Skip to main content

समर्थ रामदास लिखीत धवल गीताच्या अनुवादात साहाय्य हवे, आणि सुद्धा धवळे/धवले आडनावांची माहिती हवी

Published on रवीवार, 12/07/2015
धवले/धवळे/ धवलगीत हि प्राचीन महाराष्ट्रातील विवाहप्रसंगी गायल्या जाणार्‍या लोकगीतांची लूप्त होत गेलेली एक परंपरा होती. या परंपरेचे अवशेष आता आगरी समाज आणि इतर काही छोट्या समाजगटातून शिल्लक असावेत. धवळे गीत प्रकारात संतांनी सुद्धा लेखन केले त्यात समर्थ रामदास लिखीत एक काव्य दिसते आहे. त्याची सुरवात आतां राहो द्या गलबला । महादेव लग्नासि चालिला । पार्वतीचा विवाह जाला । कोणेपरी ॥१॥ वरील प्रमाणे आहे. हे पूर्ण काव्य, या लिंकेवर उपलब्ध आहे; पूर्ण काव्य (मला) समजत नाहीए; ते वाचणे त्याचा अर्थ या धाग्यावर सांगणे हा या धाग्याचा मुख्य उद्देश आहे. *** अधिक माहिती*** सदर काव्यातून समर्थ रामदास काही विशेष सांगू पाहात असावेत असा अंदाजा आहे, समर्थ रामदास या धवळेमधून काय सांगू पहात आहेत ? दुसरे कुणास शक्य झाल्यास समर्थ लिखीत या काव्याचा अनुवादकरून हवा आहे. तेही शक्य न झाल्यास जेवढ्या शब्दांचे अर्थ सांगता येतील तेवढे दिलेत तरीही चालेल. (विकिसाठी असल्यामुळे या धाग्यास प्रतिसाद प्रताधिकारमुक्त समजले जातील.) हे काव्य ट्रांसलिटरल डॉट ऑर्ग (पुर्वाश्रमीचे खाप्रे डॉट ऑर्ग) वर उपलब्ध आहे. समर्थ लिखीत मूळ स्वरूपातील लिखीत दस्तएवज कॉपीराइट फ्री असावयास हवेत. मूळ दस्तएवजात कुणी काना-मात्रा शुद्धलेखनाचे बदल केले तरी नवीन कॉपीराईटची निर्मीती होते. त्यामुळे ट्रांसलिटरल डॉट ऑर्गवरून पूर्ण काव्य येथे कॉपीपेस्टवणे शक्य नाही. ट्रांसलिटरल डॉट ऑर्गने काना-मात्रा शुद्धलेखनापलिकडे मूळकाव्यात काही बदल केले असण्याची शक्यता नाही त्यामुळे अनुवादावर ट्रांसलिटरल डॉट ऑर्गच्या कॉपीराइटचा प्रश्न उद्भवणार नाही. जर कुणाच्या संग्रही समर्थ लिखीत या काव्याची मूळाबर हुकूम प्रत उपलब्ध असल्यास या धाग्यासाठी (मूळाबर हुकूम) टंकून मिळाल्यास ते सुद्धा हवे आहे. आगरी समाजाप्रमाणे एखाद्या समाजाचे अजूनही धवळे उपलब्ध असल्यास हवे आहेत, अर्थात छोट्या छोट्या समाजांच मराठी संस्थळांवर प्रतिनिधीत्व फारस नाही त्यामुळे ते या धाग्यावरून कितपत उपलब्ध होतील या बाबत साशंकता आहे. प्राचीन गुजराथ मध्ये ढोल गीते होती आणि राजस्थान मध्ये धवले आडनावाची मंडळी काही लोकगीतांचे गायन करत असावीत असे आंतरजालावरील माहिती वरून अंदाजा येतो या संबंधानेही काही अधीक माहिती मिळाल्यास हवी आहे. राजस्थानातील लोकगीत गायनात धवले आडनावाचे (एक की अनेक ?) दिसतात. आगरी समाजात धवले म्हणण्याचे काम मुख्यत्वे स्त्रीया करतात त्यांना धवलारनी म्हणतात. तेव्हा धवले आणि धवळे आडनावाचा धवले लोकगीत परंपरेशी काही सरळ संबंध असल्याचा कोणताही संदर्भ तुर्तास उपलब्ध नाही पण धवले आणि धवळे आडनावांबद्दल काही अधिक माहिती मिळाल्यास स्वागत असेल. धवले लोकगीतांबद्दल सध्या आंतरजालावर उपलब्ध माहितीची दखल मराठी विकिपीडियातील धवळे या लेखात घेतलेली आहे. *हा धागालेख विकिप्रकल्पांसाठी असल्यामुळे आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील. *अनुषंगिक नसलेले आवांतर टाळण्यासाठी आभार

वाचन संख्या 14777
प्रतिक्रिया 46

प्रतिक्रिया

माहितगार बुवा तुम्ही काय म्हणता ते मला काहीच कळलं नाही. पण मी वरील लिंकवर जाउन मूळ काव्य वाचलं. अतिशय छान आहे मूळ काव्य. तुमच्यामुळे एक अतिशय दुर्मिळ साहित्य प्रकार पहावयास मिळाला. समर्थांची शब्दरच्ना पण काय प्रभावी आहे. मस्तच.

In reply to by जडभरत

माहितगार बुवा तुम्ही काय म्हणता ते मला काहीच कळलं नाही.
बरोबर मूळ लिंकवर जा, वाचा तुम्हाला समजलेला अर्थ आम्हालाही सांगा.

नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुमची चूक नाही. मलाच आकलन झालेलं नाही. काव्याचा गूढार्थ सांगणे फार मुश्किल आहे. मी मला काव्य समजलं असं म्हटलेलं नाही. मी फक्त शब्दरचना आणि लय या अर्थी रचना चांगली आहे असं म्हणतोय.

विवाहाच्या प्रसंगी गायली जाणारी गीतं म्हणजे धवळे महधंबा हीचं नाव धवळ्याशी जोडलं गेलं आहे तिची गीतं शोधली पाहिजेत. म्हाहिम भट आणि लक्ष्मीधरभट यांनी पदे लिहिली आणि महदाइसा (महधंबा) यांनी ती गीतं गायली. बाकी, धवळे आडनावांचीच लोक ही गीतं म्हणतात असं काही माहिती नाही. बाकी, कालच कोणीतरी ’वि्हिणी” ची आठवण काढली होती. लग्नात जवळ जवळ सर्वच समाजात अशी गीतं असावी पण तुम्ही म्हणता तसं विवाहाच्या प्रसंगी ढोलगीतं म्हणजे महिला ढोल वाजवितात आणि गाणी म्हणतात पण ते धवळे आडनावाची लोक आहेत हे माहिती नाही. :( आतां राहो द्या गलबला । महादेव लग्नासि चालिला । पार्वतीचा विवाह जाला । कोणेपरी ॥१॥ महादेवाचा अवतार आणि विवाह प्रसंगी उडालेली गम्मत सुंदरच आहे, दुव्याबद्दल आभारी आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महादेवाचा अवतार आणि विवाह प्रसंगी उडालेली गम्मत सुंदरच आहे, दुव्याबद्दल आभारी आहे. हं बिरुटे साहेब. मला पण हेच म्हणायचे आहे. जो प्रत्यक्ष अर्थ, म्हणजे ज्याला फेस व्हैल्यू म्हणतो आपण, तो मजेशीर आहे छान आहे. पण जो गूढार्थ आहे. तो समजणे मला तरी मुश्किल आहे. असो, कुणि लपलेला अर्थ समजावून सांगू शकत असेल तर मला खूप आवडेल समजून घ्यायला. हे नक्कीच कशाचे तरी रूपक आहे.

In reply to by जडभरत

मला तरी त्यात गुढ अर्थ असा काही वाटला नाही. अर्थात असेल आणि कोणी समजुन सांगत असेल तर वाचायला मजा येईलच. पण उगाच ओढून अर्थ काढण्यात काही मजा नाही असे वाटते. नवरी हंसरुप चाले तीवरी भुजंग फुंपाले लोक म्हणती भुजंग आले, धावा धावा. नवरी हंसासारखी डौलदारपणे चालत आली आणि महादेवाच्या गळ्यातील सर्प फुत्कार टाकू लागले आणि लोक भुजंग आले धावा धावा म्हणुन मंडपातून पळु लागले यात काय गुढ अर्थ दडलेला असेल ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोल्सवर्थात आणि आंतरजालावर काही शब्दांचे अर्थ लावत पुन्हा एक दोनदा वाचली. बहुधा शंकर पार्वती विवाहाचे (?) आपण म्हणतातसे मनोरंजक वर्णन असाचे असे वाटते. विनोदावर टिका करणार्‍या समर्थ रामदासांच्या काव्याच हे वेगळ रुप म्हणता येईल का ?

In reply to by माहितगार

सरसकटीकरण नको. कुठल्या विषयानुरूप समर्थांनी टवाळा आवडे विनोद म्हटलं आहे ते पाहावे लागेल.

In reply to by प्यारे१

आपण म्हणता तसे काँटेक्स्ट पाहीला पाहीजे हे खरे. ते तीन शब्द आणि समर्थांचे नाव लक्षात राहते काँटेक्स्ट विसरला जातो. तरीही सर्वसाधारणपणे समर्थ साहित्य तत्वज्ञानाने ओतप्रोत भरले आहे. समर्थांच ह्या काव्यात केवळ महादेवाच्या विवाहाचे चित्तवेधक वर्णन दिसते म्हणून वेगळे वाटते आहे.

In reply to by माहितगार

समर्थांना भारत भ्रमणामुळे अनेक भाषा अवगत होत्या. तसेच त्यांनी दासबोधातल्या एका समासात वर्णमाला घेऊन एकेका अक्षरावर एक एक ओवी रचली आहे. अशा प्रकारच्या संतसाहित्याला थोडंसं हलक्या स्वरुपात घ्यायची गरज आहे. सातत्यानं शास्त्रीय गायन करणारानं एखादं लोकगीत गावं असा प्रकार आहे. यात उच्चनीच भेद करावा की नाही हा वेगळा विषय!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर, मराठीची शब्द संपत्ती खालावलेल्या मला यातील बर्‍याच शब्दांचे अर्थ माहित नाहीत. आपण ज्या 'विवाह प्रसंगी उडालेली गम्मत'चा उल्लेख करता आहात, ती गंमत समजून घेता येण्यासाठी आपल्या साहाय्याची विनंती आहे.

बिरुटे साहेब संत वचनांचा काहीतरी लपलेला अर्थ बहुतेक असतोच! "वारियाने कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले" याचा खरा अर्थ तुम्ही सांगू शकाल का? एका सत्पुरुषांनी मला ह्याचा अर्थ स्पष्ट करून सांगितला होता.

In reply to by जडभरत

देव आणि भक्त, द्वैत आणि अद्वैत असा आशय असलेली गवळण आहे इतकेच माहिती आहे. राधा पाहून भुलले हरी बैल दुभवी नंदाघरी कृष्ण राधेच्या प्रेमात इतका वेडा होऊन गेला होता की ''बैल दुभवी नंदाघरी'' आणि राधाचं हरीच्या नादात कुठे कामात लक्ष होतं. ''रिकामा डेरा घुसळत'' होती. हरि पाहून भुलली चित्ता राधा घुसळी डेरा रिता देव आणि भक्त, द्वैत आणि अद्वैत एक झाले की असंच होणार. ''ऐसी आवडी मिनली दोघा एकरूप झाले अंगा'' शरद सरांनी मिपावर या गवळणी विषयी लिहिलं होतं. नाथांची छान गवळण आहे. -दिलीप बिरुटे

* वैश्वानर (कडवे ३), सीसाळे (कडवे ४), व्याळ वळवळिती (कडवे ४), पिनाक (कडवे ७) या शब्दाम्चे अर्थ काय ? * कडवे ८ : हाती नराची खापरी | भिक्षा मागे दारोदारी (म्हणजे काय ? याचा काव्यातील संदर्भ/उद्देश काय ? या ओळीतून समर्थ काय सांगत आहेत ?) *कडवे ९: ढोर लाताड चूकले | गाते बाजेचे घेतले (म्हणजे काय ? याचा काव्यातील संदर्भ/उद्देश काय ? ) *कडवे ११: नवरी सुंदर रुपड | नवरा आणिल तो कोड || वोले हात्तीचे कातड | आंगावरी ( यात 'नवरा आणिल तो कोड' म्हणजे काय ? 'वोले हात्तीचे कातड' याचा संदर्भ अथवा अर्थ काय ?) *कडवे १२ : बैल बहुता दिवसांचा | मोटा साटा गोमाशांचा (म्हणजे काय ?) || :लोक मिळाला नगरीचा (म्हणजे काय ?) *कडवे १४: "बैले लाविल्या गोमाशा' (म्हणजे काय ? याचा काव्यातील संदर्भ/उद्देश काय ? ) *कडवे १७: 'एकवीस सर्वांगावरुता दूरी' (म्हणजे काय ?) *कडवे १९: भुजंग फुंपाले (म्हणजे काय ?) *कडवे २०: उटणे घेऊनी बाळ ( या ओळीत निर्देशीलेले बाळ कोण आहे ?) जळे बिजले दुकुळ (म्हणजे काय ?) *कडवे २१: धर्मा हळदी लागली | विभूती अवघी उकरंबिली (म्हणजे काय ?) साडी अवघी नासली | रक्तबिंदी (या ओळीचा अर्थ काय आणि या ओळीतून समर्था नेमके काय म्हणू इच्छितात) *कडवे २२: व्याघ्रांबर खडबडीले | गजचर्म लवथविले (या ओळीचा अर्थ काय आणि या ओळीतून समर्था नेमके काय म्हणू इच्छितात) तेणे मन कंटाळले | वर्‍हाड्यांचे || ( वर्‍हाड्यांचे मन का कंटाळले आहे ?) *कडवे २३: तेल घालू गेली सिरी | तेथे देखिली सुंदरी || सवती आहे इयेवरी | (यात डोक्यावर तेल कोण घालते आहे ? सुंदरी कोण आहे ? सवत कोण आहे ? हे उल्लेख कुणाबद्दल आहेत ? *कडवे २४: 'तेथे नामनाम आले' म्हणजे काय ? 'प्रेम नवर्‍यासी चालिले | गळती अश्रू || (या ओळीचा अर्थ काय, कोण कुणावर प्रेम करत आहे ? अश्रू कुणास येत आहेत ? आणि या ओळीतून समर्था नेमके काय म्हणू इच्छितात) *कडवे २५ आणि २६ : यात आगीचा संदर्भ काय आहे ? पंचाक्षर म्हणजे कोण ? *कडवे २७ आणि २८: जोगी जोगीणी वोहर | (यात 'वोहर' आणि 'सरपाडे' म्हणजे काय ?) *कडवे ३१: दास म्हणे दाता थोर | (या कडव्यातील दाता कोण ? देवभक्तास कुणकुणात अंतर दिसत नाही ?)

In reply to by माहितगार

वैश्वानर = अग्नि व्याळ हा शब्द नागाला उद्देशून वापरतात सीसाळे हे बहुधा मुंडक्यांची माळ याला उद्देशून असावे. पिनाक = शंकराचे धनुष्य हाती नराची खापरी | भिक्षा मागे दारोदारी नरमुंड (कवटी)चे खापर हातात धरलेला शंकर हा बैरागी आहे. तो दारोदार भिक्षा मागतो. वोले हात्तीचे कातड शंकराने गजचर्म पांघरले आहे असे म्हणतात. म्हणून ओले हत्तीचे कातडे. "कोड" याचा अर्थ कौतुक असा असावा. ढोर आणि बैल बहुता दिवसांचा | इथे नंदीचा संदर्भ आहे लोक मिळाला नगरीचा = नगरातले लोक एका जागी होऊन मजा बघत आहेत. बैले गोमाशा लाविल्या म्हणजे नंदीने मान हलवून गोमाशा लोकांच्या दिशेने हाकलून लावल्या एकवीस सर्वांगावरुता दूरी हे शंकराने अंतरपाट धरताच महाप्रचंड रूप धारण केले, इतके की नवरीला वर उचलले तरी मस्तक दूरच राहिले असे अर्थाने दिसते. भुजंग फुंपाले हे नाग (भुजंग) फूत्कार टाकत आला अशा अर्थाने आहे. सवती आहे इयेवरी हे गंगेला उद्देशून आहे. तेथे नामनाम आले म्हणजे तिथे शंकराच्या नामाचा उल्लेख झाला. 'प्रेम नवर्‍यासी चालिले | गळती अश्रू || पार्वती नवर्‍याकडे निघाली आहे. त्याच्या प्रेमामुळे त्याचे नाव ऐकताच तिच्या डोळ्यात प्रेमाश्रू उभे राहिले. यात आगीचा संदर्भ काय आहे ? शंकराच्या तिसर्‍या डोळ्यात अग्नि आहे असे म्हणतात. त्या अग्निच्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्या. पंचाक्षरी म्हणजे मांत्रिक वोहर म्हणजे वधूवर, नवदांपत्य. जोगी जोगिणी म्हणजे शंकर हा जोगी आहे, पार्वतीने त्याला शोभेल असे जोगिणीचे रूप घेतले. दाता थोर हा दाता (देणारा) शंकर आहे. रामेश्वर असा त्याचा उल्लेख पुढच्या ओळीत आहे. देवभक्तासी अंतर आडळेना म्हणजे देव आणि भक्तात अंतर आढळत नाही. हा देव सतत भक्ताच्या सन्निध असतो.

In reply to by पैसा

+1 शंकराचे चित्रदर्शी वर्णन समर्थांनी केलेले आहे. पुराणात अशा प्रकारचे उल्लेख असावेत.

In reply to by माहितगार

आतापर्यंत रामदासस्वामींच्या रचना मराठीत आहेत असंच वाटत होतं त्यामुळं अनुवाद कशासाठी असं वाटत होतं. बरेचसे शब्द समजतात खरंतर. त्या तुलनेत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतलया ओव्या फारच अवघड आहेत

In reply to by प्यारे१

समर्थांचीही मराठी चार शतकांपुर्वीची आहे. थोडे शब्द समजले नाहीत अथवा बरेच वेळा शब्द समजताहेत वाटले तरीही तत्कालीन शब्द-संदर्भ वेगळे असू शकतात. चुकीचा अथवा गैर अर्थ होण्यापेक्षा सुस्पष्ट अर्थ लावून घेण्याचा प्रयत्न नेहमीच चांगला असे वाटते.

In reply to by पैसा

'एकाचे एकविस होऊ दे पाचा चे पंचविस होऊ दे' अशा प्रकारचा आशिर्वादाची काही म्हण असल्याचे दिसते. एकविस या शब्दास २१ स्वर्ग या संकल्पनेचा काही आधार असू शकेल ?

In reply to by माहितगार

कदाचित ते मूळात "एकवीस स्वर्गांवरूते" असे असू शकेल. कुठे पाठभेद मिळतो का ते पहावे लागेल.

In reply to by पैसा

अप्रतिम प्रतिसाद पैसा तै मन:पूर्वक धन्यवाद । इतके सुन्दर लेखन शेयर केल्या बद्दल माहीतागार ह्यांचे आभार ! अवांतर : पंचाक्षरी म्हणजे मांत्रिक >> ॐ नम:शिवाय हां पंचाक्षरी मन्त्र । त्याचा जप करणारे सारेच पंचाक्षरी । देव सतत भक्ताच्या सन्निध असतो.>> देवाभक्तात अन्तरच नाही । देव आणि भक्त एकच आहे । विभक्त नाही तोच भक्त। जिथे द्वैतच नाही तिथे जवळ दूर असेल काही संभवत नाही । देवाभक्तात अन्तरच नाही । हे आपल्या शिवाशंकरांचे अप्रतिम वर्णन आहे । वल्ल्या बरोबर वेरुळ आणि घारापुरी लेण्या मधे पाहिले आहे, गजचर्म, हातात कवटी किन्व्वा पार्वतीचा सवति मत्सर वगैरे वगैरे । अतिअवान्तर : एका पदाच्या शेवटी "रामीरामदास स्वामी । चिन्तितसे अन्तर्यामी ।। असे आहे " माझ्या अत्यल्प माहिती नुसार समर्थांचे ज्येष्ठ बंधू श्रेष्ठगंगाधर स्वामी असा वापर करत असत, हे लेखन त्यांचे असण्याची शक्यता आहे (अर्थात त्यांच्यात आणि समर्थान्च्यात द्वैत असे काही नाही, दोघे एकच!! त्यामुळे बाकी निरर्थक चर्चा नको) पुनश्च एकवार धन्यवाद ।

In reply to by प्रसाद गोडबोले

+१ पैसा तैंच्या मदतीने एका चांगल्या काव्याचा आस्वाद घेण्याचे भाग्य लाभले. * 'पंचाक्षर' म्हणजे (ॐ) 'नमः शिवाय' सुद्धा असू शकेल. * 'देवभक्तासी आंतर | आडळेना ||' : अद्वैतवादी सर्वत्र अद्वैत पाहतो तेव्हा यात आपण म्हणता तसे देव आणि भक्त यांच अद्वैत असू शकेलच. सांख्य तत्वज्ञानात प्रकृती आणि पुरुष या दोन तत्वांचा उल्लेख येतो, या काव्यात पार्वती आणि शंकर त्याचे प्रतिनिधीत्व करत असल्यास त्याचे वर्णन करून, पार्वती हि शंकराची भक्त आहे तेथेही देव आणि भक्त असे नाते आहे आणि त्यांच्याती अद्वैत दाखवण्याचा संत कवीचा मानस असण्याची शक्यता असू शकेल का असा एक विचार मनात येऊन गेला. अजून एक शक्यता कवी स्वतःस रामाचा दास म्हणवतो आणि महादेव आणि राम या दोहोंमधील अद्वैताचा उल्लेख संतकवी या ओळीतून करून देऊ इच्छित असू शकतील अशी पण एक शक्यता वाटते.
एका पदाच्या शेवटी "रामीरामदास स्वामी । चिन्तितसे अन्तर्यामी ।। असे आहे " माझ्या अत्यल्प माहिती नुसार समर्थांचे ज्येष्ठ बंधू श्रेष्ठगंगाधर स्वामी असा वापर करत असत, हे लेखन त्यांचे असण्याची शक्यता आहे (अर्थात त्यांच्यात आणि समर्थान्च्यात द्वैत असे काही नाही, दोघे एकच!! त्यामुळे बाकी निरर्थक चर्चा नको)
भक्तांसाठी अद्वैतच अंतीम सत्य आहे, हे मान्य. परंतु हा धागा ज्ञानकोशीय अभ्यासाच्यादृष्टीने असल्यामुळे परमेश्वराच्या प्रतीबिंबांचे नि:संदिग्धीकरणाचा प्रयत्न करणे प्राप्त आहे म्हणून ह्या काव्याचे लेखक समर्थांचे ज्येष्ठ बंधू श्रेष्ठगंगाधर स्वामी असण्याची शक्यतेचा आपला निर्देश अभ्यासूंनी तपासून पाहण्यासाठी महत्वाचा वाटतो. या काव्यातील शब्दांचे अर्थ शोधताना काही शब्दांचा उपयोग बंधू द्वयांनी लिहिलेल्या काव्यांमध्ये ओघाने दिसून येतो. 'बहुसाल' हा शब्द दोन्हीही कवी वापरू शकतील पण 'रक्तबिंदी' या शब्दात इतर कवींनी कमी वापरलेल्या विशीष्ट नवीन रुपकाची उपयोजन दिसते आहे आणि रामायणातील युद्धकांडातही 'रक्तबिंदी' हे रूपक येताना दिसते आहे. शब्दसंग्रहांचा अभ्यास करून जिज्ञासूंना दोन्ही कवींची काव्ये वेगवेगळी शोधणे शक्य असावे असे वाटते. आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद

In reply to by माहितगार

'लवथव' हा शब्द समर्थांच्याच ५व्य गणपती गाथेच्या ४थ्या कडव्यात, ...'लवथव दोंद कट्ट नागबंद...' असा आला आहे. संदर्भ

In reply to by माहितगार

व्याघ्रांबर खडबडीले | गजचर्म लवथविले तेणे मन कंटाळले | वर्‍हाड्यांचे || खडबड आवाज करणारे व्याघ्रचर्म आणि ओले लोंबणारे (लवथवते) गजचर्म बघून वर्‍हाड्यांना वीट आला (किळस आली).

'बहुसाल' आणि 'रक्तबिंदी' हे या धवळे समर्थ लिखीत रचनेतील दोन शब्द समर्थांनीच लिहिलेल्या रामायणाच्या युद्धकांडवर्णनात दिसताहेत. 'बहुसाल' (धवळे कडवे १३वे आणि युद्धकांड कडवे २७वे) शब्दाचा नेमका अर्थ अद्यापी मला लागलेला नाही. 'रक्तबिंदी' (धवळे कडवे ३१वे आणि युद्धकांड कडवे ७७वे) शब्दाचा युद्धकांडातील अर्थ नेमका अद्याप उमगला नाही पण 'जणू (रक्ताच्या रंगाचा म्हणजे) लालरंगाचा शिंपण(सडा?)' असा असावा का ? http://www.transliteral.org/pages/z140412060953/view *धर्मा हळदी लागली | विभूती अवघी उकरंबिली || साडी अवघी नासली | रक्तबिंदी || २१|| धवळे ज्या प्रसंगी गायले जात त्यात चूना दळण्याचे गीत असाही काही प्रकार दिसतोय. (संदर्भ) समर्थ लिखीत धवळे गीताच्या २१ व्या कडव्यात विभूती अवघी उकरंबिली यात उल्लेखिलीली विभूती चुन्याची असू शकेल की हळद लागल्यामुळे त्यास लालरंग आला तो उटणे लावताना साडीवर उडाला आणि त्याचे वर्णन 'रक्तबिंदी' असे असेल ? (माझा जुजबी तर्क आहे, चुभूदेघे सुधारणा सुचवणे)

In reply to by माहितगार

बहुसाल याचा अर्थ बरीच वर्षे असा होतो. इथे बराच वेळ असा घ्यावा लागेल. धर्मा हळदी लागली | विभूती अवघी उकरंबिली || साडी अवघी नासली | रक्तबिंदी || २१|| शंकराला हळद लावताना स्त्रियांनी विभूती उकरून, खरडून काढली. तेव्हा गजचर्मातून गळणार्‍या रक्तबिंदूंनी त्यांच्या साड्या खराब झाल्या असे मला वाटते. (संदर्भ: वोले हत्तीचे कातडे)

In reply to by पैसा

प्रथम दर्शनीतरी हे एक हलकेफुलके काव्यच वाटते आहे. आणि तुमच्या मदतीने ह्या काव्याचा आस्वाद घेणे खुपच सुलभ झाले. या सरळ हलक्या फुलक्या काव्यात गहन गूढ अर्थ शोधण्याबद्दल बिरुटेसरांची साशंकता पटत असली तरीही अधीक काल्पनिक विश्लेषणाचा मोह आवरता येत नाही. संतकवीला प्रकृती आणि पुरुष हे द्वैत दाखवून नंतर अद्वैत स्पष्ट करणे असे तर नसेल ना असा एक विचार मनात येऊन गेला. शिवरुपी धर्म हा विरक्त आहे आणि त्याची विभूती उतरवून प्रपंचाची हळद लावली जाण्याचे हे रुपक असण्याचीही शक्यता वाटते आहे.

In reply to by माहितगार

द्वैतातील अद्वैत दाखवणे हे असू शकेलच. बहुतेक भारुडे, कूटे, आर्या, धवळे अशा वरकरणी साध्या दिसणार्‍या काव्यांमधे अनेकदा खूप गहन अर्थ दडलेला असतो. किंवा तसा लावता येतो. मात्र मी त्या अर्थात न शिरता वरकरणी दिसणारा अर्थ वाच्यार्थ घेतला आहे. यात रक्तबिंदी हे रक्तबिंदू शब्दाचे तृतीयेचे बहुवचनी रूप आहे. "ने ए शी - नी ई शी" यातला ई प्रत्यय लावला आहे.

In reply to by माहितगार

शिवरुपी धर्म हा विरक्त आहे आणि त्याची विभूती उतरवून प्रपंचाची हळद लावली जाण्याचे हे रुपक असण्याचीही शक्यता वाटते आहे. :- हं मुद्दा पटला.

पैसा, मस्तच..... आणि धन्यवाद.... गजासूराच्या वधाचा मला वाटते यात संधर्भ असावा.... खाली गजासूरवधाच्या शिल्पाचे छायाचित्र दिले आहे... त्यात खाली हत्तीचे मस्तक व हाताने ताणलेले कातडे स्पस्ट दिसत आहे.... रामदासांनी केलेले शंकराचे वर्णन या मुर्तीचेच आहे की काय अशी शंका येते... इतके ते जुळते... Simple, Free Image and File Hosting at MediaFire

बाल-जरठ विवाहाबद्दल खरी सामाजीक क्रांती २०व्या शतकात घडून आली परंतु समर्थांच्या काळातही, "...नवरा पाहता म्हातारा चुरचुर लागली नगरा,.." "..लोकी हासेवया केल्या..तेणे कासावीस जाल्या नगरनारी.." यातून बाल-जरठ विवाहांची तत्कालीन अपरिहार्यता आणि तरीही सामाज्मनाची अस्वस्थता या ओळींमधून दिसते का ? हे काव्य वरून हलके फुलके दिसत असले, (विवाहाच्या गाठी स्वर्गात बांढल्या जातात ही समाज मान्यता) असा विवाह परमेश्वरी स्वरुप म्हणून समर्थ स्विकारताना दिसत असले तरीही विवाहेत्सुकांच्या वयांमधील अंतराबद्दल अल्पशी का होईना थट्टा या काव्यात दिसते का ? ,की मी या काव्यातील सरलार्थापेक्षा माझ्या मनातील कल्पना अधिक शोधू पहातो आहे अशी शंका वाटते ?

आता वाजवा रे वाजवा । महादेव लग्नाला चालला । पार्वतीचा विवाह झाला । कसा, पाहू ॥ उमा सुंदर सुकुमार । सुलक्षण मनोहर । तिला पाहिला भ्रतार । महादेव ॥ मस्तकी त्याच्या जटाभार । देही विषारी फुत्कारती नाग । तिसरे नेत्री वैश्वानर । भगभगीत ॥ गळा शोभे रुंडमाळ । त्यातुनी ओघळे रुधीर । शंखपाळे धवळे । नाग वळवळत ॥ सदा स्मशानी राहणे । ते राखेचे ऊधळणे । भोंवती कोणती भूते । कोण जाणे ॥ जुना कधीचा पुरातन । भुतेखेते संग अचाट । रूप हे सर्व अफाट । वर्णवेना ॥ हाती त्रिशूल डमरू । काखेस भयंकर व्याघ्र्यांबर । मोठे पिनाक सरळ । शोभतसे ॥ हाती धरून नरवंटी । भिक्षा मागे दारोदारी । गळा रुद्राक्षांच्या माळा । इथे तिथे ॥ ढोर लाताड चूकले । गाते बाजेचे घेतले । दंड कमंडलु शोभले । भस्म पोते ॥ सुंदर गंध रेखले ललाटी । गंगा धबधबा वाहती । लाळ सर्वांगी गळती । भुजंगाची ॥ नवरीचे सुंदर रूप । नवर्‍याने शृंगारले कवतूक । सजवले पांघरून गजचर्म । अंगावर ॥ नंदी शोभला कधीचा । संगती गोमाशांचा थवा । लोक लोटले पहाया । शहरभरचे ॥ नवरी नीटस सुंदरी । नवरा पाहता दिसे थोर । चुटपुट लागे अंतरी । बहुतांच्या ॥ लोक हसाया लागता । नंदीने गोमाशा पळवल्या । त्यामुळे कासावीस झाल्या । नगरनारी ॥ लोक ते पळू पाहती । पाठलाग माशा करती । डंख शमवू पाहती । अंगभर ॥ नवरा मंडपी आला । मग अंतरपाट धरला । नवरा क्षणी उंच झाला । वरून पाहे ॥ अक्षता टाकण्या वरी । भट्टी उचलती नवरी । उंच उंच उन्नत होई । माथा त्याचा ॥ कसेबसे लग्न झाले । लोक उदंड ते आले । पुढे उटणे आरंभले । कौतुकाने ॥ नवरी हंसगती चाले । तीवर भुजंग फुत्कारले । लोक म्हणती भुजंग आले । धांवा धांवा ॥ सर्प आवरिले सकळ । ऊटणे घेउनि बाळ । जळे भीजले दुकुळ । गंगा वाहे ॥ धर्मा हळद लागली । विभूति काढून टाकली । साडी सर्व डागाळली । रक्तवर्णे ॥ व्याघ्रांबर अस्ताव्यस्त झाले । गजचर्म ते लवथवलेले । त्यामुळे अंतर कंटाळले । वर्‍हाड्यांचे ॥ तेल घालूं पाहे शिरी । तेथे पाहिली सुंदरी । सवत आहे इयेवरी । म्हणती लोक ॥ पुढे ढवळे गाईले । तेथे नामनाम आले । प्रेम नवर्‍यास दाटून आले । गळती अश्रू ॥ म्हणती बाधा झाली वरा । कोणी आणा पंचाक्षरा । रक्षा करितां संसारा । निघती ज्वाळा ॥ पळा पळा आग लागली । नगरामध्ये बोंब जाली । परंतु लवकर विझली । आनंद झाला ॥ नवरीला अलंकार । शंखमण्यांचा श्रृंगार । जोगी जोगीणी युगुल । पाहती लोक ॥ देवे रुप पालटीले । अंगी सौंदर्य बाणले । युगुल तळपते देखिले । सकळांनी ॥ धन्य धन्य ती दंपती । उमा महेश्वर शोभती। नाना रत्नांचे श्रृंगार । चमचमती ॥ दंपती सुंदर शोभती । नंदी दीसे जसा हत्ती । जिकडे तिकडे लखलखती । दिव्यांबरे ॥ दास म्हणे दाता थोर । आमुचा देव रामेश्वर । देवभक्तांस अंतर । आढळेना ॥ वोहर = दंपती, मेहूण काही ओळींचा अर्थ स्पष्टपणे न कळल्याने त्या तशाच राहिल्या आहेत...

In reply to by नरेंद्र गोळे

सुरेख लिहिलंय! ढोर लाताड चूकले । गाते बाजेचे घेतले । या ओळीत नंदीने लाथ मारली ती चुकली, एवढे कळले. बाज शब्द "बाजले" यासाठी वापरला असावा. मात्र गाते म्हणजे काय ते कळले नाही.

In reply to by पैसा

सुरेख लिहिलंय! +१ बाज शब्दासाठी http://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C/word या दुव्यावर अधिक पर्याय दिसतात.

In reply to by माहितगार

मग ते गायक वादक सोबत घेतले असेही असू शकेल भस्म पोते म्हणजे भस्म लिंपले.

In reply to by नरेंद्र गोळे

क्या बात है गोळे साहेब...!!! -दिलीप बिरुटे

तेथे नामनाम आले
येथे रामनाम म्हणायचे असेल का? कारण अनेक ठिकाणी शिवशंकर रामनाम प्रेमाने स्मरतात असा उल्लेख आहे. नामनामचा अर्थ तर काहीच लागत नाही.