✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एका गारुड्याची गोष्ट १०: घोणस: गवतात लपलेला स्नायपर !

ज
जॅक डनियल्स यांनी
Fri, 10/04/2013 - 09:57  ·  लेख
लेख
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद ! एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ ! एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे ! एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग. एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य ! एका गारुड्याची गोष्ट ७: नाग: अंधश्रद्धेचा बळी ! मनातलं एका गारुड्याची गोष्ट ८: नाग: माझे कॉलचे अनुभव एका गारुड्याची गोष्ट ९: मण्यार: पडद्यामागचे कलाकार ! आपल्या मध्ये जसे (जाती-)जमाती प्रकार असतो,तसाच सापांमध्ये पण असतो. (अजून साप आपल्या एवढे प्रगत नाही म्हणून त्यांच्या मध्ये जाती नसतात.) नेपाळी गुरखा म्हणले की कसे "शलाम साब" डोळ्यासमोर उभे राहते, अंबानी म्हणले की "बिजिनेस" ऐकू येते आणि "गांधी" ऐकले की "राजकारण" दिसते, तसेच सापांचे पण असते. नाग हा "येलापिडे (Elapidae)" या ("सौथ इंडियन अण्णा") कुटुंबातील असतो, यामध्ये चष्मा नाग, राज नाग (किंग कोब्रा) ते आफ्रिकन मंबा आणि शेवटी मण्यार पर्यंत अनेक विषारी साप येतात. या सर्व बंधू भावांची वर्तणूक, त्यांचे विषाचे परिणाम साधारण पणे सारखेच असतात. पुण्यात जसे "घराच्या पत्त्यावरून" त्या कुटुंबाच्या स्वभावाचा किंवा वर्तनाचा अंदाज लावता येतो तसेच एकदा का 'येलापिडे' सापडला की पुढचे अंदाज बांधता येतात. म्हणूनच आधीच्या दोन्ही लेखात मी नाग आणि मण्यारची ओळख करून दिली आहे. त्याच प्रमाणे घोणस आणि फुरसे हे एकाच कुटुंबातील जत्रेत हरवलेले करन- अर्जुन आहेत (जमात: व्हायपरीडे-Viperidae) त्यामुळे त्यांचे दोघांचे स्वभाव,(हो सापांना पण स्वभाव असतात.) त्यांच्या दंश करण्याच्या पद्धती, लुक्स जवळपास सारखेच असते.
त्यातला घोणस म्हणजे सैन्यातील "स्नायपर" !(enemy at the gates मधला व्हासिली आठवा.)
घोणस (विषारी): सोनेरी-बदामी रंगावर काळपट ठिपक्यांची वेलबुट्टी, जसा काही पैठणीचा पदर काठ. तळपता बाण डोक्यावर रेखलेला आणि कॉलेज मधल्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारे हार्ट-शेप डोके. घोणस घोणसाला, एका स्कॉटिश फिरंग संशोधकाने शोधून काढले म्हणून त्याला त्याचे नाव 'रसेल व्हायपर' (Patrick रसेल) दिले गेले. हा साप म्हणजे "अमेरिकन अपाची" हेलिकॉप्टर सारखा..सगळ्या अस्त्रांनी सज्ज आणि लपून राहण्यात पटाईत. खात्या पित्या घरचा साप, ग्राईप वाटर च्या जाहिरातीमधल्या बाळासारखा गुटगुटीत असतो. उगाचच झाडावर चढ,छपरात घूस असे उरफाटे प्रकार हा करत नाही. आपला गप गवतात लपून राहतो आणि डब्बा उडवायला कोणी आला की 'इस्टोप' करून टाकतो. अंगावरील नक्षी ही त्याला निसर्गाने दिलेले बर्थडे गिफ्ट आहे, त्यामुळे पिवळ्या पडलेल्या गवतामध्ये असला तर कधी कधी पाय पडे पर्यंत दिसत नाही. हा साप नागासारखा जंटलमन असल्याने, आधी वार्निंग द्यायला प्रेशर कुकर च्या शिट्टी सारखा खर्जातला सूर लावतो. त्या सुरात इतकी बेक्कार वार्निग असते की, जो तो सूर ऐकतो त्याला डायरेक्ट ए.मे.सी.बी च्या ट्रान्सफोर्मार वरची कवटी दिसते. "माझ्या सुरवातीच्या काळात, एका बांधकामाच्या कामचलाऊ गोदामात दोन घोणस असल्याचा कॉल होता. राजाभाऊंनी एक घोणस पकडून पिशवीत टाकला होता आणि मी दुसरा शोधात होतो. प्रेशर कुकर च्या शिट्टी सारखा आवाज येत होता आणि इतक्यात कोणीतरी गोदामाच्या छताचा सांधा हलवला आणि आख्खे छत खाली आले. धुराळा उठला, त्याच अंधारात मी टारझन सारखे दोन्ही हाताने छत पकडले. त्या धुराळ्यात तो प्रेशर कुकर चा आवाज येत होता पण मला काहीच दिसत नव्हते. तेंव्हा भीती वाटून पण उपयोग नव्हता, त्यांमुळे त्या आवाजाचा मी आध्यात्मिकपातळीवर ;) आनंद घेतला. नंतर तो आवाज हळू हळू कमी होत गेला, मग माणसे आली, छत उचलले वगैरे. पुढे आयुष्यात असे (घोणस बरोबरचे)एकांतातील क्षण फार कमी आले.(भाग ४) " इंजेक्शनच्या सुई सारखे पोकळ, १६ एम.एम. चे दोन विषाचे दात हे घोणसाचे मुख्य अस्त्र ! हे दात हायपो-डर्मिक सुई सारखे पोकळ असून विष ग्रंथिना जोडलेले असतात. (मोसादच्या) बेरेत्ता पिस्तुलातील म्यागझीन सारख्या याच्या जबड्यात ५-६ दाताच्या जोड्या असतात, एक फायर झाली की दुसरा तयार. त्यातून ते दात फोल्डिंग चे असतात, म्हणजे छत्रीत गुप्ती ठेवतो ना तसे...