Skip to main content

दुकानदाराकडून अपमान..

लेखक योगी९०० यांनी मंगळवार, 09/12/2014 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षभरात दोन प्रसंग असे आले की दुकानदाराने अतिशय अपमान केला.. दोन्ही प्रसंग बोरीवलीच्या एकाच मॉल मधील दोन वेगवेगळ्या दुकानात घडले.. प्रसंग एक : हिच्यासाठी ड्रेस मटेरीयल घ्यायचे होते. मला तितका उत्साह नव्हता. कारण म्हणजे १०-१५ मिनिटाचे काम नव्हते तर चांगले दोन-तीन तास जाणार हे ओळखून होतो. त्यामुळे बोरीवलीच्या मॉलमधील एका चांगल्या दुकानात शिरल्या-शिरल्या एक मोक्याची जागा बसायला पकडली आणि शांतपणे मोबाईलवर गेम खेळू लागलो. अर्थात अगदीच निरूत्साही नव्हतो. मध्ये मध्ये तिला हा ड्रेस बघ, तो बघ तुला चांगला दिसेल असे सांगत सुद्धा होतो. हिला माझा हा स्वभाव माहित होता म्हणून तिने माझे मध्ये मध्ये बाजूला जाऊन बसणे तितके काय मनावर घेतले नव्हते (असे मला वाटले). अशीच १०-१२ मिनिटे गेल्यावर तिने चला म्हणून मला सांगितले. मी आश्चर्याने खरेदी झाली का असे विचारला. त्यावर तिने नजरेनेच दुसर्‍या दुकानात बघू या असे सांगितले. मी लगेच "इथले ड्रेस मटेरीयल नाही का आवडले?" असे तिला विचारले. यावर लगेच दुकानदार माझ्यावर डाफरला " कसे आवडेल ड्रेस मटेरीयल? आख्खे दुकान जरी दाखवले तरी त्यांना आवडणार नाही. तुम्हीच इंटरेस्ट घेत नाही मग त्या कितीही भारी कापड दाखवले तरी नाहीच म्हणणार...आमच्या दुकानात एसी खायला, आराम करायला आलात तुम्ही. तुम्ही काय खरेदी करणार?" असे इतक्या मोठ्यांनी म्हणाला. की मी एकदम अवाक झालो. दुकानातले सर्वजण माझ्याकडे पहायला लागले. त्यातल्या काही बायका माझ्याकडे विचित्र नजरेने आणि काही माझ्या मिसेसकडे सहानभुतीने पहात आहेत असे वाटले. खरतरं मला माझ्यावर कोणी असे ओरडेल असे मुळीच वाटले नव्हते त्यामुळे दुकानदाराच्या त्या अचानक झालेल्या शाब्दीक हल्याने माझी बोलती बंद झाली होती. मदतीसाठी मी तिथल्या एका पुरूषाकडे पाहिले पण त्याने माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले. आणि आपल्या बायकोच्या खरेदीकडे लक्ष घातले. माझ्या बाजूला बसलेला एकजण हळूच उठला आणि त्याच्या बायकोच्या बाजूला उभा राहीला. मी पण मग मुकाट्याने उठलो आणि खाली मान घालून हिच्याबरोबर बाहेर पडलो. नंतर घरी दुकानदाराने केला नसेल त्याच्या शतपटीने आमचा पाणउतारा केला गेला पण बाहेरची कोणी मंडळी पहात नसल्याने त्याचे तितके काही वाटले नाही. दुकानदाराला "अरे बाबा तुला तुझ्याकडच्या कापडाचे मार्केटींग करता येत नाही किंवा तुझ्याकडे तितकी variety नाही याचा दोष मला का देतोस? किंवा मी काय तुझा नोकर आहे काय की तुझ्या कापडांचे मार्केटींग करावे?" असे काहीतरी म्हणायला पाहिजे होते असे वाटत राहीले. पण हे त्यावेळी अजिबात सुचले नाही. प्रसंग दोन: वरील प्रसंग घडल्यानंतर साधारणपणे एक वर्षानंतर त्याच मॉलमध्ये हिच्याबरोबर जायचा योग लादला गेला. यावेळी साडी खरेदी होती. आधीचा अनुभव मॉलमध्ये शिरल्या-शिरल्या डोळ्यासमोर आला आणि उगाचच उसना उत्साह चेहर्‍यावर आणला. एका साडीच्या दुकानात गेलो. तिथे १०-१५ मि. साड्या बघण्यात गेली. एखादी साडी हिला जरा आवडत आहे असे दिसल्या-दिसल्या घे घे तुला छान दिसेल, एकदम सुरेख साडी आहे असे बोलून तिला पटवायचा प्रकार चांगला दोन-तीन वेळा केला. दुकानातल्या साड्या दाखवणार्‍या माणसाला आम्ही आता काहीतरी घेणारच अशी आशा लागली. त्याने लगेच आणखी साड्या दाखवायचे थांबवले आणि तो ही दोन-तीन जरा बर्‍यापैकी आवडलेल्या सांड्यांमधली साडी घ्या असा मागे लागला. पण हिला आणखी variety पहायची होती आणि दुकानातल्या माणसाला अजुन दाखवायचा कंटाळा आला होता. त्या दोघांचा थोडा-फार वाद सुरू झाला. मी सुद्धा थोडा दमल्याने बाजूला बसलो आणि झाले. हिने एकदम निर्णय घेतला की दुसर्‍या दुकानात पाहून घेऊ. तसेच पहिल्याच दुकानात साडी काय घ्यायची चांगले दोन-तीन दुकानात पाहून काय ते ठरवू असाही विचार तिने केला. पण या मुळे तो दुकानातला माणूस माझ्यावर एकदम ओरडला, "टाईमपास करायला आलात काय? काही घ्यायचे नाही तर कशाला उगाच बसून राहीलात?". मी यावेळी हिच्यावर जरा ओरडलो," तुला आवडली असेल तर घे ना साडी. कशाला यांचे शिव्याशाप ऐकतेस?". हिचा मात्र दुसर्‍या दुकानात जायचा ठाम निश्चय होता. त्या माणसाच्या अशा बोलण्याने हीने भडकून सांगितले की एक तर अजुन variety दाखवत नाही आणि वर असे बोलता. आता काही झाले तरी तुमच्या दुकानात परत येणार नाही. मग निघालो तेथून. परत घरी आमचे भांडण झालेच. मी थोडावेळ बाजूला बसलो आणि त्या दुकानातल्या माणसाला variety दाखवायला नाही सांगितली याचा राग माझ्यावर निघाला. मी उसना उत्साह चेहर्‍यावर आणला होता हे सुद्धा हिने बरोबर ओळखले होते. (हा राग त्यानंतर दोन-तीन दिवसांनी नल्ली साडी घेतल्यावर कमी झाला). वरील दोन्ही प्रसंगात मला एक गोष्ट सारखी वाटली की दोन्ही वेळेस दुकानदारांनी नवर्‍यास (म्हणजे मला) दोषी ठरवले. ही त्यांची Strategy असावी काय? दोन्ही वेळेस "एसीची हवा खायला किंवा टाईमपास करायला आलात" अशा प्रकारची अपमान होईल अशी वाक्ये बोलली गेली. खरे तर दोन्ही प्रसंगात आम्ही दुकानदाराचा १०-१५ मिनीटांपेक्षा जास्त वेळ घेतला नव्हता. उगाच एखादा तास-दीड तास घालवला आणि असे वागलो तर समजण्यासारखे आहे. पण असे त्यांचे बोलणे बरोबर नाही वाटले. नवर्र्‍यांना हुसकवून किंवा त्यांचा पुरूषी अहंकार जागवून त्यांनी बायकोला खरेदी करण्यास भाग पाडावे असे त्यांचा हेतू असावा काय? असा अनुभव आपल्याकडील कोणाला आला आहे काय? तसेच बायकोबरोबर उत्साहाने खरेदीस कसे जावे? काय करावे म्हणजे उत्साह टिकून राहील किंवा उत्साही आहोत असे दिसेल. यावरही जाणकारांनी प्रकाश टाकावा.

वाचने 102604
प्रतिक्रिया 313

प्रतिक्रिया

उत्साह कसा दाखवावा असे म्हणतो (जरी नसला तरी..) अजून एक मार्गः असा कोणी अपमान केल्यावर खो ख्खो हंसत सुटावे. मधून मधून अपमान करणार्‍याकडे बोट दाखवून जोरजोरांत हंसावे. अपमान करणारा एकदम गोंधळून जातो आणि त्याचा 'मोरु' होतो.

आमच्या बाबतीत असा किस्सा झाला असता तर मी तर त्याला शिव्या घातल्याच असत्या पण बायकोने तर उभा सोलला असता त्याला. एकतर पैसे देवून सामान विकत घेणार मग फुकटचा माज का सहन करावा? आता झालं ते झालं पण पुढच्या वेळी असाकाही प्रकार घडला तर असाच सुक्का सोडू नका कोणाला. अवांतरः Men will be men ;) 1

अजिबात सोडायचा नव्हता त्याला. उलटं त्याच्याचं दुकानात त्याच्यावर चार गिर्‍हाईकांसमोर बाउन्सर टाकायचे. त्याला कोणाच्या जीवावर दुकान चालतं हे दाखऊन द्यायचं आणि वरुन असल्या दुकानात खरेदी करण्याएवढी वाईट परिस्थिती आली नाही असं म्हणुन बाहेर पडायचं. भांडखोर रिक्षावाले, सुट्ट्या पैशावरुन अक्कल काढणारे कंडक्टर, भुरटे दुकानदार, आपल्या बाईक ला कट मारुन जाणारे दुसरे बाईकवाले, पचापचा थुंकणारे ह्यांना कधीचं सरळं सोडायचं नाही. त्यांना त्यांची लायकी जागेवर दाखऊन द्यायची. एकदा आम्ही निगडी प्राधिकरणमधल्या फायर ब्रिगेड वाल्या चौकातल्या एका दुकानामधे जॉगिंग ट्रॅकपँट्स आणायला गेलो होतो. चार पँट काढायला लावल्या (रॅकवरुन हो) तर म्ह्णला की तुला परवडणार नाही म्हणुन. तिथल्या तिथे गर्दीमधे आवाज चढवुन त्याचा पगार, शिक्षण आणि लायकी काढली, उद्धटपणा केला म्हणुन अजुन २-३ गिर्‍हाईकं घालवली. त्या दुकानाचा शेठ \ कॅशियर जो कोण असेल तो नंतर बाहेर येऊन सॉरी वगैरे म्हणायला लागला तेव्हा त्याला आम्ही सांगीतलं की मी तर खरेदी करणार नाहीच वरुन ओळखीमधल्या सगळ्यांना ह्या **कडे खरेदी करु नका म्हणुन सांगीतलं

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

+ १००० आपण काही चिंचोके मोजत नाही कि दुकानातील विक्रेता किंवा मालक यांनी आपली लाज काढावी. आपला आवाज बुलंद असेल तर मेक्डोनाल्द चा मालक सुद्धा नम्र होतो मग त्याचे विक्रेते किंवा म्यानेजर तर सोडाच. मुलुंडच्या के एफ सी मध्ये गेलो होतो तेथे एक पार्टी चालू होती. मी आपल्या कुटुंबाबरोबर एका टेबलाशी बसलो. चार पाच मिनिटात एक वेटर येऊन मला जरा लवकर आटपा म्हणून सांगायला लागला. मी ताबडतोब त्याला वेळ विचारली. त्याने वेळ सांगताच मी त्याला बिलावरील वेळ दाखवली आणी सांगितले कि दहा मिनिटात मी जेवण आटपावे असे तुझे म्हणणे आहे काय? तुझ्या मानेजर ला बोलाव आणी लगेच तक्रार पुस्तक पण घेऊन ये. तो लगेच सोर्री म्हणायला लागला मी त्याला उंच आवाजात झाडून म्हटले कि पार्टीचे लोक पैसे देतात आणी मी काय फुकट खातो काय? तेथे शांतता पसरली पार्टीतील लोकपण बघायला लागले. म्यानेजर धावत आला आणी मला मनापासून माफी मागू लागला. मी त्याला झालेला प्रकार सांगितला आणी म्हटले मला इथला प्रमुख व्यवस्थापक कोण आहे त्याला भेटायचे आहे त्यावर तो म्हणाला साहेब मीच प्रमुख आहे मी त्याचे नाव पाहिले( ते गायकवाड होते). आणी म्हणाला साहेब तुम्हाला पाहिजे तितका वेळ बसा. मी त्याला उरलेली डीश पार्सल करून द्यायला सांगितली आणी तक्रार पुस्तक आणायला सांगितले. त्याने परत परत माफी मागितली. मी त्याला सांगितले कि गायकवाड साहेब तुम्ही केवळ मराठी आहात म्हणून मी लेखी तक्रार करीत नाही अन्यथा मी असे सोडले नसते. गायकवाड साहेबांनी त्या वेटर ची कडक शब्दात सर्वांसमोर हजेरी घेतली. मला जाताना तीन SOFTY आईस क्रीमचे पार्सल दिले. मी त्याचे पैसे देऊ केले तेंव्हा ते म्हणाले साहेब हे आमच्या चुकीचे परिमार्जन म्हणून माझ्यातर्फे आपल्या मुलांना. त्याने कितीही सांगितले तरी पैसे घेतले नाही.

In reply to by सुबोध खरे

गायकवाड साहेबांनी त्या वेटर ची कडक शब्दात सर्वांसमोर हजेरी घेतली या प्रकाराच्या अनुषंगाने माझा अनेकदा गोंधळ उडतो. वेटर, सेल्समन किंवा आपण ज्याची तक्रार करत असतो त्या व्यक्तीचे "या प्रसंगामुळे पुढे काय होणार..?" असा विचार केला तर.. १) त्यांना वॉर्नींग मिळेल किंवा जास्तीत जास्त आपण गेल्यानंतर आणखी एकदा मॅनेजर झाडेल.. असे.. किंवा २) त्यांच्या नोकरीवर गदा येईल अथवा आर्थिक दंड होईल (इन्सेंटीव्ह मधून कापून अथवा एखादे इन्क्रीमेंट कमी % ने झाल्याने...) पहिला मुद्दा असेल तर ठीक आहे.. पण जर या प्रकारामुळे जर आर्थिक दंड किंवा नोकरीवर गदा येत असेल तर विनाकारण वाईट वाटत राहते. उदा. - आमच्या कंपनीच्या कॅब ड्रायव्हर्सना AC कायम ऑन ठेवावा अशी सूचना असताना (आणि AC हा ३ किंवा ४ वरच असावा, २ वर असू नये इतक्या स्पष्ट सूचना असताना) एखादा ड्रायव्हर मुद्दाम २ वर AC चालवतो. त्यामुळे किती फरक पडतो हा वेगळा प्रश्न पण "कंपनीने आखून दिलेला नियम पाळला जात नाहीये हे उघड असते." (कंपनीचे सगळे नियम आपण पाळतो का हा एक मुद्दा आहेच!) याची तक्रार केली तर या ड्रायव्हरला पहिल्यावेळी ५००/- रू नंतर ७००/- रू असा दंड होतो. अनेकदा सांगूनही भरधाव वेगाने आणि धोकादायकरीत्या गाडी चालवणे हाही असाच एक प्रश्न. तक्रार केली तर त्याची कॅब काढून टाकतात तक्रार नाही केली तर आपण जीव मुठीत धरून प्रवास करत असतो.. व्यवस्थीत न वागणारा वेटर - जेवणाच्या कितीतरी आधी मागवलेला मसाला पापड जेवण सुरू झाल्यानंतर आणून देणे, कांदा लिंबू किंवा टिश्यू पेपर्स आणण्यास वेळ लावणे, चाट मसाला मागितला असताना तिखट आणून देणे आणि चाट मसाला संपला असे सांगणे.. अशा वेळी तक्रार करणे योग्य असते परंतु आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून त्याची शिकार होईल ही भावना टोचत राहतेच. :(

In reply to by मोदक

अशा अनेक प्रसंगात...आधी एकदा त्या व्यक्तीशी शांतपणे बोलून पहावे...ऐकला तर ठिक...नाहीतर त्याला सरळ सांगावे की तुझ्या वरिष्ठांशी बोलायचे आहे (हे सुध्धा शांतपणे)...यावेळेस जर तो नीट बोलला आणि चूक सुधारली तर सोडून द्यायचे...पण जर उलट बोलला तर मग "नीट" अक्कल काढावी १ शंका...हे असे प्रसंग चितळ्यांकडच्या दुकानांत होतात काय? :)

In reply to by टवाळ कार्टा

१ शंका...हे असे प्रसंग चितळ्यांकडच्या दुकानांत होतात काय? हेच नाही पण एक दोनदा असे प्रसंग झाले होते. सध्याचे माहिती नाही. आपण पैसे देवून त्यांचा माज सहन करणे जमत नसल्याने चितळ्यांच्याऐवजी काका हलवाईला पसंती दिली जाते.

In reply to by टवाळ कार्टा

१ शंका...हे असे प्रसंग चितळ्यांकडच्या दुकानांत होतात काय? कोणत्या ग्रहावरून आला आहात ? चितळ्यांच्या दुकानांत असे प्रसंग झाले नाही तर सूर्य पश्चिमेला उगयला सुरूवात करेल! "ग्राहक येथे स्वतःवर तुमच्या कडून उपकार किंवा अपमान करून घ्यायला येत नाहीत. ग्राहक यायचे बंद झाले तर इथल्या मालकाचा धदा बंद होईल आणि कर्मचार्‍यांची नोकरी जाईल." असे दोन-तीनदा तेथिल कर्मचारी, व्यवस्थापक आणि मालक यांना सांगून झाले आहे. प्रत्येक वेळेला त्या सगळ्यांच्या चेहर्‍यावर "कायच्या काय बोलतात बुवा माणसे" असाच आश्चर्यमिश्रित भाव दिसला आहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रत्येक वेळेला त्या सगळ्यांच्या चेहर्‍यावर "कायच्या काय बोलतात बुवा माणसे" असाच आश्चर्यमिश्रित भाव दिसला आहे !
ते कदाचीत "परंपरा" जपत असावेत ... तो आग बुझवायला येणार्या अग्निशमक दलाचा किस्सा कदाचित खराही असू शकेल ;)

In reply to by टवाळ कार्टा

पुलंच्या भाषेत सांगायचे तर "आपल्या निष्कारण उद्धटपणाची आणि उर्मटपणाची शरम वाटणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे" अशी पूर्ण मानसिक तयारी असल्याशिवाय त्या दुकानात काम करायला सक्त बंदी आहे. ;)

In reply to by मोदक

आयड्याची कल्पना ब्येष्ट आहे ! पण ही केस पारंपारिक "जित्याची खोड... " टाईपची असल्याची धोक्याची सूचना देणेही आवश्यक आहे ;) :)

In reply to by मोदक

आख्खी मिपाग्यांग घेउन आत शिरायचे...आपण कोणालाही ओळखत नाही असे दाखवायचे...उगाच इकडच्या-तिकडच्या पदार्थांकडे नुस्तेच आशाळभूताचे भाव आणून बघत बसायचे..."ठिणगी" पडली की सगळे मिळून तुटून पडायचे :)

In reply to by टवाळ कार्टा

आग बुझवायला
बुझवायला नाय हो, विझवायला .. टका तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती राव.. (बाकी किसा पण सांगा इथेच)

In reply to by हाडक्या

"आग बुझवणे" हे कदाचित चुकीचेही (किंवा चुकीचेच) असेल पण तसे बोलताना ऐकले आहे काही जणांना किस्सा एकदा दुपारी ११:५५ am ला चितळ्यांच्या दुकानात आग लागते...कोणीतरी फोन करुन अग्निशमन दलाला बोलावतात...अग्निशमन दल १० मिनीटांत आल्यावर बघतात तर मालक दुकान बंद करत असतो आणि सांगतो "आता ४ pm ला दुकान उघडल्यावर या"

In reply to by टवाळ कार्टा

रच्याकने पुण्याचा तो वल्डफेमस "जाज्वल्य अभिमान" म्हणतात तो हाच असावा... सांगोवांगी खर्या-खोट्या किस्स्यात सुध्धा १ ते ४ ही वेळ चुकत नाही =))

In reply to by टवाळ कार्टा

असाच रजनीकांतचा किस्सा वाचला होता. दुपारी १ ला शटर बंद करायला लागलेल्या चितळ्यांच्या दुकानात घुसू पाहणारा रजनी मार खाऊन परत जातो वगैरे! बाकी एखाद्या गोष्टीसाठी एवढी *व*व (चिवचिव आहे ते) आमच्याकडून होणार नाही. मिळाली ठीक, नाही मिळाली तर उत्तम. उगा डोक्याला शॉट!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तरी पण चितळे ची सर्व दुकाने जोरात चालू आहेत. नविन काढलेली फ्रँचॅजी पद्धतीची दुकाने पण जोरात चालू आहे. दर्जा कायम ठेवणार्‍याला ( तो सुद्धा खाण्याच्या पदार्थांचा ) धंद्याला मरण नाही. शेवटी ते "चितळे" आहेत. सोने घेताना "गाडगीळ", घर बूक करताना "परांजपे" लोक डोळे झाकुन घेतात.

In reply to by प्रसाद१९७१

शेवटी ते "चितळे" आहेत. सोने घेताना "गाडगीळ", घर बूक करताना "परांजपे" लोक डोळे झाकुन घेतात. मान्य आहे पण म्हणून मालकांनी डोळे झाकून बसू नये असे वाटते. गाडगीळांच्याकडे असा कधीही अनुभव येत नाही - कोणाला आला असल्यास वाचण्यास उत्सुक.

In reply to by मोदक

जावूदे माज आणि अभिमान याच्यात काही फरक असतो तो या अडाण्यांना समजेल तो सुदीन!! बिग सिनेमा-आणि फेम गणेश्मध्ये "गाव" गोळा केलेला. एकपडदा प्रेमी प्रेक्षक. ना.खु.

In reply to by प्रसाद१९७१

सोने घेताना "गाडगीळ", घर बूक करताना "परांजपे" लोक डोळे झाकुन घेतात.
"परांजपे" डोळे झाकून घेणे परवडणारे किती पुणेकर आहेत म्हणे? नै म्हणजे कोपर्‍यावरच्या गाडीवरनं दाबेली घेतल्यागत उल्लेख होता म्हणून विचारलं.

In reply to by बॅटमॅन

डोळे झाकुन म्हणजे भरलेले पैसे वाया जाणार नाही ह्याची खात्री बाळगुन. वेटींग लिस्ट असते अनाउंस पण न झालेल्या स्कीम साठी, लोक एक दोन लाख भरुन नाव नोंदवून ठेवतात.

In reply to by प्रसाद१९७१

डोळे झाकुन म्हणजे भरलेले पैसे वाया जाणार नाही ह्याची खात्री बाळगुन.
मराठी कळते ओ आम्हांला.
वेटींग लिस्ट असते अनाउंस पण न झालेल्या स्कीम साठी, लोक एक दोन लाख भरुन नाव नोंदवून ठेवतात.
होक्का, नवीनच माहिती कळाली. पण मेन मुद्दा सोडून सगळं काही आहे. मुद्याचं काय?

In reply to by बॅटमॅन

पुण्यनगरीतले पुण्यवान काय करतील हे ब्रम्हदेवालाही सांगणं अवघड आहे. डीएस्के आणि परांजपे यांनी झोपड्या जरी बांधून विकल्या तरी डोळे विकून घेणारे लोक आहेत. डिएस्के नी चाकणच्या एका शेतात सुरू केलेला प्रोजेक्ट मी पहायला गेलो होतो. अरेरे. जिथे बाजूला काहीच नाही तिथे बाकिच्यांच्या पेक्षा जास्त दराने विकून सुद्धा बुक करणारे लोक होते.

In reply to by काळा पहाड

जिथे बाजूला काहीच नाही तिथे बाकिच्यांच्या पेक्षा जास्त दराने विकून सुद्धा बुक करणारे लोक होते.
@बॅट्या - ह्यालाच मी डोळे झाकुन घेणे म्हणत होतो, तुम्हाला उदाहरण मिळाले. पण लोक असे बूकींग करतात कारण खात्री असते. माझा स्वताचा परांजपे चा अतिशय चांगला अनुभव आहे. का.पा. म्हणतात तसे नुस्ती जमिन असताना, मी २२०० च्या रेट नी फ्लॅट बूक केला होता, कुठलेही कागदपत्र नव्हते आणि फक्त २५००० दिले होते. नंतर ती स्कीम चे बांधकाम चालू होयला २ वर्षाचा उशीर झाला. मधल्याकाळात रेट ४००० झाला होता. तरी पण मला २००० च्याच रेट नी फ्लॅट मिळाला कुठल्याही प्रकारची कायदेशीर कागदपत्र नसताना. मला परांजपे २५००० व्याजा सकट परत करुन नविन रेट नी बूक कर असे म्हणु शकला असता.

In reply to by प्रसाद१९७१

प्रतिसादा बद्दल धन्यवाद...!! एक कळले नाही की तुम्ही २२०० च्या रेटने फ्लॅट बुक केला पण दोन वर्षानंतर २००० च्याच रेट ने मिळाला. येथे २००० काय आहे? २००० सालच्या २२०० च्या रेटने की २००० रू. च्या रेटने?? जर २००० रू असेल तर पहिल्या २२०० चे काय?

In reply to by प्रसाद१९७१

नंतर ती स्कीम चे बांधकाम चालू होयला २ वर्षाचा उशीर झाला.
अरे वा!!! उत्तम! काय व्यावसायिकता आहे नै? नाही, राणीच्या देशातनं आणलेला माल ओतायला ठीक आहे. पण भाड्याच्या घरात रहात असलेल्या गरजुने तिथे फ्लॅट बूक केला आणि त्याला तो किमान २ वर्ष उशीरा मिळाला तर फायनान्शीअली (त्याहीपेक्षा मानसीक आणि कौटुंबिक बाजूने) काय फरक पडतो माहिती आहे का?
कुठल्याही प्रकारची कायदेशीर कागदपत्र नसताना.
म्हणजे थोडक्यात काय, कायद्याची आयमाय झाली की नाही झाली ते गेलं चुलीत. आपल्याला हवे ते होतंय यात समाधानी. :) वास्तू दोन वर्षे उशीरा मिळाली यापेक्षा आहेत ते २५००० बुडवले नाहीत त्याचे कौतुक. मला स्वतःला परांजपे, डीएसके, चितळे वगैरेंचा राग, लोभ वगैरे काही नाही पण हे असले मेंढराच्या कळपातले लोक उगाच नाचताना दिसले कि जाम मजा वाटते. नाही, असतील हो कदाचित ते चांगले. पण म्हणुन उगाच डोक्यावर घेऊन काय नाचायचं? मी स्वतः दोन वेळा फ्लॅट चे व्यवहार केलेत, दोन्ही वेळेस वेगळे बिल्डर आणि दोन्हीचा अनुभव चांगला आहे (एकाने दिलेल्या वेळेच्या ४ महिने उशीरा फ्लॅट दिला तर झापला होता त्याला. दुसरा वेळेत मिळालाय). तरीही समोरच्याने सल्ला मागितला तर त्याची आवड, बजेट वगैरे बघुन (सल्ला देण्याला अर्थ असेल तर) मगच माझे मत देतो. उगाच डोळे झाकून इकडे जा तिकडे जा असलं काही करत नाही.

In reply to by थॉर माणूस

पण बेसिकली ते अवतरणचिन्हांतले "परांजपे" "गाडगीळ" अन "चितळे" हा मुद्दा आहे. यालाच इंग्रजीत म्युच्वल रुब्रिफिकेशन अर्थातच एकमेकांची लाल करणे असे म्हणतात ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ग्राहक येथे स्वतःवर तुमच्या कडून उपकार किंवा अपमान करून घ्यायला येत नाहीत.
आम्हाला तर ब्वॉ चितळ्यांच्या दुकानातल्या बाकरवडी, आंबाबर्फी, काजू कतली, साखरी पेढे या वस्तू मिळाल्यावर त्यांनी या अशा चीजा तयार करून आपल्याला उपकृत केलेलं आहे अशीच भावना असते. बाकी त्यांच्या दुकानात 'बाकरवडी ताजी आहे का?' सारखे निर्बुद्ध प्रश्न विचारले नाहीत तर शेलकी उत्तरे (ज्याला काही पामर अपमान म्हणतात !) मिळत नाहीत असे निरीक्षण आहे.

In reply to by अनुप ढेरे

त्या दुकानात सरळ साधे मराठी, सरळ साध्या (उर्मटपणा अथवा गुर्मी नसलेल्या) स्वरात बोलतात असा अनुभव असलेले एक गिर्‍हाईक सापडल्याने ड्वाळे पानाव्ले... आता सुर्याने उद्यापासून पश्चिमेकडे उगवायला सुरूवात न केल्यास त्याच्यावर अजामिनपात्र आरोपांसहित खटला भरायला हरकत नाही ! +D

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मी एकदा डेक्कनवरच्या चितळ्यांकडे गेले होते. तिथे हातात ती जगप्रसिद्ध पाटी ठेवली. साहजिकच मी गोंधळले. आणि कॅश काउंटरच्या माणसालाच विचारलं, "हे प्रकरण कसं वापरायचं आणि दुकानात खरेदी कशी करायची?" त्यावर त्याने चक्क सहास्य वदनाने ती पाटी कशाकरता ते नीट सांगितलेच, एवढेच नव्हे तर बाकरवडीचा काउंटर कुठे तेही व्यवस्थित दाखवले!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आम्हाला तर ब्वॉ चितळ्यांच्या दुकानातल्या बाकरवडी, आंबाबर्फी, काजू कतली, साखरी पेढे या वस्तू मिळाल्यावर त्यांनी या अशा चीजा तयार करून आपल्याला उपकृत केलेलं आहे अशीच भावना असते. आम्ही स्वकष्टाने कमावलेले पैसे देऊन कोणतीही सेवा/वस्तू खरेदी करत असल्याने कोणताही दुकानदार/सेवा देणारा आमच्यावर कृपा करत नाही. अर्थात, प्रत्येकाला ज्याचा त्याचा योग्य तो मान मिळालाच पाहिजे या तत्वाशी आमची बांधिलकी असल्याने कोणाबरोबर शिरजोरी करत नाही आणि दुसर्‍या कोणी केली तर त्याच्या पदरात त्याचे माप घातले नाही असे सहसा होत नाही. दुकानदाराने माजाने दुकान बंद केले तरी आम्हाला काही फरक पडेल इतके कोणत्याच दुकानदारावर अवलंबून न राहण्याएवढे मनोबल राखून आहोत :) ;) बाकी त्यांच्या दुकानात 'बाकरवडी ताजी आहे का?' सारखे निर्बुद्ध प्रश्न विचारले नाहीत तर शेलकी उत्तरे (ज्याला काही पामर अपमान म्हणतात !) मिळत नाहीत असे निरीक्षण आहे. असा प्रश्न विचारणे म्हणजे एखाद्या दुकानदाराची अब्रू वेशिवर टांगली जाते असे समजण्याएवढे आम्ही कोणत्याच दुकानदाराच्या आहारी गेलेलो नाही ;) :) छे, छे, किती ते परावलंबित्व ?... बाकरवडी, आंबाबर्फी, काजू कतली, साखरी पेढे अश्या गोष्टींची आवड असणे ठीक... पण ते विकत देणार्‍याचे उपकार वाटण्याइतके त्यांचे व्यसन ??? *dash1* (वरचे सगळे खरोखरच खरे आहे... पण तरीसुद्धा ह घ्या ;) )

In reply to by रेवती

चितळ्यांकडून पुपो विकत घेतल्या. दोन दिवसात संपवावे हा नियम लिहिलेल्या असतो असे अंधुकसे आठवते. ३०तासात बुरशी आली. फोन केला. नाव लिहून घेतले त्यांनी व येऊन घेऊन जावा म्हणाले. त्यानंतर भारतात जायला जमले नाही. पण आता त्यांच्याकडून घेणार नाही. त्यापेक्षा चाम्गली पुपोवाले आहेत. शिवाय आपणही करू शकतोच. इस्पिक एक्काजी म्हणतात तसे अवलंबित्व कामाचे नाही. त्याने दुकानदार माजतात. लोकही राम्गेत दरवेळी येतातच असे नाही. मग ते लोक वसवस करतात. (१० मिनितात एवढे ट्म्कले). जौदे राव!

In reply to by रेवती

धंधा वाढला की 'बाहेरून खात्रीशीर व्यक्तीकडून करून आणणे '(आईटसोर्सिँग) सुरू करतात. आणखी धंधा वाढला की खात्री॰ इतकेजण मिळत नाहीत अथवा तो आणखी दुसऱ्या पातळीतले आउट॰ सुरु करतो. शिवाय कमिशनचे घोडे पुढे पळतच असते. पुढे आणखी गुजरातमधून गूळ, तेल, मप्र॰चा गहू आणि कर्नाटकातली चणाडाळ थोक भावात हडपसरच्या कोठीत येऊन पडू लागते. पुपो॰जाते नदीपात्रात आणि गिऱ्हाइकाला कात्रजचा घाट दाखवतात.

In reply to by मोदक

मोदक साहेब बहुतांशी अशा ठिकाणी कामावर ठेवताना त्यांना कसे वागायचे याचे व्यवस्थित प्रशिक्षण दिलेले असते. त्यामुळे अशा तर्हेचे "हं, आटपा लवकर" सारखे आगाऊ वक्तव्य अजिबात अपेक्षित नाही.( बर्याच वेळेस ते त्या पार्टीतील लोकांकडून जड बक्षिसी साठी केलेले "कर्तव्य"असते.) त्यामुळे अशा कारणासाठी त्याला आर्थिक दंड झाला तरी मला मुळीच वाईट वाटणार नाही. मी गायकवाड साहेबाना स्पष्ट शब्दात सांगितले कि तुमच्या कर्मचार्याने माझ्या संध्याकाळचा पार विचका केला याची किंमत काय? मी जर माझ्या दवाखान्यातील रुग्णांना पुढे मागे करून( आज नको उद्या या इ. इ.) येथे कुटुंबाबरोबर एक संध्याकाळ आनंदात घालवायला आलो असता तिचा विचका कुणी केला आणि फक्त सोर्री म्हणाले तर चालेल काय? हि तेथे नीट न वागणाऱ्या वेटरला समज देणे आवश्यक आहेच. आपण आपल्या पत्नीसाठी एखादा ड्रेस शिवायला दिलात आणि त्या शिंप्याने त्याची वाट लावली तर आपण फक्त त्याचिं क्षमा याचना ऐकून गप्प बसता कि त्याला तो सुधारून व्यवस्थित करून द्यायला भाग पाडता.

वस्तू घेतांना त्याची किंमत, दर्जा आदींची तुलना करणे, दोन दुकांनांमधील भाव तपासणे हे ग्राहक हक्कात मोडते. याविरूद्ध एखाद्या दुकानदाराने बेजबदार वर्तन केल्यास त्यास फौजदारी खटला दाखल करता येतो याची जाणीव करून द्यावी. बर्‍याच जणांच्या प्रतिक्रीया चांगल्या आहेत. बाकी आमच्या साडी खरेदी करण्याचे प्रसंग आठवले.

बायकांबरोबर खरेदीला जाताना उत्साह कसा दाखवावा यावरील मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत....
बायकोबरोबर खरेदीला जाणं हा आनंद सोहळा आहे. किती तरी अँगल्सनं, तिला काय खुलून दिसेल हे पाहाण्याची ती संधी असते. स्त्री विश्वात कायकाय नव्या फॅशन्स आल्यात तेही कळतं. प्रश्न खरेदीचा कमी आणि तिच्या सहवासात वेळ घालवण्याचा जास्त आहे. मी तर तिच्याबरोबर खरेदीची एकही संधी सोडत नाही. जोपर्यंत दोघांना पटत नाही तोपर्यंत आम्ही काहीही खरेदी करत नाही, पण एकमत व्हायचा आवकाश की (मग किंमत काहीही असो), खरेदी करतोच. अमक्या टॉपवर कोणती लेगीन घ्यायची, तमक्या ड्रेसचं मिक्स अँड मॅच कसं बघायचं, स्पेशल दुपट्टा कुठून रंगवून घ्यायचा, अनोख्या रंगांच्या साड्यांची मोहमयी दुनिया आणि त्यावरचे अनेकविध प्रकारे डिजाइन केले जाणारे ब्लाऊज, तिच्यासाठी घेतलेल्या स्ट्रेचबल जीन्स आणि त्यावरचे दिलकष टी शर्टस... आणि या सगळ्या खरेदी नंतर, त्या आनंदात तिच्याबरोबर निवांतपणे केलेला श्रमपरिहार. एकसोएक आयम आहेत तिच्याबरोबर केलेल्या खरेदीचे. मग सरते शेवटी जेंव्हा दोघांनी मिळून खरेदी केलेली परिधानं लेवून ती आपल्याबरोबर एखाद्या समारंभाला येते तेंव्हा तिचं ते खुललेलं रुप, बस देखते रहो!

In reply to by संजय क्षीरसागर

प्रयत्न केला जाईल...!! प्रश्न खरेदीचा कमी आणि तिच्या सहवासात वेळ घालवण्याचा जास्त आहे. या वाक्याला मनापासून सलाम...!! कदाचित असे वागलो तर मॉलमध्येच एक खोली घ्यावी लागेल. पण एकमत व्हायचा आवकाश की (मग किंमत काहीही असो), खरेदी करतोच. लुटले जाण्याची शक्यता आहे... अमक्या टॉपवर कोणती लेगीन घ्यायची, तमक्या ड्रेसचं मिक्स अँड मॅच कसं बघायचं, स्पेशल दुपट्टा कुठून रंगवून घ्यायचा, अनोख्या रंगांच्या साड्यांची मोहमयी दुनिया आणि त्यावरचे अनेकविध प्रकारे डिजाइन केले जाणारे ब्लाऊज, तिच्यासाठी घेतलेल्या स्ट्रेचबल जीन्स आणि त्यावरचे दिलकष टी शर्टस... आणि या सगळ्या खरेदी नंतर, त्या आनंदात तिच्याबरोबर निवांतपणे केलेला श्रमपरिहार. क्या बात है...दिल गार्डन गार्डन हो गया...!!

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्हाला प्रतिसाद आवडला याचा अर्थच तुमच्याबाबतीत काही चांगलं घडण्याची शक्यता निर्माण झालीये. आणि कधी हवं असेल तर घरी येऊन पाहा, दृष्ट लागावी अशी रिलेशन्स आहेत. संपादित

In reply to by संजय क्षीरसागर

दुकानदार त्याचं वैफल्य आपल्यावर काढतोयं त्यामुळे त्याची दखल घेण्याची गरज नाही. ही कान्ट हँडल हिज बिझीनेस, दॅटस ऑल! अशाच प्रकारे (जगात) सगळीकडे चाललेलं असतं. कुणी कशानं आणि कसं उसळेल याचा नेम नसतो. तुम्ही भिडस्त आहात त्यामुळे प्रत्युत्तर देत नाही, काही हरकत नाही. मी बिनधास्त टोलवतो! कारण दुसर्‍यांची जळजळ आपल्यावर घ्यायचं काही कारण नाही! एकदा आपला हेतू क्लिअर असला की कुणाला जुमानायचा काहीएक संबंध नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

मी सगळ्यात पहिल्यांदा हेच सांगितले होते त्यांना. मॉल मध्ये दुकानाच्या भाड्यानीच दुकानदार गांजलेले असतात, म्हणून त्यांची टाळकी सटकलेली असतात. तुम्ही माझाच मुद्दा का रिपिट करताय?

In reply to by संजय क्षीरसागर

शक्यव्च नाही!! मी सांगतो ना? मुर्खासारख काही निवडु नको. मी म्हणतो तेच चांगल दिसेल. उगा बोगद्यात शिरु नको. घ्यायची अक्क्ल आहे का? अस म्हणत फकत आपलीच निवड लादायची आणि वर दोघांच्या संमतीने म्हणायच. का ब्वा? ज्याने कपडे घालायचे त्याने स्वतः काही आवडल म्हणुन का नाही घ्यायच काही? का नाही कधी मधी मित्रांबरोबर जाउन थोडी खरेदी करायची? स्वतः साठी म्हणुन का नाही जगायच? बाहेर जगाला सांगायला जरी "आम्ही बरोबरच खरेदीला जातो" असलं तरी त्यात दबावशास्त्रच जास्त जाणवत. मी म्हणतो तेच घालायच, तेच खायच अन तसच वागायच हे करण्यासाठी कायम बरोबर असण महत्वाच असत. त्यामानाने मला योगी ९०० परवडले. साधेसुधे, "अग ठरव ना तुझ तू" म्हणणारे!

In reply to by संजय क्षीरसागर

आमच्याकडे पण एकमत असतं! फक्त माझं एकच मत! नवरा कधीतरी आईने नेसली आहे तशी साडी घे वगैरे म्हणतो, पण तसा तो स्वतःचे कपडे पण आणायचा आळस + निरुत्साह दाखवतो त्यामुळे मी खरेदीला कधीच त्याला बरोबर नेत नाही. त्याचं मत कधी नसतं याचा मला वैताग येतो बरेचदा, पण आता काय करणार? (तशी मी पण सगळ्या अँगल्सने सुंदरच दिसते बरं का! पण तसं कधी चारचौघात सांगेल तर शपथ!)

In reply to by पैसा

तू ऊगा इकडे तिकडे लक्ष नको देऊ। मला विचारशील तर आम्हा दोघांचा मिळून संसार आहे। कुणा एकट्याचा नव्हे। जशी मी त्याच्यावर अवलंबून आहे तितकाच् तो माझ्यावर। आणि हो बघा माझी पसंती म्हणून आम्ही दोघेही मिरवत नाही। बैल बेंदराला काढावा तसा मी त्याला मिरवत नाही अन बघा कशी सुन्दर दिसते ते तो कधी मिरवत नाही। चार चौघात चर्चा करायला तो काही बाजार नाही। संसार आहे। जेंव्हा लोक अगदी खाजगी गोष्टी सुद्धा चव्हात्यावर मांडतात ना तेंव्हाच् त्या नात्याला एकच "मी"एवहढीच् बाजू आहे ते लक्ष्अत येते। दोघे ही कधी स्वतंत्र कधी मिळून निर्णय घेऊ शकतात अं त्या निर्णयाचा आदर राखतात तो संसार!!बाकी सारी दडपशाही!

In reply to by vikramaditya

श्री: अग, चल, शॉपींगला जायच ना? सौ: आत्ता? श्री: हो, गेल्या महिन्यात तु म्हणाली होतीस ना? सौ: बरं चला. श्री: हे आपले छान आहे ना? आपले विचार नेहेमी कसे जुळतात ना? सौ: हं.. सौ: गेल्या महिन्यात मी म्हणाले की साडी घ्यायची.. श्री: छे! छे! अग आज लेगीन्ग्स घ्यायची आहेत. सौ: काsssssय? श्री: मी बघुन ठेवली आहेत. शनिवारी पिकनिकला तु कोणता टॉप आणि लेगीन्ग्स घालायची ते पण मी ठरवले आहे. आहे की नाही मी मनकवडा? सौ: असेल... श्री (प्रचंड खुश होवुन): नंतर बाहेरच जेवुया. सौ: हो, माझी मैत्रीण सांगत होती की एक नवे चायनीज हॉटेल आहे तिथे जावुया. श्री : अग वेडी की काय तु? मी आधीच माझ्या मित्राच्या हॉटेलात टेबल बुक केले आहे. ओके? सौ: नेहेमीप्रमाणे तुम्ही म्हणाल तसे. श्री(अति प्रचंड खुश होवुन): जानेमन, मी सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी कश्या सोप्या केल्या आहेत. तु फक्त खुशीत राहायचे. आपल्या ह्याच एकमताने वागण्यामुळे लोक आपल्याला आदर्श जोडपे म्हणतात ना? सौ: अच्छा? शक्यता आहे. (इति लेखनसीमा)

२००+

अजून चितळेंकडे जाण्याचा योग आला नाही. (एका मोठ्या आनंदाला मुकतोय मी) अजुन एक धाडसी विधान, "माझी बायको मला साड्या आणि ड्रेस मटेरीयल घ्यायला घेउन जाते आणि मि सांगीतलेल्याच साड्या आणि ड्रेस घेते" (कीतीही खोटे वाटले तरी वरील विधान सत्य आहे. माझा रंगांचा चॉइस चांगला आहे असे तीचे मत)

In reply to by खटपट्या

आपलं बी असचं हाय... सर्व प्रथम मीच बायडीला सल्ला देतो की साड्या निवडण्याची घाई करु नकोस ! नाही पसंत पडत असेल तर बाजुच्या दुकानात जाऊ,पण जो पर्यंत पसंत पडत नाही तो पर्यंत काहीही घेण्याच्या भानगडीत पडू नकोस. आमच्या तिर्थरुपांकडुन मी आत्मसात केलेल्या अनेक गुणांपैकी साडीची खरेदी हा एक. :) आत्ता पर्यंत घेतलेल्या साड्यांपैकी प्रत्येक साडी तिला पसंत पडली आहेच, पण बाकीच्या स्त्रींयांनी या खरेदीचं भरभरुन कौतुक केल्यामुळे साडीच्या खरेदीला माझ्या मताची नोंद घेउन, माझ्या पसंतीची साडी घेणे तिला अत्यावश्यक झाले आहे... एव्हढेच नव्हे तर कुठल्या समारंभाला जावयाचे असेल तर... १० वेळा मला ३-४ वेळा वेगवेगळ्या साड्या दाखवुन यातली कुठली ? असं विचारंण हे नित्याच झालं आहे. ;) जाता जाता :--- काही काळा पूर्वी वारली प्रिंटची मस्त साडी घेतल्यावर आणि तिचे तिच्या मैत्रिणी आणि इतर स्त्रीवर्गाने कौतुक केल्यावर आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या आठवते आहे.. ;) Warli Saree

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- U.S. passes $18 trillion in debt, and nothing’s being done about it Billionaire Tells Americans to Prepare For 'Financial Ruin' Economists Caution: Prepare for 'Massive Wealth Destruction'