मूर्ख भोगितो राजवैभवा पंडित फिरत भिकारी.

In reply to by सुबोध खरे

हजार बाराशे फुट आणि फारशी नाही?
चित्रगुप्त यांनी म्हटल्याप्रमाणेच जशी ज्याची संस्कृती-राहणीमान तसा त्याच्या शब्दांचा अर्थ.
२३ वर्षे प्रथम वर्ग राजपत्रित लष्करी अधिकारी असून ५६० चौ फुट जागा घेताना तोंडाला फेस आलेला.
अनेक प्रथमवर्गीयराजपत्रित अधिकारी सामान्य जनतेच्या तोंडाला रोजच्या रोज फेस आणून बेकायदेशीर मालमत्तेचे डोंगर उभे करतांना बघितले आहेत. त्यामुळे वैयक्तिकरित्या तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल, नीतीमुल्यांबद्दल नितांत आदर असला तरी तुमच्या राजपत्रित असण्याचे कौतुक नाही. कारण हे विधान लिहितांना तुम्ही 'राजपत्रित असल्याने भ्रष्टाचार करणे हे स्वाभाविक आहे' हे अप्रत्यक्ष मान्य करत आहात. पण 'असे' असूनही आपण 'तसे' नाही असे म्हणून विशिष्ट दर्जा मिळवू पाहत आहात. जर तुम्ही एक सामान्य व्यक्ती म्हणून प्रामाणिक आहात तर तुमच्या 'राजपत्रित असूनही प्रामाणिक' असण्याचे व 'प्रामाणिकपणामुळे ५६० फुटाची जागा घेतांना तोंडास आलेल्या फेसाचे कौतुक' का असावे? माझ्या वडीलांनाही ती बाराशे चौफूची जागा मिळवतांना तोंडास फेस आला होताच. त्यामुळे 'कोणत्याही कारणाने तोंडास येणार्‍या फेसा'चेही अप्रुप नाही.
सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून राजेशाही थाटात राहता येते.
वरील विधान प्रचंड गैरसमजुत व पुर्वग्रहातून उत्पन्न झालेले दिसते. राजेशाही थाट? एकतर लष्करात असून तुम्हाला मी राजेशाही थाट सांगावा आणि तो तुम्ही ऐकावा हे एक नवलच होईल. तुमच्या नेव्हीमधेच एका उच्चपदस्थ अधिकारी आणि त्याच्या पत्नीच्या दोन तासाच्या इवनिंग प्लेजर साठी दीड कोटीचं बील निघालेलं पाहिलंय. रेल्वे फर्स्ट क्लासमधे सर्व नागरिकांना समान मान्यता देणार्‍या स्वतंत्र भारताच्या एका लष्करी अधिकार्‍याला लष्करी नोकरीतला त्याचा अटेंडंट, वैयक्तिक गुलामाप्रमाणे, पुढ्यातच ठेवलेली केळी सोलून देतांना, संत्री, मोसंबी सोलून देतांना, फळांचे तुकडे करून देतांना प्रत्यक्ष पाहिलंय. अजूनही बरेच काही आहे. त्यामुळे सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण करून कायदेशीर राजेशाही थाट उपभोगणे काय असते हे तुम्हास माझ्यापेक्षा जास्त माहिती असावे.
शिवाय पाणी फुकट उपसून वापरलेच असे नव्हे तर विकले सुद्धा.
पाणी फुकट उपसून...? बोअरवेल व पाणी-उपसावर सरकारी नियमन येण्याआधीचा काळ असल्याने यात बेकायदेशीर काय हे कळले नाही. जाणकारांनी प्रकाश टाकावा. अगदी कालच्या प्रत्यक्ष अनुभवावरून एका उच्च-भ्रू सोसायटीत राहणारे गृहस्थ आपल्या घरच्या बोअरच्या पाण्यावर आर-ओ-प्लांट लावून पाणी व्यावसायिकरित्या विकत आहेत. त्यांच्या प्लांटची सरकारी अधिकार्‍यांमार्फत शुद्धता व स्वच्छतेच्या निकषांसाठी नियमित तपासणी होते असे ते सांगत होते. म्हणजेच ते हा अनधिकृते व्यवसाय अधिकृतपणे चालवत असावेत असे निदर्शनास येते. यावर आपले काय म्हणणे आहे?
वीज सुद्धा दुसर्याला विकून त्यातूनही पैसे मिळवले. इथे प्रामाणिकपणे जर स्वतःचे जनित्र आणि डीझेल वापरून स्वतःच्या उद्योगासाठी वीज निर्मिती करायची तर सरकारला पैसे भरावे लागतात.
दोन्ही परिस्थिती सरकारी निष्क्रियेतेचे उत्पादन आहे. कसे ते पुढे कळेलच. आताच सगळे सांगीतले तर मजा राहणार नाही.
असेच आहे दैव किती अविचारी-- मूर्ख भोगितो राजवैभवा पंडित फिरत भिकारी.
चालेल की. चांगलेच आहे. मग आजपासून, जे भिकारी फिरतात ते पंडित आहेत आणि जे राजवैभव भोगत आहेत ते सर्व मूर्ख आहेत असे समजुयात. प्रतिसादासाठी धन्यवाद!

In reply to by तर्राट जोकर

२३ वर्षे प्रथम वर्ग राजपत्रित लष्करी अधिकारी असून ५६० चौ फुट जागा घेताना तोंडाला फेस आलेला. याचा अर्थ एवढाच आहे कि एवढी वर्षे इमाने इतबारे नोकरी केलेल्या माणसाला (ज्याचा पगार सरकारी खात्यात सर्वात जास्त पगारापैकी आहे अशा माणसाला) सुद्धा ५६० चौ फुट जागा घेणे अतिशय अवघड आहे.यात राजपत्रित वर्ग २ आणि इतर वर्ग ३ किंवा चार याना हे अशक्य आहे असे मला म्हणायचे आहे. त्यात माझ्या प्रामाणिक पणाचा तुम्हाला कुठे डांगोरा दिसला. हे तुमच्या मनाचे खेळ आहेत कि सर्वच्या सर्व राजपत्रित अधिकारी भ्रष्ट असतात. शाळांचे मुख्याध्यापक अधिकारी वर्ग २ मध्ये येतात. शिक्षक वर्ग ३ मध्ये येतात. उच्चभ्रू माणूस आपल्या विकत घेतलेल्या सोसायटीतील पाणी विकत आहेत. सोसायटीतील पाणी किंवा शेतातील विहिरीचे पाणी यावर मालकाचा हक्क कायद्यात मान्य केलेला आहे. सरकारी बळकावलेल्या जमिनीतील नव्हे. आपल्याला अशा गोष्टींचे समर्थन करावेसे वाटले यातच सर्व आले बाकी गोष्टीना पास.

In reply to by सुबोध खरे

खरेसाहेब, मला तुमच्या विधानाचा योग्य आशय कळला त्यामुळे आता पुढे निरर्थक वाद नको. तुम्हाला फक्त प्रामाणिक-विरूद्ध-अप्रामाणिक अशी तुलना मांडायची होती असे कळते. असे असेल तर हा मुद्दा प्रामाणिक अधिकारी विरूद्ध सरकारी जमीन बळकावणारे असा राहत नसून सरसकट कायदेशीर-विरूद्ध-बेकायदेशीर असा होतो आहे. मग मी आधीच म्हटल्याप्रमाणे बेकायदेशीर प्रकार फक्त झोपडपट्टीतच होतात असे नाही. त्यामुळे आपल्या दोघांच्याही मतांमधे तसा फरक दिसत नाहीये. मी कशाचे समर्थन करत नाही, विरोधही करत नाही. 'आहे ते असे आहे' हेच नेहमी मांडतो. त्यात तुम्हाला समर्थन दिसले हा माझ्या मांडणीचा दोष असू शकतो. धन्यवाद!

लेखक त्याच्या लहानपणाची वस्तुस्थिती कशाचे समर्थन वा धिक्कार न करता मांडतो आहे. वाचकाने मूल्यमापन-तुलना न करता, समीक्षकी चष्मा न चढवता निव्वळ आस्वादकाच्या भूमिकेतून कोणत्याही साहित्य्/कलाकृतीचा आस्वाद घेणे केंव्हाही श्रेयस्कर. खेडेगावात, शेतात वा माळरानावर ज्यांचे जीवन व्यतीत झाले असेल, त्यांना हजार-बाराशे वर्गफूट (३० x ४० = १२००) जमीन लहान वाटणे स्वाभाविक आहे. मोठ्या शहरात जागांच्या, फ्लॅटच्या किंमती एवढ्या जास्त का, हा अगदी वेगळा विषय अहे. त्याला झोपडपट्टीत राहणारे जबाबदार नाहीत. पुण्या-मुंबईतला एक फ्लॅट विकून त्या पैशात अमेरिकेत (जिथे भारताच्या कितितरी पट पगार मिळतो) कित्येक एकर जमीन आज विकत घेता येते, ही वस्तुस्थिती आहे.

In reply to by चित्रगुप्त

कितीतरीपट पगार मिळतो" हे वाक्य खूप फसवे आहे. खर्चही सगळेच डॉलरामध्येच असतात, कितीतरीपट! कित्येक एकर जमीन घेता येते हे ही सापेक्षच. वेस्ट किंवा ईस्ट कोस्टावरच्या चांगल्या स्कूलडिस्ट्रिक्ट टाउन्समधून ते अजिबातच शक्य नाहीये परंतु मिडवेस्टात मिसुरी, आयोवा, डाकोटा किंवा साऊथकडे लुईझिआना तत्सम भागात कदाचित शक्य असेल. लोकांचे गैरसमज होऊ नयेत म्हणून हा प्रतिसाद! धन्यवाद.

In reply to by चित्रगुप्त

समीक्षकी चष्मा न चढवता निव्वळ आस्वादकाच्या भूमिकेतून कोणत्याही साहित्य्/कलाकृतीचा आस्वाद घेणे केंव्हाही श्रेयस्कर. चित्रगुप्त साहेब, कोणी आपले उत्कृष्ट चित्र ढापून मिपा वर स्वतः चे म्हणून खपवले तर केवळ आस्वादकाच्या भूमिकेतून त्याचा आस्वाद घेणे तुम्हाला / सर्वाना जमेल काय? चित्र कुणाचे का असेना कलाकृती म्हणून उत्कृष्ट आहे ना? राहिली गोष्ट जोकर साहेबांची--त्यांनी मांडलेल्या वस्तुस्थिती बद्दल मी म्हणतो आहे. त्यांच्या लेखन किंवा शैली बद्दल यात कोणता वावगा शब्द आहे कि टीका आहे? त्यांची लेखांची पद्धत उत्तमच आहे. आणि बाकी तटस्थपणे कलेचा आस्वाद घ्या म्हणाल तर मी तेवढा स्थितप्रज्ञ नाही कि तेवढा मोठा नाही कि भावना बाजूला ठेवून आस्वाद घेता येईल. हि आमच्या संस्काराची सीमा समजा किंवा बुद्धीची मर्यादा समजा.

च्यायला! एकाच कॅनव्हास वर आक्खं चित्र आलं की. वाईट गरीबी ते मजबूत श्रीमंती, कायदेशीर-बेकायदेशीर, निळे झेण्डे-इतर झेण्डे, देवाचा दगड वर येणं-पुरला जाणं, ब्राह्मण अब्राह्मण, पांढरपेशे मराठी साहित्यिक ते विद्रोही चळवळ, सरकारी, निमसरकारी ते खाजगी, १५० स्क्वेफुट ते १२०० स्क्वेफुट जागांचे चढे भाव कुणामुळे, गोट्या आणि बल्ल्या . . . . . तर्राट जोकर आगे बढो!

हजार बाराशे फुटांवर मी पण अडखळले. एक दोनदा युनिट नक्की "फुट" च आहे ना हे पाहिलं. मग आपलं घर जे आपण आयुष्यभर फेडावं लागेल असं कर्ज काढुन घेतलय ते ही ह्याच मापाचं आहे हे क्रॉसचेक केलं.. झोपडपट्ट्या आठवुन पाहिल्या.. एवढी मोठी घरं असतात त्यांची..?? शेवटी नाद सोडुन पुढचा लेख वाचला. मला व्यक्तिशः झोपडपट्टीतल्या लोकांबद्दल सहानुभुती वाटत नाही. असेलच तर राग, वैताग, संताप, चिडचिड अश्याच भावना आहेत. पण अर्थातच कधी "त्या" बाजुला जाऊन जग पाहिलेले नाही. त्यामुळे वाचण्याची उत्सुकता आहे. बघुया.. मतं बदलतात का. पुलेशु.

In reply to by पिलीयन रायडर

तुम्ही नक्की कुठल्या झोपडपट्ट्या पाहिल्यात व तुमचे स्वतःचे राहणीमान कसे आहे यावर आपले अडखळणे अवलंबून आहे. ही मुंबैतली झोपडपट्टी नाही इतकेच आता सांगू शकतो. त्यामुळे मुंबैतलं हजार-बाराशे फूट हे मानक इथे लावून उपयोगाचे नाही. बाकी राग, वैताग, संताप, चिडचिड ह्या व्यक्तिगत अनुभव व आकलनानुसार उत्पन्न होणार्‍या भावना आहेत. त्याबद्दल आपल्याशी सहानुभूती आहे. आपल्याच समाजातल्या एका भागाबद्दल आपण पूर्णपणे अनभिज्ञ असूनही घट्ट पूर्वग्रह बाळगतो यात आपल्या एकूण समाजव्यवस्थेचे प्रतिबिंब आहे. प्रतिसादासाठी धन्यवाद, पुढे नक्की वाचा!

In reply to by पिलीयन रायडर

एखाद्या गोष्टीबद्दल किंवा माणसाबद्दल अनुभव न घेताच राग,वैताग,संताप अश्या टोकाच्या भावना कश्या निर्माण होऊ शकतात हे समजले नाही. असो, मध्यंतरी याच विषयाला अनुसरून एक कविता टंकली होती तिची जाहिरात करतो! ती बाजू!

हजार बाराशे वर्गफुटाचा (carpet area) फ्लॅट आणि तेवढी जमीन यात जरा घोटाळा होतो आहेसे दिसते. बाराशे वर्गफूट बांधलेले घर म्हणजे दहा बाय दहाच्या दहा-बारा खोल्या, परंतु बाराशे फूट ( ३० x ४० फूट) जमीनीवर एक-दोन खोल्यांची झोपडी आणि बाकी जागेत बकर्‍या, कोंबड्या, गाय वा म्हैस, हातगाडी वा बैलगाडी, गोवर्‍या वाळवणे, हँडपंप किंवा विहीर, पाणी साठवायला हौद, कपडे वाळवण्याच्या दोर्‍या, उन्हाळ्यात झोपायला खाटा, जो काही काम-धंदा असेल त्यासाठी लागणारे सामान, कोपर्‍यात न्हाणीघर आणि संडास... वगैरेचा विचार करता ही जागा जेमतेमच म्हणावी लागेल. पूर्वी मी स्केचिंगसाठी अश्या वस्त्यांमधे खूप फिरलो आहे. आपल्या बकर्‍या, कोंबड्या, अडगळीचे सामान, मुले यांच्यात एवढे चित्र काढण्यासारखे काय आहे याचे तिथल्या लोकांना खूप आश्चर्य आणि कौतुक वाटायचे. आमच्या लेकरांचे चित्र काढा म्हणायचे आणि पाहुणचार करायचे. मला चित्रांसाठी भरपूर विषय तिथे मिळायचे. मी त्यांना त्यांची चित्रे काढून देऊन टाकत असे. एम एफ हुसेन लहानपणी इंदूरच्या अश्याच वस्तीत रहात असत. कलावंत, लेखक इ. साठी अश्या जागेत बालपण जाणे ही पुढे उपयोगी गोष्ट ठरते. आठवा चार्ली चापलीनचे बालपण.

In reply to by चित्रगुप्त

हजार फूट इथे मोजले काय किंवा चंद्रावर मोजले काय, सेमच येतात. बाकी जागेत बकर्‍या, कोंबड्या, गाय वा म्हैस, हातगाडी वा बैलगाडी, गोवर्‍या वाळवणे, हँडपंप किंवा विहीर, पाणी साठवायला हौद, कपडे वाळवण्याच्या दोर्‍या, उन्हाळ्यात झोपायला खाटा, जो काही काम-धंदा असेल त्यासाठी लागणारे सामान, हे असले चोचले मुंबईकर मध्यमवर्गीयांना नाही हो जमत. आम्ही आपले हॉल मधेच सोफा कम बेड, पॅसेज मधेच कपडे वाळत घालायच्या दोर्‍या, सगळ्या ॠतूंमधे तीच ती बेडरूम असं करून राहतो. माणसांनाच जागा नसल्याने प्राणी पाळणं कितीही इच्छा होऊन शक्य होत नाही. पण आमचे हे आदरणीय सरकारी जावई आकडा टाकून वीज घेणार, घरात फ्रिज पासून एलसिडी पर्यंत भारंभार वस्तू कोंबणार, ६०-७० हजारांच्या पल्सर फिरवणार, पाईपलाईन फोडून पाणी घेणार आणि आम्ही ह्यांना पोसायचं. वर, १० वर्ष सरकारची जाग बळकावल्याचे बक्षीस म्हणून सरकार ह्यांना फुकट घरं देणार. वा रे वा.

In reply to by आदिजोशी

(ज्या टेबलवरचं बिल त्या टेबलवरच पे करायची सवय असल्यामुळे व पुढच्या भागांमधे नसते घोळ घालण्यापेक्षा एकदाच उत्तर देऊन टाकतो.) या भागावर परत प्रतिसाद द्यायची बिल्कुल इच्छा नव्हती. पण काही प्रतिसादांनी व्यथित केले आहे. त्यातला हा एक. असाच आशय असलेल्या इतर प्रतिसादांसाठीही हा प्रतिसादः
हजार फूट इथे मोजले काय किंवा चंद्रावर मोजले काय, सेमच येतात.
भौतिक शास्त्रानुसार कुठलेही हजार वर्गफुट कुठेही मोजले तरी सेमच असणार. पण तुमच्या विधानामागे तो अर्थ नाहीये हे तुम्हालाही कळतंय, तरी आपलं विधान रेटण्यासाठी चंद्राचा संदर्भ? सातपुड्याच्या डोंगरांमधे, अंटार्क्टिकाच्या बर्फावर, अमेझॉनच्या जंगलांमधे, हिमालय पर्वतावर, पॅसिफिकच्या समुद्रावर, गोबीच्या वाळवंटात अशी काही ठिकाणे आहेत जिथे जी हजार-बाराशे फूट जागा आपल्याला हवी आहे ती अगदी फुकट उपलब्ध आहे. जाऊन राहणार...? नाहीना. मग कुठलेही हजार फूट सेम कसे नाहीत हे पक्कं माहिती असतांना उगाच फाटे कशाला फोडायचे? कफपरेड वरिल १००० वर्गफुटाचा संपूर्ण अधिकृत फ्लॅट आणि आसनगाव येथील तेवढाच संपूर्ण अधिकृत फ्लॅट याची किंमत सेम का नाही मग? यांच्या भावातल्या फरकासाठी झोपडपट्टी कशी जबाबदार याचे उत्तर कुणीही द्यावे. मुंबईत बर्‍याच ठिकाणी राहतांना एक फरक माझ्या निरिक्षणात आला. एक हायफाय सोसायटी वा कॉलनीतल्या घराची किंमत आणि त्याच्याच बाजुला असणार्‍या झोपडपट्टीतल्या घराची किंमत कधीच सारखी नसते. कारण लोकॅलिटी. घरांच्या किंमती जागेवर किंवा बांधकामाच्या दर्जावर, सुविधांवर ठरत नसतात. त्या ठिकाणी राहणारे ती ठरवत असतात. इन-टाइम या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे लोक आपल्या सांपत्तिक स्थितीनुसार नकळत घेट्टो बनवून राहतात. हिरानंदानीच्या संकुलांमधे राहणारे 'त्यांची किंमत देऊ शकण्याची क्षमता असलेल्या लोकांबरोबर राहण्याची' किंमत देत असतात. जागेची वा सुविधांची नाही. पोवईच्या हिरानंदानीच्या संकुलातल्या १२०० वर्गफुटाची जागा आणि त्याच्याच बाजुला असलेल्या झोपडपट्टी वा चाळींमधल्या तेवढ्याच आकाराच्या घरांची किंमत सारखी नसते. इथे झोपडपट्टीतल्या लोकांवर उखडणार्‍या वा सरकारी जावई म्हणून हेटाळणी करणार्‍या लोकांना मी एक प्रश्न विचारू इच्छितो की जर तुमच्या कडे घर घेण्यासाठी १ कोटी रुपये आहेत, तुम्हाला त्या एक कोटीत हिरानंदानीचा १२०० वर्गफुटाचा एक फ्लॅट घेता येईल, पण त्याचवेळेस त्याच्याच शेजारची चाळीवजा घरांमधे तेवढ्याच आकाराचं एक घर जर २० लाखात मिळत असेल तर ८० लाख वाचवण्यासाठी तुम्ही ते झोपडपट्टीतलं घर विकत घ्याल व तिथे राहायला जाल का?
बाकी जागेत बकर्‍या, कोंबड्या, गाय वा म्हैस, हातगाडी वा बैलगाडी, गोवर्‍या वाळवणे, हँडपंप किंवा विहीर, पाणी साठवायला हौद, कपडे वाळवण्याच्या दोर्‍या, उन्हाळ्यात झोपायला खाटा, जो काही काम-धंदा असेल त्यासाठी लागणारे सामान, हे असले चोचले मुंबईकर मध्यमवर्गीयांना नाही हो जमत. आम्ही आपले हॉल मधेच सोफा कम बेड, पॅसेज मधेच कपडे वाळत घालायच्या दोर्‍या, सगळ्या ॠतूंमधे तीच ती बेडरूम असं करून राहतो. माणसांनाच जागा नसल्याने प्राणी पाळणं कितीही इच्छा होऊन शक्य होत नाही.
माझ्या लेखात करुणरस अजिबात वापरला नाही पण प्रतिसादांमधून तो भरभरून वाहतोय. गरिबांनी उपरोक्त गोष्टी करणे हे चोचले कसे काय? गरिबांनी बकर्‍या, कोंबड्या, गाय वा म्हैस पाळणे म्हणजे नवाबाने, राजाने जातीवंत घोडे पाळणे असे समजता काय? हातगाडी वा बैलगाडी बाळगणे म्हणजे ६०-७० महगड्या स्पोर्ट्सकारचं गॅरेज बाळगणार्‍या मल्ल्यांच्या हौशीपणाचं गरिबी वर्जन आहे का? इथे गरिबाला, कष्टकर्‍याला अपराधी, गुन्हेगार असल्यासारखे वागवायची काय खुमखुमी आहे हेच मला कळत नाही. मुंबैत लोक आपल्या कर्माचे भोग भोगतायत. त्यात कुणा गरिबाच्या झोपडीचा नक्की कसा दोष हेही मला कळत नाही. तुम्हाला तुमच्या हॉलमधेच सगळे सोपस्कार उरकायला लागतात हा कुणा गरिबामुळे तुमच्यावर झालेला अन्याय आहे असं काहीसं तीरपागडं लॉजिक आपण लावत आहात. खरं बघितलं तर ते उलटं आहे. पुढे लेखमाला वाचाल तेव्हा लक्षात येईलच.
पण आमचे हे आदरणीय सरकारी जावई आकडा टाकून वीज घेणार, घरात फ्रिज पासून एलसिडी पर्यंत भारंभार वस्तू कोंबणार, ६०-७० हजारांच्या पल्सर फिरवणार, पाईपलाईन फोडून पाणी घेणार आणि आम्ही ह्यांना पोसायचं. वर, १० वर्ष सरकारची जाग बळकावल्याचे बक्षीस म्हणून सरकार ह्यांना फुकट घरं देणार. वा रे वा.
तुमच्या आदरणीय सरकारी जावयांना विधिवत सुविधा पुरवायला तुमच्या सरकारकडे वेळ नाही, इच्छा नाही. त्याहीपेक्षा मोठा बेमुवर्तखोरपणा म्हणजे मतदारयादीशिवाय तुमच्या सरकारला यांच्या अस्तित्वाशी काहीही घेणंदेणं नाही. त्यांच्या समस्यांवर उपाययोजना सोडा, ती फार पुढची गोष्ट. त्यांचे अस्तित्व मान्य करायलाही हे सरकार आणि हे सरकार चालवण्यास पैसे देणारे तुम्ही करदाते यांना गरज वाटत नाही. स्वतंत्र भारताचे तेही नागरिक आहेत. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या ऐपतीप्रमाणे जागा उपलब्ध करून देऊन, सोयी सुविधा पुरवायला तुमच्या सरकारला कोणीही अडवले नाही. तुमचे सरकार व्यवस्थेतल्या त्यांच्या उपस्थितीलाच महत्त्व देत नाही. तुमच्या सरकार आणि कायदेपाळू समाजाला हा गरिब वर्गच नकोय. त्यांची ऐपत नाहीये तर का येता शहरात? तिकडेच गावात का राहत नाहीत? इथे घाण का करतात? आमचं शहर बकाल का करतात? असे प्रश्न विचारायला फार मोठी अक्कल लागत नाही पण त्यांची उत्तरे शोधायला आणि ती मान्य करायला फार मोठं मन लागतं जे सद्यस्थितीत तुमच्या सरकार व समाजाकडे नाही. त्यांनी जगूच नये असेच तुमच्या सरकारला व समाजाल वाटत आलेय. त्यांचे काही प्रॉब्लेम आहेत हे समजुन न घेता हेच आमच्यासाठी प्रॉब्लेम आहेत असंच ज्यांना वाटतं त्यांच्याकडून अधिक शहाणपणाची, संवेदनशीलतेची अपेक्षा करणं फोल आहे. आणि एक, तुमचे सरकार निवडून यायला मतदान करायला लागतं. तिथे तुम्हास नको असलेले हे गरिब, वॉर्ड असो वा लोकसभा, प्रत्येक निवडणुकीत १००% मतदान करत असतात. त्यांच्या मताच्या जोरावर राज्यकर्ते निवडून येतात. त्यामुळे तुम्हाला डावलून त्यांना व्यवस्थाबाह्य सुविधा पुरवायला तुमचेच राज्यकर्ते मदत करतात. त्यामुळे तुम्ही त्यांना पोसताय हा भ्रम काढुन टाकलात तर बरेच होईल. कुणाचा पोशिंदा वैगेरे होऊन मिरवण्याआधी जरा खोलात जाऊन विचार करावा, शोध व अभ्यास करावा. खरंच तुम्ही एक सुजाण नागरिक म्हणून आपल्या जबाबदार्‍या पार पाडत असता तर आम्ही पोसतो वैगेरे चे वृथा अहंगंड बाळगण्याची गरजच उरली नसती. दुसरी बाजू अशी की याच झोपडपट्टीतून तुमच्या सुसंस्कृत, जबाबदार नागरिकांना लागणार्‍या काही अत्यावश्यक सेवा पुरवायला लोक मिळतात. थोडा विचार करा. ज्या सेवा हे लोक पुरवतात त्याच्यासाठी जर ते तुमच्यासारखे पगार आकारायला लागले तर त्यांनाही अधिकृत व चांगल्या सोसायट्यांमधे घरे घेता येतील. मुलांचे नीट संगोपन करता येईल. त्यांचे जीवनमान उंचावेल. सर्वत्र कायद्याचे राज्य येईल. पण महागाई वाढेल हो. त्याचे काय? किंवा मग तसे नको असेल तर असे करा की ज्या सेवा-सुविधा हे लोक पुरवतात त्या वापरणे बंद करा. आपोआप हे लोक शहर सोडून जातील, आत्महत्या करतील, नष्ट होतील. सोप्पंय न..? (डिस्क्लेमरः इथे झोपडपट्ट्यांमधून होणार्‍या गुन्हेगारी, कायदेबाह्य वर्तनास ग्लोरिफाय करण्याचा, समर्थन करण्याचा अजिबात हेतू नाहीये. कारण असे वर्तन फक्त झोपडपट्यांमधूनच होते असा गोड गैरसमज मी बाळगत नाही.)

In reply to by नगरीनिरंजन

कविता आवडली. माझ्या प्रतिसादात तुमच्या कवितेतल्याच भावना आहेत.

In reply to by तर्राट जोकर

दुसरी बाजू अशी की याच झोपडपट्टीतून तुमच्या सुसंस्कृत, जबाबदार नागरिकांना लागणार्‍या काही अत्यावश्यक सेवा पुरवायला लोक मिळतात. थोडा विचार करा.
+१ आमची मोलकरीण महिना ५०० रु मध्ये भांडी घासण्याचं काम करते, किंवा इस्त्रीवाला रु ६ मध्ये एक कपडा या दराने कपडे इस्त्री करुन घरपोच आणून देतो तेव्हा प्रामाणिकपणे काम करुनही हे लोक फक्त पोटच भरु शकतील त्यापलिकडे त्यांचा विकास होणं कठीण आहे हे जाणवतंच. माझा खोलवर अभ्यास नाही तरी पण साधारण निरिक्षणावरुन असे वाटते की जे संघटित नाही ते स्पर्धेमुळे स्वतःचे दर कमी ठेवतात आणि स्वस्तात सेवा पुरवितात तेच संघटना करुन सेवा पुरविणारे पहा.. उदा: न्हावी - केस कापण्याचे रु ४०-५०, दाढी २० ला असेल बहुधा. पंक्चर काढणारे : ट्युबलेसचा पंक्चर (कारसाठी ) ८० ते १०० रु ?

In reply to by मराठी कथालेखक

फक्त संघटीत असल्यामुळे जास्त मोबदला मिळतो हे बरोबर नाही, कारण दोन्ही जाॅब्जमध्ये फरक अाहे. केस कापायला शिकायला किमान सहा महीने लागतात, घरगुती स्वच्छतेचे काम एक दोन दिवसात कुणीही करू शकतो. हार्ट सर्जन संघटीत नसले तरी, तीन तासाच्या सेवेचे ५०-६० हजार घेतील.

In reply to by स्वधर्म

केस कापायला शिकायला किमान सहा महीने लागतात
सहा महिने ? आणि टायरचे पंक्चर काढायला किती शिकावं लागतं ? बाकी मागणी-पुरवठाचे तत्व आहेच, नेहमीच असेल पण पुरवठा वाढत असेल तरी नफा खूप जास्त घटू नये म्हणून संघटित असणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे शब्दशः Monopoly ग्राहकाच्या हिताची नसते तशीच टोकाची perfect competition पुरवठादारासाठी मारक ठरते. सर्जनने तीन तासासाठी ५० हजार घेणं योग्य असलं तरी झाडू-फरशी करणार्‍या स्त्रीला १५ तासांसाठी (रोजचा सुमारे अर्धा तास) फक्त ५०० रु मिळावे हे कितपत योग्य आहे ?

In reply to by चित्रगुप्त

1200 चौरस फुटामध्ये 10बाय10 च्या 10 खोल्या निघणं अशक्य आहे. 1200 कारपेट एरिया म्हणजे फ्लॅट किमान 1700 चा असायला हवा. वाटतंय तसं नसतंय. किमान 30% तरी लोडींग आतल्या एरिया आणि त्यावरचं 15 तरी आणखी बाहेरच्या एरिया साठी येतं.

In reply to by प्यारे१

लईच गुंता झालाय धाग्याचा.'१२०० वर्गफूट' हाच जणू या लेखाचा गाभा आहेसं झालंय. एवढ्या कार्पेट एरियात किती खोल्यांचा फ्लॅट् असतो ?

In reply to by प्यारे१

असं कसं असं कसं? पत्रावळी, पार्टिशन टाकून खोल्या करता येतीलच की. इतके लोक म्हणताहेत म्हणजे जागा लैच मोठी असणारच, पण तुम्ही उगीच बाजू घेताय झालं. तुम्हांला सर्कारी दोडक्यांची काळजीच नाही. फक्त लाडकेच दिसतात.

लेखन आवडले. ग्लोरिफिकेशन न करता किंवा अकारण बीभत्सपणा न करता लिहील्याने जास्तच. कुडाच्या भिंती, माती दाबून सपाट केलेली जमीन इत्यादी गोष्टी दुर्लक्षून फक्त १२०० स्क्वे.फू. आकडा पाहून काहींची जळ्जळ झाल्याचे पाहून माफक मनोरंजन झाले पण उद्वेगही वाटला. इतरांचे प्रतिसाद वाचायची खोड काही जात नाही माझी.

In reply to by नगरीनिरंजन

१२०० स्क्वे.फू. आकडा पाहून काहींची जळ्जळ झाल्याचे पाहून माफक मनोरंजन झाले पण उद्वेगही वाटला ह्याचा अर्थ तुम्हाला आमचे प्रतिसाद कळलेच नाहीत. १२०० स्क्वे फू काय कुणी अगदी १२००००००००० स्क्वे मै ची घरं बांधलीत तरी आम्हाला जळजळ व्हायचा संबंधच काय?

In reply to by नगरीनिरंजन

या धाग्याचा गाडा बाराशे वर्गफुटात रुतलाय जणू. ....आमचं घर, कुडाचं, पक्कं नाही. पण हवेशीर. झोपडी नाही. मोठ्या बल्ल्यांनी मजबूत बांधलेले, मातीने लिपलेल्या जाड भिंती असलेलं दहा-बाय दहा च्या दोन खोल्या असलेलं... उंच व मजबूत होतं, प्रशस्त नव्हतं, गरजेपुरतं. जागा फारशी नाही एकूण हजार-बाराशे फूट.... म्हणजे प्रत्यक्ष घरात १० बाय १० च्या दोन खोल्या होत्या, बाकीचं अंगण होतं, त्यात कदाचित मी लिहिल्याप्रमाणे असावं. लेखकाने त्याच्या लहानपणीच्या आठवणी लिहीत आहे, त्या काळच्या विशिष्ट परिस्थितीबद्दल आपण वाचकांनी भले बुरे अभिप्राय देण्याची खरेतर गरज नाही. परंतु '१२०० वर्गफुट म्हणजे कमी की जास्त' याचा निकाल लेखकानेच लावावा. तो असा, की "जागा फारशी नाही एकूण हजार-बाराशे फूट" असे लेखकाच्या वडिलांना काय कारणाने वाटत होते? आसपासची इतर घरे त्यापेक्षा जास्त मोठ्या जागेवर होती का ? की वडील या जागेत येण्यापूर्वी त्यापेक्षा खूप मोठ्या जागेत रहात होते ? (किती वर्गफुटात ?? पुणेरी प्रश्न) वगैरे.

फक्त १२०० स्क्वे.फू. आकडा पाहून काहींची जळ्जळ झाल्याचे पाहून माफक मनोरंजन झाले पण उद्वेगही वाटला. न नि साहेब मागे एका दुसर्या धाग्यावर लिहिलेला प्रतिसाद परत लिहित आहे. हिरानंदानी रुग्णालयातील आमच्या विभागातील( मी विभाग प्रमुख होतो) एक अत्यंत कष्टाळू स्वागत सहायिका, हिचा पगार तेंव्हा ८ हजार होता. तिने डोंबिवली स्थानकापासून २० मिनिटांच्या अंतरावर घर घेतले ३३० चौ फुट. ज्यासाठी तिचा हप्ता होता ८०००/- रुपये २० वर्षासाठी. तिचे यजमान कुठे तरी दुसरीकडे नोकरीला होते. हिचा पूर्ण पगार ( पुढची २० वर्षे) तो हप्ता फेडण्यात जाणार होता. त्यांच्या शिल्केतील रक्कम पहिले २० % भरण्यात गेली होती. स्थानकापासून २० मिनिटे ती चालत येउन मुलीला आईकडे( डोम्बिवलीतच) ठेवून ती कामावर येत असे. त्याच वेळेस चेंबूर च्या झोपडपट्टी तील लोकांनी मोर्चा काढला होता. त्यांना झोपू योजनेत फुकट मिळालेली घरे २५० चौ फुट होती त्यांना ती नको होती तर घरे ३५० चौ फुट हवी होती. चोर तो चोर वर शिरजोर याचे दुसरे उदाहरण दिसणार नाही. एकीकडे प्रामाणिकपणे कष्ट करणारी निम्न मध्यमवर्गातील महिला मी रोज पाहत होतो आणि इकडे फुकट सरकारी जागेत राहून मुंबईत फुकट मिळणारे घर यांना वाढवून हवे होते आणि त्यासाठी एक पैसाही द्यायची त्यांची तयारी नव्हती. असे पाहून आमचे मधमवर्गीय इमान जळते याला तुम्ही जळजळ म्हणा किंवा काहीही. थोडक्यात काय प्रामाणिक पणाला किंमत नाही असे खेदाने म्हणावे लागते. आणि हे पाहून आपले मनोरंजन झाले हे पाहून खेद वाटतो.

In reply to by सुबोध खरे

काय त्रास आहे भेंडी, दोन्हीकडचे प्रतिसाद पटताहेत.

In reply to by सुबोध खरे

बरोबर आहे. पण म्हणून झोपडपट्टीतल्या ३५० चौ फुटाची तुलना मध्यमवर्गीय ३५० चौ फुटांशी होऊ शकत नाही. नाहीतर सगळेच झोपडपट्टीत राहायला गेले असते. पत्र्याच्या खोलीत *गले असते आणि रेल्वे लाईनवर *गले असते. मुळात एकाच ठिकाणी केंद्रित होणारी ही ट्रिकल डाऊन व्यवस्था बदलायची ज्यांना त्या व्यवस्थेचा थोडासाही फायदा असेल त्यांची तयारी नाही. त्यामुळे आहे ते स्विकारण्यावाचून गत्यंतर नाही. झोपडपट्टीत राहणारे अगदी सुखात नसतात एवढं लक्षात ठेवलं म्हणजे पुरे.

In reply to by सुबोध खरे

खरेसाहेब, तुमच्या समजूतीतच ढीगभर चुका आहेत. सांगण्याचा पद्धतीमुळे कहानीच्या परिणामावर प्रभाव पडतोच. स्वागत साहय्यिकेने घर घेतले. म्हणजे नोकरी मिळवण्याइतपत तिचे नीट शिक्षण झाले होते. हिरानंदानीसारख्या उच्च-भ्रू इस्पितळात आहे म्हणजे स्मार्ट, नीटनेटकी, चांगलं संवादकौशल्य, प्रेझेंटेबल व्यक्तिमत्व असणारी असेल. घराची किंमत अंदाजे १० ते १२ लाख असेल. तीला ८ लाख रुपये कर्ज मंजूर झाले म्हणजे बँकेला तिच्याकडे तेवढे कर्ज मिळवण्याची पात्रता आहे हे दिसले. डीपी भरायला तिच्या नवर्‍याकडे २-३ लाख असतील. म्हणजे तोही सुशिक्षित व नोकरीवर असेल. शिवाय त्याच्या पगारातून घर चालेल याची हमी आहे. आता पगार ८ हजार आहे म्हणजे किमान दहा वर्षांनीही तो आठच असेल असेही नाही. नवर्‍याचाही आता आहे तोच असेल असेही नाही. दहाच वर्षांनी तिचा पगार किमान १३-१५ हजार झालेला असेल. नवर्‍याचाही वाढलेला असेल. मग ते आता विकत घेतलेले घर चढ्या किंमतीत विकून दुसरीकडे दुसरं घर विकत घेतील. ह्यात तिच्या पगाराचा इएमाय म्हणून विचार केला तर किमान ३०-३५ लाखाचं घर ते घेऊ शकतील. किंवा हे उपद्व्याप केलेच नाहीत तरी सेविंग्स वाढतील. कारण घराचा हफ्ता तर कॉन्स्टंट आहे ना? यात अगदी दु:खाने कळवळून जाण्यासारखं काय आहे. यापेक्षा अधिक कष्टप्रद कहान्या तुमच्या-आमच्या परिघाबाहेर घडत असतात. स्वागत-सहाय्यिकेची ही परिस्थिती बेकायदा वस्ती करावी लागणार्‍यांकडे नसते. अंगावरच्या कपड्यानिशी शहरात येणार्‍यांना आयुष्याची सुरुवात करायला फक्त झोपडपट्टी हाच एक आसरा असतो. त्यांच्याकडे तुमच्या मालमत्तेवर धाड घालायला टपलेले रामोशी-दरवडेखोर म्हणून बघू नका. जे मोर्चा काढतायेत त्यांच्या मागण्या आपण बघितल्या, समस्या व परिस्थिती आपण बघितली का? झोपडपट्टी निर्माण होणे हे सरकारचे अपयश आहे. त्यामुळे सरकारलाच त्यांना जागा देणे भाग आहे. असे नको असेल तर मध्यमवर्गीय इमानदारांनी सरकारवर अंकुश ठेवून आधीपासूनच झोपडपट्टी निर्माण होण्यास प्रतिबंध करावा. बहुमत असून, क्षमता असून व्यवस्थेत सक्रिय सहभाग न घेता, त्याचमुळे होणार्‍या दुष्परिणामांवर कढ काढण्याशिवाय मध्यमवर्गीय इमानदार लोकांनी आजवर वेगळे काय केले आहे?

