Skip to main content

मराठी अस्मिता, आपण आणि राजकारण

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 28/10/2014 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
"नाही यार नाही. हा नाही. अरे तो ठीक आहे पंतप्रधान म्हणून. महाराष्ट्रात हा नाही पाहिजे. अरे तो मराठी माणसाचा, आपला, असा पक्ष नाहीये मित्रा.... तो महाराष्ट्रात मराठी माणसाला पोरकं करेल, अरे मारून टाकेल तो आपल्या अस्मितेला...." अगदी कळकळीने काल रस्त्यावर एक माणूस दुस-या माणसाला सांगत होता. या सगळ्या विचारांत काहीसं तथ्य असलं जरी, तरी बरचसं नाही आहे. मुंबईतला एक मुख्य पक्ष हा पहिल्यापासून मराठी माणसाचा पक्ष राहिलेला आहे. मराठी माणसाला मुंबईत कधीच पोरकं केलं गेलं असतं. पण त्याला बळ दिलं, त्याचा दरारा प्रस्थापित केला तो या पक्षाने. दंगलींच्या वेळी मराठी माणसाला मुंबईत आधार होता तो याच पक्षाचा. या आणि अशा अनेक गोष्टी अगदी ख-या आणि महत्वाच्या आहेत. पण मला त्या माणसाच्या बोलण्यातला एकच मुद्दा खटकला. अस्मितेचा. मराठी अस्मिता ! मराठी अस्मिता !.... कधी बंगळुरू मधे कन्नडी अस्मिता ! असं कुणी बोंब मारताना ऐकलंय का? मी तरी नाही. चेन्नईत मल्ल्याली अस्मितेच्या नावाने कुणी ओरडत नाही की बंगाल मधे बंगाली अस्मितेच्या नावाने नाही. पण ही अस्मिता त्यांच्या रोजच्या, सततच्या वागण्यातून दिसते. बंगळुरू मधे रिक्षावाले ठासून नो इंग्लिश नो हिंदी म्हणतात. ओनली कन्नडा. मग तिथे रहायला गेलेली मराठी मंडळी घरी आल्यावर मी थोडं थोडं कन्नड शिकलोय म्हणतात, त्यांना घरचेही अरे वा ! मस्त म्हणून शाबासकी देतात. इथे अस्मिता कुणाची श्रेष्ठ ठरली? लोकल ट्रेन मधे आपण प्रवास करतो. अगदी सहजपणे आपण हिंदीत संवाद साधत असतो. उदा. 'भाईसाब जरा बाजू होना', 'कौनसा स्टेशन गया?', 'आपको कहां उतरना है?'. किंवा अगदीच फस्ट क्लास किंवा एसी बस मधे असू किंवा जरा टापटीप माणूस/बाई दिसली की आपण थेट इंग्रजी सुरू करतो. उदा. 'एक्स्क्यूज मी, डज धिस बस गो टू चेंबूर'. का? आपल्याला कुणी प्रतिबंध करत नाही 'नो हिंदी नो इंग्लिश' म्हणायला. शिरजोर पणे 'हिंदी मे बोल यार' म्हणणारी अमराठी मंडळी अनेकांनी कार्यालयात बघितली असतील कदाचित. त्यांच्यासमोर आपली अस्मिता मूग गिळून का बसते? इंग्रजी शाळांवरचं प्रेम, इंग्रजी सण, आपले मराठी सणही साजरे करायच्या इंग्रजी पद्धती, या आणि अशा बाबतीत 'आपलीच' मराठी अस्मिता दाखवण्यात आपल्याला वाटणारा कमीपणा किंवा कालबाह्यतेची भावना अशा अनेक गोष्टींद्वारे आपण आपली ही अस्मिता मारतच असतो की. 'जीते जी' म्हणतात तसं. हे असं असताना निवडणुका आल्या की कुण्या पक्षाची आणि लगोलग आपलीही अस्मिता मात्र जागी होते. मग आपल्याला पुळका येतो; भाषेचा, आणि ती भाषा, तिचा अभिमान बाळगणा-या अशा पक्षांचा. आता वास्तविक हा असा प्रकार कालबाह्य झाला आहे. पक्षांसाठी भाषिक मुद्द्यावर निवडणुका लढवणं योग्य राहिलेलं नाही आणि लोकांनी कुण्या राजकीय पक्षावर 'आपल्या' भाषेची अस्मिता जपण्याकरिता अवलंबून रहाणं योग्य राहिलेलं नाही. पुढे गेलंय सगळं आता. दोन दशकांपूर्वी जेंव्हा एका पक्षाने मराठी माणसाचं सबलीकरण केलं, तेंव्हा त्यासाठी तो काळ योग्य होता. पण आता जेंव्हा इतर पक्ष विकासाची कास धरत आहेत, ती लोकांच्या बुद्धीला पटत आहे, तेंव्हाही हे योग्य ठरेल ही शक्यता कमीच. मराठी भाषा, तिची अस्मिता जपायला हवी, तर ती प्रत्येकाने कृतीतून, वागण्यातून जपायला हवी. जिथे तिथे मराठीचा पुरस्कार व्हायला हवा. छोट्या छोट्या गोष्टीतून मराठीचा, मराठी असल्याचा अभिमान दिसायला हवा. बंगळुरूच्या रिक्षावाल्यापासून ते जरीकाठी लुंगी घालून फिरणा-या भारताच्या माजी अर्थमंत्र्यांच्या वागण्यातून दिसतो तसा. एक पक्ष येईल, मराठी अस्मिता जपेल असं म्हणणं म्हणजे कुणीतरी येईल, वाढून देईल म्हणण्यासारखं आहे. आपण आपल्या बाजूने अस्मिता वा-यावर सोडायची, आणि एखादा राजकीय पक्ष ती जपेल म्हणत त्याला मत द्यायचं म्हणजे खुळेपणा आहे. क्रांतिवीर चित्रपटातला 'आज मै तुम्हे बचाऊंगा, कल कौन आयेगा?' वाला संवाद इथे आठवतो. सुजाणांनी त्यातून बोध घ्यावा. एक मराठी म्हणून प्रत्येक माणसाला अभिमान जरी असला, तरी तोच राजकारणाच्या अग्रस्थानी ठेवण्यावर संबंधित पक्षांनी, मतदारांनी विचार करायला हवा. कारण याच्यामुळेच कदाचित आपण जे खरोखर गरजेचे मुद्दे आहेत, जो आपल्या हक्काचा विकास आहे, त्याच्यापासून दूर राहिले असू. तेंव्हा आज खरं तर विकासासारख्या महत्वाच्या मुद्द्याला प्राधान्य दिलं पाहिजे. लढाई विकासाची असली पाहिजे. मराठी आहेच; आणि राहील. आजच्या काळात गरज मराठीच्या तलवारीला धार लावण्याची नसून विकासाच्या तलवारीला मराठीची मूठ बसविण्याची आहे. आणि त्या मुठीला इथल्या मराठी माणसांची एकत्रित ताकद मिळाली पाहिजे. मग अटकेपार झेंडे रोवण्यापासून मराठीला मराठी माणसाला कुणीही अडवू शकणार नाही. एकत्रित ताकद मिळाली नाही तर मात्र भविष्यात अल्पसंख्यांकतेची ढाल करायची वेळ आपल्यावर येईल हे नक्की. - अपूर्व ओक
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 35070
प्रतिक्रिया 132

प्रतिक्रिया

In reply to by सुहास..

>>> अरे रे ! अतिशय बायस्ड , मुद्दे राहिलेत बाजुला , २५ सभा , ब्रॅन्ड मोदी, खर्च, विकासाच्या गप्पा करणारे विकासचे पप्पा !! ...येव्हढ काही ही नसताना जर उध्दव इतके सीट्स आणु शकला हेच त्याचे यश आहे ...मनसे च तर सोडुनच दे !! उद्धवकडे काही नव्हतं तर कशाला १५१ जागांच्या गमजा मारत होता? आणि १५१ जागा हव्या त्या भाजपच्या जीवावर? स्वतःला फक्त ६३ जागा निवडून आणत्या आल्या? आधीच्या निवडणुकात तर भाजपची मदत घेऊन भाजपपेक्षा जास्त जागा दांडगाई करून लढवून भाजपपेक्षा कमी जागा मिळत होत्या, तरी आम्हीच मोठे भाऊ हा तोरा कायम! जशी शिवसेना एकटी निवडणुक लढलेली आहे, तसा भाजप आणि इतर पक्षही एकटेच लढलेले आहेत. पण त्यापैकी कोणीच स्वतःचे एवढे कौतुक करत नाहीय्ये. >>> बाळासाहेबांच्या गोष्टी तुम्ही भाजपाप्रेमी करुच शकत नाही , आणि आम्ही करु देणार ही नाही , मी च काय कुठलाही मराठी करु देणार नव्हताच , म्हणुन तर बाळासाहेंबाविषयी चकार काढता आला नाही मोदींना ...उपकार केलेत बाळासांहेबानी येव्हढे !! आणि सोळा जागांसाठी भाजपाने आपला संधी-साधु पणा दाखविला असेच होते ना .... बाळासाहेब म्हणजे काय सगळ्या टीकेच्या पलिकडे होते काय? मोदींचे ५ ऑक्टोबरचे भाषण नीट ऐका. ते बाळासाहेबांबद्दल अजिबात बोलणार नाही असे म्हणाले नव्हते (या निवडणुकीत बाळासाहेब हा मुद्दाच नव्हता). बाळासाहेबांच्या आदरासाठी शिवसेनेवर टीका करणार नाही असे म्हणाले होते. आणि बाळासाहेबांनी काय उपकार केलेत भाजपवर? उलट भाजपनेच कमी जागा लढवून इतके दिवस शिवसेनेवर उपकार केलेत. मुंबई-ठाण्याच्या पलिकडे अस्तित्व नसलेला पक्ष भाजपमुळेच महाराष्ट्रात पोहोचला. हे भाजपचे शिवसेनेवर उपकार आहेत. १९८० मध्ये सेनेचे शून्य आमदार होते व १९८५ मध्ये फक्त १. तीच संख्या १९९० मध्ये ५२ वर पोचली ती भाजपच्या उपकारांमुळे. १९६६ मध्ये स्थापना होऊन सेनेला आपला पहिला खासदार निवडून आणायला २३ वर्षे लागली आणि ते सुद्धा भाजपच्या मदतीने. १९७९ मध्ये इंदिरा काँग्रेसबरोबर युती असून व इंदिरा गांधींची प्रचंड लाट असूनसुद्धा सेनेला एकही खासदार निवडून आणता आला नव्हता. भाजपबरोबर युती केली नसती तर शिवसेना २-४ आमदारांच्या पलिकडे गेली नसती. आपली ताकद किती आणि फुसका आव आणायचा किती?

In reply to by श्रीगुरुजी

जशी शिवसेना एकटी निवडणुक लढलेली आहे, तसा भाजप आणि इतर पक्षही एकटेच लढलेले आहेत. पण त्यापैकी कोणीच स्वतःचे एवढे कौतुक करत नाहीय्ये.>>>>>>>>>> गुरुजी ते कौतुक नापास होईल असे वाटलेला मुलगा काठावर पास झाला तरी त्याचे जसे होते तश्या प्रकारचे कौतुक आहे.

In reply to by क्लिंटन

या परिच्छेदातून प्रस्तुत प्रतिसाद देणार्‍यास नक्की काय म्हणायचे म्हणायचे आहे हे कोणी समजावून सांगितल्यास त्या मिपाकराला माझ्याकडून एक व्हेज लार्ज पिझ्झा आणि पेप्सीची पार्टी नक्की. पण त्यासाठी त्या मिपाकराला माझ्याकडे यावे लागेल Smile
मी येतो. तुम्हाला ते समजावून साम्गण्याचा प्रगत्न करतो. तुम्हाला समजले नाही तर? ( .... अर्धा पिझ्झा आणि अर्धी पेप्सी हे तरी अ‍ॅशुअर करा क्लिन्टन शेठ उगाच सगळं ऐकून नंतर समजलं नाही म्हंटला तर गेले किनई आमचा अर्धा दिवस + लोकलचे .रीक्षाचे भाडे वाया ;) )

In reply to by प्रसाद१९७१

सहमत! उत्क्रांतीच्या काळात माणूस कंदमुळं खायचा. थालीपीठ , मांडे , पुरणपोळी , म्हाद्यामुळं कंदमुळांची खाद्यसंस्कृती नष्टच झाली की! तेच थालीपीठ, मांडे, पुरणपोळ्यांचं होईल.

In reply to by आजानुकर्ण

अगदी हेच लिहिणार होतो. अन्नाचा उद्देश शरीराला त्याची कामे करण्यासाठी ऊर्जा पुरवणे हा आहे. त्याला संस्कृती वगैरे बनवणे ही माणसाच्या सुपिक मेंदूची करामत आहे. तेच भाषेचं. संवाद महत्वाचा. भाषा नव्हे.

In reply to by प्रसाद१९७१

नाही दिसले हे पदार्थ, तर काय फरक पडतो.
तुम्ही फक्त खाण्याचेच पदार्थ पाहिले. सण, रीती नाही पाहिल्या. असो. अर्थात मी नसल्यावर भाषा किंवा संस्कृती किंवा हा देश किंवा पृथ्वी सुद्धा असली काय नसला काय राहिली की कसलाच फरक पडत नाही. तुमच्या प्रतिसादाला उत्तर देणे हे देखील तितकेच खरे व्यर्थ टंकणश्रम. त्यामुळे भाषेला कसलाच फरक पडणार नाहिय्ये.

In reply to by विजुभाऊ

आयला वीजूभाऊ - तुम्ही तर महान भारतीय संस्क्रुतीतील अस्पृष्यता, सती जाणे, हूंडा, बालविवाह ह्या सर्व रीतींना सॉलीड मिस करत असाल ना?

In reply to by यसवायजी

"म्हाद्या " ही भरपूर कांदा घालून केलेली शेम्गदाण्याची भाजी किंवा भरपूर शेम्गदाणे घालून केलेली कांद्याची भाजी असते. खासकरून सातारा भागात ही गावरान भाजी एकदम फेमस आहे. उसाची वारी केलेल्या अन नावालाच सातारचे सांगणाराना हे माहीतच नसेल. अर्थात त्यामुळे त्यांना काहीच फरक पडत नाही.

In reply to by यसवायजी

अनिल अवचट यांचं ' छंदांविषयी ' नावाचं पुस्तक आहे. त्यात स्वयंपाकाविषयी जे प्रकरण आहे त्यात त्यांनी महाद्याची कृती दिलेली आहे.

In reply to by विजुभाऊ

अपल्याला माहीतही नसलेल्या अनेक आदिवासी भाषा आज आस्तित्वातच नाहीत उदा : पावरी ,वाडवली , अहिराणी , वडारी , ज्या भाषा नष्ट झाल्या त्या भाषीक लोकांची संस्कृती नष्ट झाली.
बठ्ठा खानदेश आहिरानामा बात करंस, पावरी आठे सातपुडामां पावरा लोके बोलतंस. वड्डर लोकेस्नी भासा बी तितलीच जित्ती शे. आन तुम्ही आठे सोंस्कृतीना बाता करी र्‍हायनात? १. उदाहरणे नीट द्या. २. आधी संस्कृती नष्ट होते. नंतर भाषा.

In reply to by आनंदी गोपाळ

उद्या समजा मराठीवर अशी वेळ आली तर भोंडला , पोवाडा ,गुढीपाडवा असे सांस्कृतीक सण नाहीसे होतील.
पोवाडा नावाचा सांस्कृतीक सण?? डब्लू टी एफ?

भाषेची निर्मिती का झाली ? तर संवाद साधण्यासाठी . मग तो संवाद कसा होतो हे महत्वाचे . तो कुठल्या भाषेतून होतो ते फारसे महत्वाचे नाही . मराठी वर प्रेम असणे वेगळे आणि तिची अस्मिता वैगेरे ठोकळेबाज कल्पनांच्या आहारी जाण वेगळ . शेवटी भाषा (फ़क़्त संवादाच माध्यम म्हणून ) महत्वाची कि ती वापरणारा माणूस जास्त महत्वाचा हा preference नक्की झाला तर भाषेमुळे नसलेले प्रश्न उकरून काढून स्वतहाच्या पोळ्या भाजणार्या लोकांची दुकान बंद होतील

In reply to by पिंपातला उंदीर

मला वाटले होते की माझ्या प्रतिसादामुळे एकदम अस्मिताखोरांचा हल्ला होइल माझ्यावर, पण पिंउ आणी बोएआ ह्यांच्या प्रतिक्रीया वाचुन बरे वाटले.

मराठी अस्मिता हे एक भोंगळ प्रतीक आहे. बीहारी / युपी च्या लोकांची दादागिरी हसत खेळत सहन करणे म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? उगाचच हिन्दी भाषेला राष्ट्रभाषा म्हणवत हिन्दी पखवडा साजरा करणे म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? कर्नाटक सरकारने / तामिळनाडू सरकारने भाषेची सक्ती केली तर त्या विरुद्ध कोणीच काही बोलायचे नाही मात्र मराठीचा आग्रह धरला तर मात्र तो राष्ट्रदोह मानायचा म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? मराठीला इंग्रजी पेक्षाही हिन्दी भाषेकडून गिळंकृत होण्याचा धोका आहे हे स्पष्ट दिसत असूनही ते मान्य करायचे नाही म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? "गर्व " हा शब्द हिन्दी भाषेतील अर्थाप्रमाणे मात्र मराठीत चुकीच्या अर्थाने वापरायचे म्हणजे मराठी अस्मिता म्हणायचे का? ( उदा: "गर्वाचे घर खाली" )

In reply to by विजुभाऊ

मराठीचे हिंदीचं आक्रमण होतंय तसं हिंदीवरही मराठीचं होतंय की! जिला मुंबैया हिंदी म्हणतात ती ऐकलीय तुम्ही? कोणत्याही अस्सल हिंदीभाषिकाचा नक्षा उतरतो ती ऐकली की!

In reply to by विजुभाऊ

हिंदी पंधरवड्याच्या बाबतीत तुमची माहिती थोडी कमी असावी कदाचित असे दिसत आहे. भारत सरकारच्या धोरणानुसार सर्व केंद्रसरकारी खाती, बँका, महामंडळे, कंपन्या (पीएसयु) यांना हिंदी भाषेच्या प्रसारार्थ काही अ‍ॅक्टीव्हिटीज चालवणे बंधनकारक असते. त्याचा तिमाही, सहामाही व वार्षिक अहवालही देणे बंधनकारक आहे. या सर्वाचा मराठी अस्मितेशी संबंध जोडणे सर्वथा चूक आहे. महाराष्ट्र सरकारला अथवा कोणत्याही राजकीय, बिगर राजकीय पक्षाला त्यात काहीही बदल करता येत नाही. अजून एकः महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीतील कंपन्या, महामंडळे, खाती, यांना वरील गोष्टी लागू नाहीत.

In reply to by बोका-ए-आझम

ही लिंक देणा-यांनी धागा नीट वाचलेला दिसत नाही. धाग्यातील सूर लेखातील सुरापेक्षा फार वेगळा नाही आहे. असो.

In reply to by वेल्लाभट

धागा अस्मितेचा पुरस्कार करतोय आणि लेख अस्मितेचं राजकारण संपुष्टात आलंय असं म्हणतोय. दोन पूर्ण वेगवेगळे मुद्दे आहेत. फारसा फरक नाही?

In reply to by बोका-ए-आझम

आता वास्तविक हा असा प्रकार कालबाह्य झाला आहे. पक्षांसाठी भाषिक मुद्द्यावर निवडणुका लढवणं योग्य राहिलेलं नाही आणि लोकांनी कुण्या राजकीय पक्षावर 'आपल्या' भाषेची अस्मिता जपण्याकरिता अवलंबून रहाणं योग्य राहिलेलं नाही. पुढे गेलंय सगळं आता. दोन दशकांपूर्वी जेंव्हा एका पक्षाने मराठी माणसाचं सबलीकरण केलं, तेंव्हा त्यासाठी तो काळ योग्य होता. पण आता जेंव्हा इतर पक्ष विकासाची कास धरत आहेत, ती लोकांच्या बुद्धीला पटत आहे, तेंव्हाही हे योग्य ठरेल ही शक्यता कमीच.

बस स्टॉपवर उभे राहून स्पष्ट मराठी बोलणे ठीक आहे पण त्यापेक्षा मुंबईतल्या,राज्यातल्या मराठी ग्रंथसंग्रहालयांची काय अवस्था आहे? शाळांची काय अस्वस्था आहे?स्वतःची अस्मिता जपण्यासाठी दुसर्यांचा मत्सर करावाच लागतो का? मराठी अस्मितेच्या नावाने राजकारण करणार्यांनी स्वतःची मुले मात्र डॉन बॉस्को,बॉम्बे स्कॉटिशला घातली.किती मराठी चांगल्या कादंबर्यांची ईतर भाषांत भाषंतरे झाली? नरेण्द्रने गुजरातमध्येही गुजराती अस्मिता चेतवली पण आर्थिक्,पर्यटनाच्या माध्यमातून.देशभरात त्याचे स्वागत झाले. आता नविन सरकारातले लोक काय करतात ते पाहू.

In reply to by सुनील

अस्मिता नव्हे अस्मिथा

मराठी माणसाला मुंबईत कधीच पोरकं केलं गेलं असतं. पण त्याला बळ दिलं, त्याचा दरारा प्रस्थापित केला तो या पक्षाने
कोणता बरे पक्ष हा? याच पक्षाची सत्ता महापालिकेवर १५+ वर्षे आहे मग मराठी माणसाचा दरारा कमी का होतोय म्हणे?

In reply to by आजानुकर्ण

तो पक्ष आहे म्हणून मराठी माणूस जिवंत आहे मुंबईत असे हे ही म्हणत.दुसर्यांच्या लुंग्या सोडण्याच्या नादात ह्या पक्षाच्या लोकांनीच कमरेचे सोडून डोक्याला कधी गुंडाळले हे त्यांचे त्यांनाही कळले नाही.तरी मतदारांनी जरा दया-माया दाखवली त्यांच्यावर नाहीतर त्यांचेही 'खळ-खट्याक' झाले असते.

भाषा एका नदी सारखी असते, काळाप्रमाणे प्रवाह बदलत राहते, कुणाला कळत ही नाही. चिंता करू नये. तीनशे वर्ष जुनी मराठी आज लोक समजू शकतात का. बाकी प्रश्न पदार्थांचा कालच आमच्या कार्यालयातला एका सरदारजी घरून डब्यात बटाटे-पोहे आणले होते. दिल्लीत ही कित्येक अमराठी लोकांना मराठी पदार्थ मुंबे-पुण्यावाल्यांपेक्षा चांगले बनविता येतात. आमची सौ. मराठी, पंजाबी आणि आता चाईनीज (मोमो, इत्यादी) ही उत्तम बनविते. बाकी अस्मितेचे म्हणाल तर हरयाणात एक निर्वासित पंजाबी भाषिक मुख्यमंत्री झाला आहे. महाराष्ट्रात जर अमराठी मुख्यमंत्री झाला तर काही फरक पडणार नाही फक्त तो इमानदार आणि राज्याला विकासाकडे नेणारा असला पाहिजे.

In reply to by विवेकपटाईत

महाराष्ट्रात जर अमराठी मुख्यमंत्री झाला तर काही फरक पडणार नाही फक्त तो इमानदार आणि राज्याला विकासाकडे नेणारा असला पाहिजे.
+१...सहमत.

In reply to by शिद

+२... मराठी खाऊ-भाउ पेक्षा विकासाकडे-नेऊ करणारा अमराठी भारतिय मराठी माणसासाठी हजारोपटींनी जास्त चांगला ठरेल.

In reply to by प्रसाद१९७१

भारताचा पहिला पंतप्रधान इंग्लंडमध्ये शिकलेला साहेबच होता. काय वाट लावून ठेवली त्याने आणि त्याच्या मुलाबाळांनी! भारतीय असला पाहिजे. जात, धर्म, राज्य, लिंग - काहीही चालेल!

In reply to by बोका-ए-आझम

इंग्लंड मधे शिकलेला आणी युरोपियन ह्याच्यात जमीन्-आस्मानाचा फरक आहे. एनीवे, मी मुद्दामुन टोकाचे लिहीले. मला म्हणायचे होते, चांगला माणुस पाहीजे, कुठला का असेना.

मराठी माणूस हा नेहमीच बाहेरच्यांना डोक्यावर घेताना दिसतो. अगदी नाते संबधात पण असेच दिसते. सख्खी बहिण / भाऊ यांना फाट्यावर मारणार . पण चुलत / मामे बहिण / भाऊ यांना जास्त जवळचे. बघा ..विचार करा असेच असते कि नाही ?

धर्म, जात, भाषा देश, संस्कृति .रूढी परंपरा, साहित्य, कला यात अजरामर कोणीच नाही. याला निसर्गात काहीही अर्थ नाही. मानव समाज निसर्गाचाच एक काहीसा संभ्रमित असलेला सबसेट . त्यात काला नुसार बदल हे होणारच ! सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट याचा दुसरा अर्थ उपयुक्त तेच टिकते असा आहे. आज कोब्रा व देब्रा यांंची लग्ने विनातक्रार होतात. त्याना सत्तर च्या दशकापर्यंत कोण अभिमान होता आपल्या पोटजातीचा !

नुस्तेच कोब्रा-देब्रा कशाला म्हणताय. कोब्रा; कर्‍हाडेना विचारतसुद्धा नाहीत. आणि दे ब्रा परभट म्हणून कोणाला हिणवतात हे म्हैत आहे ना? जी एस के त्यांंचे वेगळेच तुंअतुणे वाजवत असतात. सी के पी स्वतःला सर्वत्र फिट्ट बसवतात. पश्चीम महाराष्ट्रातील कुलकर्णी वर्‍हाडातल्या कुल्कर्ण्याला सापत्न वागणूक देतो. कधीतरी टिपणीस ,पोतनीस , कुलकर्णी ( वर्‍हाडकर) , देशपांदे , दळवी , म्हैसकर , दाबके , जोशी , प्रधान ,शेणॉय आणि दाभोलकर यां आडनावांच्या जातबांधवानी मिळून एकत्र काही केलेले कधी पहाण्यात आलय का? तेच शेट्ये , आठल्ये , शेंडगे ,नारकर , सुर्वे , काम्बळी , आंग्रे , लहाने , चौधरी इत्यादी मंडळींसाठी अवाम्तरः माझा हा प्रतिसाद जाती उकरुन काढण्यासाठी नाहिय्ये. एक समाज म्हणूण आपण आजही एकत्र वावरत नाही.

In reply to by विजुभाऊ

माझ्या नातेवाईकात ( कोब्रा ) मधे मराठा ,सोनार , कर्‍हाडे देशस्थ, गुजराथी यांचा प्रवेश गेल्या चाळीस वर्षात झाला आहे. माझ्या काही मित्रांच्या नातेवाईकातही असा कल दिसतो आहे. काही टीकाटीपण्णी होत असते पण बेटी व्यवहार होत आहेत.

अस्मिता हे लबाड लोकानी पोट भरण्याकरता केल we ले हुकमी हत्यार आहे

शिवसेना मराठी लोकांचा पक्ष आहे म्हणे. मग महाराष्ट्रातील काँग्रेस , राष्ट्रवादी , भाज्पा , शेकाप वगैरे वगैरे हे सगळे रशियन लोकांचे पक्ष आहेत का ?

मुंबईच्या मराठी लो़़कसंख्येच्या मानाने इतर महाराष्ट्रात राहणार्या मराठी लोकांची संख्या नक्कीच जास्त आहे. नागपुर तर पुर्वी मध्य प्रदेशातच होते. इन्दूर, बडोदा, ग्वाल्हेर इत्यादी भागांतही अनेक मराठी कुटुंबे आहेत. परदेशातही अनेक मराठी लोक राहतात. ही सगळी मंडळी आपापल्या सोयीप्रमाणे मराठी अस्मिता जपत असंतात. दोन-चार मराठी मंडळींनी कुठे कोपर्यात चार हिंदी वाक्ये म्हटली तर मराठी भाषेला मुर्छा येईल असे वाटत नाही.