Skip to main content

रॉकस्टार

लेखक समीरसूर
Published on रवीवार, 13/11/2011
रॉकस्टारचे पोस्टर्स बघून हा चित्रपट बघायचाच असे ठरवले होते. गाणी आणि संगीत आधीच सुपरहीट आहे; शिवाय इम्तियाझ अलीचा चित्रपट म्हणून उत्सुकता होतीच. त्याचा 'जब वुई मेट' छान वाटला होता. 'रॉकस्टार'चे पोस्टर खरोखरच खूप उत्सुकता निर्माण करणारे वाटले होते. लांबलचक केस वाढलेला आणि टोपी घातलेला रणबीर कपूर पोस्टरवर बघून चित्रपटात काहीतरी वेगळे असेल असे वाटले होते आणि काही प्रमाणात ही अपेक्षा पूर्ण झाली देखील. एका रॉकस्टारच्या ओपन एअर कॉन्सर्टमध्ये त्याच्या संगीतावर थिरकणार्‍या आणि मदहोश होणार्‍या तरण्या पोरांच्या बेधुंद मस्तीला अगदी उत्कृष्ट पद्धतीने पकडणार्‍या प्रसंगाने चित्रपट सुरु होतो. हा रॉकस्टार अर्थातच रणबीर असतो. तरुण पोरं या रॉकस्टारसाठी वेडी झालेली असतात. पोरी आपल्या लाडक्या रॉकस्टारच्या दर्शनाने हर्षातिशयाचा धक्का बसून धारातीर्थी पडत असतात. कॅमेराचे सुंदर अँगल्स, झळाळणारी प्रकाशयोजना, रणबीरचा अत्युच्च दर्जाचा अभिनय...पहिल्याच प्रसंगात चित्रपटाचा आवाका लक्षात येतो. अर्थात, एका सामान्य कुटुंबातला कॉलेजात शिकणारा अतिसामान्य रणबीर स्वतःला या स्वप्नात पाहत असतो हे लगेच लक्षात येते. गिटार वाजवू शकणारा आणि गायक बनण्याची महत्वाकांक्षा असलेला रणबीर तसा खूप लाजरा आणि बालिश असतो. त्याच्या कॉलेजातल्या कँटीनचा मालक त्याला कलाकार होण्यासाठी दर्द अनुभवणे गरजेचे आहे असे सांगतो. रणबीर (जनार्दन जाखड) दर्द मिळवण्यासाठी इरेला पेटतो. एका सुंदर दिसणार्‍या मुलीच्या म्हणजे नर्गिस फाखरीच्या (हीर) प्रेमात पडून प्रेमभंगाचं दु:ख मिळवण्यासाठी आटापिटा करतो; पण त्या पोरीने झिडकारल्यानंतरही त्याला 'खरा' दर्द-बिर्द वाटत नाही. तो आपला आरामात समोसे हादडत आपल्या प्रेमभंगाची सुरस कथा कँटीनमालकाला (खटाराभाई) ला ऐकवतो. कसं होणार या खुशालचेंडूचं म्हणून खटाराभाई काळजीत पडतो. दरम्यान, हीरची जनार्दनसोबत दोस्ती जमते. मग 'जंगली जवानी' हा 'प्रेमळ' चित्रपट पाहणं, देशी दारू ढोसणं, वेश्यावस्तीत चक्कर मारणं असले उद्योग करत हीर आणि जनार्दन अनुभवांचे स्वातंत्र्य उपभोगतात. पुढे हीर जनार्दनला स्वतःच्या लग्नाचे आमंत्रण देते आणि जनार्दन काश्मीरला जाऊन तिच्या लग्नात खूप कामं करतो. हीरचं लग्न पार पडते आणि जनार्दन परत आपल्या गावी येतो. परत आल्यावर तो गायक म्हणून थोडंबहुत नाव कमवतो. दरम्यान, त्याचे भाऊ त्याला घरातून हाकलून देतात. आणि मग सुरु होतो जनार्दनचा खडतर प्रवास. मग अजमेरच्या दर्ग्यावर भिकारी अवस्थेत गाणी गात असतांना त्याला शम्मी कपूर (उस्ताद जमील खान) बघतात. त्याला एका रेकॉर्ड कंपनीच्या करारानुसार युरोपमध्ये जाण्याची संधी मिळते. तिथे तो हीरला भेटतो. तिथे विवस्त्र स्त्री-पुरुषांच्या बारमध्ये जाऊन ते पुन्हा अनुभवस्वातंत्र्य उपभोगतात. नंतर एका गुन्ह्याच्या आरोपाखाली तेथील पोलीस त्याला अटक करून भारतात परत पाठवतात. पुढे काय होते? तो रॉकस्टार होतो का? हीरचे काय होते? जनार्दनवर प्रेम करणार्‍या टीव्ही रिपोर्टरचे काय होते? त्याच्या म्युझिक काँट्रॅक्ट्सचे काय होते? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी सुरस असा 'रॉकस्टार' बघणे इष्ट ठरेल. सगळ्यात पहिले रणबीरचं कौतुक करावं लागेल. ही भूमिका तो अक्षरशः जगला आहे. नर्गिस फाखरी दिसायला एवढी सुंदर नाहीये पण तिने अभिनय छान केला आहे. ए. आर. रहमानने संगीत जोरदार दिलं आहे. 'साड्डा हक, येथ्थे रख' आधीच खूप गाजतंय. अजमेरच्या दर्ग्यामधलं गाणं खूप छान वाटतं. बाकी रॉक म्युझिकमधलं मला काहीच कळत नसल्याने त्याच्या बाकी गाण्यांवर मला प्रतिक्रिया देणं शक्य नाही. पण गाणी लक्षात राहत नाहीत हे खरं. दृष्यप्रभावांमुळे गाणी बघणं एक सुखद अनुभव ठरतो. चित्रपटाचे चित्रण अत्युच्च दर्जाचे आहे. प्राग आणि काश्मिरचे मनोहारी दर्शन चित्रपटातून घडते. चित्रपटाचा पहिला भाग खूप छान जमून आलाय. खटकेबाज संवाद, हसायला लावणारे प्रसंग, जनार्दन-हीरचे विविध अनुभव घेतांनाचे प्रसंग, खटाराभाईचा आटापिटा आणि उपदेश हे सगळं खूप मस्त वाटतं. दुसर्‍या भागात चित्रपट गंभीर होतो. पटकथा सैल पडते. शेवटच्या अर्ध्या तासात तर दिग्दर्शकाचा उडालेला गोंधळ स्पष्ट दिसतो. दुसर्‍या भागात कथा भरकटते. चित्रपटाचा शेवट अगदीच अतार्किक आणि बेचव झाला आहे. शेवटची दहा मिनिटे काहीतरी अगम्य गाणी दाखविण्यात इतकी रटाळ झाली आहेत की विचारता सोय नाही. शेवटची वीस मिनिटे चित्रपट विनाकारण खेचला आहे असे वाटते. एका क्षणाला वाटते की चित्रपट आता संपला पण मारुतीच्या शेपटाप्रमाणे चित्रपटाचे रीळे उलगडतच राहतात आणि गाण्यांचा भडीमार कंटाळा आणतो. शेवटी एकदाचा चित्रपट संपतो तेव्हा ९९% प्रेक्षक आधीच निघून गेलेले असतात. शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षक खुर्चीमध्ये बसून राहणं हे चित्रपटाच्या यशाचे एक द्योतक आहे. 'रॉकस्टार'च्या बाबतीत मात्र बहुधा दणदणीत यश एक धूसर शक्यता वाटते. पुण्या-मुंबईसारख्या शहरांमध्ये चित्रपट बर्‍यापैकी चालेल. ग्रामीण भागात (जो अजूनही हिंदी चित्रपटांच्या एकूण व्यवसायाच्या ६०% व्यवसायाची गुरुकिल्ली आहे) मात्र 'रॉकस्टार' खडकावर आदळणार असे दिसतेय. एकूणात चित्रपटाचे यश 'हीट' किंवा 'सरासरीच्या वर' असे असू शकते. मनोरंजन या निकषावर 'रॉकस्टार' बर्‍यापैकी यशस्वी होतो. शेवटची १५-२० मिनिटे वगळता चित्रपट गुंतवून ठेवतो. मोहात पाडणारी काही दृष्ये खूप छान घेतली आहेत. वासनेचा जहरीला साप विवेकबुद्धीला डंख मारून कसा घायाळ करतो आणि तो विकारी दंश झाल्यावर माणूस (म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघेही; फक्त पुरुषच नव्हे!) कसा सैरभैर होतो, त्याच्या मनाची तगमग त्याला कशी बरबाद करते, प्रेमाच्या भव्य मंडपाला विवेकाची मोहक झालर नसेल तर भावनांच्या ज्वाळा त्या मनोहारी मंडपाला कसे भस्मसात करून टाकतात हे अगदी समर्थपणे दाखवण्यात 'रॉकस्टार' यशस्वी होतो. एक चित्रपट म्हणून ठीक आहे पण 'रॉकस्टार' ज्या विच्रारबीजापोटी उभा राहतो ते विचारबीज थोडे गोंधळात टाकणारे वाटले. 'साड्डा हक येथ्थे रख' या गाण्याचे प्रयोजन कळले नाही. मनाला वाटेल ते, वाटेल तसं वागण्याचे स्वातंत्र्य असा तर अर्थ यात अभिप्रेत नाही ना? म्हणजे उठून कोणत्याही पोरीला चुंबावं, तिचं लग्न झालेलं असेल तरी तिच्या नवर्‍याला फाट्यावर मारून तिच्या शरीराचा हव्यास धरावा आणि वरून आम्हाला कुणीच काही विचारू नये; उलट प्रेमरत्न किंवा प्रेमभूषण असा पुरस्कार देऊन आमचा लकडी पुलावर सत्कार करावा अशी तरुण स्वातंत्र्याची कल्पना घेऊन हा चित्रपट बनवला आहे की काय असे वाटले. एका गाण्यात रणबीर 'मैं उन परिंदो को ढूंढ रहा हूं जो इस शहर को छोडकर चले गये...' वगैरे बडबडतो आणि 'नेचरची काळजी घेणार्‍यांनो, माझी पण काळजी घ्या, मी पण नेचरच आहे...' असं काहीतरी गाण्यातून आव्हान करतो. अरेच्चा! हा काय प्रकार आहे? काय संदेश आहे हा? म्हणजे माझ्या प्रेमाची, शरीरसुखाची व्यवस्था तुम्ही करा, मी कार्यभाग साधत असतांना तिकडे तुम्ही बघू नका आणि नंतर बोंब तर अजिबात मारू नका. नाहीतर मी भडकून तुमचं टाळकं फोडेल. मला जे वाटतं ते बरोबरच आहे असं वाटून मी ते केलं तर तुम्ही ते समजून घ्यायला पाहिजे व त्याचं कौतुकही केलं पाहिजे असा हा विचार रुजवण्याचा प्रयत्न दिसतो. एका तरुणाच्या आयुष्यातल्या अतिखाजगी आणि अतिसंवेदनशील गोष्टींना चळवळीचे स्वरूप देण्याचा दिग्दर्शकाचा हेतू काय असावा हे कळले नाही. काही झेंडे वगैरे पण गाण्यांमध्ये दिसतात. तिबेटचे झेंडे बहुधा धूसर केलेले जाणवले. तिबेटच्या स्वातंत्र्याला कथेचे सूत्र जोडण्याची ही काय भानगड आहे? काहीतरी लोच्या खासच वाटला... नर्गिस मला एवढी काही आवडली नाही. श्रेयस तळपदेच्या नाकासारखे तिचे नाक ओठांच्या वरच्या बाजूला गोल रेष खाली आल्यासारखे दिसते. कुठल्यातरी बुधवार पेठ छाप टॉकीजला जाऊन 'जंगली जवानी' बघण्याची खाज तिला असते. खरं तर अशा धमाल प्रसंगातून चित्रपट आणखी खुलवता आला असता पण हे सगळे प्रसंग गुंडाळले आहेत कारण दिग्दर्शकाला पुढचा 'साड्डा हक येथ्थे रख' हा विचार मांडायला वेळ कमी पडला असता. शम्मी कपूर छान दर्शन देऊन जातात. त्यांचे रुपेरी पडद्यावरचे बहुधा हे शेवटचेच दर्शन ठरावे. खटाराभाई (अभिनेत्याचं नाव माहित नाही) खूप हसवतात....बाकी चित्रपट म्हणून एकदा बघायला हरकत नाही. --समीर
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4619
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

चित्रपट लगेच जाऊन पहायला उद्युक्त करणारं परिक्षण. काही वाक्ये तर अतिशय म्हणजे अतिचशय आवडली, पण ती मुद्दाम अनकोट ठेवतो :)

'समीर' भाउ मस्त 'सूर' लागला आहे परिक्षणाचा! आवडले, हा चित्रपट एनीवे बघणारच होतो, रणबीरसाठी. आता तर मस्ट सी कॅटेगरीमधे गेला. - (रॉकस्टार) सोकाजी

छान. सोपी आणि सुटसुटीत समि़क्षा. आभार.

स सूनच अजून एक बहारदार परीक्षण..

एकदम झकास परीक्षण. माझ्या भावानीसुद्धा चित्रपट पाहून अगदी तंतोतंत तुझ्यासारखं मत व्यक्त केलं. म्हणजे आता काय अपेक्षा ठेऊन चित्रपट बघायचा हे पक्कं झालं ! चित्रपटाचं appreciation, त्यावरची टीका आणि त्यातलं फसलेलं लॉजिक हे सगळंच जमून आलंय परीक्षणात. झकास ! जे पी

आत्ताच दुसर्‍या धाग्यावर चित्रपटाबद्दल प्रतिकूल झालेलं मत व्यक्त करून आलो आणि हे वाचलं. जाऊन बघावा की काय असं वाटून गेलं असं छान परीक्षण आहे. अर्थात शेवटाबद्दल लिहीलेल्या भागामुळे आणि एकूणच गंडलेल्या विषयामुळे पास हे मत कायम करण्यात आले आहे.

१. साड्डा हक च प्रयोजन खरचं कळाल नाही.... आणि "ओ इको फ्रेण्डली..." ह्या ओळी आणि त्या पटाव्या म्हणुन आधी केलेली बड्बड हे ही फसलय... २. रणबीरला त्या पोरी पेक्षा तिच्या शरीराची जास्त ओढ आहे असं वाट्त रहातं.. ३. गाणी खरचं छान आहेत... पण शेवट गंडलाय...

एकूण चित्रपट एकदा पहायला हरकत नाही! कोणत्यातरी चॅनेलवर येईलच.

परिक्षण आवडले... नेहमीप्रमाणे सर्व बाजूंनी समीक्षा केलेली आहे.

परिक्षण आवडले. लगेच तूनळीवर ट्रेलर पाहिले. सगळा आरडाओरडाच दिसतोय. जाऊन पाहण्याइतका बरा नाही वाटत शिनेमा.

लेखन नेहमीप्रमाणेच सुरेख आणि व्यवस्थीत 'तोल मोल के बोल' असलेले. रणबीर हा मनुष्य दिसतोच इतका मतिमंद की काय सांगावे =)) त्याचे चित्रपट तर दूरच, त्या चित्रपटांची ट्रेलर देखील बघायचे धाडस होत नाही बॉ.

स्त्रियां विरूध्द भयंकर षडयंत्र रचणारा दिग्दर्शक आहे हा इम्तीयाज. ह्याच्या प्रत्येक चित्रपटात तो हिरॉइनला असं डेअरडेवील दाखवतोच, म्हणजे हीरॉइन ही अत्यंत धीट वा दारू वगैरे पिणारी अथवा (तसं धाडस करणारी), हूशार पूरूषांच्या खाद्यांला खांदालावून निर्णय घेणारी तरूण तडफदार धडाडीची वगैर वगैरे असूनही असं आपल्या पयल्या नवर्‍याला नेहमी का "डीच" करते हेच कळत नाही. प्रत्येक चित्रपटात स्त्रियांची ही प्रतीमा रंगवल्याबद्दल इम्तीयाजचा करावा तेव्ह्डा निषेध कमीच आहे. स्त्रिमूक्तीवाले जाणकार उ़जेड टाकतीलच. पण आपण स्त्रियांचा असा अपमान का खपवून घ्यावा ?

समीरसूरचं आणखी एक "सर्वांग-सुंदर" परीक्षण.. आधीचा धागा वाचल्यावरही पिक्चर पाहूनच प्रतिक्रीया लिहायचं ठरवलं होतं.. मी हा पिक्चर इम्तियाजचा म्हणून बघायला गेलो होतो.. त्याचं कदाचित चेतन भगतसारखं होतंय, प्रत्येक नव्या चित्रपटासोबत खाली-खाली घसरत चाललाय.. "रॉकस्टार" बर्‍याच गोष्टी अनक्लियर ठेवतो.. रणबीर एवढा चवताळलेला आणि कनफ्युज्ड का आहे, हे कळलं नाही.. ह्याआधीच्या चित्रपटांमधे इम्तियाजने हीरो-हीरोईनच्या हृद्याची पडझड काही प्रसंगाद्वारे आणि गाण्यांमधून योग्य प्रकारे दाखवली होती. ( "इक पेड हमनें प्यार का" हे गाणं आणि त्याआधीचे काही प्रसंग इन सोचा ना था.. "आओगे जब तुम साजना" आणि सुरुवात इन जब वी मेट.. "यें दुरीयां" इन लव आज कल..) ह्या पिक्चरमध्ये हे सगळं दाखवण्यात तो सपशेल फसलाय, असं मला वाटतं... बाकी आत्मशून्य म्हणतात तसंच मलाही वाटतं.. हीरोईनने तिच्या नवर्‍यापासून (होणार्‍या कींवा असलेल्या) पळून, तोडून प्रियकराकडे जाणं, तिचं बोल्ड असूनही प्रेमाच्या बाबतीत कनफ्युज्ड असणं अश्या गोष्टींचं इम्तियाजला ऑब्सेशन आहे कदाचित..

एक जबरदस्त चित्रपट ! इथली परीक्षण वाचून कुठलाही मत बनवण्यापेक्षा थेटरात एकदा तरी हा चित्रपट पाहावा. कारण लवकरच हा चित्रपट थेटरातून जाईल :) ए.आर + मोहित आणि गीतांचे शब्दानी जबरदस्त गाणी तयार झाली आहेत. रॉक-स्टार एक प्रचंड आवडलेली अनुभूती वाटली शेवटची पाच मिनिटे तर एक तर एका वेगळ्या पातळीवर घेऊन जातो

पाहिला. जिगसॉ पझल जोडून काय घडतंय ते नेमकं समजून घेण्यातच सगळी शक्ती खर्च पडली. कोलाज पद्धतीने दाखवण्या दाखवण्यात स्टोरीचा महाकोला झाला आहे. जणू थम्सअप महाकोलाचा पिचर. बसल्या बैठकीत रिचवणे कठीण झाले. बाकी ठीकठाक.

In reply to by गवि

अगदी पहिल्यांदा पहिल्या नंतर अस वाटल , म्हणून दोनदा पहिला , दुसर्यांदा सर्व फंडे क्लीयर झाले !

आपल्या "मनस्वी" किंवा वाईल्ड हौसामौजा लग्नापूर्वीच पुर्‍या करुन घेण्याच्या अ‍ॅडव्हेंचरमधे जोडीदार कोण तर काल पर्यंत पोलीस बोलवावेत अशी निलाजरी छेडछाड करणारा आणि आज बावळट असल्याचं सिद्ध झालेला एक पोरगा.. आणि तिच्या आवडी पाहून फेफरेच भरले. ठीक आहे एकदा आवड म्हणून करुन बघायचंय. पण लग्नानंतर अनेक काळाने पुन्हा तो टपोरी प्रागमधे दिसताक्षणीच डिप्रेशन तात्काळ गहाळ होऊन लगेच पुन्हा स्ट्रिप क्लब, घाणेरडे पब आणि तिथल्या लोकांसमोर नाच, वेश्यागृहे वगैरे अशी लिस्ट आणि एक्झेक्युशन. म्हणजे एक फॉर्बिडन असलेला अनुभव प्रत्यक्ष घेऊन त्यातून पुढे जाणे नसून देशीदारु, वेश्यागृहे, कॅब्रेवाले बार, किसविषयी तपशीलवार चर्चा आणि असल्या गोष्टींची कायमची खावखाव सुटल्यासारखा फील आला. शिवाय लग्न ठरले आहे पण नवीन झालेल्या मित्राविषयीही काही वाटते आहे, त्यात नक्की निवड करता येत नाहीये. घरच्यांचं / परिस्थितीचं दडपण आहे.. म्हणून लग्न थांबवणं आता शक्य नाहीये.. किंवा मनःस्थितीच गोंधळाची आहे.. असं काही तिच्याबाबतीत वाटलं नाही. अगदी ओल्या मेहेंदीच्या हातांनीही मित्राला मिठी मारायला सांगणारी आणि त्याच्याशीच फँटसाईझ करण्याबद्दल किंवा पळून जाण्याबद्दल चर्चा करणारी ती (आणि लगेच पळून न जाता लग्नाविषयी आपला फर्मनेस दाखवणारी) "ती" पाहता तिच्या लग्नाबद्दलच्या कल्पना अगदी घट्ट आणि स्पष्ट आहेत, पाय जमिनीवर घट्ट आहेत असं वाटतं. मग त्यानंतर ती त्याच्यात गुरफटावी किंवा प्रागमधे डिप्रेशनात जावी हे अनाकलनीय वाटतं. लग्नापूर्वीच्या खरेदीत श्री जनार्दन हे वधूची मदत करीत असता चि.सौ.कां. नर्गिस हिने एक लाल उन्हाळी कपडा ट्रायलरूममधे घालून दाखवल्यावर त्याचे उर्वरित झाकण छातीपाशी उघडायला लावून डोळे भरुन पाहून "पलंगतोड.." असा तिचा गौरव आणि तिच्या पतीचे तिला अशा स्थितीत पाहून काय होईल त्याविषयीची श्री जनार्दनांची टिप्पणी हृदय हलवून गेली. त्यांच्यातील विशुद्ध मैत्रीची खात्रीच पटली.. बाकी ठीकठाक.