बॅटमनपंत, आपल्या जुन्या साहित्यात एका शब्दाभोवती सारे काव्य फिरत असल्याचे उदाहरण आहे का एकादे ? मोरोपंत, वामनपंडित वगैरेंचे ?

In reply to by चित्रगुप्त

रामाभिषेके जलमाहरन्त्या: हस्ताच्च्युतो हेमघटो युवत्या:। सोपानमार्गेण करोति शब्दं ठंठं ठ ठंठं ठठ ठं ठठंठः॥ http://www.misalpav.com/node/12242 खुद के साथ बातां : हा लेकाचा मेव्या कुठे आणि का गायबलाय कोण जाणे! :(

In reply to by चित्रगुप्त

पाहून सांगतो. एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरल्याची उदाहरणे आहेत, पण एकाच शब्दाभोवती फिरणारे....पाहिले पाहिजे. मोरोपंतांची काही उदाहरणे आहेत आय गेस. पाहतो.

In reply to by चित्रगुप्त

भारवीची उदाहरणे आहेत पण त्यात एकच अक्षर किंवा दोनच अक्षरे अशी आहेत, उदा. "यायायायायायायाया" किंवा "तित्तिरी रतति तीरे, तीरे तीरे तरौ तरौ" वगैरे.

In reply to by बॅटमॅन

जेवढी उदाहरणे असतील, ती सर्व द्यावा द्येवा. तेवढाच पंत-संत कवींचा अभ्यास होईल या निमित्ताने.

In reply to by बॅटमॅन

तारतारतरैरेतैरुत्तरोत्तरतोरुतै: रतार्ता तित्तिरी रौति तीरे तीरे तरौ तरौ ॥

In reply to by सूड

कवितेच्या नशेत तर्राट होऊन असं कायबाय तरातरा लिव्हलं की त्याचा नशापानी न करणार्‍यांसाठी काय अर्थ असतो ? ;)

लोकशाही मधे प्रमाणिकपणा वगैरे नुसत्या गफ्फा असतात असे वाटते अन सार्वत्रिक अनुभव ही तोच आहे,मध्यमवर्गीय इमान वगैरे काही नसते , जे काही असते ते फ़क्त "lack of opportunity" असते, जगणे हा एक धंदा मानल्यास ज्याला आपण मध्यमवर्गीय इमान वगैरे थोरली नावे देतो ते म्हणजे थोडक्यात आपण जगण्याच्या धंद्यात काही इन्वेस्टमेंट लावतो अन रिटर्न्स घेतो तसेच काही लोक इन्वेस्टमेंट न करता रिटर्न्स घेतात तश्यातला प्रकार आहे! उद्या मध्यमवर्गात काहीतरी बेकायदेशीर करणे fashionable झाले तर लोक सर्रास करतीलच ते सगळे बाकी मनुष्यस्वभाव कोणाला चुकत नाही, जरा या आमच्या सातार्यात एक से एक अधिकारी अन जेसीओ दाखवतो रिटायर्ड, पोस्ट रिटायरमेंट सगळे माळकरी पण महिन्याच्या एक तारखेला कोणीच कोट्याची बाटली/ल्या सोडत नाही, घरापुढे एक भुसारमालाचे बारके दुकान अन मागच्या पत्रा शेड मधे "₹५/ग्लास" आर्मी रम ची विक्री! हीच ती संधी अन इन्वेस्टमेंट असते असे मनःपूर्वक वाटते (आर्मी बद्दल आदर असलेला तरी डोळसपणे सगळे पाहणारा ) नाना

In reply to by नाना स्कॉच

प्रामाणिकपणावर विश्वासच नसेल तर प्रश्नच मिटला. कालच्याच बातमीत रिक्षा वाल्याने काळ १ लाख रुपये आणि लैप टॉप परत केला ते काय त्याला संधी नव्हती म्हणून. अण्णा हजारे, बाबा आमटे, प्रकाश आमटे इ माणसे सुदैवाने आजच्याच काळातील आहेत. पण लोकांच्या चांगुलपणावर आपला विश्वासच नाही हा आपला प्रश्न आहे. आपण ज्या रंगाचा चष्मा लावाल जग तसे दिसेल.असेच नव्हे तर तसेच जग तुमच्या वाट्याला येईल. तुमच्या वाट्यालाच नेहमी लुटणारा डॉक्टर, वकील, सरकारी नोकर, दुकानदार येईल. काही लोक इन्वेस्टमेंट न करता रिटर्न्स घेतात अशांच्या बाबतीत आपल्याला आदर वाटतो म्हणताय मग बोलणेच खुंटले. माझे मत असे आहे कि ६६ % लोक भ्रष्ट नाहीत कारण त्यांना संधी मिळत नाही ३३% लोक भ्रष्ट आहेत. पण १% लोक असे आहेत कि "संधी मिळूनही" ते प्रामाणिक असतात.शिवाय भ्रष्ट माणसे सुद्धा बर्याच वेळेस अतिशय चांगले काम करताना दिसतात. आपले म्हणणे ३४ % लोक भ्रष्ट आहेत आणि ६६ टक्क्यांना संधी मिळत नाही असे आहे तर तसे ठीक. जे मला वाटले त्याला मी मध्यमवर्गीय इमान म्हणालो. त्याला इमान म्हणा. संस्कार म्हणा. ते नाहीच आपण म्हणता तर तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात आणि मी माझ्या जागी. बाकी तुम्हाला आर्मी बद्दल आदर असो किंवा नसो काय फरक पडतो. बढीया है. आपल्याला काही पटवून द्यावे असे मला मुळीच वाटत नाही.

कालच्याच बातमीत रिक्षा वाल्याने काळ १ लाख रुपये आणि लैप टॉप परत केला ते काय त्याला संधी नव्हती म्हणून. अण्णा हजारे, बाबा आमटे, प्रकाश आमटे इ माणसे सुदैवाने आजच्याच काळातील आहेत. Exceptions are not examples, अपवाद हे उदहारण नसते, उद्या ७५% रिक्षावाले लाख रूपयाच्या गड्या परत करू दे मग पाहता येईल, थोरामोठ्यांची तुम्ही घेतलेली नावे हे सुद्धा असेच अपवाद आहेत असे नसते तर ट्रेन मधे एकमेकांस टाळ्या देत "बीसी अण्णा के आंदोलन में जाना था टिकट कन्फर्म नहीं था, टीटीई को २०० रुपया दिया तो कन्फर्म बर्थ मिला मेरेको" म्हणणारी तरुणाई दिसली नसती साहेब, शिवाय काही लोक इन्वेस्टमेंट न करता रिटर्न्स घेतात अशांच्या बाबतीत आपल्याला आदर वाटतो म्हणताय मग बोलणेच खुंटले. मी मला "आदर" वाटतो असे कुठे म्हणले आहे इन्वेस्टमेंट न करणाऱ्याबद्दल? काहीही उगीच! मी फ़क्त इतके म्हणतो आहे की काही विशिष्ट परिस्थिती (circumstrances) असे असतात की एक गट आपली सामाजिक उतरंडीमधली जागा अबाधित ठेवायला इन्वेस्टमेंट करतो अन एक गट त्याच सामाजिक-आर्थिक उतरंडी मधे वर चढायला विधिनिषेध गुंडाळून इन्वेस्टमेंट न करता ते फायदे घेतो , ह्यात तुमच्याच परिभाषेनुसार "आदर" कुठला चष्मा घातल्यामुळे तुम्हाला दिसतो आहे हा तुमचा प्रश्न आहे. शिवाय, मला काही समजावणे हे आपले काम नाहीच तरीही ते स्पष्ट केल्याबद्दल आपले आभार

In reply to by नाना स्कॉच

प्रश्न ९९ टक्क्यांबद्दल नसून उरलेले १ टक्का आहेत कि ० टक्के आहेत एवढाच आहे. इति लेखनसीमा

In reply to by सुबोध खरे

डॉक, उरलेले कीतीही ट्क्के असुदेत पण ते आहेत. आणि त्यांच्यामुळेच जो काही चांगुलपणा दीसतोय तो आहे. त्यामुळे जाउदे....

लेखन मनाला भिडले. बाकी आदिजोशी ताई, गरिबांना दोष नका देऊ, मजबुरी आहे त्यांची. दिल्लीत कुठे हि नवी कालोनी (अनधिकृत) तिथे सुरवातीला काहीच नसते. मी उत्तम नगर येथे राहायला आलो, तेंव्हा, वीज पाणी काहीच नव्हते. ४-५ वर्षांनी वीज पाणी इत्यादी आले. तो पर्यंत ५० रुपये महिना देऊन वीज घ्यावी लागत होती. कुणा कडून ते सांगण्यात अर्थ नाही. 'मजबुरी का नाम महात्मा गांधी' हेच लक्ष्यात ठेवावे. पाणी टेंकरचे. उत्तम नगर येथे किंवा संपूर्ण बाह्य दिल्ली येथे. १५ ६० चा प्लॉट मध्ये प्रत्येक माल्यावर १०x१० पाच खोल्या आणि ३ x ३ चा कॉमन संडास आणि ३x५ चा बाथरूम. शिवाय १० रुपये unit विजेचे आणि एक केनी २० लिटर पिण्याचे पाणी. बाकी वापरायला sabmarsible चे खारे पाणी. ३ माल्याचा घरात १५ भाडेकरू राहतात. घरमालक खालच्या माल्यावर राहतो अर्थातच १५ x ६० ची संपूर्ण जागा. दिल्लीत १ कोटीहून अधिक लोक असेच राहतात.

In reply to by विवेकपटाईत

@विवेकपटाईत - पटाईत साहेब झोपडीत कुणी पंचतारांकित सुविधा आहेत हे कुणीच म्हणत नाहीये किंवा तेथे प्रश्न नाही असेही नाही. सरकारी जमिनीवर फुकट राहायचे. सर्व सरकारी साधन सामुग्रीचा वापर करायचा इथपर्यंतहि एकवेळ ठीक आहे. पण तीच साधन सामुग्री दुसर्याला विकायची आणि त्यातून पैसा मिळवायचा हे मान्य होऊ शकत नाही. मग रेल्वे चे स्लीपर, कोळसा किंवा विजेच्या तारा विकणारे आणि या लोकांत काय फरक आहे? ती पण सरकारीच संपत्ती आहे ना? मी उदाहरण दिले आहे कि एक निम्न मध्यमवर्गीय स्त्री प्रामाणिक कष्टाने एक जागा घेते ज्यासाठी तिला आपला २० वर्षाचा पगार द्यावा लागतो. तिच्या यजमानांची सर्व संचित पुंजी द्यावी लागते आणि तरीही झोपडपट्टी सुधार योजने पेक्षा कमी जागा मिळते.इथे सरकारी जमीन बळकावून एकहि पैसा न मोजता यांना मुंबईत जास्त जागा पाहिजे आणि त्यासाठी ते मोर्चा काढतात हे पटत नाही. झोपू मध्ये घर दिल्यावर त्याचा पूर्ण नाही तरी काही अंशी काहीतरी मोबदला त्यांनी भरावा एवढी माफक अपेक्षा आहे अन्यथा प्रामाणिक माणसाना फसवले गेल्याची भावना आहे. अधिक काय लिहिणे. मी माझे स्वतःचे उदाहरण देण्याचे एकच कारण सरकारी नोकरीत सर्वात जास्त पगारावर( आय ए एस पेक्षा जास्त सुरुवातीचा आणि पुढे १२ वर्षे पगार असूनही) लागलेल्या माझ्या सारख्या माणसाला १८ वर्षे नोकरी करून एक ५६० चौ फुट घर मुंबईच्या "टोकाला" घेताना तोंडाला फेस येतो आणि येथे सरकारी जमीन "फारशी नाही हजार बाराशे फुट"म्हटलेले चालते? असो.

In reply to by नाखु

खरंच, 1200 वर्गफुटाच्या टीचभर जागेत दम घुटत होता , या झुळुकेमुळे जरा टवटवी आली पंत.

तर्राट जोकर ह्यांनी सर्व गोष्टी स्पष्टपणे लिहिल्यात त्याबद्दल थोडे कौतुक आहे. पण असे सरकारी जमिनीत अतिक्रमण करून राहणे, पाणी, वीज दुसर्याला विकणे ह्या गोष्टी मुळीच आवडलेल्या नाहीत. खरे साहेब आणी आदी जोशी ह्यांच्याशी पूर्णपणे सहमत. तर्राट जोकर साहेब ह्या गोष्टी (सरकारी जमिनीत अतिक्रमण करून राहणे, पाणी, वीज दुसर्याला विकणे) आता करत नसतील अशी अपेक्षा आहे.

काळातला लेख आहे. अशा वेळी तजोंना काही choice होता का? आणि एवढ्या प्रांजळपणे लिहिल्याबद्दल तरी त्यांचं अभिनंदन हे करायलाच पाहिजे. पण डाॅक्टर खरे आणि आदिजोशी यांचे मुद्देही बरोबर आहेत.