Skip to main content

ती खोली

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 29/01/2013 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
माजघराच्या डाव्या बाजूची ती खोली बंदच असते आजकाल खूप वर्ष झाली त्या खोलीत डोकावून ------- त्या खोलीत एक टोपली आहे जुन्या खेळण्यांनी भरलेली डालडाच्या मोठ्ठ्याश्या डब्यात काठोकाठ भरलेल्या गोट्या आहेत मी जिंकून आणलेल्या फक्त त्यांचे रंग धुसर झाले आहेत आता आरपार रंगीत जग दिसायचे तसे दिसत नाही आताशा ------- बरीच धूळ जमलीये त्या टोपलीवर धुळीखाली ते गर्द निळ्या रंगाचे विमान आहे खर तर एक पंख तुटलाय त्याचा पण जरा जोरात धक्का दिला तर खुरडत खुरडत चालते कधी कधी ------- एक माकडही आहे चावी दिल्यावर इवलासा ढोल वाजवणारे आताही चावी दिल्यावर हातातल्या इटुकल्या काड्या वरखाली करते पण आता काड्यांखालचा तो ढोल तेवढा निखळून पडलाय ------- खरंच खुप वर्ष झाली त्या खोलीत डोकावून ------ त्या टोपलीत कायम हसणारा एक बाहुला होता गोंडस, निरागस...गोबर्‍या गालांचा आडवं केलं की शहाण्या बाळासारखा झोपणारा आणि बसवलं की निळे डोळे मिचकावून पुन्हा हसणारा कुठे गेला कुणास ठाऊक.... बरेच दिवस शोधतोय ------- खरंच खुप वर्ष झाली त्या खोलीत डोकावून ।- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२९/०१/२०१३)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 23817
प्रतिक्रिया 55

प्रतिक्रिया

आई ग्ग... मिका.. तू कविता लिहू नको बाबा. कविता लिहायला घेतलीस की चरचरवणारं, आतून हलवणारं काहीतरी लिहीतोस. तुझ्या कवितांची ती अशक्य हुरहूर नकोच.. तू किरकोळ "सेफ" टाईप लिखाण करत जा बाबा.. साधं ललित, चित्रपट परीक्षण, पाककृती, विनोदी, प्रेमकथा असे आणि कितीक प्रकार पडलेत.

मनातली खूप खोलवरची तार छेडलीत मिकाराव ! अप्रतिम कविता !!

त्या टोपलीत कायम हसणारा एक बाहुला होता गोंडस, निरागस...गोबर्‍या गालांचा आडवं केलं की शहाण्या बाळासारखा झोपणारा आणि बसवलं की निळे डोळे मिचकावून पुन्हा हसणारा कुठे गेला कुणास ठाऊक.... बरेच दिवस शोधतोय अंगावर काटा आणि भयानक अस्वस्थ करणारा अनुभव.

In reply to by तर्री

अंगावर काटा आणि भयानक अस्वस्थ करणारा अनुभव.
अगदी शब्दशः तिव्र सहमत.. किती सहज वाक्ये... अन्...

In reply to by अग्निकोल्हा

कविता खुपच आवडली. गवि आणि इतर काही़जणांशी असहमत होऊन लिहीत रहा असे म्हणावेसे वाटते.

खूपच अर्थगर्भ कविता. विचार केला की जाणवतं प्रत्येकाच्या आयुष्यात अशीच एखादी 'खोली' असते. त्यात कमीजास्त खेळणी असतात आणि त्या खेळण्यांना बिलगलेल्या अस्वस्थ आठवणी. आज, सर्व महत्त्वाची कामे बाजूला सारून आठवणीतल्या ह्या सर्व खेळण्यांशी हळूवार खेळत बसावे असे वाटते आहे.

मुजरा स्विकराव. प्रत्येकाचे एक खोली आणि आपापली खेळणी असतात. तशीच माझी पण आहे. आधुन मधुन धुळ झटकतो. मनसोक्त खेळतो आणि परत ठेवतो. पुन्हा धुळ बसण्यासाठी... कविता खुप आवडली माझ्या ईतर मित्रांबरोबर शेअर करण्या साठी परवानगी हवी आहे. फक्त आपले नाव व्यनी करा म्हणजे सोपे होईल. cc

मनात पार खोलवर उतरली कविता. गेला ओसरुनी प्रकाश सगळा, हो म्लान ताजेपणा आता शोधुनही न भेटति पुन्हा त्या शैशवीच्या खुणा या शांताबाईंच्या ओळी आठवल्या.

आज, सर्व महत्त्वाची कामे बाजूला सारून आठवणीतल्या ह्या सर्व खेळण्यांशी हळूवार खेळत बसावे असे वाटते आहे. पण खेळता येत नाही म्हणूनच अतिशय अस्वस्थ वाटते. कविता आतवर हलवून गेली.

मि.का. ची कविता म्हटल्यावर उघडुन वाचायचे टाळत होतो. पण आज शेवटी रहावलच नाही आणि जे अपेक्षीत होते तेच झाले. नकोरे असले काहीतरी लिहूस, ओरखाडे काढणार. पैजारबुवा,

आत्ता ही कविता वाचताना समोरच "कायम हसणारा, गोंडस, निरागस...गोबर्‍या गालांचा बाहुला" खेळतोय, आणि उद्या त्याला सोडून दूरच्या मायदेशी जायचंय.... रडवलंत मिका. ahn

बर्याच दिवसानी येथे आलो.. कविता वाचली .. तुझ्या शब्दांमार्फत कधी तुझ्या कवितेतुन मी माझ्या गावात .. माझ्या जुन्या घरात गेलो कळलेच नाही ... निरागस आठवणीनी सुद्धा आजकाल खुप जखमा होतात ..

आज इतक्या वर्षांनी पुन्हा त्या खेळण्यांची आठवण आली ...आहेत अजून माझ्याकडे ...जपून ठेवलेली.... खेळेन म्हणतो परत...बालपण सापडेल कदाचित...धूळ असेल तर पुसेन त्यावरची... खूप मस्त..

व्वा. कविता आवडली. शेवटच्या ओळी क्या कहने. -दिलीप बिरुटे