रमेश व सुरेश
आटपाट नगर होतं, खेडेगाव म्हंटलं तरी चालेल. लोक खाऊन -पिऊन सुखी होते कारण गरजेपुरते उत्पन्न जवळ जवळ प्रत्येकालाच मिळत होते.या गावात एका जोडप्याचा संसार सुरू झाला -रामराव व जनाबाई. रामरावांच्या वडिलांची वडलोपार्जित शेतजमीन होती (क्षेत्रफळ ४ एकर). शेताच्याच एका कोपऱ्यात एक झोपडीवजा घर होते. रामराव व जनाबाई स्वतःच्याच शेतात राबत असत. दिवसामागून दिवस गेले, वर्षामागून वर्षे गेली. रामराव व जनाबाईंच्या संसारवेलीवर फुले उमलली मोठा रमेश, मग जाई व जुई या जुळ्या मुली व या सर्वांच्या पाठीवर धाकटा सुरेश.
अर्थातच स्वतःच्या शेतीतून मिळणारे उत्पन्न कमी पडू लागले. मग रामराव व जनाबाई इतर लोकांच्या शेतात जमेल तशी मजुरीची कामे करू लागले. रामरावांचे म्हातारे आई - वडील वृद्धापकाळाने देवाघरी गेले. मुले मोठी होत होती. मोठा रमेश अभ्यासात तसा बरा होता पण तो अभ्यासात स्वतःला कधी झोकून देऊ शकला नाही. शाळा सांभाळून घरच्या शेतीतील कामे. आई - वडिलानं वेळ नसल्यामुळे भावंडचा अभ्यास घेणे,घरातील कामे करणे. १० वी ची परीक्षा काही तो एका दमात उत्तीर्ण होऊ शकला नाही. बहिणी मात्र कला शाखेत १२ वी उत्तीर्ण होऊन तालुक्याच्या ठिकाणी स्नातक अभ्यासक्रमात प्रवेशकर्त्या झाल्या.
धाकटा सुरेश हा फारच चुणचुणीत मुलगा होता, शाळेत नेहमीच त्याचा वरचा क्रमांक असे. खेळ व इतर स्पर्धांमध्येही त्याची कामगिरी कौतुकास्पद असे. अर्थातच रमेशचे मार्गदर्शन व पाठबळ त्याला वेळोवेळी मिळायचेच. दोघा बहिणींसाठी चांगली स्थळे (एकदमच) सांगून आल्याने व दोन्हीकडले लोक एकाच मांडवात विवाहसोहळ्यास तयार झाल्याने संपूर्ण कुटुंबाच्या आनंदास पारावार उरला नाही. परंतु नाईलाजाने का होईना रामरावांना सावकाराकडून थोडे कर्ज घ्यावे लागले.
काही वर्षांनी धाकटा सुरेश १० वी मध्ये प्रावीण्य यादीत आला अन रामरावांच्या कुटुंबाचेच नव्हे तर आटपाट गावाचेच नाव मोठे केले. त्याचे हे यश पाहून जिल्हयाच्या ठिकाणच्या एका संस्थेने त्याला प्रोत्साहन म्हणून नाममात्र शुल्कावर वसतिगृहात प्रवेश देऊ केला. घरात आजवर एवढे शैक्षणिक यश मिळाले नसल्याने रामराव व रमेश यांनी कुठल्याही परिस्थितीत सुरेशच्या शिक्षणास काही कमी पडू द्यायचे नाही असे ठरवले व त्याला जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला पाठवले.
सुरेश मराठी माध्यमात शिकला असल्याने त्याला ११ वी विज्ञान अभ्यासक्रम इंग्रजीतून शिकणे अवघड जात होते. त्याला इंग्रजीसाठी शिकवणी लावावी लागली. रामरावांनी स्वतःच्या पोटास चिमटा लावून व रमेशने क्षमतेपेक्षा जास्त मजुरी करून सुरेशच्या शिक्षणास पैसे कमी पडू दिले नाही. यथावकाश सुरेशने १२ वीतही उत्तम गूण मिळवून राज्यातील एका मोठ्या शहरातील नामांकित सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवला.
रामरावांना जुने कर्ज फेडणे अवघड झाल्याने त्यांनी दीड एकर शेती सावकारास विकून टाकली. रमेशनेही भावाचे शिक्षण सुरू असल्याने आलेली स्थळे नाकारून स्वतःचे लग्न लांबणीवर टाकले. रामराव व जनाबाई आता थकले होते. समाजरितीप्रमाणे मुलींची पहिली बाळंतपणे त्यांना करावी लागली. तरीपण सुरेशच्या यशाच्या बातम्या ऐकून त्यांना जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटत असे. थकलेल्या आईच्या आग्रहाखातर रमेश लग्नास तयार झाला. अर्थात त्याची होणारी बायकोही गरीब कुटंबात वाढलेली व कमी शिकलेली होती.
इकडे सुरेश अभियंता झाला व त्याला एका मोठ्या कंपनीत नोकरीही लागली. पगारातून पैसे वाचवून तो घरी पाठवत असे. हे सर्व पाहून रामराव व जनाबाई कृतकृत्य होत. आता त्यांच्याकडून मोल-मजुरी व शेतीची कामे होत नव्हती. त्यामुळे रमेश व त्याच्या बायकोवर सर्व भार पडला होता. लौकरच त्यांनाही मूल झाले.
सुरेशच्या कामगिरीवर खूश होवून त्याच्या कंपनीने त्याला त्यांच्यातर्फे प्रायोजित एम बी ए करण्याचा सल्ला दिला. ते महाविद्यालय दुसऱ्या राज्यात असणार होते. अर्थातच शिष्यवृत्ती जरी मिळणार होती तरी पगार बंद होणार होता. सुरेशने खटपट करून शैक्षणिक कर्ज मिळवले व एम बी ए ला प्रवेशकर्ता झाला. त्यामुळे पुढील दोन वर्षे तो घरी पैसे पाठवू शकला नाही.
इकडे जनाबाईंचा हृदयविकाराने अचानक मृत्यू झाला व संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली. सुरेशच्या परीक्षेमुळे तो आईच्या अंतिम दर्शनालाही येऊ शकला नाही. या धक्क्याने रामराव ही खंगले व अंथरुणाला खिळले. काही महिन्यांतच त्यांचाही मृत्यू झाला. यावेळी मात्र सुरेशने हजेरी लावली. वडिलांच्या आजारपणात रमेशवर बरेच कर्जही झाले. दुर्दैवाने सुरेश काही मदत करू शकत नव्हता कारण त्याचा पगार बंद होता.
यथावकाश सुरेश एम बी ए मध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन नोकरीवर परत रुजू झाला. यथावकाश त्याला बढतीपण मिळाली व अधून मधून परदेशी जाण्याची संधी पण मिळू लागली. कंपनीतील मनुष्यबळ विकास विभागात काम करणाऱ्या एका सुंदर तरुणीच्या प्रेमात तो पडला. तीचे नाव प्रिया. सुरेशचे कर्तृत्व पाहून प्रियाच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली व धूमधडाक्याने लग्न लावून दिले. रमेश कुटूंबासह विवाहास उपस्थित होता पण त्यांचा गावठी अवतार पाहून त्यांच्याशी फारसे कुणी बोललेही नाही. त्यामुळे ते लग्न झाल्या झाल्या गावी परतले.
सुरेश व प्रिया नव्या संसारात रमले. वाहन कर्ज घेऊन नवी चारचाकी, गृहकर्ज घेऊन ३ शयनकक्षाचा गाळा त्यांनी घेतला. वर्षभरात त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. तिचे नाव त्यांनी मुग्धा ठेवले. तिला शहरातील नामांकित आंतरराष्ट्रीय शाळेत शिकवण्यासाठी ते पैसे वेगळे काढून ठेवू लागले. बऱ्याच कर्जांचे मासिक हप्ते, वेगवेगळ्या विम्यांचे शुल्क , शहरातील जीवनमान या साऱ्या घटकांमुळे त्यांचे मोठे उत्पन्नही कमी पडू लागले.
वर्षामागून वर्षे गेली, रमेश व सुरेश आपापल्या संसारात रमले होते. सुरेशची बायको मोठ्या शहरात लहानाची मोठी झालेली असल्याने तिला रमेशच्या कुटुंबाचा तिटकारा होता. त्यामुळे त्यांचे संबंध चार सहा महिन्यांतून एखादा दूरध्वनी एवढेच उरले होते. तसाही सुरेश मोठ्या हुद्दयावर असल्याने त्याला रिकामा वेळ नसायचाच.
एके दिवशी अचानक रमेशची बायको आजारी पडली. गावातल्या डॉक्टरांकडून निदान न झाल्यामुळे तिला जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या इस्पितळात न्यावे लागले. तेथे गेल्यावर कळले की तिला कर्करोग झालाय व उपचाराचा खर्च १० लाखांच्यावर असणार आहे. अर्थातच गावातले पडके घर व संपूर्ण शेती विकूनही एवढी मोठी रक्कम उभी करणे शक्य नव्हते.
मदत करू शकेल असे दुसरे कुणीच नसल्याने रमेशने धाकट्या भावास आर्थिक मदतीची याचना करणारा दूरध्वनी केला. त्याला खात्री होती की आपला भाऊ नक्कीच मदत करेल. परंतु दुर्दैवाने मदत करणे तर दूरच सुरेश मोठ्या भावावरच चिडला. तो म्हणाला इतकी वर्षे तुम्ही आर्थिक नियोजन केले नाही, बचत करून मोठा लाभ देणाऱ्या योजनांमध्ये पैसे गुंतवले नाहीत, आरोग्य विमा काय कुठलाही विमा काढला नाही अन आता मला पैसे मागताय? माझाही संसार आहेच. कर्जांचे हप्ते, घरातील खर्च व मुलीचे शिक्षण यालाच पैसे अपुरे पडतात तर तुम्हाला कसे देऊ?
हताश मनाने रमेशने दूरध्वनी ठेवला व विचार करू लागला आपले काय चुकले.
मित्रांनो हि एक काल्पनिक कथा आहे. आता या कथेचा तौलनिक अभ्यास करूया आपल्या देशाचे उदाहरण घेऊन.
- रामराव अन जनाबाईंचे हे कुटुंब म्हणजे आपला देश.
- रमेश म्हणजे ज्यांच्या समस्या कधीच संपत नाही असे शेतकरी बांधव.
- रामरावांच्या मुली म्हणजे निम्न मध्यमवर्गीय असणारी आपल्या देशातील बहुतांश जनता.
- अन सुरेश म्हणजे तुमच्या माझ्या सारखे, मोठ्या शहरांत राहणारे, जालावरील सामाजिक माध्यमांवरून इतरांना शहाणपणा शिकवणारे, स्वतः अथवा स्वतःच्या कंपनीला परदेशी चलनात उत्पन्न मिळवून देणारे लोक.
- आज फार मोठे झालेल्या अनेक उद्योगांना ते बाल्यावस्थेत असताना सरकारने अनेक सवलती दिल्या. यात माहिती तंत्रज्ञान कंपन्यासुद्धा आल्या.एक मोठी करसवलत २०१० मध्ये संपणार होती म्हणून ती अधिक १० वर्षाने वाढवून घेण्यास नॅसकॉमने जोरदार मागणी केली होती.
- तीन वर्षांपूर्वी जागतिक मंदीमुळे सरकारने उद्योग क्षेत्राला मोठे बेल आऊट दिले होतेच याचे विस्मरण होऊ देऊ नका.
- एकंदरीत असे म्हणायला हरकत नाही की आपल्या प्रगतीमागचे एक कारण म्हणजे इतर अनेकांनी केलेला त्याग व गमावलेल्या संधी.
प्रतिक्रिया
'आंतरजालावर होणारे नकारात्मक
मायक्रोफाय्नान्स संस्था मार्फत मदत करु शकता..
मायक्रोफायनान्स संस्था खूप व्याजदर आकारतात असे वाटते..
अतिशय मार्मिक लेख !
मांडणी चांगली आहे.
+१
कोण बरोबर..कोण चुकतं...
प्रा.डॉं. शी सहमत आहे. मी
अप्रतिम व मार्मिक.
पुणेरी पाट्या....
आजच्या लोकरंग मधला लेख
रूपक कथा
धन्यवाद सुरेश
श्रीरंग_जोशी साहेब, खरच डोळे उघडणारा लेख आहे.
श्रीरंग, मस्त समजावुन
सुरेशच्या कामगिरीवर खूश होवून
प्रायोजित एम बी ए...
राजकीय पुढारी त्यांच्या
प्रतिसादांबद्दल आभार!!
हे जगजाहीर आहे हो! नविन
बरच खर बोलताय. पण एक कृषक