मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाळलेले दोन गजरे..

सांजसंध्या · · जे न देखे रवी...
माणसांशी वागतांना, चूक होणे टाळले मी माणसांना टाळतांना, उंब-यांना चाळले मी रंग माझे आग़ळाले, ढंग माझे वेगळाले तव चुकांना साहण्याचे, छंद वेडे पाळले मी कायद्याने थांबवाव्या, मीलनाच्या चोरवाटा आसवांशी वैर घेतां, कायदे ते जाळले मी जीवनाच्या तेजधारा झेलल्या मी वाहतांना क्लेशकारी काळज्यांना, काजळाने गाळले मी सांजवेळी आठवांच्या, तेवतांना सांजवाती वाळलेले दोन गजरे, मोग-याचे माळले मी - संध्या २० एप्रिल २०१०

वाचने 5026 वाचनखूण प्रतिक्रिया 31

शैलेन्द्र 27/05/2012 - 00:15
"जीवनाच्या तेजधारा झेलल्या मी वाहतांना क्लेशकारी काळज्यांना, काजळाने गाळले मी सांजवेळी आठवांच्या, तेवतांना सांजवाती वाळलेले दोन गजरे, मोग-याचे माळले मी" सुंदर.. आवडली ..

सांजसंध्या 27/05/2012 - 07:35
धन्यवाद :) @ पूजा सांजवेळी आठवांच्या, तेवतांना सांजवाती वाळलेले दोन गजरे, मोग-याचे माळले मी सांजवेळ आयुष्याची आहे. वाट इतकी पाहिली कि गजरेही वाळून गेलेत...

चौकटराजा 27/05/2012 - 08:50
रंग माझे आग़ळाले, ढंग माझे वेगळाले तव चुकांना साहण्याचे, छंद वेडे पाळले मी माझेच मनोगत तुमच्या शब्दात . वाळलेले च्या ऐवजी सुकलेले हा शब्द जास्त युक्त झाला असता का ? (पण बहुदा तो वृतात बसत नाहीय) . उदा गजरा असा फुलांचा सुकवून रात्र गेली - गजल नवाझ सुरेश भट . पु क शु.

In reply to by प्रचेतस

चौकटराजा 27/05/2012 - 13:48
वल्ली, सुकलेला हा शब्द मलाही इथे रिदमिक वाटत नाही. त्यामुळे मी थोड्या शंकाग्रस्त मनानेत त्या बद्द्ल लिहिले आहे. पण वाळलेले याचा संबंध माळले याच्याची नाही तर माळले याचा संबंध जाळले , गाळले, पाळले, चाळले यांच्या शी आहे. त्यालाच काफिया रदीफ असे काहीसेसे म्हणतात .

In reply to by चौकटराजा

प्रचेतस 27/05/2012 - 13:58
तसे यमक / काफिया रदीफ मी ही म्हणत नाही. कवितेमधली ही ओळ पाहा
क्लेशकारी काळज्यांना, काजळाने गाळले मी
इथे काळजी आणि काजळ या दोन शब्दांनी जसा परिणाम साधला गेलाय तसाच तो वाळलेले आणि माळले ह्या शब्दांनी साधला गेलाय.

In reply to by प्रचेतस

चौकटराजा 27/05/2012 - 14:15
वल्ली, तू सांगितलेला योगायोग आहे कारण अशी रचना सांजसंध्या यानी मग हेतूपूर्वक प्रत्येक शेरात वापरली असती. तशी ती दिसत नाही !

In reply to by चौकटराजा

प्रचेतस 27/05/2012 - 14:19
तसे वाटत नाही. बहुतेक ओळींत तशीच रचना आहे. माणसांना टाळतांना, उंब-यांना चाळले मी रंग माझे आग़ळाले, ढंग माझे वेगळाले क्लेशकारी काळज्यांना, काजळाने गाळले मी सांजवेळी आठवांच्या, तेवतांना सांजवाती

In reply to by प्रचेतस

मोदक 28/05/2012 - 00:45
आकर्षक गिफ्ट पेपर मध्ये गुंडाळलेल्या सुंदर पुस्तकात फक्त कोरी पानेच असावीत असे काहीसे वाटले हा संवाद वाचून...

In reply to by मोदक

गणामास्तर 28/05/2012 - 12:20
अगदी सहमत.. एकंदरीत काय तर फणस सोलतात तशी कविता सोलायची, गरे फेकून द्यायचे आणि साल चावत बसायचं. श्रेयअव्हेर: पु.ल.

In reply to by गणामास्तर

सूड 29/05/2012 - 22:23
साल नाय रे गणामास्तर, चारखंड म्हणतात त्याला. ते नाय का ? 'तुम्ही खा गरे, आम्ही खातो गरे...म्हशीला काय ? चारखंड !!'

In reply to by मोदक

प्रभो 28/05/2012 - 15:23
>>आकर्षक गिफ्ट पेपर मध्ये गुंडाळलेल्या सुंदर पुस्तकात फक्त कोरी पानेच असावीत असे काहीसे वाटले हा संवाद वाचून... त्याला 'डायरी' म्हणतात रे.... ;)

In reply to by चौकटराजा

शैलेन्द्र 27/05/2012 - 12:01
"वाळलेले च्या ऐवजी सुकलेले हा शब्द जास्त युक्त झाला असता का ? (पण बहुदा तो वृतात बसत नाहीय) . उदा गजरा असा फुलांचा सुकवून रात्र गेली - गजल नवाझ सुरेश भट ." काक्काआआअ........................... नक्क्क्काआआआआआआआआआअ......... ;)

मुक्ती 27/05/2012 - 17:10
पोरीने किती छान कविता रचली आहे आणि काय मेलं त्या कवितेचं शवविच्छेदन करताय आँ?

अस्वस्थामा 28/05/2012 - 01:36
विडम्बनाची तीव्र इच्छा होवून देखील दाबतो आहे... ;) फक्त एक शब्द बाहेर टाकतोय.. 'वाळलेले गजरे' वाचून 'वाळलेली गाजरे' ऐसे मनी आले.. आणि , माणसाना वाहताना, चूक होणे टाळले हो मी.. दगड धोंडे टाळताना, वाळूलाही चाळले मी .. ...... ..... वाळलेली गाजरे, मोहाची टाळते मी.. वाळलेली गाजरे' बाकी सर्व कष्टपूर्वक साभार परत .. बाकी चालू द्या.. 'कविता छान ' , 'यमक छान' वगैरे वगैरे ... :)

स्पंदना 02/06/2012 - 04:29
जवळ जवळ दहा वेळा वाचल हे काव्य मी. पण नुसतच फार छान वा सुरेख म्हणुन पुढ जावस वाटत नाही. ना ही या गझलेच विच्छेदन करावस वाटत. ' या गझलेल्च्या बाबतीत ' सिर्फ एहसास है ये...' एव्ह्ढच म्हनावस वाटेल.