रॉकस्टारचे पोस्टर्स बघून हा चित्रपट बघायचाच असे ठरवले होते. गाणी आणि संगीत आधीच सुपरहीट आहे; शिवाय इम्तियाझ अलीचा चित्रपट म्हणून उत्सुकता होतीच. त्याचा 'जब वुई मेट' छान वाटला होता. 'रॉकस्टार'चे पोस्टर खरोखरच खूप उत्सुकता निर्माण करणारे वाटले होते. लांबलचक केस वाढलेला आणि टोपी घातलेला रणबीर कपूर पोस्टरवर बघून चित्रपटात काहीतरी वेगळे असेल असे वाटले होते आणि काही प्रमाणात ही अपेक्षा पूर्ण झाली देखील.
एका रॉकस्टारच्या ओपन एअर कॉन्सर्टमध्ये त्याच्या संगीतावर थिरकणार्या आणि मदहोश होणार्या तरण्या पोरांच्या बेधुंद मस्तीला अगदी उत्कृष्ट पद्धतीने पकडणार्या प्रसंगाने चित्रपट सुरु होतो. हा रॉकस्टार अर्थातच रणबीर असतो. तरुण पोरं या रॉकस्टारसाठी वेडी झालेली असतात. पोरी आपल्या लाडक्या रॉकस्टारच्या दर्शनाने हर्षातिशयाचा धक्का बसून धारातीर्थी पडत असतात. कॅमेराचे सुंदर अँगल्स, झळाळणारी प्रकाशयोजना, रणबीरचा अत्युच्च दर्जाचा अभिनय...पहिल्याच प्रसंगात चित्रपटाचा आवाका लक्षात येतो. अर्थात, एका सामान्य कुटुंबातला कॉलेजात शिकणारा अतिसामान्य रणबीर स्वतःला या स्वप्नात पाहत असतो हे लगेच लक्षात येते. गिटार वाजवू शकणारा आणि गायक बनण्याची महत्वाकांक्षा असलेला रणबीर तसा खूप लाजरा आणि बालिश असतो. त्याच्या कॉलेजातल्या कँटीनचा मालक त्याला कलाकार होण्यासाठी दर्द अनुभवणे गरजेचे आहे असे सांगतो. रणबीर (जनार्दन जाखड) दर्द मिळवण्यासाठी इरेला पेटतो. एका सुंदर दिसणार्या मुलीच्या म्हणजे नर्गिस फाखरीच्या (हीर) प्रेमात पडून प्रेमभंगाचं दु:ख मिळवण्यासाठी आटापिटा करतो; पण त्या पोरीने झिडकारल्यानंतरही त्याला 'खरा' दर्द-बिर्द वाटत नाही. तो आपला आरामात समोसे हादडत आपल्या प्रेमभंगाची सुरस कथा कँटीनमालकाला (खटाराभाई) ला ऐकवतो. कसं होणार या खुशालचेंडूचं म्हणून खटाराभाई काळजीत पडतो. दरम्यान, हीरची जनार्दनसोबत दोस्ती जमते. मग 'जंगली जवानी' हा 'प्रेमळ' चित्रपट पाहणं, देशी दारू ढोसणं, वेश्यावस्तीत चक्कर मारणं असले उद्योग करत हीर आणि जनार्दन अनुभवांचे स्वातंत्र्य उपभोगतात. पुढे हीर जनार्दनला स्वतःच्या लग्नाचे आमंत्रण देते आणि जनार्दन काश्मीरला जाऊन तिच्या लग्नात खूप कामं करतो. हीरचं लग्न पार पडते आणि जनार्दन परत आपल्या गावी येतो.
परत आल्यावर तो गायक म्हणून थोडंबहुत नाव कमवतो. दरम्यान, त्याचे भाऊ त्याला घरातून हाकलून देतात. आणि मग सुरु होतो जनार्दनचा खडतर प्रवास. मग अजमेरच्या दर्ग्यावर भिकारी अवस्थेत गाणी गात असतांना त्याला शम्मी कपूर (उस्ताद जमील खान) बघतात. त्याला एका रेकॉर्ड कंपनीच्या करारानुसार युरोपमध्ये जाण्याची संधी मिळते. तिथे तो हीरला भेटतो. तिथे विवस्त्र स्त्री-पुरुषांच्या बारमध्ये जाऊन ते पुन्हा अनुभवस्वातंत्र्य उपभोगतात. नंतर एका गुन्ह्याच्या आरोपाखाली तेथील पोलीस त्याला अटक करून भारतात परत पाठवतात. पुढे काय होते? तो रॉकस्टार होतो का? हीरचे काय होते? जनार्दनवर प्रेम करणार्या टीव्ही रिपोर्टरचे काय होते? त्याच्या म्युझिक काँट्रॅक्ट्सचे काय होते? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी सुरस असा 'रॉकस्टार' बघणे इष्ट ठरेल.
सगळ्यात पहिले रणबीरचं कौतुक करावं लागेल. ही भूमिका तो अक्षरशः जगला आहे. नर्गिस फाखरी दिसायला एवढी सुंदर नाहीये पण तिने अभिनय छान केला आहे. ए. आर. रहमानने संगीत जोरदार दिलं आहे. 'साड्डा हक, येथ्थे रख' आधीच खूप गाजतंय. अजमेरच्या दर्ग्यामधलं गाणं खूप छान वाटतं. बाकी रॉक म्युझिकमधलं मला काहीच कळत नसल्याने त्याच्या बाकी गाण्यांवर मला प्रतिक्रिया देणं शक्य नाही. पण गाणी लक्षात राहत नाहीत हे खरं. दृष्यप्रभावांमुळे गाणी बघणं एक सुखद अनुभव ठरतो. चित्रपटाचे चित्रण अत्युच्च दर्जाचे आहे. प्राग आणि काश्मिरचे मनोहारी दर्शन चित्रपटातून घडते.
चित्रपटाचा पहिला भाग खूप छान जमून आलाय. खटकेबाज संवाद, हसायला लावणारे प्रसंग, जनार्दन-हीरचे विविध अनुभव घेतांनाचे प्रसंग, खटाराभाईचा आटापिटा आणि उपदेश हे सगळं खूप मस्त वाटतं. दुसर्या भागात चित्रपट गंभीर होतो. पटकथा सैल पडते. शेवटच्या अर्ध्या तासात तर दिग्दर्शकाचा उडालेला गोंधळ स्पष्ट दिसतो. दुसर्या भागात कथा भरकटते. चित्रपटाचा शेवट अगदीच अतार्किक आणि बेचव झाला आहे. शेवटची दहा मिनिटे काहीतरी अगम्य गाणी दाखविण्यात इतकी रटाळ झाली आहेत की विचारता सोय नाही. शेवटची वीस मिनिटे चित्रपट विनाकारण खेचला आहे असे वाटते. एका क्षणाला वाटते की चित्रपट आता संपला पण मारुतीच्या शेपटाप्रमाणे चित्रपटाचे रीळे उलगडतच राहतात आणि गाण्यांचा भडीमार कंटाळा आणतो. शेवटी एकदाचा चित्रपट संपतो तेव्हा ९९% प्रेक्षक आधीच निघून गेलेले असतात. शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षक खुर्चीमध्ये बसून राहणं हे चित्रपटाच्या यशाचे एक द्योतक आहे. 'रॉकस्टार'च्या बाबतीत मात्र बहुधा दणदणीत यश एक धूसर शक्यता वाटते. पुण्या-मुंबईसारख्या शहरांमध्ये चित्रपट बर्यापैकी चालेल. ग्रामीण भागात (जो अजूनही हिंदी चित्रपटांच्या एकूण व्यवसायाच्या ६०% व्यवसायाची गुरुकिल्ली आहे) मात्र 'रॉकस्टार' खडकावर आदळणार असे दिसतेय. एकूणात चित्रपटाचे यश 'हीट' किंवा 'सरासरीच्या वर' असे असू शकते.
मनोरंजन या निकषावर 'रॉकस्टार' बर्यापैकी यशस्वी होतो. शेवटची १५-२० मिनिटे वगळता चित्रपट गुंतवून ठेवतो. मोहात पाडणारी काही दृष्ये खूप छान घेतली आहेत. वासनेचा जहरीला साप विवेकबुद्धीला डंख मारून कसा घायाळ करतो आणि तो विकारी दंश झाल्यावर माणूस (म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघेही; फक्त पुरुषच नव्हे!) कसा सैरभैर होतो, त्याच्या मनाची तगमग त्याला कशी बरबाद करते, प्रेमाच्या भव्य मंडपाला विवेकाची मोहक झालर नसेल तर भावनांच्या ज्वाळा त्या मनोहारी मंडपाला कसे भस्मसात करून टाकतात हे अगदी समर्थपणे दाखवण्यात 'रॉकस्टार' यशस्वी होतो.
एक चित्रपट म्हणून ठीक आहे पण 'रॉकस्टार' ज्या विच्रारबीजापोटी उभा राहतो ते विचारबीज थोडे गोंधळात टाकणारे वाटले. 'साड्डा हक येथ्थे रख' या गाण्याचे प्रयोजन कळले नाही. मनाला वाटेल ते, वाटेल तसं वागण्याचे स्वातंत्र्य असा तर अर्थ यात अभिप्रेत नाही ना? म्हणजे उठून कोणत्याही पोरीला चुंबावं, तिचं लग्न झालेलं असेल तरी तिच्या नवर्याला फाट्यावर मारून तिच्या शरीराचा हव्यास धरावा आणि वरून आम्हाला कुणीच काही विचारू नये; उलट प्रेमरत्न किंवा प्रेमभूषण असा पुरस्कार देऊन आमचा लकडी पुलावर सत्कार करावा अशी तरुण स्वातंत्र्याची कल्पना घेऊन हा चित्रपट बनवला आहे की काय असे वाटले. एका गाण्यात रणबीर 'मैं उन परिंदो को ढूंढ रहा हूं जो इस शहर को छोडकर चले गये...' वगैरे बडबडतो आणि 'नेचरची काळजी घेणार्यांनो, माझी पण काळजी घ्या, मी पण नेचरच आहे...' असं काहीतरी गाण्यातून आव्हान करतो. अरेच्चा! हा काय प्रकार आहे? काय संदेश आहे हा? म्हणजे माझ्या प्रेमाची, शरीरसुखाची व्यवस्था तुम्ही करा, मी कार्यभाग साधत असतांना तिकडे तुम्ही बघू नका आणि नंतर बोंब तर अजिबात मारू नका. नाहीतर मी भडकून तुमचं टाळकं फोडेल. मला जे वाटतं ते बरोबरच आहे असं वाटून मी ते केलं तर तुम्ही ते समजून घ्यायला पाहिजे व त्याचं कौतुकही केलं पाहिजे असा हा विचार रुजवण्याचा प्रयत्न दिसतो. एका तरुणाच्या आयुष्यातल्या अतिखाजगी आणि अतिसंवेदनशील गोष्टींना चळवळीचे स्वरूप देण्याचा दिग्दर्शकाचा हेतू काय असावा हे कळले नाही. काही झेंडे वगैरे पण गाण्यांमध्ये दिसतात. तिबेटचे झेंडे बहुधा धूसर केलेले जाणवले. तिबेटच्या स्वातंत्र्याला कथेचे सूत्र जोडण्याची ही काय भानगड आहे? काहीतरी लोच्या खासच वाटला...
नर्गिस मला एवढी काही आवडली नाही. श्रेयस तळपदेच्या नाकासारखे तिचे नाक ओठांच्या वरच्या बाजूला गोल रेष खाली आल्यासारखे दिसते. कुठल्यातरी बुधवार पेठ छाप टॉकीजला जाऊन 'जंगली जवानी' बघण्याची खाज तिला असते. खरं तर अशा धमाल प्रसंगातून चित्रपट आणखी खुलवता आला असता पण हे सगळे प्रसंग गुंडाळले आहेत कारण दिग्दर्शकाला पुढचा 'साड्डा हक येथ्थे रख' हा विचार मांडायला वेळ कमी पडला असता. शम्मी कपूर छान दर्शन देऊन जातात. त्यांचे रुपेरी पडद्यावरचे बहुधा हे शेवटचेच दर्शन ठरावे. खटाराभाई (अभिनेत्याचं नाव माहित नाही) खूप हसवतात....बाकी चित्रपट म्हणून एकदा बघायला हरकत नाही.
--समीर
याद्या
4619
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
चित्रपट लगेच जाऊन पहायला
सुंदर परीक्षण ! आधीच्या
'समीर' भाउ मस्त 'सूर' लागला
लवकरच पाहतो.
वा
एकदम झकास परीक्षण. माझ्या
आत्ताच दुसर्या धाग्यावर
सहमत.....
चित्रपट चान आहे पन तितकासा
छान परिक्षण...
समीक्षा आवडली
परिक्षण आवडले
परिक्षण आवडले. लगेच तूनळीवर
धन्यु
स्त्रियां विरूध्द भयंकर षडयंत्र
सुरेख परीक्षण...
एक जबरदस्त चित्रपट ! इथली
पाहिला. जिगसॉ पझल जोडून काय
अगदी पहिल्यांदा पहिल्या नंतर
In reply to पाहिला. जिगसॉ पझल जोडून काय by गवि
आणखी