✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच

ध
धन्या यांनी
Tue, 02/19/2013 - 22:00  ·  लेख
लेख
आयटीच्या गोष्टी - नमन कल्पना करा, तुमच्या ऑफीसमधील तुमचं आधीचं काम संपलंय. पुढचं काम केव्हा मिळेल याबद्दल सध्यातरी कोणालाच माहिती नाही. किंवा अशी कल्पना करा की, तुम्ही नुकतीच तुमची नोकरी बदलली आहे. सध्याच्या कंपनीत नविन काम येणार आहे, त्यासाठी तुमची नेमणूक केली आहे. आता जोपर्यंत हे पुढचं काम येत नाही तोपर्यंत तुम्हाला कुणीच कधी येता कधी जाता, ऑफीसमध्ये काय करता हे विचारत नाही. कंपनीची अपेक्षा एव्हढीच असते की तुम्ही ऑफीसला नऊ तास भरायचे. तुम्ही सकाळी नऊ वाजता ऑफीसला जाता. दहा वाजेपर्यंत तुमच्या एखादया त्रागा किंवा वैताग करणार्‍या मित्राबरोबर चहा आणि मसाला डोश्याबरोबर अध्यात्म, धर्म, जागतिक महायुद्धे, मानसशास्त्र असले विषय चघळता. दहा ते बारा या वेळात यच्चयावत वृत्तपत्रांच्या आंतरजालीय आवृत्त्या चाळता. बारा वाजता सबवे काउंटरवर जाऊन मस्त एक फुट लाँग हाणता. जमलं तर बाहेर येऊन मोसंबीचा रस वगैरे पिता. डोळे मिटू लागले आहेत याची जाणिव होताच डॉर्ममध्ये अगदी संध्याकाळचे चार वाजेपर्यंत ताणून देता. चार वाजता उठून फ्रेश होता. कँटीनला येऊन मस्त एक चहा घेता. थोडा वेळ जिमला जातात. नंतर क्रिकेट ग्राऊंडला एखादा फेरफटका मारता. साडे सहा वाजायला थोडा वेळ असेल तर एखादा बकरा पकडून त्याला पकवत बसता. आणि साडे सहा वाजताच बाईकला किक मारून घरी सुसाट सुटता. एव्हढं सारं करुनही तुम्हाला महिना अखेरीस पुर्ण पगार मिळतो. कशी वाटली कल्पना? आता अ़जून एक कल्पना करा, तुमच्या ऑफीसमधील तुमचं आधीचं काम संपलंय. पुढचं काम केव्हा मिळेल याबद्दल सध्यातरी कोणालाच माहिती नाही. तुम्ही ऑफीसला येऊन नुसती हजेरी लावण्याला प्रचंड कंटाळले आहात. अचानक एक दिवस एचारचा फोन येतो. तो किंवा ती तुम्हाला सांगते की वूई हॅव सम प्रोजेक्टस इन पाईपलाईन बट वुई आर नॉट शुअर व्हेन दे विल गो ऑन फ्लोअर. जोपर्यंत पुढचा प्रोजेक्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही ऑफीसला येऊ नका. कदाचित अजून दोनेक महिने तुम्हाला घरी राहावं लागेल. महिना अखेरीस तुमचा पुर्ण पगार तुमच्या खात्यात जमा होईल. तुमच्यासाठी काम आलं की आम्ही तुम्हाला बोलावून घेऊ. कशी वाटली कल्पना? आता तिसरी कल्पना करा, तुमच्या ऑफीसमधील तुमचं आधीचं काम संपलंय. पुढचं काम केव्हा मिळेल याबद्दल सध्यातरी कोणालाच माहिती नाही. किंवा अशी कल्पना करा की, तुम्ही नुकतीच तुमची नोकरी बदलली आहे. सध्याच्या कंपनीत नविन काम येणार आहे, त्यासाठी तुमची नेमणूक केली आहे. एक दिवस एचारचा फोन येतो. तो किंवा ती तुम्हाला सांगते की वूई हॅव सम प्रोजेक्टस