Skip to main content

.बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही ..

लेखक प्राची अश्विनी यांनी शनिवार, 05/09/2015 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
चहु दिशांत पसरे कीर्ती, जग तुझिया पायावरती पण अवखळ गोकुळवासी, मज कृष्ण भेटला नाही ....... किती काळ उलटला राधे ,नित नवीन दिसशी तूही ....... जरी रूप बदलले त्याचे, तो कृष्ण वेगळा नाही तो परतून आला तरीही, माझा ना उरला काही दमले मी शोधून त्याला , मज कृष्ण भेटला नाही ....... उमगता मोल नात्याचे गेलेला परतून येई ....... समजून तयाला घे तू , तो कृष्ण वेगळा नाही सर्वस्व वाहिले त्याला , काही ना बाकी उरले मी स्वत:स हरवून बसले , मज कृष्ण भेटला नाही .........इतुके न कुणाला द्यावे, की भार तयाचा व्हावा ........ बघ तुझ्यात लपला आहे , तो कृष्ण वेगळा नाही या नात्यातील उपेक्षा मी मूक साहिली नाही बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही ........ राधेची निर्मम प्रीती , गोपास बनविते कृष्ण ........ मिटल्या नयनांनी बघ तू , तो कृष्ण वेगळा नाही
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 51198
प्रतिक्रिया 91

प्रतिक्रिया

ही वाचायची राहिली होती. फारच अप्रतिम झालीये. पुन्हा पुन्हा वाचावी अशी.

तुमची कविता दखल सदरात गेली! याबद्दल खूप खूप अभिनंदन!!! जे अगदी अंतःकरणापासून आहे त्याची निश्चित दखल घेतली जाणारच!!! तो हातात बासरी घेतलेला कृष्णकन्हैया वाचकांच्या मनात जागवला तुमच्या कवितेने! म्हणून हे यश! असो! पुनश्च अभिनंदन!!!

In reply to by मांत्रिक

जे अगदी अंतःकरणापासून आहे त्याची निश्चित दखल घेतली जाणारच!!!
धन्यवाद माहितीबद्दल. माहीत नव्हते.

दोन तीन दा वाचली. शब्दांची गुंफण सुरेखच वाटली होती आधीही आणि आत्ताही. पण परत परत वाचल्यावर कवितेतला सुंदर अर्थही साधला. सुंदर जमली आहे कविता

@प्राची अश्विनी, माझ्या इतर प्रतिसादात, तुमची कविता मला खूपच आवडली हे लिहायचे राहून गेले. तसेच मांत्रिक यांनी त्याबाबत केलेला अर्थाचा उलगडा तेवढाच आवडला. एक फारच चांगला घागा वाचायला मिळाला असे वाटते.

राधेचा सर्वप्रथम उल्लेख बाराव्या शतकातील कवी जयदेव याने आपल्या "गीतगोविंद" या काव्यात केला होता असे वाचले होते. त्याआधी लिहिलेल्या आणि कृष्णाचे अधिकृत चरित्र म्हणता येतील अशा श्रीमद भागवत, महाभारत आणि हरिवंश पुराण यात राधेचा उल्लेख नाही. किंबहूना श्रीकृष्ण भक्तीचा पुरस्कार करणारा "पुष्टीमार्ग" संप्रदायही याला दुजोरा देतो. या दुव्यावरील माहिती वाचनीय आहे.

भागवतात राधा वाचललेली आठवते,कुणीतरी केलेले भागवताचे भाषांतर होते, पुन्हा बघून संदर्भ देईन.

कविता खूप सुन्दर आहे.आणि त्यानन्तर झालेली चर्चा पण खूप अर्थपूर्ण आहे.मला छान माहिती मिळाली.

कल्पना अत्त्युत्तम! मांडणीही खास. खूप आवडली कविता. धन्यवाद! :-)