Skip to main content

भारतातील आणिबाणीचा इतिहास व भवितव्य संबंधाने प्रश्न आणि उत्तरे

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 25/06/2015 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
२५ जून इ.स. १९७५ मध्ये आज पासून बरोबर ४० वर्षांपुर्वी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणिबाणी (Emergency) लागू केली होती जी २१ महिन्यांनी वापस घेतली गेली. इंदिराजींची हि कारवाई त्यांच्या आणि भारतीय काँग्रेसच्या एकुण राजकीय वाटचालीतील मोठ्या विवाद्य गोष्टींपैकी एक गोष्ट ठरली. नवीन पिढ्यांना हा इतिहास खूपसा ठाऊक नाही. पण गेल्या आठवड्या भरापासून इतर विवीध माध्यमातून चर्चा चालू आहे, राष्ट्रीय व्यासपीठावर अगदी अडवाणी मोदींपासून बरेच जण या चर्चेत सहभागी झालेले दिसतात. इंग्रजी आणि हिंदी भाषेत या विषयावर जेवढी सविस्तर चर्चा आणि माहिती उपलब्ध होते तेवढ मराठीत होत नाही. तर त्या इतिहासा उजाळा देणारी माहिती या धाग्यातून मिपाकर सदस्यांच्या माध्यमातून मिळावी म्हणून हा धागा. चर्चेची सुरवात होण्यास उपयूक्त असे काही प्रश्न मांडतो आहे. ज्यांना विषयाचे वाचन आहे त्यांना खालील प्रश्न अगदीच बाळबोध वाटू शकतील; तत्कालीन राष्ट्रीय राजकारण आणि आणिबाणी याची काहीच कल्पना नसलेल्यांनाही या विषयाची ओळख व्हावी म्हणून अगदी साधे साधे ही प्रश्न घेत आहे. १) आणिबाणी म्हणजे काय ? कोणत्या परिस्थिती आणिबाणी न्याय्य असू शकते ? २) इंदिरा गांधी कोण होत्या ? ३) त्यांनी आणिबाणी का लागू केली ? ४) आणिबाणीचा घटनाक्रम कसा होता ? ५) आणिबाणी विषयक कोणकोणती माहिती उपलब्ध आहे आणि कोणती माहिती उपलब्ध नाही ६) त्यांनी आणिबाणी करण्यास कोणती पार्श्वभूमी कारणीभूत ठरली ? ७) आणिबाणीस आंतरराष्ट्रीय राजकारणाचे आणि/अथवा अर्थशास्त्रीय पैलू होते का ? ते कोणते होते ? ८) आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधीच्या विरोधात कोण कोण होते आणि का ? ९) आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधी सोबत/बाजूने कोण कोण होते त्यांनी काय काय भूमिका पार पाडल्या ? १०) आणिबाणीच्या काळातील कोणाकोणाच्या कोणकोणत्या कृतीवर कुणी आणि का टिका केली करतात? आणिबाणी विवाद्य का ठरली ? ११) आणिबाणीचे कुणी कुणी समर्थन केले आणि का ? १२) भारतीय न्यायसंस्थेची त्याकाळातील आणि नंतरच्या काळातील भूमिका आणि न्यायसंस्थेच्या भूमिकेवर झालेले परिणाम कोणते ? १३) आणिबाणीचे भारतीय लोकशाही भारतीय राजकारणावर कोणते परिणाम त्यानंतरच्या काळात कसे झाले ? १२) आणिबाणी बद्दलची माहिती देणारी संशोधनात्मक लेखन झालेली पुस्तके, लेखमाला लेख; चरित्रे आणि आत्मचरित्रे आणि जेथे उपलब्ध असती तेथे त्यांचे दुवे ? १३) आणिबाणीच्या संबंधाने उल्लेखनीय अवतरणे आणि विधाने. १०) भारतीय लोकशाहीस भविष्यात पुन्हा एकाधिकारशाहीचा धोका असू शकेल का ? त्याचे स्वरूप कसे असू शकेल ? एकाधिकारशाहीचा धोका भविष्यात होऊ नये म्हणून भारतीय लोक, लोकशाहीचे आधारस्तंभ, राजकारण, नोकरशाही यांनी कोणत्यास्वरूपाची काळजी घ्यावयास हवी / ११) भारतात होऊन गेलेल्या आणिबाणी बद्दल शालेय शिक्षणातून माहिती दिली जावयास हवी का ? असेल तर त्या माहितीचे स्वरूप काय असावे ? शालेय शिक्षणातून माहिती दिली जाऊ नये असे वाटत असेल तर का ? अजून थोडे प्रश्न ! १२) A. N. Ray अजित नाथ राय यांच्या न्यायालयीन नेमणूकीवरून काय वाद झाला आणि का ? अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या निकालांची आणीबाणि संदर्भाने चर्चा केली जाते आणि का ? १३) जय प्रकाश नारायण कोण होते ? आमेरीकेत शिक्षण घेऊन अथवा राहून आलेल्या व्यक्ती सहसा मुक्त अर्थव्यवस्थेच्या समर्थक होतात जय प्रकाश नारायण तेथे जाऊन मार्क्सवादी होऊन कसे आले ? १४) जय प्रकाश नारायण राजकारणातून बाहेर केव्हा पडले आणि राजकारणात वापस केव्हा आले आणि का ? १५) जय प्रकाश नारायण यांना संपूर्ण क्रांती या संकल्पनेतून नेमके काय अभिप्रेत होते आणि बिहार चळवळीतून नेमके काय साधावयाचे होते ? १६) जय प्रकाश नारायण हे उद्योग व्यवसयांच्या राष्ट्रीय करणाच्या बाजूने होते की विरोधात होते ? १७) मोरारजी देसाई कोण होते ? त्यांनी नवनिर्माण आंदोलनाचे समर्थन का आणि कसे केले ? मोरारजी देसाई मुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थक होते का मुलतः समाजवादीच होते ? राष्ट्रीय करणाचा विरोध करता करता मोरारजी देसाई समाजवाद्यांच्या कँपमध्ये कसे पोहोचले आणि कसे स्विकारले गेले ? १७) नव निर्माण आंदोलन काय होते ? त्यांच्या मागण्या काय होत्या ? १८) विद्यार्थ्यांना वसतीगृह खाणावळ दरात झालेल्या वाढीमुळे सुरू झालेल्या आंदोलन उर्वरीत समाजात का आणि कसे वाढले ? १८) महाराष्ट्रातून मोरारजी देसाईंना या काळात कुणी कुणी समर्थन दिले आणि का ? १९) आणिबाणी काळात काँग्रेस विरोधातील राष्ट्रीयकरणाचे विरोधक आणि समाजवादी यांनी एकमेकांसोबत घरोबा कसा काय केला ? २०) आणिबाणीपुर्व चळवळीत आणि आणिबाणी काळात काँग्रेस विरोधातील धर्मनिरपेक्ष आणि धर्मनिरपेक्षतेचे टिकाकार यांनी एकमेकांसोबत कसे जमवून घेतले ? २१) आणीबाणीस राष्ट्रपती, कॅबीनेट, आणि संसदेची मंजुरी कशी मिळवली गेली ? २२) मिसा म्हणजे काय होते ?

वाचने 66066
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

धाग्याचा विषय छान आहे मग प्रतिक्रीया का नाहीत? असो, बाळासाहेब म्हणायचंे भारतात दोनच मर्द पंतप्रधान मिळाले, एक इंदिरा गांधी आणी दुसरे लाल बहादुर शास्त्री

फारच मोठा विषय आहे. Outlook च्या ताज्या अंकात कुमी कपूर यांच्या आगामी पुस्तकाचा काही भाग छापलेला आहे. http://www.outlookindia.com/article/dark-chapter--worse/294570 मुद्दा ७ शी निगडीत लेख - http://www.lokmat.com/storypage.php?catid=29&newsid=2032

In reply to by विशाखा पाटील

जेपींनी तर आविर्भाव असा आणला की, जणू ‘चलेजाव’ चळवळच सुरू झाली आहे. परंतु, एका मुख्य प्रश्नाचे उत्तर आजवर कुणीही दिलेले नाही. तो हा की, 1958 नंतर राजकारण संन्यास घेतलेले जयप्रकाश नारायण एकदम 1972-73 नंतर सक्रिय आणि आव्हानात्मक राजकारणात का आले? 1958 ते 1973 या काळात भ्रष्टाचारच नव्हता? मग, संपूर्ण क्रांतीची गरज एकदम 1974 सालीच का भासली? अमेरिका भारताविरुद्ध काही उघडउघड आणि काही गुप्त कारस्थाने करीत होती. तेव्हाच जेपींनी नवनिर्माण आंदोलनाला उत्तेजन कसे दिले? स्वत:ला गांधीवादी म्हणविणा:या या अहिंसावादी, सत्याग्रही लोकनायकाला गुजरातमधील हिंसाचाराच्या आगडोंबात संपूर्ण क्रांतीचे स्फुल्लिंग कसे आढळले..?
थोडक्यात केतकर साहेब सरळ सरळ आरोप करतायेत की जेपी आणी त्यांचे आंदोलन अमेरिका प्रणित होते. कारण काय तर विएतनाममध्ये पराभव झाल्यानंतर, जागतिक राजकारणात महत्व टिकुन राहण्यासाठी अमेरिकेला भारत आशियात डोईजड व्हायला नको होता. ह्म्म इंटरेस्टिंग.

In reply to by वॉल्टर व्हाईट

म्हणून ते आणीबाणीचे समर्थनपण करत आहेत!

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

केतकर ? यांना कुठे सीरीयसली घ्यायचे असते का? ते काँग्रेसचे गुरुजी आहेत

In reply to by कपिलमुनी

मुनीवर, ते काँग्रेसचे कपिलमुनी किंवा नांदेडीअन आहेत असा उल्लेख जास्त योग्य ठरेल का? असो. महान आणि परखड पत्रकार पद्मश्री (की पद्मभूषण) श्री. कुमार केतकर यांच्याशी माझ्यासारख्या क्षुद्र व्यक्तीशी तुलना होऊच शकत नाही. तसाही आमच्या दोघात एक किरकोळ फरक आहे. मी सध्या भाजप या पक्षाचा समर्थक आहे तर महान आणि परखड पत्रकार पद्मश्री (की पद्मभूषण) श्री. कुमार केतकर हे मुख्यत्वेकरून गांधी घराण्याचे स्वयंघोषित भाट आहेत. त्यांचे काँग्रेसचे समर्थन हा दुय्यम भाग असून गांधी घराण्यावरील भक्तीमुळे ते सध्या काँग्रेसचे समर्थक आहे. भविष्यात गांधी घराणे भाजप किंवा इतर पक्षात गेले तर महान आणि परखड पत्रकार पद्मश्री (की पद्मभूषण) श्री. कुमार केतकर हे त्या पक्षाचे समर्थक होतील. असो. Indira is India, India is Indira!

एवढी माहिती मागवली आहे तुम्हाला माहित असलेली माहिती देउन सुरुवात केली असती तर बरे झाले असते

In reply to by कपिलमुनी

इंदीरा गांधींच्या तत्कालीन सचीव आर. के. धवन मग अजून एका सचिवाचा कुणी मुलगा अशा वेगवेगळ्या लोकांचे तत्कालीन गोष्टींवर मत प्रदर्शनाचे लेख येत आहेत. खरेतर माझा काल वाचण्यातच वेळ गेला आणि लिहिण्यासाठी खूपसा वेळ हातात नव्हता म्हणून कमीत कमी चर्चा सुरु करून देऊयात, तसेही विवादात थोरामोठ्यांची नावे असल्यामुळे जाणकार मंडळी येतीलच या आशेने धागा टाकला आहे.

मी आणिबाणीवर एक मोठ्ठा लेख टाकला असता कारण आम्ही ती जगलोय. पण सध्या जे अपूर्ण आहे ते पूर्ण करायच्या मागे आहे.....

बापरे! बरेच प्रश्न आहेत. बर्‍याच प्रश्नांची उत्तरे माहित आहेत. वेळेअभावी उद्या सविस्तर उत्तरे देतो.

बरेच प्रश्न आहेत. पॉइंट बाय पॉइंट उत्तरे देण्याऐवजी जे माहिती आहे ते लिहीतो. आणिबाणी म्हणजे थोडक्यात घटनेने दिलेल्या सप्तस्वातंत्र्यांना गोठवून आणलेली एकाधिकारशाही. स्वतंत्र भारतात ती सर्वप्रथम पंडीत नेहरूंनी १९६२ च्या चीनच्या युद्धाच्या वेळेस जाहीर केली. गंमत म्हणजे ती २६ ऑक्टोबर १९६२ ते १० जानेवारी १९६८ पर्यंत होती, याचा अर्थ नेहरूंनी ती जाहीर केली, शास्त्रींच्या काळात ती चालूच राहीली आणि नंतर इंदीराजींनी ती रद्द केली. या वेळेत चीन युद्धा पाठोपाठ पाकीस्तानशी पण युद्ध झाले होते. त्या नंतर १९७१ ला पाकीस्तानच्या युध्दाच्या वेळेस ती जाहीर केली गेली आणि नंतर "भारताच्या सुरक्षेच्या" कारणास्तव ती अजून पुढे वाढवण्यात आली. अर्थातच पहील्या दोन आणिबाणींची कारणे ही बाह्य होती तर तिसर्‍या आणिबाणीचे कारण अंतर्गत होते. यातील पहील्या दोन आणिबाणींबद्दल कधी का काही बोलले गेले नाही, त्याचा इंदीराजींना आणि काँग्रेसला परत निवडून येण्यात त्रास का झाला नाही आणि २६ जून १९७५ ला वाढवल्या गेलेल्या आणिबाणीचा त्रास का झाला? ह्याचा विचार केला पाहीजे. मला वाटते पहील्या दोन वेळेस जरी आणिबाणी असली तरी जनतेच्या स्वातंत्र्याची गळचेपी झाली नव्हती. याच काळात उर्वरीत हिंदूस्थान जाउंदेत पण किमान महाराष्ट्रात आचार्य अत्र्यांचे लेख येत होते. "कन्नमवार झाडूमार", "कन्नमवार की कंडमवार" असल्या भेदक शिर्षकांच्या अग्रलेखांचा परीणाम म्हणा अथवा अजून काही पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कन्नमवार हे त्याच (पहील्या आणिबाणीच्या काळात) निवर्तले... शिवसेनेचे लुंगी हटावो आंदोलन याच काळातले. असे अनेक देशभर घडत असणार.... थोडक्यात आणिबाणीने जनतेवर निर्बंध लादले नव्हते. पण नंतर इंदीराजींची निवडणूक अलाहाबाद कोर्टाने रदबादल केली. आणि पाकीस्तानच्या युध्दात "दुर्गा" ठरलेल्या या पंतप्रधानांची "गौरी" नाही तर "भलतेच काहीतरी" होऊन गेले... त्यांचे लोकसभासदत्व रद्द झाल्याने पंतप्रधान म्हणून राजीनामा देणे अथवा सहा महीन्यात परत निवडून येणे असे खरे म्हणजे कायदेशीर पर्याय होते. त्या निवडून देखील येऊ शकल्या असत्या.... पण त्या उलट निकाल लागल्यावर १३ दिवसातच, २६ जून १९७५ ला प्रथमच अंतर्गत आणिबाणी जाहीर होऊन त्यांनी जनतेचे स्वातंत्र्य हिरावून घेतले गेले. मग कायदा बदलून केवळ (मला वाटते राष्ट्रपतींच्या) आदेशानुसार (Rule by decree) त्यांना अनंत काळासाठी पंतप्रधान म्हणून राहता येईल याची त्यांनी व्यवस्था केली! मग पत्रकारांवर बंधने आणली गेली. प्रसंगाचे तात्काळ गांभिर्य जाणणारे पत्रकार त्या काळात होते... त्यामुळेच इंडियन एक्सप्रेसच्या रामनाथ गोएंकांनी (आता सुप्रसिद्ध असलेले) अग्रलेखाचे पान कोरे ठेवून निषेध व्यक्त केला आणि न बोलता/लिहीता जनतेला जनतेला १००० शब्दांचा संदेश दिला. Indian Express http://indianexpress.com/ramnath-goenka/10/# : In June 1975, then Prime Minister Indira Gandhi clamped an Emergency on the country. The voice of the media was ruthlessly choked, its contents censored. Anti-government demonstrations were prohibited by law. Since the paper took a strong stand against the Mrs. Gandhi’s imposition of Emergency, The Indian Express protested her Government’s attempts to censor the press by carrying a blank editorial on the OpEd page. This blank editorial went on to become a symbol of the movement against the Emergency. याच काळात ४२वी घटना दुरुस्ती करून न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य आणि अधिकार देखील संकुचित करण्यात आले. आणिबाणीके तीन दलाल इंदीरा, संजय, बन्सीलाल आणि चांडाळ चौकडी म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या धवन-संजय-बन्सीलाल आणि व्हि सी शुक्ला यांनी मनमानी चालू केली. सक्तीची नसबंदी ही ह्याच काळातली. (त्याचे अप्रत्यक्ष समर्थन डॉ. भा.नि. पुरंदरे यांनी त्यांच्या शल्यकौशल्य या पुस्तकात केले होते. कारण नंतरच्या काळात जनता सरकारने कुटूंब नियोजन पूर्णच बाजूला केले, म्हणून.) इंदीरांजींनी केलेल्या लोकशाहीच्या गळचेपीचे समर्थन करणार्‍या तथाकथीत विद्वान (वास्तवात सुमार) पत्रकारांचे लेख वाचून कदाचीत त्यांना (इंदीराजी आणि संजय गांधी) पण वर धक्का बसत असेल. म्हणत असतील, "आपल्याला हे कळलेच नाही, की इतका उदात्त हेतू होता म्हणून!" विनोबा भाव्यांनी देखील आणिबाणीचे समर्थन करत त्याला अनुशासन पर्व काय म्हणले, मौनव्रत चालू होते म्हणून टाळ्या काय वाजवल्या. बरीच गंमत जंमत केली. बाळ ठाकर्‍यांनी पण समर्थन केले. अर्थात त्यांचे हुकूमशाहीसच समर्थन असायचे म्हणून आश्चर्य नाही. महाराष्ट्रात नंतरच्या काळात आणिबाणी विरोधात पुल आणि दुर्गाबाई भागवतांनी जाहीर आवाज उठवला होता आणि सर्वत्र सभा घेणे चालू केले होते. मला वाटते तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव वैतागून पुलंना विदुषक म्हणाले होते. आम्हाला शाळेत शिस्तीवरच्या गाण्यांची आणि मला वाटते, "हम होंगे कामयाब" वगैरे म्हणण्याची सक्ती केली गेली होती. अर्थात ती सक्ती वगैरे समजण्या इतके वय नव्हते. पण प्राथमिक शाळेतल्या त्या बिचार्‍या शिक्षिका घाबरलेल्या/बावरलेल्या दिसल्याचे आजही आठवते.

In reply to by विकास

धन्यवाद सर , अर्वाचीन इतिहासातील एक महत्त्वाचा कालखंड तो काळ जगलेल्या व्यक्तीकडून ऐकायला भेटतय यासाठी भाग्यवान समजतो मी स्वतःला . आमची पिढी ही आणीबाणीच्या बर्याच नंतरची. ७१ चा दुष्काळ , आणीबाणी केवळ ऐकून माहीत आहे आम्हाला.

In reply to by विकास

त्यांचे लोकसभासदत्व रद्द झाल्याने पंतप्रधान म्हणून राजीनामा देणे अथवा सहा महीन्यात परत निवडून येणे असे खरे म्हणजे कायदेशीर पर्याय होते. त्या निवडून देखील येऊ शकल्या असत्या....
विकासजी, ते सहा महिने नसुन सहा वर्षे आहे. विकी वरुन साभार:
The hearing of the case took more than four years. The case concluded on May 23, 1975 but the judgement was not announced immediately. It was pronounced that the judgement will be pronounced on June 12, 1975. June 12, 1975 witnessed courtroom No. 24 packed by lawyers, media and general public. Sinha read only the operative part of his judgement. The judgement in itself ran into 258 pages. Gandhi was declared guilty of corrupt practices and her election to the Lok Sabha was declared null and void. She was charged under Section 123(7) of the Representation of the People Act. She was also disqualified from contesting elections for six years.

In reply to by सव्यसाची

दुरूस्तीबद्दल धन्यवाद! वास्तवीक मी सांगितलेला नियम हा सर्वसाधारण परीस्थितीत लागू असतो. म्हणजे एखाद्याला मंत्री अगदी पंतप्रधान पद पण निवडणूक न लढवता मिळवता येऊ शकेल. पण सहा महीन्यात निवडून येणे गरजेचे असते. ते राज्यसभा-लोकसभा कुठेही चालू शकते. (तेच राज्यांच्या संदर्भात). मात्र येथे त्यांच्या वरील आरोप शाबित झाल्याने ("सरकारी यंत्रणेचा वापर करून निवडणूक जिंकली", हा आरोप) त्यांचे सभासदत्व रद्द झाले आणि शिक्षा म्हणून सहा वर्षे निवडणुक लढवण्यावर बंदी घालण्यात आली. अर्थात त्या नंतर हायकोर्ट आणि सुप्रिम कोर्टात स्टे ऑर्डर आणून लढत राहू शकल्या असत्या. पण नको ते सल्लागार असले की असेच होते... असो.

In reply to by विकास

विनोबा भावेंच्या समर्थनाची माहिती नवी होती. विकीवर असही म्हटलय, पुलंनी वानरोबा असा लेख लिहिला होता. पुलं असं लिहितील असं वाटत नाही. अत्र्यांनी लिहिला असावा काय? कुणाकडे त्या लेखाची लिंक आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

कदाचित संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात अत्र्यांनी विनोबांना तशी उपाधी दिल्याचे सुधीर यांना म्हणायचे असावे...

In reply to by सुधीर

अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेस जे काही घणाघाती अग्रलेख लिहीले होते त्यातील एकाचे शिर्षक "विनोबा की वानरोबा" असे होते. अत्र्यांच्या गटातला एक कवी होता ज्याने त्यावेळेस अनेक विडंबने लिहीली होती त्यात "हा कसला बाबा संत, हा संत नव्हे एजंट..." नावाची कविता देखील विनोबांवर केली होती. पुलंनी विनोबांच्या विरोधात काही लिहीले होते असे वाटत नाही.

In reply to by विकास

पु.ल. विनोबांचे फॅन होते. विनोबांच्या भूदान चळवळीवर त्यांचा अप्रतिम लेखही आहे (मला वाटतं 'गणगोत' किंवा 'गुण गाईन आवडी' मध्ये आहे.) पण विनोबांनी आणीबाणीला अनुशासन पर्व म्हणून त्याचं समर्थन केल्यावर पु.लं.नी ' आम्ही सूक्ष्मात जातो ' नावाचा एक मस्त लेख लिहिला, ज्यात विनोबांची टर उडवलेली आहे. हा लेख ' खिल्ली ' मध्ये समाविष्ट आहे. वानरोबा असा लेख पु.लं.नी लिहिला असेल असं वाटत नाही. कदाचित अत्र्यांचे ' सख्याहरी ' दत्तू बांदेकर यांनी तो लिहिला असेल.

In reply to by विकास

विकास, प्रतिसादात काही चुका आहेत. >>> त्यामुळेच इंडियन एक्सप्रेसच्या रामनाथ गोएंकांनी (आता सुप्रसिद्ध असलेले) अग्रलेखाचे पान कोरे ठेवून निषेध व्यक्त केला आणि न बोलता/लिहीता जनतेला जनतेला १००० शब्दांचा संदेश दिला. अग्रलेखाचे कारण आणिबाणीचा निषेध हे नव्हते. पुण्यातील "केसरी"च्या २६ जून १९७५ च्या अंकातील अग्रलेखाची जागा सुद्धा कोरी होती. त्याचे कारण म्हणजे २५ जून ला रात्री आणिबाणी जाहीर झाल्यावर लगेचच वर्तमानपत्रातील मजकुरावर निर्बंध आणण्याचे आदेश निघाले. लगेचच काही सरकारी अधिकारी या दोन्ही वृत्तपत्रांच्या कार्यालयात गेले व त्यांनी दुसर्‍या दिवशीच्या अंकातील मजकुराची तपासणी केली. त्यातील सरकारविरोधी बातम्या काढून टाकायला लावल्या. सरकारवर टीका करणारे अग्रलेख सुद्धा काढून टाकायला लावले. ते काढल्यावर नवीन अग्रलेख लिहिण्याइतका वेळ या वृत्तपत्रांकडे शिल्लक नव्हता कारण प्रती छापायची वेळ झाली होती. त्यामुळे अग्रलेखाची जागा कोरी ठेवून वृत्तपत्र छापले गेले. अग्रलेखाची जागा कोरी ठेवण्याचा व आणिबाणीचा निषेध करण्याचा संबंध नव्हता. अर्थात नंतर इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने सरकारसमोर नांगी न टाकता जमेल तेवढे आणिबाणीविरूद्ध लिहिले होते हेही खरे आहे. >>> महाराष्ट्रात नंतरच्या काळात आणिबाणी विरोधात पुल आणि दुर्गाबाई भागवतांनी जाहीर आवाज उठवला होता आणि सर्वत्र सभा घेणे चालू केले होते. आणिबाणीला फक्त दुर्गा भागवतांनी विरोध केला होता. कराडला साहित्य संमेलन सुरू असताना जयप्रकाश नारायण खूप आजारी होते. त्यात यशवंतराव चव्हाणही उपस्थित होते. जयप्रकाश नारायणांच्या प्रकृतीला आराम पडावा यासाठी आपण सर्वजण उभे राहून प्रार्थना करूया असे त्यांनी आवाहन केल्यावर सर्वजण उभे राहिल्यामुळे चव्हाणांना सुद्धा उभे रहावे लागल्यामुळे त्यांची अडचण झाली होती. आणिबाणीला पुलंनी अजिबात विरोध केला नव्हता. "पु.ल. एक साठवण" या पुस्तकात याचा सविस्तर उल्लेख आहे. >>> मला वाटते तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव वैतागून पुलंना विदुषक म्हणाले होते. १९७७ साली निवडणुक जाहीर झाल्यावर पु.लं. नी जनता पक्षासाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यांची शनिवारवाडा पटांगणात एक प्रचंड मोठी सभा झाली होती. त्यावेळी वैतागून शंकरराव चव्हाण त्यांना विदूषक म्हणाले होते.

In reply to by श्रीगुरुजी

धन्यवाद पण काही खुलासे! अग्रलेखाचे कारण आणिबाणीचा निषेध हे नव्हते. ...त्यामुळे अग्रलेखाची जागा कोरी ठेवून वृत्तपत्र छापले गेले. निषेध हेच होते. मी जे कायम इंडीयन एक्सप्रेसबद्दल वाचले आहे ते निषेध म्हणूनच वाचले आहे. माझ्या वरील प्रतिसादात मी इंडीयन एक्सप्रेसच्या अधिकृत संस्थळावरील माहिती देखील दिली होती ती येथे परत चिकटवतो. http://indianexpress.com/ramnath-goenka/10/# : In June 1975, then Prime Minister Indira Gandhi clamped an Emergency on the country. Since the paper took a strong stand against the Mrs. Gandhi’s imposition of Emergency, The Indian Express protested her Government’s attempts to censor the press by carrying a blank editorial on the OpEd page. This blank editorial went on to become a symbol of the movement against the Emergency. अजून खणल्यावर इतके दिसले की हे दिल्लीच्या वृत्तपत्रात केले गेले होते. आणि फायनॅन्शिअल एक्सप्रेसने मोठ्या अक्षरांमधे, रविन्द्रनाथांची “Where the mind is without fear and the head is held high” कविता/प्रार्थना छापली ज्यात शेवटी “Into that heaven of freedom, my Father, let my country awake.” असे लिहीले होते. केसरी कडून त्यावेळेस असली अपेक्षा नव्हती. कारण तो दुर्दैवाने तेंव्हा लोकमान्यांचा उरला नव्हता. जयंतरावांचा झाला होता. असो. आणिबाणीला फक्त दुर्गा भागवतांनी विरोध केला होता....आणिबाणीला पुलंनी अजिबात विरोध केला नव्हता. "पु.ल. एक साठवण" या पुस्तकात याचा सविस्तर उल्लेख आहे. ही गोष्ट मी आठवणीतून लिहीली होती त्यामुळे काळासंदर्भात किंचीत चूक झाली असेल... मात्र दुर्गाबाईंचा विरोध हा कर्‍हाड साहीत्य संमेलनात यशवंतरावांनी व्यासपिठावर बसण्यावरून अधिक होता. त्यावेळेस (त्यांचा विरोध असला तरी) आणिबाणीवरून काही झाले असे वाटत नाही. आठवत नाही. दूरदर्शनवर पाहीलेली चित्रफित पुसटशी आठवते. पण त्यातील सर्व कळण्याइतके वय नव्हते... त्याच्या आधीच्या वर्षी पुल अध्यक्ष असलेल्या इचलकरंजीच्या संमेलनात देखील यशवंतरावांना व्यासपिठावर बसून देण्यास पुलंनी विरोध केला होता. दोन्ही वेळेस यशवंतरावांनी ते मान्य करून रसिक या नात्याने स्वतःची उपस्थिती दाखवली. नंतरच्या काळात (नक्की निवडणुका जाहीर होण्याच्या आधी) पुल आणि दुर्गाबाई यांनी काही भाषणे केली होती. ती जनतापार्टीच्या बाजूने नव्हती कारण तो पर्यंत जनता पार्टी अस्तित्वात नव्हती. त्यात त्यांची ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालय आणि व्हि जे टी आय ला मराठी वाड्मय मंडळात भाषणे झाली होती हे आठवल्यामुळे मी वरील विधान केले. पण "पु.ल. एक साठवण" या पुस्तकात नक्की काय सविस्तर उल्लेख आहे ते माहीत नाही. त्यामुळे जर काही का़ळाच्या संदर्भात चूक होत असली तर माहीत नाही...

In reply to by विकास

>>> मी जे कायम इंडीयन एक्सप्रेसबद्दल वाचले आहे ते निषेध म्हणूनच वाचले आहे. इंडियन एक्स्प्रेस व केसरी या दोघांनीही अग्रलेख कोरा ठेवण्याचे कारण आणिबाणीचा निषेध असे सांगितले. परंतु प्रत्यक्षात मी सांगितली ती वस्तुस्थिती इतर काही लेखात वाचली होती. माझा एक मित्र इंडियन एक्स्प्रेस मध्ये पत्रकार म्हणून काम करतो. त्याच्याकडून देखील हेच ऐकायला मिळाले.

In reply to by श्रीगुरुजी

दोन शक्यता असू शकतील ? शक्यता १) सेंसॉरशीपचा विरोध म्हणून जागा कोरी सोडली पण सरकारी बडग्यातून वाचण्यासाठी अचानक मजकुर वगळावा लागल्याने कोरे राहील्याचे कारण सरकार दरबारी दिले. शक्यता २) खरेच अचानक मजकुर वगळावा लागल्याने जागा कोर्‍या राहील्या, पण पब्लीकपुढे क्रेडीट घेण्यासाठी सेंसॉरशीपचा विरोध करणार्‍यात आम्ही होतो हे भासवायचे होते. एनीवे जयंतराव टिळकांची आणि गाडगीळ प्रभृतींची स्वतःची आणीबाणीबद्दल भूमिका काय होती ?

In reply to by श्रीगुरुजी

इंडियन एक्स्प्रेसने अग्रलेखाची जागा कोरी ठेवली तो आणिबाणीचा निषेधच होता. इंडियन एक्स्प्रेस तेव्हा फक्त एवढे करुन थांबला नाही तर त्याने तेव्हा अनेक भुमिगत प्रकाशने सुरु करण्यास मदतही केली होती. रामनाथजी गोएन्का यांनी तेव्हा आणिबाणीच्या विरोधात जाहिर भुमिका घेतलेली होती. हा इतिहास एम व्हि कामथांनी लिहिलेल्या रामनाथजींच्या चरित्रातही आला.

१) आणिबाणी म्हणजे काय ? कोणत्या परिस्थिती आणिबाणी न्याय्य असू शकते ? जेव्हा देशात प्रचंड दंगली, यादवी युद्ध, इतर देशांबरोबर युद्ध अशासारखी गंभीर परिस्थिती उद्भवली असते, उद्भवलेल्या परिस्थितीवर नेहमीच्या लोकशाही मार्गाने नियंत्रण आणणे कठीण असते व सत्ताधार्‍यांना नेहमीची लोकशाही पद्धत तात्पुरती बाजूला ठेवून तातडीने निर्णय घ्यायचे असतात तेव्हा आणिबाणीजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ - इतर कोणत्या तरी देशाशी युद्ध सुरू असताना देशात युद्धाविरूद्ध किंवा इतर कोणत्याही कारणाने जनता निदर्शने करीत रस्त्यावर उतरलेली असते, वाहतूकदार संप करीत असतात, एकीकडे सैनिक सीमारेषेवर लढत असताना देशात अंदाधुंदी माजलेली असते तेव्हा नियंत्रण आणण्यासाठी आणिबाणी लागू केली जाऊ शकते. अगदी अपवादात्मक परिस्थितीतच आणिबाणी लागू केली जाते. २) इंदिरा गांधी कोण होत्या ? पंतप्रधान ३) त्यांनी आणिबाणी का लागू केली ? इंदिरा गांधींनी १९७१ साली रायबरेली मतदारसंघातून सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग करून निवडणुक जिंकली अश्या आरोपावरून राजनारायण यांनी त्यांच्याविरूद्ध अलाहाबाद उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यांचे वकील शांतिभूषण हे होते. या खटल्याचा निकाल १२ जून १९७५ रोजी लागून न्यायाधीश जगमोहन सिन्हा यांनी त्यात इंदिरा गांधींना दोषी ठरवून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली व त्यांना पुढील ६ वर्षे निवडणुक लढण्यास बंदी घालण्यात आली. अशा वेळी राजीनामा देण्याऐवजी देशात अराजक माजले आहे असे कारण देऊन २५ जून १९७५ ला इंदिरा गांधींनी देशात आणिबाणी जाहीर करून सर्वाधिकार आपल्या हातात घेतले. त्यापूर्वी १९७४ मध्ये गुजरातमध्ये चिमणभाई पटेलांच्या भ्रष्टाचाराविरूद्ध विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन करून त्यांना राजीनामा द्यायला लावला होता. त्याच सुमारास बिहार मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी तत्कालीन राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराविरूद्ध प्रचंड तीव्र असे नवनिर्माण आंदोलने केले होते. कामगार नेते जॉर्ज फर्नांडीस यांनी रेल्वे संपाची हाक दिली होती. १९७१ च्या युद्धात भारताचा प्रचंड खर्च झाला होता व त्यावेळी भारतात आलेल्या १ कोटीहून अधिक बांगला निर्वासितांपैकी बरेच जण परत गेलेच नव्हते व त्यांचा खर्च भारताला करावा लागत होता. १९७१ च्या निवडणुकीतील इंदिरा गांधींची 'गरिबी हटाव' घोषणा हवेत विरून गेली होती व जनतेत प्रचंड असंतोष होता. एकंदरीत भारतात जनमत मोठ्या प्रमाणात इंदिरा गांधींविरूद्ध गेले होते. त्यात न्यायालयाच्या निर्णयाची भर पडली. इंदिरा गांधी एखाद्या हुकूमशहाप्रमाणे होत्या. त्यांना पक्षांतर्गत अनेक विरोधक होते. अनेक पक्षांतर्गत विरोधकांना त्यांनी पूर्वीच पक्षातून काढले होते. अशा वेळी न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेऊन आपल्याला पक्षांतर्गत विरोधक हटवतील व पुढील ६ वर्षे निवडणुक लढवायला बंदी असल्याने आपण राजकारणातून कायमच्या हद्दपार होऊ या भितीने इंदिरा गांधींनी वरील कारणे पुढे करून आणिबाणी आणली. (क्रमशः)

In reply to by अनुप ढेरे

मिपा आणि ऐसी दोन्हीकडील प्रतिसादातील माहिती वाचतोय, केवळ २१ महिन्यांची आणीबाणी पण न संपणार्‍या आठवणी आता कुतूहलाचा विषय पण जेव्हा घडले तेव्हा काही जणांसाठी ते सारे कठीण राहीले असणार.

वर मी एका प्रतिसादात लिहीले आहे... इंदीराजींवरील आरोप शाबित झाल्याने ("सरकारी यंत्रणेचा वापर करून निवडणूक जिंकली", हा आरोप) त्यांचे सभासदत्व रद्द झाले आणि शिक्षा म्हणून सहा वर्षे निवडणुक लढवण्यावर बंदी घालण्यात आली. त्यांनी नंतर आणिबाणि जाहीर केली वगैरे ठीक आहे. पण त्याच वेळेस त्यांनी त्यांच्यावरील ही शिक्षा पण रदबादल केली का? नसली केल्यास त्या ७७ सालातली निवडणूक कशा लढल्या? कोणी इतिहासाची हौस असलेला/ली अधिक माहिती देऊ शकेल का?

In reply to by विकास

>>> त्यांनी नंतर आणिबाणि जाहीर केली वगैरे ठीक आहे. पण त्याच वेळेस त्यांनी त्यांच्यावरील ही शिक्षा पण रदबादल केली का? नसली केल्यास त्या ७७ सालातली निवडणूक कशा लढल्या? कोणी इतिहासाची हौस असलेला/ली अधिक माहिती देऊ शकेल का? १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश जगमोहन सिन्हा यांनी इंदिरा गांधींची १९७१ मधील निवडणुक रद्द ठरवून त्यांची खासदारकी अवैध ठरविली व त्यांना ६ वर्षे निवडणुक लढविण्यास बंदी घातली. त्याचवेळी न्यायाधीशांनी इंदिरा गांधींच्या जागी नवी व्यवस्था करण्यासाठी २० दिवसांची मुदत दिली होती. इंदिरा गांधींनी या निकालाविरूद्ध लगेचच सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यावर सर्वोच्च न्यायालयाने २४ जून १९७५ ला उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली परंतु त्यांना लोकसभेत मतदान करण्यावर बंदी घातली. लगेचच दुसर्‍या दिवशी इंदिरा गांधींनी आणिबाणी जाहीर करून आपल्याला हवे तसे कायदे आणण्यासाठी अनेक घटनादुरूस्त्या केल्या. शेवटी ७ नोव्हेंबर १९७५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा गांधींना निर्दोष जाहीर केले.

In reply to by विकास

त्यांनी नंतर आणिबाणि जाहीर केली वगैरे ठीक आहे. पण त्याच वेळेस त्यांनी त्यांच्यावरील ही शिक्षा पण रदबादल केली का? नसली केल्यास त्या ७७ सालातली निवडणूक कशा लढल्या?
हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. १२ जून १९७५ रोजी इंदिरा गांधींची रायबरेलीमधून लोकसभेवर झालेली निवड अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जगमोहनलाल सिन्हा यांनी रद्द केली. त्याला इंदिरा गांधींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. इंदिरा गांधींचे आव्हान उन्हाळी सुटीच्या काळातील न्यायाधीश व्ही.आर.कृष्ण अय्यर यांच्यापुढे आले आणि इंदिरा गांधींची बाजू न्यायालयात मांडली नानी पालखीवालांनी तर विरोधी बाजूचे वकील होते शांती भूषण (प्रशांत भूषण यांचे वडील). २४ जून १९७५ रोजी न्या.कृष्ण अय्यर यांनी दिलेला निकाल मात्र बुचकळ्यात पाडणारा होता. अय्यर यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला तर स्थगिती दिली पण त्याचवेळी इंदिरा गांधींवर काही बंधने टाकली. ही बंधने होती-- लोकसभेत मतदान करता येणार नाही, लोकसभेच्या सदस्यत्वासाठी मिळणारा पगार (आणि भत्ते) घेता येणार नाही, एक लोकसभा सदस्य म्हणून लोकसभेत चर्चेत भाग घेता येणार नाही.पण पंतप्रधान म्हणून पगार घेता येईल, लोकसभेत सरकारच्या वतीने निवेदनेही देता येतील आणि पंतप्रधानपदावर कायम राहता येईल. म्हणजेच अय्यर यांच्या निकालाने लोंबकळलेली परिस्थिती निर्माण झाली. त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबादल केला असता तर तो इंदिरा गांधींचा विजय ठरला असता. जर का त्यांनी तो निर्णय योग्य आहे असा निवाडा दिला असता तर तो इंदिरा गांधींचा निंसंशय पराभव ठरला असता. पण अय्यर यांनी दोन्ही गोष्टी केल्या नाहीत. त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला केवळ हंगामी स्थगिती दिली आणि इंदिरा गांधींचे अपील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे वर्ग केले. न्या.अय्यर यांनी त्यांच्या निकालपत्रात म्हटले---"Draconian laws do not cease to be law in courts but must alert a wakeful and quick-acting legislature." म्हणजेच न्यायाधीश न्याय देताना कायद्याला बांधिल असतात. जरी एखादा कायदा अयोग्य असला तरी जोपर्यंत तो कायदा कायदेपुस्तकात (statute) आहे तोपर्यंत न्यायाधीश त्याच कायद्याला बांधिल असतात. म्हणजेच Representatives of People Act च्या ज्या कलमांतर्गत इंदिरा गांधींची निवड (भले तांत्रिक कारणांनी) रद्दबादल झाली होती ती कलमे जोपर्यंत कायद्यात आहेत तोपर्यंत खंडपीठातील न्यायाधीश त्याच कायद्याला बांधिल राहतील असा एकाप्रकारे इशाराच न्या.अय्यर यांनी दिला. ११ ऑगस्ट १९७५ रोजी इंदिरा गांधींची याचिका मुख्य न्यायाधीश ए.एन.रे आणि न्यायाधीश हंसराज खन्ना, के.के.मॅथ्यू, यशवंतराव चंद्रचूड आणि एम.एच.बेग यांच्या खंडपीठापुढे येणार होती. इंदिरा गांधींच्या सरकारने २१ जुलै १९७५ रोजी संसदेचे अधिवेशन बोलावले. या अधिवेशनात केवळ तातडीचे कामकाज घेतले जाईल असे जाहीर करून इतर महत्वाच्या गोष्टी (प्रश्नोत्तराचा तास, सदस्यांना लक्षवेधी सूचना आणता येणे) इत्यादी रद्द केल्या. या अधिवेशनात ३८ आणि ३९ व्या घटनादुरूस्ती विधेयकांना संसदेची मंजुरी घेण्यात आली. ३८ व्या घटनादुरूस्तीविषयी अन्य प्रतिसादात लिहितो. पण ३९ व्या घटनादुरूस्तीप्रमाणे पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्षांच्या लोकसभेवर झालेल्या निवडीविषयी आव्हान याचिकांवर सुनावणी कोणत्याही न्यायालयात करता येणार नाही तर त्यांच्या निवडीला कोणी आव्हान दिल्यास त्याची सुनावणी संसदेने नेमलेल्या समितीपुढे होईल असे म्हटले. त्यासाठी राज्यघटनेत ३२९ (अ) हे नवे कलम आणण्यात आले. ही ३९ वी घटनादुरूस्ती किती विलक्षण वेगाने झाली हे बघणे रोचक ठरेल. एक तर विरोधी पक्षांचे बरेचसे सदस्य आणीबाणीमुळे तुरूंगातच होते.आणि मुळातच काँग्रेसकडे असलेल्या प्रचंड बहुमतामुळे तशीही ही घटनादुरूस्ती मंजूर झालीच असती. ७ ऑगस्टला लोकसभेने तर ८ ऑगस्टला राज्यसभेने या विधेयकाला मंजुरी दिली.या विधेयकाला अर्ध्यापेक्षा जास्त राज्य विधानसभांचीही मंजुरी गरजेची होती.त्यासाठी ९ ऑगस्टला शनीवारी राज्य विधानसभांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. जवळपास सगळ्या राज्यांमध्ये काँग्रेसच सत्तेत असल्यामुळे राज्यांकडून हे पास व्हायला काहीच प्रश्न आला नाही. रविवारी १० ऑगस्टला राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांनी या विधेयकाला मंजुरी दिली आणि घटनादुरूस्ती प्रत्यक्षात झाली. तसेच Representatives of People Act मध्येही इंदिरा गांधींना अनुकूल बदल करण्यात आले. कायद्याच्या तत्वांप्रमाणे गुन्हेगारी कायदे (क्रिमीनल लॉ) पूर्वलक्षी प्रभावाने अंमलात आणता येत नाहीत.पण दिवाणी कायदे (सिव्हील लॉ) करता येतात. कुणाही लोकसभा सदस्याची लोकसभेवर झालेली निवड हा अर्थातच सिव्हील लॉचा विषय होता. त्यामुळे तो असा पूर्वलक्षी प्रभावाने अंमलात आणता आला. ११ ऑगस्टला जेव्हा पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे हा विषय सुनावणीसाठी आला तेव्हा त्यांच्यापुढे त्यावेळी जो कायदा होता त्याद्वारेच निर्णय देणे क्रमप्राप्त झाले. इंदिरा गांधींची ही खेळी म्हणजे खेळ सुरू झाल्यानंतर खेळाचे नियम बदलण्याप्रमाणे होती आणि अर्थातच असे करणे अयोग्य होते. पुढे ७ नोव्हेंबर १९७५ रोजी खंडपीठाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबादल ठरविला. अशा प्रकारे रडीचा डाव खेळून इंदिरा गांधी १९७७ च्या निवडणुकीसाठी पात्र ठरल्या.

In reply to by विकास

इंदिरा गांधींनी रायबरेलीहून १९७१ ची निवडणूक लढवली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी राजनारायण यांनी हा आरोप त्यांच्यावर करत त्यांच्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयात हा खटला दाखल केला होता. त्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तेव्हा इंदिराजींचे स्वीय सहायक असलेले यशपाल कपूर हे आय.ए.एस्. अधिकारी असण्याचा. थोडक्यात सांगायचं तर इंदिराजींनी सनदी सेवा स्वतःच्या निवडणुकीसाठी वापरली. कपूर यांनी नियमानुसार काँग्रेसचं सदस्यत्व घेण्याआधी राजीनामा दिला होता पण तो मान्य केला गेला नव्हता. तो मान्य झालाय हे गृहीत धरून कपूर इंदिराजींच्या प्रचारात सहभागी झाले पण तेव्हा तो मान्य झालेला नसल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते सनदी सेवेतच होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाने हा मुद्दा ग्राह्य धरत इंदिराजींची निवडणूक बेकायदेशीर ठरवली. अजूनही मुद्दे होते, उदाहरणार्थ उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री नारायणदत्त तथा एन.डी.तिवारी यांनी इंदिराजींना सरकारी वाहनं प्रचारासाठी दिली वगैरे. पण हा यशपाल कपूरांचा मुद्दा निर्णायक होता. न्यायमूर्ती जगमोहनलाल सिन्हा यांनी इंदिराजींची निवडणूक रद्दबातल ठरवली. त्याच्याविरूध्द त्यांनी सर्वोच्च न्यायालयात स्टे मागितला. तो त्यांना १० दिवसांसाठी मिळाला. २६ जून १९७५ या दिवशी हा स्टे संपुष्टात येणार होता. त्याच्या आदल्या दिवशीच राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी सरकारच्या ' सल्ल्यानुसार ' आणीबाणी जाहीर केली. असा सगळा घटनाक्रम आहे. (संदर्भ: बंगलोर ते रायबरेली आणि रायबरेली आणि त्यानंतर. लेखक: वि.स.वाळिंबे.)

आणीबाणीतल्या सो कॉल्ड अत्याचाराचे सुत्रधार म्हणुन ज्यांचे नाव जनसंघीय घेतात त्या संजय गांधींची बायको आणि मुलगा गेली २ दशके भाजपतर्फे निवडुन येतात आणि मनेका बाई भाजप सरकार मधे मंत्रापदी कशा असतात ? की जनसंघाचा संजय ना आतुन पाठींबा होता?

In reply to by प्रसाद१९७१

गांधीजींची हत्या गोडसे नामक एका मराठी ब्राम्हणाने केली - मारा सगळ्या मराठी ब्राम्हणांना इंदीराजींची हत्या शिखाने केली - मारा सगळ्या शिखांना तेच अनेकदा जातीय आणि धार्मिक दंगलीत सर्व धर्माच्या निष्पाप लोकांना मारताना होते.... तीच ही मनोवृत्ती आहे - demonize someone - guilt by association.

In reply to by प्रसाद१९७१

आणीबाणीतल्या सो कॉल्ड अत्याचाराचे सुत्रधार म्हणुन ज्यांचे नाव जनसंघीय घेतात त्या संजय गांधींची बायको आणि मुलगा गेली २ दशके भाजपतर्फे निवडुन येतात आणि मनेका बाई भाजप सरकार मधे मंत्रापदी कशा असतात ?
आणीबाणीचे सूत्रधार म्हणून ज्यांना दोष दिला गेला त्यापैकी अनेक नंतर काँग्रेसबरोबरच भाजपशीही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात संबंधित राहिले. १. बन्सीलालः हरियाणाचे मुख्यमंत्री असताना बन्सीलालनी संजय गांधींना मारूती फॅक्टरीसाठी जमीन मिळवून द्यायला मदत केली होती. नंतर ते डिसेंबर १९७५ मध्ये केंद्रात संरक्षणमंत्री झाले आणि १९८५ ते १९८७ या काळात परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री होते. पुढे तेच बन्सीलाल यांनी स्वतःचा हरियाणा विकास पक्ष स्थापन केला आणि १९९६ ते १९९९ या काळात ते भाजपच्या पाठिंब्यावर राज्याचे मुख्यमंत्री होते. २. विद्याचरण शुक्ला: इंदिरा गांधींची लोकसभेवरील निवड अलाहाबाद उच्च न्यायालयाने रद्दबादल केल्यानंतर इंदिरांच्या समर्थनार्थ दिल्लीजवळच्या भागातील (उत्तर प्रदेश, हरियाणा इत्यादी) अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना संजय गांधींनी दिल्लीत आणून इंदिरांना फार मोठा पाठिंबा आहे असे दाखवायचा प्रयत्न केला.यासाठी सरकारी बसगाड्यांचाही दुरूपयोग केला गेला.तसेच या जमावाला दूरदर्शन आणि आकाशवाणीवर बातम्यांमध्ये स्थान द्यावे असे संजय गांधींनी माहिती आणि प्रसारणमंत्री इंद्रकुमार गुजराल यांना सांगितले. घटनात्मक पद भूषवत नसलेल्या संजयचा आदेश गुजराल यांनी मानला नाही.त्याबद्दल त्यांची नियोजन मंत्रालयात बदली केली गेली आणि त्यांच्या जागी "सेन्सॉरशीप" साठी जबाबदार असलेल्या विद्याचरण शुक्लांना आणले गेले. त्यांनीच २००४ मध्ये भाजपचे उमेदवार म्हणून छत्तिसगडमधील महासमंद लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवली. काँग्रेसच्या अजित जोगींनी त्यांचा पराभव केला. ३. जगमोहनः शहरांचे सुशोभिकरण हा संजय गांधींचा आवडता कार्यक्रम होता. दिल्लीतील यमुनाकाठाहून जामा मशीद कोणत्याही अडथळ्याशिवाय दिसायला हवी म्हणून यमुनाकाठच्या आणि तुर्कमान गेटजवळच्या झोपडपट्या हलवायचा कार्यक्रम संजय गांधींनी राबविला.त्यात लोकांनी जायला नकार दिला म्हणून त्यांच्यावर गोळीबार झाला आणि काही अंदाजांप्रमाणे १५० पर्यंत लोक मारले गेले. जगमोहन हे त्यावेळी दिल्ली डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनमध्ये होते आणि तुर्कमान गेट प्रकरणी बदनाम झाले होते. पुढे त्यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल म्हणून चांगले काम केले. ते १९९६, १९९८ आणि १९९९ मध्ये नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले.ते वाजपेयी सरकारमध्ये मंत्रीपण होते. त्यांचा २००४ मध्ये अजय माकन यांनी पराभव केला.त्यानंतर वाढत्या वयामुळे ते सक्रीय राजकारणातून निवृत्त झाले. मागे एके ठिकाणी वाचल्याप्रमाणे ते आजही संजय गांधींनी काही चूक केली असे मानत नाहीत. ही मंडळी काँग्रेसबरोबरच कधीना कधी भाजपशीही संलग्न होतीच. तरीही मेनका गांधींची गोष्ट थोडी वेगळी आहे असे वाटते. त्यांचा संजय गांधींशी विवाह बराच लवकर (मला वाटते १९-२० वर्षाच्या असताना) झाला. संजय गांधी गेल्यानंतर १९८१-८२ मध्ये त्यांचे इंदिरा गांधींशी मतभेद झाले आणि त्यांना इंदिरांचे घर सोडावे लागले. १९८० मध्ये संजय गांधींनी आपल्या समर्थकांना मंत्रीपदे, मुख्यमंत्रीपदे (उदा. अ.र.अंतुले) मिळवून दिली होती. पण संजय गेल्यानंतर इंदिरांनी संजय समर्थकांना बाजूला करायला सुरवात केली. त्यानंतर मेनका गांधींनी राष्ट्रीय संजय मंच हा गट स्थापन करून संजय गांधींच्या "विचारांचा" प्रसार करायचा प्रयत्न केला. त्यावेळी मेनका गांधी फार तर २५ वर्षांच्या होत्या. पुढे जनता दल आणि आता भाजप असा मेनका गांधींचा प्रवास राहिला. मी जेव्हा माझे स्वतःचे वयाच्या २५ व्या वर्षीचे विचार कसे होते हे आठवतो तेव्हा माझे विचार त्यावेळी वेगळे होते हे मला जाणवते. वयानुरूप जसे अधिक जग बघतो त्याप्रमाणे वेगळे अनुभव येतात आणि त्यातून विचार बदलू शकतात. तेव्हा वयाच्या २५ व्या वर्षी संजय गांधींच्या "विचारांचा प्रसार" केला म्हणून मेनका गांधींना आयुष्यभर सुळावर चढवायची काही गरज नाही. मेनका गांधींनी बन्सीलाल, विद्याचरण शुक्ला यांच्यासारखी स्वार्थासाठी टोपी फिरवली असे तर म्हणता येणार नाही किंवा दुसर्‍या शब्दात विद्याचरण शुक्ला किंवा बन्सीलाल हे जसे गणंग होते तशा मेनका नक्कीच नाहीत. तेव्हा मेनका गांधी भाजप सरकारमध्ये मंत्री आहेत याचा अर्थ संजय गांधींना जनसंघाचा पाठिंबा होता असे म्हणणे हे सुतावरून स्वर्ग गाठणे किंवा वडाची साल पिंपळाला जोडणे वगैरे म्हणींचे उदाहरण होऊ शकेल.

आणिबाणी लागू होण्याच्या अगोदर व झाल्यानंतरच्या घटनाक्रमावर भाष्य करणारी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांची ही नवी ब्लॉगपोस्ट. आणिबाणी, नानी पालखीवाला आणि शांतीभूषण. माहितीपूर्ण प्रतिक्रिया आवडल्या. विषय उपस्थित करण्यासाठी व मध्यम लांबीचे शीर्षक देण्यासाठी माहितगार साहेबांचे आभार.

४) आणिबाणीचा घटनाक्रम कसा होता ? १२ जून १९७५ - अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणुक रद्द केली व त्यांना पुढील ६ वर्षे निवडणुक लढविण्यास बंदी घातली. २४ जून १९७५ - सर्वोच्च न्यायालयाची वरील निर्णयाला स्थगिती २५ जून १९७५ - आणिबाणीची घोषणा ७ नोव्हेंबर १९७५ - सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा गांधींना निर्दोष ठरविले. जानेवारी १९७७ - सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा. अनेक विरोधी नेत्यांची कारावासातून मुक्तता मार्च १९७७ - निवडणुकीत जनता पक्षाला स्पष्ट बहुमत. राजीनामा देण्यापूर्वी आणिबाणी ऊठविण्याची इंदिरा गांधीची घोषणा ५) आणिबाणी विषयक कोणकोणती माहिती उपलब्ध आहे आणि कोणती माहिती उपलब्ध नाही नक्की कोणत्या सल्लागारांवर विसंबून इंदिरा गांधींनी आणिबाणी आणली, त्यांना पक्षातील नक्की कोणाची भीति वाटत होती, आणिबाणी जाहीर करणे व नंतर निवडणुका जाहीर करणे यासाठी नक्की कोणत्या ज्योतिषांनी त्यांना सल्ले दिले होते, आणिबाणीच्या कालखंडात आर के धवन, स्वामी धीरेंद्र ब्रह्मचारी यांची नक्की कोणती भूमिका होती इ. अनेक गोष्टी आजही अनुत्तरीत आहेत. ६) त्यांनी आणिबाणी करण्यास कोणती पार्श्वभूमी कारणीभूत ठरली ? पूर्वीच्या प्रतिसादात उत्तर दिले आहे. (क्रमशः)

In reply to by श्रीगुरुजी

जे जे वाचतो आहे त्यात माहित नसलेले काही ना काही वाचण्यास मिळते आहे. अजूनही प्रश्न/शंका सुचताहेत पण ते कदाचित आपसूकच प्रतिसादातून येतील म्हणून नंतर विचारेन. सध्या एक चांगला वाचक म्हणुन पु.ले.शु.

In reply to by श्रीगुरुजी

स्वामी धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्या बद्दल इंग्रजी विकिपीडियावरील माहिती तपासली, केवळ योगाच्या बिझनेसवर त्या काळात खाजगी विमान बाळगणे म्हणजे ग्रेटच प्रकरण होते वाटते. (अवांतर: धीरेंद्र ब्रह्मचारी १९७० च्या काळात दूरदर्शनवरून आणि दिल्ली प्रशासनाच्या शैक्षणिक संस्थातून योग शिकवत. इती इंग्रजी विकिपीडिया याला लोकप्रीय व्यक्तींच्या योगाचा योगा योग म्हणावे काय ? :) काँग्रेसने २०१५च्या योगा डे वर बहिष्कार टाकणे त्यांच्या १९७०च्या इतिहासास अनुसरून नव्हते असे दिसते :) (ह. घ्या.) )

In reply to by श्रीगुरुजी

५) आणिबाणी विषयक कोणकोणती माहिती उपलब्ध आहे आणि कोणती माहिती उपलब्ध नाही नक्की कोणत्या सल्लागारांवर विसंबून इंदिरा गांधींनी आणिबाणी आणली, त्यांना पक्षातील नक्की कोणाची भीति वाटत होती, आणिबाणी जाहीर करणे व नंतर निवडणुका जाहीर करणे यासाठी नक्की कोणत्या ज्योतिषांनी त्यांना सल्ले दिले होते, आणिबाणीच्या कालखंडात आर के धवन, स्वामी धीरेंद्र ब्रह्मचारी यांची नक्की कोणती भूमिका होती इ. अनेक गोष्टी आजही अनुत्तरीत आहेत.
याच्याशी थोडासा असहमत. पूर्ण माहिती नक्कीच आता आपल्याकडे नाही. परंतु सिद्धार्थ शंकर रे यांनी एका पत्रा मधून आणीबाणी चा सल्ला दिला होता. त्याच पत्रात संविधानाच्या कक्षेत राहून पण कश्या पद्धतीने लोकशाही अधिकार काढून घेतले जाऊ शकतात याची त्यांनी माहिती दिली होती. हे पत्र आजच प्रकाशित झालेल्या कुमि कपूर यांच्या पुस्तकात आहे. त्यानुसार जानेवारी १९७५ ला हे पत्र पाठवण्यात आले होते. त्या पत्राची मागणी इंदिरा गांधी यांच्याकडून झाली कि ते पत्र सिद्धार्थ शंकर रे यांनी स्वतःच पाठवले हे पाहायला लगेल. या पत्राचा विचार इंदिरा गांधी यांनी कधी केला हे पण समजले नाही. पण जानेवारी मध्ये जर हे पत्र दिले असेल तर त्यांच्या मनात आणीबाणी फक्त १२ जून नंतर आली असे म्हणता येईल का? आणीबाणी शिवाय स्वतःला पर्याय नाही म्हणून त्यांनी आणीबाणी त्यावेळी जाहीर केली का? तसेच १९७७ मध्ये असे काय घडले कि त्यांनी निवडणुका जाहीर केल्या? आर. के. धवन यांच्याबद्दल पाहायला लागेल. सध्या तवलीन सिंग यांचे दरबार पुस्तक वाचत आहे त्यामध्ये बरेच संदर्भ आहेत. जर काही मिळाले तर जरूर शेअर करेन.

७) आणिबाणीस आंतरराष्ट्रीय राजकारणाचे आणि/अथवा अर्थशास्त्रीय पैलू होते का ? ते कोणते होते ? आणिबाणी आणण्याचा व आंतरराष्ट्रीय राजकारणाचा तसा काहीही संबंध नव्हता. सीआयए च्या कारवाया रोखण्यासाठी आणिबाणी आणली हा केतकरांचा एक अत्यंत हास्यास्पद व जावईशोध आहे. अर्थशास्त्रीय पैलूही नव्हते. महागाई, गरीबी, भ्रष्टाचार, दुष्काळ इ. समस्या आजही आहेत व त्याही काळात होत्या. परंतु आणिबाणी आणण्याइतके त्यांचे स्वरूप अक्राळविक्राळ नव्हते. किंबहुना आणिबाणी आणल्यानंतर सुद्धा या समस्यांकडे संपूर्ण दुर्लक्षच केले गेले होते कारण आणिबाणी आणण्यामागे ते कारण नव्हतेच. ८) आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधीच्या विरोधात कोण कोण होते आणि का ? आणिबाणीला बहुसंख्य काँग्रेसजनांचा बाय डीफॉल्ट पाठिंबा होता, कारण बाईंच्या विरोधात बोलण्याची कोणाचीच हिंमत नव्हती. आणिबाणीच्या विरोधात काँग्रेसमधील फारच थोडे नेते होते. तत्कालीन नभोवाणी मंत्री इंद्रकुमार गुजरालांनी आणिबाणीला विरोध केल्यावर त्यांना मंत्रीपदावरून काढून टाकण्यात आले व त्यांच्या जागी विद्याचरण शुक्ला आले. यशवंतराव चव्हाणांचा आणिबाणीला मूक विरोध होता, पण जाहीररित्या पाठिंबा होता. बन्सीलाल, विद्याचरण शुक्ला, शंकरराव चव्हाण, देवराज अर्स, देवकांत बारूआ इ. काँग्रेस नेत्यांचा आणिबाणीला जाहीर पाठिंबा होता. विरोधी पक्षांपैकी शिवसेना, उजवे कम्युनिस्ट, नॅशनल कॉन्फरन्स इ. पक्षांनी आणिबाणीला पाठिंबा दिला होता. दुसरीकडे जनसंघ, समाजवादी पक्ष (हा मुलायम सिंगचा समाजवादी पक्ष नव्हे. हा एस एम जोशी, ना ग गोरे, मधु लिमये, मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस इ. चा समाजवादी पक्ष), संघटना काँग्रेस, भालोद इ. पक्षांचा विरोध होता. रा. स्व. संघाने आणिबाणीला विरोध केला होता. आणिबाणीच्या काळात तुरूंगात टाकलेल्यांपैकी सर्वाधिक नेते व कार्यकर्ते जनसंघ, समाजवादी पक्ष व संघाचे होते. ९) आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधी सोबत/बाजूने कोण कोण होते त्यांनी काय काय भूमिका पार पाडल्या ? वर उत्तर दिले आहे. बन्सीलाल, विद्याचरण शुक्ला, संजय गांधी इ. नी आणिबाणीतील तरतुदींचा फायदा घेऊन अत्यंत निष्ठुरपणे आपल्या विरोधकांना तुरूंगात डांबून प्रचंड दडपशाही केली. (क्रमशः)

In reply to by श्रीगुरुजी

उजवे कम्युनिस्ट
हे कोण होते ?
यशवंतराव चव्हाणांचा आणिबाणीला मूक विरोध होता, पण जाहीररित्या पाठिंबा होता.
हे यशवंतरावांचे वास्तव होते का महाराष्ट्रातील बुद्धीवादी लोकांपुढे दुहेरी भूमिका वठवणे होते ? (सहज विचारले, यशवंतरांवांच्या रोल विषयी मला काहीच माहिती नाही)

In reply to by माहितगार

उजवे कम्युनिस्ट म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष अर्थात भाकप (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया) आणि डावे कम्युनिस्ट म्हणजे माकप म्हणजेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट). यातल्या भाकपने आणिबाणीला पाठिंबा दिला होता. सध्या भाकपमध्ये डी. राजा, ए बी बर्धन इ. नेते आहेत. गोविंद पानसरे, इंद्रजित गुप्ता सुद्धा भाकपमध्ये होते. पूर्वी श्री. अ. डांगे हे पण भाकपमध्ये होते. माकपमध्ये प्रकाश कराट, वृंदा कराट, सोमनाथ चटर्जी, ज्योति बसू, हरकिशन सिंग सुरजीत, सीताराम येचुरी इ. आजी/माजी नेते आहेत्/होते. >>> हे यशवंतरावांचे वास्तव होते का महाराष्ट्रातील बुद्धीवादी लोकांपुढे दुहेरी भूमिका वठवणे होते ? यशवंतराव हे अत्यंत सुसंस्कृत, मृदुभाषी असे नेते होते. त्यांनी कधीही टोकाची भूमिका घेतली नाही. विरोधाकरीता विरोध न करता सर्वांना खूष ठेवण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांना कायम कुंपणावरचे समजले गेले. पक्षशिस्तीमुळे त्यांना आणिबाणीला विरोध करता आला नव्हता (अशी वंदता होती की इंदिरा गांधींबरोबरच्या एका भेटीत त्यांनी आणिबाणीविषयी नाराजी व्यक्त केली होती, परंतु काहीतरी दडपण आणल्यामुळे त्यांना आणिबाणीला पाठिंबा जाहीर करावा लागला.).

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

उजवे कम्युनिस्ट म्हणजे राजकारणात ज्यांना उजवे समजले जात त्या अर्थाने नाही. भाकपला उजवे कम्युनिस्ट हा मराठी वृत्तपत्रांनी शोधलेला शब्द आहे. इंग्लिश मध्ये हा शब्द वापरला जात नाही. चीनच्या युद्धानंतर तत्कालीन कम्युनिस्ट पक्षात फूट पडून श्री. अ. डांगे यांच्या नेतृत्वाखाली जो तुकडा तयार झाला तो भाकप. डांग्यांच्या चीनच्या आक्रमणाला विरोध होता तर इतर बर्‍याच कम्युनिस्ट नेत्यांनी चीनच्या सेनेचे मुक्तिसेना असे स्वागत केले होते. चीनचे केले ते आक्रमण का अतिक्रमण यावर कम्युनिस्ट पक्षात बराच काळ बौद्धिक सुरू होते. शेवटी पक्ष फुटला. डांगे यांचा नेहरूंच्या काही निर्णयांनाही पाठिंबा होता. त्यामुळे कदाचित माकप नेत्यांनी भाकपचा "उजव्या" विचारांचे कम्युनिस्ट अशी हेटाळणी केली असावी.

१०) आणिबाणीच्या काळातील कोणाकोणाच्या कोणकोणत्या कृतीवर कुणी आणि का टिका केली करतात? आणिबाणी विवाद्य का ठरली ? प्रचंड दडपशाही, विनाचौकशी विरोधकांना व विरोधी कार्यकर्त्यांना तुरूंगात डांबणे, तुरूंगात छळ करणे, सर्व माध्यमांवर सेन्सॉरशिप, न्यायसंस्थांवर दडपण, लोकशाहीवर घाला, संघ व इतर काही संघटनांवर बंदी इ. कारणांमुळे आणिबाणी विवाद्य ठरली. आणिबाणीवर फारशी जाहीर टीका झाली नाही कारण बहुतेक सर्व विरोधक तुरूंगात होते व माध्यमांवर सेन्सॉरशिप असल्याने टीका छापलीच जात नव्हती. जेव्हा जेव्हा काही जणांनी टीका केली तेव्हा लगेचच त्यांना तुरूंगात टाकण्यात आले. आणिबाणीला तत्कालीन जनसंघ खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी विरोध केल्यावर पोलिस त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या मागावर होते. ते लपून राहिले होते. ज्या दिवशी आणिबाणीवर राज्यसभेत मतदान होणार होते त्यावेळी अचानक ते राज्यसभेत हजर राहिले व त्यांनी विरोधात मतदान केले. ते संसदेच्या सभागृहात असल्याने पोलिस त्यांना पकडू शकले नाहीत. नंतर ते अचानक बेपत्ता झाले व काही दिवसांनी एकदम लंडनमध्ये प्रकट झाले. पोलिसांना गुंगारा देऊन ते भारताबाहेर कसे गेले हे अजूनही गूढ आहे. (क्रमशः)

In reply to by श्रीगुरुजी

स्वतःच्या बर्‍याच मंत्र्यांना आणि अधिकार्‍यांनाही थांगपत्ता न लागू देता रातोरात असंख्यांचे अटक सत्र झाल्याचे म्हटले जाते. ज्यांची अटक करावयाची त्यांच्या याद्या कोणी बनवल्या आणि त्या अटक करणार्‍या अधिकार्‍यांपर्यंत कशा पोहोचल्या. जनता पक्षाने काही चौकशी आयोग गठीत केले होते का आणि त्यांच्या चौकशीतून आणिबाणी विषयक काही माहिती अथवा खुलासे होऊ शकले का ?

In reply to by आदूबाळ

धन्यवाद. भारतात शाह कमिशनची रिपोर्टची प्रतसुद्धा राहू न देणे म्हणजे जरा अतीच होते. एनी वे काळ बदलला आहे. तुमच्या दुव्यामुळे मीही जरा खोदकाम करून अर्काईव्ह डॉट ऑर्गवर कमिशन रिपोर्टची प्रत शोधली.

In reply to by माहितगार

शाह कमिशन चा रिपोर्ट तीन भागात विभागला गेला आहे. पहिला अंतरिम रिपोर्ट, दुसरा अंतरिम रिपोर्ट आणि तिसरा रिपोर्ट. तुम्ही ज्याची लिंक दिली आहे तो फक्त शेवटचा भाग आहे. परंतु तुम्ही अजून थोडे खोदकाम केलेत तर पहिले दोन्ही भागही त्याच वेबसाईट वर मिळून जातील.

In reply to by माहितगार

>>> ज्यांची अटक करावयाची त्यांच्या याद्या कोणी बनवल्या आणि त्या अटक करणार्‍या अधिकार्‍यांपर्यंत कशा पोहोचल्या. आणिबाणी २५ जून च्या रात्रीत घोषित केल्यावर काही तासातच अनेक विरोधी नेते गजाआड केले होते. रातोरात सरकारी अधिकारी वृत्तपत्रांच्या कचेर्‍यात पोहोचले व दुसर्‍या दिवशी छापण्यात येणार्‍या मजकुराची तपासणी करून नको असलेला मजकूर वगळायला लावला. याचा अर्थ आणिबाणी लादण्याची पूर्वतयारी आधीच झाली होती (बहुतेक १२ जून या दिवसापासूनच तयारी सुरू झाली असावी) आणि अधिकृत घोषणा २५ जूनला केली.

In reply to by श्रीगुरुजी

आणिबाणीत इंदिराजींची साथ देणार्‍या अथवा आसपासच्या आता उरलेल्या धवन , मुखर्जी मंडळींनी खरी खरी माहिती आता ४० वर्षांनतंर तरी द्यावयास हवी होती. सचीव पातळीवरील किमान काही अधिकार्‍यांना शिक्षा सुनावली गेली असती तरी त्यांनी तोंडे उघडली असती असे वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

अजून एक गंमत झाली होती. मध्यप्रदेशातील विजयाराजे शिंदे व माधवराव शिंदे आणिबाणीपूर्वी जनसंघात होते. २५ जून नंतर विजयाराजे शिंदेंना अटक होऊन त्यांना तुरूंगात टाकले गेले. तुरूंगवास टाळण्यासाठी माधवराव नेपाळला निघून गेले. इंदिरा गांधींनी बहुतेक तिथे त्यांच्याशी संपर्क करून काही आश्वासन दिले असावे. कारण काही काळानंतर माधवराव नेपाळहून परतले व परत आल्यावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला व अटक टाळली. त्या दिवसापासून माधवराव शिंदे व नंतर त्यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्येच आहेत. विजयाराजे शिंदे मात्र निधन होईपर्यंत भाजपमध्येच होत्या. १९९६ मध्ये हवाला प्रकरणात नाव आल्यावर नरसिंहरावांनी संधी साधून त्यांना लोकसभेचे तिकीट दिले नव्हते. हवालाच्या निमित्ताने नरसिंहरावांनी पक्षांतर्गत विरोधक व इतर पक्षातील विरोधकांवर राजकीय खेळी केली होती. माधवरावांनी तिकीट नाकारल्यावर स्वतःचा वेगळा स्थानिक पक्ष काढून ते लोकसभेवर निवडून आले व नंतर सीताराम केसरी अध्यक्ष झाल्यावर त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश दिला.

In reply to by श्रीगुरुजी

एकदा घरातली जुनी पुस्तके लावत असताना एका पुस्तकावर ६९ सालच्या मराठी वृत्तपत्राचे कव्हर घातलेले होते. ते पहील्या पानाचे कव्हर होते. त्यावरील बातम्या वाचताना गंमत वाटली... एकीकडे नुकत्याच पार पडलेल्या अपोलो मिशन वरून काहीतरी बातमी होती. काँग्रेस फुटण्याची घटना ताजी आणि देशांतर्गत महत्वाची असल्याने ती जास्त ठळक होती. आणि त्या खाली एका चौकटीत छोटी बातमी होती त्याचे शिर्षक असे काहीसे होते... "विजयाराजे काँग्रेसमधे जाणार, माधवराव मात्र जनसंघातच रहाणार!" अर्थात हे वाचल्याला अनेक वर्षे झाली. स्मार्टफोनचा जमाना नव्हता. रोलच्या आणि फ्लॅश नसलेल्या कॅमेर्‍यातून त्याचा फोटो वगैरे काढण्याचा प्रश्नच नव्हता! ;) कदाचीत ते पुस्तक अजूनही घरात असेल इतकेच. तरी देखील आत्ता जरा वर विषय आल्याने जालावर चाळले. माधवराव जनसंघातून १९७१ साली प्रथम निवडून आले. नंतर ते जनसंघातून बाहेर पडले अथवा जनता पार्टीत गेले नाहीत. पण ७७ साली स्वतंत्र उमेदवार म्हणून परत निवडून आले. आणि ८० मधे काँग्रेसमधे गेले. विजयाराजे यांच्या बद्दल विकीनुसार, ६७ साली त्या काँग्रेसमधून बाहेर आल्या आणि स्वतंत्रता पार्टीतून जिंकल्या. नंतर जनसंघात गेल्या आणि कायमची बांधिलकी ठेवली.

In reply to by श्रीगुरुजी

विजयाराजे यांना अजून अटक झाली नव्हती आणि त्या पोलिसांना सापडतही नव्हत्या. तेव्हा अचानक बातमी कळली कि त्या दिल्ली मध्ये सरेंडर करणार आहेत. तेव्हा तवलीन सिंग, मार्क टली आणि इतर रिपोर्टर चांदणी चौकात दिवसभर वाट पाहत राहिले. त्यादिवशी विजयाराजे काही आल्याच नाहीत. त्या घरी गेल्या तेव्हा त्यांची आई गेस्ट रूम मध्ये ताट घेऊन जाताना दिसली. कोण आले आहे असे विचारणा केली तर तुझ्या ओळखीचे नाहीत असे उत्तर त्यांना मिळाले. जेव्हा काही आठवड्यानंतर विजयाराजे यांना अटक झाली तेव्हा तवलीन सिंग यांना कळले कि त्या दिवशी विजयाराजे त्यांच्या घरी मुक्कामास होत्या.

आणिबाणीचे दिवस चांगलेच लक्षात आहेत. त्या शाळकरी वयात घरी वडिलांच्या मित्रांच्या आणिबाणीवर झालेल्या चर्चा स्पष्ट आठवतात. तो भयान दुष्काळ, अमेरिकेतून आयात केलेला लाल गहू (मिलो) गुरंही तोंड लावणार नाही अशी त्याची चव. मिलो खावून मेलो असे गमतीने म्हटले जायचे. केतकरसरांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरच जेपी आणि जॉर्ज फर्नांडिसांनी देशात अराजक माजवले होते. नाइलाजाने इंदिराजींना आणिबाणी पुकारावी लागली. मिसाखाली (मेंटेनंस ऑफ इंटर्नल सिक्युरिटी अ‍ॅक्ट) विरोधकांची धरपकड चालू झाली. पुढे संजय गांधीच्या गरिब हटाओ व सक्तीच्या नसबंदी मोहीमेमुळे अनेक अप्रिय घडामोडी झाल्या ज्यामुळे इंदिराजींची बदनामी झाली. वैयक्तीक महत्वाकांक्षेने पछाडलेले मोरारजी अखेर पंतप्रधान झाले. आल्याआल्या संशयी जनता पार्टीच्या कोल्ह्यांनी इंदीराजींनी खोल जमिनीत गाडलेली कालकुपी खोदुन वर काढली ज्यात आक्षेपार्ह काहीही आढळले नाही,परंतू मोरारजी सरकारचे हसू झाले. मोरारजींच्या उतावळेपणामुळे जेपींच्या म्रुत्युच्या शाळेला दोन वेळा सुट्ट्या मिळाल्या होत्या. जेपींच्या मृत्युच्या अफवेची शहानिशा न करता मोरारजींनी संसदेत श्रधांजली वाहीली व सरकारी कार्यालये शाळांना सुट्टी घोषित केली. जनता पक्षात विदुषक राज नारायण चरणसिंगांसारखे नमूने भरले होते. मोरारजींचे पंतप्रधानपद घालवण्यास ह्या दोघांची मोलाची भुमिका होती. पुढे चरणसिंगांचे सरकार आले ते ही पडले. पुन्हा इंदिराजीचे सरकार आले. असे काय मधल्या काळात घडले ज्यामूळे एके काळी जनतेने व्हिलन ठरवलेल्या इंदिराजींना पुन्हा सत्तेत आणले. आणिबाणीच्या काळातील अनेक आठवणी जागृत झाल्या. 'अनुशासनही शासनको मजबूत बनाता है' अशा प्रकारची घोषवाक्य एसटी वर लिहिलेली असत. प्राप्तिकर भरा देश वाचवा असे आवाहन केले जायचे. सरकारी कामे अगदी शिस्तीत होउ लागली. एसटीच्या गाड्या वेळेवर धावू लागल्या. किशोर कुमारच्या गाण्यांना आकाशवाणी व दुरदर्शनवर बंदी होती त्यामुळे आम्ही बच्चे कंपनी नाराज होतो. काँग्रेसच्या पराभवानंतर दिल्ली दूरदर्शनवर एका कार्यक्रमात किशोरकुमारांनी गाढवासारखे लोळून ह्याचे उट्टे काढले. जनता पक्षाचा प्रचार करणार्‍या पुलंनी अखेर जनता पक्षाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून उद्वेगाने झाले गेले ते 'जन्तात' जाउ दे असे म्हटल्याचे स्मरते.

In reply to by ऋतुराज चित्रे

वेगवेगळी फुले उमलली रचुनि त्यांचे झेले एकमेकांवरी उधळले गेले, ते दिन गेले ! किंवा आंग्ल भाषेत... (आणिबाणीचे) Good old days!

In reply to by ऋतुराज चित्रे

>>> तो भयान दुष्काळ, अमेरिकेतून आयात केलेला लाल गहू (मिलो) गुरंही तोंड लावणार नाही अशी त्याची चव. मिलो खावून मेलो असे गमतीने म्हटले जायचे. मिलो भारतात १९७२-७३ मध्ये होता, १९७५ मध्ये नव्हता. >>> केतकरसरांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरच जेपी आणि जॉर्ज फर्नांडिसांनी देशात अराजक माजवले होते. नाइलाजाने इंदिराजींना आणिबाणी पुकारावी लागली. असहमत. १९७५ साली देशात कोणतीही अराजकाची परिस्थिती नव्हती. महागाई, भ्रष्टाचार, विद्यार्थ्यांची आंदोलने, रेल्वे संप असे कोणतेही कारण आणिबाणीसाठी समर्थनीय नव्हते. ही कारणे नंतरच्या काळात होती आणि आजही आहेत, तरीसुद्धा आणिबाणीची परिस्थिती नाही. तसं पाहिलं तर १९८४ आणि १९९२-९३ च्या दंगलीच्या काळात १९७५ च्या तुलनेत कितीतरी जास्त पटीने भयानक परिस्थिती होती. तरीसुद्धा आणिबाणीची गरज वाटली नव्हती. इंदिरा गांधींनी नाईलाजाने आणिबाणी आणली नव्हती, तर न्यायालयाच्या निर्णयामुळे आपली सत्ता जाउ नये यासाठी बागुलबुवा निर्माण करून निरंकुश सत्ता आपल्या हातात यावी यासाठी त्यांनी आणिबाणीचे भयानक पाउल उचलले. >>> पुढे चरणसिंगांचे सरकार आले ते ही पडले. पुन्हा इंदिराजीचे सरकार आले. असे काय मधल्या काळात घडले ज्यामूळे एके काळी जनतेने व्हिलन ठरवलेल्या इंदिराजींना पुन्हा सत्तेत आणले. जनता पक्षाला बहुमत मिळाल्यावर पंतप्रधानपदासाठी मोरारजी, चरणसिंग व जगजीवन राम उत्सुक होते. आचार्य कृपलानी व जयप्रकाश नारायणांनी मोरारजींच्या पारड्यात वजन टाकल्याने ते पंतप्रधान झाले. 'एक चमार इस देश का प्रधानमंत्री कभी नही बन सकता' असे उद्गार त्यावेळी जगजीवन राम यांनी काढले होते (जगजीवन राम जातीने चांभार होते). चरणसिंगही नाराज होते. इंदिरा गांधींनी अत्यंत चातुर्याने चरणसिंगांना भरीला घालून जनता पक्षात फूट पाडली व मोरारजींचे सरकार पाडले. त्यानंतर २१ दिवसात आपल्या पाठिंब्यावर उभे राहिलेले चरणसिंगांचेही सरकार पाडले. (१९९०-९१ मध्ये आधी वि.प्र.सिंग व नंतर आपल्या पाठिंब्यावर चाललेले चंद्रशेखर यांचे सरकार काँग्रेसने असेच पाडले होते. नंतर १९९७ मध्ये आधी देवेगौडा व नंतर इंद्रकुमार गुजरालांचे सरकारही काँग्रेसने पाडले.) जनता पक्षात पूर्वाश्रमीच्या जनसंघ नेत्यांचे संघाशी अजूनही संबंध टिकून आहेत हे बघून चवताळलेल्या मधू लिमयांनी दुहेरी निष्ठेचा मुद्दा उकरून काढून समाजवादी व जनसंघ नेत्यात भांडणे लावून दिली. शेवटी निवडणुक झाल्यावर जनता पक्षातल्या लाथाळ्यांना कंटाळलेल्या व दोन तुकडे पडलेल्या जनता पक्षाला जनतेने नाकारून काँग्रेसला निवडून दिले.