Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चित्रा on Tue, 03/20/2012 - 19:57
लेखनविषय (Tags)
इतिहास
वाङ्मय
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
मत
संदर्भ
वल्ली यांच्या http://www.misalpav.com/node/20767 या भाजे येथील लेण्यांवरील धाग्यात काही प्रतिसादांमध्ये मी अजातशत्रू आणि प्रसेनजितावरून उल्लेख केला होता. तेव्हा असे जाणवले की या गोष्टी बौद्ध लेखनाशी संबंध आला आहे असे काही थोडे लोक वगळता इतरांमध्ये विशेष प्रसृत नसाव्यात. आणि या कथा इतक्या सुरस आहेत की त्या माहिती नसणे बरे नाही असे वाटते! पण त्याहीपेक्षा त्या अभ्यसनीय आहेत ते त्यातून काही तत्कालिन समाजांची माहिती हाती येऊ शकते म्हणून. म्हणून त्या इथे देत आहे. --------------------------------------- अजातशत्रूची कथा - अजातशत्रूची थोडक्यात गोष्ट सांगायची तर अशी की हा मगधाचा जो राजा बिंबिसार, त्याचा मुलगा. बिंबिसाराच्या तीन पत्नी असाव्यात. एक वैशाली नगरीतली कन्या, दुसरी काशीची कोसलादेवी आणि तिसरी मद्र देशीची राजकन्या. यापैकी एकीचा (बहुतेक कोसलादेवीचा) मुलगा म्हणजे अजातशत्रू. अजातशत्रू बिंबिसाराला मारून (किंवा तुरुंगात घालून) सत्तेवर आला. आणि त्याने अनेक वर्षे वैशाली नगरीशी युद्ध केले, तसेच काशीचा राजा प्रसेनजिताशीही म्हणजे त्याच्या मामाशीच युद्ध केले. ज्या अर्थी अजातशत्रूला बिंबिसाराच्या दोन प्रमुख राण्यांच्या परिवारांशी लढावे लागले त्याअर्थी त्याला मातुल कुटुंबाकडून विरोध असावा. कदाचित लढण्याशिवाय पर्याय नसावा. प्रसेनजित हा काशीचा राजा. अजातशत्रूचे वडिल आणि मामा दोघेही बुद्धाचे थोडेफार अनुयायी होते. मात्र अजातशत्रू जसा वडिलांना मारून सिंहासनावर आला तसे त्याने त्यांचे हितचिंतकांनाही दूर करून स्वत:चे समर्थक गोळा केले. बुद्धापासून तो दूर गेला आणि त्याने बुद्धाचा विरोधक असलेल्या देवदत्ताला जवळ केले. पुढे अजातशत्रूला वडिलांना त्रास दिल्याचा (किंवा मारल्याचा) पश्चात्ताप झाला, त्याच्या मनाला स्थिरता मिळेना तेव्हा जीवक नावाच्या त्याच्या वैद्याने अजातशत्रूला बुद्धाची भेट घेण्याची सूचना केली. राजवैद्य जीवकाने आपली आंब्याची बाग बुद्धाला राहण्यास दिली होती. अजातशत्रूने आपल्या वैद्याचे म्हणणे ऐकले खरे आणि बुद्ध ज्या आंब्याच्या वनात राहत असे तेथे त्याची भेट घेण्यासाठी आपले सैनिक, आणि राजाला शोभेल असा सर्व थाटामाटासह प्रस्थान केले. ही वाट खूप बिकट होती. तेथे राजाचे मोठे सैन्य जाईना. तेव्हा अजातशत्रूला आपले सैन्य आणि लवाजमा मागे ठेवून पायउतार व्हावे लागले. सैन्य मागे ठेवले तेव्हा तो मनात घाबरला की आपला घात तर होणार नाही ना? पण जीवकाने त्याला आश्वासन दिले आणि तो बुद्धाला भेटला. बुद्धाला भेटल्यावर (कथेत म्हटले आहे की) अजातशत्रू म्हणाला ते असे की आपला मुलगा उदयभद्र याला मनाला शांतता नाही. (बहुतेक वडिलांना मारले तेव्हाच्या स्वतःच्या मनःस्थितीची कल्पना असल्याने असावे!) बुद्धाने हे सर्व ऐकून घेतले. आणि राजाच्या अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. बुद्धाबद्दल खात्री पटल्यानंतर अजातशत्रूने स्वतःच आपल्या वडिलांना मारल्याचे बुद्धाजवळ कबूल केले. बुद्धाने तुझ्याकडून चूक झाली हे तू मान्य करत आहेस म्हणजे तुझी प्रगती आहे असे म्हटले. आपले दुष्कृत्य सांगितल्यानंतर अजातशत्रूच्या मनावरचे ओझे हलके झाले. मात्र कथा सांगते की यानंतर अजातशत्रूने पुढे बुद्धमार्गाकडे वळण्याचा निर्णय घेण्याऐवजी हे सांगून मन मोकळे करून बुद्धाचा निरोप घेतला. बुद्धाला असे वाटले की राजाने आपली सत्याकडे जाण्याची संधी घालवली. पुढे या अजातशत्रूच्या मुलाने (उदयभद्राने) अजातशत्रूला ठार मारून सत्ता बळकावली असा उल्लेख आहे. उदयभद्राबद्दल विशेष माहिती मिळत नाही. पण बुद्धाच्या नंतरच्या धम्मप्रसारात अजातशत्रूचा अडथळा झाला नसावा असे वाटते. अजातशत्रूची नाणी, खुणा असे काही मिळते असे नाही, मात्र अजातशत्रू हा ऐतिहासिक राजा असावा किंवा त्याचे बिरूद असावे असे वाटते. मथुरेतील एका शिल्पावर अजातशत्रूचा उल्लेख "वैदेही पुत्तो अजातसत्तू कुनिक" म्हणून येतो. अजातशत्रू आणि सम्राट अशोकाच्या आयुष्यात अनेक साम्यस्थळे आहेत. पण महास्तूपवंशातली एक कथा त्यांना दोघांना जोडते ती अशी: बुद्धाच्या मृत्युनंतर त्याच्या अस्थिंचे काय करायचे, त्यावर कोणाचा अधिकार असा वाद झाला. यात मगध आणि इतर सात नगरांनी आपापला अधिकार सांगितला. तेव्हा द्रोण म्हणून एका ब्राह्मणाने अस्थिंचे आठ भाग करावेत असे सुचवले ते सर्वांना मान्य झाले. तरीही द्रोणाने त्यातील एक भाग चोरण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी झाला नाही. शेवटी दहा भाग करण्यात आले, आणि आठ नगरे, तसेच नंतर आलेले मौर्य आणि द्रोण असे दहा अधिकारी धरून बुद्धाच्या अस्थिंवर वेगवेगळ्या नगरांमध्ये दहा स्तूप बांधण्यात आले. मात्र तरी पुढे ही भांडणे परत लागतील या भितीने महाकश्यपाने अजातशत्रूला सांगितले की ह्या सर्व अस्थि परत आण आणि त्या एका ठिकाणी गुप्तपणे ठेवून दे. अजातशत्रूने एकात दुसरी बसतील अशा आठ चंदनाच्या पेट्यातील सर्वात आतल्या पेटीत अस्थि ठेवल्या. त्यातली सर्वात बाहेरची पेटी अशाच एकात एक बसतील अशा चंदनी स्तूपांमध्ये घातल्या. मग रक्तचंदन, हस्तीदंत अशा प्रकारच्या विविध पेट्यात घालून त्याने त्या राजगिरच्या बाहेर एका स्तूपात घातल्या. यावर सुवर्णाचे पान बसवले आणि त्यात भविष्य लिहीले की पुढे राजपुत्र प्रियदर्शी अशोक म्हणून हे उघडेल आणि सर्वांमध्ये वाटेल. त्यानंतर त्या खोलीबाहेर रत्नांचा एक ढीग ठेवून त्यावर लिहीले की पुढे जे गरीब राजपुत्र येतील त्यांना अस्थिंची काळजी घेणे सोपे जावे म्हणून हा निधी ठेवत आहे! नंतर शाक्याने विश्वकर्म्यास पाठवले. येथून स्तूपवंशातले पुढचे वर्णन थोडे विचित्र आहे. विश्वकर्म्याने या खोलीत वन्य प्राण्यांना मारणारे एक यंत्र (हा उल्लेख कळत नाही) बसवले, स्फटिकासारख्या तलवारी/जांबिये घेतलेल्या लाकडी मूर्ती बसवल्या (लोकपाल?) आणि त्यानंतर हे सर्व विटांच्या, दगडाच्या स्तूपाने झाकून टाकले, त्यावर माती पसरली. अशी बरीच वर्षे लोटली. सत्तापालट होत होत अशोक सम्राट झाला. पुढे अशोकाने बुद्धमार्गाकडे कल झाल्यानंतर ८४, ००० स्तूप बांधायचे ठरवले. कोणा जुन्या माणसाने त्याला ही जागा दाखवली, अशोकाने मग प्रयत्नपूर्वक अस्थि परत बाहेर काढल्या. ते करताना रत्नांबद्दल अजातशत्रूने लिहीलेली गरीब राजपुत्रांबद्दलची टीप वाचून तो वैतागला असाही गंमतीदार उल्लेख आहे, पण त्याने काम पूर्ण केले. ह्या अस्थिंवर एकंदरीत ८४,००० स्तूप बांधण्यात आले. अशोक आणि अजातशत्रूमध्ये बरेच साम्य आहे. दोघेही आपापल्या वडिलांना मारून सत्तेवर आले. अजातशत्रूच्या वडिलांचे नाव बिंबिसार तर अशोकाच्या वडिलांचे नाव बिंदुसार असे सांगितले जाते. अजातशत्रू आणि अशोक हे दोघेही युद्धखोर सत्ताधीश होते. दोघांनीही सुरुवातीच्या काळात सत्तेसाठी वाटेल ते प्रयत्न केले, सत्ता काबीज केली, आणि नंतरच्या काळात धार्मिकांना जवळ केले होते. पण नंतर मात्र वरील कथा खरी मानली तर अजातशत्रूने मुलाच्या सत्तालोलुपतेला आळा घातला नाही. अशोकाने मात्र मुलांच्या सत्तालोलुपतेला आळा घातला म्हणण्यापेक्षा लक्ष मगधापासून बाहेर वळवले. संघमित्रा, आणि महिंद्र या दोन्ही मुलांना दूर श्रीलंकेत पाठवले. त्याचा अजून एक मुलगा कुणाल हा काही काळ अशोकाच्या मर्जीबाहेर होता, पण नंतर अशोकाला चूक कळल्यावर त्याने मुलाला परत राजदरबारी आणले असे दिसते. अशोकाच्या उत्तर आयुष्यात त्याला फारसे विरोधक उरले नसावेत असे वाटते. म्हणून या काळात भव्यदिव्यतेच्या कल्पना स्तूपांच्या संख्येशी जोडल्या गेल्या असे दिसते. मात्र अशोकाच्या काळात जर ८४,००० स्तूप बांधून झाले असले तर नंतर शुंग आणि इतर राजांनी काय केले असा प्रश्न पडतो. यावरून एवढेच म्हणता येईल की अशोकाच्या काळात स्तूपांच्या बांधकामाची चलती झाली. अशोकाच्या शिलालेखांमधून त्याच्याबद्दल बरीच माहिती मिळते पण ती तो सत्ताधीश म्हणून स्थिर झाल्यानंतरची. त्याआधीची माहिती ही अशा कथा-कहाण्यांमधूनच मिळते. ती कितपत खरी धरायची, आणि किती खोटी हे ठरवणे अवघड आहे. काही कपोलकल्पित कथा (उदा. अजातशत्रूने लिहून ठेवलेले भविष्य) या स्तूप खणून आधीचे पुरून ठेवलेले अवयव काढले यावरून गहजब होऊ नये म्हणून किंवा अजातशत्रूशी अशोकाचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी रचल्या गेल्या असाव्यात*. भविष्य आदी गोष्टी पुराणातली वांगी म्हणून सोडून दिली तरी अनेक गोष्टी विचारांना खाद्य असल्याप्रमाणे आहेत. १. भविष्य सांगण्याची प्रथा बरीच जुनी दिसते :) २. राजांनी भविष्ये आणि भविष्य सांगणार्‍यांना स्वतःच्या हितासाठी वापरून घेण्याची पद्धतही जुनीच दिसते. ३. अशोकाच्या काळात यज्ञयाग राजकीय हस्तक्षेपाने कमी झाले असे म्हणतात. यज्ञांनी होणारा तोटा, नुकसान टळले हे उत्तमच झाले, पण लोकांचा यज्ञयागांवर खर्च होणारा पैसा आणि लक्ष इतरत्र वळले असावे, त्याला आळा घातला गेला नाही. उलट प्रोत्साहन दिले गेले. अर्थात त्यामुळेच स्तूपांसारखी स्थाने आज भारतीय इतिहासाची माहिती देत उभी आहेत हा झालेला फायदा. पण तोटेही बरेच असावेत. मुख्य तोटा असा की अशोकाच्या काळात यज्ञांना आळा बसला म्हणून नंतरच्या शुंगांनी आणि सातवाहनांनी जरी लेणी कोरणे, आणि स्तूप उभारणे सुरूच ठेवले तरी यज्ञयागांचेही थोडेफार पुनरुत्थान केले. जरी नंतर त्यात प्राण्यांचे बळी देण्याचे प्रमाण कमी झाले, तरी पैसा आणि शक्तीचा अपव्यय टळला नाही. मुळात अर्थव्यवस्थेचा भाग झालेली कोणतीही वाईट पद्धत मोडकळीला आणायची असल्यास तिला अनेक पर्याय तयार करायला हवेत. पर्याय तयार करण्याची राजकीय इच्छाशक्ती आणि सामाजिक जाण अशोकाने दाखवली (स्तूपांची बांधकामे हा त्याचाच प्रकार), पण अनेक पर्याय तयार झाले नसल्याने ही जाण समाज पूर्ण बदलण्यास पुरेशी पडली नाही असे मला वाटते. असो. यानंतर अजून एक विचारांना खाद्यः अस्थिंबरोबर पुरण्याच्या गोष्टींबद्दल जे काही लिहून ठेवले गेले आहे त्यापैकी काही पद्धती पाहून जुन्या चिनी संस्कृतींशी त्यांचा काही संबंध असावा का असे वाटते. इजिप्तमध्ये लाकडी मानवी बाहुल्या शवपेटिकेबरोबर पुरण्याची पद्धत होती. लाकडी बाहुल्या पुरण्याची पद्धत चीनमध्येही होती असे दिसते. (पूर्वी कोणी राजा मरण पावला की त्याच्याबरोबर नोकरचाकर, घोडे, रथ पुरले जात, नंतर ती पद्धत सोडून बहुदा लाकडी वस्तू पुरल्या जाऊ लागल्या). http://history.cultural-china.com/en/56History9562.html विशेष म्हणजे हे वर्णन श्रीलंकेच्या महावंसामध्येही सापडते. उदा. महावंसातील लेखनात स्तूपातील 'स्वर्गाचे' वर्णन करताना चार टोकांना चार राजे (बहुदा लोकपाल) आहेत असे म्हटले आहे. चीनमधील या नवीन उत्खननांबद्दल कोणाला काही दुवे मिळाल्यास ते जरूर द्यावे. ह्यामध्ये काही संबंध आहेत का हे अभ्यसनीय असावे. मात्र यावरून या कथा किंवा व्यक्ती भारतातल्या नाहीत किंवा आहेतच अशा पद्धतीचे निष्कर्ष काढणे मला योग्य वाटत नाही**. ---------------------------------- टीपा: * याचे कारण समजत नाही. ** माझ्या हे स्पष्ट करण्यामागचा संदर्भ आहे तो खट्टामिठा या ब्लॉगचा. या ब्लॉगकर्त्याने http://khattamitha.blogspot.com/2008/03/blog-post_07.html भास्कर जाधवांचे उदाहरण देऊन रामकथा ही इजिप्तमधली आहे असा निष्कर्ष घाईने काढल्यासारखा वाटतो. ------------------------------------ जालावरील संदर्भः Indian Kavya literature:The wheel of time, Volume 7, Part 1 Anthony Kennedy Warder, Motilal Banarsidass Publ., Apr 30, 2004. http://history.cultural-china.com/en/56History9562.html Mahavamsa:Great Chronicle of Ceylon Wilhelm Geiger Asian Educational Services, Dec 1, 1996 - 300 pages
  • Log in or register to post comments
  • 62791 views

प्रतिक्रिया

Submitted by बॅटमॅन on Wed, 03/21/2012 - 14:39

In reply to काण्वांचे राज्य सातवाहनांनी by प्रचेतस

Permalink

>>कण्वांचे राज्य कलिंगाधिप

>>कण्वांचे राज्य कलिंगाधिप खारवेलाने नष्ट केले असे मानले जाते(नक्की माहित नाही). खारवेलाचा हातीगुंफेतील शिलालेखात अधिक उल्लेख मिळायला हवा. खारवेल आणि कण्व यांचे काळ जुळत नाहीत. हाथीगुंफा शिलालेखाचा मजकूर पहा: http://en.wikipedia.org/wiki/Hathigumpha_inscription कण्व राजांचा उल्लेख नाही त्यात. असणार देखील नाही. कारण खारवेल=इ स पू १९३ ते इ स पू १७०. तर कण्व= इ स पू ७५ ते इ स पू २६. (सौजन्यःविकी) http://en.wikipedia.org/wiki/Kharavela http://en.wikipedia.org/wiki/Kanva_dynasty आता भलेही सातवाहनांनी कण्व राज्य खालसा केल्याचे पुरावे न मिळोत, कण्व राजांचा काळ पाहता त्यांना हरवू शकणार्‍यांपैकी सातवाहन हे एक नक्कीच असू शकतात. आणि जर सातवाहन नाही तर कोण? त्या काळात उत्तर भारतात कोणती अशी सत्ता होती? तर शक राजे होते. पण मग पर्याय २ च राहतातः सातवाहन अथवा शक. कोई शक? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by योगप्रभू on Wed, 03/21/2012 - 15:14

In reply to काण्वांचे राज्य सातवाहनांनी by प्रचेतस

Permalink

होय, ही जागा संदिग्ध आहे..

वल्ली, या इतिहासाबद्दलचे दुवे कालौघात नष्ट झालेले असल्याने जे आहे जमेस धरुन पुढे जावे लागते. ही जागा संदिग्ध आहे. शिलालेखात उल्लेख नाही. पण पुराणांमध्ये (यातही खूप घोळ आहे) हा उल्लेख आहे. त्यावरुन असे मानले जाते. पुराणांनी मौर्यांचा राज्यकाळ १३७ वर्षे, शुंगांचा १३२ वर्षे आणि काण्वांचा ४५ वर्षे मानला आहे. काण्वांचा अखेरचा प्रतिनिधी सुशर्मन् काण्वाचा शिमुक आंध्राने उच्छेद केला, असे वर्णन पुराणांत आहे. (महाराष्ट्र परिचय या ग्रंथात महाराष्ट्राचा इतिहास या प्रकरणात ही नोंद वाचनात आली आहे.) ब्रह्मांड, भागवत, मत्स्य, वायु व विष्णु या पाच पुराणांच्या अनेक प्रतींवरुन पार्जिटर यांनी पुराणातील ऐतिहासिक भागाचे संकलन व संपादन केले. त्यात आंध्र सातवाहन वंशाबाबत पुढील श्लोक आहे. काण्वायनांस्ततो भृत्या: सुशर्माणः प्रसह्य तम् शृंगानां चैव यच्छेषम् क्षपित्वा तु बलीयसः शिशुकोघ्नः सजातीयः प्राप्स्यतीमां वसुंधराम् त्रयोविंशत् समा राजा सिमुकस्तु भविष्यती (सुशर्म्याचे सेवक असलेल्या स्वजातीयांसह आंध्र शिशुक काण्वायनांवर हल्ला करेल आणि सुशर्म्याचा व शुंगांच्या अवशेषाचा नाश करुन वसुंधरा प्राप्त करुन घेईल. तो १३ वर्षे राज्य करील.) त्यामुळे तुमच्याइतक्या खात्रीपूर्वक 'हे चूकच आहे' असे मी म्हणणार नाही, पण पुराणे हे अचूक आणि विश्वासार्ह साधन मानले जात नसल्याने 'हे असे घडले असण्याला जागा आहे, आणि तसे मानून पुढे जाऊया' इतकाच माझा दृष्टीकोन आहे. काण्वांचे राज्य सातवाहनांनी संपवले, की खारवेलाने संपवले यापेक्षा माझा मुद्दा हा होता, की ही राजघराणी संपण्याची व त्यासाठी राजकारण/लढाया/कट/भाऊबंदकी/फितुरी करण्याची एक प्रदीर्घ परंपरा भारतीय इतिहासात चालत आलेली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 03/21/2012 - 18:35

In reply to होय, ही जागा संदिग्ध आहे.. by योगप्रभू

Permalink

'चुकीचा आहे ' ही माझी

'चुकीचा आहे ' ही माझी शब्दयोजना चुकली. माझ्या म्हणण्याचा उद्देश इतकाच की कण्व-सातवाहन संघर्षाचे उल्लेख शिलालेखांमध्ये अथवा नाण्यांच्या स्वरूपात सापडत नाहीत. अर्थात पुराणात जरी उल्लेख आला असला तरी पुराणे ही नंतरच्या काळातील असल्याने त्यातील मतांशी फारसे सहमत होता येत नाही याच्याशी सहमती. तसेही पुराणांनी सातवाहनांना आंध्रभृत्य ठरवून मोठी चूक केलेलीच आहे. सिमुक सातवाहन हा सातवाहनांच्या पिढीतला दुसरा ज्ञात राजा. सातवाहनांच्या सुरुवातीच्या काळातलाच. जुन्नरवरून इतक्या लवकर तो थेट मगधापर्यंत धडक मारेल हे तसे अविश्वनीय वाटते.
माझा मुद्दा हा होता, की ही राजघराणी संपण्याची व त्यासाठी राजकारण/लढाया/कट/भाऊबंदकी/फितुरी करण्याची एक प्रदीर्घ परंपरा भारतीय इतिहासात चालत आलेली आहे.
पूर्णपणे सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by योगप्रभू on Wed, 03/21/2012 - 19:34

In reply to 'चुकीचा आहे ' ही माझी by प्रचेतस

Permalink

युद्धे राजधानीपासून लांब झालीत...

<<जुन्नरवरून इतक्या लवकर तो थेट मगधापर्यंत धडक मारेल हे तसे अविश्वनीय वाटते. >> अहो. त्याही काळात ज्या लढाया होत त्या एकमेकांच्या राजधानीपासून लांब होत. प्रत्येक राज्याच्या सीमा दूरवर पसरलेल्या असून एकमेकांना चिकटून असत. सातवाहन राजे जुन्नर किंवा प्रतिष्ठानचे असले तरी त्यांचे साम्राज्य पार माळव्यापर्यंत पसरले होते. तेथे ते व शुंग राजे एकमेकांचे शेजारी होते. शुंग आणि सातवाहनांच्याही लढाया झाल्या पण त्या विदर्भात झाल्या. अलिकडच्या काळात काही अपवाद वगळता पेशवे आणि निजाम यांचे युद्ध बहुतेक मराठवाड्यात होई (खर्डा, राक्षसभुवन, उदगीर इ.) प्रत्येकवेळी पुणे किंवा हैदराबादवर आक्रमण करण्याची वेळ येत नसे. सम्राट अशोकाच्या मृत्युनंतर शिमुक सातवाहनाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र (दक्षिणापथ) आणि खारवेलाच्या नेतृत्वाखाली कलिंग ही राज्ये स्वतंत्र झाली. या सातवाहनांनी नंतरच्या काळात आपली सीमा माळव्यापर्यंत वाढवली होती. शुंग घराणे मगधाच्या गादीवरुन गेले व त्याऐवजी काण्व आले तोपर्यंत मगध साम्राज्य राहिले नव्हते. मांडलिक राज्ये स्वतंत्र झाली होती. सातवाहनांनी काण्वांचा पराभव केला तेव्हा काण्वांनी मथुरेच्या शक क्षत्रपांचे सहकार्य घेतले होते. म्हणजे ही लढाई पाटलिपुत्र (मगध) जवळ झाली नसून उत्तर भारतात कुठेतरी झाली असावी. या युद्धात सातवाहन आणि काण्व दोघांचेही जबर नुकसान झाले. काण्व संपले, सातवाहन दुर्बळ झाले आणि शक प्रबळ झाले. (दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ)सातवाहनांचे सामर्थ्य कमी झाल्याने महाराष्ट्राच्या सीमा पुन्हा संकोचल्या.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 03/21/2012 - 14:01

Permalink

@ योगप्रभू >>ती चूक

@ योगप्रभू >>ती चूक बृहद्रथाने केली. वैदिक धर्माभिमानी असलेल्या मगध सैन्याला तो शस्त्रत्याग करुन भिख्खु बनण्याचे आवाहन करु लागला. हे इन्टरेस्टिन्ग आहे, नव्हतं वाचलं आधी. कृपया दुवा/संदर्भ दिलात तर मी पाहू शकेन जास्तीची माहिती. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 03/21/2012 - 14:27

Permalink

अतिशय सुरेख

लिखाण. नवं नवीन माहिती मिळाली. प्रतिसाद देखील वाचनीय आहेत. वाचनखूण साठवल्या गेली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 03/21/2012 - 14:34

Permalink

उत्तम

चर्चा उत्तम सुरुये.. लेखही आवडेश वाचतोय
  • Log in or register to post comments
Profile picture for user प्रसाद प्रसाद

Submitted by प्रसाद प्रसाद on Wed, 03/21/2012 - 17:25

Permalink

अतिशय सुंदर लेख आणि

अतिशय सुंदर लेख आणि प्रतिक्रिया ही मस्त. बरीच नवीन माहिती मिळाली. लेखात http://khattamitha.blogspot.com/ ह्या ब्लॉगचा उल्लेख आहे. हा ब्लॉग पूर्वी एकदा वाचला होता. खट्टामिठा ब्लॉगमध्ये 'मिठा' काय आहे कुणास ठाऊक!
  • Log in or register to post comments
Profile picture for user प्रसाद प्रसाद

Submitted by प्रसाद प्रसाद on Wed, 03/21/2012 - 17:43

Permalink

द्विरूक्तीमुळे का. टा. आ.

द्विरूक्तीमुळे का. टा. आ.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Wed, 03/21/2012 - 19:18

Permalink

माहितीपूर्ण लेख आणि प्रतिसाद!

माहितीपूर्ण लेख आणि प्रतिसाद!
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Wed, 03/21/2012 - 19:40

Permalink

बरीच नवी माहिती

बरीच नवी माहिती मिळाली. चित्रातै, जियो!!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 03/21/2012 - 23:55

Permalink

लेखन माहितीपूर्ण

लेखन आणि प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत काळजीपूर्वक वाचतोय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on गुरुवार, 03/22/2012 - 01:44

Permalink

सुंदर....

चर्चेच्या प्रस्तावाइतकीच प्रत्यक्ष चर्चा, योगप्रभू आणि वल्लींचे प्रतिसाद उत्तम. @शापित्/यकु :- श्टाइल ओळखली रे (http://www.misalpav.com/node/21078#comment-382458) प्रतिसादातली. काही पारितोषिक वगैरे आहे काय? सध्या वेळेअभावी आवडत्या विषयावरही अधिक टंकू शकत नाही. सॉरी.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on गुरुवार, 03/22/2012 - 03:58

Permalink

लेख, चर्चा माहितीपूर्ण आहे

लेख, चर्चा माहितीपूर्ण आहे
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on गुरुवार, 03/22/2012 - 07:24

Permalink

सर्वांचे आभार

लेख आणि त्यावरून झालेल्या चर्चेत भाग घेणार्‍या सर्वांचे आभार. अंत्यसंस्काराचा मुद्दा बाजूला राहिला - बहुदा कोणाला त्यात रस वाटला नाही. पण ते असो. सम्राट/ राजे येतात आणि जातात, समाज आपल्या खुणा ठेवत जातो. काळाच्या ओघात काही गोष्टी महत्त्वाच्या राहत नाहीत, तर काही वेळा त्यातून सध्यासाठी शिकता येते. कधीतरी आपल्याला दिसते तेच आणि तेवढेच एक बरोबर असते अशी एक समजूत असते. तिलाही इतिहासाच्या वाचनाने धक्का मिळतो असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on गुरुवार, 03/22/2012 - 07:53

Permalink

उत्तम धागा आणि उत्तम चर्चा,

उत्तम धागा आणि उत्तम चर्चा, या विषयातले फार कळत नाही , त्यामुळे को-या मनानं वाचायला छान वाटलं.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 03/22/2012 - 08:04

Permalink

शवपेटिका

>>अंत्यसंस्काराचा मुद्दा बाजूला राहिला - बहुदा कोणाला त्यात रस वाटला नाही. :) नाही, तसं नाही. पण भारतात मुख्यतः दहनाची पद्धत असल्याने याबद्दल फारंसं साहित्य वाचायला मिळत नाहीये. संन्यासी, लहान मुलं यांचं दहन करत नाहीत असं वाचायला मिळतं. सिंधु संस्कृती आणि आर्य हे दहन आणि दफन दोन्हींचा वापर करत असत असं दिसतं. ऋग्वेदातही तसे उल्लेख आहेत अस वाचायला मिळालं. पण या काळात पेट्यात नाही तर मृत्तिका कुंभात मृतदेह घालून पुरत असत. http://asi.nic.in/asi_exec_adichchanallur.asp या दुव्यावर भारतातल्या उत्खननाच्या कामाबद्दल अधिकृत माहिती आहे. तिथे याबद्दल आणखी काही माहिती सापडेल. यात काही मृतदेह सांगाडे या स्वरूपात तर काही अस्थी-राख या स्वरूपात सापडले. अशा उत्खननाच्या जागी इतर वस्तू मृतदेहाबरोबर सापडलेल्या आहेत. म्हणजे मृतदेहाबरोबर वस्तू पुरायची पद्धत फार प्राचीन काळापासून आणि सर्व जगभर होती. चीनच्या प्रभावामुळे असं काही नसावं.
  • Log in or register to post comments

Submitted by सागर on Mon, 03/26/2012 - 17:54

Permalink

किंचीत भर

चित्राजी, सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद की एका (तुलनेने कमी) माहिती असलेल्या विषयावर एवढा सुरेख लेख लिहिला आहे. या धाग्यावर चर्चा देखील खूप छान सुरु आहे. वल्ली, बॅटमॅन, योगप्रभू, पैसा इत्यादी अनेक मान्यवर सदस्यांनी या चर्चेत अनेक गोष्टींचा परामर्श घेतला आहे. त्यात माझे १-२ पैसे - * त्याचा अजून एक मुलगा कुणाल हा काही काळ अशोकाच्या मर्जीबाहेर होता, पण नंतर अशोकाला चूक कळल्यावर त्याने मुलाला परत राजदरबारी आणले असे दिसते. * याबद्दल थोडेसे संक्षिप्त - ( हा माझा थोडा आवडीचा विषय असल्यामुळे मोह आवरत नाहिये. थोडे अवांतराबद्दल क्षमस्व) सम्राट अशोकाचा पुत्र 'कुणाल' याची एक शोकांतिका आहे. (आधारः जैन साहित्य व काही संदर्भग्रंथ) सम्राट अशोकाच्या अनेक बायका होत्या व त्यांच्यापासून त्याला अनेक अपत्येही होतीच. त्यात त्याची सर्वात तरुण बायको होती तिष्यरक्षिता. ती अतिशय रुपवती होती आणि सम्राट अशोकाची मर्जी संभाळून त्याची सेवा करत असल्यामुळे अशोकाची ती लाडकी देखील होती. त्यामुळे तिच्या शब्दाला एक वजन प्राप्त झालेले होते. सम्राट अशोक आजारी असताना तिने त्याची सुश्रुषा इमानेइतबारे केली होती याचे ते फळ असावे. दुसरीकडे अशोकाचा मुलगा कुणाल हा कैक वर्षे राज्यकारभारानिमित्त बाहेरच होता. (त्यावर अशोकाची गैरमर्जी होती असे मला अजिबात वाटत नाही - अर्थात हे माझे वैयक्तीक मत आहे ;) ) जन्मतःच याचे डोळे नीलवर्णी आणि अतिशय सुरेख होते. त्यामुळे कुणाल पेक्षा दुसरे सुंदर नाव त्याच्यासाठी योग्य नव्हतेच. जेव्हा हा कुणाल मगधाची राजधानी पाटलिपुत्रात आला तेव्हा प्रथमदर्शनीच त्याला समवयस्क असलेल्या महाराणी तिष्यरक्षिताची नजर कुणाल वर पडली व तिच्या मनात कुणालविषयी मोह निर्माण झाला. संधी साधून तिने कुणालपाशी आपले हृदय मोकळे केले. पण कुणाल हा पक्का पितृप्रेमी असल्यामुळे त्याने तिचे प्रेम झिडकारले व ती त्याची आई आहे बाकी कोणी नाही याची जाणीवही कुणालाने तिष्यरक्षितेला करुन दिली. तिच्यासारख्या रुपगर्वितेला झिडकारल्यामुळे तिष्यरक्षिता सूडाने पेटली व तिने सम्राट अशोकाकडे चुगली करुन त्याला शिक्षा फर्मावण्यास सांगितले. त्याप्रमाणे सम्राट अशोकाने तसा आदेश दिला. पण त्या आदेशात (आपल्या पेशव्यांच्या इतिहासात जसे आनंदीबाईंनी ध चा मा केला त्या धर्तीवर) तिष्यरक्षितेने फेरबदल करुन कुणालाचे सुंदर डोळे काढण्याचा आदेश केला. कुणालास तिष्यरक्षितेचे कारस्थान कळूनही त्याने निर्भयपणे आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतःचे डोळे काढू दिले. नेत्रहीन झाल्यावर कुणालाने बौद्ध धर्म जवळ केला. त्यानंतर तिष्यरक्षितेसही पश्चाताप होऊन तिला विरक्ती आली व बौद्ध धर्माला शरण गेली. अशी ही कथा आहे. यात असेही आहे की कुणालाचे डोळे गेल्यामुळे आणि महेन्द्र व संघमित्रा बौद्ध धर्माच्या प्रसारात व्यस्त असल्यामुळे राज्याचा कारभार सम्प्रति या तिष्यरक्षितेच्या मुलाकडे देण्यात आला होता. (याबद्दल पुरावे थोडे कमी आहेत, पण आहेत) या कथानकावर बेतलेली मराठीत 'आर्यपुत्र कुणाल' ही 'जैन आनंद प्रकाश' यांनी लिहिलेली , सन पब्लिकेशनने प्रकाशित केलेली अतिशय सुंदर कादंबरी आहे. ज्यांना रस असेल त्यांनी ही कादंबरी अवश्य वाचावी. ------------- अजातशत्रू आणि सम्राट अशोकाच्या आयुष्यात अनेक साम्यस्थळे आहेत. हे मान्य आहे. पण सुदैवाने चंद्रगुप्त मौर्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार आणि त्यानंतर त्याचा मुलगा सम्राट अशोक या तिघांनी जो भव्य इतिहास निर्माण करुन ठेवला आहे त्यामुळे कालौघातही अशोक आणि अजातशत्रू या नायकांचे इतिहास जसेच्या तसे उपलब्ध झाले आहेत. याचे प्रमुख श्रेय जैन आणि बौद्ध साहित्यालाच द्यावे लागेल. --- मात्र अशोकाच्या काळात जर ८४,००० स्तूप बांधून झाले असले तर नंतर शुंग आणि इतर राजांनी काय केले असा प्रश्न पडतो. याबद्दल एक थोडी शंका आहे. माझ्या माहिती नुसार सम्राट अशोकाने ८४,००० स्तूप नव्हे तर ८४,००० स्तंभ उभारले आहेत. यात असेही आहे की कित्येक स्तंभ स्तूपाच्या प्रवेशद्वारावर आहेत. पण एवढ्या मोठ्या संख्येने स्तूप असण्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. माहिती चुकीची असल्यास दुरुस्त करावी ही विनंती. --- शेवटी अंत्यसंस्कारांबद्दल - त्याकाळी मृत्तिकांतून दफन करायची पद्धत होती. तरी शरीराचे दहन करुन आत्म्याला मुक्त करण्याची पद्धतही होतीच होती. दफन करताना त्या व्यक्तीच्या पुढील प्रवासाला उपयोगी पडावे म्हणून त्या व्यक्तीच्या आवडत्या वस्तू त्या मृत्तिकापात्रात व्यक्तीच्या शवाबरोबर ठेवल्या जात. ही पद्धत फक्त इजिप्त, चीन इथेच नव्हती तर भारतातही सर्रास प्रचलित होती. हीच प्रथा दक्षिण अमेरिकेतील आदिवासी लोक वा मेक्सिको येथील प्राचीन संस्कृती , यांच्यातही प्रचलित होती. एकूणच अखिल मानवसमाज एका सामूहिक भावनांवर वेगवेगळ्या ठिकाणी थोड्या फार फरकाने चालत असतो हेही दिसते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 03/26/2012 - 18:42

In reply to किंचीत भर by सागर

Permalink

उत्तम प्रतिसाद रे

उत्तम प्रतिसाद रे मित्रा. अशोकपुत्र कुणालाचे संदर्भ जैन साहित्यात कसे मिळतात? शिवाय चंद्रगुप्त मौर्याने हिंदू असून आयुष्याच्या उत्तरार्धात जैन धर्म स्वीकारला होता पण त्याचा पुत्र बिंदुसार हा पण जैन धर्माचा अनुयायी होता ना(का वैदिक, नक्की माहीत नाही)? जर पिता आणि पितामह दोघेही जैन असतील तर अशोकाने जैनधर्म त्यागून बौद्ध धर्म स्वीकारला का तो सुरुवातीला वैदिक धर्माचा पुरस्कर्ता होता?
  • Log in or register to post comments

Submitted by सागर on Mon, 03/26/2012 - 19:39

In reply to उत्तम प्रतिसाद रे by प्रचेतस

Permalink

उत्तम प्रश्न उपस्थित केले आहेस मित्रा

अशोकपुत्र कुणालाचे संदर्भ जैन साहित्यात कसे मिळतात? जैन व बौद्ध या दोन्ही धर्माच्या प्रसारकांनी त्याकाळी जे लेखन करुन ठेवले आहे तेच आजच्या इतिहाससंशोधकांसाठी पुराव्यांचे काम करतात. तिष्यरक्षितेची कथा ही जैनसाहित्यात अधिक आली आहे कारण पुढे तिष्यरक्षितेचा मुलगा सम्प्रति हा सम्राट अशोकानंतर गादीवर आला व त्याने पाटलिपुत्र व उज्जैन येथून काम करताना जैन धर्म स्वीकारला व जैनांसाठी तीच भूमिका पार पाडली जी सम्राट अशोकाने बौद्धांसाठी पार पाडलेली होती. त्यामुळे जैन साहित्यात तिष्यरक्षिता व कुणालाची कथा जास्त विस्ताराने आलेली आहे. तुलनेने बौद्ध साहित्यात जैन साहित्याच्या तुलनेत थोडी कमी महत्वाची मांडली गेली आहे. कुणालाची कथा ओघाने आली म्हणून थोडी विस्ताराने सांगितली होती. पण कुणालाव्यतिरिक्त सम्राट अशोकाचा 'जालौक' नावाचा अजून एक पुत्र होता व काश्मीरचा कारभार तो संभाळत असल्याचा उल्लेख कल्हणाच्या राजतरंगिणीमध्ये आला आहे. तिष्यरक्षिता अशोकाची पट्टराणी होती म्हणून सम्प्रतिची सम्राटपदी वर्णी लागली असावी. आता चंद्रगुप्त मौर्य व बिंदुसार यांच्याबद्दलः चंद्रगुप्त मौर्य व बिंदुसार यांच्याबद्दल एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती ही की त्यांनी निवृत्तीच्या वेळी जैन धर्माचा स्वीकार केला होता. तत्पूर्वी ते हिंदूच होते. सम्राट अशोक हा देखील त्याला अपवाद नव्हता. लहानपणापासून सम्राट अशोकाचे आयुष्य लढण्यातच आणि मुख्य म्हणजे राजधानीपासून दूर गेले होते. त्यामुळे जैन धर्माचा त्याला गंध सुद्धा नव्हता. कलिंग युद्धानंतर अशोकाचे हृदयपरिवर्तन झाले असे मानले जाते. पण कलिंग युद्धात प्रचंड मनुष्यहानी झाल्यामुळे त्याला पश्चाताप झाला असे मात्र मला वाटत नाही. कारण कलिंगयुद्धासारखी भीषण युद्धे अशोकाने कित्येक वेळा लढलेली होती. थेट हिंदुकुश पर्वतापर्यंत चंद्रगुप्त मौर्याने साम्राज्य नेऊन ठेवलेलेच होते. त्यात बिंदुसाराने भर टाकून अधिक विस्तार केला होता. सम्राट अशोकाने तलवारीच्या जोरावर बंड करुन उठणार्‍या गणराज्यांना जरब बसवलेली होती. विदिशा - उज्जैन लढायांबरोबरच काश्मीर प्रांतातले स्वातंत्र्याचे बंडही त्याने क्रौर्याने संपवले होते. कलिंग युद्धाचे महत्त्व असलेच तर एवढेच असावे की या युद्धानंतर सम्राट अशोकाला युद्ध करुन जिंकण्यासारखा दुसरा कोणी शत्रू राहिला नव्हता. दक्षिणेच्या टोकाच्या व श्रीलंकेच्या राजांनी सम्राट अशोकाचे मांडलिकत्व मान्य केलेले होते. अशा परिस्थितीत युद्धमय वातावरण नसताना अशोकाच्या शरीराला आणि मनाला स्थैर्य लाभले. त्यावेळी त्याच्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव पडला, याला कारण त्याचा लहान भाऊ वीताशोक होता असा एक प्रवाद आहे. अशोकावर बुद्ध धर्माचा प्रभाव कसा आणि कोणामुळे पडला यापेक्षा तो पडला होता हे महत्त्वाचे. त्यानंतर दरवर्षी निर्माण होणार्‍या महसूलाचा वाटा बौद्ध धर्माची बांधकामे करण्यावर केला जाऊ लागला. चंद्रगुप्त व बिंदुसार यांच्यात आणि अशोकात फरक असलाच तर एवढाच होता की सम्राट अशोकाने योद्ध्याचे कर्तव्य पूर्ण केल्यानंतर कित्येक वर्षे राजोपभोग घेत मृत्युपर्यंत सम्राटच राहिला. तर चंद्रगुप्त व बिंदुसार यांनी पुढील राजाकडे आपल्या सर्व जबाबदार्‍या हस्तांतरित केल्यावर मगच जैन धर्म स्वीकारुन राज्यत्याग (परिणामाने स्थलत्यागही) केला.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 03/26/2012 - 21:12

In reply to उत्तम प्रश्न उपस्थित केले आहेस मित्रा by सागर

Permalink

उत्तम माहिती. चंद्रगुप्त आणि

उत्तम माहिती. चंद्रगुप्त आणि अशोकाचे चरित्र आता वाचायला हवे.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Mon, 03/26/2012 - 22:04

In reply to किंचीत भर by सागर

Permalink

धन्यवाद

विस्ताराने दिलेल्या कुणालाच्या कथेबद्दल आभार. स्तूपांबद्दल, ८४००० स्तूप असेच वाचले आहे. विकीवरही हेच दिसते. http://en.wikipedia.org/wiki/Stupa अंत्यसंस्काराबद्दल - मी चिनी माहिती देण्याचे कारण एवढेच की ज्या पद्धतीचे वर्णन ४ दिशांना चार लोकपाल आदी आहे तसेच वर्णन चिनी उत्खननात दिसले. तसेच वन्य प्राण्यांना मारणार्‍या यंत्राचा उल्लेख वेगळा वाटला. शिवाय मी वर जे वायूविजनाची सोय केली असे लिहीले आहे ते मूळ भाषांतरकाराने 'fixed a fan with the force of the wind and closed it with a bolt' असे लिहीले आहे (जे बहुतेक मी चुकीच्या अर्थाने वायूविजनाबद्दल समजले). खालील दुवा (अजून एका चिनी उत्खननात ब्लास्ट ब्लोअर म्हणून कबरींमध्ये मिळाल्याची बातमी आहे). http://www.china.org.cn/english/culture/97500.htm परत याचा अर्थ ही चिनी पद्धत होती - तेथून आपल्याकडे आली वगैरे काही म्हणायचे नाही. फक्त ही एक संशोधनाची दिशा असू शकते. त्याबद्दल पुरावे न मिळाल्यास ते चूक म्हणून सोडून देता येईल.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com