Skip to main content

बिघडला स्वर्ग हा अपार.

लेखक रेवती यांनी मंगळवार, 07/02/2012 02:58 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ: क्षीरसागरातले विष्णूंचे होम थिएटर. प्रचंड आरडाओअरडा ऐकू येतोय. बावन्न इंची एच डी एल ई डीवर सुपरबॉलचा धुमाकूळ सुरु आहे. नारदमुनी: नारायण , नारायण. विष्णू: अरे! मुनीवर कधी आलात? येताना नेहमीसारखा खडावांचा आवाज नाही आला? नारद (उसासा टाकून खांद्यावरची गिटार खाली ठेवत): कुठल्या खडावा आणि कसले काय्.....सध्यातरी स्पोर्टशूजच वापरावे लागतायत. बघताय ना, वजन किती वाढलय आणि पायही सुजलेत. सो, खडावाज आर आउट ऑफ क्वश्चन! विष्णू: अरेच्च्या! हा बदल बरा चालला तुम्हाला? नारद: खडावांसारखी खडखड मीही केली पण डॉ. धन्वंतरी ओरडले. "जस्ट डू इट!" (चेहेर्‍यावरचा घाम पुसत लक्ष्मीची एन्ट्री होते.) लक्ष्मी: हॅलो मुनीवर! नारद: नमस्कार देवी, कश्या आहात? अंमळ थकलेल्या वाटता. लक्ष्मी: हो, हे काय आत्ताच फिटनेस सेंटरमधून आलिये. माहेरी एक लग्न निघालय, म्हटलं जरा वजन कमी करावं. (विष्णूकडे रागाने कटाक्ष टाकत) यांच्यासारखे सुपरबॉलचे चोचले कसे परवडावेत आम्हाला! (आत जाते) विष्णू (सावरून घेत): तर, काय हो मुनीवर तुमच्या तब्येतीचं हे असं कश्यामुळे झालं? नारद: हम्म्म्.......आउटसोर्सींग! हल्ली पृथ्वीतलावरच्या फेर्‍या कमी झाल्यात,बरचसं काम त्रिखंड सर्व्हिसेसकडे आउटसोर्स केलय. व्हिडिओ कॉन्फरन्स करूनच अपडेटस् घेत असतो. (तेवढ्यात लक्ष्मी हातात ओनियन रिंग्जची प्लेट घेऊन बाहेर येते.) लक्ष्मी: अहो मुनीवर यांच्याही पोटाचा घेर केवढा झालाय पहा ना! सगळी पितांबरं गुढग्यापर्यंत वर सरकलियेत. तरी सांगत असते, सोमरस ओन्ली बॉटल अ डे, किप्स धन्वंतरी अवे! पण आमचं कोण ऐकणार? विष्णू (मखलाशी करत): फार नाही हो मुनीवर, तसा मी योगा करत असतो अधून मधून. सुस्कारे सोडतानाच कपालभातीही होवून जाते. लक्ष्मी (फणकार्‍याने): थोडा कसला, परवाच झालेल्या कैलास व्हिजिटमध्ये गरूडाला यांचं वजन सहन न होवून दोनदा थांबावं लागलं असं शंकरभावोजी जीटॉकवर सांगत होते. बरं, मी जाते बाई! लग्नात घ्यायचा उखाणा तयार करायचाय. विष्णू (थट्टेच्या सुरात): देवी, आम्हालाही ऐकू द्याकी तुमचा उखाणा! लग्नानंतर घेतलाच नाहियेत..... लक्ष्मी: आत्ताच अपडेटली फेसबुकची वॉल, विष्णूपंत बघतायत सुपरबॉल! नारद: हा हा हा. छानच हो देवी! पण एक सांगा, खमंग कांदा भज्यांवरून अनियन रिंग्जवर कश्याकाय आलात? लक्ष्मी: मिसेस मोहिनी धन्वंतरींनी आमचं डाएट प्लॅन करून दिलय, त्याप्रमाणेच करते सगळं. बरंतर मुनीवर, मी जरा शॉपिंगला जाऊन येते. (राजरथ हॅन्डबॅग आणि हायहिल्स सावरत प्रस्थान करते.) विष्णू: मुनीवर, आजकाल बातम्या मिळण्यासाठी आम्हाला तुमच्याशिवाय इतरही पर्याय आहेत बरं का! नुकतेच चित्रगुप्ताने ट्वीट केल्यानुसार तो त्याच्या चोपड्या आउटडेट करून काम क्लाऊड सर्व्हिसेसकडे आउटसोर्स करतोय म्हणे! नारद: हम्म्....चालायचच. दिवस बदलले तशी तंत्रंही बदलली. अनायसे होणारा व्यायाम मात्र थांबला. (नारदाच्या आयफोनची कॉलर ट्यून वाजते) हां, बोल रे.....काय? काय म्हणतोयस तू?........आस्सं होय्......निघतोच्.....लगेच. विष्णू: काय हो मुनीवर काय झालं? काही गडबड? नारद: हो हो सांगतो. लगेच निघायला हवं मला. असुर ग्रुप ऑफ हॅकर्सनी म्हणे त्रिखंड सर्व्हिसेसची वेबसाईट हॅक केलीये. यापुढे बातम्या काढण्यासाठी आणि पुरवण्यासाठी मलाच त्रिलोकीची यात्रा करावी लागणार. अर्थात माझे व्यवहार सुरळीत होणार. अहो शेवटी यंत्र ते यंत्र आणि तंत्र ते तंत्र! त्या यंत्रांना निकामी करण्यासाठी असूर गृपची योग्य ती कळ दाबण्याचं कार्य पार पाडलं ते आमच्या तंत्रानंच.......काहीही झालं तरी कळीचा नारद मी. जाता जाता "चारी तोंडानं चारीठाव चरणार्‍या" ब्रम्हदेवालाही काम तंत्रानं होऊ देण्याबद्दल सांगतो म्हणजे त्याच्या वाढणार्‍या वजनाखाली कोमेजणारं कमळ पुन्हा तरारून येईल! नारायण नारायण! (शिर्षक श्रेय- रंगाण्णा.)

वाचने 19881
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

लेखन आवडले. :) आत्ताच अपडेटली फेसबुकची वॉल, विष्णूपंत बघतायत सुपरबॉल! हे तर लैच भारी. बाकी, विष्णूपंत हे क्रिकेटचे फ्यान होते असे ऐकलेले होते. बाकी, क्रिकेटमधील दारुण पराभव पाहवत नसल्यामुळे विष्णूपंत सुपरबॉलकडे वळले की काय ? :) टीप : विष्णूपंत हे इहलोकातील एखाद्या काल्पनिक मनुष्याचं नाव असावं म्हणून प्रतिसादात विष्णूपंत असे लिहिले आहे. कोणा शिव आणि वैष्णव पंथांच्या भक्तांनी उगाच टेंशन घेऊ नये, ही नम्र विनंती. -दिलीप बिरुटे

उत्तम लिहिले आहेस रेवती :) "सोमरस ओन्ली बॉटल अ डे, किप्स धन्वंतरी अवे!" हे वाचून खुप हसायला आले :bigsmile: आणी उखाणा तर क्या बात!! क्या बात!! क्या बात!!

मस्त. "शंकरभावोजी जीटॉकवर" --- जबरी. :) आत्ताच अपडेटली फेसबुकची वॉल, विष्णूपंत बघतायत सुपरबॉल! --- हपुवा. :) :)

काही कल्पना अजून फुलवून एखादे नाटुकले होऊ शकले असते असे वाटले. अर्थात निर्मितीची वेळ बघता पटकन लेख संपला यात आश्चर्य नाही.

अशा लिखाणाचा आम्ही जाहिर निषेध करतो आहोत ! आपल्याच संस्कृतीची खिल्ली उडवणारे लेखन आपल्याच लोकांकडून व्हावे यासारखे दुर्दैव नाही. परा कटियार अध्यक्ष चतुरंग दल

In reply to by परिकथेतील राजकुमार

जाहीर पुणेरी मराठी: +१ रेवतीआजीने आम्हाला पराषेटच्या गोटात परस्परच ढकलून दिल्याने संमती देतो आहे. बाकी या ढकलाढकलीचा आनंद (अथवा दु:ख) साजरा करण्याबाबत आम्ही साशंक आहोत. खाजगी पुणेरी मराठी: लेख आवडला हो. पण मेव्या म्हणतोय तसा - शुरु होतेही खतम हो गया, और भौत घाईघाईमें लिख्या लगता है. --असुर

In reply to by परिकथेतील राजकुमार

बरं झालं बाबा निषेध केलास. म्हटलं गेला कुठे हा. जमलं तर त्या असुरालाही समजाव. त्याचं नाव लिहिलं हे एकच मनात धरून बसलाय.

मस्त खुसखुशीत लेखन. वाचताना मजा आली. काहि प्रतिसाद वाचून छान करमणूक झाली. अभिज्ञ

अहो , लेखिका बाई , का अशी आमच्या देव देवतांची चेष्टा करता. ....आता आमच्या कित्ती किती भावना दुखावल्या म्हणून सांगू ? आमच्यात फतवे निघत नाहीत म्हनून त्याचा लई म्हजी लईच डिस अ‍ॅडवव्हान्टेज घेता की हो ! कल्पना भारी आहे. पण एक " बग" त्यात आहे..... देवांना भूक ही भावना नसते... संदर्भ .. जीतेंद्र , प्रेमनाथ देवेन वर्माचा लोक परलोक हा चित्रपट. ( यावर भारत सरकरने बंदी घातली होती..... भावना दुखावल्या..... आ>>>>ईईईईए ग ) त्यामुळे विष्णूना सेंट्रल ओबेसिटी होणे गैरलागू आहे. फारतर सोमरसाचा डोस ज्यादा आल्याने काही अघटित आजार आला असे रूपक घेता आले असते ...अरे ,,, अरे पण देवाना आजारही होत नाहीत ,ते अजरामर आहेत ना .....? मग अश्विनीकुमार , डॉ. धनवंतरी यांचे काय बुवा तिथे...... ? अरारा ...... काहीच संगति लागत नाही ... मति गुंग झाली...... मग आता लेखनसीमा .