इन पाईपलाईन बट वुई आर नॉट शुअर व्हेन दे विल गो ऑन फ्लोअर. जोपर्यंत पुढचा प्रोजेक्ट येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला अमुक अमुक ट्रेनिंगला नॉमिनेट करतो. तुम्ही आनंदाने उडया मारायला लागता. हे तेच ट्रेनिंग असतं जे त्याची फी जास्त असल्यामुळे आणि ऑफीसमधून एक महिना सुटटी मिळणे शक्य नसल्यामुळे तुम्ही पुढे ढकललेलं असतं. आणि इथे तर कंपनी चक्क त्यांच्या पैशाने ते ट्रेनिंग द्यायला तयार असते. ते ही तुम्हाला महिन्याचा पुर्ण पगार देऊन. कशी वाटली कल्पना? तुम्ही जर नॉन आयटी इंडस्ट्रीत असाल तर या कल्पना कल्पनाच राहतील. पण तुम्ही जर आयटीत असाल तर मात्र या कल्पना वास्तवात उतरू शकतात. नव्हे, मोठया आयटी कंपन्यांमध्ये जवळपास वीस ते तीस टक्के कर्मचार्‍यांना हे भाग्य (किंवा दुर्भाग्य; कसे ते पुढे पाहू) लाभण्याची दाट शक्यता असते. आयटी कंपन्यांमध्ये काही कर्मचारी राखीव असतात. या कर्मचार्‍यांना बेंच रीसोर्सेस असं म्हणतात. मोठया आयटी कंपन्यांमध्ये तर अगदी एकुण कर्मचारी संख्येच्या वीस ते तीस टक्के कर्मचारी राखीव असतात. हे राखीव कर्मचारी सहसा उत्पादक काम करत नसल्यामुळे कंपनीला त्यांच्यापासून थेट उत्पन्न असे नसतेच. आणि तरीही या राखीव कर्मचार्‍यांना कंपनीला महिना अखेरीस पुर्ण पगार द्यावा लागतो. आयटीतील बेंच ही संकल्पना सांघिक खेळांमधील बेंच या संकल्पनेवर आधारीत आहे. काही सांघिक खेळांमध्ये प्रत्यक्ष खेळणार्‍या खेळाडूंबरोबर न खेळणारे पण गरज पडली तर खेळू शकणारे खेळाडू संघात ठेवावे लागतात. आयटीतील बेंच असाच आहे. आयटी कंपन्यांना प्रत्यक्ष काम न करणारे परंतू गरज पडल्यावर लगेच काम करु शकणारे काही राखीव कर्मचारी ठेवावे लागतात. हे सारं आपण जरा अधिक विस्ताराने पाहूया. आयटी कंपन्या दोन प्रकारच्या असतात. १. स्वतःची विशिष्ट संगणक प्रणाली निर्माण करणार्‍या (प्रोडक्ट बेस्ड) २. ग्राहकाच्या गरजेनुसार संगणक क्षेत्रातील सेवा पुरवणार्‍या (सर्व्हीस बेस्ड) प्रोडक्ट बेस्ड कंपन्या म्हणजे स्वतःचे सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन बनवून ते बाजारात विकणार्‍या कंपन्या. उदा. मायक्रोसॉफ्ट जी एमएस ऑफीस, एमएस विंडोज असे प्रोडक्ट्स बनवते. किंवा टॅली सोल्युशन्स ही भारतीय आयटी कंपनी जी टॅली नावाचं प्रोडक्ट बनवते. सर्व्हीस बेस्ड कंपन्या म्हणजे ग्राहकाच्या गरजेनुसार संगणकीय सेवा देणार्‍या आयटी कंपन्या. बर्‍याचशा भारतीय आयटी कंपन्या आणि भारतातू काम करणार्‍या बर्‍याचशा परदेशी कंपन्या या प्रकारात मोडतात. काही वेळा एकच आयटी कंपनी प्रोडक्ट बेस्ड आणि त्याच वेळी सर्वीस बेस्ड असू शकते. पण अशा कंपन्या खुपच कमी असतात. सर्व्हीस बेस्ड आयटी कंपन्यांचे तेल आणि नैसर्गिक वायू, औषध निर्माण, दुरसंचार, मिडीया अशा इतर विविध उद्योगक्षेत्रातील कंपन्यांबरोबर संगणकीय सेवा पुरवण्याचे करार असतात. इथे आयटी कंपनी सर्व्हीस प्रोव्हायडर असते आणि कोअरमधील कंपनी क्लायंट. आयटी कंपनीसाठी ते एक प्रकारचं खातंच असतं. म्हणून या कराराला अकाऊंट म्हणतात. एका अकाऊंट मध्ये म्हणजेच एका क्लायंटकडे त्याच्या व्यवसायाचे सेल्स, मार्केटींग, एचार, प्रोडक्शन असे अनेक विभाग असतात. आणि या वेगवेगळ्या विभागांना सर्व्हीस प्रोव्हायडरकडून त्यांचे काम संगणकीकृत करायचे असते. त्यासाठी अनेक छोटया मोठया संगणक प्रणाल्या बनवल्या जातात. सर्वसाधारणपणे एक संगणक प्रणाली बनवण्याचे काम किंवा बनवल्यानंतर तिची देखभाल करण्याचे काम म्हणजे एक प्रोजेक्ट असा हीशोब असतो. या प्रोजेक्टवर अ‍ॅप्लिकेशन डीझाईन, प्रोग्रामिंग, टेस्टींग, डेटाबेस असे विविध कौशल्य असणारी एक किंवा एकापेक्षा अधिक माणसं कार्यरत असतात. बरेच वेळा होतं काय, सर्व्हीस प्रोव्हायडर आयटी कंपनीकडे एखादा नवा क्लायंट येतो. किंवा जुन्या क्लायंटला त्याच्या एखाद्या विभागासाठी एखादी अदययावत संगणक प्रणाली बनवून हवी असते. किंवा त्या क्लायंटला त्याचा आधीचा सर्व्हीस प्रोव्हायडर चांगल्या दर्जाची सेवा देत नाही म्हणून दुसर्‍या सर्व्हीस प्रोव्हायडरकडून ते काम करुन घ्यायचे असते. ईथपर्यंतही ठीक आहे. पण ह्या क्लायंटला त्याचे काम आज आणि आताच सुरु व्हायला हवे असते. कारण त्यासाठी तो भरमसाट किंमत मोजायला तयार असतो. जर एखाद्या सर्व्हीस प्रोव्हायडरने काम लगेच सुरु करण्यात असमर्थता दाखवली तर क्लायंट लगेच दुसर्‍या सर्व्हीस प्रोव्हायडरकडे जाण्याची शक्यता असते. क्लायंट लाख म्हणेल की मी जर एव्हढे पैसे मोजतोय तर माझे काम आज आणि आताच सुरु व्हायला हवे. पण सर्व्हीस प्रोव्हायडरने त्या कामासाठी आवश्यक असणारे कौशल्य असणारी माणसे अगदी आताच कुठून आणायची? आयटी मधला नोकर भरती हा प्रचंड वेळखाऊ प्रकार आहे. नविन भरतीची जाहीरात देणे, उमेदवारांचे नोकरीच्या अर्जांची छाननी करुन त्यातल्या त्यात योग्य वाटणार्‍या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावणं, मुलाखतीत निवड झालेल्या उमेदवारांशी पगाराची घासाघीस करुन त्यांना निवडपत्र देणं, तो उमेदवार आधीच दुसर्‍या आयटी कंपनीत काम करत असल्यामुळे त्याच्यासाठी दोन तीन महिने थांबणं याच्यात कधी कधी अगदी सहा महिनेसुद्धा जातात. बरं एहढं सारं केल्यानंतर तो उमेदवार दुसर्‍याच कंपनीत जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मग क्लायंटला आज आणि आताच नविन माणसं कुठून द्यायची. या समस्येवरचा उपाय म्हणजे बेंच. प्रत्यक्षात कर्मचार्‍यांची गरज नसतानाही नविन भरती करुन ठेवायची. जसे काम येईल तशी ही नविन भरती केलेली माणसं त्या कामावर रुजू करायची. मोठया आयटी कंपन्यांमध्ये वर्षाचे बारा महिने नोकर भरती सुरु असते ती यामुळेच. बरेच वेळा एखादा चालू असलेला प्रोजेक्ट संपतो. त्या प्रोजेक्टमधल्या माणसांना दुसरे काम मिळेपर्यंत ती माणसेही बेंचवर जातात. ही बेंचवरची माणसे वर कल्पना म्हणून वर्णन केलेल्या सोयींचा लाभ घेऊ शकतात. अर्थात ते बरंचसं कंपनीवर अवलंबून असतं सार्‍याच कंपन्यांत हे असं होतंच असं नाही. किंवा होत असलं तरी अगदी असंच होतं असंही नाही. बेंचवर असलेल्या कर्मचार्‍यांना पुर्ण पगार द्यावा लागत असल्यामुळे आयटी कंपन्यांसाठी बेंच हा प्रकार "असून अडचण नसून खोळंबा" असा असतो. ही झाली कंपनीची बाजू. बेंचवर असलेल्या कर्मचार्‍यांचं काय? ते ही पाहूया. वरच्या तीन प्रकारच्या बेंच वर्णनांवरुन नॉन आयटीवाल्यांना आयटीवाल्यांचा नक्कीच हेवा वाटेल. पण आयटीत बेंचवर येणं ही तितकीशी चांगली गोष्ट नाही. १. सुरुवातीचे एक दोन महिने चांगले जातात. पण नंतर प्रचंड कंटाळा यायला लागतो. दिवसभर काय करायचे हा प्रश्न पडतो. २. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी हा असा प्रकार आहे की जर तुम्ही एक दोन महिने त्यापासून दूर राहीलात तर ते सारं तुम्ही विसरुन जाण्याची दाट शक्यता असते. महिनाभर रीयाज केला नाही तर गायकाला त्याचा गळा साथ देत नाही तसंच काहीसं आहे हे. ३. बरेच वेळा बेंचवर असल्यानंतरही नको असलेला प्रोजेक्ट नाकारण्याचा अधिकार असला तरी कधी ना कधी प्रोजेक्ट घ्यावाच लागतो. बरेच वेळा समोर येईल तो प्रोजेक्ट घ्यावा लागतो. आपली कामाच्या वेळा, आपल्याला काम करायची ईच्छा असलेली टेक्नॉलॉजी यात तडजोड करावी लागते. ४. खुप दिवस बेंचवर राहील्यास कंपनी आपल्या दुसर्‍या शहरातील ऑफीसला बदली करु शकते. केव्हा केव्हा टेक्नॉलॉजीमधल्या माणसाला कंपनीच्या बीपीओ आर्मलाही पाठवले जाते. ५. सर्वात महत्वाचे म्हणजे, आर्थिक मंदीच्या काळात पहिली तडी बेंचवरील कर्मचार्‍यांवर पडते. वरवर चांगला वाटणारा हा प्रकार तसा कर्मचार्‍यांसाठीही वाईटच असतो. एक दोन महिन्यांसाठी बेंचवर येऊन लगेच हवा तसा प्रोजेक्ट मिळाल्यास मात्र मज्जानू लाईफ. पण असे खुपच कमी वेळा होते. वर्ष - दिड वर्ष बेंचवर असलेले किस्से आयटीत ऐकायला मिळतात. आता समारोपाच्या काही ओळी लिहून हे प्रकरण आटोपतं घेतो. शंभराच्या आतबाहेर कर्मचारी संख्या असलेल्या आयटी कंपन्यांमध्ये बेंच हा प्रकारच नसतो. त्याचे क्लायंटही कधी घोडयावर येत नाहीत. हजाराच्या आसपास कर्माचारी संख्या असलेल्या कंपन्यांमध्ये खुपच कमी कर्मचारी बेंचवर असतात. कारण त्यांना बेंच परवडतच नाही. आणि मोठया आयटी कंपन्या बेंच ठेवतात कारण ती त्यांच्या व्यवसायाची गरज असते.

Book traversal links for आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच

  • ‹ आयटीच्या गोष्टी - नमन
  • Up
  • आयटीच्या गोष्टी - ऑनसाईट (१) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
38276 वाचन

💬 प्रतिसाद (168)

प्रतिक्रिया

दोघांनीही छान माहिती दिलीय.

धन्या
Sat, 02/23/2013 - 20:51 नवीन
पुन्हा एकदा डेव्हलपमेंट प्रोफाईलचे वेध लागल्यामुळे मी सपोर्टची टर्मिनॉलॉजी विसरु लागलो आहे. :) असो.
एखाद्या नावाजलेल्या outsourcing वाल्या कंपनीत किती टक्के लोक L१ ला असतात रे ?
एकुण आयटीवाल्यांच्या संख्येच्या मानाने खुपच कमी.
बेसिक्स कच्चे असल्याने मी म्हणतो त्या लोकांना efficient solutions देत येत नाहीत. मग धेडगुजरी पद्धतीने काम होते. आणि त्यात काही चूक आहे असे कुणालाच वाटत नाही. मुळात आपल्या अज्ञानामुळे आपल्याला जास्त काम करावे लागत आहे हेच कळत नाही. एक प्रॉब्लेम दहा प्रकारे सोडवता येतो पण ज्याला त्यातले ज्ञान आहे त्याला, इतरांना ते दहा options दिसणारच नाहीत.
बेसिक कच्चं असण्यापेक्षा मुळात त्यांचं शिक्षण आणि प्रशिक्षण तितकं खोलवर झालेलं नसतं. मुळात कंपनीला पैसे वाचवायचे असल्यामुळे कंपनीही अशीच माणसं निवडते. मग कुणीतरी त्यांना नॉलेज ट्रान्स्फरच्या नावाखाली "हे असं करायचं, ते तसं करायचं" अशी जुजबी माहिती देतं. आणि ते पब्लिकही ते तसंच करत राहतं. आणि मग हे तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रॉब्लेम्स होतात. विमे, The Blub Paradox हे अफलातून आर्टीकल शेअर करण्यासाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

विमे, The Blub Paradox हे

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 02/24/2013 - 01:03 नवीन
विमे, The Blub Paradox हे अफलातून आर्टीकल शेअर करण्यासाठी धन्यवाद.
Blub Paradox च्या मागचा फंडा बऱ्याच ठिकाणी वापरता येतो. मागे एका अध्यात्मिक वादात माझा मुद्दा समजावून सांगण्यासाठी मी त्या सारखे एक उदाहरण वापरले होते. पॉल ग्राहम चा पूर्ण ब्लॉग बघ. अत्यंत सुंदर आहे. त्या माणसाचा करीअर ग्राफ पण रोचक आहे. त्याने एकेकाळी वेब स्टार्टअप सुरु केली, ती कालांतराने याहू ला विकली आणि याहूत नोकरी करायला लागला. आता ती नोकरी सोडली आणि फंडींग देतो इतर स्टार्टअप्स ना. Dropbox आणि Airbnb या दोन्हींना त्याचे फंडिंग आहे. १० बिलियन चा पोर्टफ़ोलिओ आहे त्याच्या कंपनीचा. या सगळ्या अनुभवामुळे ब्लॉग ला वजन आहे :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

तसं नाय धनाराव

चौकटराजा
Sat, 02/23/2013 - 18:59 नवीन
आमी ह्यी मिष्टेक काडायचा कारन आसा की त्या वीसावीसाच्या सामन्यात ते परत्यक्ष बाकड्याव बसल्याले लोक दावत्यात म्हूनशान म्हनालो . आन तानायला डारमीटर्‍या बी बनावल्यात ? आयाया ! मंग तर लईच जळालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आयटीत लिहिलाय लेख..

यशोधन वाळिंबे
Sat, 02/23/2013 - 18:35 नवीन
कोणीतरी म्हणे.. एवरेस्ट लांबुनच छान दिसतो :-)
  • Log in or register to post comments

बेंचवर बसलेले आयटीतले नवरे.

लौंगी मिरची
Sat, 02/23/2013 - 23:23 नवीन
धागा माझ्यासारख्याना अतिशय उपयुक्त माहिती देणारा आहे . दहावेळा नवर्‍याला आयटीत नक्कि तु काय काम करतोस हे विचारल्यावर काहिहि नीटसं उत्तर न देता " सांगुन तुला काय कळणार आहे का ?" असं प्रश्न वजा उत्तर मिळतं , त्यामुळे हा धागा वाचायला खुप आवडला . मी तर म्हणेन बेंच्वर बसलेल्या नवर्‍याचा ग्रुहिनीला बराच फायदा होतो .माझा अनुभव म्हणजे : १) बेंचवर असताना "दुपारी जेवायला घरी ये , आज डबा नाहि देत चालेल का ? " असं म्हटल्यावर लगेच तयार होतो , पण तेच काम असताना असं विचारायलाहि भिती वाटते . लगेच " दुपारी मीटिंग आहे , कॉल आहे .. येणार कधी .. जाणार कधी ? ह्यावरणं वाद घालतो . २ ) मुलाला स्कूलबस पर्यंत तरी सोडायला जा , फक्त आजच्या दिवस ? असं म्हटल्यावर " अगं कसं शक्य आहे , पंधरा मिनिटात निघतोय मी " अशी उत्तरं मिळतात . तेच बेंचवर असला कि " एवढच ना ! आजचा दिवसच काय .. आता रोज जाईन म्हणुन जातो . ३ ) एरवी कुठल्याहि नातेवाईकाला ओरडुन मागे लागुन झालं तरी फोन करणार नाहि कि कुणाला भेटायला जाणार नाहि .. पण बेंच मुळे हा दिवसभर सगळ्याना फोन करेल , मित्रांना घरी जेवायला बोलवेल , आईशी गप्पा मारुन नको नको त्या न्युझ घरी आणेल .. असे बरेच उद्योग करतो , तेव्हा मात्र मला माझा नवरा माणसात आलाय याचं समाधान मिळतं :) तोटे तसे फारसे नाहित पण काम नसल्याने त्याची चिडचिड होते , थोडा अस्वस्थ वाटतो . महत्वाचं म्हणजे नको तिथे आपली मतं मांडत बसतो :( .
  • Log in or register to post comments

सकु आणि संखंचं ' स्पायडरमॅन

५० फक्त
Sat, 02/23/2013 - 23:40 नवीन
सकु आणि संखंचं ' स्पायडरमॅन स्पायडरमेंन मि. स्पायडरमँन गाणं आठवलं'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लौंगी मिरची

लिंक मिळु शकते का ?

लौंगी मिरची
Sat, 02/23/2013 - 23:47 नवीन
त्या गाण्याची लिंक मिळु शकते का ? कळेल तरी अर्थ तुमच्या प्रतिसादाचा , नाहितर अज्ञानात सुख माणुन घेण्यात येइल .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

http://www.hulkshare.com

५० फक्त
Tue, 02/26/2013 - 08:22 नवीन
http://www.hulkshare.com/7jigno6wi471 , जुळवुन घेता आलं तर पहा नाहीतर खवत चर्चा करु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लौंगी मिरची

हम्म..

दादा कोंडके
Sun, 02/24/2013 - 01:17 नवीन
आईशी गप्पा मारुन नको नको त्या न्युझ घरी आणेल ..
कुणाच्या आईशी? नको नको त्या न्युज म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लौंगी मिरची

लै लोकं बसले बेंच मोडला तर नै

नाना चेंगट
Sat, 02/23/2013 - 23:27 नवीन
लै लोकं बसले बेंच मोडला तर नै ना?
  • Log in or register to post comments

चिंता नसावी...

धन्या
Sun, 02/24/2013 - 01:36 नवीन
एक लाखापेक्षा जास्त कर्मचारी संख्या असणार्‍या आयटी कंपन्यांची बेंच क्षमता पंचवीस हजाराच्या आसपास असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

आयबीएम मध्ये तुम्ही बेन्चवर

संपत
Sun, 02/24/2013 - 00:16 नवीन
आयबीएम मध्ये तुम्ही बेन्चवर असाल तर हापिसातसुद्धा जायची गरज नसते. अशामुळे घरात तुम्ही नक्की नोकरीवर आहात की कसे याबाबत संभ्रम निर्माण होतो
सत्यवचन महाराजः)
  • Log in or register to post comments

आयबीएम मध्ये तुम्ही बेन्चवर

संपत
Sun, 02/24/2013 - 00:16 नवीन
आयबीएम मध्ये तुम्ही बेन्चवर असाल तर हापिसातसुद्धा जायची गरज नसते. अशामुळे घरात तुम्ही नक्की नोकरीवर आहात की कसे याबाबत संभ्रम निर्माण होतो
सत्यवचन महाराजः)
  • Log in or register to post comments

हत्ती आणि अनेक डोळस

मैत्र
Tue, 02/26/2013 - 18:17 नवीन
हत्ती आणि चार आंधळे या गोष्टीप्रमाणे चर्चा चालू आहे असं वाटतंय. महत्त्वाचा फरक हा की इथे अनेक डोळस आहेत आणि समोर येणारे सोंड / पाय/ शेपूट / कान असे अवयव पाहून हा महाकाय प्राणी असाच आहे असे दावे प्रतिदावे सुरू आहेत. चर्चा आणि काही मुद्दे उत्तम आहेत आणि नॉन आयटी वाचकांना बरीच माहिती मिळेल यात शंका नाही पण खूप काही एकांगी लिखाणही दिसते आहे. (अनेक वर्षे आयटी कंपन्यामध्ये काढलेला / कुठल्याही स्किल्सचा अभाव नसताना साडेचार महिने सलग बेंच पाहिलेला / इंप्लिमेंटेशन्स / सपोर्ट आणि सीआर सर्व प्रकार पाहिलेला पण आजवर एकही 'कोड' न लिहिलेला) मैत्र
  • Log in or register to post comments

(अनेक वर्षे आयटी कंपन्यामध्ये

धन्या
Tue, 02/26/2013 - 19:56 नवीन
(अनेक वर्षे आयटी कंपन्यामध्ये काढलेला / कुठल्याही स्किल्सचा अभाव नसताना साडेचार महिने सलग बेंच पाहिलेला / इंप्लिमेंटेशन्स / सपोर्ट आणि सीआर सर्व प्रकार पाहिलेला पण आजवर एकही 'कोड' न लिहिलेला) मैत्र
तुम्ही तर खुप मोठी हस्ती दिसता आयटीमधील. आपल्याबद्दल आदर आहे.
हत्ती आणि चार आंधळे या गोष्टीप्रमाणे चर्चा चालू आहे असं वाटतंय. महत्त्वाचा फरक हा की इथे अनेक डोळस आहेत आणि समोर येणारे सोंड / पाय/ शेपूट / कान असे अवयव पाहून हा महाकाय प्राणी असाच आहे असे दावे प्रतिदावे सुरू आहेत.
चर्चा चालू आहे हे महत्वाचे नाही का?
चर्चा आणि काही मुद्दे उत्तम आहेत आणि नॉन आयटी वाचकांना बरीच माहिती मिळेल यात शंका नाही पण खूप काही एकांगी लिखाणही दिसते आहे.
याची शक्यता मी नाकारत नाही. किंबहूना, पहिल्या भागात मी तसा उल्लेख केलाच आहे:
कमी अधिक अशा साडे सात आठ वर्षांच्या माझ्या आयटी करीयरमध्ये खुप काही गोष्टी पाहील्या, अनुभवल्या. काही आनंद देणार्‍या, काही आपल्या क्षमतेचा कस पाहणार्‍या, काही मनस्वी चीड आणणार्‍या, तर काही नैराश्येच्या खोल गर्तेत फेकून देणार्‍या. या सार्‍याबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न असेल. मिपावर आयटीमधील रथी महारथी आहेत. ते माझ्या लेखनात काही चुका झाल्या तर दाखवून देतीलच. तसेच ते प्रतिसादांमधून आपले अनुभवही सांगतील, वाचकांच्या प्रश्नांना उत्तरेही देतील याची मला खात्री आहे.
नाऊ ईट्स युअर टर्न सर. माझं लेखन एकांगी कसं आहे हे पटवून देणार्‍या तुमच्या प्रतिसादाची मी वाट पाहतोय. तुमच्या प्रतिसादाने माझ्या आणि माझ्या या लेखमालेच्या वाचकांच्या ज्ञानात नक्की भर पडेल अशी मला आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

प्रतिसाद

मैत्र
Wed, 02/27/2013 - 10:06 नवीन
# मी कोणी हस्ती वगैरे नाही. मिपावर बरेच अनुभवी / /ज्येष्ठ - तुम्ही म्हणालात तसे रथी महारथी आहेत (खर्‍या अर्थाने) आठ वर्षे हासुद्धा आय टी साठी मोठा अनुभव आहे. त्यामुळे अर्थात तुम्हालाही उत्तम कल्पना असेल. -- कमी अधिक अशा साडे सात आठ वर्षांच्या माझ्या आयटी करीयरमध्ये खुप काही गोष्टी पाहील्या, अनुभवल्या. काही आनंद देणार्‍या, काही आपल्या क्षमतेचा कस पाहणार्‍या, काही मनस्वी चीड आणणार्‍या, तर काही नैराश्येच्या खोल गर्तेत फेकून देणार्‍या. या सार्‍याबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न असेल. -- यु सेड इट. बरोब्बर हाच आहे आयटीचा अनुभव. तो तसा वाटला नाही आत्तापर्यंत. पुढील लेखांबद्दल उत्सुकता आहे. # चर्चा चालू आहे हे नक्कीच महत्त्वाचे आहे # धन्याजीराव - तुमचं लिखाण हे शक्य तितकं माहितीपर आणि बरंच अनबायस्ड आहे. मी चर्चा एकांगी होते काही वेळा असं म्हटलं आह. धन्या यांचं लेखन नाही. चर्चा सध्या दुसरीकडे जाते आहे. मी त्यावर काही मतप्रदर्शन जास्त करू इच्छित नाही. जिथे मला एकांगी मतं वाटली त्यावर मी वेळ काढून थेट प्रतिसाद देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

छान माहिति

कुळाचा_दीप
Wed, 02/27/2013 - 07:55 नवीन
बर हे सगळ बहुतान्शि झाल सर्व्हिस बेस्ड कम्पनि बद्दल...प्रोडक्ट बेस्ड बद्दल पण काहि येऊद्या...
  • Log in or register to post comments

प्रोडक्ट बेस्ड आयटी

धन्या
Wed, 02/27/2013 - 08:31 नवीन
प्रोडक्ट बेस्ड आयटी कंपनीमध्ये सहसा बेंच नसतो. त्यांना आगाऊ नोकरभरती करण्याची मुळात गरज नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुळाचा_दीप
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा