Skip to main content

टकाटक

लेखक आतिवास यांनी सोमवार, 21/10/2013 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
परारथना झाली की हजरी घेतेत गुर्जी. घरी बसलेल्यांना पकडून आणाया पोरास्नी पळवत्यात. कंदी कामं असत्यात. तळ्यावरनं पाणी आणा; अंगण झाडा; फळा काळा करा. गमभन लिऊन झालं की पाडे. लंबरपरमानं येकेकाला हुबा करतेत. तेनं वरडायचं, “येक रे ..” की आमी “येकाचा”. धापत्तुर. मंग “येकावर येक अकरा”. पन्नासपत्तुर. गुर्जी येकदम बायेर. च्या प्यायाला, तमाकू खायाला. रोजला तेच. म्या पेंगाया लाग्ली. मंगली वराडली, “आन्जे, पाडे म्हन, नायतर गुर्जीस्नी नाव सांगते बग”. शिवाजीम्हाराज समजतेय सोताला. मंगली वराडली, “साहा रे” म्या हळूच “आटाचा” बोल्ली. कुणाला कायबी नाय समजलं. मंगली, “येकावर चार” म्या, “पंचेईस” समद्यांच्यात कायबी म्हन्लं तर चालतंय – फकस्त हळू म्हनायचं. म्या जागीच झाली. टकाटक. *शतशब्दकथा*
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 12605
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

लईच भारी . . :) आमची शाळा आटवली !

शतशब्दकथा बास जाली की ताई ! म्ह्जी तुमी पायवाट दावली. बाकीचे त्यावरुन चालतील आणी रस्ता बनलं. आता नवीन कायतरी फारम्यॉट आणा की ! जमलं तर ते पयल्यासारखे सबेचे रपट लिवा की ! लै ग्वाडं लागतात वाचाया !

In reply to by मुक्त विहारि

शाळा ते कामगार सभा कुठेही हा फंडा वापरा... हं! हे नव्हतं लक्षात आलं माझ्या कधी :-)

.

त्याच अस हाय बगा, ह्या आंजीन शिकशनाची बराबर नसच पकडल्या बगा, म्हंजे साळत कशासाटन जायाच? शान व्हाया, एव्हार कळाया म्हनुनच कनी? मग आता ही शानी बी व्हाल्या, आन एव्हारबी कळतोया. एकून साळा जे शिकवायच त्ये शिकवाया लागली तर. अतिवासताई त्या आंजीचा माज्याकडन एक गालगुच्चा घ्ये ग!

In reply to by स्पंदना

अपर्णाताई, बघते तुमचं काम करायला जमतंय का ते :-) बाकी 'शाळा जे शिकवायं ते शिकवायला लागली तर' या भावनेशी सहमती.

आवडल .

In reply to by चतुरंग

"टकाटक" लेखन! "म्या जागीच झाली. टकाटक" आंजीला साळंत जागं र्‍हान्याचं इंगितच गावलं ! जे पी

टकाटक हा शब्द थोडासा वेगळा वाटला ह्या शतशब्दकथेतला, पण कथा नेहमीप्रमाणेच खूप गोंडस आहे आन्जीसारखीच :)

In reply to by क्रेझी

'टकाटक' या शब्दाचा प्रचलित किंवा/आणि आंतरजालीय अर्थ काय आहे याविषयी मी अनभिज्ञ आहे :-) पण तुमच्या प्रतिसादावरुन हा शब्द आंजीच्या निरागसतेला न शोभणारा आहे असं तुम्हाला वाटलं हे स्पष्ट होतंय. समर्थन नाही. पण कदाचित आंजीने हा शब्द 'झोप सगळी उडून गेली (नवी गंमत कळल्याने)' - इतक्याच मर्यादित अर्थाने वापरला असावा इथं :-)

आन्जीचा इनोसन्स आवडला.

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.

मस्तच! * वर "टकाटक" या शब्दाबद्दल चर्चा जरा वाचली. "टक्क जागी झाली" किंवा "टकटकीत जागी झाली" असा शब्दप्रयोग माहित आहे.

In reply to by पैसा

आज "टकाटक" शब्द प्रत्यक्ष ऐकला (पुन्हा एकदा). अनोळखी भागात दुचाकी पंक्चर झाली. मग समोर दिसलेल्या दुकानात गेले. त्याने अर्धा तास काही काम केलं. निघताना मी म्हटलं, "व्यवस्थित केलं आहे ना सगळं?" त्यावर तो माणूस म्हणाला, "एकदम टकाटक झालंय, काळजीचं काम नाही काही ...." :-)

In reply to by आतिवास

तुम्ही ते आगरी कोळ्यांच गाणं ऎकलं असतं तर अर्थ आधीच कळाला असता. :-)

In reply to by किसन शिंदे

जस्ट टू अ‍ॅड टू द लिस्ट.. तव्यावर केलेल्या ठराविक रेसिपीजना टकाटक म्हणतात. मुंबईत तर या रेसिपीज फेमस आहेत. खडा पावभाजीसदृश. उदा. तवा सीफूड टकाटक, तवा सब्जी टकाटक, तवा पनीर टकाटक नमुना इथे

In reply to by गवि

पुढच्या मुंबई भेटीत "तवा सब्जी टकाटक" असं म्हणून बघेन एखाद्या वेटरला; पाहू काय प्रतिक्रिया येतेय ते :-)

आवडली कथा. अश्या 'रोजला तेच' शिकवणार्‍या शाळा आहेत तर... पेंगणारच पोरं.