काम तमाम झाले की गुप्ती छत्रीच्या दांड्यात ! पहिला फोटो घोणसाचे विष काढतानाचा आणि दुसरा त्याच्या डोक्याची रचना दाखवणारा.  दात ! दाताची रचना. नाग हा फण्याच्या समोरच्या बाजूला म्हणजे साधारण पणे १८० अंशात हल्ला करू शकतो तर घोणस ३६० अंशात कुठे पण हल्ला करू शकतो....म्हणजे दिवाळी मध्ये भुईनाळा फेल गेला ही कसा फिरतो, तसाच हल्ला करताना घोणस फिरतो. त्यामुळे तुम्ही पहिले असेल तर, नागांचे चुंबन घेणारे खूप लोकं असतात पण घोणसाच्या वाटेला जात नाही.(जगात चुंबन घ्यायला एवढ्या सुंदर गोष्टी असताना, लोकं इंटर-स्पेसियल रिलेशन मध्ये का पडतात कोण जाणे?) गारुडी, थाईलंडवाले सापवाले पण घोणसाच्या खेळापासून जास्त करून दूरच राहतात. डोळ्याची पापणी लवते न लवते तो पर्यंत जीवा महाला ५ हातावरचे लिंबू पट्ट्याने उडवून जागेवर यायचा,याच कुळीतला घोणस असतो. १/३ सेकंदात: "तोंड उघडून -विषदंत बाहेर काढून -दंश करून -विष सोडून - दात मिटून -परत जागेवर".. या सगळ्या क्रिया होतात.( मला हे वाक्य लिहायला पण ३० सेकंद लागली.) हा व्हिटेकर सर्पतज्ञांचा व्हिडिओ बघा: घोणसाचा हल्ला. .हाय-स्पीड कॅमेरा मध्ये त्यांनी घोणसाचा हल्ला चित्रित केला आहे. ) वरती लिहिल्याप्रमाणे या जमातीचे विषपण नागापेक्षा वेगळ्या प्रकारचे म्हणजे हिमो-टोक्सिक असते. साधरण पणे १३० ml तो २५० ml म्हणजे पाउण ते आख्या (कुकिंग) कप एवढे विष टोचू शकतात, त्यातले माणसाला पाव कप विष ढगात पोचवायला पुरेसे असते. हे विष मुख्य करून रक्ताभिसरण संस्थेवर (तर नागाचे मज्जासंस्थेवर) हल्ला करते, थोडक्यात म्हणजे रक्ताचे पाणी करते. रक्ताची गुठळ्या करायची क्षमता गंडल्यामुळे शरीरातून रक्तस्त्राव होऊ लागतो. पहिल्यांदा हिरड्या मधून रक्त चालू होते,नंतर मिळेल त्या भागातून रक्त पडू लागते...रक्त दाब कमी होऊ लागतो आणि शेवटी किडनी फेल होऊन रुग्ण दगावतो. अमेरिकन झोंबी हा (हिडीस) प्रकार पहिल्या वर मला घोणस चावलेला आणि अगदी शेवटच्या स्टेज मध्ये असलेला माणूस आठवला होता.
ज्यांना हा साप चावला आहे त्यांच्या भाषेत,"उकळते तेल शरीराच्या आत मध्ये इंजेक्शन ने टोचायचे- म्हणजे घोणसाचा चावा !"
माणूस वाचला तरी, ज्या जागी घोणस चावतो तिकडचे टिशू जळून जातात. अशी घोणसाची कृपा झाली की त्याची परिणीती हाता-पायाची बोटं किंवा हात-पाय गमावण्यात होते. लान्सेत या मेडिकल जर्नलच्या मते जी कोणी माणसे घोणस चावून वाचतात, त्यातील २६% लोकांची पिटूटरी ग्यांडची वाट लागते आणि मग त्यांचा हार्मोनल-लोचा होतो. घोणस चावून वाचलेला माणूस जर कधी पहिला पहिला तर हे डिस्कवरी प्रेरित सर्पमित्र कधी सापाशी खेळ करायची हिम्मत करणार नाहीत. हा व्हिडिओ बघा: विषाचे रक्तावर परिणाम "कूच डाग भी अच्छे होते है!" याच चालीवर हे घोणसाचे विष मेडिकल क्षेत्रात खूप ठिकाणी वापरले जाते. "Dilute Russell's viper venom time (dRVVT)" ही पद्धत हॉस्पिटल मध्ये वापरून रक्ताची गुठळ्या करण्याची क्षमता तपासली जाते. २००५ सालची एक सकाळ...मी सर्पोद्यान मध्ये एक स्नेक-पिट साफ करत होतो, इतक्यात एक माणूस पळत आला, त्याने डोक्यावर दोन्ही हाताने साप पकडला होता (लावणीवाली बाई पदर पकडते तसा !)..."अहो अजगराचे पिल्लू पकडून आणले आहे, कुठे सोडू ?" मी दृश्य बघताच, हादरलो...३ फुटी चकचकीत घोणस त्याने हातात डोक्याजवळ पकडला होता, चावला असता तर औषध द्यायला पण वेळ मिळाला नसता. मी आधी त्याच्या पासून लांब झालो आणि त्याला, जमिनीवर त्या अजगराला (घोणसाला!) टाकायला सांगितले. (नंतर स्नेक स्टिक ने नीट उचलून त्याला घोणसाच्या पिट मध्ये टाकले.)..."काय हो, तुम्ही एवढे सर्पोद्यान चे असून अजगराला घाबरता , बारामती ला एसटी मध्ये चढलो या बेन्याला (अजगराला) घेऊन, मध्ये मध्ये पोत्यांमधून डोके काढायचा ...की द्यायचो एक टप्पू ठेवून, असाच आणला याला इकडे स्वारगेट वरून .... मी काहीच बोललो नाही,मला फक्त राजाभाऊंचे (मूळ वाक्य:जिम कार्बेट) वाक्य आठवले "अज्ञानात नेहमीच सुख असते ! " पुढच्या लेखात फुरसे ... (या लेखातले सर्व फोटो अंतरजालावरून आणि चिराग रॉय कडून घेतले आहेत.त्यांना कुठल्या पद्धतीने बदलण्यात आले नाही.)

Book traversal links for एका गारुड्याची गोष्ट १०: घोणस: गवतात लपलेला स्नायपर !

  • ‹ एका गारुड्याची गोष्ट ९: मण्यार: पडद्यामागचे कलाकार !
  • Up
  • एका गारुड्याची गोष्ट ११: फुरसे: कोकणी धसका ! ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
तंत्र
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव
माहिती

प्रतिक्रिया द्या
69749 वाचन

💬 प्रतिसाद (110)

प्रतिक्रिया

(गैर) समज/प्रश्न

पुतळाचैतन्याचा
Fri, 10/04/2013 - 21:41 नवीन
माझे साप/नाग या विषयी काही (गैर) समज/प्रश्न आहेत. कृपया प्रकाश टाकावा. १) सापाला तीव्र प्रकाश सहन होत नाही. कधी साप निघाल्यास तीव्र प्रकाश टाकून त्याला पळवून लावता येईल का? २) साप शक्यतो ओल्या आणि थंड जागेत जात नाहीत. साप निघाल्यास पाणी टाकून बचाव करता येईल का? ३) सर्प दंश वरचे injection काही ठराविक ठिकाणीच का मिळते? आणि ती emergency मध्ये ती ठिकाणे कशी शोधायची? प्रार्थमिक उपचारांची माहिती द्या. ४) बचावाच्या काही पद्धती सांगा.
  • Log in or register to post comments

माझी माहिती

एस
Sun, 10/06/2013 - 01:15 नवीन
१ आणि २ - माझ्या माहितीनुसार बरेचसे चुकीचे. जेडी सांगतीलच. ३. ग्रामीण भागात दुर्दैवाने तालुक्याच्या ठिकाणीच आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रावर प्रतिविष उपलब्ध असते - तेही नेहमी असेलच असे नाही. शहरी भागात सरकारी रुग्णालयांमध्ये असते. प्रथमोपचारांबद्दल सांगायचे झाले तर जखम स्वच्छ धुणे आणि रुग्णाला धीर देत, शांत ठेवत सर्वात आधी डॉक्टरांकडे न्यावे हेच योग्य आहे. जखमेच्या ठिकाणी काप वगैरे घेऊ नयेत किंवा विष जखमेतून तोंडाने शोषून घेऊन थुंकणे असे काही प्रकार करू नयेत. रुग्णाची हालचाल कमीत कमी व्हावी अशी काळजी घ्यावी. बरेचदा चावलेला साप बिनविषारी असतो किंवा झालेला दंश हा ड्राय-बाईट प्रकारचा असतो. तरीही वैद्यकीय उपचार त्वरित मिळतील हे पहावे हेच उत्तम. ४. बचाव म्हणजे लांब राहणे. साप काही तुमच्याविरुद्ध युद्धाचा बिगुल वाजवून तुमच्याशी लढायला येत नाहीत. तसेच ते विनाकारण तुमचा चावाही घ्यायचा प्रयत्न करत नाहीत. आपण जेवढे सापांना घाबरतो त्यापेक्षा जास्त ते आपल्याला टरकून असतात. फक्त त्यांच्या वाटेला (कळत वा नकळत) जाऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुतळाचैतन्याचा

१)हा गैरसमज आहे, उलट तीव्र

जॅक डनियल्स
Sun, 10/06/2013 - 20:18 नवीन
१)हा गैरसमज आहे, उलट तीव्र प्रकाश टाकला तर तो थोडा वेळ बावचळून जाऊ शकतो पण त्या नंतर तो चवताळून हल्ला करेल. २)साप हा पृथ्वीवर करोडो वर्ष आहेत, त्यामुळे जवळपास सगळ्या परिस्थिती त्यांना जगायला जमते. पाणी टाकून नाही पण घराच्या बाजूला फिनेल (किंवा उग्र वासाचे केमिकल) टाकल्यास जास्त करून साप फिरकत नाहीत. ३)आणि ४) उत्तरे स्वॅप्स मस्त दिली आहेत, अजून माहिती पाहिजे असल्यास, या लेखाच्या प्रतिसादात पहावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुतळाचैतन्याचा

धन्य आहेस..

चिगो
Fri, 10/04/2013 - 22:29 नवीन
धन्य आहे तुझी, जेडी.. काय लिहीतोस जबरा.. घोणसला खरोखर अजगराशी कनफ्यूज करायला भरपूर वाव आहे असं दिसतंय..
  • Log in or register to post comments

अप्रतिम

अभिजा
Fri, 10/04/2013 - 22:57 नवीन
अप्रतिम लेख मालिका आहे.
  • Log in or register to post comments

धन्य आहे तुमची..

अग्निकोल्हा
Fri, 10/04/2013 - 23:11 नवीन
अन घोणस वागवणार्‍या माणसाची!
  • Log in or register to post comments

आमच्याकडे एक परड जातीचा साप

सँम (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 10/04/2013 - 23:57 नवीन
आमच्याकडे एक परड जातीचा साप सापडतो म्हणे(मी पाहिलेला नाहि). लोकांचा असा गैरसमज आहे कि तो साप जोरात माणसावर फूंकतो व तो माणूस म्हणे जाम म्हशी सारखा फूगतो. मला वाटते तो कदाचित घोणस असेल. कारण घोणस दूरुनच एव्हड्या वेगाने एखाद्यावर वार करत असेल कि पाहणार्याला वाटत असेल कि त्याने नूसते फुंकले आहे . त्यामूळे अशी धारणा तयार झाली असेल. का खरच असा एखादा साप सापडतो का महाराष्ट्रात?
  • Log in or register to post comments

"परड" हे घोणसाचे लोकल नाव आहे

जॅक डनियल्स
Sat, 10/05/2013 - 21:40 नवीन
"परड" हे घोणसाचे लोकल नाव आहे. "म्हशी सारखा फुगणे" किंवा "माणसावर फुंकणे " हे अतिशोयोक्तीचे वर्णन आहे. पण तुमचे घोणसबद्दल चे निदान बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सँम

बरोबर

एस
Sun, 10/06/2013 - 00:58 नवीन
परड, सोन्या परड, बहिर्‍या परड, फरड अशीही काही स्थानिक नावे या सापाला आहेत. घोणस अतिशय चपळाईने हल्ला करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सँम

तुमचे लेख वाचवत नाहीत आणि

वीणा३
Sat, 10/05/2013 - 01:15 नवीन
तुमचे लेख वाचवत नाहीत आणि सोडवत पण नाहीत. माहितीपूर्ण असतात पण वाचल्यावर बराच वेळ भीती वाटत राहते :( फोटो तर बघत सुद्द्धा नाही :( .
  • Log in or register to post comments

रसेल वायपर

एस
Sat, 10/05/2013 - 01:16 नवीन
ह्याच्याशी दोनदा जवळून गाठ पडली. एकदा आहुप्याच्या वाटेवर आणि एकदा आमच्या घराच्या मागच्याच घरात. आहुप्यावरून परत येताना हा गाडीच्या उजेडात दिसला. स्वारी आरामात फुल्ल टाइट झाल्यासारखी हळूहळू रस्ता ओलांडत होती. एकदा डावीकडे तर एकदा उजवीकडे झोकांड्या खात जाणार्‍या दारुड्यागत हीपण कधी थोडी इकडे तर कधी थोडी तिकडे जाई. मग जरा वेळ गल्लीतलं आपलं घर किती नंबरचं हे विसरल्यागत वाईच दम खाई. पुन्हा किक बसल्यागत हिची गाडी चार पावलं पुढे सरके. बहुधा रात्रीचे भोजन जरा जास्तच झालं असावं. इकडे आमचा जीव टांगणीला. आम्ही गाडी थांबवली असली तरी दुसरी गाडीपण थांबेनच हे कशावरून. खाचक्कन एखाद्या जोरात असलेल्या डायवरने घातली अंगावरून की ही देखणी त्वचा एका मृतप्रायः शरीरावर पहावी लागली असती... त्यात गाडीतले काही अतिउत्साही गडी खाली उतरून जवळून बघायला धावले. त्यांना आवरायला जीव खाऊन शिव्या देत आणि मागे ओढत शेवटी ह्या तरूण रक्तांना हिमोटॉक्सिनपासून कसंबसं वाचवलं. तिकडे ती शांतपणे गवतात अदृश्य झाली आणि हायसे वाटून आम्ही आमचा मार्ग धरला. पण जाताजाता तिने माझ्या कॅमेर्‍यासाठी एक मस्त पोज दिली. :) दुसरी भेटली तीपण अशीच शांत आणि निवांत. नाग आणि घोणस हे निदान मलातरी जेव्हा जेव्हा भेटलेत तेव्हा तेव्हा ते अतिशय शांतपणे वागले आहेत. दोन्हीही आधी तिथून निघून जाण्याचा म्हणजेच संघर्ष टाळण्याचाच प्रयत्न करतात हे मात्र नक्की. दुसरीने मस्तपैकी इंग्रजी S चा आपला टिपिकल पवित्रापण घेऊन दाखवला. पण तो थोडावेळच. तिलाही सुरक्षित नेऊन सोडले जवळच्या शेतात. मात्र लोकांना तिला मारलं का नाही हे समजावता समजावता जाम दमछाक झाली नंतर - विशेषतः जेव्हा ती घोणस होती आणि तिच्यापासून लांब का रहायचं हे सांगितल्यावर जसा इथे प्रतिक्रियांना घाम फुटला आहे तसेच तिथे प्रेक्षकांना झालं होतं. तर असोत. ही ती लावण्यवती - Image removed. कशी आहे? :) हेमांगी-मस्तकबाणधारिणी-कृष्णपुष्पदलत्रिपट्टवस्त्रांकित-सर्पकन्या...
  • Log in or register to post comments

तुम्हीपण भारी..

चिगो
Sat, 10/05/2013 - 15:14 नवीन
जबरा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

फारच सुंदर आहे !

जॅक डनियल्स
Sat, 10/05/2013 - 21:35 नवीन
फारच सुंदर आहे ! जो पर्यंत शांत आहे तो पर्यंत ठीक आहे...पण समजा उसळला तर ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

उसळला तर काय, एक तृतियांश सेकंद...

एस
Sun, 10/06/2013 - 00:38 नवीन
काही नाही खरेसाहेबांना व्यनि करायचा ताबडतोब. =)) जोक्स अपार्ट, सापांबद्दल जर माहिती नसेल (दुरुस्ती - पूर्ण माहिती नसेल) तर त्यांच्या वाटेला मुळीच जाऊ नये. तेही आपल्या वाटेला जात नाहीत. आणि माहितीही असली तरी विनाकारण - सापाच्या किंवा त्यापासून इतरांच्या जीवाला जर धोका नसेल तर - निसर्गात ढवळाढवळ करू नये हे तत्त्व मी कसोशीने पाळतो. एका भटकंतीला अरण्यात कोरड पडलेल्या नदीपात्राच्या किनार्‍यावर असाच आम्हांला धामणींचा एक जोडा सकाळच्या उन्हात कातळावर सळसळताना दिसला. आमचा एक सर्पमित्र लगेच ओरडतबिरडत त्यांच्यापाठी त्यांना पकडण्यासाठी धावला. त्याला थोपवून फक्त हे विचारलं - तू त्यांच्या घरात आला आहेस ना, मग?... त्यालाही नशीबाने हे पटले आणि त्या मीलनातूर जोड्याला छानपैकी त्यांच्या मधुर एकांतात सोडून 'ऑल द बेस्ट' करून आम्ही पुढे निघालो. :) थोडेसे अवांतर - सापांना जास्त त्रास स्वयंघोषित आणि स्वयंप्रेरित सर्पमित्रच जास्त देतात असे माझे मत होऊ लागले आहे. माणसांचे हे दोनच प्रकार अलिकडे जास्त दिसून येतात. एक म्हणजे साप दिसला रे दिसला की काठी घेऊन (मारायला) धावणारे अज्ञानी सामान्यजन आणि काठी घेऊन (पकडायला) धावणारे अर्धज्ञानी सर्पमित्र. त्यातही दुसरे त्यांच्या अतिउत्साहीपणामुळे सापाला पोत्यात घालण्याऐवजी गोत्यातच जास्त घालताना दिसतात. असोत. पहिल्या सर्पकन्येच्या बाबतीत आम्ही तिच्या घरी आलो होतो आणि स्वतःहून हायहॅलो करत तिचा पाहुणचार घ्यायचे त्यामुळेच टाळले. दुसरी मात्र लोकांच्या इतकी जवळ होती की एकतर चुकून कोणाचा पायबिय पडून तो सरळ ढगात गेलातरी असता किंवा पहारीचा वा दगडाचा एक घाव हिच्या माथी दाणकन् बसलातरी असता. म्हणून दुसर्‍या परिस्थितीत मात्र हस्तक्षेप केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

धन्यवाद् ! खूप सही प्रतिसाद.

जॅक डनियल्स
Sun, 10/06/2013 - 19:56 नवीन
धन्यवाद् ! खूप सही प्रतिसाद.
सापाच्या किंवा त्यापासून इतरांच्या जीवाला जर धोका नसेल तर - निसर्गात ढवळाढवळ करू नये हे तत्त्व मी कसोशीने पाळतो
हेच सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. पुढे कधी हस्तक्षेप करायची वेळ आली तर, थोडे काळजी पूर्वक करा एवढेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

नेहमीप्रमाणेच मस्त..

उपास
Sat, 10/05/2013 - 02:25 नवीन
साप पाहून लटपटायलाच होतं पण.. तो ओळखेपर्यंत डोळे मिटायचे.. :) विषारी साप, भक्ष्याला विषाने मारुन मग आरामात खात बसतात मग बिनविषारी साप कशी करत असतिल शिकार. विशेषतः उंदीर वगैरे चपळ प्राण्याची?
  • Log in or register to post comments

साप हा खूप चपळ असतो, त्यातून

जॅक डनियल्स
Sun, 10/06/2013 - 19:54 नवीन
साप हा खूप चपळ असतो, त्यातून जे बिनविषारी साप असतात ते जास्तच चपळ असतात-धामण, तस्कर इ. त्यामुळे भुकेले कोणी राहत नाही. मी या बद्दल पुढे लिहीनीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

नेहमीप्रमाणे मस्त लेख...

किलमाऊस्की
Sat, 10/05/2013 - 06:36 नवीन
पुभाप्र...बाकी घोणस आणणार्‍या माणसाची कमाल आहे.
  • Log in or register to post comments

उत्तम लिखाण

सन्जोप राव
Sat, 10/05/2013 - 06:40 नवीन
फारच माहितीपूर्ण लिखाण आणि जबरदस्त लेखनशैली. या लेखांचे एक पुस्तक होईल अशी आशा बाळगून आहे.
  • Log in or register to post comments

फारच माहितीपुर्ण लेखमालिका.

पाषाणभेद
Sat, 10/05/2013 - 07:05 नवीन
फारच माहितीपुर्ण लेखमालिका.
  • Log in or register to post comments

साप

ऊपेन्द्र
Sat, 10/05/2013 - 09:56 नवीन
Dear Mr. Daniel, Myself is Upendra Nirgudkar from Pune. I am a volunteer of Katraj Snake Park, Pune. Kindly let me know your full name. Upendra Nirgudkar. Upendra1970@rediffmail.com
  • Log in or register to post comments

तुमचा वक्तिगत संदेश तपासा.

जॅक डनियल्स
Sat, 10/05/2013 - 10:03 नवीन
तुमचा वक्तिगत संदेश तपासा. जेडी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऊपेन्द्र

फारच सुंदर लेखमाला! प्रत्येक

मिहिर
Sat, 10/05/2013 - 10:11 नवीन
फारच सुंदर लेखमाला! प्रत्येक वेळी प्रतिसाद दिले नाही आहेत, पण आवर्जून वाचतो आहे.
  • Log in or register to post comments

इतक्या डेंजर विषयावरचा मस्त

सस्नेह
Sat, 10/05/2013 - 11:12 नवीन
इतक्या डेंजर विषयावरचा मस्त खुसखुशीत लेख !
  • Log in or register to post comments

जबरदस्त लेख!

पैसा
Sat, 10/05/2013 - 18:37 नवीन
निवांतपणे वाचला. भयंकर प्रसंगांना तुम्ही ज्या विनोदी पद्धतीने रंगवलंय त्याला तोड नाही!
  • Log in or register to post comments

मस्त.

खेडूत
Sat, 10/05/2013 - 23:58 नवीन
मस्त रे दादा! नेहमी वाचत असतो. नेहमीच आवडते! हा भाग तर भारीच .. :)
  • Log in or register to post comments

'वन ऑफ द बेस्ट' सीरिज ऑन मिपा

प्यारे१
Sun, 10/06/2013 - 02:19 नवीन
'वन ऑफ द बेस्ट' सीरिज ऑन मिपा!
  • Log in or register to post comments

+१

पिशी अबोली
Mon, 10/07/2013 - 14:02 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ईथेले अनुभव आणि फोटो

दिपक.कुवेत
Sun, 10/06/2013 - 14:19 नवीन
पाहुनच टाईट झाली आहे. संपुर्ण लेखमाला अतिशय माहितिपुर्ण आहे. पण उपास म्हणलेत त्या प्रमाणे...."साप पाहून लटपटायलाच होतं पण.. तो ओळखेपर्यंत डोळे मिटायचे.."
  • Log in or register to post comments

सुपर्ब!

सोत्रि
Sun, 10/06/2013 - 17:40 नवीन
मस्त माहितीवर्धक आणि मनोरंजक! संजोपराव पुस्तकाबद्दल जे म्हणाले त्याच्याशी सहमत!! - (सापाला भयंकर घाबरणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments

सापांचे स्वभाव

हुप्प्या
Mon, 10/07/2013 - 03:07 नवीन
नाग, मण्यार, घोणस ह्यांची स्वभाववैशिष्ट्ये अगदी वाचनीय आहेत. निव्वळ साप कसे दिसतात त्याबरोबर हेही सांगणे उपयुक्त आहे. पर्यटक, गिर्यारोहक, भटके, सामान्य लोक अशांची ह्या सर्पश्रेष्टांशी कधीही गाठ पडू शकते. त्यावेळी त्यांचे स्वभाव आठवले तर कुणाला इजा न होऊ देता (सापालाही) सुटायला मदत होईल असे वाटते. त्यातही आपली आलंकारिक भाषा, सर्वांच्या ओळखीची रुपके वापरुन विषय सोपा करुन सांगणे अगदी मस्त वाटते. पण मला असा प्रश्न आहे की सगळे घोणस एकसारखे असतात का? त्यांच्यात अजून वेगवेगळी स्वभाववैशिष्ट्ये नसतात का? माणसात कुणी शांत असतो तर कुणी तापट तसे ह्या (व अन्य) सापांच्या एकाच जातीत वैविध्य नसते का? ह्या सर्पांच्या पिल्लांचे वागणे कसे असते? पिल्ले छोटी असली तरी त्यांचे वीष जालीमच असते असे ऐकून आहे. पिल्लांच्या चावण्यामुळे वीष जास्त भिनते का कमी? आईबाप सापांच्या पिल्लांचे रक्षण करतात का?
  • Log in or register to post comments

मी नागाच्या पिल्लाबद्दल

जॅक डनियल्स
Mon, 10/07/2013 - 05:37 नवीन
मी नागाच्या पिल्लाबद्दल लिहिले होते ते सगळ्या विषारी सापाच्या पिल्लांना लागू होते.
नागच्या (कोणत्याही विषारी सापाच्या) पिल्लामध्ये पण पूर्ण विकसित झालेल्या विष-ग्रंथी असतात, आणि विष पण मोठ्या नागापेक्षा जहाल असते. कारण विष-ग्रंथीचा आकार छोटा असल्यानेमुळे त्यांना कमी विषात जास्त मोठें भक्ष मारून पचवायचे असते.(त्यांना त्यांच्या आया ग्राईप वाटर पाजत नाहीत ;)). म्हणून लहान पिल्लू बघून त्याला हलगर्जी पणे हाताळायला जाऊ नका, ते पण मोठ्या नागासारखेच तुम्हाला पोचवू शकते.
आई- बाप पिल्लांचे रक्षण करतात का ते मला माहित नाही, पण किंग कोब्राचा मेंदू सापांमधील सगळ्यात विकसित मेंदू असल्याने त्याची मादी अंड्यांचे रक्षण जीव तोडून करते. मला साप पकडताना जाणवायचे की काही साप (एकाच जातीचे) शांत आहेत, पण ते परिस्थितीवर (आधीची इतिहास, तापमान इ.)पण अवलंबून असेल. ढोबळ स्वभाव धरूनच काम करायला लागते नाही तर अपघात व्हायची शक्यता असते. आता जी लोक या क्षेत्रात ३०-४० वर्षे आहेत ते अंदाज लावू शकतात पण १०० % खात्री कोणीच देऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments

किंग कोब्राची मादी वेळुच्या

स्पंदना
Tue, 10/08/2013 - 05:19 नवीन
किंग कोब्राची मादी वेळुच्या पानांचा ढिगारा करुन त्यात अंडी घालते. आमच्या शेतात जोवर वेळुचे बन होते तोवर तेथे हा लांबच्या लांब साप दिसायचा.(पूर्वज) पण किंग कोब्रा हा कॅनिबल असल्याने ज्या क्षणी अंड्यातले जीव वळवळु लागतात त्या क्षणी मादी घरट सोडते. कारण तिचा स्वतःचा स्वभाव साप खाणे हा असतो. तरीही....आईपणाला जागुन ज्या पद्धतीने ती घरट्यापासून दुर जाते ते पहाता, खरेच त्यांचा मेंदू विकसित असावा. हे नुकते जन्मलेले नाग एकदा गंजीत सापडले होते, लांबवरुन काठेने ढोसलुन एका बुट्टीत भरुन मग बुट्टी पेटवली होती. :( यु माईट फील सॉरी पण आवारात बैल, म्हशी कुत्री,, कोंबड्या आणी काम करणारी माणसे एव्हढ्या सगळ्यांच्याकडे पहाता तेच उचित होते. ही जन्मलेली पिल्ले झाडावर चढुन बसतात अन त्यातल्या काठ्यांमध्ये अगदी बेमालुन मिसळुन जातात. जोवर त्यांचा आकार अन पळ्णे डेव्हलप होत नाही तोवर अशी झाडावरच रहातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

ट्रेक ला जाताना एक काठी बरोबर घेऊन जावे

सुबोध खरे
Mon, 10/07/2013 - 09:59 नवीन
ट्रेक ला जाताना एक काठी बरोबर घेऊन जावे आणि गवताळ भागातून चालताना काठी जमिनीवर आपटत चालावे म्हणजे काठीने जमिनीत निर्माण होणार्या कंपनानी साप सावध होऊन दूर जातो शिवाय आयत्या वेळी हे शस्त्र केंव्हाही उपयोगी येते. (या गोष्टी आर्मीत शिकवल्या जातात)(ज्ञान) परंतु कोकणात लोक काठी चा ( रात्रीच्या वेळेस काठी आणि कंदील) शतकानुशतके वापर करीत आले आहेत.( शहाणपण) रात्री ट्रेकला झोपताना आजूबाजूला डांबर गोळ्यांचा चुरा पसरवावा त्यामुळे उंदीर घुशी आणि सापसुद्धा दूर राहतात. डांबर गोळ्यांचा वास हा सापाची जीभ संतृप्त(saturate) करून टाकतात त्यामुळे सापाची वासाने भक्ष्याचा माग घेण्याची क्षमता कमी होते. मुळात इतका उग्र वास असेल तर उंदीर खारी किंवा तत्सम जमिनिलगत राहणारे प्राणी आपणहून दूर राहतात त्यामुळे त्यांच्या मागे येणारे साप येत नाहीत. माणूस चार पायावर चालणे सोडून दोन पायावर चालू लागला त्याचे नाक जमिनीपासून दूर गेल्यामुळे जमिनीवर असलेल्या धोक्याची शक्यता कमी झालीतेंव्हा पासून त्याची वासाची क्षमता कमी झाली त्यामुळे आपल्याला डांबर गोळीच्या वासाचा तेवढा त्रास होत नाही) मुळात कोणताही साप दिसला तर दुरूनच रामराम करावा. मग तो विषारी का बिनविषारी याच्याशी काय घेणे आहे? आपण बिबळ्या दिसला तर असे शौर्य दाखवलं काय? केवळ सापाचा आकार लहान असल्याने लोक शौर्य दाखवण्यास जातात. बिबळ्या शी झुंज म्हणजे जीवाशी खेळ हे नक्की माहित असल्याने तो लांबून दिसताच लोक धूम ठोकतात मग सापाशी खेळ कशासाठी? सर्व सामान्य माणसांनी( म्हणजे तुम्ही आणि मी) साप पकडण्याच्याच काय त्याच्या जवळ जाण्याच्या सुद्धा फंदात पडूच नये असे माझे प्रामाणिक मत आहे. ते असामान्य ( जे डी सारख्या) माणसांवर सोडून द्यावे मला असे वाटते कि या जे डी साहेबांच्या उत्कृष्ट लेख मालिकेतून आपण सर्व सापाच्या(विषारी व बिनविषारी) चार हात लांब राहायला शिकलो तर तर मालिकेचे सार्थक झाले असे वाटेल.
  • Log in or register to post comments

रेटल स्नेक म्हणजे हाच का?

स्पा
Mon, 10/07/2013 - 15:51 नवीन
रेटल स्नेक म्हणजे हाच का? लेखमाला सुंदर सुरु आहे
  • Log in or register to post comments

फुकाचा शहाणपणा..

चिगो
Mon, 10/07/2013 - 22:25 नवीन
फुकाचा शहाणपणा करतोय, पण हा रॅटल स्नेक नसावा .. तो हामेरीकेतल्या वाळवंटात असतो, असं टिव्हीवर पाहीलंय.. त्याच्या शेपटीला एक खुळखुळ्यासारखा अवयव असतो. शेपटी हलवत ह्या खुळखुळ्याचा आवाज करुन तो 'अपुन इधर बैठेला है, संभालके बाप..' असा इशारा देतो.. :-) बाकी, जेडीसाहेब सांगतीलच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

रेटल स्नेक हा याच्याच

जॅक डनियल्स
Mon, 10/07/2013 - 22:38 नवीन
रेटल स्नेक हा याच्याच कुटुंबातील अमेरिकेत स्थायिक झालेला सदस्य आहे. त्याचे मूळ स्वभाव, हल्ला करायची पद्धत, विषाचा प्रकार सारखाच असतो, फक्त चीगो ने लिहिले आहे तसे त्याच्या शेपटीला खुळखुळा असतो, त्यामुळे त्याला कुकर ची शिट्टी वाजवायला लागत नाही. आधी एका प्रतिसादामध्ये मी लिहिले होते, इकडे माझा एक अमेरिकन मित्र रेटल स्नेक चा माज करत होता, मी त्याला आपल्या नाग, मण्यार, घोणस, फुरसे, साधा चापडा, मलबार चापडा (चापडा -पिट व्हायपर)या बद्दल सांगून झीट आणली होती, वरती म्हणालो होतो की "हे तर पुण्यात सापडतात, अजून दाट जंगलात घुसलो पण नाही, घुसलो तर अजून लिस्ट देईन."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

छान लेखमाला.

झुणका भाकर
Mon, 10/07/2013 - 22:09 नवीन
छान लेखमाला.
  • Log in or register to post comments

घोणसने मारलेली कुकरच्या आवाजासारखी शिट्टी

परिंदा
Tue, 10/08/2013 - 00:22 नवीन
ही बघा घोणसने मारलेली कुकरच्या आवाजासारखी शिट्टी http://www.youtube.com/watch?v=zLjKAOyjJHA
  • Log in or register to post comments

लावणीतला पदर....देवा!

स्पंदना
Tue, 10/08/2013 - 05:11 नवीन
लावणीतला पदर....देवा! फरोड म्हणजे घोण्स हे आज समजल. पण गावी नक्की असच वर्णन आहे की फरोड चावला की माणुस शिजल्यासारखा फुटतो. नशिबाने पाहीला नाही आहे अस वाटत होतं, पण एकदा पुराच्या पाण्याबरोबर येउन काठावर पडला होता. बरोबरच्या मुलांनी (आम्ही शाळेत होतो) मारला होता.
  • Log in or register to post comments

तुम्ही खुपच सुलभ पद्धतीने माहिती देता

केदार-मिसळपाव
Tue, 10/08/2013 - 14:28 नवीन
तुमच्या लेखमालिकेची नेहमीच प्रतिक्षा असते.
  • Log in or register to post comments

मस्त रे

मी-सौरभ
Tue, 10/08/2013 - 19:51 नवीन
वाचतोय
  • Log in or register to post comments

घोणसचा चावा

एस
Wed, 10/09/2013 - 00:03 नवीन
ज्यांना हा साप चावला आहे त्यांच्या भाषेत,"उकळते तेल शरीराच्या आत मध्ये इंजेक्शन ने टोचायचे- म्हणजे घोणसाचा चावा !"
मागच्या लेखात निनादरावांनी इथे चांगला मुद्दा मांडला आहे. मला असे वाटते की बलात्कार्‍यांना फाशीबिशी देण्याऐवजी घोणशीचे चुंबन घ्यायला लावावे. जगला तरी मरणप्रायः जीवन, मेला तरी त्याने त्याच्या व्हिक्टीमला दिलेल्या वेदना सव्याज त्याला परत, इतका तडफडून... माफ करा, पण राहवलं नाही म्हणून अवांतर!
  • Log in or register to post comments

एक शंका..

चिगो
Mon, 10/14/2013 - 12:56 नवीन
मित्रा, इथे तू लिहीलंयस..
हे विष मुख्य करून रक्ताभिसरण संस्थेवर (तर नागाचे मज्जासंस्थेवर) हल्ला करते, थोडक्यात म्हणजे रक्ताचे पाणी करते. रक्ताची गुठळ्या करायची क्षमता गंडल्यामुळे शरीरातून रक्तस्त्राव होऊ लागतो. पहिल्यांदा हिरड्या मधून रक्त चालू होते,नंतर मिळेल त्या भागातून रक्त पडू लागते...रक्त दाब कमी होऊ लागतो आणि शेवटी किडनी फेल होऊन रुग्ण दगावतो
आणि 'घोणसाच्या विषाचे रक्तावर परीणाम' वाल्या व्हिडियोत दाखवलंय की रक्त गोठून जेलीसारखं होतं.. नेमके काय होते? तुझ्याकडून किंवा डाॅ. खरे ह्यांच्याकडून कळेल, असे वाटते.. धन्यवाद..
  • Log in or register to post comments

चिगो साहेब.

सुबोध खरे
Mon, 10/14/2013 - 13:04 नवीन
चिगो साहेब. त्या व्हिडियो मध्ये रक्त गोठ्ताना दाखवले आहे जी रक्ताची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. तो विषाचा प्रभाव नाही असे मला वाटते( व्हिडियो चुकीचा आहे असे मला वाटते.) उलट घोणस किंवा फुरसे या सापाची विषे हि रक्तभंजक (haemolytic) असतात त्यामुळे रक्ताच्या पेशी फुटून निघतात आणि रक्त गोठवणाऱ्या प्रथिनांचे विभाजन झाल्याने रक्त गोठत नाही.उलट जर ते विष गोठलेल्या रक्तात मिसळले तर रक्त पातळ आणि प्रवाही होऊ लागते. यामुळेच घोणस चावलेल्या माणसाला गेल्या काही दिवसात झालेल्या क्षुल्लक जखमातून परत रक्तस्त्राव होऊ लागतो. त्या ठिकाणच्या केशवाहीन्यात तयार झालेल्या रक्ताच्या गाठी विरघळून रक्तस्त्राव सुरु होतो आणि रुग्णाला रक्ताचे फोड येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

अप्रतिम लेख माला

डॉ.प्रसाद दाढे
Sat, 10/19/2013 - 21:11 नवीन
जॅक साहेब अभिनंदन !! खूपच छान माहिती आणि अतिशय आकर्षक शैली. खूप दिवसांनी मिपावर आलो; सार्थक झाले. विषारी साप व विंचू याबद्दल महाडच्या डॉ. हिम्मतराव बावस्करांच्या आत्मचरित्रातही खूप डिटेलवार माहिती दिली आहे. तेही एक थोर संशोधक असून ह्या विषयावर अ‍ॅथॉरिटी मानले जातात. मी जबड्याचा सर्जन असल्याने माझा सल्ला घोणस दंशाच्या एका केसमध्ये घेतला गेला होता; रूग्णाच्या हिरड्यांमधून खूप रक्तस्त्राव होत होता, थांबतच नव्हता,तेव्हा मी डॉ. बावस्कर सरांना फोन करून माहिती विचारली होती. त्यांच्या सल्ल्यानुसार रूग्णास ए.एस.व्ही आणि ब्लड रिप्लेस्ड बाय ब्लड असे केले तेव्हा कुठे हिरड्यांमधला रक्तस्त्राव थांबला आण रूग्ण वाचला. घराभोवती वाळू टाकली असता साप त्यावर सरपटू शकत नसल्याने धोका कमी होतो असे ऐकले आहे. अदरवाईज गमबूट आणि जाड जीन्स पॅन्ट वापरणे अन काठी आपटत जंगलात फिरणे हे प्रतिबंधात्मक उपाय करावेत. आणखीन एक बातमी वाचलेली आठवते. घराची साफसफाई करताना एका माणसाला (पुण्यातच) साप चावला आणि दडून बसला. आजुबाजुच्या लोकांनी साप हुडकून मारला आणि मृत सर्पासकट त्या माणसाला दीनानाथ मध्ये आणला. तपासणी अंती डोक्टर म्हणाले की हा बिनविषारी सर्प असून भीतीचे काही कारण नाही. पण आपली प्रिकॉशन म्हणून त्या माणसास त्यांनी थोडावेळ आयसीयू मध्ये ठेवले. परंतु थोड्या वेळाने त्या माणसाचे बीपी खाली येऊ लागले, दंशाची जागा टम्म सुजली व इतर सर्व विषारी सर्पदंशाची लक्षणे दिसू लागली. आयसीयूवाले पण चक्रावले. त्यांनी तातडीने आवश्यक ती ट्रिटमेंट सुरू केली आणि त्याच्या नातेवाईकाना घरात नीट शोधाशोध करायला सांगितली तर अडगळीत लपून बसलेला एक नाग सापडला !! त्या माणसाला जर आयसीयूत निरिक्षणासाठी ठेवला नसता तर काही खरं नव्हतं !! सापावरून अजुन एक चावट किस्सा आठवला.. दादा कोंडकेंच्या एका चित्रपटात दादा आपल्या नायिकेवर इम्प्रेशन मारण्यासाठी तिला सांगतो,"अगं मी तर आहेच पण माझे आजोबा तर इतके शूर होते की त्यांच्या धोतरात एकदा नाग सापडला होता !" मग ती भयचकित होऊन विचारते,"मग त्यांना चावला नाही तो..?" "अगं, एक नाग दुसर्‍या नागाला कधी चावत नसतो" इती दादा. ती विचारते,"म्हणजे..?" "अगं, माझ्या आजोबांचे नाव 'नागनाथ' होते !!"
  • Log in or register to post comments

मस्त प्रतिसाद दिला आहे.

जॅक डनियल्स
Sat, 10/19/2013 - 21:49 नवीन
मस्त प्रतिसाद दिला आहे. डॉ. हिम्मतराव बावस्करांचे "ब्यारीस्टेर चे कार्टे " आणि काही संशोधन पेपर मी वाचले आहेत. खूपच चांगले काम ते कठीण परीस्थित,त्या परिस्थीतीवर न रडता करत आहेत. त्या माणसाचा अनुभव खूप कॉमन आहे, पण तो माण्यारीच्या बाबतीत खूप वेळा घडतो. कारण मण्यार दुसऱ्या सापाला खायला घरात घुसते आणि दंश करते, आपल्याला तो बिनविषारी साप सापडतो. मण्यार चावली हे कळत पण नाही, आणि जेंव्हा कळते तेंव्हा उशीर झाला असतो. दादा कोंडकेंना सलाम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे

मस्तच ….

रुस्तम
Sun, 10/20/2013 - 08:33 नवीन
मस्तच ….
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे

थोडीशी सुधारणा

एस
Mon, 10/21/2013 - 22:41 नवीन
घराभोवती वाळू टाकली असता साप त्यावर सरपटू शकत नसल्याने धोका कमी होतो
वाळवंटातही साप आढळतात. वाळूऐवजी घराच्या भिंतींना सर्व बाजूंनी जमिनीपासून काही उंचीपर्यंत गुळगुळीत गिलावा केल्यास सापांना दूर ठेवण्यास मदत होते. साप हे खवल्यांच्या आधारे सरपटत असल्याने त्यांना थोडातरी खडबडीत पृष्ठभाग त्यासाठी गरजेचा असतो. वाळू त्यांना आडकाठी करू शकणार नाही. उलट त्यामुळे सापांना लपण्यासाठी मदतच होईल असे वाटते. त्याचप्रमाणे पाण्याचा खंदक करूनही उपयोग होणार नाही. साप केवळ अतिशीत पर्माफ्रॉस्ट प्रदेश वगळता इतर सर्व अधिवासांमध्ये आढळतात. त्यामुळे गुळगुळीत पृष्ठभाग हाच सापांना घरात येऊ न देण्याचा बराचसा खात्रीशीर उपाय आहे. इतर कुठल्या समजावर खातरजमा केल्याशिवाय विश्वास ठेऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे

तुमचे बरोबर आहे, वाळूमुळे

जॅक डनियल्स
Mon, 10/21/2013 - 23:32 नवीन
तुमचे बरोबर आहे, वाळूमुळे जास्त काही होणार नाही. मी मागे प्रतिसादामध्ये लिहिले होते की फिनैल किंवा बाथरूम धुण्याचे आसीड टाकावे, त्याच्या उग्र वासाने साप येण्याची शक्यता कमी होते. तंबू लावून राहणार असाल तर "सापासाठी खड्डा" (स्नेक त्रेंच) जो आर्मी मध्ये खोदायला शिकवतात तो खोदावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा