✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच

ध
धन्या यांनी
Tue, 02/19/2013 - 22:00  ·  लेख
लेख
आयटीच्या गोष्टी - नमन कल्पना करा, तुमच्या ऑफीसमधील तुमचं आधीचं काम संपलंय. पुढचं काम केव्हा मिळेल याबद्दल सध्यातरी कोणालाच माहिती नाही. किंवा अशी कल्पना करा की, तुम्ही नुकतीच तुमची नोकरी बदलली आहे. सध्याच्या कंपनीत नविन काम येणार आहे, त्यासाठी तुमची नेमणूक केली आहे. आता जोपर्यंत हे पुढचं काम येत नाही तोपर्यंत तुम्हाला कुणीच कधी येता कधी जाता, ऑफीसमध्ये काय करता हे विचारत नाही. कंपनीची अपेक्षा एव्हढीच असते की तुम्ही ऑफीसला नऊ तास भरायचे. तुम्ही सकाळी नऊ वाजता ऑफीसला जाता. दहा वाजेपर्यंत तुमच्या एखादया त्रागा किंवा वैताग करणार्‍या मित्राबरोबर चहा आणि मसाला डोश्याबरोबर अध्यात्म, धर्म, जागतिक महायुद्धे, मानसशास्त्र असले विषय चघळता. दहा ते बारा या वेळात यच्चयावत वृत्तपत्रांच्या आंतरजालीय आवृत्त्या चाळता. बारा वाजता सबवे काउंटरवर जाऊन मस्त एक फुट लाँग हाणता. जमलं तर बाहेर येऊन मोसंबीचा रस वगैरे पिता. डोळे मिटू लागले आहेत याची जाणिव होताच डॉर्ममध्ये अगदी संध्याकाळचे चार वाजेपर्यंत ताणून देता. चार वाजता उठून फ्रेश होता. कँटीनला येऊन मस्त एक चहा घेता. थोडा वेळ जिमला जातात. नंतर क्रिकेट ग्राऊंडला एखादा फेरफटका मारता. साडे सहा वाजायला थोडा वेळ असेल तर एखादा बकरा पकडून त्याला पकवत बसता. आणि साडे सहा वाजताच बाईकला किक मारून घरी सुसाट सुटता. एव्हढं सारं करुनही तुम्हाला महिना अखेरीस पुर्ण पगार मिळतो. कशी वाटली कल्पना? आता अ़जून एक कल्पना करा, तुमच्या ऑफीसमधील तुमचं आधीचं काम संपलंय. पुढचं काम केव्हा मिळेल याबद्दल सध्यातरी कोणालाच माहिती नाही. तुम्ही ऑफीसला येऊन नुसती हजेरी लावण्याला प्रचंड कंटाळले आहात. अचानक एक दिवस एचारचा फोन येतो. तो किंवा ती तुम्हाला सांगते की वूई हॅव सम प्रोजेक्टस इन पाईपलाईन बट वुई आर नॉट शुअर व्हेन दे विल गो ऑन फ्लोअर. जोपर्यंत पुढचा प्रोजेक्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही ऑफीसला येऊ नका. कदाचित अजून दोनेक महिने तुम्हाला घरी राहावं लागेल. महिना अखेरीस तुमचा पुर्ण पगार तुमच्या खात्यात जमा होईल. तुमच्यासाठी काम आलं की आम्ही तुम्हाला बोलावून घेऊ. कशी वाटली कल्पना? आता तिसरी कल्पना करा, तुमच्या ऑफीसमधील तुमचं आधीचं काम संपलंय. पुढचं काम केव्हा मिळेल याबद्दल सध्यातरी कोणालाच माहिती नाही. किंवा अशी कल्पना करा की, तुम्ही नुकतीच तुमची नोकरी बदलली आहे. सध्याच्या कंपनीत नविन काम येणार आहे, त्यासाठी तुमची नेमणूक केली आहे. एक दिवस एचारचा फोन येतो. तो किंवा ती तुम्हाला सांगते की वूई हॅव सम प्रोजेक्टस इन पाईपलाईन बट वुई आर नॉट शुअर व्हेन दे विल गो ऑन फ्लोअर. जोपर्यंत पुढचा प्रोजेक्ट येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला अमुक अमुक ट्रेनिंगला नॉमिनेट करतो. तुम्ही आनंदाने उडया मारायला लागता. हे तेच ट्रेनिंग असतं जे त्याची फी जास्त असल्यामुळे आणि ऑफीसमधून एक महिना सुटटी मिळणे शक्य नसल्यामुळे तुम्ही पुढे ढकललेलं असतं. आणि इथे तर कंपनी चक्क त्यांच्या पैशाने ते ट्रेनिंग द्यायला तयार असते. ते ही तुम्हाला महिन्याचा पुर्ण पगार देऊन. कशी वाटली कल्पना? तुम्ही जर नॉन आयटी इंडस्ट्रीत असाल तर या कल्पना कल्पनाच राहतील. पण तुम्ही जर आयटीत असाल तर मात्र या कल्पना वास्तवात उतरू शकतात. नव्हे, मोठया आयटी कंपन्यांमध्ये जवळपास वीस ते तीस टक्के कर्मचार्‍यांना हे भाग्य (किंवा दुर्भाग्य; कसे ते पुढे पाहू) लाभण्याची दाट शक्यता असते. आयटी कंपन्यांमध्ये काही कर्मचारी राखीव असतात. या कर्मचार्‍यांना बेंच रीसोर्सेस असं म्हणतात. मोठया आयटी कंपन्यांमध्ये तर अगदी एकुण कर्मचारी संख्येच्या वीस ते तीस टक्के कर्मचारी राखीव असतात. हे राखीव कर्मचारी सहसा उत्पादक काम करत नसल्यामुळे कंपनीला त्यांच्यापासून थेट उत्पन्न असे नसतेच. आणि तरीही या राखीव कर्मचार्‍यांना कंपनीला महिना अखेरीस पुर्ण पगार द्यावा लागतो. आयटीतील बेंच ही संकल्पना सांघिक खेळांमधील बेंच या संकल्पनेवर आधारीत आहे. काही सांघिक खेळांमध्ये प्रत्यक्ष खेळणार्‍या खेळाडूंबरोबर न खेळणारे पण गरज पडली तर खेळू शकणारे खेळाडू संघात ठेवावे लागतात. आयटीतील बेंच असाच आहे. आयटी कंपन्यांना प्रत्यक्ष काम न करणारे परंतू गरज पडल्यावर लगेच काम करु शकणारे काही राखीव कर्मचारी ठेवावे लागतात. हे सारं आपण जरा अधिक विस्ताराने पाहूया. आयटी कंपन्या दोन प्रकारच्या असतात. १. स्वतःची विशिष्ट संगणक प्रणाली निर्माण करणार्‍या (प्रोडक्ट बेस्ड) २. ग्राहकाच्या गरजेनुसार संगणक क्षेत्रातील सेवा पुरवणार्‍या (सर्व्हीस बेस्ड) प्रोडक्ट बेस्ड कंपन्या म्हणजे स्वतःचे सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन बनवून ते बाजारात विकणार्‍या कंपन्या. उदा. मायक्रोसॉफ्ट जी एमएस ऑफीस, एमएस विंडोज असे प्रोडक्ट्स बनवते. किंवा टॅली सोल्युशन्स ही भारतीय आयटी कंपनी जी टॅली नावाचं प्रोडक्ट बनवते. सर्व्हीस बेस्ड कंपन्या म्हणजे ग्राहकाच्या गरजेनुसार संगणकीय सेवा देणार्‍या आयटी कंपन्या. बर्‍याचशा भारतीय आयटी कंपन्या आणि भारतातू काम करणार्‍या बर्‍याचशा परदेशी कंपन्या या प्रकारात मोडतात. काही वेळा एकच आयटी कंपनी प्रोडक्ट बेस्ड आणि त्याच वेळी सर्वीस बेस्ड असू शकते. पण अशा कंपन्या खुपच कमी असतात. सर्व्हीस बेस्ड आयटी कंपन्यांचे तेल आणि नैसर्गिक वायू, औषध निर्माण, दुरसंचार, मिडीया अशा इतर विविध उद्योगक्षेत्रातील कंपन्यांबरोबर संगणकीय सेवा पुरवण्याचे करार असतात. इथे आयटी कंपनी सर्व्हीस प्रोव्हायडर असते आणि कोअरमधील कंपनी क्लायंट. आयटी कंपनीसाठी ते एक प्रकारचं खातंच असतं. म्हणून या कराराला अकाऊंट म्हणतात. एका अकाऊंट मध्ये म्हणजेच एका क्लायंटकडे त्याच्या व्यवसायाचे सेल्स, मार्केटींग, एचार, प्रोडक्शन असे अनेक विभाग असतात. आणि या वेगवेगळ्या विभागांना सर्व्हीस प्रोव्हायडरकडून त्यांचे काम संगणकीकृत करायचे असते. त्यासाठी अनेक छोटया मोठया संगणक प्रणाल्या बनवल्या जातात. सर्वसाधारणपणे एक संगणक प्रणाली बनवण्याचे काम किंवा बनवल्यानंतर तिची देखभाल करण्याचे काम म्हणजे एक प्रोजेक्ट असा हीशोब असतो. या प्रोजेक्टवर अ‍ॅप्लिकेशन डीझाईन, प्रोग्रामिंग, टेस्टींग, डेटाबेस असे विविध कौशल्य असणारी एक किंवा एकापेक्षा अधिक माणसं कार्यरत असतात. बरेच वेळा होतं काय, सर्व्हीस प्रोव्हायडर आयटी कंपनीकडे एखादा नवा क्लायंट येतो. किंवा जुन्या क्लायंटला त्याच्या एखाद्या विभागासाठी एखादी अदययावत संगणक प्रणाली बनवून हवी असते. किंवा त्या क्लायंटला त्याचा आधीचा सर्व्हीस प्रोव्हायडर चांगल्या दर्जाची सेवा देत नाही म्हणून दुसर्‍या सर्व्हीस प्रोव्हायडरकडून ते काम करुन घ्यायचे असते. ईथपर्यंतही ठीक आहे. पण ह्या क्लायंटला त्याचे काम आज आणि आताच सुरु व्हायला हवे असते. कारण त्यासाठी तो भरमसाट किंमत मोजायला तयार असतो. जर एखाद्या सर्व्हीस प्रोव्हायडरने काम लगेच सुरु करण्यात असमर्थता दाखवली तर क्लायंट लगेच दुसर्‍या सर्व्हीस प्रोव्हायडरकडे जाण्याची शक्यता असते. क्लायंट लाख म्हणेल की मी जर एव्हढे पैसे मोजतोय तर माझे काम आज आणि आताच सुरु व्हायला हवे. पण सर्व्हीस प्रोव्हायडरने त्या कामासाठी आवश्यक असणारे कौशल्य असणारी माणसे अगदी आताच कुठून आणायची? आयटी मधला नोकर भरती हा प्रचंड वेळखाऊ प्रकार आहे. नविन भरतीची जाहीरात देणे, उमेदवारांचे नोकरीच्या अर्जांची छाननी करुन त्यातल्या त्यात योग्य वाटणार्‍या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावणं, मुलाखतीत निवड झालेल्या उमेदवारांशी पगाराची घासाघीस करुन त्यांना निवडपत्र देणं, तो उमेदवार आधीच दुसर्‍या आयटी कंपनीत काम करत असल्यामुळे त्याच्यासाठी दोन तीन महिने थांबणं याच्यात कधी कधी अगदी सहा महिनेसुद्धा जातात. बरं एहढं सारं केल्यानंतर तो उमेदवार दुसर्‍याच कंपनीत जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मग क्लायंटला आज आणि आताच नविन माणसं कुठून द्यायची. या समस्येवरचा उपाय म्हणजे बेंच. प्रत्यक्षात कर्मचार्‍यांची गरज नसतानाही नविन भरती करुन ठेवायची. जसे काम येईल तशी ही नविन भरती केलेली माणसं त्या कामावर रुजू करायची. मोठया आयटी कंपन्यांमध्ये वर्षाचे बारा महिने नोकर भरती सुरु असते ती यामुळेच. बरेच वेळा एखादा चालू असलेला प्रोजेक्ट संपतो. त्या प्रोजेक्टमधल्या माणसांना दुसरे काम मिळेपर्यंत ती माणसेही बेंचवर जातात. ही बेंचवरची माणसे वर कल्पना म्हणून वर्णन केलेल्या सोयींचा लाभ घेऊ शकतात. अर्थात ते बरंचसं कंपनीवर अवलंबून असतं सार्‍याच कंपन्यांत हे असं होतंच असं नाही. किंवा होत असलं तरी अगदी असंच होतं असंही नाही. बेंचवर असलेल्या कर्मचार्‍यांना पुर्ण पगार द्यावा लागत असल्यामुळे आयटी कंपन्यांसाठी बेंच हा प्रकार "असून अडचण नसून खोळंबा" असा असतो. ही झाली कंपनीची बाजू. बेंचवर असलेल्या कर्मचार्‍यांचं काय? ते ही पाहूया. वरच्या तीन प्रकारच्या बेंच वर्णनांवरुन नॉन आयटीवाल्यांना आयटीवाल्यांचा नक्कीच हेवा वाटेल. पण आयटीत बेंचवर येणं ही तितकीशी चांगली गोष्ट नाही. १. सुरुवातीचे एक दोन महिने चांगले जातात. पण नंतर प्रचंड कंटाळा यायला लागतो. दिवसभर काय करायचे हा प्रश्न पडतो. २. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी हा असा प्रकार आहे की जर तुम्ही एक दोन महिने त्यापासून दूर राहीलात तर ते सारं तुम्ही विसरुन जाण्याची दाट शक्यता असते. महिनाभर रीयाज केला नाही तर गायकाला त्याचा गळा साथ देत नाही तसंच काहीसं आहे हे. ३. बरेच वेळा बेंचवर असल्यानंतरही नको असलेला प्रोजेक्ट नाकारण्याचा अधिकार असला तरी कधी ना कधी प्रोजेक्ट घ्यावाच लागतो. बरेच वेळा समोर येईल तो प्रोजेक्ट घ्यावा लागतो. आपली कामाच्या वेळा, आपल्याला काम करायची ईच्छा असलेली टेक्नॉलॉजी यात तडजोड करावी लागते. ४. खुप दिवस बेंचवर राहील्यास कंपनी आपल्या दुसर्‍या शहरातील ऑफीसला बदली करु शकते. केव्हा केव्हा टेक्नॉलॉजीमधल्या माणसाला कंपनीच्या बीपीओ आर्मलाही पाठवले जाते. ५. सर्वात महत्वाचे म्हणजे, आर्थिक मंदीच्या काळात पहिली तडी बेंचवरील कर्मचार्‍यांवर पडते. वरवर चांगला वाटणारा हा प्रकार तसा कर्मचार्‍यांसाठीही वाईटच असतो. एक दोन महिन्यांसाठी बेंचवर येऊन लगेच हवा तसा प्रोजेक्ट मिळाल्यास मात्र मज्जानू लाईफ. पण असे खुपच कमी वेळा होते. वर्ष - दिड वर्ष बेंचवर असलेले किस्से आयटीत ऐकायला मिळतात. आता समारोपाच्या काही ओळी लिहून हे प्रकरण आटोपतं घेतो. शंभराच्या आतबाहेर कर्मचारी संख्या असलेल्या आयटी कंपन्यांमध्ये बेंच हा प्रकारच नसतो. त्याचे क्लायंटही कधी घोडयावर येत नाहीत. हजाराच्या आसपास कर्माचारी संख्या असलेल्या कंपन्यांमध्ये खुपच कमी कर्मचारी बेंचवर असतात. कारण त्यांना बेंच परवडतच नाही. आणि मोठया आयटी कंपन्या बेंच ठेवतात कारण ती त्यांच्या व्यवसायाची गरज असते.

Book traversal links for आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच

  • ‹ आयटीच्या गोष्टी - नमन
  • Up
  • आयटीच्या गोष्टी - ऑनसाईट (१) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
38276 वाचन

💬 प्रतिसाद (168)

प्रतिक्रिया

आयटीत आल्यापासून बाकड्यावर

ऋषिकेश
Wed, 02/20/2013 - 12:13 नवीन
आयटीत आल्यापासून बाकड्यावर जायची संधी मिळालेली नाही याची पुन्हा आठवण झाली. तेव्हा यात अधिक माहितीची भर टाकु शकत नाही
  • Log in or register to post comments

+१

आजानुकर्ण
Wed, 02/20/2013 - 20:24 नवीन
आयटीत आल्यापासून सुरुवातीचे ट्रेनिंगचे दोन महिने सोडल्यास एकही दिवस बाकड्यावर गेलेला नाही. मात्र बाकड्यांवर बसलेल्या १५-२० टक्के पब्लिकमुळे आमचा वेरिएबल पे अनेकदा अफेक्ट झाला आहे. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

तुम्हाला उद्देशून असं नाही पण

धन्या
Wed, 02/20/2013 - 20:41 नवीन
तुम्हाला उद्देशून असं नाही पण एक गोष्ट लिहावीशी वाटते की कुणी जर आपण आयटीत असूनही एकदाही बेंचवर गेलो नाही याचं कौतुक करुन घेत असेल तर ती ते अयोग्य आहे. त्यात कौतुक करुन घेण्यासारखं काहीच नाही. कुणाला लगेच प्रोजेक्ट मिळतो, कुणाला नाही मिळत. :)
मात्र बाकड्यांवर बसलेल्या १५-२० टक्के पब्लिकमुळे आमचा वेरिएबल पे अनेकदा अफेक्ट झाला आहे.
हे विधान मात्र चुकीचे आहे. बाकडयावर बसलेल्या १५ - २० टक्के पब्लिकमुळे बिलेबल पब्लिकच्या वेरियेबल पेवर कसा काय परीणाम होईल? १५ - २० टक्के बेंच ठेवणं ही मोठया आयटी कंपन्यांची गरज असते, व्यावसायिक धोरणाचा भाग असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

बरोबर आहे . १५ ते २०% बेन्च

जेनी...
Wed, 02/20/2013 - 20:49 नवीन
बरोबर आहे . १५ ते २०% बेन्च ठेवावाच लागतो .. अचानक आलेल्या प्रोजेक्ट्स्ना मॅनपॉवर अचानक कुठुन दाखवणार ?? . बेन्चवरच्या लोकांमुळे वेरिएबल पे कसा काय अफेक्ट होऊ शकतो ?? कळुद्या जरा आम्हा अज्ञानानाहि ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अचानक?

आजानुकर्ण
Wed, 02/20/2013 - 21:10 नवीन
प्रोजेक्ट्स असे अचानक येत नाहीत. अनेक महिने आरएफपी वगैरे भानगडी चालू असतात. प्रोजेक्ट कधी मिळेल याचे प्रोजेक्शन असते त्यानुसारच हायरिंग होते. आला माणूस की घ्या ठेवून किंवा आला प्रोजेक्ट की करा वगैरे करत नाहीत. वेरिएबल पेबाबत खाली माहिती दिलीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

थोडी असहमती

श्रीरंग_जोशी
Wed, 02/20/2013 - 21:17 नवीन
प्रकल्प बहुतेकवेळा अचानक येत नसले तरी काही वर्षानुवर्षांपासूनचे ग्राहक ऐनवेळी अधिक काम देतात अन त्यांच्या मागणीची पूर्तता करता न येणे हि कंपनीसाठी नामुष्की असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

हो तरीही २० टक्के जास्त वाटतात

आजानुकर्ण
Wed, 02/20/2013 - 21:53 नवीन
हो हे मान्य आहे. पण आता टीसीएस सारख्या २ लाख लोकांना नोकऱ्या देणाऱ्या कंपनीने त्यापैकी २० टक्के म्हणजे जवळपास चाळीस हजार लोकांना बिनकामाचा पगार द्यायचे ठरवले तर कसे काय होणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

सहमत

श्रीरंग_जोशी
Wed, 02/20/2013 - 21:57 नवीन
आजच्या परिस्थितीत २०% लोक बाकड्यावर ठेवणे म्हणजे नक्कीच घाट्याचा सौदा आहे. माझ्या निरिक्षणाप्रमाणे हे प्रमाण यापेक्षा बरेच खाली आलेले आहे पण खात्रीने सांगू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

८५+ % युटीलायझेशन म्हणजे

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 02/21/2013 - 01:39 नवीन
८५+ % युटीलायझेशन म्हणजे दिवाळी अहो. पुरावा हवा. हा घ्या. http://www.tcs.com/investors/Documents/Presentations/TCS_Analysts_Q3_13.PDF पुष्ठ क्रमांक १९ पहा. Utilization Rate • 81.7% (excluding Trainees) • 72.1% (including Trainees) शंभरातून बहात्तर गेले म्हणजे किती राहिले ?? मोड बोटे, कर हिशोब (पुलंकडून साभार). ०५८+% युटीलायझेशन म्हणजे दिवाळी अहो. पुरावा हवा. हा घ्या. http://www.tcs.com/investors/Documents/Presentations/TCS_Analysts_Q3_13.PDF पुष्ठ क्रमांक १९ पहा. Utilization Rate • 81.7% (excluding Trainees) • 72.1% (including Trainees) शंभरातून बहात्तर (किन्वा ब्यान्शी) गेले म्हणजे किती राहिले ?? मोड बोटे, कर हिशोब (पुलंकडून साभार).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 02/21/2013 - 01:50 नवीन
या माहितीबद्दल धन्यवाद. आशा आहे इतर मोठ्या कंपन्यांची परिस्थिती इतकी वाईट नसावी... सदर कंपनीबाबत इतर कंपन्यांमध्ये काम करणार्‍यांना नेहमीच कुतूहल वाटते... त्यांचे नफ्याचे आकडे नेहमीच अचंबित करून जातात. या कंपनीच्या उसातील कर्मचार्‍यांना इतरांच्या तुलनेत खूपच कमी पगार मिळतो असे ऐकले आहे (केवळ ऐकले आहे वाचलेले नाही ;-)).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

गंमत

आजानुकर्ण
गुरुवार, 02/21/2013 - 02:48 नवीन
सदर कंपनीची एक ऐकीव गंमत अशी की असे नॉन बिलेबल रिसोर्सेस हे नवीन क्लायंटला प्रपोजल देताना 'फ्री' म्हणून ऑफर करण्यात येतात. उदा. दोन डेवलपर्सवर एक डेवलपर फ्री वगैरे... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

काय सांगता?

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 02/21/2013 - 02:54 नवीन
ऐकावे ते नवलच. पण याच कंपनीच्या भारतातल्या कर्मचार्‍यांकडून ऐकले आहे की या कंपनीतली नोकरी सरकारी नोकरीइतकीच चैनीची नोकरी आहे म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

या कंपनीच्या अशा अनेक ऐकीव

आजानुकर्ण
गुरुवार, 02/21/2013 - 03:03 नवीन
या कंपनीच्या अशा अनेक ऐकीव गोष्टी अचंबित करणाऱ्या आहेत. उदा. यांचा बिलिंग रेट सर्वात कमी असतो. (मला वाटते ऑफशोअरसाठी 25 डॉलरपेक्षाही कमी). यांची बेंचस्ट्रेंग्थही सर्वांपेक्षा जास्त आहे, एवढे करुन यांचा फायदाही सर्वांपेक्षा जास्त असतो. मी कॉलेजात असताना वर्षभर सदर कंपनीच्या आर अँड डी विभागात ट्रेनी म्हणून काम केले होते. तेव्हा ही कंपनी आम्हाला हजार रुपये स्टायपेंड द्यायची. जो आमच्या क्लासमध्ये फक्त आणखी दुसऱ्या एक कंपनीतील ट्रेनींना मिळत होता. त्यामुळे कंपनीच्या एम्प्लॉईजला फायदे मिळत असावेत असे वाटते. शिवाय या कंपनीतील नोकरांना टाटाच्या अनेक उत्पादनांमध्ये (टायटन, इंडिका, तनिष्क वगैरे) सवलत मिळते असेही ऐकले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

कुछ तो बात है!!

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 02/21/2013 - 03:10 नवीन
२००९ च्या सुरूवातीला भारतातील एक नावाजलेल्या मा. त. कंपनीच्या आकडेवारीची बनवेगिरी उघड झाली होती. आशा आहे की येथे तसे काही नसावे. मी ज्याही ग्राहकांकडे (अमेरिकेतील कंपन्या) काम केले आहे तिथे या कंपनीची माणसे काम करीत नसल्याने काहीच अंदाज नाही की यांचे काम (एवढ्या कमी बिलिंगमध्ये) चालते तरी कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

फायदा होतच असणार

आजानुकर्ण
गुरुवार, 02/21/2013 - 03:20 नवीन
एखाद्या माणसाचे utilization 70 टक्के जरी पकडले. (म्हणजे वर्षाच्या 2000 तासांपैकी 1400 तास) आणि अगदी 25 डॉलरचा rock bottom रेट पकडला तरी 50 प्रति डॉलर भावाने त्या माणसाने कमावून दिलेला रेवेन्यू 17,50,000 रुपये इतका येतो. यातला निम्मा तरी नक्कीच फायदा असावा. शिवाय क्लायंटच सगळी सॉफ्टवेअर वगैरे देतो. कंपनीला डेस्कटॉप, चहाकॉफी वगैरे माफक खर्च.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

सहमत

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 02/21/2013 - 03:25 नवीन
फायदा होतच असणार नाहीतर.... बाकी भारत सरकार व अनेक राज्यसरकारांच्या खात्यांचे लाँग टर्म प्रकल्प या कंपनीकडे बहुसंख्येने असतात हे पण ऐकले आहे :-).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

अगदी,,..

उपास
गुरुवार, 02/21/2013 - 03:27 नवीन
कॉस्ट टू कंपनीचा जरी विचार केला तरी प्रचंड फायद्यात आहे हे प्रकरण, येन केन प्रकारेण (बी बिलेबल..) प्रॉजेक्ट मॅनेजरचं रेटींग त्याच्यावरच.. टॉप लाईन आणि बॉटंम लाईन ही अशी सरळ सरळ आहे. अवांतर : एक एच आर वाला, सीटूसी (कॉस्ट टू कंपनी) समजावत होता मागे जॉब बदलताना, म्हटलं तू मला पीटूसी (प्रॉफीट टू कंपनी) देतोस का काढून, माझयवर किती कमावते कंपनी आणि किती मला देते ते? मग लगे हात त्याला, तुमचे एम्प्लोयी हे तुम्ही एसेट म्हणून समजत नसून लाएबिलिटी समजता असं सांगत बिनपाण्याची करुन घेतली.. (थोडकयात कंडू शमवला) :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

यात इतर कंपन्यांमध्ये खूप फरक नाही.

मैत्र
Wed, 02/27/2013 - 10:47 नवीन
ऑफशोअर बिलिंग रेट्स हे खूप मोठ्या प्रमाणात बदलत नसावेत टीसीएस / विप्रो / इन्फी मध्ये. ३० डॉलर पेक्षा जास्त रेट ऑफशोअरला पहिल्या लेव्हलला (सॉफ्टवेअर इंजिनिअर) फार कमी वेळा पाहिला आहे (जवळजवळ नाही). इतर अनुभवी मिपाकरांनी याहून जास्त रेट पाहिला असल्यास जरूर शेअर करावे. नवीन माहिती उपयोगीच ठरेल. खूप जास्त फायदे काही मिळत नाहीत टाटा उत्पादनांमध्ये. २००४ मध्ये आय पी ओ जेव्हा आला तेव्हा मात्र चांदी झाली होती. एम्प्लॉइज शेअर्स कोटा इतका मोठा होता की बाजारात रिटेल गुंतवणूकदाराला बोलीच्या १/५ ते १/७ शेअर्स मिळत असताना एम्प्लॉईजना १-१ शेअर्स मिळाले होते. म्हणजे ज्यांच्याकडे पैसे होते तेव्हा त्यांनी किंवा बाजारातून / मित्रपरिवारातून उचलून ५-१० लाखाचे शेअर्स सुद्धा १-१ मिळाले होते आणि मोठा नफा कमावला होता. गेल्या ८ वर्षात मूळ गुंतवणूक आजच्या भावाने ६ पट झाली आहे. बेंच स्ट्रेंग्थ हा अतिशय गुलदस्तात ठेवला जाणारा आणि अतिशय फज केलेला (मराठी?) प्रकार आहे. एथिक्स आणी पारदर्शकतेसाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीत डोळ्यापुढे टिम्सच्या टिम्स बेंचवर दिसत असताना युटिलायझेशन ८०% दाखवलेले पाहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

आशा आहे इतर मोठ्या कंपन्यांची

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 02/21/2013 - 03:10 नवीन
आशा आहे इतर मोठ्या कंपन्यांची परिस्थिती इतकी वाईट नसावी
ही परिस्थिती वाईट नाही हो. वर पण ४-५ दा हा उल्लेख आला आहे. एक काम करा, इन्फोसिस च्या संकेतस्थळावरून हीच माहिती काढा आणि बघा.
या कंपनीच्या उसातील कर्मचार्‍यांना इतरांच्या तुलनेत खूपच कमी पगार मिळतो असे ऐकले आहे
असे काही नाही आहे. TCS, Infy, Wipro आणि तत्सम कंपन्यांना सगळ्या गोष्टी कम्पेरेबल ठेवाव्या लागतात. नाहीतर काशी लागेल. बघा जरा नीट विचार करून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

त्याचे असे आहे की

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 02/21/2013 - 03:13 नवीन
त्याचे असे आहे की काही लोक उसात येण्यासाठी तडजोड करायला तयार असतात त्यामुळे कमी पगार देणार्‍यांचे फावत असते. एल -१ व्हिसावर आलेल्यांना कंपनी बदलण्याचाही पर्याय नसतो त्यामुळे यायला मिळते यावरच ते लोक समाधानी असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

कौतुक

आजानुकर्ण
Wed, 02/20/2013 - 20:55 नवीन
त्यात कौतुक करुन घेण्यासारखं काहीच नाही. कुणाला लगेच प्रोजेक्ट मिळतो, कुणाला नाही मिळत.
वेल. असेच काही नाही. प्रोजेक्टवर असतानाच आपले स्किलसेट नेहमी अद्दयावत ठेवले की प्रोजेक्ट संपण्यापूर्वीच दुसरा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता वाढते. मात्र 'मला एवढेच येते आणि मी त्याच गोष्टीवर (आहे त्या ज्ञानावर अवलंबून राहून) एवढेच काम करणार अशी हटवादी भूमिका घेणारे महिनोन्महिने बेंचवर राहतात.) त्यामुळे या ज्या कुणाला प्रोजेक्ट मिळत नाहीत त्यांचे स्किल्स फारच स्पेशलाईज्ड असतात (जे फार कमी भारतीय आय टी कंपन्यांमध्ये आहे) किंवा त्यांचे स्किल्स रेडिली ट्रान्सफरेबल नसतात (जे सर्वच कंपन्यांमध्ये आहे)). शिवाय टेक्निकल स्किल बाजूला ठेवले तरी इतर डोमेन्स किंवा वर्टिकल्समधील प्रोजेक्ट मॅनेजर, रिसोर्स मॅनेजर यांच्याशी संपर्क साधून राहणे वगैरे सॉफ्ट स्किल्सही डेवलप करणे आवश्यक असते. त्यामुळे थोडेफार कौतुक करण्यासारखे आहे असे वाटते. बेंचवरील बहुतेकांचा अटिट्यूड हा 'असेल माझा हरी तर देईल प्रॉजेक्ट खाटल्यावरी' असा असतो.
बाकडयावर बसलेल्या १५ - २० टक्के पब्लिकमुळे बिलेबल पब्लिकच्या वेरियेबल पेवर कसा काय परीणाम होईल?
कारण हे 15-20 टक्के पब्लिक काहीच बिलिंग कमावत नसल्याने, जे बिलिंग कमावतात त्यांचा वेरिएबल पे अफेक्ट होतो! १०० रुपये बिलिंग कमावणारे १०० लोक असतील, आणि त्याचे वाटप ११५ लोकांमध्ये होत असेल तर बिनकामाच्या लोकांमुळे काम करणाऱ्यांचा पे अफेक्ट होतोच. सुदैवाने माझ्या कंपनीत काही वर्षांनंतर वेरिएबल पे फक्त बिलेबल रिसोर्सेसनाच मिळेल अशी धोरणअंमलबजावणी केल्यावर, बेंचवरच्या अनेक पब्लिकने आळस झटकून मिळतील ते प्रोजेक्ट करायला सुरुवात केलीच. बाकी 15-20 टक्के बेंच ठेवण्यामागचा आतबट्ट्याचा व्यवहार ध्यानात आल्यावर आता अनेक कंपन्या बेंचची साईज कमी करत आहेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

प्रतिसादातील पहिला परिच्छेद

धन्या
Wed, 02/20/2013 - 21:11 नवीन
प्रतिसादातील पहिला परिच्छेद नक्कीच माहितीपुर्ण आणि ऑप्टीमिस्टीक आहे. बेंचवर जाणार्‍यांनी असा दृष्टीकोन ठेवला तर बेंच कालावधी नक्कीच कमी होईल.
बेंचवरील बहुतेकांचा अटिट्यूड हा 'असेल माझा हरी तर देईल प्रॉजेक्ट खाटल्यावरी' असा असतो.
हे वाक्य मात्र सरसकटीकरण केल्यासारखं आहे त्यामुळे असहमत. बेंचवरील सारीच जनता अशी नसते. खुप जणांना काम मिळावे अशी प्रामाणिक ईच्छा असते आणि ते त्या दृष्टीने प्रयत्नही करत असतात.
कारण हे 15-20 टक्के पब्लिक काहीच बिलिंग कमावत नसल्याने, जे बिलिंग कमावतात त्यांचा वेरिएबल पे अफेक्ट होतो! १०० रुपये बिलिंग कमावणारे १०० लोक असतील, आणि त्याचे वाटप ११५ लोकांमध्ये होत असेल तर बिनकामाच्या लोकांमुळे काम करणाऱ्यांचा पे अफेक्ट होतोच. सुदैवाने माझ्या कंपनीत काही वर्षांनंतर वेरिएबल पे फक्त बिलेबल रिसोर्सेसनाच मिळेल अशी धोरणअंमलबजावणी केल्यावर, बेंचवरच्या अनेक पब्लिकने आळस झटकून मिळतील ते प्रोजेक्ट करायला सुरुवात केलीच.
काम करणार्‍या लोकांनी मिळवलेल्या उत्पन्नातूनच बेंचवाल्यांना पगार मिळत असला तरी तो व्यवसायाचा भाग आहे हो. त्यामुळे बिलेबल मंडळींनी आमच्या कमाईवर बेंचवाले बसून पगार घेतात असा टाहो फोडण्याला काहीच अर्थ नाही. जर बेंच नाही ठेवला तर त्याचा नविन येणार्‍या प्रोजेक्ट्सच्या संख्येवर (काही वेळा नविन क्लायंट मिळण्यावरही) परीणाम होईल आणि त्याचा थेट परिणाम कंपनीच्या प्रगतीवर होईल हे आयटी व्यवसायातील वास्तव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

+१

श्रीरंग_जोशी
Wed, 02/20/2013 - 21:23 नवीन
बाकड्यावर नसणार्‍यांनी बाकड्यावरच्यांना कंपनीच्या आर्थिक नुकसानासाठी दोष देणे म्हणजे एखादया गाडीच्या चार टायर्सनी स्टेपनीला दोष देण्यासारखे आहे? अचानक नवे काम आले तेव्हाच नव्हे तर काम करणार्‍यांपैकी कुणी आजारी पडला, कुणाला अपघात झाला, कुणाला अचानक अध्यात्माचा झटका आला तर बाकड्यावरचीच मंडळी कामी पडतात. मा.त. मध्ये अनेकांना सरळसोट काम मिळत नाही. नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे काम अंगावर पडत असते त्यामूळे वर्षा दोन वर्षांतून जर दोन तीन आठवडे बाकड्यावर बसायला मिळाले तर अनेकांना ते हवेच असते. त्यातून ताजे तवाने झाल्यावर नव्या प्रकल्पात अधिक जोमाने कामगिरी करता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

थोडेसे स्पष्टीकरण

आजानुकर्ण
Wed, 02/20/2013 - 21:39 नवीन
माझा आक्षेप गॅरंटीड पे बाबत नसून वेरिएबल पे बाबतच आहे. वेरिएबल पे हे एका स्वरुपाचे प्रॉफीट शेअरिंग असते. कंपनीला झालेला अधिकचा फायदा हा तो फायदा करुन देणाऱ्या लोकांमध्येच शेअर करावा हे न्याय्य आहे - आणि अशीच अंमलबजावणी आता अनेक कंपन्या करत आहेत.- बेंचवर असूनही प्रॉफीट शेअरिंगमध्ये हिस्सा देणाऱ्या कंपन्या आता मला माहीत नाहीत. मात्र दहा वर्षांपूर्वी बेंचवर असणारे आणि नसणारे यांमध्ये काहीच फरक केला जात नसल्याने स्वतःहून प्रोजेक्टवर जायला काहीच इन्सेंटिव नसायचा. एखाद्या व्यक्तीला प्रॉजेक्ट मिळवून देणे ही केवळ कंपनीच्या रिसोर्सिंग/फुलफिलमेंट टीमची जबाबदारी असल्याचा आभास निर्माण होऊन पब्लिक निवांत टंगळमंगळ करत राहत असे. दहा वर्षापूर्वी अगदी दीड-दीड वर्षे बेंचवर राहूनही ३०० ते ४०० टक्के वेरिएबल पे घेतलेली मंडळी मी पुण्यात पाहिली आहेत. आता प्रॉफिट शेअरिंग फक्त काम करणाऱ्यांंसोबतच होत असल्याने अशा टंगळमंगळ करणाऱ्यांना स्वतःहून प्रॉजेक्ट शोधण्यासाठी एक दट्ट्या मिळतो. आर्थिक नाड्या आवळल्या जात असल्याने झटापट नवनव्या गोष्टी शिकून लवकर प्रॉजेक्ट मिळवण्यासाठी खटपटी केल्या जातात. - जे योग्य आहे. इतर कोणत्या इंडस्ट्रीमध्ये अशी लक्झरी नसते. मुळात ही बेंचची भानगड ही या कंपन्यांच्या दोन-तीन महिने नोटीस पीरिअडच्या धोरणामधून आली आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

बाकड्याचे तोटे पूर्वीही असायचेच

श्रीरंग_जोशी
Wed, 02/20/2013 - 21:47 नवीन
आज जरी परिस्थिती कमालीची बदलली असली तरी पूर्वीही खूप काळ बाकड्यावर बसणार्‍यांना वार्षिक गुणांकनात मार खावा लागायचाच. अन पदोन्नातीही पुढे ढकलली जायची.. बाकी वैयक्तिक स्तरावरचे तोटे मूळ लेखात व चर्चेमध्ये उल्लेखिले आहेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

वार्षिक गुणांकन

आजानुकर्ण
Wed, 02/20/2013 - 21:51 नवीन
आयटीतले वार्षिक गुणांकन हा एक जोक आहे असे वाटते (हे कोणताही आयटीवाला मान्य करील). एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक कामगिरी त्या बेल कर्व आणि नॉर्मलायझेशनमध्ये अगदी गुळगुळीत होते. त्यामुळे ३.२ चे ३.१ होण्याव्यतिरिक्त फारसा फरक पडत नव्हता. शिवाय 'कंपनी माझ्यासाठी प्रॉजेक्ट शोधू शकत नाही ही कंपनीची चूक आहे माझी नाही' असे स्पष्टीकरण तयार असायचेच. मात्र सध्या कंपन्या करत असलेला आर्थिक उपाय हाच सर्वात परिणामकारक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

दहा वर्षापूर्वी अगदी दीड-दीड

राजेश घासकडवी
गुरुवार, 02/21/2013 - 06:58 नवीन
दहा वर्षापूर्वी अगदी दीड-दीड वर्षे बेंचवर राहूनही ३०० ते ४०० टक्के वेरिएबल पे घेतलेली मंडळी मी पुण्यात पाहिली आहेत.
या आयटीवाल्यांची दुःखं पाहून काळजाचं अगदी पाणी पाणी होतंय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

जरा आश्चर्य

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 02/21/2013 - 07:17 नवीन
आपल्या जालिय वावरावरून आपण मा.त. क्षेत्रात जुने जाणते तज्ञ असाल असा गैरसमज झाला होता. आपण तसे नाहीत हे पाहुन जरा आश्चर्य वाटले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

बेंच आणि व्हेरिएबल पे

मैत्र
Wed, 02/27/2013 - 11:15 नवीन
मी दुसर्‍या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे बेंच --> युटिलायझेशन --> अप्रेझल --> रेटिंग --> व्हेरिएबल पे पर्सेंटेज असा परिणाम होत जातो. रेटिंग प्रमाणे युनिट्चा आणि वैयक्तिक व्हेरिएबल पे कमी मिळणे हे नेहमीचे आहे. बेंच मुळे रेटिंग नाही आणि म्हणून उर्वरित काळात उत्तम काम करुनही प्रमोशन नाही हे बरेचदा घडते. मुळात इतर इंडस्ट्री ही इतक्या प्रमाणात पीपल बेस्ड नाही ज्यात इतकी वाढ / घसरणही होते. प्रॉडक्शन मध्ये वाढ झाल्यास बाहेरून काम केलं जातं / ओव्हरटाईम होतो / ऑर्डर बॅकलॉग होतो. घसरण झाल्यास बहुतेक वेळा टेम्पररी कामगार कमी केले जातात. त्यामुळे एकूणात बेंच ही संकल्पना फॉर्मल नाही. पण कुठलही मशीन १००% युटिलायझेशन केलं तर त्यात गरजेप्रमाणे वाढवण्यास वाव कमी राहतो. आय टी सोडून इतर इंडस्ट्री ही सगळा वेळ १००% वापरते आणि फक्त आयटी वालेच मजा करतात आणी टंगळ मंगळ करतात असे नाही. आय टी प्रमाणे पूर्ण प्रोजेक्ट बेस असलेली इंडस्ट्री म्हणजे ईपीसी - इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स -- ही मोठ्या प्रमाणावर आउटसोर्सिंग / सब काँट्रॅक्टिंग / टेंपररी कामगार यावर चालते आणि यातही परमनंट एम्प्लॉइजचं काम कमी जास्त होतं बेंचप्रमाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

सॉफ्ट स्किल्स

वामन देशमुख
गुरुवार, 02/21/2013 - 15:45 नवीन
… वगैरे सॉफ्ट स्किल्सही डेवलप करणे आवश्यक असते.
या मुद्द्याशी १००% सहमत. आइटी मधील बहुतेक लोक्स नवनवीन बाबी शिकण्याची तयारी, मौखिक आणि विशेषतः लेखी संवादकौशल्य, निर्णयक्षमता, नेतृत्वक्षमता, पेहराव आणि दृश्यव्यक्तिमत्त्व इ. सॉफ्ट स्किल्सबाबतीत अपेक्षेपेक्षा दोन पावले मागेच असतात असा माझा अनुभव आहे. आइटीमध्ये पुढारलेल्या विशेषतः दक्षिणेतील राज्यांतील ताज्या दमाच्या (fresher) आणि अनुभवी दोन्ही प्रकारच्या लोकांची कथा सारखीच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

दोन्ही बाजू

मैत्र
Wed, 02/27/2013 - 11:04 नवीन
ट्रान्स्फरेबल स्किल्स -- बरेचदा असे विविध स्किल्स वर काम केलेले लोक एक ना धड भाराभर चिंध्या होऊन जातात आणि प्रोजेक्टस मिळत गेले तरी कोअर स्ट्रेंग्थ आणि रेझ्युमे तयार होत नाही. आजूबाजूचे स्किल्स असावेत आणि वाढवावेत. पण "फ्लेक्झिबिलिटी" च्या नावाखाली आयटी मद्ध्ये जे काही चालतं त्याचं दु:ख त्यातून गेलेल्य व्यक्तीला चांगलंच माहीत असतं. इतर मॅनेजर्सशी संपर्क वगैरे सॉफ्ट स्किल्स -- सॉफ्ट स्किल्स हे बिहेविअरल स्किल्स असतात असा अंदाज आहे पॉलिटिकल नसावेत. बेंचवरच्या अनेक पब्लिकने आळस झटकून मिळतील ते प्रोजेक्ट करायला सुरुवात केलीच. -- बहुतेक ठिकाणी बेंचमुळे युटिलायझेशन पर्यायाने अप्रैजल रेटींग आणि म्हणून भविष्यातले प्रमोशन्स / पगार वाढ यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे बेंचवरचे सर्व आळशी असतात हा काही सर्वसामान्य नियम नाही. बेंचवर काही महिने गेल्यावर माणसे कशी असहाय होऊन वाटेल ते काम घेतात याची कल्पना असावी. त्याचा फायदा घेऊन अनेकदा काहीही असंबद्ध कामे गळ्यात मारली जातात. सीए मनुष्य युनिक्स वर आणि एमबीए टेक्निकल डिझाईनवर काम केलेले पाहिले. कर्मचारी आणि काम दोघांची वाट लागते. काही आडमुठे लोक असतात आणि त्यांना थोड्या अनुभवावर सगळं रेडीमेड हवं असतं हे खरं आहे. २००८-०९ मध्ये मंदीच्या काळात अनेक उत्तम लोक प्रोजेक्ट बंद झाल्याने बेंचवर आले. पुढचे प्रोजेक्टस नसल्याने लगेच काम मिळणे अशक्य होते ज्याचा त्यांचे स्किल्स/ अपग्रेडस / सॉफ्ट स्किल्स याचा काही संबंध नव्हता. या काळात ज्या कंपन्यांनी उत्तम युटिलायझेशन दाखवले आहे ते सपशेल खोटे होते. बरेचदा कॉफीबरोबर युटिलायझेशनचे आकडे कसे वाढवायचे आणि कुठल्या सब प्रॅक्टिसमध्ये किती वाईट स्थिती आहे आणि तरी त्यांनी काय भारी आकडा दाखवला आहे याची चर्चा व्हायची. अनेक कंपन्या बेंचची साईज कमी करत आहेत -- असावेत पण आत्तापर्यंत हा व्यवहार आतबट्ट्याचा नव्हता. अंगठ्याचा नियम -- सुमारे चार ते पाच दिवसाला कंपनी जेवढे बिलिंग तुमच्यावर क्लायंटला करते तेवढे त्या लेव्हलला महिन्याला ग्रॉस पगार असतो. यात थोडे कमी जास्त होते. बरेचदा ज्युनियर लेव्हलला कमीच. हा ढोबळ नियम आहे अगदी काटेकोर नाही पण वस्तुस्थितीपासून खूप दूरही नाही. या स्थितीत १५% बेंच अवघड नाही. इतर कॉस्ट वाढत आहेत आणि गेल्या तीन वर्षात पगार बरेच वाढले आहेत त्यामुळे बेंच परवडेनासा झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

त्यामुळे बेंच परवडेनासा झाला

५० फक्त
Wed, 02/27/2013 - 22:38 नवीन
त्यामुळे बेंच परवडेनासा झाला आहे. - मग आता काय सतरंज्या देणार काय कंपन्या यापुढं, अभ्या, काढतोस कारे एक चित्र, मोठा एसि हॉल आहे, चार बाजुला चांगल्या सतरंज्या, लोड,तक्के ठेवलेत, मधेच एक दोन पानाचे तबक आहेत, सकाळ ते संध्यानंद इकडं तिकडं विखुरलेत, एक दोन टिव्हीत इंद्रा द टायगर लावलाय,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

:) कमी केलेल्या अनेक कॉस्टस

मैत्र
गुरुवार, 02/28/2013 - 12:38 नवीन
५० भाऊ.. चित्र डोळ्यापुढे आलं .. झक्कास :) इंद्रा द टायगर वाचून फिस्सकन हसू आलं. मस्त.. एकूणात मार्जिन्स कमी झाले आहेत. प्रचंड CAGR असण्याची वर्ष केव्हाच मागे गेली आहेत. आतल्या गोटातली बातमी अशी ऐकली आहे की २८% पेक्षा कमी ऑपरेटिंग मार्जिन्स नसतील तर बिड न करणारी एक प्रसिद्ध कंपनी सुद्धा आता बरेचदा या तत्त्वाला मुरड घालू लागली आहे - याला अर्थात वाढती स्पर्धा, वाढलेल्या कॉस्टस, एकूणात थोडी खराब आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. उदाहरण म्हणून सांगतो -- २००५ पर्यंत तरी चहा कॉफी पूर्ण फुकट होतं. काही ठिकाणी अजून काही स्नॅक्स वगैरे फुकट होते. आता बहुतेक कंपन्यांमधून फुकट मिळणारी चहा कॉफी बंद झाली आहे. काही ठिकाणी पुर्वी कँटीन मध्ये बनवलेला चहा फुकट होता त्याजागी अतिशय टुकार चवीची पेये देणारी मशिन्स आली आहेत डीप टी बरोबर. अशाच एका कर्मचार्‍यांच्या सोयी सुविधांसाठी प्रसिद्ध कंपनी मध्ये २००८ पर्यंत प्रत्येक मजल्यावर वर्तमानपत्रे असायची. २००९ च्या मंदीनंतर ती फक्त तळमजल्यावर ठेवण्याची पद्धत सुरू केली. (बहुतेक इमारतींना २-३ मजलेच असण्याची पद्धत आहे त्यामुळे ते शक्य झाले). पूर्वी एम्प्लॉई डिपेंडंट्सचा मेडीकल इन्शुरन्स कंपन्या सरसकट करत होत्या. आता वयाच्या आणि इतर अनेक अटी घालून त्यात बरीच कपात केली आहे. काही ठिकाणी आई वडीलांचा मेडीकल इन्शुरन्स कंपनीच्या कॉस्ट्मधून काढून टाकण्यात आला आहे. एका प्रसिद्ध मोठ्ठ्या कंपनीत पूर्वी कॉस्ट सेंटर्स होती. (त्याचं नाव सांगितल्यास बहुतेक जुन्या लोकांना समजेलच -- स्वॉन SWON) त्या धोरणात मोठे बदल झाले आहेत आणि पूर्णपणे कॉस्ट सेंटर असण्याला परवानगी दिली जात नाही. बहुतेक कंपन्यांनी पूर्वी नसलेले व्हेरिएबल पे अमलात आणून कमी झालेला नफा हा एम्प्लॉइजच्या कॉस्ट मध्ये काही प्रमाणात वाचवला आहे. वरच्या पदांवर व्हेरिअबल पे चे प्रमाण खूप वाढले आहे. कँटीन सबसिडीज आता कंपन्या भरणे टाळतात आणि ती कमी केलेली किंमत त्या केटररला बिझनेस देण्याच्या बदल्यात गळ्यात मारतात असे काही वेळा पाहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

एका प्रसिद्ध मोठ्ठ्या कंपनीत

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 03/01/2013 - 00:32 नवीन
एका प्रसिद्ध मोठ्ठ्या कंपनीत पूर्वी कॉस्ट सेंटर्स होती. (त्याचं नाव सांगितल्यास बहुतेक जुन्या लोकांना समजेलच -- स्वॉन SWON) त्या धोरणात मोठे बदल झाले आहेत आणि पूर्णपणे कॉस्ट सेंटर असण्याला परवानगी दिली जात नाही.
SWON वर invoice रेज करता येतो आता ?? नक्की ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

ओळखीचे आहे चित्र

अभ्या..
Fri, 03/01/2013 - 01:04 नवीन
अभ्या, काढतोस कारे एक चित्र, मोठा एसि हॉल आहे, चार बाजुला चांगल्या सतरंज्या, लोड,तक्के ठेवलेत, मधेच एक दोन पानाचे तबक आहेत, सकाळ ते संध्यानंद इकडं तिकडं विखुरलेत, एक दोन टिव्हीत इंद्रा द टायगर लावलाय,
पन्नासदादा मला आयटीकंपनीचं चित्र काढायला सांगताय का झेड्पीजवळच्या काँग्रेस भवनाचे? बाहेर ताई आणि साह्यबाचे दोन डिजीटल पण लावतो मग ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

उलट स्थिती॑

मैत्र
Sat, 03/02/2013 - 21:29 नवीन
नाही नाही.. स्वॉन वर इन्व्हॉस करुन बिलिंग होत नसावे.. मी आता तिथे नाही. त्यामुळे नेमके सांगता येणार नाही. उलट अनेक / जवळजवळ सर्व स्वॉन बंद केल्याचे समजले आहे. त्यामुळे इंटर्नल कॉस्ट वर बिलिंग दाखवणे बंद झाले आणि युटिलायझेशन हे पूर्णतः क्लायंट बिलिंगवरच होते असे ऐकले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

कॉस्टसेन्टर्स पूर्ण बंद करणे

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 03/03/2013 - 01:25 नवीन
कॉस्टसेन्टर्स पूर्ण बंद करणे शक्य नाही. HR, Admin या सारखे विभाग हे पूर्णपणे कॉस्टसेन्टर्स असतात. इतकेच कशाला प्रत्येक बिल्डींगचे पण स्वॉन असते. या सगळ्या कॉस्ट त्या त्या विभागातील वॉन्स वर विभागून जातात. त्यामुळे तो खर्च कमी झाला कि आपसूकच युटिलायझेशन वाढते. यापेक्षा जास्त इथे लिहिता येणार नाही. Confidentiality चे बंधन आहे. व्यनित या, मारू गप्पा :-) (खूप लहान वयात वरील सिस्टीम्स आतून पाहिलेला) विमे ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

लेख आवडला.

मृत्युन्जय
Wed, 02/20/2013 - 12:35 नवीन
लेख आवडला. बेंचवर असणे काही काळासाठी खुप सुखाचे असेल यात शंका नाही. पण बेंचवर असण्याची काही तोटे कदाचित नॉन आय्टी पब्लिकला लक्षात यायचे नाहित: १. काही काळ बेंचवर असणे हे लगेच काम उपलब्ध नसल्याने होउ शकते. मात्र ६-७ महिने काम दिले जात नसेल तर बेंचवरचा इंजिनीयर माठ असणार असा समज होउ शकतो (तसे नसेल तरी). की माठ आहे म्हणुनच एवढे दिवस काम मिळत नाही. २. बेंचवर असणार्‍या माणसाची नौकरी रिसेशनमध्ये सगळ्यात आधी जाणार हे उघड आहे. ३. बेंचवरचा माणुस जर ७-८ महिने बेंचवर असेल तर त्याला नविन नौकरी शोधणेही अवघड जाणार. कारण ७-८ महिने अनुभव असा काहिच नाही. आयटी मध्ये पब्लिक लवकर आउट ऑफ नॉलेज जाते. शिवाय ८ महिने काम का दिले गेले नाही ह प्रश्न मुलाखत घेणार्‍याच्या मनात येणारच.
  • Log in or register to post comments

बाकड्यावर जायची संधी मिळालेली नाही

अनघा आपटे
Wed, 02/20/2013 - 12:48 नवीन
आयटीत आल्यापासून बाकड्यावर जायची संधी मिळालेली नाही. बाकी पहिले उदाहरण इन्फी बेन्च ला अगदी तन्तोतन्त लागू पड्ते आहे.
  • Log in or register to post comments

झकास....

मन१
Wed, 02/20/2013 - 12:52 नवीन
मस्त सुरु आहे. दहा वाजेपर्यंत तुमच्या एखादया त्रागा किंवा वैताग करणार्‍या मित्राबरोबर चहा आणि मसाला डोश्याबरोबर अध्यात्म, धर्म, जागतिक महायुद्धे, मानसशास्त्र असले विषय चघळता कोण बुवा अशी ही माठ नि निरुद्योगी त्रागाधारी मंडळी?
  • Log in or register to post comments

श्री. धन्याश्वर राव, सांगाच ओ

५० फक्त
Wed, 02/20/2013 - 15:27 नवीन
श्री. धन्याश्वर राव, सांगाच ओ कोण आहेत असे मित्र ? किंवा ' चहा डोश्यातलं अध्यात्म' असा धागा तरी काढा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

जाऊदया हो...

धन्या
Wed, 02/20/2013 - 19:55 नवीन
बिचारा आधीच खुप सार्‍या गोष्टींना वैतागला आहे. त्यात आम्ही असा काही धागा काढला आणि त्यातला आमच्या मुक्ताफळांनी त्याचा अधिक त्रागा झाला तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

वरील काही प्रतिसादांबाबतः-

मन१
Wed, 02/20/2013 - 12:55 नवीन
वरील काही प्रतिसादांबाबतः- बेंचमुळे करिअरची, रेझ्युमेची वाट लागते असे काही वर लिहिलेले दिसले. किती जण रेझ्युमीवर मी दोन्-चार महिने बेंचवर होतो असे लिहितात? (माझ्या पाहणयत असा एकही रेझ्युमे नाही. सो चिल.) . बेंचसाठी सात जन्माचा उपाशी
  • Log in or register to post comments

बेंचमुळे करिअरची, रेझ्युमेची

धन्या
Wed, 02/20/2013 - 19:47 नवीन
बेंचमुळे करिअरची, रेझ्युमेची वाट लागते असे काही वर लिहिलेले दिसले. किती जण रेझ्युमीवर मी दोन्-चार महिने बेंचवर होतो असे लिहितात?
बेंचवर गेल्याने तंत्र कौशल्याची वाट नक्कीच लागते. कारण विशिष्ट सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचं ज्ञान कापरासारखं उडून जाणारं असतं. जर एखादया संगणक तंत्रज्ञानावर तुम्ही महिना दोन महिना काम केले नाहीत तर ते तुम्ही विसरु शकता. नविन नोकरीसाठी अर्ज करताना सहसा दोन महिन्यांपेक्षा जास्त बेंच कालावधी दाखवला जात नाही. कारण दोन महिने मॅनेजेबल असतात. किंबहूना गेले दोन महिने बेंचवर आहे म्हणून दुसरी नोकरी शोधतोय अशी मखलाशी केली जाते. खरं कारण असतं, एवीतेवी बेंचवर आलोय तर थोडं नॉलेज रीफ्रेश करुन बाहेर ट्राय करायला काय जातंय. मिळाली दुसरी नोकरी तर तीस टक्के पगारवाढ कुठेच जात नाही. पंचवीस टक्के तर डोळे झाकून देते समोरची कंपनी. दोन महिन्यांपेक्षा जास्त बेंच कालावधी रीझ्युमेवर दाखवणं म्हणजे आपल्याच पायावर कुर्‍हाड मारून घेण्यासारखे आहे. ही व्यक्ती दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी बेंचवर आहे याचा अर्थ बरेच वेळा ही व्यक्ती प्रोजेक्ट मिळण्यास लायक नाही असा सरळ सरळ अर्थ घेतला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

मिळाली दुसरी नोकरी तर तीस

राजेश घासकडवी
Wed, 02/20/2013 - 22:35 नवीन
मिळाली दुसरी नोकरी तर तीस टक्के पगारवाढ कुठेच जात नाही. पंचवीस टक्के तर डोळे झाकून देते समोरची कंपनी.
तुमच्या दुःखांची यादी वाचून मला आणखीनच भरून येतं आहे. म्हणजे बेंचवर दोन महिने काढून आधीच वर्षाचा १६ टक्के पगार फुकट घ्यावा लागतो. त्यात फक्त २५ टक्के पगारवाढीची नोकरी शोधायला वेळ मिळतो.
ही व्यक्ती दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी बेंचवर आहे याचा अर्थ बरेच वेळा ही व्यक्ती प्रोजेक्ट मिळण्यास लायक नाही असा सरळ सरळ अर्थ घेतला जातो.
आणि मग काय, नाइलाजाने फक्त १० टक्के पगारवाढीची नोकरी स्वीकारावी लागते? इतके दुःखप्राय अनुभव गाठीशी नसल्याने 'सहानुभूती' देणं शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

रेझ्युमे

आजानुकर्ण
Wed, 02/20/2013 - 21:06 नवीन
मुळात किती लोक खरे रेझ्युमे लिहितात ते पाहावे. आयटीमधील खोटे रेझ्युमे (आमीरपेट, बेगमपेट मु.पो. हैद्राबाद येथील विद्यापीठे) याबाबतही एखादा लेख यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

आयटीमधील रेझ्युमेंचा खरेपणा

धन्या
Wed, 02/20/2013 - 21:19 नवीन
आयटीमधील रेझ्युमेंचा खरेपणा हा संशोधनाचा विषय ठरावा. एखादयाला या विषयात पीएचडीही मिळू शकेल. या विषयावरही नक्कीच लिहिण्याचा प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

बेन्च १५% च्या आसपास असावा.

बाळ सप्रे
Wed, 02/20/2013 - 13:47 नवीन
बेन्च १५% च्या आसपास असावा. ज्यायोगे नवीन प्रोजेक्ट सुरु करायलाही प्रॉब्लेम नसतो आणि मार्जिन्सही योग्य रहातात. १५% च्या खाली असेल तर रिक्रुटमेन्ट वाले जोरात कामाला लागतात. बेंच २०-३० % झाले तर सेल्स वाल्यांना आणि टॉप मॅनेजमेंटला रेड अलर्ट असतो. रेव्हेन्यु असुनही ग्रॉस मार्जिन्स २५-३०% च्या खाली आल्यास शेअर चा भाव लगेच कोसळतो.
  • Log in or register to post comments

च्यायला हे बेंच म्हंजे साल डोक्याला शॉट असतो.

खबो जाप
Wed, 02/20/2013 - 15:29 नवीन
च्यायला हे बेंच म्हंजे साल डोक्याला शॉट असतो. मी आधी मुंबई मध्ये एका टेलिकॉम कंपनी मध्ये होतो, पगार मनासारखा वाढत नव्हता म्हणून कुठून दुर्बुद्धी सुचली आणि हिंजवडी मधल्या एका नामवंत आय टी कंपनी मध्ये गेलो . त्यावेळी पगार चांगला मिळाला पण साला एक नंबर टुकार काम दिले होते (अंडर व्ह्यालू म्हणतात तसे). तसे पण आय टी कंपनी मध्ये सध्या काहीच काम नसते,नुसते सपोर्ट चे काम असते, ८-१० वर्षापूर्वी भरपूर आणि चांगले काम होते तो प्रोजेक्ट संपल्यावर बेंच वर,१५ दिवसात डोक्याचा नुसता भुगा झाला मग एक महिन्यातच एचारचाने अचानक मिटिंग साठी बोलावले, मला वाटले नवीन प्रोजेक्ट असेल तर म्हणाला कंपनीची पॊलिसि बदलली आहे पुढच्या एका महिन्यात नवीन प्रोजेक्ट शोध नाहीतर नोटीस दिली जायील . रिसोर्स एचार म्हणे सध्या कंपनी कडे नवीन प्रोजेक्टच नाही आहेत. मग म्हंटल काशी करा मी चाललो १५-२० दिवसात परत दुसऱ्या टेलिकॉम कंपनी मध्ये रिसर्च आणि देव्हलपमेन्त मध्ये नोकरी मिळवली. सध्या मजेत डोक्याला जास्त शॉट नाही, वर्षातून एक दोनदा परदेशात ऑनसायीट काम आणि परत आल्यावर इकडचे काम. आता आय टी वाले चांगले काम नाही म्हणून रडणारे मित्र बघितले कि कॉलेज चे दिवस आठवतात; आय टी कंपनी चा कॅम्पस अटेंड केला नाही म्हणून आम्हाला युसलेस आणि टाकावू म्हणायचे लेकाचे. पुण्यात असताना हिंजवडी मधल्याच दुसर्या एका नामवंत आय टी कंपनीतला ८ महिने बेंच वर असलेला मित्रपण बघितला होता.
  • Log in or register to post comments

च्यायला मी तरी इथे गाढवासारखा

पिंगू
Wed, 02/20/2013 - 17:12 नवीन
च्यायला मी तरी इथे गाढवासारखा राबतोय. अजून बेंच म्हणजे काय तो अनुभवच नाही. - पिंगू
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा