✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आम्हा घरी धन..

म
मोदक यांनी
Sun, 05/26/2013 - 12:53  ·  लेख
लेख
राम्राम मंडळी. खरडफळ्यावर गेले दोन दिवस अनेक जण आपापल्या आवडीच्या कविता देत आहेत.. त्यावरून या धाग्याची कल्पना सुचली. चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते.. अगदी जे जे आवडले आहे ते येथे एकत्र करूया. लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच परंतु आवडलेला मजकूर 'का आवडला?' हे ही शक्य असेल तर द्या. मी सुरूवात करतो.. ******************************************************** गोनिदांच्या दुर्गभ्रमणगाथेतून, रायगडावरील आषाढाचे चित्रदर्शी वर्णन... ज्येष्ठ संपतो. आकाश मेघांनी भरभरून येवू लागतं. रायगड ऐन कोकणांत. आकाश आपल्यावर प्रसन्न असलं, कीं तिथून समुद्ररेखा दिसू शकते. सूर्य अस्ताला जात असावा, उतरता उतरता तो क्षितिजाशी टेकावा, त्या क्षणी थेट पश्चिम क्षितिजाशी सूर्यप्रकाशानं चकाकणारं सागरजळ दिसतं. अनेकदां ते पाहिलंही आहे. अर्थ असा, की थेट समुद्रापासून रायगडावेरी कशाचीही अटक नाही. समुद्रावर गर्दी करून जमलेला मेघांचा समूह पूर्वेच्या दिशेनं चालून येवू लागला, की त्याला आढळतो रायगड. एखाद्या प्रचण्ड चौरंगासारखा. अन् मग तो असा बरसू लागतो की सांगता पुरवत नाही. लोटावर लोट चालून येतात. ते थांबतच नाहीत. येतात आणि गडाच्या माथ्यावर कोसळतात. त्यांच्याबरोबरच येते धुई. ती सगळा डोंगर आपल्या कवेत घेते. हातावरचं कांही दिसत नाही. अगदीं आपल्या नाकाचा शेंडादेखील. त्या दिवसात धनगरं आपापल्या झापांमधून रानशेण्यांची शेकोटी करून तासन् तास तापत बसतात. इकडे पाऊस धुवांधार कोसळत असतो, तों तों धनगरं मात्र प्रसन्न होत असतात. कारण असा मोप पाऊस बरसला, की गड हिरवागार होणार असतो. त्याची म्हसरं अन् गावल्या भरपूर जोगावणार असतात. कासंड्या भरभरून दूध देणार असतात. तर त्या धनगरांशेजारी बसून एकीकडे शेकत, दुसरीकडे त्याच्या चौकश्या करीत बसणं इतकं सुखाचं असतं, म्हणून सांगू! त्यांच्यापास हवा तेवढा वेळ असतो. ती मोकळी झालेली असतात. भरंवसा निपजलेला असतो, कीं हा परदेशी पाहुणा आपला मित्र आहे. सखा सुहृद आहे. असं अंतर हरपलेलं असतं. मग ती नाना परींचं बोलत असतात. सुखाचं. दु:खाचं. प्रापंचिक चिंतांचं. गाईम्हशींचं. त्यांच्या वेतांचं. दुधाचं. तें सगळं ऐकून वाटू लागतं, की आपण आपल्या भोंतीचा प्रपंच म्हणजेच सगळं विश्व असं गृहीत धरतो, ते किती चूक आहे! मात्र हे ध्यानी येण्यासाठींही असं त्यांच्या पोटात शिरावं लागतं. त्यांच्या मनी भरंवसा निपजूं द्यावा लागतो. किंवा धर्मशाळेतल्या खोलींत चिप्प बसून असावं. नगारखान्याच्या ओवर्‍यात हात पाय पोटाशी घेवून बसावं. जगदीश्वराच्या देवळांत आसरा घेऊन पावसाचं चण्डनृत्य आनभवीत असावं. ध्यानी येवू लागतं, की पावसाच्या या धारानृत्यालाही एक ताल आहे. कधी तो धुमाळीचं बोट धरून बरसतो. कधी एकतालाच्या ठोक्यांत खाली उतरतो. कधी त्या धारांच्या त्रितालाचा ठेका सुरू असतो. चहुंकडून घेरून येणारं धुकट कुंद असतं. स्वत:वेगंळं काहीही दिसत नाही. कशाचंही भान नसतं. त्यात हा ताल असा कांही अंगी भरतो, की सांगता पुरवत नाही. हळूं हळूं पाऊसधारा उणावू लागतात. धुकट विरूं लागतं. कमींत कमी दिवसांतले कांही तास तरी मग बाहेर पडावं. पायांतळी वाहाणारे इवलाले वहाळ वलांडीत चहूं दिशा भटकावं. टकमकावर जावं. दिसली, तर तळातली शोभा पाहावी. काळ दुथडी भरून वाहात असते. पुन: धुकटं झाकोळून येतात. मग माघारे वळून, पायांतळी सांचलेल्या डबक्यांतलं पाणी उडवत गंगासागरावरून बालेकिल्ल्यात शिरावं. नगारखान्याबाहेर पडावं, बाजारपेठेत शिरावं. पावसधारांनी काय कवतिक केलं आहे, ते ध्यानी येवू लागतं. तें पाणी भुईचं कवच भेदून आत शिरलं. कड्यांची आवरणं भेदून आत घुसलं. त्या कवचा-आवरणाखाली गतवर्षी उन्हाळ्यांत वाळून कोळ झालेली तृणबीजं सुरक्षित असतात. तें पाणी त्यांच्या भंवताली गोळा होतं. त्यांना गुदगुल्या होतात. ती फुगतांत. टरारतात. अंग ठसठसू लागतं. मग तें वरील बाजूनं फुटतं. एक नाजूक लवलवता कोंब बाहेर येतो. पोपटी रंगाचा. तो भुई-कडा भेदून वर उठतो. मोठ्या नवलानं भंवताल न्यांहाळू लागतों. एक. दुसरा. तिसरा. सहावा. दहावा. शंभरावा. हजारावा. अन् पाहतां पाहतां अवघं धरतीमंडळ हिरव्या सौंदर्यानं बहरून येतं. सगळे डोंगर, दरे, कडे, दरकुटं, ओघळी, घळी, लवणं असं सगळं चिरतरूण होऊन जातं. महिन्या दीडमहिन्यात तृणपुष्पं आपले डोळे विस्मयानं उघडीत आकाश न्याहाळूं लागतात. सोनावळी धुमारते. तेरडा उंच उंच उठूं लागतो. त्याला कळे फुटतात. ती अनाम तृणपुष्पं, ती सोनावळी, ती तेरड्याची फुलं, असा काही विलक्षण रूपगौरव डोंगरभर दाटतो म्हणून सांगू! पायातळी असा वनपुष्पांचा गालिचा अंथरलेला असतो, आणि आपण विराण्या देशींच्या राजपुत्रासारखे त्या रूजाम्यावरून अवशेष धुंडाळीत हिंडत असतो... ********************************************************
  • आम्हां घरी धन... (२)
  • आम्हां घरी धन.....(३)

Book traversal links for आम्हा घरी धन..

  • आम्हां घरी धन... (२) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
वाङ्मय
भाषा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
प्रतिक्रिया
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
87443 वाचन

💬 प्रतिसाद (172)

प्रतिक्रिया

धन्यवाद मोदकराव! सविस्तर भर

आदूबाळ
Sun, 05/26/2013 - 13:16 नवीन
धन्यवाद मोदकराव! सविस्तर भर घालेनच. गोनिदांसारखं लिहिता यायला पाहिजे होतं...

+१

प्रसाद गोडबोले
Sun, 05/26/2013 - 17:08 नवीन
गोनिदांसारखं लिहिता यायला पाहिजे होतं. >>> मनातलं बोललात !!
↩ प्रतिसाद: आदूबाळ

आधी या उतार्‍या बद्दल लोटांगण

स्पंदना
Sun, 05/26/2013 - 13:31 नवीन
आधी या उतार्‍या बद्दल लोटांगण स्विकारा मोदकराव. अहो चारी बाजुने धुई अंगावर आली वाचता वाचता. मला आवडलेली कविता आहे वसंत बापटांची "केवळ माझा सह्यकडा" भव्य हिमालय तुमचा आमुचा केवळ माझा सह्यकडा ।गौरीशंकर उभ्या जगाचा मनात पूजीन रायगडा॥ तुमच्या अमुच्या गंगा यमुना केवळ माझी भिवरथडी ।प्यार मला हे कभिन्न कातळ प्यार मला छाती निधडी ॥ मधु गुंजन लखलाभ तुम्हाला बोल रांगडा प्यार मला ।ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते तुकयाचा आधार मला ॥ धिक तुमचे स्वर्गही साती इथली चुंबीन मी माती इथल्या मातीचे कण लोहाचे तृण पात्यांना खड्ग कळा ।कृष्णेच्या पाण्यातुनी अजुनी वाहतसे लाव्हा सगळा ॥ कबिर माझा तुलसी माझा ज्ञानेश्वर परी माझाच ।जयदेवाचा जय बोला परी माझा 'नाम्याचा' नाच ॥ जनी जनार्दन बघणारा तो 'एका' हृदये एकवटे ।जनाबाईच्या ओवीमध्ये माझी मजला खुण पटे ॥ इंद्रायणीच्या डोहामधली गाथा ओली ती ओली ।ती माझी मी तिचाच ऐशी जवळीक कायमची झाली ॥ भक्तीचा मेळा दाटे चोख्याची पैरण फाटे निर्गुण मानवतेची पूजा करणारे करु देत भले । माझ्यासाठी भिमाकाठी भावभक्तीची पेठ खुले ॥ रामायण तर तुमचे आमुचे भारत भारत वर्षाचे । छत्रपतींची वीरकहाणी निधान माझ्या हर्षाचे ॥ रजपूतांची विक्रमगाथा तुमच्या परी मजला रुचते । हृदयाच्या हृदयात परंतु बाजी बाजीची सुचते ॥ अभिमन्युचा अवतारच तो होता माझा जनकोजी । दत्ताजीचा शेवटचा तो शब्द अजुन हृदयामाजी ॥ बच जाये तो और लढे पाऊल राहिल सदा पुढे तुम्हास तुमचे रुसवे फुगवे घ्या सगळा नाजुक नखरा । माझ्या साठी राहील गाठी मरहट्ट्याचा हट्ट खरा ॥ तुमचे माझे ख्याल तराणे दोघेही ऐकु गझला । होनाजीची सोन लावणी वेड लावीते परी मजला ॥ मृदंग मोठा सुमधुर बोले मंजुळ वीणा अन मुरली । थाप डफाची कडकडता परी बाही माझी फुरफुरली ॥ कडाड्णारा बोल खडा जो दरीदरीमधुनी घुमला । उघडुनी माझ्या हृदयकवाडा तोच पवाडा दुमदुमला ॥ तटा तटा तुटती बंद भिवईवर चढते धुंद औट हात देहात अचानक वादळ घुसमटुनी जाते । उचंबळे हृदयात पुन्हा ते इतिहासाशी दृढ नाते ॥ कळे मला काळाचे पाऊल दृत वेगाने पुढती पडे । कळे मला क्षितिजाचे वर्तुळ क्षणो क्षणी अधिकची उघडे ॥ दहा दिशांचे तट कोसळले ध्रुव दोन्ही आले जवळी । मी ही माझे बाहु पसरुनी अवघ्या विश्वाते कवळी ॥ विशाल दारे माझ्या घरची खुशाल ही राहोत खुली ।मज गरीबाची कांबळ वाकळ सकळांसाठी अंथरली॥ मात्र भाबड्या हृदयात तेवत आहे जी ज्योत ती विझवाया पहाल कोणी मुक्त करु झंझावात । कोटी कोटी छात्यांचा येथे कोट उभारु निमिषात ॥ अशी ही कविता वाचत असताना अंगावर काटा उमलतो माझ्या तरी.

धन्यवाद

मराठीप्रेमी
Tue, 05/28/2013 - 07:47 नवीन
हि कविता माझीपण आवडती आहे. याचे उत्तम सादरीकरण येथे आहे. http://www.youtube.com/watch?v=EMXefJY5jME&feature=player_detailpage#t=52s
↩ प्रतिसाद: स्पंदना

वा! उत्तम कल्पना!

पैसा
Sun, 05/26/2013 - 15:17 नवीन
वरचे दोन्ही उतारे आणि कविता आवडीचे आहेतच. आणखी आवडते उतारे आणि कविता खूप आहेत. कोणते देऊ आणि कोणते नको असं वाटलं तरी लगेच आठवणारे काही म्हणजे कुसुमाग्रजांचे पृथ्वीचे प्रेमगीत, गोनीदां, बाबासाहेब पुरंदरे, वसंत बापट आणि कितीतरी. पण सगळ्यात पहिल्यांदा इथे देते ते शब्दप्रभू बाकीबाब बोरकरांची अजरामर कविता. ज्यात त्यांनी सामान्यातल्या असामान्यत्वाला विनम्र वंदन केलं आहे. ---------------- दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती ॥धृ.॥ गाळुनिया भाळीचे मोती हरिकृपेचे मळे उगवती जलदांपरी येऊनिया जाती जग ज्यांची न करी गणती ॥१॥ यज्ञी ज्यांनी देऊनि निजशिर घडिले मानवतेचे मंदिर परि जयांच्या दहनभूमिवर नाहि चिरा नाहि पणती ॥२॥ जिथे विपत्ती जाळी उजळी निसर्ग-लीला निळी काजळी कथुनि कायसे काळिज निखळी एकाची सगळी वसती ॥३॥ मध्यरात्रि नभघुमटाखाली शांतिशिरी तम चवर्‍या ढाळी त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी एकांती डोळे भरती ॥४॥ ---------- बा.भ.बोरकर ---------- _/\_

नको नको !

परिकथेतील राजकुमार
Sun, 05/26/2013 - 15:32 नवीन
चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते.. अगदी जे जे आवडले आहे ते येथे एकत्र करूया.
नको नको ! तसला मजकूर इकडे कुठे द्यायचा.

तसला मजकूर इकडे कुठे द्यायचा.

मालोजीराव
Mon, 05/27/2013 - 10:59 नवीन
तसला मजकूर इकडे कुठे द्यायचा.
तो मजकूर टाकल्यास या धाग्याचा तात्काळ समारोप होईल काय :P
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तरि अवधान एकवेळें दीजे

नंदन
Sun, 05/26/2013 - 15:53 नवीन
उत्तम धागा. गोनीदांच्या उतार्‍याची निवडही फार सुरेख! आवडते उतारे कुठले द्यावेत हा बिकट प्रश्न आहे. तूर्तास प्रतिक्रिया, प्रति-प्रतिक्रिया आणि त्यांची फोफावलेली तत्सम/तद्भव तिरपी वाटचाल पाहून यावर 'उतारा' म्हणून ज्ञानेश्वरीतल्या नवव्या अध्यायातल्या ह्या दोन आवडत्या ओव्या: अर्थ बोलाची वाट पाहे । तेथ अभिप्रावो अभिप्रायातें विये । भावाचा फुलौरा होत जाये । मतिवरी ॥ म्हणूनि संवादाचा सुवावो ढळे । तरी हृदयाकाश सारस्वतें वोळे । आणि श्रोता दुश्चिता तरि वितुळे । मांडला रसु ॥

सुरेख धागा. धन्यवाद.

यशोधरा
Sun, 05/26/2013 - 19:21 नवीन
निवड करुन लिहिणं खरंच कठीण आहे. हाताशी आहेत त्या २-३ कविता आत्ता लिहिते. किती पायी लागू तुझ्या किती आठवूं गा तूंते; किती शब्द बनवूं गा अब्द अब्द मनी येते. काय गा म्यां पामराने खरडावी बाराखडी; आणि बोलावी उत्तरें टिनपाट वा चोमडी. कधी लागेल गा नख तुझे माझिया गळ्याला, आणि सामर्थ्याचा स्वर माझिया गा व्यंजनाला! - बा. सी. मर्ढेकर रात्र थांबवुनी असेच उठावे तुझ्यापाशी यावे क्षणासाठी डोळियांच्या व्हाव्या वेड्या गाठीभेटी आणि दिठी दिठी शब्द यावे तूही थेंब थेंब शब्दापाठी द्यावा अर्थ ओला व्हावा माझ्यासाठी आणि उजाडता पाठीवर ओझे वाटेपाशी तुझे डोळे यावे - ग्रेस पोरसवदा होतीस कालपरवा पावेतो; होता पायांतही वारा कालपरवा पावेतो. आज टपोरले पोट जैशी मोगरीची कळी; पडे कुशीतून पायीं छोट्या जीवाची साखळी. पोरसवदा होतीस कालपरवा पावेतो; थांब उद्याचे माऊली तीर्थ पायाचे घेईतों! -बा. सी. मर्ढेकर

वाहवा ...

चौकटराजा
Sun, 05/26/2013 - 19:42 नवीन
मोदकभौ. मस्त उतारा .आप्पा लेखनिकाला बाहेरच्या खोलीत बसवीत व तिथल्या तिथे य्रेरझारी घालत मजकूर सांगत असे मी याची देही याची डोळा पाहिलेले दृश्य आठवले.तसे स्वता: लिहिताना उतरत्या मेजावर कागद टाकून हिरव्या शाईच्या पेनाने लिहित.हे ही आठवले. माझ्या आवडीची एक कविता देत आहे. म्हातारपाणामुळे एक दोन शब्द इकडे तिकडे झाले तर माफी असावी. कविता नक्की कुणाची हे आठवत नाही. वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी हळू थबकत जावे कधी कानोसा घेत कधी रमत गमत वा कधी भरारी थेट शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावे गात वेळूंच्या कुंजी वाजवुनी अलगूज कणसांच्या कानी सांगावे हितगूज शिंपावी डोई ही फुळे बकुळीची सारी गाळुनी जांभभुळे पिकली भुळभुळ तीरी लावुबी अंगुली कलिकेला हळुवार ती फुलून बघे तो व्हावे पार पसार दिनभरी राबुनी दमला दिसता कोणी टवटवी मुखावर आणावी बिलगोनी स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा

गुगलल्यावर सापडली.

प्रभाकर पेठकर
Sun, 05/26/2013 - 23:33 नवीन
झुळुक वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे कधी बाजारी कधी नदीच्या काठी राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी हळु थबकत जावे कधी कानोसा घेत कधी रमत गमत वा कधी भरारी थेट लावून अंगुली कलिकेला हळुवार ती फुलून बघे तो व्हावे पार पसार परि जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशादिशांतुनी फिरता उधळुनी द्यावा गाण्याची चुकलीमुकली गोड लकेर झुळ्झुळ झर्‍याची पसरावी चौफेर शेतात पाचुच्या, निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावे गात वेळूच्या कुंजी वाजवुनी अलगूज कणसांच्या कानी सांगावे हितगूज शिंपावी डोही फुले बकुळीची सारी गाळुनी जांभळे पिकली भुळभुळ तीरी दिनभरी राबुनी दबला दिसता कोणी टवटवी मुखावर आणावी बिलगोनी स्वच्छंद अशा या करुनी नाना मौजा घ्यावया विसावा यावे मी तिन्हीसांजा - दामोदर कारे
↩ प्रतिसाद: चौकटराजा

पुख विदस लाझे

चौकटराजा
Mon, 05/27/2013 - 06:39 नवीन
पुख विदस लाले म्यातुळे केय नोद ळोई कियडे कितडे लेग्या ! णूर्प वकिता लिद्या दब्बल भाआरी !
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

म्हाईपण बुहत भाआरी!!

बॅटमॅन
Mon, 05/27/2013 - 11:57 नवीन
म्हाईपण बुहत भाआरी!!
↩ प्रतिसाद: चौकटराजा

जम्या लाई.

प्रभाकर पेठकर
Mon, 05/27/2013 - 15:33 नवीन
तोह सअं धकी धकी. रतीणप म्हुताला पुखच ठाअणव हेआ. लमा रत केअही वकिता ठाअवत हानी. सओ. लाचायचच यव लाझं.
↩ प्रतिसाद: चौकटराजा

प्रतिदिनी आपल्या शारीरिक,

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 05/26/2013 - 23:38 नवीन
प्रतिदिनी आपल्या शारीरिक, सामाजिक गरजा आपणच निर्माण करायच्या आणि त्या पूर्ण करण्याकरिता अधिकाधिक पैसे देणारी नोकरी अथवा काम पत्करायचे आणि ते करता करता एक दिवस संपून जायचे हा आणि एवढाच आजच्या सर्वसाधारण माणसाच्या जीवनाचा हेतू झाला आहे. केवळ स्वत:च्या गरजा पूर्ण करणे हे जर सुख असेल तर ते तरी त्याला लाभते काय, ह्या प्रश्नाचे उत्तर मला सापडले नाही. आमच्यावेळी तरुणांभोवती निर्भीड, निर्भय आणि निग्रही अशी माणसे पहाडासारखी आकाशाला मस्तक भिडवून ताठ मानेने उभी होती. ह्या पहाडातुन तेव्हा एकच ध्वनी उमटायचा - "स्वातंत्र्य,स्वराज्य, सुराज्य." आम्हा तरुणांपैकी अनेक जणांच्या जीवनाचा तोच उद्देश होता, आणि प्रसंगी मरणाचाही ! स्वातंत्र्य मिळाले, स्वराज्य झाले. आता त्या मंत्राच्या जागी दुसरा कोणता शब्द जीवनाचा हेतू म्हणुन आला आहे? चांगली नोकरी, सुस्वरूप पत्नी, ब्लोक, पैसा, सत्ता ? शांतपणे बसून कधितरी स्वत:ला विचार, "मी कशाकरता जगतो आहे? ह्या जीवनापासून माझी काय अपेक्षा आहे? असं काय आहे जे मला काहीही झालं तरी मिळवायचंच आहे? आणि त्यापलिकडे असं काय आहे की ज्याकरता मी नोकरी, ही प्रतिष्ठा, फार काय हे जीवनदेखील झुगारून देईन?" हे एकदा मनाशी ठरवलेस तर द्विधा मन:स्थिती संपेल, मनात निर्माण होणारा संघर्ष थांबेल. स्वत:शीच प्रामाणीक राहण्याला आणि आपल्या सद्सदविवेकबुद्धीला पटलेल्या रस्त्याने जाण्याला विलक्षण धैर्य लागते. ते तुला लाभो ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना. "रारंग ढांग" मधून

सगळेच आवडले.

प्यारे१
Mon, 05/27/2013 - 00:28 नवीन
सगळेच आवडले. गोनिदांच्या शब्दसामर्थ्याला सलाम. भिजलो.

ह्या धाग्याबद्दल मोदकाला

प्यारे१
Wed, 05/29/2013 - 20:44 नवीन
ह्या धाग्याबद्दल मोदकाला पायजे तिथं पार्टी. :) काय वाचू नि काय नको असं झालंय. ;) एखाद्या बाईला सोन्याच्या दुकानात नेऊन पाहिजे ते दागिने फुकट न्या असं म्हटल्यासारखं झालंय. लौ यु रे!
↩ प्रतिसाद: प्यारे१

पहिले वाक्य वाचून झालेला आनंद

मोदक
Wed, 05/29/2013 - 23:32 नवीन
पहिले वाक्य वाचून झालेला आनंद शेवटचे वाक्य वाचून मावळला आणि मनाच्या तळागाळातून एकच प्रतिक्रिया उमटली... "प्यार्‍या.. जा घर्ला!" :D
↩ प्रतिसाद: प्यारे१

अरे ????????

प्यारे१
Wed, 05/29/2013 - 23:43 नवीन
अरे ???????? आमच्या 'लौ'ला काय किम्मत हाय का न्हाय? का गविंसारका एक लेख टाकू? मला त्या मोदकाला प्यार्टी द्यावीशी वाटली पण देता नाही आली वगैरे :D गविशेट हलकं घ्या. ;) (मोदक घेईलच.) बाकी हा प्रतिसाद उडवला तर आवडेल. धागा मस्त आहे. आमची ठिगळं नकोत.
↩ प्रतिसाद: मोदक

बा. भं च्या काही..

यशोधरा
Mon, 05/27/2013 - 01:54 नवीन
आत गोठलेले आसू, वर विटलेले हसू, ओठी आलेले, मावळे... "थोडे नदीकाठी बसू" घ्यावा कशाला मागोवा, जीव अहंतेचा गोवा, चार पावली यायचा, वीस कोसांचा पस्तावा... नदी रोडावली आहे, खडे मात्र बोचायाचे, रान राहिलेले नाही, आता पान पाखरांचे... वृथा सारवासारव, फोल शब्दांची रांगोळी, आता पाचोळ्यात जमा, लय चुकलेल्या ओळी... -बा.भ.बोरकर

आत गोठलेले आसू,

यशोधरा
Mon, 05/27/2013 - 01:56 नवीन
आत गोठलेले आसू, वर विटलेले हसू, ओठी आलेले, मावळे... "थोडे नदीकाठी बसू" घ्यावा कशाला मागोवा, जीव अहंतेचा गोवा, चार पावली यायचा, वीस कोसांचा पस्तावा... नदी रोडावली आहे, खडे मात्र बोचायाचे, रान राहिलेले नाही, आता पान पाखरांचे... वृथा सारवासारव, फोल शब्दांची रांगोळी, आता पाचोळ्यात जमा, लय चुकलेल्या ओळी... -बा.भ.बोरकर आयुष्याची आता झाली उजवण येतो तो तो क्षण अमृताचा जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब तुझे प्रतिबिंब लाडेगोडे सुखोत्सवे असा जीव अनावर पिंजर्‍याचे दार उघडावे संधीप्रकाशात अजून जो सोने तो माझी लोचने मिटो यावी असावीस पास जसा स्वप्नभास जीवी कासावीस झाल्याविना तेह्वा सखे आण तुळशीचे पान तुज्या घरी वाण नाही त्याची तूच ओढलेले त्यासवे दे पाणी थोर ना त्याहूनी तीर्थ दुजे वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल भुलीतली भूल शेवटली -बा. भ. बोरकर

देखणे ते चेहरे

यशोधरा
Mon, 05/27/2013 - 01:56 नवीन
देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे । गोरटे की सावळे या मोल नाही फारसे ॥ तेच डोळे देखणे जे कोंडीती सार्‍या नभा । वोळिती दुःखे जनांच्या सांडिती नेत्रप्रभा ॥ देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ताफळॆ । आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे ॥ देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे । मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळॆ ॥ देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती । वाळवंटातूनसुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती ॥ देखणे ते स्कंध ज्या ये सूळ नेता स्वेच्छया । लाभला आदेश प्राणां निश्चये पाळावया ॥ देखणी ती जीवने जी तॄप्तीची तीर्थोदके । चांदणॆ ज्यातुन वाहे शुभ्र पार्‍यासारखे ॥ देखणा देहान्त तो जो सागरी सुर्यास्तसा । अग्निचा पेरुन जातो रात्रगर्भी वारसा ॥ -बा. भ. बोरकर.

सुरेख !

चौकटराजा
Mon, 05/27/2013 - 06:44 नवीन
देखणे ते काव्य ज्याने श्रवण होते सार्थकी देखणे ते 'बाकी' ज्यांची शब्दा वरी हो मालकी
↩ प्रतिसाद: यशोधरा

यशोधरातै - धन्यवाद!

आदूबाळ
Mon, 05/27/2013 - 10:46 नवीन
यशोधरातै - धन्यवाद! चौराकाका - चार चांद लावलेत!
↩ प्रतिसाद: चौकटराजा

याच शब्दप्रभुची अजुन एक मस्त कविता

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 05/27/2013 - 15:44 नवीन
गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले दिन लंघुनी जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरी पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले धुंद सजल हसीत दिशा, तृणपर्णी सज्ज तृषा तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना मंदाकिनी वरुनी धवल विहगवृंद डोले गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील हिरव्या तटी नावांचा कृश्ण मेळ खेळे गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले मीन चमकुनी उसळे, जलवलयी रव मिसळे नवथर रस रंग गहन करिती नयन ओले गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले धूसर हो क्षितिज त्वरित, घोर पथी अचल चकित तृण विसरूनी जवळील ते खिळवी गगनी डोळे गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले टप टप टप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले गदड निळे गडद निळे जलद भरुनी आले शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले कवी - बा. भ. बोरकर. बोरकरांच्या तशा सगळ्याच कविता इथे टाकायला हव्या.
↩ प्रतिसाद: चौकटराजा

जीवन त्यांना - बाकीबाब

मैत्र
Wed, 05/29/2013 - 21:25 नवीन
मीपण ज्यांचे पक्‍व फळापरी सहजपणाने गळले हो जीवन त्यांना कळले हो जळापरी मन निर्मळ ज्यांचे, गेले तेथे मिळले हो चराचरांचे हो‍उनि जीवन स्‍नेहासम पाजळले हो जीवन त्यांना कळले हो सिंधूसम हृदयांत जयांच्या रस सगळे आकळले हो आपत्काली अन्‌ दीनांवर घन हो‍उनि जे वळले हो जीवन त्यांना कळले हो दूरित जयांच्या दर्शनमात्रे मोहित हो‍ऊन जळले हो पुण्य जयांच्या उजवाडाने फुलले अन्‌ परिमळले हो जीवन त्यांना कळले हो आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुळिले हो सायासाविण ब्रम्ह सनातन घरीच ज्यां आढळले हो जीवन त्यांना कळले हो -- बा. भ. बोरकर देखणे जे चेहरे, संधिप्रकाशात, गडद निळे असे मोती पाहून अतिशय तीव्रतेने आठवल्या त्या ओळी.. कालातीत होऊन जातात ही कवी, गायक, लेखक मंडळी.. ७०-८० वर्षांनंतरही इतक्या अप्रतिम वाटतात या कविता ..
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

बोरकर

सुधीर
Fri, 05/31/2013 - 22:22 नवीन
+१ टू बोरकरांच्या सगळ्याच कविता इथे टाकाव्या लागतील
↩ प्रतिसाद: मैत्र

देखणे ते चेहरे, हीच इथे पोस्ट

गवि
Mon, 05/27/2013 - 17:00 नवीन
देखणे ते चेहरे, हीच इथे पोस्ट करावीशी वाटत होती. आधीच हे काम केल्याबद्दल धन्यवाद. बोरकरांची कविता एकूणच उत्तम.
↩ प्रतिसाद: यशोधरा

काय करु शकाल तुम्ही

यशोधरा
Mon, 05/27/2013 - 01:56 नवीन
काय करु शकाल तुम्ही तिच्यासाठी? द्याल तिच्या तान्ह्या श्वासांना जखमी न होता मोकळं जगण्याचं एक साधं आश्वासन? तिचा वाढता बहर वेचण्यासाठी उतावीळ तुमच्या अभिलाषा, ठेवाल मुळाशी निरोगी माती घालण्याची मायेची आठवण? स्वप्नचुटुक वाटेवर चालणारी तिची तरुण नाचरी पावलं आणू शकाल माघारी, तुम्ही पेरुन ठेवलेल्या स्फोटक आणि भयकारी वास्तवापासून? अडवू शकाल तिच्या निरागस इच्छांवर तुमच्या विषारी स्पर्धांच्या अग्निलोलकांतून कोसळणारं संवेदनांची ओल गाभ्यापासून नष्ट करणारं उग्र आणि निर्मम ऊन? रोजच्या रोज घरात बळी जाणारं सोशिक विवाहितेचं कौमार्य कराल परत तिच्या अनीह रतिकर्माची दु:सह आठवण पुसून? उमलण्याच्या आणि दरवळ्ण्याच्या सगळ्या शक्यता सांभाळून जडवाल तिला तिच्या इच्छांच्या सगळ्या कळ्या, पुन्हा फुलवून ज्या गळून पडल्या तिच्या देहावरुन? कसं काही करु शकाल तुम्ही तिच्यासाठी, हजारो वर्षांच्या संकेताच्या झगमगीनं तुमचे डोळे दिपल्यानंतर? आणि अंधारात पूर्ण जागी असलेली ती तर जाणूनच आहे तुमचं मस्तक आणि हृदय यातलं अहंभावाचं अटळ अंतर... -अरुणा ढेरे

समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला

मोदक
Mon, 05/27/2013 - 02:11 नवीन
समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला पाचवा म्हैना वाकले माडांचे माथे , चांदणे पाण्यात न्हाते आकाशदिवे लावीत आली कार्तिक नौमीची रैना कटीस अंजिरी नेसू , गालात मिस्कील हसू मयूरपंखी मधुरडंखी उडाली गोरटी मैना लावण्य जातसे उतू वायाच चालला ऋतू अशाच वेळी गेलीस का तू करून जीवाची दैना - बा भ बोरकर.

नक्षत्रांच्या गावातून उतरली

यशोधरा
Mon, 05/27/2013 - 02:14 नवीन
नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात; मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून, तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे, आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे धुंदमदिर निळे तळे. त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती अमराचा अळता लावलेली तुझी पावले घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता; काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने; तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना; रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना; मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना; पिसावताना, रसावताना, अस्तित्वाचा कण न्‌ कण प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना. कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची; दु:खाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची; कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची. तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला, त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला. पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत; पाठ फिरवून नाही उणी करत; घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो; आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो. राधे, पुरुष असाही असतो! - अरुणा ढेरे, ’मौज दिवाळी’ २००४

देवा परमेश्वरा!

स्पंदना
Mon, 05/27/2013 - 04:03 नवीन
देवा परमेश्वरा! काय हे शब्द सामर्थ्य!
↩ प्रतिसाद: यशोधरा

हेच म्हणतो..

चिगो
Mon, 05/27/2013 - 14:37 नवीन
मन दिपवणार्‍या कविता आहेत 'अरुणा'जींच्या.. जबरदस्त ताकदीच्या कविता..
↩ प्रतिसाद: स्पंदना

अप्रतिम.. भारावणारं...

पिशी अबोली
Mon, 05/27/2013 - 11:47 नवीन
अप्रतिम.. भारावणारं...
↩ प्रतिसाद: यशोधरा

गोनिदांचं अजून एक नितांतसुंदर

प्रचेतस
Mon, 05/27/2013 - 08:45 नवीन
गोनिदांचं अजून एक नितांतसुंदर शब्दलेणं. कादंबरी- जैत रे जैत हे दोन अडीच महिने डोंगराचं दर्शन होणे कठीण. महादेवाचं ध्यान सुरू आहे. तो डोळे मिटून चिंतना करतोय. सगळीकडे पाऊस पडला की नाही. सगळी रानं जोगवली की नाही. अवघी धरित्री भिजली की नाही. कुठं उणं राहिलं असेल, तर त्या अंगाला तो मेंघांना पाठवतो. त्याच्यापाशी लई मेघ. त्याच्या दाराशी हुकमाची वाट पाहात ते उभे असतात. त्याच्या ध्यानात पटदिशी येतं, का अमुक एका डोंगराच्या घळीत पाऊस झाला नाही. तिथले ओढेनाले वाहिले नाहीत. खाचरं पाण्यानं तुडुंब भरली नाहीत. त्या रानचे बेडूक बोलू लागले नाहीत. तिथं काजवे लुक्लुकू लागले नाहीत. तिथल्या कड्यांना गवतं वाढली नाहीत. कड्यांच्या पोटांशी भारंगीचे ठोंब उगवले नाहीत. चवेणीच्या कंदांना हिरवी पानं धरली नाहीत. त्या रानाला अजून भुईकमळं दिसू लागली नाहीत. मग महादेव ढगांचा ताफाच्या ताफाच तिकडे धाडतो. ढग तिकडे सरू लागतात. कधी घाईघाईनं. एकापाठोपाठ एक. कधी एकमेकांच्या अंगावर कोसळत. कधी सावकाश. चुकार कामकर्‍यासारखे. पण शेवटी ते तिथं पोचतात. बरसायला लागतात. न बरसून करतील काय? टंगळमंगळ केली तर महादेवाचा बिजलीचा चाबूक काडदिशी पाठीत बसतो. केवढा आवाज होतो. डोंगर गदगदा हलू लागतात. अशा रीतीनं चहू अंगांना पाऊस पडतो. मग महादेवाच्या ध्यानी येतं, की आता चहूकडे हिरवं झालं आहे. गाईगुजी जोगवू लागल्या आहेत. शेरडं चरू लागली आहेत. खाचरं जळानं तुडुंबलेली आहेत. भाताचे लोंबे जळाच्या साईवर डोकी उचलीत आश्चर्यानं चहूदिशांना बघू लागले आहेत. असं अवघं शांत झालं आहे. मग हळूहळू महादेव ध्यानातून बाहेर येतो. ध्यानाला बसला तेव्हा तो जख्ख म्हातारा होता. ध्यानातून बाहेर येतो तेव्हा तो जवान होऊन येतो. डुईवरचे केस पुन्हा हिरवेगार झालेले असतात. पापण्या पुन्हा ताज्यातवान्या झालेल्या असतात. तो आपल्या डुईत भुईकमळं खोचतो. रंगारंगाची. बहुधा सगळी गुलाबीतांबडी. पण महादेवाला पांढरा रंग आवडतो. म्हणून तो काही पांढरी भुईकमळं अंगावर वागवतो. असा तो कोवळा दरदरीत दिसू लागतो. त्याच्या अंगावरून गंगाबाई खाली उतरत असते. कुठं टंगळमंगळ करीत. कुठं धावत धडपडत. मग तो डुईवर एखाद दुसर्‍या ढगाची चिंधुकली वागवतो, तेवढंच. यापलीकडे मग बाकी ढगांना तो दूरच्या गगनी धाडून देतो. पावसकाळाभर महादेवाच्या गळ्यातला मधमाशांच्या पोळ्यांचा हार गडचीप असतो. पावसकाळा उलटला, की मग त्यांचं गाणं सुरू होतं. ते गुंग गाणं काही फार मोठ्यानं ऐकू येत नाही. पण तरी हजारपाचशे माशी एक्या ठायी झाली, की मग चांगला घुमारा ऐकू येतो. कधी त्या गंगनात तिथल्या तिथं गाणं म्हणत घुमतात. कधी नाच करतात.

भिजणारा मावळ ..

चौकटराजा
Mon, 05/27/2013 - 14:36 नवीन
हे वर्णन वाचून आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ चिम्ब होऊन रोमरोमातून फुलताहेत असे वाटतेय ! आप्पा आपल्या निसर्ग वेडाला दंडवत !! @ म्हादेवा, आरं बाबा तुला मोकळ्या कोरड्या डोंगरांची काळजी हाय ना मग मिपावर अनेक डोगरमाथे भिजायची वाट पाहाताहेत रे.....सरी वर सरी दे ना पाठवून आता....काय म्हंतो .?. ब्रह्मदेवाला कळीवतो म्हून ?
↩ प्रतिसाद: प्रचेतस

छान आहे धागा. आमच्यासारख्या

धन्या
Mon, 05/27/2013 - 09:44 नवीन
छान आहे धागा. आमच्यासारख्या सामान्य वाचकांना यातून सुरेख शब्दमौक्तिके सापडतील यात शंकाच नाही.

"सखी मंद झाल्या तारका" -

आदूबाळ
Mon, 05/27/2013 - 10:56 नवीन
"सखी मंद झाल्या तारका" - भीमसेन जोशींच्या आवाजात या धाग्यात हे बसतं का माहीत नाही. फारच फटकून असल्यास उडवलं तरी हरकत नाही.

एझॅक्टली अवांतर नाही

पैसा
Mon, 05/27/2013 - 11:05 नवीन
पण माझी आवडती गाणी असा वेगळा धागा काढलात तर जास्त छान होईल ना?
↩ प्रतिसाद: आदूबाळ

तू काढ असा धागा,मी टाकीन हवी

मदनबाण
Mon, 05/27/2013 - 19:37 नवीन
तू काढ असा धागा,मी टाकीन हवी तेव्हढी भर ! ;)(मला आवडणारी आणि मी पाहतो ती गाणी टाकेन चालेल काय ?)
↩ प्रतिसाद: पैसा

आहे की. हा घ्या..

इनिगोय
Mon, 05/27/2013 - 20:13 नवीन
आहे की. हा घ्या..
↩ प्रतिसाद: मदनबाण

सुंदर

अद्द्या
Mon, 05/27/2013 - 12:20 नवीन
सुंदर :)
↩ प्रतिसाद: आदूबाळ

सखी मंद झाल्या तारका

मोदक
Mon, 05/27/2013 - 14:01 नवीन
सखी मंद झाल्या तारका आता तरी येशिल का, येशिल का मधुरात मंथर देखणी, आली तशी गेली सुनी हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशिल का ह्रूदयात आहे प्रीत अन् ओठात आहे गीत ही ते प्रेमगाणे छेडणारा, सुर तू होशिल का जे जे हवेसे जीवनी, ते सर्व आहे लाभले तरी ही उरे काही उणे, तू पुर्तता होशिल का बोलावल्यावाचुनही मृत्यू जरी आला इथे थांबेल तो ही पळभरी, पण सांग तू येशिल का (शेवटचे कडवे अफाट आहे!!!)
↩ प्रतिसाद: आदूबाळ

यस! शेवटच कडव म्हणताना अजुनही

स्पंदना
Tue, 05/28/2013 - 05:31 नवीन
यस! शेवटच कडव म्हणताना अजुनही आवाज दाटतो. अप्रतिम शब्द रचना.
↩ प्रतिसाद: मोदक

अगदी असंच होतं,

५० फक्त
Tue, 05/28/2013 - 11:16 नवीन
अगदी असंच होतं, भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, या गाण्यातली - का राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गाताना' ही ओळ म्ह्णताना, यातल्या श्वासवर श्वास कोंडला नाही तर विचारा.
↩ प्रतिसाद: स्पंदना

माचीवरला बुधा

मैत्र
Mon, 05/27/2013 - 11:08 नवीन
गोनीदांची पावसाची शब्दलेणी पाहून राहून राहून बुधाची, त्याच्या मणरंजेणाची, नांदुरकीच्या झाडातल्या दुबेळक्याची आठवण येते आहे. पुस्तक हाती नाही.. त्यातला नांदुरकीमध्ये बसल्यावर जो दूर दिसणारा पाऊस जवळ येऊन भिजवून जातो त्याचे वर्णन कोणी जमल्यास जरूर टाका इथे..

आणि 'शितु' मधले देखिल काही

सौंदाळा
Mon, 05/27/2013 - 11:53 नवीन
आणि 'शितु' मधले देखिल काही असेल तर जमल्यास जरूर टाका इथे.. त्यातले काही वर्णन पण खुपच छान आहे.
↩ प्रतिसाद: मैत्र

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा

कोमल
Mon, 05/27/2013 - 11:54 नवीन
या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे चंचल वारा या जल धारा, भिजली काळी माती हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती फुले लाजरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे रंगांचा उघडूनिया पंखा, सांज कुणीही केली काळोखाच्या दारावरती, नक्षत्रांच्या वेली सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे बाळाच्या चिमण्या ओठांतून, हाक बोबडी येते वेलीवरती प्रेम प्रियेचे, जन्म फुलांनी घेते नदीच्या काठी सजणा साठी, गाणे गात झुरावे या ओठांनी चुंबून घेईन, हजारदा ही माती अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्या साठी इथल्या पिंपळ पानावरती, अवघे विश्र्व तरावे -मंगेश पाडगावकर

मस्त धागा

स्पा
Mon, 05/27/2013 - 12:01 नवीन
मस्त धागा :)

+१

बिपिन कार्यकर्ते
Mon, 05/27/2013 - 12:08 नवीन
+१
↩ प्रतिसाद: स्पा
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा