Skip to main content

अशोक-अजातशत्रू कथा आणि काही अवांतर

लेखक चित्रा यांनी मंगळवार, 20/03/2012 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
वल्ली यांच्या http://www.misalpav.com/node/20767 या भाजे येथील लेण्यांवरील धाग्यात काही प्रतिसादांमध्ये मी अजातशत्रू आणि प्रसेनजितावरून उल्लेख केला होता. तेव्हा असे जाणवले की या गोष्टी बौद्ध लेखनाशी संबंध आला आहे असे काही थोडे लोक वगळता इतरांमध्ये विशेष प्रसृत नसाव्यात. आणि या कथा इतक्या सुरस आहेत की त्या माहिती नसणे बरे नाही असे वाटते! पण त्याहीपेक्षा त्या अभ्यसनीय आहेत ते त्यातून काही तत्कालिन समाजांची माहिती हाती येऊ शकते म्हणून. म्हणून त्या इथे देत आहे. --------------------------------------- अजातशत्रूची कथा - अजातशत्रूची थोडक्यात गोष्ट सांगायची तर अशी की हा मगधाचा जो राजा बिंबिसार, त्याचा मुलगा. बिंबिसाराच्या तीन पत्नी असाव्यात. एक वैशाली नगरीतली कन्या, दुसरी काशीची कोसलादेवी आणि तिसरी मद्र देशीची राजकन्या. यापैकी एकीचा (बहुतेक कोसलादेवीचा) मुलगा म्हणजे अजातशत्रू. अजातशत्रू बिंबिसाराला मारून (किंवा तुरुंगात घालून) सत्तेवर आला. आणि त्याने अनेक वर्षे वैशाली नगरीशी युद्ध केले, तसेच काशीचा राजा प्रसेनजिताशीही म्हणजे त्याच्या मामाशीच युद्ध केले. ज्या अर्थी अजातशत्रूला बिंबिसाराच्या दोन प्रमुख राण्यांच्या परिवारांशी लढावे लागले त्याअर्थी त्याला मातुल कुटुंबाकडून विरोध असावा. कदाचित लढण्याशिवाय पर्याय नसावा. प्रसेनजित हा काशीचा राजा. अजातशत्रूचे वडिल आणि मामा दोघेही बुद्धाचे थोडेफार अनुयायी होते. मात्र अजातशत्रू जसा वडिलांना मारून सिंहासनावर आला तसे त्याने त्यांचे हितचिंतकांनाही दूर करून स्वत:चे समर्थक गोळा केले. बुद्धापासून तो दूर गेला आणि त्याने बुद्धाचा विरोधक असलेल्या देवदत्ताला जवळ केले. पुढे अजातशत्रूला वडिलांना त्रास दिल्याचा (किंवा मारल्याचा) पश्चात्ताप झाला, त्याच्या मनाला स्थिरता मिळेना तेव्हा जीवक नावाच्या त्याच्या वैद्याने अजातशत्रूला बुद्धाची भेट घेण्याची सूचना केली. राजवैद्य जीवकाने आपली आंब्याची बाग बुद्धाला राहण्यास दिली होती. अजातशत्रूने आपल्या वैद्याचे म्हणणे ऐकले खरे आणि बुद्ध ज्या आंब्याच्या वनात राहत असे तेथे त्याची भेट घेण्यासाठी आपले सैनिक, आणि राजाला शोभेल असा सर्व थाटामाटासह प्रस्थान केले. ही वाट खूप बिकट होती. तेथे राजाचे मोठे सैन्य जाईना. तेव्हा अजातशत्रूला आपले सैन्य आणि लवाजमा मागे ठेवून पायउतार व्हावे लागले. सैन्य मागे ठेवले तेव्हा तो मनात घाबरला की आपला घात तर होणार नाही ना? पण जीवकाने त्याला आश्वासन दिले आणि तो बुद्धाला भेटला. बुद्धाला भेटल्यावर (कथेत म्हटले आहे की) अजातशत्रू म्हणाला ते असे की आपला मुलगा उदयभद्र याला मनाला शांतता नाही. (बहुतेक वडिलांना मारले तेव्हाच्या स्वतःच्या मनःस्थितीची कल्पना असल्याने असावे!) बुद्धाने हे सर्व ऐकून घेतले. आणि राजाच्या अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. बुद्धाबद्दल खात्री पटल्यानंतर अजातशत्रूने स्वतःच आपल्या वडिलांना मारल्याचे बुद्धाजवळ कबूल केले. बुद्धाने तुझ्याकडून चूक झाली हे तू मान्य करत आहेस म्हणजे तुझी प्रगती आहे असे म्हटले. आपले दुष्कृत्य सांगितल्यानंतर अजातशत्रूच्या मनावरचे ओझे हलके झाले. मात्र कथा सांगते की यानंतर अजातशत्रूने पुढे बुद्धमार्गाकडे वळण्याचा निर्णय घेण्याऐवजी हे सांगून मन मोकळे करून बुद्धाचा निरोप घेतला. बुद्धाला असे वाटले की राजाने आपली सत्याकडे जाण्याची संधी घालवली. पुढे या अजातशत्रूच्या मुलाने (उदयभद्राने) अजातशत्रूला ठार मारून सत्ता बळकावली असा उल्लेख आहे. उदयभद्राबद्दल विशेष माहिती मिळत नाही. पण बुद्धाच्या नंतरच्या धम्मप्रसारात अजातशत्रूचा अडथळा झाला नसावा असे वाटते. अजातशत्रूची नाणी, खुणा असे काही मिळते असे नाही, मात्र अजातशत्रू हा ऐतिहासिक राजा असावा किंवा त्याचे बिरूद असावे असे वाटते. मथुरेतील एका शिल्पावर अजातशत्रूचा उल्लेख "वैदेही पुत्तो अजातसत्तू कुनिक" म्हणून येतो. अजातशत्रू आणि सम्राट अशोकाच्या आयुष्यात अनेक साम्यस्थळे आहेत. पण महास्तूपवंशातली एक कथा त्यांना दोघांना जोडते ती अशी: बुद्धाच्या मृत्युनंतर त्याच्या अस्थिंचे काय करायचे, त्यावर कोणाचा अधिकार असा वाद झाला. यात मगध आणि इतर सात नगरांनी आपापला अधिकार सांगितला. तेव्हा द्रोण म्हणून एका ब्राह्मणाने अस्थिंचे आठ भाग करावेत असे सुचवले ते सर्वांना मान्य झाले. तरीही द्रोणाने त्यातील एक भाग चोरण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी झाला नाही. शेवटी दहा भाग करण्यात आले, आणि आठ नगरे, तसेच नंतर आलेले मौर्य आणि द्रोण असे दहा अधिकारी धरून बुद्धाच्या अस्थिंवर वेगवेगळ्या नगरांमध्ये दहा स्तूप बांधण्यात आले. मात्र तरी पुढे ही भांडणे परत लागतील या भितीने महाकश्यपाने अजातशत्रूला सांगितले की ह्या सर्व अस्थि परत आण आणि त्या एका ठिकाणी गुप्तपणे ठेवून दे. अजातशत्रूने एकात दुसरी बसतील अशा आठ चंदनाच्या पेट्यातील सर्वात आतल्या पेटीत अस्थि ठेवल्या. त्यातली सर्वात बाहेरची पेटी अशाच एकात एक बसतील अशा चंदनी स्तूपांमध्ये घातल्या. मग रक्तचंदन, हस्तीदंत अशा प्रकारच्या विविध पेट्यात घालून त्याने त्या राजगिरच्या बाहेर एका स्तूपात घातल्या. यावर सुवर्णाचे पान बसवले आणि त्यात भविष्य लिहीले की पुढे राजपुत्र प्रियदर्शी अशोक म्हणून हे उघडेल आणि सर्वांमध्ये वाटेल. त्यानंतर त्या खोलीबाहेर रत्नांचा एक ढीग ठेवून त्यावर लिहीले की पुढे जे गरीब राजपुत्र येतील त्यांना अस्थिंची काळजी घेणे सोपे जावे म्हणून हा निधी ठेवत आहे! नंतर शाक्याने विश्वकर्म्यास पाठवले. येथून स्तूपवंशातले पुढचे वर्णन थोडे विचित्र आहे. विश्वकर्म्याने या खोलीत वन्य प्राण्यांना मारणारे एक यंत्र (हा उल्लेख कळत नाही) बसवले, स्फटिकासारख्या तलवारी/जांबिये घेतलेल्या लाकडी मूर्ती बसवल्या (लोकपाल?) आणि त्यानंतर हे सर्व विटांच्या, दगडाच्या स्तूपाने झाकून टाकले, त्यावर माती पसरली. अशी बरीच वर्षे लोटली. सत्तापालट होत होत अशोक सम्राट झाला. पुढे अशोकाने बुद्धमार्गाकडे कल झाल्यानंतर ८४, ००० स्तूप बांधायचे ठरवले. कोणा जुन्या माणसाने त्याला ही जागा दाखवली, अशोकाने मग प्रयत्नपूर्वक अस्थि परत बाहेर काढल्या. ते करताना रत्नांबद्दल अजातशत्रूने लिहीलेली गरीब राजपुत्रांबद्दलची टीप वाचून तो वैतागला असाही गंमतीदार उल्लेख आहे, पण त्याने काम पूर्ण केले. ह्या अस्थिंवर एकंदरीत ८४,००० स्तूप बांधण्यात आले. अशोक आणि अजातशत्रूमध्ये बरेच साम्य आहे. दोघेही आपापल्या वडिलांना मारून सत्तेवर आले. अजातशत्रूच्या वडिलांचे नाव बिंबिसार तर अशोकाच्या वडिलांचे नाव बिंदुसार असे सांगितले जाते. अजातशत्रू आणि अशोक हे दोघेही युद्धखोर सत्ताधीश होते. दोघांनीही सुरुवातीच्या काळात सत्तेसाठी वाटेल ते प्रयत्न केले, सत्ता काबीज केली, आणि नंतरच्या काळात धार्मिकांना जवळ केले होते. पण नंतर मात्र वरील कथा खरी मानली तर अजातशत्रूने मुलाच्या सत्तालोलुपतेला आळा घातला नाही. अशोकाने मात्र मुलांच्या सत्तालोलुपतेला आळा घातला म्हणण्यापेक्षा लक्ष मगधापासून बाहेर वळवले. संघमित्रा, आणि महिंद्र या दोन्ही मुलांना दूर श्रीलंकेत पाठवले. त्याचा अजून एक मुलगा कुणाल हा काही काळ अशोकाच्या मर्जीबाहेर होता, पण नंतर अशोकाला चूक कळल्यावर त्याने मुलाला परत राजदरबारी आणले असे दिसते. अशोकाच्या उत्तर आयुष्यात त्याला फारसे विरोधक उरले नसावेत असे वाटते. म्हणून या काळात भव्यदिव्यतेच्या कल्पना स्तूपांच्या संख्येशी जोडल्या गेल्या असे दिसते. मात्र अशोकाच्या काळात जर ८४,००० स्तूप बांधून झाले असले तर नंतर शुंग आणि इतर राजांनी काय केले असा प्रश्न पडतो. यावरून एवढेच म्हणता येईल की अशोकाच्या काळात स्तूपांच्या बांधकामाची चलती झाली. अशोकाच्या शिलालेखांमधून त्याच्याबद्दल बरीच माहिती मिळते पण ती तो सत्ताधीश म्हणून स्थिर झाल्यानंतरची. त्याआधीची माहिती ही अशा कथा-कहाण्यांमधूनच मिळते. ती कितपत खरी धरायची, आणि किती खोटी हे ठरवणे अवघड आहे. काही कपोलकल्पित कथा (उदा. अजातशत्रूने लिहून ठेवलेले भविष्य) या स्तूप खणून आधीचे पुरून ठेवलेले अवयव काढले यावरून गहजब होऊ नये म्हणून किंवा अजातशत्रूशी अशोकाचा संबंध प्रस्थापित करण्यासाठी रचल्या गेल्या असाव्यात*. भविष्य आदी गोष्टी पुराणातली वांगी म्हणून सोडून दिली तरी अनेक गोष्टी विचारांना खाद्य असल्याप्रमाणे आहेत. १. भविष्य सांगण्याची प्रथा बरीच जुनी दिसते :) २. राजांनी भविष्ये आणि भविष्य सांगणार्‍यांना स्वतःच्या हितासाठी वापरून घेण्याची पद्धतही जुनीच दिसते. ३. अशोकाच्या काळात यज्ञयाग राजकीय हस्तक्षेपाने कमी झाले असे म्हणतात. यज्ञांनी होणारा तोटा, नुकसान टळले हे उत्तमच झाले, पण लोकांचा यज्ञयागांवर खर्च होणारा पैसा आणि लक्ष इतरत्र वळले असावे, त्याला आळा घातला गेला नाही. उलट प्रोत्साहन दिले गेले. अर्थात त्यामुळेच स्तूपांसारखी स्थाने आज भारतीय इतिहासाची माहिती देत उभी आहेत हा झालेला फायदा. पण तोटेही बरेच असावेत. मुख्य तोटा असा की अशोकाच्या काळात यज्ञांना आळा बसला म्हणून नंतरच्या शुंगांनी आणि सातवाहनांनी जरी लेणी कोरणे, आणि स्तूप उभारणे सुरूच ठेवले तरी यज्ञयागांचेही थोडेफार पुनरुत्थान केले. जरी नंतर त्यात प्राण्यांचे बळी देण्याचे प्रमाण कमी झाले, तरी पैसा आणि शक्तीचा अपव्यय टळला नाही. मुळात अर्थव्यवस्थेचा भाग झालेली कोणतीही वाईट पद्धत मोडकळीला आणायची असल्यास तिला अनेक पर्याय तयार करायला हवेत. पर्याय तयार करण्याची राजकीय इच्छाशक्ती आणि सामाजिक जाण अशोकाने दाखवली (स्तूपांची बांधकामे हा त्याचाच प्रकार), पण अनेक पर्याय तयार झाले नसल्याने ही जाण समाज पूर्ण बदलण्यास पुरेशी पडली नाही असे मला वाटते. असो. यानंतर अजून एक विचारांना खाद्यः अस्थिंबरोबर पुरण्याच्या गोष्टींबद्दल जे काही लिहून ठेवले गेले आहे त्यापैकी काही पद्धती पाहून जुन्या चिनी संस्कृतींशी त्यांचा काही संबंध असावा का असे वाटते. इजिप्तमध्ये लाकडी मानवी बाहुल्या शवपेटिकेबरोबर पुरण्याची पद्धत होती. लाकडी बाहुल्या पुरण्याची पद्धत चीनमध्येही होती असे दिसते. (पूर्वी कोणी राजा मरण पावला की त्याच्याबरोबर नोकरचाकर, घोडे, रथ पुरले जात, नंतर ती पद्धत सोडून बहुदा लाकडी वस्तू पुरल्या जाऊ लागल्या). http://history.cultural-china.com/en/56History9562.html विशेष म्हणजे हे वर्णन श्रीलंकेच्या महावंसामध्येही सापडते. उदा. महावंसातील लेखनात स्तूपातील 'स्वर्गाचे' वर्णन करताना चार टोकांना चार राजे (बहुदा लोकपाल) आहेत असे म्हटले आहे. चीनमधील या नवीन उत्खननांबद्दल कोणाला काही दुवे मिळाल्यास ते जरूर द्यावे. ह्यामध्ये काही संबंध आहेत का हे अभ्यसनीय असावे. मात्र यावरून या कथा किंवा व्यक्ती भारतातल्या नाहीत किंवा आहेतच अशा पद्धतीचे निष्कर्ष काढणे मला योग्य वाटत नाही**. ---------------------------------- टीपा: * याचे कारण समजत नाही. ** माझ्या हे स्पष्ट करण्यामागचा संदर्भ आहे तो खट्टामिठा या ब्लॉगचा. या ब्लॉगकर्त्याने http://khattamitha.blogspot.com/2008/03/blog-post_07.html भास्कर जाधवांचे उदाहरण देऊन रामकथा ही इजिप्तमधली आहे असा निष्कर्ष घाईने काढल्यासारखा वाटतो. ------------------------------------ जालावरील संदर्भः Indian Kavya literature:The wheel of time, Volume 7, Part 1 Anthony Kennedy Warder, Motilal Banarsidass Publ., Apr 30, 2004. http://history.cultural-china.com/en/56History9562.html Mahavamsa:Great Chronicle of Ceylon Wilhelm Geiger Asian Educational Services, Dec 1, 1996 - 300 pages
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 63170
प्रतिक्रिया 72

प्रतिक्रिया

In reply to by सागर

विस्ताराने दिलेल्या कुणालाच्या कथेबद्दल आभार. स्तूपांबद्दल, ८४००० स्तूप असेच वाचले आहे. विकीवरही हेच दिसते. http://en.wikipedia.org/wiki/Stupa अंत्यसंस्काराबद्दल - मी चिनी माहिती देण्याचे कारण एवढेच की ज्या पद्धतीचे वर्णन ४ दिशांना चार लोकपाल आदी आहे तसेच वर्णन चिनी उत्खननात दिसले. तसेच वन्य प्राण्यांना मारणार्‍या यंत्राचा उल्लेख वेगळा वाटला. शिवाय मी वर जे वायूविजनाची सोय केली असे लिहीले आहे ते मूळ भाषांतरकाराने 'fixed a fan with the force of the wind and closed it with a bolt' असे लिहीले आहे (जे बहुतेक मी चुकीच्या अर्थाने वायूविजनाबद्दल समजले). खालील दुवा (अजून एका चिनी उत्खननात ब्लास्ट ब्लोअर म्हणून कबरींमध्ये मिळाल्याची बातमी आहे). http://www.china.org.cn/english/culture/97500.htm परत याचा अर्थ ही चिनी पद्धत होती - तेथून आपल्याकडे आली वगैरे काही म्हणायचे नाही. फक्त ही एक संशोधनाची दिशा असू शकते. त्याबद्दल पुरावे न मिळाल्यास ते चूक म्हणून सोडून देता येईल.