✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दारू - म्हणजे काय रे भाऊ ?

स
सोत्रि यांनी
Tue, 03/05/2013 - 22:25  ·  लेख
लेख
   दारू आणि दारू पिणारा यांच्याकडे समाजात एका वेगळ्याच नजरेने बघितले जाते. “अरे तो दारू पितो”, “बेवडा आहे पक्का साला”, “त्या दारूने त्याच्या संसाराची धूळधाण उडाली आहे”, “त्याच्याशी बोलून काही उपयोग नाही, तारेत असेल तो” असे आणि अशा प्रकारची मतं ऐकू येतात साधारणपणे. त्याचे कारण म्हणजे आपल्या समाजात (हा ‘समाज’ व्यापक अर्थाने आहे) दारू निषिद्ध मानली जाते. पण एकेकाळी रुढी-परंपरांचा आणि सामाजिक जीवनाचा भाग असलेली आणि सद्ध्या निषिद्ध समजली जाणारी ही दारू म्हणजे नेमके काय? हेच बहुतेकांना माहिती नसते. ऐकीव किंवा काही १-२ वाईट उदाहरणांवरून वेगेवेगळे मतप्रवाह बनलेली दारू म्हणजे नेमके काय? चला तर आज तेच बघूयात... कोणत्याही शर्करायुक्त धान्यातल्या अथवा फळ किंवा फुलातल्या शर्करेचे रूपांतर ईथाइल अल्कोहोल (C2H5OH) मध्ये करून त्यापासून तयार होणारे आणि झिंग आणणारे मादक पेय म्हणजे दारू अशी सरसकट व्याख्या करता येईल दारूची. त्यासाठी अतिरिक्त किंवा विपुल प्रमाणात शर्करा असलेले धान्य, फळ अथवा फूल हे महत्त्वाचे असते. अगदी साध्या आंबवणे ह्या नैसर्गिक प्रक्रियेचा वापर करून शर्करेचे रूपांतर अल्कोहोल मध्ये केले जाते. ह्या तयार झालेल्या अल्कोहोलयुक्त द्रवामध्ये मध्ये मूळ कच्च्या मालाचे वास, चव हे गुणधर्म आलेले असतात. त्यावर प्रकिया करून ते आणखीनं खुलवले जातात किंवा पूर्णपणे घालवून टाकले जातात. त्या त्या दारू प्रकारावर ते अवलंबून असते. आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये खनिजयुक्त पाण्याचे महत्त्व अनन्य साधारण असते. (आता ह्या सर्वावरून दारू ही शुद्ध शाकाहारी असते असे म्हणता येऊ शकेल  :) ) दारूच्या व्याख्येनंतर येतात दारू प्रकार. दारूचे ढोबळ मानाने, ती कशापासून बनली आहे आणि त्यातले अल्कोहोलचे प्रमाण किती ह्यावरून, दोन प्रकार पडतात. लिकर आणि लिक्युअर. लिकर म्हणजे धान्यापासून बनलेली आणि लिक्युअर म्हणजे फुला-फळांपासून बनलेली. लिकर म्हणजे जनरली जेवणापूर्वी घेण्याचा पेय प्रकार तर लिक्युअर म्हणजे जेवेणानंतर घेण्याचा प्रकार. लिकर हा जनरली पुरुषवर्गात लोकप्रिय असलेला प्रकार तर लिक्युअर म्हणजे महिलावर्गात लोकप्रिय असलेला प्रकार. (इथे कोणत्याही प्रकारचा वाद अपेक्षित नाही, स्त्री मुक्ती मोर्च्याने इथे दुर्लक्ष करावे). लिकर आणि लिक्युअरचे वेगवेगळे उपप्रकार पडतात ती कशापासून बनली आहे त्यावरून. व्हिस्की प्रामुख्याने बार्ली (सातू) ह्या धान्यापासून बनली जाणारी लिकर. जगातल्या वेगवेगळ्या भागात ती वेगवेगळ्या धान्यापासून बनली जाते. पण प्रामुख्याने, विख्यात असलेली व्हिस्की, स्कॉच व्हिस्की, स्कॉटलंडमध्ये बार्लीपासून बनवली जाते. अमेरिकन व्हिस्की, बर्बन, ही मक्यापासून बनवली जाते. कॅनेडियन व्हिस्की राय (Rye) ह्या धान्यापासून बनवली जाते. कॅरेबियन बेटांवर प्रामुख्याने बनणारी रम ही उसापासून बनते. जापनीज साके आणि शोचू तांदळापासून बनते. मेक्सिकन टकिला अगावे ह्या कंदापासून बनते. व्होडका बार्ली तसेच बटाटा यांपासून बनते. जीन ही शेतीजन्य पदार्थांपासून मिळवलेल्या अल्कोहोल मध्ये ज्युनिपर बेरी ह्या फळांचा स्वाद मुरवून बनवली जाते. लिक्युअर्स ह्या संत्री, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, सफरचंद, केळी अशा असंख्य फळापासून बनवल्या जातात. तसेच काही वनस्पती, कंदमुळे, झाडांच्या साली, गवत अश्या वेगवेगळ्या घटकांच्या मिश्रणातून बनवल्या जातात. त्या चवीला त्यामुळे गोड असतात. भारतात बनणारी दारू ही अस्सल दारू नसते. साखरेच्या मळीपासून मिळणार्‍या अल्कोहोल मध्ये वेगेवेगळे स्वाद आणि कृत्रिम रंग मिसळवून भारतीय बनावटीची, पण विदेशी फॉर्म्युल्याची दारू तयार होते. ह्यात कास्क (लाकडी ड्रम्स) मध्ये अमुक एक वर्ष मुरवणे वगैरे असला शास्त्रोक्तपणा नसतो. इंडीअन मेड फॉरिन लिकर (IMFL) हा एक उच्चभ्रू आणि महागडा दारू प्रकार भारतात मोठ्या हॉटेलांमध्ये सर्व्ह केला जातो. प्रख्यात विदेशी ब्रॅन्ड्सच्या दारवांचे (प्रामुख्याने व्हिस्की आणि रम) भारतात उत्पादन केले जाते. बॉटल्ड दारू आयात केली की ती उत्पादित वस्तू असल्याने तिच्यावर साधारण १००-१५०% आयात कर भरावा लागतो. त्यामुळे जर बॉटल्ड न केलेली दारू आयात केली तर तो कच्चा माल बनून त्यावरील ड्यूटी कमी होते. मग ह्या आयात केलेल्या दारूला साखरेच्या मळीपासून मिळणार्‍या अल्कोहोलपासून बनलेल्या दारूमध्ये ब्लेंड करून त्या दारूची चव वाढवली जाते आणि मूळ विदेशी चवीशी मिळतीजुळती चव आणली जाते. ह्याउलट हातभट्टीची दारू असते. मूलभूत शास्त्रीय प्रकिया एकच पण बनविण्याची पद्धत एकदम अशास्त्रीय. अस्वच्छ पाणी, नवसागर आणि ती स्ट्रॉंग करण्यासाठी त्यात मिसळलेली वेगवेगळी घाणेरडी रासायनिक द्रव्ये ह्यांमुळे ती दारू, एक मादक पेय न राहता विषारी द्रव्य बनते माणूस तिच्या आहारी जाऊन ती त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरते. ही असली दारू भयंकर स्वस्त असते कारण बनविण्याची पद्धत एकदम अशास्त्रीय असल्याने उत्पादन खर्च कमी असतो. ह्या दारूचे मुख्य उद्दिष्ट झटकन ‘जोरदार किक’ देणे एवढाच असतो त्यामुळे कच्चा माल दर्जाहीन असला तरीही काहीही फरक पडत नाही; कारण इथे चवीचे कुणाला पडलेलेच नसते. डोळे मिटून ‘भर गिलास कर खलास’ असे करून असलेल्या विवंचना घटकाभर विसरून जाणे हाच मुख्य उद्देश असल्याने ‘स्वस्तात मस्त’ असलेला हा माल फार खपतो. ह्या प्रकारच्या दारूमुळेच, दारू वाईट असा सरसकट समज झाला आहे. ह्या हातभट्टीच्या दारूपेक्षा अजून एक जरा बरा प्रकार म्हणजे देशी दारू किंवा सरकार मान्य दारू. हातभट्टीच्या दारूमध्ये वापरल्या जाणार्‍या घातक पदार्थांवर आळा बसावा म्हणून सरकारने दारू बनविण्याची पद्धत आणि त्यासाठी वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालाची मानके ठरवून दिलेली आहेत. त्यानुसार बनणारी ही देशी दारू, सरकारमान्य, हा जरी थोडाबहुत चांगला प्रकार असला तरीही स्वस्त असणे ही तिचीही महत्त्वाची गरज असल्याने ती ही दर्जाहीनच असतो. आता दारू म्हणजे काय ते कळले पण दारू प्यायल्यावर नेमके होते काय? खरं म्हणाल तर खूपच गंमत होते, दोन्ही अर्थाने. जेवढी दारू प्यायली जाते त्यातली २०% पोटात शोषली जाते आणि ८०% लहान आतड्यांमध्ये शोषली जाते आणि त्यातले अल्कोहोल रक्तात मिसळून रक्ताभिरण प्रक्रियेद्वारे शरीरभर पसरले जाते. हे प्रमाण वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. जेवल्यानंतर दारू प्यायली असता शरीरात दारूतले अल्कोहोल शोषले जाण्याचा वेग कमी असतो कारण पोट भरलेले असल्याने आतडी त्यांच्या कामाला लागलेली असतात. त्यामुळे अल्कोहोल रक्तात मिसळून शरीरभर पसरायला वेळ लागतो. एकदा का ते रक्ताभिरण प्रक्रियेद्वारे शरीरभर पसरायला लागले की ते मेंदूपर्यंत पोहोचते आणि गंमत व्हायला सुरुवात होते. ते मेंदूतल्या विविध भागांवर अंमल बजावायला सुरुवात करते. सेंट्रल नर्व्हस सिस्टिम हळूहळू अल्कोहोल च्या ताब्यात जाऊन मेंदूचे काम करणे मंदावते आणि मेंदूचे संदेश शरीरभर पोहोचवण्याचे काम करणार्‍या न्युरोट्रान्समीटर्सवर परिणाम होऊन प्रतिक्षिप्त क्रिया मंदावतात आणि शरीराच्या हालचाली मंदावतात. त्याने एक सहजावस्था प्राप्त होते. मेंदूच्या विविध भागांचे काम करणे मंदावले गेल्याने आणि आलेल्या सहजावस्थेमुळे एक वेगळ्याच कैफाची अनुभूती येते. अर्थात हे सर्व दारू किती प्यायले गेली आहे त्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. अती तिथे माती ह्या उक्तीने खूपच जास्त प्रमाणात जर दारू प्यायली गेली तर सहजावस्था ही सहजावस्था न राहता पूर्ण ‘ब्लॅक आऊट’ अशी अवस्था होऊ शकते. ही दारू पचविण्याची शक्ती माणसामाणसावर अवलंबून असते. ३० मिली दारू शरीरात शोषली जाण्यास साधारणपणे एक तास लागतो. शरीरात पसरत जाणारे हे अल्कोहोल हे शरीरासाठी एक अ‍ॅन्टीबॉडीच असते त्यामुळे यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे ते अल्कोहोल शरीराबाहेर टाकण्याचे काम चालू करतात. आता म्हणाल, फुप्फुसे तर श्वसनाच्या कामात असतात आणि दारू तर तोंडावाटे प्यायली जाते, मग इथे फुप्फुसांचा काय उपयोग? तर त्या अल्कोहोलचे विघटन शरीरात वेगेवेगळ्या प्रकाराने केले जाते त्यात त्याचे वाफ ह्या प्रकारातही विघटन होते आणि ती वाफ फुप्फुसांच्या मार्फत बाहेर टाकली जाते. त्यामुळेच पोलीस Breath Analyzer वापरून टेस्ट घेताना त्या गनमध्ये श्वास सोडायला सांगतात आणि त्या श्वासातल्या अल्कोहोलच्या प्रमाणावरून दारू प्यायली आहे की नाही ते कळते. तर दारूमार्गे अल्कोहोल शरीरात सारण्याचा वेग हा जर शरीराच्या विघटन करण्याच्या वेगापेक्षा जास्त झाला तर माणसाची अवस्था बिकट होते. आपल्या यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे यांची काम करण्याची एक क्षमता असते. त्या क्षमतेपेक्षा जास्त काम त्यांना दिले तर काय होईल? तुम्हाला तुमच्या बॉसने प्रमाणापेक्षा जास्त काम दिले तर काय होते? तुमच्या रागाचा पारा चढून तो कुठल्यातरी मार्गे बाहेर पडण्याचा प्रयत्न होतो की नाही? तसेच नेमके ही यकृत, मूत्रपिंड आणि फुप्फुसे करतात आणि उलटीच्या मार्गे अतिरिक्त अल्कोहोल शरीराबाहेर टाकले जाते आणि दारू पिणार्‍याचा ‘वकार युनुस’ होतो. त्यामुळे दारू पिताना तारतम्य बाळगून प्यायल्यास त्यातली मजा अनुभवता येते, नापेक्षा दारू म्हणजे वाईट असा मतप्रवाह बळावण्यास मदत होते. तर आता दारू म्हणजे काय ते कळले का रे भाऊ?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
संदर्भ

प्रतिक्रिया द्या
80984 वाचन

💬 प्रतिसाद (250)

प्रतिक्रिया

+१

उपास
Wed, 03/27/2013 - 18:45 नवीन
खरं आहे विमे. मागे एका धाग्यावर (मला वाटतं गांधी आणि मल्ल्या) असाच वाद झाला होता, तात्या सरपंच होता तेव्हाची गोष्ट. दारुचं विनाकारण उदात्तीकरण चालू होतं. तेव्हा ते खटकलंच आणि आताही. दोन टोकांवर बसून वाद घालायचा असेल तर दोन्ही बाजूंनी विदे काढता येतील, पण शेवटी ह्या वादात हशील काय ते महत्त्वाचं. असो तर आपल्याला, भारताच्या चौकटीत विचार करायची सवय त्यामुळे हातभट्टी च्या दारुने मेल्यामुळे देशोधडीला लागलेली कुटूंब, दारुच्या आहारी जाऊन त्यातून आलेला कफल्लकपणा, अख्ख्या कुटूंबाची वाताहात हे सगळं जवळून बघतोय, वर्षानुवर्ष. सुरुवात बापाच्या पैशाने चांगल्या प्रकारच्या दारुवर आणि मग दारूच्या आहारी जाऊन घरादाराची विल्हेवाट इतकी की कुटुंब रस्त्यावर यावं अशी माझ्या पहाणीत ७-८ मराठी (सो कॉल्ड उच्चवर्णीय) कुटुंब आहेत (सॉरी विदा मागू नये!)सध्या कोकणात हे प्रमाण अगदी अंगावर येईल असं आहे. मोलमजुरी करुन (नशापाणी करुन नवहे) घरासाठी पैसे कमवणे, मुलांना शिकवणे अशी काम स्त्री करतेय आणि नवरा नुसता बेवडा मारुन राहतो हे दृश्य नवीन आहे का? प्रसंगी अशा कुटुंबाच्या पोशिंदा बायका बेवड्या नवर्याच्याही कानाखाली मारायला कमी करत नाहीत, ही खरी स्त्री मुक्ती. हे चित्र आपल्या भारतिय समाजात आजही आहे हे आपण मान्यच करणार नसू तर आपण समाजसुधारणेच्या बाता मारणं सोडून द्यायला हवं. दारु चांगली की वाईट ही व्यक्तिसापेक्ष आहेच पण समाजसापेक्षही आहे हे कधी कळणार आपल्याला? भारता संदर्भात विचार केला तर दारूचं आणि ती पिण्याच उदात्तीकरण होऊ नये असं कळकळीने वाटतं आणि म्हणूनच सचिन जेव्हा मद्याच्या जाहिराती नाकारतो तेव्हा सचिनविषयीचा अभिमान निश्चितच दुणावतो. असो!
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

मद्यपान आणि स्त्रिया

सुबोध खरे
Fri, 03/08/2013 - 23:39 नवीन
काही महत्त्वाच्या लिंक्स खाली देत आहे जरूर वाचाव्या. संस्कृती (वा स्वैराचार) हा शब्द महत्त्वाचा आहे अतिविकसित(sophisticated )जगातील स्थिती वेगळी आहे http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-08-07/india/33081997_1_alcohol-consumption-assam-drinkers http://www.sciencedaily.com/releases/2009/02/090224163555.htm http://www.cdc.gov/alcohol/fact-sheets/womens-health.htm
↩ प्रतिसाद: सोत्रि

सर्व लिंक्स वाचल्या. पण माझा

सोत्रि
Sat, 03/09/2013 - 00:44 नवीन
सर्व लिंक्स वाचल्या. पण माझा मूळ प्रश्न खालच्या वाक्यातल्या बोल्ड केलेल्या मतावर होता.
सर्व साधारणपणे जगभर कोणत्याही संस्कृतीत स्त्रिया मद्य पान क्वचित/ कमी प्रमाणात करतात.
त्याचे उत्तर त्य लिंक्स मध्ये मिळाले नाही. त्यात अल्कोहोल स्त्रियांसाठी शारिरीकदृष्ट्या कसे हितकारक नाही हे आहे. - (शंकेखोर) सोकाजी
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

लिंक्स

सुबोध खरे
Sat, 03/09/2013 - 13:10 नवीन
पहिली लिंक (TIMES OF INDIA ची) भारतातील विविध राज्यातील मद्यप्राशनाची आकडेवारी आहे. खालील आकडेवारी जगभरातील आहे http://www.who.int/substance_abuse/publications/globalstatusreportalcohol2004_drinkpatterns.pdf http://www.greenfacts.org/en/alcohol/figtableboxes/table6.htm
↩ प्रतिसाद: सोत्रि

धन्यवाद!

सोत्रि
Sat, 03/09/2013 - 15:15 नवीन
ग्रीनफॅक्ट्स च्या दुव्याबद्दल धन्यवाद! टक्कट्वारीचे प्रमाण त्या त्या देशातील सामाजिक परिस्थिती आणि वैचारिक भूमिकेशी समरुप आहे -(आभारी) सोकाजी
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बापरे...

सोत्रि
Sat, 03/09/2013 - 00:47 नवीन
ही संस्कृती वा स्वैराचार ह्याची व्याख्या कोण आणि कशी ठरवते? - (शंकेखोर) सोकाजी
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सोप्पं आहे

प्रसाद गोडबोले
Mon, 03/11/2013 - 20:35 नवीन
संस्कृती वा स्वैराचार ह्याची व्याख्या कोण आणि कशी ठरवते? >> जास्तीची मेजॉरीटी ....
↩ प्रतिसाद: सोत्रि

?

सोत्रि
Fri, 03/08/2013 - 20:28 नवीन
सर्व साधारणपणे जगभर कोणत्याही संस्कृतीत स्त्रिया मद्य पान क्वचित/ कमी प्रमाणात करतात.
ह्यावर काही माहिती असल्यास वाचायला आवडेल. - (अभ्यासू)सोकाजी
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

http://indiatoday.intoday.in/story/drink-dependence-up-in-urban-

पैसा
Fri, 03/08/2013 - 20:34 नवीन
According to a 2009 article in journal The Lancet, Indians, officially, are still among the world's lowest consumers of alcohol - government statistics show only 21 percent of adult men and around two percent of women drink. But up to a fifth of this group - about 14 million people - are dependent drinkers requiring "help". Read more at: http://indiatoday.intoday.in/story/drink-dependence-up-in-urban-indian-women/1/235418.html
↩ प्रतिसाद: सोत्रि

अहं

सोत्रि
Fri, 03/08/2013 - 21:00 नवीन
हे नव्हे, सुबोध खरे जे म्हणाले त्यावर विदा हवा असे म्हणालो मी. लिंकमधला लेख त्यांच्या म्हणण्याच्या अगदी उलट आहे. -(अभ्यासू) सोकाजी
↩ प्रतिसाद: पैसा

प्रतिसाद

सुबोध खरे
Sat, 03/09/2013 - 00:03 नवीन
साहेब आपल्याला द्यायचा प्रतिसाद चुकून दादासाहेबांच्या ( दादा कोंडके) ना दिला गेला.तेथे तो वाचावा द्विरुक्ती टाळण्यासाठी परत देत नाही क्षमस्व
↩ प्रतिसाद: सोत्रि

डाक्टरकी.

आनंदी गोपाळ
Sun, 03/31/2013 - 21:08 नवीन
सर, मिल्ट्रीमधे दारू स्वस्तात मिळते. रिटायर झालेल्या मिल्ट्रीम्याणला देखिल दारू गावोगावी 'कँटीन' नेऊन स्वस्तात दिली जाते. मेडीकल वा इंजिनिअरिंग कोअर मधे 'नसलेल्या' लोकांना दारू प्यायची गरज नसणे, किंबहुना त्यांनी न पिणे अपेक्षित असते. मला जरा समजवून सांगता का, की काय म्हणून सैनिकांना दारू 'पाजली' जाते?
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सोकाजीचा अभ्यास

पैसा
Fri, 03/08/2013 - 20:22 नवीन
सोकाजीचा या विषयाचा अभ्यास पुरा आहे आणि डॉक्टर खरे यांचे प्रतिसाद तर नेहमीप्रमाणेच आवडले!

सहजावस्था ....

चौकटराजा
Fri, 03/08/2013 - 21:37 नवीन
प्रतिसादात तब्बल तिघांचे प्रतिसाद डबल आलेले आहेत.बहुदा ही सहजावस्था असावी. की ड्रुपलने घेतली एक पेग ? असो. कोणत्याही कारबोयड्रेटच्या द्रावात यीस्ट मिसळले की घरीही दारू तयार करता येते. ही माहिती बरोबर आहे का ?

घरीही दारू तयार करता येते.

सुबोध खरे
Sat, 03/09/2013 - 19:23 नवीन
http://www.wikihow.com/Make-Alcohol-from-Common-Table-Sugar http://en.wikipedia.org/wiki/Yeast_in_winemaking
↩ प्रतिसाद: चौकटराजा

इतक्या लिंकाची काय गरज कुणा

श्री गावसेना प्रमुख
Sun, 03/10/2013 - 09:19 नवीन
इतक्या लिंकाची काय गरज कुणा आदिवासीला विचारा ,एका रात्रीत झिंगालाला तयार
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ही घ्या मागे एका धाग्यावर दिलेली.

इरसाल
Sun, 03/10/2013 - 13:28 नवीन
कोणीही हा प्रकार घरी /बाहेर्/ऑफिसमधे करण्याचा प्रयत्न करु नये. केल्यास प्रतिसाद लेखक त्यास जबाबदार नाही. साहित्य : मद्रास गुळ्/काळा गुळ ( ह्यालाच गोटा असेही नाव आहे साधारण गुळापेक्षा हा अधिक गोड असतो), मोहाची सुकवलेली फुले, नवसागर वडी (अमोनियम क्लोराइड ), पाणी, १५ किलो तेलाचे रिकामे डबे, चाटु, २५/३० लिटर कपॅसिटीचे अल्युमिनियम्चे पातेले, जुना टॉवेल्/धोतर, कापसाची लांब वात, बियरची रिकामी बाटली, चुल, लाकुड-फाटा, ५ लिटर प्लास्टिक कॅन. कृती : सुरुवातीला पहिला १५ लिटर कपॅसिटीचा तेलाचा रिकामा डबा घेवुन त्याला निरमाने स्वच्छ धुवुन घ्यावा. त्यात अन्दाजे ४/५ किलो मद्रास गुळ, १५० ग्रॅम सुकलेली मोहाची फुले, एक नवसागर वडी (२५० ग्रॅम) टाकुन तो पाण्याने १३/१४ लिटर पर्यंत भरुन त्याचे तोंड हवाबंद करावे. आता हा डबा उबदार जागी कमीत कमी ९/१० तास ठेवुन द्यावा. ९/१० तासाने आतले मिश्रण आंबुन डबा पुर्ण भरला जाइल व त्यास आंबुस वास यायला लागेल. आता हे मिश्रण दारु बनविण्यास तयार आहे. दुसरा १५ लिटर कपॅसिटीचा तेलाचा रिकामा डबा घेवुन त्याला निरमाने स्वच्छ धुवुन घ्यावा. ह्या डब्याचा वरचा पत्रा पुर्णपणे काढलेला असावा. हा डबा बाहेरुन मातीचा लेप देवुन पेटवलेल्या चुलीवरच्या रसरशीत जाळावर ठेवावा. त्यात ते आंबवलेले मिश्रण १/३ भरावे.तसेच डब्याच्या वरच्या एका बाजुस गोल छिद्र पाडुन त्यात चाटु अडकवावा. चाटु हा साधारणपणे टेबल्टेनिसच्या बॅट प्रमाणे दिसतो. त्याची एक बाजु व मुठ ही खोलगट असते. तर चाटु हा पसरट भाग मधे व दांडा बाहेर तसेच खोलगट भाग वरच्या बाजुस ह्याप्रमाणे डब्यास लावावा. या नंतर डब्यावर अ‍ॅल्युमिनियमचे पातेले पाण्याने पुर्ण भरुन ठेवावे.तसेच जुना टॉवेल्/धोतर हे ओले करुन पातेले व डब्याचा मधे पातेल्याला रिंग सारखे अडकवावे. डब्यातील वाफ निसटु नये म्हणुन. कापसाची लांब वात ही चाटुच्या बाहेर असलेल्या दांड्यात अर्धी आत अर्धी बाहेर अशी अडकवावी म्हणजे बाहेर पडणारा द्रव का नीट धारेने पडेल. त्या वाती खाली बियरची रिकामी बाटली ठेवावी. चुलीचा जाळ/धग हा/ही व्यवस्थित मेंटेन करावा/करावी.जास्त जाळ बाहेर पडणार्‍या द्रवाला गढुळ करतो, तर कमी जाळ उत्पादकतेवर परिणाम. अशाप्रकारे आतील द्रावण उकळु लागल्यावर ते वाफेत परिवर्तीत होते, ती वाफ वर पाणी असलेल्या पातेल्याला जावुन लागल्याने थंड होउन चाटुवर थेंबथेंबाने पडते व चाटुमार्गेच बाहेर वात धरुन पडते. ती धार बाटलीमधे अ‍ॅडजस्ट करावी. वरच्या पातेलीतील पाण्यावर लक्ष असु द्यावे ते गरम झाल्यास त्वरीत बदलावे. बाहेर पडणारी धार एकदम कमी झाल्यास डब्यातील द्रावण बदलायची वेळ झाली असे समजुन द्रावण बदलावे. बाटली भरली की ५ लिटर कॅनमधे रिकामी करावी. अन्यथा आग लागण्याचा धोका संभवतो. बाटलीमधे पडणारी धार म्हणजेच .............पहिल्या धारेची...........
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

काही चौकशी...

चौकटराजा
Sun, 03/10/2013 - 16:20 नवीन
मद्रास गूळ ऐवजी तामिळनाडू गूळ चालेल का ? पाणी बिस्लेरीचे की साधे नळाचे ? पंधरा किलो वजनाचे तेलाचे रिकामे डबे की पंधरा किलो क्याप्यासिटी असलेले तेलाचे रिकामे डबे?? आल्युमिनियम च्या पातेल्या ऐवजी तांब्याचे पातेले चालेल का ? जुन्या टावेला ऐवजी नवा टावेल चालेल का ? किंवा नवी धोतर जोडीच आणली तर ? बिअरची मागेच रिकमी केलेली बाटली हवी की भरलेली जाग्यावरच रिकामी ( इथे स्मायली ) करून वापरायची ? काय आहे रेसीपीची पहिलीच वेळ आहे म्हून शान इचारले !
↩ प्रतिसाद: इरसाल

ही गावठी दारु बनवण्याची

धन्या
Mon, 03/11/2013 - 23:57 नवीन
ही गावठी दारु बनवण्याची स्टँडर्ड पद्धत आहे. :) आता हा प्रकार बर्‍यापैकी बंद झाला आहे. परंतू काही वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यामधील काही गावांचा जोडधंदा असायचा. काही सुशिक्षितांची घरं सोडली तर जवळपास प्रत्येक घरातील माणसं यापद्धतीने दारु बनवत असत.
↩ प्रतिसाद: इरसाल

छे ह्या पेक्षा, दोन दिवस शिळं

५० फक्त
Tue, 03/12/2013 - 00:38 नवीन
छे ह्या पेक्षा, दोन दिवस शिळं ताक घ्या, त्यात एक कांदा फोडुन टाका, किचन कट्ट्याखाली अंधारात दोन तास ठेवा, मग काढुन त्यात स्वच्छ आरगॅनिक गुळ घाळा, गुळ विरघळला की मग नंतर पुन्हा दोन तास अंधारात ठेवा, मग बाहेर काढा अन नाक बंद करुन वास न घेता पिउन बघा, नाय दोन घोटात चढली तर विचारा.
↩ प्रतिसाद: धन्या

;)

सोत्रि
Tue, 03/12/2013 - 21:39 नवीन
आहे की नै गंमत. दारू न पिणार्‍यांनी आधि असली काहीतरी माहिती द्यायची आणि मग तसले काही पिऊन कोणी लोळला की मग लगेच दारूला दूषणे द्यायला आपणच चौकात यायचे आणि दारूला बदनाम करायचे. ये ना चॉलबे! ;) - (शिस्तीत चांगली दारु पिणारा) सोकाजी
↩ प्रतिसाद: ५० फक्त

सोकाजीराव चांगली दारु कशी

श्री गावसेना प्रमुख
Wed, 03/13/2013 - 09:07 नवीन
सोकाजीराव चांगली दारु कशी असते हो, जरा आम्हाला पण सांगा ना भट्टी टाकावी म्हणतोय
↩ प्रतिसाद: सोत्रि

लो कल्लो बात..

दादा कोंडके
Fri, 03/15/2013 - 14:56 नवीन
सोकाजीराव चांगली दारु कशी असते हो, जरा आम्हाला पण सांगा ना
सोकाजीराव जी दारू पितात ती चांगली बाकिच्या वाइट्ट. बोलेतो, त्यांचा 'पेग' आणि आमची 'पावशेर' ;)
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

सोकाजीराव जी दारू पितात ती

श्री गावसेना प्रमुख
Fri, 03/15/2013 - 17:37 नवीन
सोकाजीराव जी दारू पितात ती चांगली बाकिच्या वाइट्ट
अच्छा म्हणजे जगातील दारु कंपन्या सोकाजीरावांना चव चाखायला बोलावीतात काय?
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

तुम्ही भट्टी टाका, आम्ही येऊन

सोत्रि
Fri, 03/15/2013 - 17:41 नवीन
तुम्ही भट्टी टाका, आम्ही येऊन टेस्ट करुन सांगू चांगली की वाइट ते ;) - (जीम मरेचा एकलव्य छाप शिष्य) सोकाजी
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

:)

रुस्तम
गुरुवार, 03/21/2013 - 08:21 नवीन
:)
↩ प्रतिसाद: सोत्रि

अथ इती

चिंतामणी
Fri, 03/08/2013 - 23:59 नवीन
दारवा पुराणेशु ..................... अध्याय समाप्तं. (सर्वांनी तीर्थ - प्रसाद घेउन जाणे)

............................

अत्रुप्त आत्मा
Sat, 03/09/2013 - 13:42 नवीन
............................Image removed. (सर्वांनी तीर्थ - प्रसाद घेउन जाणे)>>>Image removed. मेलो...मेलो...!!! आंम्हाला धर्म-काहिजणांना मद्यासारखा चढतो हे माहित होते,परंतू मद्य धर्मासारखे चढलेले पाहून जाम मज्जा वाटली... Image removed.
↩ प्रतिसाद: चिंतामणी

येग्झॅटली!

कवितानागेश
Sun, 03/10/2013 - 12:45 नवीन
येग्झॅटली! हेपण बघा हो लोक्स. :) http://www.satyamevjayate.in/issue09/
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सोत्री लेख आवडला

jaypal
Sat, 03/09/2013 - 10:56 नवीन
पेठकर काका आणि डॉ.खरे यांचे प्रतीसाद देखिल आवडले. केवळ दारु पुरत म्हणुन नाही तर, कोणत्याही गोष्टीचा अतीरेक हा वाईटच.

मस्त.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 03/10/2013 - 11:07 नवीन
सोकाजीनानाचा लेख माहितीपूर्ण आहेच. प्रतिसादही तितकेच माहितीपूर्ण. धन्स दोस्तहो. -दिलीप बिरुटे

सल्ला हवाय

तुमचा अभिषेक
Sun, 03/10/2013 - 13:52 नवीन
ऑफिसच्या या ना त्या प्रोजेक्टच्या निमित्ताने वरचेवर पार्ट्या होत राहतात. पिणार्‍यांची चंगळ होते कारण फुकटचे खाणेपिणे. पण मी मात्र पित नाही. त्यामुळे पुरेपूर पार्टी वसूल होत नाही असे वाटते. मग सॉफ्ट ड्रींकच्या ऐवजी एखादे महागडे मॉकटेल मागवतो. पण तरीही पिणार्‍यांच्या ग्रूपमध्ये ऑड मॅन असल्यासारखे वाटत राहते. तर एखादे असे ड्रींक सुचवा, जे जास्त चढणार नाही, ना त्याचे व्यसन लागेल. तरीही चारचौघांबरोबर प्यायल्याचे समाधान मिळेल. अर्थात बरोबरचे सुचवतात, मात्र त्यांच्यावर तेव्हा विश्वास ठेवावासा वाटत नाही, खास करून त्यांची फुकटची मिळतेय तर हवी तेवढी ढोसल्यानंतरची हालत पाहिल्यावर.. अवांतर - कसला रे तू सिविल ईंजिनीअर.. दारू न पिणारा .. असा टोमणा गेले काही वर्षे ऐकतोय.. :(

. दारू न पिणारा

सुबोध खरे
Sun, 03/10/2013 - 21:03 नवीन
अभिषेक साहेब माझा आपल्याला एक सल्ला किंवा विनंती आहे कि आपण दारू मजा करण्यासाठी किंवा प्यावीशी वाटत असेल तर प्या केवळ फुकट मिळते म्हणून नको.कारण फुकट दारू मिळते म्हणून पिणार्यांची ख्याती लवकर पसरते.मी स्वतः २३ वर्षे लष्करात राहून सुद्धा दारू पीत नाही.नौदलात सगळ्या बड्या पार्ट्यांमध्ये स्कॉच मिळते जॉनी वॉकर, शिवास रिगल वगैरे पण तरीही मला असा मोह कधीही झाला नाही. पण त्यामुळे माझी ख्याती एक सरळ माणूस म्हणून होती. ( मूर्ख म्हणून सुद्धा असेल) पण तरीही बर्याच लोकानी मला कधी गृहीत धरले नाही(TAKEN FOR GRANTED). आणी त्यांची बरोबरी करण्यासाठी महागडे कॉकटेल तर नक्कीच नको कारण तुम्ही वसुली करीत आहात हे लोकांना सहज लक्षात येते. शेवटी तुमची कीर्ती काय राहते ते तुम्हाला आज जाणवत नाही पण काही वर्षांनी नक्कीच जाणवते.आज माझ्या दारू पिणाऱ्या मित्रांमध्ये माझे एक विशिष्ट स्थान नक्कीच आहे आणि हिंदी भाषेत म्हटल्याप्रमाणे आप खुदकी नजरोमे गिर जाते हो.
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक

मस्करीत लिहिली होती हो वरची

तुमचा अभिषेक
Sun, 03/10/2013 - 21:28 नवीन
मस्करीत लिहिली होती हो वरची पोस्ट.. ऑर्कुट समूहावर टाईमपास म्हणून धागा काढला तीच पोस्ट इथे चिपकवली.. बाकी गेले वर्षभर पोटाच्या आजारापायी मी साधे सॉफ्ट ड्रींक (पेप्सी किंवा कोक) जे मी एकेकाळी पाण्यासारखे प्यायचो, ते देखील पूर्णतः बंद केले आहे. आणखी एक म्हणजे, कॉलेजच्या दिवसांत बीअर आणि व्हिस्की या दोन मद्यप्रकारांची चव घेऊन झाली आहे. आवडली नाही, ना पुन्हा प्यायची इच्छा झाली. त्यामुळे भविष्यात पिण्याचा चान्सही नाहीच आहे तसा.. अवांतर - अश्या प्रत्येक पार्टीच्या आधी माझी बायको मला कोणाच्या आग्रहात येऊन चुकूनही पिऊ नकोस अशी ताकीदभरी शपथ घालूनच पाठवते.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

खूप छान , मना पासून कौतुक कि

घन्चकर
Wed, 03/27/2013 - 18:21 नवीन
खूप छान , मना पासून कौतुक कि आपण बायको चे आय्क्ता तिचा भावने चा मान ठेवता कारण किती विश्वास ने ती तुम्हाला सांगत असेल आणिक जेवा तुम्ही त्य्वार खरे उतरतात तेवा तिचा मना ला खूप आनंद होत असेल. आणि हो हे कुठे लिहले नाही आहे sotware engineer चा syllabus मध्ये किवा इतर कुठ्लाय पाठ्यक्रम मध्ये कि दारू पिणे आवश्यक आहे. मला सुधा अशी बरेच लोको माहित आहे जे या क्षेत्रात मोठा पदावर असून पीत नाही आणिक ते सुखी संसार करून सगड्या जवाबदार व्यवस्थित पेलतात. तुमचा सारखे सागडे नवरे ना ला कडो हीच अपेक्षा :) तर संसार ची गाडी व्यवस्थित चालेल निदान या दारू मुडे त्यात अडचण येणार नाही बरे ना :)
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक

अगदी खरे

घन्चकर
Wed, 03/27/2013 - 18:02 नवीन
अगदी खरे आहे तुमचे हे वाक्य 'शेवटी तुमची कीर्ती काय राहते ते तुम्हाला आज जाणवत नाही पण काही वर्षांनी नक्कीच जाणवते.आज माझ्या दारू पिणाऱ्या मित्रांमध्ये माझे एक विशिष्ट स्थान नक्कीच आहे आणि हिंदी भाषेत म्हटल्याप्रमाणे आप खुदकी नजरोमे गिर जाते हो. आणिक तुमचे खूप अभिनंदन, तुम्ही इतके वर्ष लष्कर मध्ये राहून सुधा या पासून दूर आहात,कारण हल्ली ची मुलं कंपनी चे कामा pressure मुढे प्यावेय लागते असली फुकट कारणे देतात.शेवटी दारू व्यसन कुठलाय परिस्थितीत नुकसान देः आणिक हि पड्वात नसावी एखादा त्रास किवा प्रेस्सुरे मधून बाहेर पडणा साठी
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

वेंजॉय माडी

पैसा
Sun, 03/10/2013 - 16:03 नवीन

लेख माहितीपुर्ण आणि डॉ. ख

५० फक्त
Mon, 03/11/2013 - 23:16 नवीन
लेख माहितीपुर्ण आणि डॉ. ख-यांचे प्रतिसाद अगदी उत्तम, माझ्या ब-याच मतांना बळकटी देणारे, खरोखर धन्यवाद खरे सर. काही प्रतिसाद वाचुन मात्र एखाद्या बारमध्ये बसल्यासारखं वाटलं, अगदी ' बोल,बोल मी म्ह्णंतो ते साप बरोबर है ना, बोल बोल, दाखव दाखव कुठाय तो क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष . असो, मी दारु पिणा-यांकडे लाईव्ह करमणुक या भावनेतुन पाहतो, आणि हो ब-याच वेळा माझ्या बददलची खरी मतं कळतात, सुधारणेला वाव मिळतो हे का कमी आहे.

अगदी

अभ्या..
Tue, 03/12/2013 - 01:08 नवीन
मी दारु पिणा-यांकडे लाईव्ह करमणुक या भावनेतुन पाहतो
मी पण. अगदी रोज. अगदी कृतज्ञता दाटून येते त्यांच्याबद्दल

व्वाह

अर्धवटराव
Tue, 03/12/2013 - 03:24 नवीन
मी अगदी गटारात लोळत वगैरे नाहि पडलो कधि... पण खुप पिणे, खुप झिंगणे हा आपला आवडता छंद आहे. शिवाय यार-दोस्त मंडळी जमवुन बीअर, खाणं पिणं करत रात्री जागवाव्या हे तर इसी का नाम झिंदगी :) पण साला एव्हढं पिऊन देखील एक बीअर सोडुन इतर कुठलच द्रव्य रंग-गंध-चवीवरुन ओळखता येत नाहि :( अर्धवटराव

लोकसत्तेतील आजचा वाचनीय लेख

श्रीरंग_जोशी
Tue, 03/12/2013 - 04:24 नवीन
मूळ लेखाचा नसला तरी चर्चेचा जो विषय आहे त्यावर एक वाचनीय लेख - मद्यप्राशनाच्या विळख्यात तरुणाई.

माहितीपुर्ण लेख.

पाषाणभेद
Wed, 03/13/2013 - 06:06 नवीन
माहितीपुर्ण लेख. सुबोध खरेंचे प्रतिसादही वाचण्यायोग्य व अंमलात आणण्यायोग्य आहेत.

उत्तम लेख...

नुमविय
Fri, 03/15/2013 - 14:12 नवीन
सोत्री सर आणि खरे काका दोघेही आपल्या जागी बरोबर आहेत असे वाटते.... मला वाटत दारू चांगली कि वाईट ह्या पेक्षा जसा सोत्री सर म्हणाले तसा कि जे पिनार्यावर अवलंबून असता...मी स्वतः सहजावस्था खूप एन्जोय करतो..पण न कधी सवय लागली ओर लागेल.... मला वाटता कि आयुष्यात कुठे थांबायचा हे कळला न कि बर्याच गोष्टी साध्य होतात... मी माझ्या वडिलांचे दोन मित्र दारूपायी देशोधडीला लागले आहेत हे बघितलाय.... जगात अशा बरायचं गोष्टी आहेत ज्या प्रमाणाबाहेर केल्या कि वाईट ठरू शकतात... मध्ये एक विशेष बातमी होती कि एका महिलेचा अति परमात कोक प्यायालामुळे मृत्यू झाला.... म्हणजे डॉक्टरांचा असा अंदाज होता.. ( हि शिंची लिंक काही सापडत नाहीये त्या बातमीची )....असो.... पण अजूनही बरेच लोक खरे काकांसारखे विचार करत नाहीत...म्हणजे जसा खरे काका म्हणतात कि ते दारू पीत नाहीत ह्यात विशेष अभिमानस्पद काही नाही तसे त्यांना असेही वातात नाही कि दारू पितात ते लोक वाईट...जे कि एकदम बरोबर आहे.... पण बरेच लोक असे मानतात कि एखादा दारू पितो म्हणजे तो काहीही ( ? ) करत असेल..मला आठवते एकदा मी एका पार्ट्य ला गेलो होतो ( मी शाकाहारी आहे ) एका युवतीने मला एक दिश दिली ज्यात नोन-वेग भात होता....मी म्हणालो कि मी नोन-वेग खात नाही...तर तिच्या चेहऱ्यावर असे भाव होते कि ...आवरा!!!... ती म्हणाली अरे तू ड्रिंक्स घेतोस न म....मी म्हणालो मी ड्रिंक्स घेतो म्हणजे मी काय वाटेल ते खातो ओर करतो असा वाटत का तुला ??? म्हणजे अरे तू ड्रिंक्स घेतोस म्हणजे घरून पैसे चोरत असशीलच!!!! कमाल असते लोकांची

एका महिलेचा अति परमात कोक

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 03/17/2013 - 10:55 नवीन
एका महिलेचा अति परमात कोक प्यायालामुळे मृत्यू झाला
परमा* असा पण लई वाईट बघा. त्यातून अतिपरमा तर अति वाईट !! *अर्थ कळला नाही तर सुबोधकाकांना सांगा. ते लगेच समजावून सांगतील :-)
↩ प्रतिसाद: नुमविय

बाझवला तेज्यायला!!!!

धमाल मुलगा
गुरुवार, 03/21/2013 - 10:10 नवीन
म्हेंदळे....आवरा!!! :D फुटलो राव ठ्या: करुन...एव्हढ्या शिरेस मूडमध्ये चर्चा चालू होती अन एकद्म अतिपरमा कुठून आलं बॉ म्हणून चमकलो ना. :D
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

एका युवतीने मला एक दिश दिली

अधिराज
गुरुवार, 03/21/2013 - 18:26 नवीन
एका युवतीने मला एक दिश दिली ज्यात नोन-वेग भात होता
भातालाही "वेग" असतो कि काय?
↩ प्रतिसाद: नुमविय

डॉ. खरे यांचे प्रतिसाद आवडले.

सूड
Fri, 03/15/2013 - 18:02 नवीन
डॉ. खरे यांचे प्रतिसाद आवडले. आमच्या एका पिकनिकला पिणार्‍या मंडळींनी ब्लॅक डॉगच्या दोन खंब्यांना उद्याची सकाळ दिसू द्यायची नाही अशी शपथ घेऊन प्यायला सुरुवात केली होती, पुढे रात्र चढत गेली तशी त्यांना चढत होती आणि शुद्धीवर असलेल्यांसाठी तो प्रचंड करमणूकीचा विषय ठरला होता. फुल्ल टल्ली झालेल्यांबरोबर मांडलेला रमीचा डाव आणि त्यात झालेली मजा मजा विसरु म्हणता विसरता येणार नाही.:D

दोन्ही बाजुंचे मत प्रहाव

गणपा
Fri, 03/15/2013 - 18:45 नवीन
दोन्ही बाजुंचे मत प्रहाव वाचले. काही अपेक्षीत प्रतिसाद नेहमी प्रमाणे अपेक्षीत आयडींकडूण आलेत त्यामुळे करमणूक झाली. बाकी ज्याला झेपते/परवडते त्याने त्याच्या जवाबदारीवर (इतरांना त्रास होणार नाही हे पाहून. {इतरांची करमणूक होत असल्यास आमची ना नाही.} ) प्यावी. बाकी सोत्रि एक लेख म्हणुन धागा आवडला.

+१

दादा कोंडके
Fri, 03/15/2013 - 19:05 नवीन
काही अपेक्षीत प्रतिसाद नेहमी प्रमाणे अपेक्षीत आयडींकडूण आलेत त्यामुळे करमणूक झाली.
सहमत. हा प्रतिसादसुद्धा वाचून करमणुक झाली.
↩ प्रतिसाद: गणपा

चला घटकाभर का होईना तुमची

गणपा
Fri, 03/15/2013 - 19:35 नवीन
चला घटकाभर का होईना तुमचीही करमणूक झाली. आनंदच आहे. :)
↩ प्रतिसाद: दादा कोंडके
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा