✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अफझलखान वध - खानाला बुडविला !

म
मालोजीराव यांनी
Fri, 03/09/2012 - 23:44  ·  लेख
लेख
या युद्धात २ मराठा महिलांनी हि प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे भाग घेतला,दीपाबाई बांदल आणि बबई खोपडे दीपाबाई यांनी म्हसवडे या बांदल यांच्या कारभाऱ्या सोबत आपले सैन्य राजांच्या बाजूने लढायला पाठवले ,तर बबई खोपडेंनी आपले सैन्य खानाच्या बाजूने लढविले ! कान्होजी जेधे शिवरायांस मिळाले ! जेधे बाजी पासलकर यांचे जावई असल्याने जेधे आले कि पासलकर येतील असे खानाला वाटले, खानाने जेध्यांना आपल्या वाई प्रांत हवालदार त्र्यंबक कान्हो च्या कडून निरोप पाठवला. "आपला जमाव घेऊन सिताबीने यावे,खर्चाची तरतूद स्थळी केली जाईल,आम्ही तायाघाट ओलांडून गेलो आहोत" खान तोपर्यंत वाईहून निघोन कुसगाव,चिखली,तायाघाट ,गुव्हेघर,गुताड असे करत लिंगमळ्यापर्यंत पोचला. खालील पत्र जेध्यांस खानकडून आलेले आहे, ते पत्र जोडून अजून एक पत्र जेध्यांनी शिवरायांना पाठवले व या कमी त्यांचा सल्ला विचारला. जेध्यांना आलेले खानाचे पत्र जोडून जेध्यांनी शिवरायांना पाठवले यावर महाराजांनी धूर्त उत्तर देत कळविले "तुमचा व खानाचा घरोबा आहे,तरी तुम्ही जावे अथवा पुत्रास पाठवावे,नीट कौलभाक घ्यावी...दगा होईल असे होऊ देऊ नये " महाराजांवर विश्वास दाखवत जेध्यांनी शपथक्रिया आणि कौलफर्मान राजांना मागितले,कौल घेऊन जेधे आपल्या ५ मुलांसह राजगडी आले. तेथेही राजांनी सुचविले "बादशाही हुकुम मोडून तुम्ही येईन राहिलेत,वतन आणि जीवास अपय होईल तिकडेच जाणे" ...राजांच्या शब्दातील खोच लक्षात येऊन जेध्यांनी आपल्या वतनावर पाणी सोडले. जेधे आपल्या बाजूने आल्यावर राजांनी खलबते करण्यास मोरोपंत,सोनोपंत,नेतोजी पालकर,निळोपंत,रघुनाथ बल्लाळ,गोमाजी नाईक पानसंबळ,सुभानराव नाईक इ. मातब्बर बोलावले. नेतोजी पालकर यांना जावळी घाटमाथ्यावर व्यवस्था लावून दिली. अशी दोहो बाजूस तयारी चालू असता, कृष्णाजी भास्कर पत्र घेऊन शिवाजीकडे आला...पत्राचा मतलब असा होता "सरकारातून मला तुमच्यावर मोहिमेसाठी धाडले आहे, परंतु तुमचा व माझं घरोबा लक्षात घेऊन तुमच्या सर्व कृत्यांची माफी विजापूर दरबारातून करून घेईन, तुम्ही म्हणाल तसं तुमचा बंदोबस्त लावेन, शहाजीराजांपेक्षा मोठा मरातब होईल " पत्रातला छद्मीपणा राजांना कळला,त्यांनी कृष्णाजी भास्करास एक दिवस गडावर ठेऊन घेतले चांगली सरबराई केली.दुसर्या दिवशी जाताना बरोबर पंताजी गोपीनाथ (बोकील वकील) यांस पाठविले. "खानाचे चित्त आमच्या बर्यावर आहे कि वाईटावर आहे याचा कसून शोध घ्या " असे बजावले व खानास निरोप धाडला "आपण जावळीला यावे...आमच्या मनात कपट नाही " बोकीलांनी खानची एकांतात भेट घेतली "राजा कचदिल आहे,वाई ला येऊन भेट घेण्यास भितो " असे सांगून त्यास जावळी येण्यास राजी केले.भेट संपल्यावर बोकीलांनी खानाच्या लोकांस लाच-लुचपत देऊन खानाचा ठाव घेतला असता कळले कि खानाच्या मनात फार्मानाप्रमाणे काहीही करून शिवाजींस ठार मारणे आहे.पंतांनी लगोलग हि गोष्ट राजांना कळविली. जिजाऊ मा साहेबांनी सुद्धा युद्धापूर्वी "मुसलमान बेईमान, खान राखीना तुम्हाला " असे बजावले होते. अफझल खान अफझल खानाच्या गोटात राजांच्या हेरांचा सूळसुळाट होता,कोणी विश्वासराव नावाचा हेर रोज फकिराचा वेश घेऊन खानाच्या गोटात फिरत असे आणि ती खबर दरबारी पोचवत असे. मजल दरमजल करत खान पार मुक्कामी मार्गशीर्ष शुद्ध पंचमी ला आला लगोलग राजांस त्याने भेटीचे वेळ आणि स्थळ ठरविण्यासाठी वकील पाठवला. बुरुजाखालील माची भेटीचे ठिकाण ठरविले,शिवरायांनी त्या ठिकाणी सपाट जागेत उत्तम सदर तयार करण्यास अण्णाजी रंगनाथ तळेकर (कि मळेकर?) यांस सांगितले, येण्याची वाट झाडे तोडून दगड हटवून सोपी करून दिली,पण जिथे जिथे वाट रुंद होती तिथली वाट जाणून बुजून अरुंद केली गेली कि जेणेकरून जास्त लोक एका वेळी येऊ शकणार नाहीत. सदर - तयार केलेली सदर शाही इतमामास साजेशी होती. देरे,बिछाने, अस्मान्गिरी गिर्द्या ,तक्के ठेवून जागा सजविली होती.देर्यास चंद्रराई कळस सोन्याचे बसवले होते .मोत्याच्या झालरी लावल्या होत्या ,उंची मखमली पडदे होते.शामियान्यात एक चौथरा तयार करोन खाशांस बसण्याची व्यवस्था लावली होती.चौथरा ३३ फुट रुंद ,दक्षिणोत्तर ४० फुट असा होता. (१९२० सालापर्यंत चौथरा अस्तित्वात होता). तयारी - सैन्य चौफेर पसरेल असे ठेवले होते,"चौकशीस हवालदार ,किल्लेदार,कारकून,कारखाननिस आदिकरून जातीने राहून चौकशी करावी,राखावी,यावे-जावे. वाड्यापर्यंत दरवाजाचे आत ठायी ठायी चौकी-पहारे असावे,दरवाज्यावरी-कचेरीनजीक तोफा ठेविल्या | बार होताच हुश्शार व्हावे " अशी ताकीद राजांनी दिली . बुरुजाच्या आतल्या बाजूस पन्नास तोंडाशी शंभर, मोकळ जमिनीस शे-पन्नास अशी किल्ल्यावर व्यवस्था.तर किल्ल्याखाली व सभोवताली व्यवस्था अशी होती. चंद्रगडावर जमाव ठेवला,हैबतराव व बालाजी शिलीम्कारास बोचेघोळ घाटी ठेवले, नेतोजी पालकर घाटमाथ्यावर थांबले,जावळीच्या अंगाला बांदल सैन्य थांबले.हिरोजी फर्जंद मंडपाजवळील दरडीत पन्नास माणसानिशी लपले. "जाऊ जाणे येऊ नेणे ! अशी गत रदबदल्याची झाली " (चक्रव्युहात स्वताच अडकला) त्या दिवशी ( मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी) ला सकाळी ब्राम्हण बोलावून द्रव्य,धर्म हस्तके,गोदाने दिली.केदारेश्वराची पूजा-प्रार्थना केली. दुपारी दोनप्रहर सुमारास राजे सदरेस जायला निघाले- अंगात चिलखत वर जरीची कुडती,अस्तनीत नवटाकी पट्टा घातला.भवानी आईचे स्मरण केले. मातोश्री जिजाउस भेटून जर दगाफटका झाला तर उमाजीस * राज्य द्यावे असा मानस केला (उमाजी - शिवरायांचा वडिलभाऊ संभाजी यांचा पुत्र) त्यावर जिजाउ साहेबांनी " काही वाकडे पडल्यास गर्दी जमवून शत्रूस बुडवावे राज्य रक्षावे" असा सल्ला दिला, जवळ जमलेल्या सर्व मातब्बरास नावाजून राजे म्हणतात "तुम्ही सर्व शूर-पराक्रमी आहा,आमची मदार तुमचेवरच,सर्वांनी शर्थ करावी राज्य तुमचेच आहे" . इकडे खान दीड हजार बंदूकवाले घेऊन सदरेस निघाला त्याला असा येताना पाहून बोकीलांनी त्यास अडवले आणि "एव्हडा जमाव कशाला, राजा धाशात खाईल,वापस जाईल " असे सांगून सगळे हशम हटविले. खान,कृष्णाजी भास्कर,सैद बंडा , कमलशा मुर्शेद आणि दोन हुद्देकारी सशस्त्र एवडेच सदरेपाशी आले. सैद बंडा ला सुद्धा बोकीलांना सांगून दूर करविले तो जाऊन सदरेबाहेर थांबला.खानाच्या पालखीचे ३२ भोई बाहेर थांबले . इथे राजे जिऊ महाला आणि संभाजी कावजी सोबत सदरेपाशी आले. (जीवा महाला - याचे पूर्ण नाव जीवा महाला सकपाळ जातीने न्हावी याच्या वंशजांना कोंडिवली गावी काही जमीन इनाम आहे. संभाजी कावजी - याचे पूर्ण नाव संभाजी कावजी कोन्धालकर, धोम धरणापाशी कमळगडाजवळ पायाथ्यास यांचे गाव आहे , युद्धानंतर राजांकडे याने शिरवळ वा वाई च्या देशमुखीची आशा धरली त्यास नकार दिल्याने तो नंतर च्या काळात शास्ताखानास मिळाला ) प्रत्यक्ष भेट - उंच बळकट शरीराचा खान शामियान्यात आला खानासमवेत कृष्णाजी पंत व विठ्ठलपंत मरठेकर होते,तर महाराजानसोबत पंताजी बोकील होते. खानाने कृष्णाजीला 'हाच शिवाजी काय' अशी पूस केली ,तसेच राजांनी बोकीलांना 'हाच खान काय ' विचारले.आगत स्वागत ओळख करून देण्यात आली. दोघेही सामोरे गेले भेटीसाठी उभे ठाकले, खानाने शिवरायांची हि इतिहासप्रसिद्ध गळाभेट घेतली,तत्क्षणी खानाने राजांची मुंडी कवटाळून काखेखाली धरली ,राजीयास घेरी आल्यासारखे झाले. खानाचे कमरेस भली मोठी जमदाड होती तिचे म्यान टाकून खानाने जमदाड राजांच्या कुशीस चालवली,आत चिलखत असल्याने खरखर आवाज झाला,वर अंगास लागला नाही. वार झाल्याचे लक्षात येताच राजांनी चपळाईने पूर्ण बळ एकवटून बिचवा खानाचे पोटी मारला.एकांगी करून तडाख्याचा वार केला (एकांगी - बगले कडून बाजूला सरून दुसर्या बाजूने जोर लावणे) या तडाख्यामुळे खानाची आतडी बाहेर आली ,खान पंतास 'दगा केला दगा केला' म्हणू लागला.तेवढ्यात महाराजांनी खानवर दुसर्या हाताने पट्ट्याने वार केला त्यात खानाचे दोन भाग होऊन खान पडला. कृष्णाजी पंताने फिरंग काढून राजांवर वार टाकला पण तो बसला नाही,तेव्हा कृष्णाजी पंताने भोयास आत बोलाविले,त्यानी खानास गोळा करून पालखीत भरला व पालखी पळवू लागले.या गोंधळात सैद बंडा आत आला आणि त्याने पट्ट्या चा वार राजांवर टाकला,तो अडवून राजांनी उलट पट्ट्याचा वार बंडा वर केला. तो चुकवून पुन्हा पट्ट्याचा वार करण्यास सैद बंडा ने जवळीक केली तसा जीवा महालाने पुढे सरसावत फिरांगीने बंडा चा हात कापला. तसच जीवा आणि संभाजी कावजी शामियान्याबाहेर गेले आणि खानाची पालखी घेऊन पळणाऱ्या भोयांचे पाय कापले,तसा तो डोलारा खाली कोसळला आणि कावजीने खानाला पालखीतून बाहेर काढत त्याचे मस्तक कापले. इकडे शामियानात झालेल्या धुमाळीने पंताजी बोकीलांवर सुद्धा काही वार झाले,तर कृष्णाजीला राजांनी त्याच्या लष्करात बातमी सांगण्यास सोडून दिले,गड उतरताना झालेल्या कचाकचीच्या लढाईत त्यास अपय होऊन तो मारला गेलं असावा असे काही इतिहासकार सांगतात. (बर्च्याच ठिकाणी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी शामियान्यातच मारला गेल्याची नोंद आहे ) खान पडल्यापडल्या गडावरच्या मराठ्यांनी तोफेला बत्ती दिली.तोफेचा आवाज विरायच्या आतच अचेतन असलेले जावळीचे रान मराठ्यांच्या किल्कारीने पेटून उठले, बाजी सर्जेरावाने जीवाची शर्थ केली. कान्होजी जेधे,बांदल यांनी पारघाटाच्या सैन्यावर हल्ला केला,मोरोपंत कोकणच्या बाजूने घुसले.अशी सगळी रण-धुमाळी माजली,तोफेला बत्ती कुणी आणि का दिली हे खानाच्या सैन्याला समजलेच नाही. सावध झाल्यावर खानाच्या सैन्यानेही नेटाने प्रतिहल्ला केला. शामराज पद्मनाभी व त्र्यंबक भास्कर हे मोठे सरदार कामी आले. "कोणी हत्यार धरू असेल त्यास जीवे मारावे प्राणानिशी ठेऊ नये" असे आदेशच मिळाले होते. 'अलिशान अफझलखान महमदशाही' ची पार दुर्दश करून टाकली,महादिन पठाण,उज्दिन पठाण,रोहिले ,अरबी मुसलमान दुलीस मिळवले. झुंझारराव घाटगे,सुलतानजी जगदाळे हे मातब्बर आदिलशाही सरदार पाडाव झाले,तसेच मंबाजी भोसले आणि जगताप हि पाडाव झाले. अफझुल्या चा पोरगा फाझल जीव वाचवायला कोयनाकाठाने कऱ्हाड च्या दिशेने पळत सुटला असता खंडोजी खोपड्याच्या हाती लागला,परंतु फाझल खानाने पैशाचे आमिष दाखविताच लोभापायी त्याने फाझल ला सोडून दिले, हि बातमी गडावर कळताक्षणी राजांनी खान्डोजीस धरून आणविला आणि त्याचे डोके उडवले. कापड ,हत्यारे, वाई ला असलेला तोफखाना, बाराशे उंट,४-५ हजार घोडे, ४ लाखाहून जास्त जवाहीर, ७-८ लाख रोकड असा बराच मुद्दे माल सरकारात जमा झाला. राजांनी सर्वात आधी युद्धात जायबंदी झालेल्यांची पूस केली,कोणाला २००,१००,५०,२५ होन अशी जखम पाहून दिले, कामी आलेल्यांच्या मुलास चाकरीस घेतले. पुत्र नाही त्यांच्या बायकांस अर्धे वेतन चालू ठेवले.त्यांचे कार्य करून दिले.सांत्वन केले, रण गाजवलेले मोठे धारकरी होते त्यांस कोणाला हत्ती,घोडे ,सोन्याचे कडे,माळा,तुरे चौकडे असे नावाजले. पंताजी गोपिनाथांना हिवरे गाव वंश परंपरेने इनाम करू दिले तसेच १ लक्ष होन बक्षीस दिला. देवीच्या समोरील बाजूस डोंगराचे टोक होते तिथे खानाचे मुंडके पुरल्याचे सांगण्यात येते, नंतर भोवती बुरुज उभारला 'अब्दुल्ला(अफझल) बुरुज ' , शरीर पडले तेथे कबर बांधली त्याच्या दिवा बत्तीची सोय भवानी मंदिरातर्फे करण्यात येते.कबरी पुढे उरुसात नारळ फोडण्याचा मन देवी संस्थानाला असतो,दसर्याला पालखी इथे सदरेजवळ थांबते पूजा अर्चा होऊन पुन्हा गडावर जाते. (उत्तरेतील बर्याच इतिहास करांचे म्हणणे पडले कि शिवरायांनी दगा करोन खानाचा खून केला,कहर म्हणजे मुसलमान इतिहासकारांनी तर असे लिहिले कि राजांनी खानास एकट्यास जेवायला गडावर बोलाविले, खान आल्यावर गडाचे दरवाजे लाऊन घेऊन राजांच्या माणसांनी खानाला मारिले. :P , सर जदुनाथ सरकारांनी सुद्द्धा अप्रत्यक्षपणे असेच सुचविले आहे.महम्मद खाफीखान ,साकी मुस्तैद खान,अडोल्फ बेंडसर,भीमसेन सक्सेना या मोगलांच्या तर्फेच्या लोकांनी सुद्धा शिवरायांनाच या प्रकरणी दोषी ठरवत ठपका ठेवला. परंतु खानाकडे राजांना मारायचे फर्मान होते हे माहित असताना शिवरायांनी जे केले ते योग्यच होते. वरील लोकांचा मराठी साधनाचा अभ्यास कमी असल्याने स्थानिक राजकीय स्थितीचा आणि खानाच्या पूर्वीच्या दगाबाजीच्या इतिहासाचा विचार या लोकांनी केला नाही. खानाचा वधच केला जाणे गरजेचे होते. ) अफझल बुरुज प्रतापगडावर मोठा सोहळा केला,सगळे आनंदून गेले, भवानी आईची कृपा झाली समजून राजांनी चांगले कारागीर बोलावून त्यास तुळजापूर ला पाठविले आणि मूर्तीचे तसेच ध्यान करून तशीच मूर्ती गंडकी शिळा आणून प्रतापगडावर घडविली.राजेश्री मोरोपंत पिंगळे आणि त्यांच्या पत्नी च्या हस्ते मूर्ती बसविली. श्री भवानी आई (देवीस रायगडात २ आणि सातार्यात ११ गाव इनाम होते, पेशवा कडूनही एक २०० व एक ३०० अशी मिळून पाचशे रु ची साडीचोळी सालीना होती,औरंगजेबाच्या आक्रमणा वेळी काही वर्षे मूर्ती काढून दुसरीकडे हलविण्यात आलेली, नंतर ती पुन्हा आणून बसविली गेली) जिजाउंचा आनंद गगनात मावेना त्यांनी अनेक धर्म केले,दान केले. आपल्या पुत्राचा पराक्रम पुढील पिढ्यांच्या लक्षात राहावा म्हणून शाहीर बोलावण्यात आले. अज्ञानदास शाहिराने हाती डफ आणि तुणतुणे घेऊन हे पादशाही सरदाराचे भांडण आणि शिवाजी सर्जाचे दलभंजन खड्या आवाजात गायले ! "शिवाजी सर्जानं इनाम घोडा बक्षीस दिला | शेरभर सोन्याचा तोडा हातात घातीला " खानाने स्वतासाठी बनवून घेतलेली कबर ...पण बिचारा तेथे दफन नाही होऊ शकला ! (शहाबाग,विजापूर ) अली आदिलशहा प्रतापगड नकाशा खान आपल्या सैन्यासकट जावळीत बुडाला हे ऐकून विजापूर दरबारात धरणीकंप झाला ,बडी बेगम शोक करू लागली तर औरंग्या चे धाबे दणाणले, कारण याच अफझल खानाने एके काळी या औरंग्याला जिवंत पकडून नंतर मोठी खंडणी घेऊन बिनकपड्याचे सोडून दिले होते ! अफझलखान वध हि राजकीय दृष्ट्या फार मोठी गोष्ट घडली,कारण त्यानंतर विजापूरकर या धक्क्यातून सावरायच्या आतच शिवरायांनी स्वराज्य एकाच महिन्यात दुपटीने वाढविले,मराठा सैन्याने कोकणात राजापूर तर घाटावर पन्हाळा,विशालगडा पर्यंत धडका मारल्या ! आमच्या राजाला २० वर्षे आणखी आयुष्य लाभलं असतं तर त्यांनीच दिल्लीपर्यंत धडक मारली असती अटकेपर्यंत धडक मारून भगवा रोवणाऱ्या मराठेशाहीची हि खरी सरुवात होती ! जय भवानी ,जय शिवाजी ! शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

Book traversal links for अफझलखान वध - खानाला बुडविला !

  • ‹ अफझलखान वध !!!
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
समाज
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
माहिती

प्रतिक्रिया द्या
33606 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

प्रतिसादांतून

मन१
Fri, 03/16/2012 - 11:35 नवीन
सर्वाम्च्याच प्रतिसादांतून अधिक माहिती मिळते आहे.....
  • Log in or register to post comments

चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात

JAGOMOHANPYARE
गुरुवार, 05/31/2012 - 21:43 नवीन
चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा शिवरायानी पट्ट्याच्या एकाच घावात वध केला. असा उल्लेख आहे. हा शासनमान्य इतिहास असल्याने तो खरा मानायला हरकत नसावी. http://3.bp.blogspot.com/_hrgE3emTGYk/TRxhmrhboHI/AAAAAAAAAeo/74RHh0tO2q8/s1600/74111_130618983659734_100001349000310_144055_4920309_n.jpg
  • Log in or register to post comments

मी व्यक्तीविषयी विचारले होते...

योगप्रभू
गुरुवार, 05/31/2012 - 22:54 नवीन
पंताजी गोपीनाथ बोकील यांचे राहते गाव, वंशजांचा उल्लेख जसा तपशीलवार आहे तसा कृष्णाजी भास्करचा उल्लेख कुठे आला आहे का? हा माणूस कोण होता?त्याचे गाव कुठले? तो एकदम खानाचा वकील कसा झाला, अशी माहिती अभिप्रेत आहे. त्याबद्दल कुणी सांगू शकेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

अवांतर...

अर्धवटराव
Fri, 06/01/2012 - 00:24 नवीन
>>...हा शासनमान्य इतिहास असल्याने तो खरा मानायला हरकत नसावी. -- इतिहासाच्या खरेखोटेपणाची कसोटी शासनमान्यतेवर अवलंबुन असावी? अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

हो.. कारण शासनाला सगळे

JAGOMOHANPYARE
Fri, 06/01/2012 - 12:11 नवीन
हो.. कारण शासनाला सगळे पुरावे,संदर्भ जपून ठेवावे लागतात. तुम्ही अभ्यास मंडळाला विचारले तर सांगू शकतात. बाकी खाजगी लेखक असे पुरावे द्यायला बांधील नसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

शासन मान्य पुरावा...

अर्धवटराव
Fri, 06/01/2012 - 23:04 नवीन
ह्म्म... शासनाने सगळे पुरावे, संदर्भ जपुन ठेवावे हे टेक्निकली बंधनकारक असेल, पण या बाबतीत शासन किती उदासीन आहे याचे प्रत्यय इतीहासाच्या अभ्यासकांना वारंवार येतात. मुळ मुद्दा असा, कि एखाद्या ऐतिहासीक ग्रे एरीयावर शासनाने ठप्पा मारल्यास तो काळा-पांढरा व्हावा? शासन संस्था कधिच इंपार्शल राहु शकत नाहि. इतीहासाच्या बाबतीत तर नाहिच नाहि. अफझलखान वध, आग्र्याहुन सुटकेचा प्रयत्न/मार्ग (आझाद हिंद सेना, सुभाशबाबु वगैरे गोष्टी तर अजुनच डार्क... )अशा घटना शासनमान्य इतीहासाच्या संदर्भातुन नि:पक्ष म्हणुन स्विकारता येणे अवघड आहे... अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

अफजलखानाचे चित्र पाहिले. पण

आशु जोग
गुरुवार, 05/31/2012 - 23:57 नवीन
अफजलखानाचे चित्र पाहिले. पण अफजलखानाबद्दल अधिक माहीती मिळेल का ? कोण कुठला ? घराणे कुठले ? भारतीय की परदेशी. स्वतःला बुतशिकन म्हणवून घेत असे, क्रुफशिकन म्हणवून घेत असे. याचा अर्थ काय ? त्याच्यात असे कोणते गुण होते म्हणून बादशाहाचा तो वजनदार सरदार होता.
  • Log in or register to post comments

अफजलखान अफगाणिस्तानचा होता.

JAGOMOHANPYARE
Fri, 06/01/2012 - 12:09 नवीन
अफजलखान अफगाणिस्तानचा होता. तो 'वजन' दार होता, म्हनुन बादशाचा वजनदार सरदार होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

केवळ

अन्तर्यामी
Fri, 06/15/2012 - 12:59 नवीन
केवळ अप्रतिम.....!!!!!!!!!! अत्यन्त सुन्दर ............. राजे खरच तुम्हि आज जन्माला या हो............
  • Log in or register to post comments

जय भवानी ,जय शिवाजी !

भटक्य आणि उनाड
Sun, 02/17/2013 - 17:49 नवीन
छान लेख.अप्रतिम.....!!!!!!
  • Log in or register to post comments

अजून एक

सृष्टीलावण्या
Sun, 02/17/2013 - 19:30 नवीन
आपल्या पुत्राचा पराक्रम पुढील पिढ्यांच्या लक्षात राहावा म्हणून शाहीर बोलावण्यात आले.
प्रसिद्ध इतिहास संकलक अप्पा परबांशी बोलताना एक महत्त्वाचा मुद्दा कळला की आपल्या शिवबाने कोणताही भाट-चारण कधीच पूर्णकालिक सेवेत ठेवला नव्हता. जरी ह्या शाहीर अज्ञानदासांनी अथवा कवि भूषणांनी येऊन शिवरायांचे पोवाडे गायले तरी त्यांना बिदागी देऊन तत्काळ परत पाठवण्यात आले. बहुदा कायमस्वरूपी स्तुतिपाठक राजांच्या तत्त्वांत बसत नव्हते किंवा (विशेषकरून) गडांवर अनावश्यक (युद्धोपयोगी नसलेले) मनुष्यबळ असणे हे राजांना मान्य नसावे.
  • Log in or register to post comments

मग कवींद्र परमानंद कोण होते

बॅटमॅन
Mon, 02/18/2013 - 12:43 नवीन
मग कवींद्र परमानंद कोण होते ब्वॉ? भाटचारणापेक्षा वेगळे कोणी ते होते असे दिसत नाही. ते तर लै घटनांमध्ये महाराजांच्या बरोबर होते. शिवभारत या काव्याचे कर्ते म्हणून त्यांचे स्थान फार महत्वाचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सृष्टीलावण्या

अफजलखानाचे पोट फाडले,

आशु जोग
Sun, 02/17/2013 - 23:21 नवीन
अफजलखानाचे पोट फाडले, शायिस्तेखानाचे बोटे तोडली असे उल्लेख असलेले धागे इथे टाकले जातात आणि ते पुन्हा का वर आणले जातात त्यामुळे हळव्या लोकांची मने दुखावली जातात (मनाने हळवा) जोग
  • Log in or register to post comments

रणजित देसाइ

कपिलमुनी
Mon, 02/18/2013 - 00:45 नवीन
यांचे एक पुस्तक आहे या विषयावर ..कुणाला नाव आठवते आहे का?
  • Log in or register to post comments

आज परत (कितव्यांदा कुणास ठाऊक

अभ्या..
Sun, 04/08/2018 - 13:46 नवीन
आज परत (कितव्यांदा कुणास ठाऊक) वाचले. परत एकदा जय भवानी जय शिवराय. . ह्या मालोजी, वल्ल्या, ब्याटमानाला लिहायला सांगा रे.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

आनंदयात्री
Wed, 04/11/2018 - 06:26 नवीन
हेच म्हणतो! मालोजीराव आहेत कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

योजक: तत्र दुर्लभ: या

Ram ram
Tue, 04/10/2018 - 14:26 नवीन
योजक: तत्र दुर्लभ: या न्यायाने शिवराय एक कुशल योजक, नेतृत्व होते. लहान असतांना लाडके शिवबा होते. माणसे जोडणे,दुरदृष्टी असणे,अन्यायाची चीड इ. गुणांमुळे राजे स्वराज्य निर्माण करू शकले.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: Ramgude Prakas…
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 16:44
  • सदस्य: kalash११
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 23:00
  • सदस्य: newexploring2020
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 22:15
  • सदस्य: अकोलेकर
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 18:00
  • सदस्य: राजा स्वामी
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 12:15
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा