✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दारू - म्हणजे काय रे भाऊ ?

स
सोत्रि यांनी
Tue, 03/05/2013 - 22:25  ·  लेख
लेख
   दारू आणि दारू पिणारा यांच्याकडे समाजात एका वेगळ्याच नजरेने बघितले जाते. “अरे तो दारू पितो”, “बेवडा आहे पक्का साला”, “त्या दारूने त्याच्या संसाराची धूळधाण उडाली आहे”, “त्याच्याशी बोलून काही उपयोग नाही, तारेत असेल तो” असे आणि अशा प्रकारची मतं ऐकू येतात साधारणपणे. त्याचे कारण म्हणजे आपल्या समाजात (हा ‘समाज’ व्यापक अर्थाने आहे) दारू निषिद्ध मानली जाते. पण एकेकाळी रुढी-परंपरांचा आणि सामाजिक जीवनाचा भाग असलेली आणि सद्ध्या निषिद्ध समजली जाणारी ही दारू म्हणजे नेमके काय? हेच बहुतेकांना माहिती नसते. ऐकीव किंवा काही १-२ वाईट उदाहरणांवरून वेगेवेगळे मतप्रवाह बनलेली दारू म्हणजे नेमके काय? चला तर आज तेच बघूयात... कोणत्याही शर्करायुक्त धान्यातल्या अथवा फळ किंवा फुलातल्या शर्करेचे रूपांतर ईथाइल अल्कोहोल (C2H5OH) मध्ये करून त्यापासून तयार होणारे आणि झिंग आणणारे मादक पेय म्हणजे दारू अशी सरसकट व्याख्या करता येईल दारूची. त्यासाठी अतिरिक्त किंवा विपुल प्रमाणात शर्करा असलेले धान्य, फळ अथवा फूल हे महत्त्वाचे असते. अगदी साध्या आंबवणे ह्या नैसर्गिक प्रक्रियेचा वापर करून शर्करेचे रूपांतर अल्कोहोल मध्ये केले जाते. ह्या तयार झालेल्या अल्कोहोलयुक्त द्रवामध्ये मध्ये मूळ कच्च्या मालाचे वास, चव हे गुणधर्म आलेले असतात. त्यावर प्रकिया करून ते आणखीनं खुलवले जातात किंवा पूर्णपणे घालवून टाकले जातात. त्या त्या दारू प्रकारावर ते अवलंबून असते. आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये खनिजयुक्त पाण्याचे महत्त्व अनन्य साधारण असते. (आता ह्या सर्वावरून दारू ही शुद्ध शाकाहारी असते असे म्हणता येऊ शकेल  :) ) दारूच्या व्याख्येनंतर येतात दारू प्रकार. दारूचे ढोबळ मानाने, ती कशापासून बनली आहे आणि त्यातले अल्कोहोलचे प्रमाण किती ह्यावरून, दोन प्रकार पडतात. लिकर आणि लिक्युअर. लिकर म्हणजे धान्यापासून बनलेली आणि लिक्युअर म्हणजे फुला-फळांपासून बनलेली. लिकर म्हणजे जनरली जेवणापूर्वी घेण्याचा पेय प्रकार तर लिक्युअर म्हणजे जेवेणानंतर घेण्याचा प्रकार. लिकर हा जनरली पुरुषवर्गात लोकप्रिय असलेला प्रकार तर लिक्युअर म्हणजे महिलावर्गात लोकप्रिय असलेला प्रकार. (इथे कोणत्याही प्रकारचा वाद अपेक्षित नाही, स्त्री मुक्ती मोर्च्याने इथे दुर्लक्ष करावे). लिकर आणि लिक्युअरचे वेगवेगळे उपप्रकार पडतात ती कशापासून बनली आहे त्यावरून. व्हिस्की प्रामुख्याने बार्ली (सातू) ह्या धान्यापासून बनली जाणारी लिकर. जगातल्या वेगवेगळ्या भागात ती वेगवेगळ्या धान्यापासून बनली जाते. पण प्रामुख्याने, विख्यात असलेली व्हिस्की, स्कॉच व्हिस्की, स्कॉटलंडमध्ये बार्लीपासून बनवली जाते. अमेरिकन व्हिस्की, बर्बन, ही मक्यापासून बनवली जाते. कॅनेडियन व्हिस्की राय (Rye) ह्या धान्यापासून बनवली जाते. कॅरेबियन बेटांवर प्रामुख्याने बनणारी रम ही उसापासून बनते. जापनीज साके आणि शोचू तांदळापासून बनते. मेक्सिकन टकिला अगावे ह्या कंदापासून बनते. व्होडका बार्ली तसेच बटाटा यांपासून बनते. जीन ही शेतीजन्य पदार्थांपासून मिळवलेल्या अल्कोहोल मध्ये ज्युनिपर बेरी ह्या फळांचा स्वाद मुरवून बनवली जाते. लिक्युअर्स ह्या संत्री, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, सफरचंद, केळी अशा असंख्य फळापासून बनवल्या जातात. तसेच काही वनस्पती, कंदमुळे, झाडांच्या साली, गवत अश्या वेगवेगळ्या घटकांच्या मिश्रणातून बनवल्या जातात. त्या चवीला त्यामुळे गोड असतात. भारतात बनणारी दारू ही अस्सल दारू नसते. साखरेच्या मळीपासून मिळणार्‍या अल्कोहोल मध्ये वेगेवेगळे स्वाद आणि कृत्रिम रंग मिसळवून भारतीय बनावटीची, पण विदेशी फॉर्म्युल्याची दारू तयार होते. ह्यात कास्क (लाकडी ड्रम्स) मध्ये अमुक एक वर्ष मुरवणे वगैरे असला शास्त्रोक्तपणा नसतो. इंडीअन मेड फॉरिन लिकर (IMFL) हा एक उच्चभ्रू आणि महागडा दारू प्रकार भारतात मोठ्या हॉटेलांमध्ये सर्व्ह केला जातो. प्रख्यात विदेशी ब्रॅन्ड्सच्या दारवांचे (प्रामुख्याने व्हिस्की आणि रम) भारतात उत्पादन केले जाते. बॉटल्ड दारू आयात केली की ती उत्पादित वस्तू असल्याने तिच्यावर साधारण १००-१५०% आयात कर भरावा लागतो. त्यामुळे जर बॉटल्ड न केलेली दारू आयात केली तर तो कच्चा माल बनून त्यावरील ड्यूटी कमी होते. मग ह्या आयात केलेल्या दारूला साखरेच्या मळीपासून मिळणार्‍या अल्कोहोलपासून बनलेल्या दारूमध्ये ब्लेंड करून त्या दारूची चव वाढवली जाते आणि मूळ विदेशी चवीशी मिळतीजुळती चव आणली जाते. ह्याउलट हातभट्टीची दारू असते. मूलभूत शास्त्रीय प्रकिया एकच पण बनविण्याची पद्धत एकदम अशास्त्रीय. अस्वच्छ पाणी, नवसागर आणि ती स्ट्रॉंग करण्यासाठी त्यात मिसळलेली वेगवेगळी घाणेरडी रासायनिक द्रव्ये ह्यांमुळे ती दारू, एक मादक पेय न राहता विषारी द्रव्य बनते माणूस तिच्या आहारी जाऊन ती त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरते. ही असली दारू भयंकर स्वस्त असते कारण बनविण्याची पद्धत एकदम अशास्त्रीय असल्याने उत्पादन खर्च कमी असतो. ह्या दारूचे मुख्य उद्दिष्ट झटकन ‘जोरदार किक’ देणे एवढाच असतो त्यामुळे कच्चा माल दर्जाहीन असला तरीही काहीही फरक पडत नाही; कारण इथे चवीचे कुणाला पडलेलेच नसते. डोळे मिटून ‘भर गिलास कर खलास’ असे करून असलेल्या विवंचना घटकाभर विसरून जाणे हाच मुख्य उद्देश असल्याने ‘स्वस्तात मस्त’ असलेला हा माल फार खपतो. ह्या प्रकारच्या दारूमुळेच, दारू वाईट असा सरसकट समज झाला आहे. ह्या हातभट्टीच्या दारूपेक्षा अजून एक जरा बरा प्रकार म्हणजे देशी दारू किंवा सरकार मान्य दारू. हातभट्टीच्या दारूमध्ये वापरल्या जाणार्‍या घातक पदार्थांवर आळा बसावा म्हणून सरकारने दारू बनविण्याची पद्धत आणि त्यासाठी वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालाची मानके ठरवून दिलेली आहेत. त्यानुसार बनणारी ही देशी दारू, सरकारमान्य, हा जरी थोडाबहुत चांगला प्रकार असला तरीही स्वस्त असणे ही तिचीही महत्त्वाची गरज असल्याने ती ही दर्जाहीनच असतो. आता दारू म्हणजे काय ते कळले पण दारू प्यायल्यावर नेमके होते काय? खरं म्हणाल तर खूपच गंमत होते, दोन्ही अर्थाने. जेवढी दारू प्यायली जाते त्यातली २०% पोटात शोषली जाते आणि ८०% लहान आतड्यांमध्ये शोषली जाते आणि त्यातले अल्कोहोल रक्तात मिसळून रक्ताभिरण प्रक्रियेद्वारे शरीरभर पसरले जाते. हे प्रमाण वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. जेवल्यानंतर दारू प्यायली असता शरीरात दारूतले अल्कोहोल शोषले जाण्याचा वेग कमी असतो कारण पोट भरलेले असल्याने आतडी त्यांच्या कामाला लागलेली असतात. त्यामुळे अल्कोहोल रक्तात मिसळून शरीरभर पसरायला वेळ लागतो. एकदा का ते रक्ताभिरण प्रक्रियेद्वारे शरीरभर पसरायला लागले की ते मेंदूपर्यंत पोहोचते आणि गंमत व्हायला सुरुवात होते. ते मेंदूतल्या विविध भागांवर अंमल बजावायला सुरुवात करते. सेंट्रल नर्व्हस सिस्टिम हळूहळू अल्कोहोल च्या ताब्यात जाऊन मेंदूचे काम करणे मंदावते आणि मेंदूचे संदेश शरीरभर पोहोचवण्याचे काम करणार्‍या न्युरोट्रान्समीटर्सवर परिणाम होऊन प्रतिक्षिप्त क्रिया मंदावतात आणि शरीराच्या हालचाली मंदावतात. त्याने एक सहजावस्था प्राप्त होते. मेंदूच्या विविध भागांचे काम करणे मंदावले गेल्याने आणि आलेल्या सहजावस्थेमुळे एक वेगळ्याच कैफाची अनुभूती येते. अर्थात हे सर्व दारू किती प्यायले गेली आहे त्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. अती तिथे माती ह्या उक्तीने खूपच जास्त प्रमाणात जर दारू प्यायली गेली तर सहजावस्था ही सहजावस्था न राहता पूर्ण ‘ब्लॅक आऊट’ अशी अवस्था होऊ शकते. ही दारू पचविण्याची शक्ती माणसामाणसावर अवलंबून असते. ३० मिली दारू शरीरात शोषली जाण्यास साधारणपणे एक तास लागतो. शरीरात पसरत जाणारे हे अल्कोहोल हे शरीरासाठी एक अ‍ॅन्टीबॉडीच असते त्यामुळे यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे ते अल्कोहोल शरीराबाहेर टाकण्याचे काम चालू करतात. आता म्हणाल, फुप्फुसे तर श्वसनाच्या कामात असतात आणि दारू तर तोंडावाटे प्यायली जाते, मग इथे फुप्फुसांचा काय उपयोग? तर त्या अल्कोहोलचे विघटन शरीरात वेगेवेगळ्या प्रकाराने केले जाते त्यात त्याचे वाफ ह्या प्रकारातही विघटन होते आणि ती वाफ फुप्फुसांच्या मार्फत बाहेर टाकली जाते. त्यामुळेच पोलीस Breath Analyzer वापरून टेस्ट घेताना त्या गनमध्ये श्वास सोडायला सांगतात आणि त्या श्वासातल्या अल्कोहोलच्या प्रमाणावरून दारू प्यायली आहे की नाही ते कळते. तर दारूमार्गे अल्कोहोल शरीरात सारण्याचा वेग हा जर शरीराच्या विघटन करण्याच्या वेगापेक्षा जास्त झाला तर माणसाची अवस्था बिकट होते. आपल्या यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे यांची काम करण्याची एक क्षमता असते. त्या क्षमतेपेक्षा जास्त काम त्यांना दिले तर काय होईल? तुम्हाला तुमच्या बॉसने प्रमाणापेक्षा जास्त काम दिले तर काय होते? तुमच्या रागाचा पारा चढून तो कुठल्यातरी मार्गे बाहेर पडण्याचा प्रयत्न होतो की नाही? तसेच नेमके ही यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे करतात आणि उलटीच्या मार्गे अतिरिक्त अल्कोहोल शरीराबाहेर टाकले जाते आणि दारू पिणार्‍याचा ‘वकार युनुस’ होतो. त्यामुळे दारू पिताना तारतम्य बाळगून प्यायल्यास त्यातली मजा अनुभवता येते, नापेक्षा दारू म्हणजे वाईट असा मतप्रवाह बळावण्यास मदत होते. तर आता दारू म्हणजे काय ते कळले का रे भाऊ?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
संदर्भ

प्रतिक्रिया द्या
80990 वाचन

💬 प्रतिसाद (250)

प्रतिक्रिया

आमच्याकडे बाबा बियर महात्म्य

निनाद मुक्काम …
Sun, 03/17/2013 - 03:42 नवीन
आमच्याकडे Image removed. बाबा बियर महात्म्य Image removed. संपूर्ण देशात गायले जाते , प्रत्येक शहराची एक बियर असते ,Image removed. त्यातसुद्धा कलोन व दिस्ल्डोर्फ मध्ये मुंबई पुण्यासारखंच विळ्याभोपळ्याचं नाते असल्याने आमचीच बियर चांगली अशी लाल करण्याची वृत्ती असते , ह्या न्यायाने आमचीच बायरिश बियर कशी चांगली , बियर प्यायची तर किमान एक मास म्हणजे एक लिटर चा प्याले कसे रिचवले पाहिजे ह्याचे वर्णन करणे ओघाने आले.Image removed. ५०० ते २००ओ माणसे एकाचवेळी बसू शकतील एवढी भव्य व विशाल मोकळ्या वातावरणात उन्हाळ्यात अनेक बियर गार्डन जर्मनीच्या बवेरीया राज्यात आढळतात व ह्याचा कळस साध्य म्हणजे बवेरीया ची राजधानी म्युनिक मध्ये दोन आठवडे रंगवणारा ऑक्टोबर फेस्टिवल. थोडक्यात काय तर बियर म्हणजे आमचा जीव की प्राण आमच्या इंग्लिश स्कॉच शी फ्रेंच कोर्नियाक शी व अमेरिकन कॉकटेल शी प्रतारणा करून आम्ही सध्या बियरच्या प्रेमात अखंड बुडलो आहोतImage removed. , पण आजकाल आठवड्यातून एकदा क्वचित प्राशन केली जाते , ह्या विषयावर लिहिण्यासारखे बरेच आहे ,पण सोत्री हे काम चोख पणे करतात तेव्हा शक्यतो वाचकांची भूमिका पार पडतो , हॉटेल व्यवस्थापन केले असल्यामुळे दारू हा नुसता पिण्याचा नसून पाजण्याच्या व त्याहून महत्त्वाचा म्हणजे अभ्यासाचा विषय होता. Image removed. बारावी नंतर सारे मित्र अभियांत्रिकी क्षेत्राकडे वळले , नि आम्ही ह्या ........., ते सर्व चार वर्ष सलग वायवा , सबमिशन्सच्या , आणि कायकाय विषयावर चर्चा करायचे , आणि माझे काय चालले आहे ह्यावर मी त्यांना आज वाईन कशी बनवितात ते शिकलो तर आज स्कॉच..... तर पहिल्या वर्षाच्या शेवटी इंटर्नशिप करतांना पंचतारांकित हॉटेलात एका नामांकित अभिनेत्रीला मी तिच्या आवडीचे कॉकटेल Image removed. कसे बनवून दिले व तिला ते आवडल्या वर तिने ,..... असो तुझे जग वेगळे , नि आमचे जग वेगळे असे नाथा कामत ने ऐकलेले वाक्य मी थोड्याफार शब्दांचा फेरफार होऊन कानावर पडायचे , टोम क्रुज चा कॉकटेल हा सिनेमा पाहून त्यांच्यासारखे जग्लिंग Image removed. करायला लागलो , पुढे मुंबई च्या अनेक नामांकित हॉटेलात ही कला सादर केली , त्यानंतर परदेशात शिकायला गेलो तेव्हापासून आजतागायत व्यवस्थापनाचे विषय शिकल्याने हॉटेलच्या कार्यालयात गळ्यात टाय व अंगावर कोट चढवून बाबूगिरी करायला लागलो , बाटलीला बेईमान झालो , तेव्हापासून ह्या विषयावर शास्त्रोक्त लिहिणे टाळतो , मनात कदाचित अपराधीपणाची भावना असावी.

अंमळ झिंगलेला लेख !

मदनबाण
Mon, 03/18/2013 - 20:11 नवीन
अंमळ झिंगलेला लेख ! ;) बाकी डॉ.खरे यांचे प्रतिसाद आवडले. :)

प्रतिसाद वाचून दारु पिऊन

प्यारे१
Tue, 03/19/2013 - 16:35 नवीन
प्रतिसाद वाचून दारु पिऊन जेवढी चढेल त्यापेक्षा न पिता जास्त चढू शकते असं वाटू लागलंय....!

ह्या धाग्यावर सेसाँर शिप

श्री गावसेना प्रमुख
Wed, 03/20/2013 - 09:02 नवीन
ह्या धाग्यावर सेसाँर शिप जोरात चालु आहे वाटतेय्,जय हो कात्रीवाले बाबा की

ह्म्म्म....

धमाल मुलगा
गुरुवार, 03/21/2013 - 10:22 नवीन
डॉ. खरे ह्यांची मते पुरेपूर पटली. पण काय करणार, आम्ही च्यायला वेगळीच लाईन पकडलेली आलरेडी. :) बाकी काही म्हणा, सहा-आठ दोस्त मंडळी एखाद्या रिकाम्या फ्ल्याटवर जमवावीत, स्कॉचचे खंबे साक्षीला ठेऊन रात्री साडेआठ नऊला मैफिलीला सुरुवात करावी...गप्पांमध्ये तलत यावा, रफी यावा, मदनमोहन, गालीब, खय्याम हेही पाहुण्यांसारखे हजेरी लाऊन जावेत....सरत्या पेगांसोबत चर्चा आणखी निराळ्या विषयांकडे वळत जावी...कधी समाजकारण, कधी राजकारण कधी आणखी काही....चढत्या रात्रीनुसार विषय गूढ होत जावेत...लहानपणीच्या उन्हाळी सुट्टीची याद दिलवून राहील अश्या गप्पा रंगत जाव्यात..मध्येच जेवणाची गडबड उडून जावी......ते झाल्यानंतर बाल्कनीत उभं राहून शिलगावलेल्या सिगारेटीच्या धुरासोबत यारदोस्तांसोबत एखाद्या टेन्शनची चर्चा व्हावी....अन संपल्या सिगारेटीसोबत ती चर्चाही चुरगाळून 'छोड यार...चल! ग्लास रिकामे पडलेत बे!!!' असं म्हणून पण मैफिलीत घुसावं...तावातावानं चाललेल्या चर्चेत आपणही मुसंडी मारावी....... हे असं पार पहाटे पहाटेपर्यंत चालावं, दारावरची घण्टी वाजल्यावर आलेल्या पेपरसाठी तू-तू-मी-मी व्हावी...अन मथळ्याच्या बातमीवरुन पुन्हा खणखणीत चर्चा घडाव्यात. तोवर हातात वाफाळत्या चहाचा कप यावा... अशी साग्रसंगीत मैफील करणार्‍याला कितीही समजाऊन सांगितलं तरी तो काही सुधारणार नाही! :) - (सुधारण्याच्या पलिकडला) ध.

आठवण येते त्या सगळ्या दिवसांची.

रुस्तम
गुरुवार, 03/21/2013 - 10:28 नवीन
बरेच दिवस झाले असा योग आला नाही. आठवण येते त्या सगळ्या दिवसांची.
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

प्रचंड आक्षेप!

सर्वसाक्षी
गुरुवार, 03/21/2013 - 17:49 नवीन
स्कॉचचे खंबे साक्षीला ठेऊन रात्री साडेआठ नऊला मैफिलीला सुरुवात करावी.
देवळात देवाला पेढा वा फळ ठेवतात तद्वत मला कुणी कधी खंबे वगैरे ठेवल्याचे स्मरत नाही!
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हा हा हा!!!

धमाल मुलगा
Fri, 03/22/2013 - 10:54 नवीन
माफी असावी सरकार माफी असावी! गरीबाच्या तोकड्या शब्दसंपत्तीची ती चूक मानून माफ करावी. पुढल्या वेळेस तिसर्‍याच्या आमटीचा नैवेद्य दाखवण्यात येईल. :)
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

खास. एकदम खासच.

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 03/21/2013 - 18:20 नवीन
खास. एकदम खासच.
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हम्म्म्...जुन्या दिवसांच्या

शिद
Fri, 03/22/2013 - 10:13 नवीन
हम्म्म्...जुन्या दिवसांच्या आठवणी ताज्या होउन डोळे पाणावले... :( मायाला, लग्न झाल्यापासुन अश्या मौजमजेला कायमचा मुकलो असे वाटु लागले आहे.
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

स्वसंपादन???

शिद
Fri, 03/22/2013 - 10:16 नवीन
कॄपया मायाला हे मायला असे वाचावे.
↩ प्रतिसाद: शिद

मैफिल

सुबोध खरे
Fri, 03/22/2013 - 10:30 नवीन
वा ध मु साहेब फार दिवस झाले अशी मैफिल जमवून मी दारू पीत नसलो तरी अशी कंपनी फारच आवडते. आणि अशा मैफिलीत एखादा अरसिक विचारतोच दारूचे दुष्परिणाम? माझे त्याला तेथे एकच सांगणे असते झणझणीत मिसळ खाताना मूळ व्याधीची आठवण काढता का? .गप्पांमध्ये तलत यावा, रफी यावा, मदनमोहन, गालीब, खय्याम हेही पाहुण्यांसारखे हजेरी लाऊन जावेत....सरत्या पेगांसोबत चर्चा आणखी निराळ्या विषयांकडे वळत जावी...कधी समाजकारण, कधी राजकारण कधी आणखी काही....चढत्या रात्रीनुसार विषय गूढ होत जावेत...लहानपणीच्या उन्हाळी सुट्टीची याद दिलवून राहील अश्या गप्पा रंगत जाव्यात..मध्येच जेवणाची गडबड उडून जावी.... वा वा वा आठवणीनीच छान वाटायला लागलंय. तेंव्हा मैफिल केंव्हा लावताय? आपला कृपाभिलाषी सुबोध
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

इन्शाल्लाह! :)

धमाल मुलगा
Fri, 03/22/2013 - 10:59 नवीन
बाकी, ते साहेब वगैरेला लावा हो काडी. सरळसोट 'धम्या' म्हणायचं ते राहिलं कुठे..अन साहेब नी फिहेब कशाला ते? :) मैफिल तर जरुर रंगेल. कधी अन कशी ठरतेय त्यानुसार तुम्हाला कळवायचे व्यवस्था करुच आता नक्की. काय? :) आपला मित्र धम्या.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ब्वाँर...

सोत्रि
Fri, 03/22/2013 - 14:02 नवीन
ब्वाँर... तिकीटाची सोयही करणार का ते बोल का नुसताच हिरवा माज म्हणायचा? -(मैफिलोत्सुक) अवांतर:पावसाळ्यात पन्हाळा, लता आणि तलत ची गाणी आणि सिंगल माँल्ट असा बेत ठरला आहे
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

घातलान् कोलदांडा?

धमाल मुलगा
Sat, 03/23/2013 - 10:18 नवीन
ते डाक्टरसाहेब मैफिलीचा मझा लुटायला येतो म्हणताहेत अन तुम्ही लावा नाट! अरे सोकाभैय्या, अरे, शौक करायचे, तर त्यांची खिदमतदेखील करायलाच पाहिजे! तुम्ही मैफिल तरी ठरवा, शक्य झालंच तर येऊ आम्हीही गोर्‍या सायबाला चुना लाऊन :) - धमाजी देवासकर. :)
↩ प्रतिसाद: सोत्रि

हेवा...

मन१
Tue, 04/02/2013 - 19:28 नवीन
ह्याच धाग्यात का कुठंतरी प्रा डॉ बिरुट्यांनी म्हटल्याप्रमाणं धमुच्या जिंदादिलीचा हेवा वाटतो खरं.
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

दारूविरोधविरोधकांनी आवर्जून

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 03/22/2013 - 11:42 नवीन
दारूविरोधविरोधकांनी आवर्जून वाचवा असा प्रतिसाद :-)
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

स ला म..

चिगो
Wed, 03/27/2013 - 00:02 नवीन
मुजरा घ्यावा, मालक.. स्साला, कसली याद आणून दिलीस, दोस्ता.. व्वाह ! दारु ही प्यायची असेल, तर अश्याभ-या मैफिलींसाठीच प्यायची असते. आणि एक अगावू सजेशन, पुढच्या मैफलीत पांचाळेच्या गझला लावून बघ. स्पेशली 'एक जखम सुगंधी'.. मी हा प्रयोग केलेला नाहीये,पण करायची इच्छा नक्कीच आहे.. :-) ( यारा-दोस्तांच्या मैफिलीची चाह असलेला) चिगो
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

:)

धमाल मुलगा
Wed, 03/27/2013 - 06:17 नवीन
भीमराव पांचाळे मैफिलीत आले अन एखादं रडूबाई असेल तर पुरता राडा होतोय मर्दा! उगं रात्री अडीच अन तीन वाजता समजूत घालत बसावी लागते. त्यापेक्षा भाऊसाहेब पाटणकर हवेत. नुस्ता धिंगाणा होतोय खरं!
↩ प्रतिसाद: चिगो

हाहा..

चिगो
Tue, 04/02/2013 - 16:06 नवीन
एखादं रडूबाई असेल तर पुरता राडा होतोय मर्दा! हे आगदी बरुबर, दोस्ता.. त्यातल्या त्यात "टूटे दिल सनम" असला तर मेलेच बाकीचे.. :D
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

धन्यवाद!

उगा काहितरीच
गुरुवार, 03/21/2013 - 15:37 नवीन
धन्यवाद सोत्री साहेब, आपल्या अश्या अभ्यासपुर्ण लेखांमुळे आमच्यासारख्या न पिणा-यांनादेखिल फुकट्ची "शाईन" मारता येते. :)

यासारखे इतर विषय

श्रीरंग_जोशी
Sun, 03/24/2013 - 21:51 नवीन
  • तंबाखू म्हणजे काय रे भाऊ?
  • विडी / सिगारेट / सिगार काय रे भाऊ?
या विषयांवर जाणकारांनी लिहून माझ्यासारख्या अज्ञानी लोकांस उपकृत करावे.

हे घे!

सोत्रि
Sun, 03/24/2013 - 22:35 नवीन
http://www.countyofsb.org/uploadedFiles/phd/Tobacco_Prevention/Tobacco%20Basics.pdf सध्या एवढेच. बाकीचे व्यनितून बोलूयात. - (साकिया) सोकाजी
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
Sun, 03/24/2013 - 22:50 नवीन
सवडीने वाचून पुढील प्रश्न व्य.स. ने विचारतो.
↩ प्रतिसाद: सोत्रि

हे काय?

श्रीरंग_जोशी
Wed, 03/27/2013 - 09:23 नवीन
या दुव्यावरील माहिती बघून अपेक्षाभंग झाला. # सोत्रि - आता व्य. स. मधून काय कप्पाळ विचारणार?
↩ प्रतिसाद: सोत्रि

लेख आणि चर्चा वाचली. डॉ.

रेवती
Mon, 03/25/2013 - 01:28 नवीन
लेख आणि चर्चा वाचली. डॉ. खरेसाहेबांचे प्रतिसाद आवडले. बाकीच्यांचे समजले नाहीत्......शुद्धीत असूनही! ;) एकदा दोन दारवा एकेक चमचा पिऊन पाहिल्या. कडवट टाईपच्या होत्या. लोकांना ही चव का आवडत असावी असा प्रश्न पडला होता पण नंतर जी झोप आली त्याने प्रश्नाचा विसर पडला. पास्त्याचा एक सॉस करताना त्यात मद्य घालण्यास सांगितले होते. तेवढ्यासाठी बाटली विकत आणली. पावकप मापाने ते पास्ता सॉसमध्ये ओतले. नंतर जी झोप आली की विचारता सोय नाही. उरलेली बाटली बरेच दिवस पडून होती. शेवटी टाकून दिली.माझा अनुभव हा एवढाच आहे. ;)

मद्य सांगितले होते की वाइन

सोत्रि
Mon, 03/25/2013 - 08:55 नवीन
मद्य सांगितले होते की वाइन घालायची होती? वाइन असल्यास कुकिंग वाइन वेगळी असते नेहमीच्या पीण्याच्या वाइनपेक्षा. -(साकिया) सोकाजी
↩ प्रतिसाद: रेवती

लाल वाईन सांगितली होती म्हणून

रेवती
Mon, 03/25/2013 - 18:58 नवीन
लाल वाईन सांगितली होती म्हणून दारूच्या दुकानात जाऊन कुकींगसाठी हवी आहे म्हणताच त्या बुवाने अमूक एक प्रकार सुचवला (नाव आठवत नाही, सुमारे १० वर्षे जुनी गोष्ट असल्याने). तो आणून मापाने पदार्थात घातला. आता कदाचित तुम्ही म्हणाल की ती फारच सौम्य असते, चढत नाही, झोप येत नाही पण आम्हाला आली, त्याला काय करणार? वाईन, बियर ही दारू नाही असे काहीजण मानण्याची शक्यता आहे पण बियर व वाईन ही दारूच आहे हे नक्की (निदान माझ्यासाठी तरी). मी एरवी चहा कॉफी घेत नाही त्यामुळे कधीकाळी नाईलाजाने मद्रासेस कॉफी प्यायले आणि दोन रात्री टक्क जागी होते. नंतर त्या वाटेला गेले नाही. तुमच्या नेहमीच्या खाण्यापिण्याच्या सवयीपेक्षा वेगळा पदार्थ असल्यास त्याचा किंचित परिणाम होत असावा पण हे अगदी सुक्ष्म असावे. पेयाच्या बाबतीत जरा जाणवत असेल एवढेच! तुमची कॉक्/मॉकटेल्स पाहणे, कुकींगमध्ये वाईन वापरणे यास माझा विरोध नाही हे आपल्याला आपल्या धाग्यांवरचे माझे प्रतिसाद पाहून समजले असेलच पण माझ्यासाठीतरी हा प्रकार वर्ज्य आहे. कुतुहल शमण्यापुरती चव पाहून झाली आहे.
↩ प्रतिसाद: सोत्रि

येथे काही गोष्टींचा खुलासा

निनाद मुक्काम …
Mon, 03/25/2013 - 04:07 नवीन
येथे काही गोष्टींचा खुलासा करतो , दारू वर माझे व्यावसायिक अनुभवावर आधारलेले मत मागच्या वर्षी गुजरात मधील दारू बंदी ह्या लेखात तर महिलांविषयी मत महिला दिनाच्या दिवशी मांडले होते. ह्या विषयी खरे ह्यांनी शास्त्रीय माहिती दिली ती चर्चेच्या ओघात हा पिलियन ह्यांचा मुद्दा पटला होता. मात्र त्याव्यतिरिक्त त्यांची मते जी ते स्वतः दारू न पिता वैयक्तिक मते मांडत होते जो त्यांचा हक्क असेल तर माझी ह्या विषयावर व्यावसायिक अनुभवाने बनलेली मते मांडणे माझा हक्क आहे , सोत्री ह्यांचे दारू विषयी लेख हे काही मिपावर नवे नाही ,त्यांचा दारू विषयी दृष्टीकोन सुद्धा आपल्याला माहिती आहे. खरे ह्यांनी त्यांच्या एका प्रतिसादात आपण दारू पीत नाही हे सांगणे म्हणजे आपला दांभिकपणा आहे असे ते स्वतः मानतात असे लिहिले , मात्र ह्या नंतरच्या अनेक प्रतिसादात आपण दारू पीत नाही , नौदलात राहून ती पीत नाही हे अनेक प्रतिसादात कारण असतांना व नसतांना सांगत राहिले , ह्या मिपावर ह्या आधी अनेक मान्यवर दारूच्या थेंबाला स्पर्श सुद्धा करत नाही मात्र त्यांनी कधीच स्वतःची जाहिरातबाजी केली नाही किंवा इतरांना सल्ले दिले नाही. सोत्री ह्यांच्या धुंदव बेधुंद करणाऱ्या धाग्यांचा निर्मळ आनंद घेतला ,उगाच मिठाचा खडा टाकला नाही , दारू काय किंवा खाणे काय अति तेथे माती हे मी माझ्या प्रतिसादातून अनेक वेळा लिहिले होते , ह्याबाबत कोणाचे दुमत नव्हते , पण तरी खरे ह्यांची वैयक्तिक मते मला प्रचंड एकांगी व नकारात्मक वाटली.. ते एकेठिकाणी म्हणतात की ते पीत नसले तरी मैफलीत मित्रांना साथ देण्यात बसतात व तेथे त्यांना दारूचे दुष्परिणाम देणे आवडत नाही, मग सोत्रींच्या धाग्यावर ते देण्याचे त्यातही महिलांना देण्यामागे काही विशेष प्रयोजन आहे का , माझ्या व्यावसायिक अनुभवाच्या जोरावर सांगतो , मी भारतात ज्या महिला दारू पितात त्यांच्या मध्यमवर्गीय , उच्च मध्यम वर्गीय , आणि श्रीमंत व अती श्रीमंत अश्या सर्व गटांच्या महिलांना भारतात साडेतीन वर्ष मदिरा पाजली आहे , , पुढे परदेशात काही वर्ष हेच कार्य केले आहे , माझा अनुभव भारतातील असा सांगतो की बायका बहुदा समूहात उच्चभ्रू नाहीतर बर्‍यापैकी चांगल्या बार मध्ये जातात, ह्यात उच्च पदावर काम करणाऱ्या किंवा गृहिणी ज्यांचे पती उच्च पदावर आहेत किंवा स्वतःचा व्यवसाय आहे, किंवा अभिनय व मॉडेलिंग करणाऱ्या व श्रीमंत घरातील मूली सुद्धा येतात , आता खरे ह्यांनी जो सल्ला दिला आहे तो मिसळपाव वर दिला आहे ,येथे शक्यतो मध्यम व उच्च मध्यमवर्गीय किंवा श्रींमत महिला मिपाकर असतील. माझा त्यांच्या बाबतीत अनुभव सांगतो , शक्यतो त्या परिवार किंवा मित्र मैत्रिणींच्या समूहाबरोबर बार किंवा उपहार गृहात जातात , पब किंवा डिस्को मध्ये शक्यतो एकट्या जात नाही , व जर एखादी डेट वर पहिल्यांदा आली असेल हे प्रमाण ह्या गटांच्या मध्ये तुलनात्मक दृष्ट्या कमी असते पण जर त्या आल्या असतील , तर जुजबी ओळखीवर किंवा एका अनोळखी व्यक्तीकडून त्या ड्रिंक स्वीकारत नाही , हे माझे निरीक्षण व अनुभवांच्या अंती मत आहे , दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना आपण कोणत्या समाजात वावरत आहोत , येथे पुरुषांच्या नजरा कश्या असतात , ह्यांची त्यांना पूर्ण कल्पना असते , त्या शक्यतो एकट्या जात नाहीत , व जर कामानिमित्त एखाद्या कलीग सोबत गेल्या तरीही ,फुकट मिळत आहे म्हणून त्या पीत नाही , अनोळखी मुलीला जुजबी ओळखी वर दारू पाजून आपला स्वार्थ साधने एवढे सोपे असते तर पिक अप पोइंत व डान्स बार रिते पडले असते. पंचतारांकित हॉटेलात मी अनेक उच्च पदस्थ भारतीय महिला पहिल्या आहेत ज्या उच्च मध्यमवर्गीय व श्रींमत ह्यांच्या सीमा रेषेवर असतात , त्या जुजबी ओळख झालेल्या व्यक्ती समवेत ड्रिंक करतात पण हे मी अनुभवाने सांगतो त्यांचे वागणे , बोलणे , कमालीचे आत्मविश्वास पूर्ण असते व त्यांना कुठे थांबायचे ह्यांची बरोबर जाण असते , त्यांना संभाषण करणारा आपला कलिंग आपल्याला त्यांच्या रूम मध्ये नेण्याच्या विचारात आहे का हे पहिल्या काही मिनिटात कळते. ते आता आम्हाला ही अनुभवाने कळायला लागले होते , मिपावर ज्या महिला दारू पितात त्यापैकी एकी ने जरी मला येथे नमूद केले की सार्वजनिक ठिकाणी दारू प्यायची का नाही किंवा ती कोणासोबत प्यायची व कंपनीच्या कामानिमित्त असलेल्या पार्टीत अनोळखी व्यक्ती सोबत कसे वागावे हे त्यांना खरे ह्यांच्या सल्ल्यामुळे कळले ,आधी ह्याबाबत त्याचे ह्याबाबतीत नॉलेज शून्य होते , तर मी खरे ह्यांची जाहीर माफी मागायला तयार आहे , त्यांनी महिलांना उपदेशाचे डोस येथे पाजाण्यापुर्वी विचार करायला हवा होता , स्वतःच्या मित्रांना ते दारू प्यायला बसले तर सल्ला न देणे व येथे आयती संधी आली आहे तर महिलांना चार सबुरीच्या ,अकलेच्या गोष्टी सांगणे हा दांभिकपणा मला वाटला , सोत्री ह्यांचे ह्या पूर्वी येथे दारूवर अनेक लेख आहे , कोठेही तिचे उदात्तीकरण नव्हते तर पेठकर काका म्हणतात तसे ह्या कलेला आस्वाद कसा घ्यावा ह्यांचे तो साक्षात्कार असायचा, अनेक दारू न पिणाऱ्या सन्माननीय मिपाकरांनी दाद दिली आहे , प्रवचन दिले नाही आहे , दारू व व्यसनाधीनता ह्या बाबतीत अनेक स्तरातील अनेक देशातील दारू पिणाऱ्या व्यक्तींशी संभाषण करून हे मत बनवले आहे. दारू पिणे ही आवड तर पाजणे हा एकेकाळी आमच्या चरितार्थाचे भाग होता. म्हणून ह्याविषयावर हक्काने थोडेसे खरडतो.( एरवी सुद्धा खरडतो ......) एखादा माणूस दारू चे आचमन करत असेल तर अनुभवाने आम्ही (पाजणारे ) हा दारू पितोय का दारू ह्याला पीत आहे हे सांगू शकतो. येथे दारूला उगाच बदनाम करण्यात येत आहे. असे माझे स्पष्ट मत आहे. दारू हे केवळ एक निमित्त असते. मुळात व्यसनाधीन माणूस कोणत्याही व्यसनाच्या आधीन होण्याआधी त्यांच्या मानसिक दृष्ट्या कुठेतरी जबरदस्त कंपूवत असतो. कारणे जगात अनेक असतात पण त्या कारणांना वास्तविक आयुष्यात तोंड देणे विविध कारणास्तव शक्य झाले नाही. किंवा तोंड देण्याची मानसिकता नसेल तर मग आपले शरीर एखादे मृगजळ शोधते. मग त्यासाठी वास्तविक जगातील एखादे व्यसन उदा दारू हि त्या इसमास खर्या आयुष्यातून एखाद्या मोहमयी जादुई दुनियेत नेऊन ठेवते. तेथे मिळणारा क्षणिक आनंद व त्यात दुनियेत चालणारी आपली अधिसत्ता त्या दुनियेत आपल्याला सारखे रमविण्यास प्रवृत्त करते ह्यालाच मग व्यसन लागणे असे म्हणतात. माझ्या पाहण्यात अनेक लोक आयुष्यात काहीतरी मोटीव. लक्ष्य ,उद्दिष्टांचा अभाव हे देखील रिकामे डोके सैतानाचे घर ह्या न्यायाने दारूचे व्यसन म्हणावे इतपत दारू पितात , दारूचे व्यसन लागणे म्हणजे नक्की काय त्याशिवाय तुम्ही राहू न शकणे माझ्या पाहण्यात अनेक प्रसिद्ध व्यक्ती आहेत ज्यांना रात्री अर्धा खंबा लागतो काहींना पूर्ण पण त्यांच्या व्यवसायात व जीवनात ते आजतागायत यशस्वी गणले जातात किचन मधील सुरीने एरवी भाजीपाला कापला जातो मात्र एखादा त्याने दुसर्‍याचा किंवा स्वतःचा गळा चिरतो ,किंवा कोथळा बाहेर काढतो. दारू वाईट नाही वाईट आहे ती नकारात्मक मानसिकता. ,

उत्तम प्रतिसाद

श्रीरंग_जोशी
Mon, 03/25/2013 - 04:36 नवीन
दारू वाईट नाही वाईट आहे ती नकारात्मक मानसिकता.
हे वाक्य खूपच भावले. गेल्या काही वर्षांत मी आंतरजालाच्या खूपच आहारी गेलेलो आहे. वरील विचार वाचून माझ्या या व्यसनाच्या तीव्रतेची मला जाणिव झाली आहे. पण काहीही झाले तरी मी अध्यात्माच्या आहारी जाईन असे वाटत नाही :-).
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

ज्जे बात

सोत्रि
Mon, 03/25/2013 - 08:49 नवीन
सर्व प्रतिसादांमधला खराखुरा 'अप्रतिम' प्रतिसाद! -(रसिक) सोकाजी
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

वैयक्तिक होत आहे

पैसा
Mon, 03/25/2013 - 09:12 नवीन
डॉक्टर खरे यांचे प्रतिसाद अजिबात उपदेशाचे डोस पाजणारे वाटले नाहीत. ज्यांना तसे वाटले असेल त्यांना आपण दारू पिऊन काहीतरी चुकीची गोष्ट करत आहोत असे आंतर्मनात खवखवत असावे. डॉक्टरांची भाषा सगळीकडे अत्यंत नम्र आहे. मला एवढे थंड राहणे जमले नसते. नकारात्मक मानसिकता वगैरे मला तरी डॉक्टरांच्या प्रतिसादात कुठेही दिसली नाही. कोणत्याच बाजूचे उदात्तीकरण करू नका असे त्यांनी सांगितले आहे जे अत्यंत समतोल आणि योग्य आहे. ते फक्त वैद्यकीय दृष्ट्या सिद्ध झालेल्या गोष्टी तुमच्यासमोर ठेवत आहेत. तुम्हाला जर कोणी चांगले सांगितलेले पटत नसेल तर सोडून द्या. उगीच वैयक्तिक शेरेबाजी करायची गरज नाही. एक संपादक म्हणून मी निनादचा खटकलेला प्रतिसाद सहज संपादित करू शकले असते पण त्याने त्याचे मिपावरचे सुरुवातीचे दिवस आठवावेत एवढेच सांगेन. त्याच्या टायपिंगला हसणार्‍यांमधे मीही होते हे इथे कबूल करते, पण नंतर त्याने जिद्दीने परत येऊन आंतर्राष्ट्रीय राजकारणावर माहिती देऊन आणि एकूण आपला वावर सर्वांना आवडेल असा करून दाखवला. आता या परिस्थितीत अशी वैयक्तिक शेरेबाजी निनादकडून अपेक्षित नव्हती. कोणताही डॉक्टर फुकट वैद्यकीय सल्ला देत नाही. त्यांच्या क्लिनिकमधे जाऊन पैसे मोजले की त्याची किंमत आपल्याला कळते. परंतु डॉक्टर खरे यांची नेव्हीची पार्श्वभूमी असल्याने ते आपल्या ज्ञानाचा फायदा सर्व सामान्यांना करून देत आहेत तर त्यात काय चूक झाली हे मला कळत नाही. आतापर्यंत इथे दिलेल्या वैद्यकीय सल्ल्यांबद्दल डॉक्टरांचे मी जाहीर आभार मानते आणि यापुढेही त्यांनी असे सल्ले देत रहावे अशी कळकळीची विनंती करते.
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

त्यांनी महिलांना उपदेशाचे डोस

कवितानागेश
Mon, 03/25/2013 - 12:58 नवीन
त्यांनी महिलांना उपदेशाचे डोस येथे पाजाण्यापुर्वी विचार करायला हवा होता , स्वतःच्या मित्रांना ते दारू प्यायला बसले तर सल्ला न देणे व येथे आयती संधी आली आहे तर महिलांना चार सबुरीच्या ,अकलेच्या गोष्टी सांगणे हा दांभिकपणा मला वाटला ,> हे अत्यंत हास्यास्पद विधान आहे, आणि हे सांगताना मला अतिशय खेद वाटत आहे. डॉक्टरांनी before and during preganancy मद्य नको, असे साम्गितले आहे, असे मी जे काही प्रतिसाद वाचलेत त्यातून मला कळलंय. आणि ३ वेळा प्रतिसाद वाचून मला कळलंय ते बरोबर आहे हेदेखिल कळलंय! इथे प्रक्रुतीशी संबंधित धोका सांगितलेला आहे. त्याला काही लोक्स विनाकारण फाटे फोडातायत. सोत्री दारु म्हणजे काय आणि ती कशी प्यावी, बेतानी प्यावी अश्याच प्रकारे काही गोष्टी सांगतायत आणि डॉक्टर ती पिताना काळजी काय काय घ्यावी हे सांगतायत... आणि लोक्स काय वाट्टेल ते सांगतायत असं माझे निरिक्षण आहे! :)
↩ प्रतिसाद: पैसा

दारू वाईट नाही वाईट आहे ती नकारात्मक मानसिकता

सुबोध खरे
Mon, 03/25/2013 - 14:16 नवीन
१०० टक्के मान्य माझी ह्या विषयावर व्यावसायिक अनुभवाने बनलेली मते मांडणे माझा हक्क आहे.१०० टक्के मान्य.आपण गोष्टी फार वैयक्तिक पातळीवर आणता. दारू पाजणे हा एकेकाळी आमच्या चरितार्थाचे भाग होता .तसेच दारू पिऊ नका हा सल्ला देणे हा आमच्याही चरितार्थाचा भाग आहे साहेब. You can win an argument but cant change someone’s point of view. म्हणून मी हा वाद थांबवला होता. माझ्या मनात कोणताही किंतु नाही.आपलेही मन साफ असेल अशी अपेक्षा करतो. कळावे लोभ असावा. सुबोध
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

येथे एक गोष्ट मला प्रकर्षाने

निनाद मुक्काम …
Mon, 03/25/2013 - 16:37 नवीन
येथे एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवत आहे , की दारू न पिणाऱ्या व्यक्तींना खरे ह्यांचे प्रतिसाद आवडले आहेत , पण माझे प्रतिसाद त्यांना खटकले ह्याबाबत मला काही आक्षेप नाही ,पण वाईट ह्या गोष्टीचे वाटते की त्यांनी खरे ह्यांचे प्रतिसाद जेवढे नीट वाचले तेवढे माझे वाचलेले दिसत नाहीत , उदा हे वाक्य त्यांनी महिलांना उपदेशाचे डोस येथे पाजाण्यापुर्वी विचार करायला हवा होता , स्वतःच्या मित्रांना ते दारू प्यायला बसले तर सल्ला न देणे व येथे आयती संधी आली आहे तर महिलांना चार सबुरीच्या ,अकलेच्या गोष्टी सांगणे हा दांभिकपणा मला वाटला ,> ह्यावर एका महिला मिपाकाराने आक्षेप नोंदवत हे पुढील विधान केले हे अत्यंत हास्यास्पद विधान आहे, आणि हे सांगताना मला अतिशय खेद वाटत आहे. डॉक्टरांनी before and during preganancy मद्य नको, असे साम्गितले आहे, असे मी जे काही प्रतिसाद वाचलेत त्यातून मला कळलंय. आणि ३ वेळा प्रतिसाद वाचून मला कळलंय ते बरोबर आहे हेदेखिल कळलंय! इथे प्रक्रुतीशी संबंधित धोका सांगितलेला आहे. आपण माझा प्रतिसाद नीट वाचला तर लक्षात येते .तर मी स्पष्ट हा उल्लेख केला आहे. ह्या विषयी खरे ह्यांनी शास्त्रीय माहिती दिली ती चर्चेच्या ओघात हा पिलियन ह्यांचा मुद्दा पटला होता. मात्र त्याव्यतिरिक्त त्यांची मते जी ते स्वतः दारू न पिता वैयक्तिक मते मांडत होते जो त्यांचा हक्क असेल तर माझी ह्या विषयावर व्यावसायिक अनुभवाने बनलेली मते मांडणे माझा हक्क आहे , सार्वजनिक ठिकाणी महिलांनी दारू पिण्यापूर्वी विचार करावा किंवा अनोळखी माणसासोबत दारू पिऊ नये ह्या सल्याला आहे , मुळात येथे खरे ह्याना दारू पिणाऱ्या ज्या मिपाकर महिलांना हा दिव्य संदेश देणे अपेक्षित आहे , त्यांना मी नम्रपणे माझ्या आधीच्या प्रतिसादात सांगितले आहे , ह्या सल्याची महिलांना अजिबात गरज नाही कारण त्यांना सार्वजनिक ठिकाणी कसे वागायचे ह्याचे पूर्णतः आत्मभान असते , गंमत म्हणजे येथे दारू न पिणारे अत्यंत हिरारीने ज्यात महिला सुद्धा आल्या त्या मत मांडत आहेत , पण मी आधी म्हटले तसे ज्या महिला मिपाकर दारू पितात त्यांचे खरे ह्यांनी त्यांना दिलेल्या अनाहूत सल्ल्याबद्दल काय मत आहे ,हे कळले नाही , आदितीने तिचे मत खरे ह्यांना साफ सांगितले , सार्वजनिक ठिकाणी महिलांनी काय करावे ,दारू प्यावी की पियू नये हे महिलांना व्यवस्थित कळते , त्यांना त्यांनी सार्वजनिक ठिकाणी पुरुषासोबत कसे वागावे , दारू प्यावी का हे सांगण्याची गरज अजिबात नाही , त्या सक्षम व सबल आहेत , अदिती हिने योग्य शब्दात आपला मुद्दा मांडला की आजपर्यंत वृत्त पत्रात जेवढे बलात्काराची प्रकरणे आपण वाचली त्यात महिला दारू पीत होत्या का सार्वजनिक ठिकाणी भारतात जेथे महिला दारू पितात तेथे वातावरण अत्यंत सुरक्षित असते हे माझे व्यावसायिक मत आहे , जे मांडण्याचा मला अधिकार आहे , आणि मी आधीच म्हटले आहे , माझा आक्षेप खरे ह्यांनी दारू पिणाऱ्या महिला मिपाकरांना सल्ला दिला त्यावर आहे , हा माझा आक्षेप t ज्या दारू पिणाऱ्या महिला मिपाकर आहेत त्यांना खटकला नसावा. , पण ज्या महिला मिपाकर दारू पीत नाहीत त्यांना खटकला , हाच नेमका विरोधाभास मला खटकतो , खरे साहेब तुमची शास्त्रीय विधानांवर मी आक्षेप घेतला नाही आहे , पण त्या व्यतिरिक्त तुम्ही जी विधाने करत आहात त्यात प्रचंड प्रमाण कमालीची विसंगती मला आढळून आली , तुमच्या ह्याच धाग्यात तुम्ही स्वतः परस्पर विरोधी विधाने करून अनेकांची दिशाभूल करत आहात असे माझे मत आहे ,उदाहरणार्थ तसेच दारू पिऊ नका हा सल्ला देणे हा आमच्याही चरितार्थ भाग आहे साहेब. तुमच्या आधी अनेक प्रतिसादात दारू पिण्यावर तुमचा आक्षेप नाही , मित्रांच्या मैफिलीत तुम्ही सामील होता , किंवा धमाल मुलगा ह्यांच्यासोबत मैफलीचे प्लान रचणे किवा अभिषेक ला तुला प्यायची असेल तर खुशाल पी ,फक्त फुकट मिळते म्हणून पियू नको अश्या अनेक वाक्याच्या पार्श्वभूमीवर तुमचे वरचे विधान तुम्हीच पहा , खरे व मी व सोत्री ह्यांनी आधीच अनेक प्रतिसादात म्हटले आहे ,संतुलित प्रमाणात दारूच नाही तर खाणे ठेवले तर आरोग्याला धोका नाही , माझ्या पाहण्यात अनेक डॉक्टर दारू पितात , परदेशात आणि भारतात सुद्धा , आणि पैसा ताई माझे सुरवातीचे दिवस आठवले तर एक गोष्ट प्रकाशाने जाणवते आंतरराष्ट्रीय राजकारणावर मी एक लेख लिहिला व त्यानंतर माझे आख्यान सुरु केले , त्यात मी माझे स्वतःचे वैयक्तिक अनुभव मांडत होतो ,ही मालिका दीर्घ चालली, त्यात माझे शुद्ध लेखन व नंतर अनेकांशी वाद झाले ज्यात आदिती अग्रस्थानी होती , पुढे मला समज मिळाली व मी वयक्तिक हल्ले माझ्या लेखनातून कटाक्षाने टाळले , पुढे मी भारतावर आधरित प्रवास वर्णन सुरु केले त्याच सोबत मी अनेक विविध विषयांवर सुद्धा लिखाण केले , ज्यात गुजरात दारू बंदी व महिला दिवस ते अनेक विविध विषय ,आपण संपादक आहात आपण ते जुने लेख पाहू शकतात , आता ह्या सगळ्यात तुम्हाला माझे लेखन म्हणजे फक्त आंतरराष्ट्रीय राजकारण असेच वाटत असेल तर मी नम्रपणे सांगू इच्छितो की आपला माझ्याविषयी अभ्यास तोडका आहे ,आंतर्राष्ट्रीय राजकारणावर माहिती देऊन मी माझा वावर मिसळपाव वर सहज केला. विशेषतः ह्या मुद्द्यावर. कारण येथे मी फक्त आंतरराष्ट्रीय राजकारणच नव्हे तर प्रवास वर्णन असो किंवा इतर कोणतेही विषय असो त्यावर माझ्या कुवतीने लिखाण व प्रतिसाद देत असतो , असे माझे मत आहे. बहुदा त्यामुळे माझा येथे वावर सुसह्य झाला असावा , माझ्या ऑक्टोबर फेस्ट वरील लेखावरील प्रतिसाद वाचलेतर तुम्हाला मी काय म्हणत आहे हे कळेल , फक्त आंतरराष्ट्रीय राजकारणावर लेख ,,,,,,, हे तुमचे माझ्याविषयी मत मला पटले नाही , कारण माझ्या जर्मन आख्यान मला असो किंवा भारतीय दास्ताने किंवा इतर अनेक विषय असो सगळ्यांना मिपाकारणी भरपूर प्रतिसाद दिला , आता तुम्हाला माझे फक्त आंतरराष्ट्रीय राजकारणावर लिखाणच दिसते हा माझा दोष नाही , दुसरे महत्त्वाचे म्हणजे तुम्ही प्रतिसादात लिहिले की कोणत्याच बाजूचे उदात्तीकरण करू नका असे त्यांनी सांगितले आहे मात्र पुढच्याच प्रतिसादात त्यांचे वाक्य मला कमालीचे विसंगतीचे वाटते , डॉक्टर म्हणून कर्तव्य ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, डॉक्टर म्हणून शास्त्रीय माहिती देणे कर्तव्य मी समजू शकतो , पण डॉक्टर म्हणून महिलांनी सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे हे सांगणे ,,,,,,,,,,, महिलांनी कसे वागावे ,काय करावे , काय करू नये हे कोणत्याच बाबतीत महिलांना पुरुषांनी सांगायची अजिबात गरज नाही आहे असे माझे फार पूर्वी पासून मत आहे, माझा मागच्या वर्षात महिला दिनावर माझे मनोगत हा लेख वाचा , त्यांच्या शेवटी एका वाक्यात मी हीच भूमिका मांडली आहे ,
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

शिरसि मा लिख

पैसा
Mon, 03/25/2013 - 19:32 नवीन
निनाद, माझा या लेखावरचा शेवटचा प्रतिसाद. तू डॉ. खरे यांचेच नव्हे तर माझाही प्रतिसाद पूर्ण वाचून समजून घेऊन उत्तर लिहिले आहेस असे वाटत नाही.
प्रवचन देणे, उपदेशाचे डोस पाजणे, नाटकी भाषा
हे सगळे का सर्जनला उद्देशून म्हणणे मला अजिबात पटले नाही. तेही त्यांनी अगदी सरळपणे सांगितल्यानंतर?
दारू पितो तर ती मजेसाठी हे सांगण्याचा प्रामाणिकपणा असावा. पार्टी मध्ये घ्यावी लागते, कंपनी म्हणून घेतो असा दांभिकपणा असू नये.
तरीही वैद्यकीय सल्ला काय विचाराल तर हा आहे इतकं स्पष्ट लिहिलेलं असताना त्याबद्दल आणि त्यांच्याबद्दल वैयक्तिक विधाने करण्याची गरज नव्हती. आजपर्यंत डॉ. खरे यांनी एकाही मिपाकराबद्दल अशी शेरेबाजी केलेली मी पाहिली नाही. तूही ते टाळलेस तर बरे.
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

पैसा ताई

निनाद मुक्काम …
Mon, 03/25/2013 - 23:42 नवीन
पैसा ताई कसे आहे माझा मुद्दा एवढाच आहे अवांतर करून की दारू पिणाऱ्या महिला मिपाकरांना ह्या धाग्यावर सल्ला देणे मला प्रशस्त वाटले नाही , माझ्या पाहण्यात महिला अत्यंत सजग असतात त्यांना पुरुषांच्या नजरेची जाण असते , दुसरा मुद्दा खरे हे सर्जन आहेत पण मी त्यांच्या शास्त्रीय माहितीवर आक्षेप घेतला नाही , मात्र स्वतः दारू न पिता जे दारू पितात त्यांना त्यांनी दांभिक म्हणणे मला भयानक खटकले , मी आधी लिहिले होते की माझ्या मते की प्रत्येक माणसाचे आपण आयुष्यात जी कृती करतो त्याबद्दल एक स्पष्टीकरण तयार असते , एखादा माणूस जेव्हा म्हणतो की मी कंपनी साठी पितो तेव्हा त्यावर विश्वास का ठेवू नये ह्याबाबत ठाम असे तार्किक किंवा शास्त्रीय मत खरे ह्यांच्या कडे आहे का त्यांना वाटते म्हणून त्यांनी लिहिले ह्या न्यायाने मला त्यांचे सल्ले महिलांना उद्देशून प्रवचन मोड वाले वाटते , त्यांचे लोकांना दांभिक म्हणायचे व्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही मान्य करत असाल किंवा आवडून घेत असाल तर त्यांच्या लेखनाला प्रवचन म्हणायचे माझे व्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही का बरे मान्य करत नाहीत ,म्हणजे तुमच्या मनात अगदी प्रतिसाद संपादित करण्याएवढा विचार आला त्यांच्या लेखनावर मी शाब्दिक हल्ले चढवले ते मी त्याच समयी श्री गुरुजी ,ह्यांच्यावर सुद्धा एका वेगळ्या धाग्यावर चढवले ते कुणाला का बरे खटकले नाही , कदाचित गुरुजींनी आपण कोठे नोकरी केली आपला व्यवसाय कोणता हे तपशीलवार पणे परत परत मिपावर सांगितले असते तर त्यांच्या बाजूने काही प्रतिसाद नक्कीच आले असते असे आता मला वाटते. मी आयुष्यात कोणालाच दांभिक म्हणत नाही , प्रत्येकाची आपली ठाम विचारसरणी असते व आपल्या कृतीच्या समानार्थक स्पष्टीकरण असते , माझ्या व्यावसायिक आयुष्यात मी कंपनी साठी दारू पिणारे अनेक जण पहिले आहेत , ह्यात अनेक मध्यमवर्गीय महिला ह्या घरी नवर्‍याला कंपनी देण्यासाठी पितात , अनेक व्यापारी लोकांच्या बायका पार्टी मध्ये कंपनी द्यावी म्हणून पितात ह्यात त्यांना ती दारू आवडते का नाही हा मुद्दा नसतो ,कारण ह्या दोन्ही वर्गातील बायका, नवरा नसतांना कधीच एकटे किंवा मैत्रिणी सोबत एकट्याने येउन दारू पीत नाहीत , हे माझे व्यावसायिक निरीक्षण आहे. आमच्या डोंबिवली सारख्या पांढरपेशा शहरात आमच्या इमारतीत असे उदाहरण होते. सोत्री ह्यांच्या धाग्यात अवांतर झाले तेव्हा दारू न पिणाऱ्या मंडळीनी येथे खरे ह्यांचे प्रतिसाद आवडले हे आवर्जून सांगितले मात्र हे सांगतांना खरे ह्यांची दारूविषयी मते अत्यंत एकांगी होती हे अनेकांना खटकले नाही ह्यांचे सखेद नवल वाटले , एक छोटे उदाहरण देतो , सार्वजनिक ठिकाणी महिलांनी दारू पिण्यापूर्वी विचार करा ह्यावर दादा कोंडके ह्यांनी अत्यंत समर्पक मुद्दा मांडला की मैत्रिणींना सावरणारे व साथ देणारे व गैरफायदा न घेणारे सुद्धा मित्र असतात ,पण त्यांचे हे मत खड्यासारखे बाजूला टाकल्या गेले ,त्यांचा हा मुद्दा अजिबात विचारात घेतला नाही , विश्वास ठेवलेल्या माणसाने विश्वासघात करायचा असेल तर तो केव्हाही करतो ह्या समाजात निर्भायाचा बलात्कार करणारे पुरुष असतील तर तिच्या साठी जीवाची बाजी लावणारा तिचा मित्र सुद्धा असतो , थोडे कच्चे हे ,पर बंदे अच्छे हे , ताजा कलम एकेकाळी माझे अदितीची टोकाचे वाद झाले , पण ह्यावेळी मला तिचा मुद्दा पटला विशेषतः तिने प्रांजळपणे तिची बाजू मांडली. कारण सल्ला तिला उद्देशून होता , येथे अजून दारू पिणाऱ्या महिला असतील तर त्या सार्वजनिक ठिकाणी दारू पितात का व त्याबाबत त्यांचे अनुभव जाणून घ्यायला आवडतील मात्र माझ्या मते त्यांचे एक उत्तर नक्की असेल की आम्ही कोठे कसे वागावे हे आम्हाला कळते. परदेशात एकटी शिकायला आलेली मुलगी व तिचा मित्र म्हणून तिला जमेल तशी साथ देणारा व मैत्री निभावणारा एक मित्र असा माझा स्वतःचा अनुभव जमेल धरून हे विधान करत आहे ,
↩ प्रतिसाद: पैसा

दारू हे केवळ एक निमित्त असते.

घन्चकर
Tue, 03/26/2013 - 23:14 नवीन
अगदी बरोबर आहे तुमचे मुळात व्यसनाधीन माणूस कोणत्याही व्यसनाच्या आधीन होण्याआधी त्यांच्या मानसिक दृष्ट्या कुठेतरी जबरदस्त कंपूवत असतो.कारणे जगात अनेक असतात पण त्या कारणांना वास्तविक आयुष्यात तोंड देणे विविध कारणास्तव शक्य झाले नाही. किंवा तोंड देण्याची मानसिकता नसेल तर मग आपले शरीर एखादे मृगजळ शोधते. मन्हुन या करिता आपण सवतः ला मानसिक दृष्ट्या इतके खंबीर करावे कि असले व्यसन ची गरज नाही .आणिक जर विचार कराल तर लक्षात येते कि कितेक रुपय, मेहनती नि कमवले, ते दारू वर वाया घालणे पेक्षा एखादय गरीब माणसाला त्याच रुपयान नि दोन वेड चे जेवण दिले तर , आणिक बरेस जरुरत मंद व्यक्तींना मद होऊ शकते या विचारा ने . शेवटी दारू चे व्यसन पेक्षा एकदा ला जीवन चे सुख देणे जास्त बरे नाही का. आपण पैसा कामुतो आणिक फुकट असला गोष्टी वर घालतो तेवा लक्षात घ्याला पाहिजे कि बरच लोकों कष्ट करून साधेय जेवण पण नाही करू शकतात तेन्चे पोर किती अभाव चे जीवन जगतात . या साठी एक विनम्र निवेदन जे कोणी मना पासून समझून घेऊ शकते त्यान ला कि कृपया दारू पिणे चे आधी लक्षात घ्या असले पोर बदल आणिक आपल्या पैसा चे खरे मोल करा गरीब जरुरत असले ला पोरं ना मदद करून हे व्यसन कधी हि चांगले :) फक्त एकदा विचार करा मना पासून...
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

जोरदार विक्री चालू आहे बहुतेक

सुज्ञ माणुस
Mon, 03/25/2013 - 09:44 नवीन
रोज सकाळी सकाळी मिपा वर लॉगीन केले कि ( नवे लेखन) पहिले दर्शन होते ते दारूच्या लेखाचे :) जोरदार विक्री चालू आहे बहुतेक ( हा अंदाज लेख आणि प्रतिक्रिया वाचून बांधलेला नव्हे. ) :) (शरीरानी) तरुण (असलेल्या) पिढीला प्रबोधनाची गरज आहे हेच खरे :)

माताय...काय चढलाय धागा टाइट

अत्रुप्त आत्मा
Mon, 03/25/2013 - 20:04 नवीन
माताय...काय चढलाय धागा ;) टाइट येकदम =))

अर्धवटराव, ऑब्जेक्टीव्ह उत्तरे द्या बघु !!!

अर्धवटराव
Tue, 03/26/2013 - 02:07 नवीन
१) दारु चांगली कि वाईट ? ऊ: वाईट. २) अच्छा... मग तुम्हाला दारु आवडते का? ऊ: हो :) ३) अरे... दारु वाईट असुनही तुम्ही आवडीने पिता ? ऊ: हो ४) सोत्री भाऊंच्या या गरमागरम उत्तम चर्चेबद्दल तुमचं काय मत? ऊ: चिअर्स माडी :) अर्धवटराव

अर्धवटराव रॉक्स!!

कवितानागेश
Tue, 03/26/2013 - 23:07 नवीन
अर्धवटराव रॉक्स!! :D या विशेष "रसायन"शास्त्राच्या पेप्रात बत्तेचाळीसातले फत्त्याहत्तर गुण मिळ्वून फैला लंबर. ;)
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

अर्धवटराव रॉक्स!!

अर्धवटराव
Wed, 03/27/2013 - 03:54 नवीन
ह्म्म्म... ऑन द रॉक्स होऊन जाउ दे या बाणिवर :) अर्धवटराव
↩ प्रतिसाद: कवितानागेश

=))

सोत्रि
Wed, 03/27/2013 - 07:52 नवीन
चुकून अर्धवटराव ऑन द रॉक्स असे वाचले Image removed. - (रसायनशास्त्रातला 'रॉक') सोकाजी
↩ प्रतिसाद: कवितानागेश

१) साखर चांगली कि वाईट ?

संपत
Sat, 03/30/2013 - 11:24 नवीन
१) साखर चांगली कि वाईट ? ऊ: वाईट. २) अच्छा... मग तुम्हाला साखर आवडते का? ऊ: हो smiley ३) अरे... साखर वाईट असुनही तुम्ही आवडीने खाता? ऊ: हो
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

आणि सोकाजीरावांच्या....

सर्वसाक्षी
Tue, 03/26/2013 - 16:36 नवीन
मिपावरील पहिल्या वहिल्या द्विशतकास केवळ पंचविस प्रतिसादांची प्रतिक्षा........................................ सोकाजीरावांना हार्दिक शुभेच्छा आणि आगाउ अभिनंदन.

दारू न पिणाऱ्या व्यक्तीचे

निनाद मुक्काम …
Wed, 03/27/2013 - 22:18 नवीन
दारू न पिणाऱ्या व्यक्तीचे ह्या धाग्यावर एकांगी मत म्हणजे नाण्याच्या एकाच बाजूचे चित्रण असल्याचे अप्रतिम उदाहरण म्हणजे सचिन तेंडूलकर चे दिले आहे , सचिन ने दारूच्या जाहिरात नाकारली अशी आपण बातमी वृत्त पत्रात वाचली . ही जाहिरात नाकारण्याचे कारण काय होते हे सुद्धा वृत्त पत्रात वाचले. आता वृत्त पत्रात एखाद्या सेलिब्रेटी च्या बातम्या त्यांनी नियुक्त केलेल्या पी आर कंपनीने दिल्या असतात , तेव्हा त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे , सचिन स्वतः मात्र व्यवस्थित दारू पितो. त्याला बकार्डी विथ कोक ह्या हाताने पाजले आहे, अगदी विजयाचा आनंद आपल्या सहकार्याच्या समवेत मदीरेत सैचेल अंघोळ करून साजरा करतो Image removed. , दारू पिण्याच्या शौकीन असलेल्या उच्चभ्रू लोकांसाठी संजय नारंग सोबत सचिन ह्या कुलाब्यातील आपल्या उपहारगृहात अव्वल दर्जाचा बार उभारतो , ज्याच्या सजावटीचे काम आमच्या एकेडेमी कडे नारंग साहेब देतात व कर्मचारी सुद्धा आमचे मित्रवर्य असतात म्हणून सांगतो , तेव्हा तात्पर्य एवढेच आहे की स्वतःच्या मेहनती वर विश्वास असणारे अनेक खेळाडू , नट , उद्योजक , व समाजातील प्रसिद्ध व्यक्ती मी नियमित पणे दारू चे सेवन करून आपल्या शेत्रात यशस्वी असणारे पहिले आहे. जेव्हा रशियात बेरोजगारी होती तेव्हा सर्व वैफल्य वोडका मध्ये रिते करणारी एक पिढी मी लंडन मध्ये येउन आपला उदर निर्वाह करतांना पहिली आहे , तर दररोज बियर पिणारा जर्मन किंवा वारुणी पिणारा फ्रेंच समाज कलासक्त जीवन जगत प्रगती पथावर असलेला पहिला आहे , प्रत्येक देशात दारूच्या अती सेवनाचे बळी आहेत , नियमितपणे संतुलित पणात दारू पियुन कलासक्त व नॉर्मल माणसांचे आयुष्य जगणारे सुद्धा ह्या जगात बहुसंख्य आहेत , दारू न पिणाऱ्या माणसांनी ह्या धाग्यावर दारूचे उदात्तीकरण नको अशी एक टेप लावली आहे , त्याचे येथे प्रयोजन मला अजिबात कळले नाही , कोण करत आहे दारूचे उदात्तीकरण. दारूचे उदात्तीकरण म्हणजे नक्की काय हे कोणी ठरवायचे , सोत्री असो किंवा मी संतुलित पणात दारू प्या असे कितीतरी वेळा लिहिले आहे मुळात गरीब माणूस हा आपल्या गरिबीवर तोडगा म्हणून दारूकडे पाहतो , तेव्हा त्यांच्या नाशाला गरिबी व समाजातील असमतोल विकास कारणीभूत आहे , दारू हे एक माध्यम आहे , पण ह्याच माध्यमांचा उपयोग संतुलित प्रमाणात करून आपले सर्वसाधारण आयुष्य उत्तमरीत्या व्यतीत करता येते हे स्वतःच्या व्यावसायिक मतानुसार सांगणे म्हणजे दारूचे उदात्तीकरण वाटत असेल तर त्यावर इलाज नाही , दारू बद्दल समाजात पूर्वग्रह व चुकीच्या समजुती आहेत , कालपरवा पर्यंत प्रेमभंग म्हणजे दारू असे समीकरण सेहेगेल , दिलीप कुमार , व शाहरुख ने समाजात रुजवले , आताच्या काळात मधुर भांडारकर चा नायक सिनेमात मदिरा पितो , नियमित पितो , पण करीनाला मी तुझ्या सारखा मूव ऑन आहे असे सांगून एक प्रेयसी आयुष्यातून गेली तर दुसरी येईल आयुष्य कशाला उध्वस्त करायचे ह्या विचारसरणीतून आपले यशस्वी आयुष्य जगतांना दाखवला आहे. थोडक्यात यश न पचवू शकलेले भगवान दादा सारखे किंवा आयुष्यातील वैफल्य दारूत बुडणाऱ्या मीना कुमारी सारखे उदाहरण मागच्या पिढीत होते , आजच्या पिढीतील मदिरेचे नियमित सेवन करून अपयशापासून यशाकडे झेप घेणारे अनेक अभिनेते मी डोळ्याने पहिले आहेत , तस्मात त्यांनी दारू हे आपल्या अपयशावर उत्तर न मानता चिकाटी व प्रयत्नाने यश संपादन केलेले दिसून येते , तस्मात दारू वाईट नाही वाईट आहे ती तुमची नकारात्मक मानसिकता हि मानसिकता समाजात निर्माण कशी होते , त्यावर उत्तर काय ह्यावर खरे तर संशोधन समाजशास्त्राच्या अभ्यासातून शोधले पाहिजे , उगाच दारूच्या नावाने शंख करून काय फायदा. ,

तेच ते..

उपास
Wed, 03/27/2013 - 22:59 नवीन
निनाद साहेब, नट नट्या काय करताहेत, इतकच काय 'सचिन' त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतो ह्यात कुणालाच रस नाही पण तो उदात्तीकरण करत नाही एवढे सगळ्यांनाच दिसते. आता उदात्तीकरण काय असे भोळसट प्रश्न विचारून टाळ्या मिळवायच्या असतिल तर तुमची मर्जी. तुमच्या व्यक्तिशः मतांबद्दल मला आदर असला तरी ह्या धाग्यावरचे कुणाचे प्रतिसाद एकतर्फी आहेत हे वाचणाराच समजेल. दारुमुळे होणारे नुकसान हा सामाजिक प्रश्न आहे आणि त्याविषयी आंतरजालाच्या खुल्या माध्यमात चर्चा होणारच, ही बेसमेंटमधल्या बार मधली चर्चा नाही, तुम्ही तिथून बाहेर आलात तरच दिसतील दारूचे दुष्परिणाम अर्थात डोळ्यावर कातडे ओढले तर ते ही दिसणार नाही, आणि हो, 'नकारात्मकता घालवणे' 'मानसिकता घडवणे' हे करायलाच हवे, प्रगत समाजात ते घडतेच (पण तिथेही दारु पिऊन सर्रास गाडी चालवता येत नाहीच, म्हणून कडक नियम करावे लागतात, तस्मात प्रमाणाबाहेर दारु ही वाईटच) पण ते होण्या आधी काही सामाजिक नियम घालून घ्यायला हवेत की नाही? मला असं वाटतय, की एक बाजू सामाजिक दुष्परिणाम समजवतेय दारुचे आणि दुसरी बाजू वैयक्तिक मुद्द्याच्या बाहेरच येत नाहीये. अवांतरः मूळ धाग्याचा उद्धेश आणि सोत्रिंची कळकळ आवडली त्यामुळे ह्या प्रतिसादात्मक अवंताराबद्दल क्षमस्व!

सचिन दारूचे उदात्तीकरण करत

निनाद मुक्काम …
गुरुवार, 03/28/2013 - 03:51 नवीन
सचिन दारूचे उदात्तीकरण करत नाही म्हणजे नक्की काय करत नाही , तो दारू पितो हे त्यांच्या बहुतेक चाहत्यांना माहिती आहे , बाळासाहेब ठाकरे ह्यांची निखिल वागले ह्यांनी मुलाखत घेतली व तुम्ही बियर पितात का असा काहीसा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी हो पितो व हायनिकन हा माझा आवडता ब्रंड आहे व मी माझ्या पैशाने पितो ,त्यात लपवण्यासारखे काय आहे , असे उत्तर दिले , आता तुम्ही म्हणाल ते सुद्धा दारूचे उदात्तीकरण करत आहेत , महाराष्ट्र तमाशाने बिघडला नाही आणि कीर्तनाने सुधारला नाही हे सुप्रसिद्ध वाक्य बहुदा तुम्हाला ठाऊक नसेल. उपास राव सामाजिक नियम करायला हवे , दारू ह्या विषयी लोकाना सर्वार्थाने साक्षर करावे लागेल. पण तिथेही दारु पिऊन सर्रास गाडी चालवता येत नाहीच, म्हणून कडक नियम करावे लागतात, तस्मात प्रमाणाबाहेर दारु ही वाईटच फार चांगला मुद्दा मांडला कडक नियम ह्या बाबतीत दोन्हीकडे आहेत ,मात्र त्यांची भारतात अंमलबजावणी होत नाही , दारू पियुन आपण पकडले गेलो तर पैसे देऊन सुटू ह्यांची शाश्वती असल्याने हे प्रकार घडतात . तेव्हा दारू वाईट का आपल्या लोकांची मानसिकता आणि अति दारू वाईट हे येथे तुम्ही वेगळे कशाला लिहायची गरज आहे तुम्ही आतापर्यंत येथे प्रतिसाद नीट वाचले तर तुमच्या लक्षात येईल प्रत्येक जण हेच म्हणत आला आहे , तुमच्या माहिती साठी सांगतो गोपीचंद ह्याने आरोग्याला हानिकारक म्हणून शीत पेयांच्या जाहिराती नाकारल्या त्या सचिन ने दाबून करून पैसा कमावला आता सचिन विषयी तुमचा आदर नक्कीच दुणावला असेल हो कि नाही , माफ करा तुमच्या अवांतर केलेल्या मुद्द्यावर अवांतर करण्याचा मोह आवरला नाही ,
↩ प्रतिसाद: उपास

बरं!

उपास
गुरुवार, 03/28/2013 - 05:59 नवीन
निनाद, अहो तुम्ही जे परत परत दाखले देताय ते वैयक्तिक आहेत, सामाजिक मुद्द्याला बगल देऊन प्रश्न सुटणार नाहीत. समाज प्रबोधन तिसर्‍या कुणीतरी येऊन करावं किंवा ते आपोआप व्हावं असं म्हणून काहीच होणार नाही, नुसत्या नियमांतून सुद्धा होत नाही, म्हणून दारुमुक्त गाव, दारुबंदी करावी लागते. शिवाय इथे चर्चेत दारूवरुन शीतपेयांवर घसरण्याची मुळातच गरज नाही, दोन्ही पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत हे तुम्हालाही माहित आहेच. बरं तर, शेवटी एकच सांगेन, 'दारु (पिण्या) मुळे मला इतकं यश मिळालं' असं सांगणारी एकही व्यक्ति भेटली नाहिये मला अजूनही, परंतु, मित्रांच्या संगतीत दारुच्या नादी लागून वाया गेला, तसेच मित्र दारुडे पण त्याने दारुला स्पर्शही न केल्याने घसरण्यापासून वाचला अशी उदाहारणे कितीतरी म्हणजे कितीतरी आहेत. तस्मात, दारु पिणे हा व्यासंग/ छंद/ आनंदाचा मर्ग असू शकेल पण तो मूठभर लोकांचा, बहुतेकांच्या वाट्याला समाजात दारुमुळे वैफल्यच आल्याच दिसतं. असो, माझे अनुभवविश्व खुज असल्याने असेल पण मला अशी दारुने गांजलेले संसारच दिसतात समोर! बरं झालं सचिनने 'अमुक व्होडका इज सिक्रेट ऑफ माय एनर्जी' नाही म्हटलं, भारतातली ( विशेषतः अडाणी) लोकं काय करुन बसली असती :)
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा