Skip to main content

शरयत

लेखक आतिवास यांनी रविवार, 25/01/2015 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी साळा. कालच्याला अब्यास न्हौता, लई खेळ्ळो. तीन पायाच्या शरयतीत नुस्ती पडापड. तोंडात चम्चा अन चम्च्यात लिंबू ठिवून पळायचीबी येक शरयत. सोपी नसतीय. पन माजा पैला नंबर आला. आज साळंत झेंडा उबारला. समदी झ्याक ‘जनगणमन’ बोल्ली. कोणकी आजीबाई आलत्या, तेंनी कायबाय सांगितलं. समजलं नाय काय मला, तरीबी म्या टाळया वाजिवल्या. मंग बक्शीसं दिली. अंक्याला लब्बर, भान्याला पटटी. गुर्जीन्नी मला बोलिवलं. म्या आज्जीबाईच्या जवळ ग्येली. त्या म्हन्ल्या, “बाळ, तुला मोठेपणी काय व्हायचं आहे?” “शरयतवाली” म्या बोल्ली. त्या हसल्या. म्हन्ल्या, “आमचीही शर्यतच चालू आहे कधीपासून. सगळया मुलामुलींना शिकता यावं ही शर्यत.” म्हन्जे समदे नाय शिकले, तर आज्जीबाई शरयत हरणार? औघड हाये. * शतशब्दकथा
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 15269
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

आंजीच्या भावना आणि परिस्थितीचे चपखल वर्णन. आंजी आवडलीच.

ते 'शरयत' पाहून मला वाटलं अफगाणिस्तानसंबंधीचा लेख आहे की काय. उघडल्यावर आंजीकथा आहे हा उलगडा झाला. ह्यावेळची इतकी भारी नाही, पण शेवट खास आतिवास स्टाइलने.

आजची आंजी उद्याची आज्जी असते

नेहमीप्रमाणेच कडक लेखन.

ते 'शरयत' पाहून मला वाटलं अफगाणिस्तानसंबंधीचा लेख आहे की काय. उघडल्यावर आंजीकथा आहे हा उलगडा झाला. ह्यावेळची इतकी भारी नाही, पण शेवट खास आतिवास स्टाइलने.+१

दिवसेंदिवस आंजीचे सवाल नेमके होत चाललेत. वाढत्या समजेचा परिणाम?

आंजी आपल्या भावना खूप सुंदर रितीने व्यक्त करते! २६ जानेवारी आणि देशाचे भविष्य यांचा मस्त सांगड घातली आहे.

छान लिहिलंय. अवांतर - +३ - मीही क्षणभर 'शरियत' असं वाचलं... तुमचं अफगाणिस्तान लेखन वाचल्याचा परिणाम असावा.

आहा!

आंजी आणि आज्जी दोन्हीबी जितू दे आपल्या आप्ल्या शरयतीत काय!!

अशा शतशब्दकथांच्या शीर्षकात कथाप्रकाराचा उल्लेख असावा असे सुचवतो. उदा. 'शतशब्दकथा - शरयत'.

ही आंजी आपल्याला खुदकन हसवून लगेच लहानपणात घेउन जाते. छानच.

वॉव.. *good*

लई ब्येस ! आन्जीला आमच्याकडनं येक वासाचा लब्बर . . ! :)

सर्वांचे आभार. शरयत - शरियत गोंधळ होऊ शकतो हे ध्यानात आलं नाही - क्षमस्व!