ससे आणि जादुगार -
छोटे छोटे ससे कसे
टकमक इंद्रधनू बघती -
बघता कोपऱ्यात ते
रुसुनी मुकाट का बसती !
चुन्यात बुडुनी आलो वाटे,
लाल ना कुणी निळे -
रंग कुणाचे ना नारंगी
कुणीच ना काळे पिवळे !
एक छडी जादूची घेऊन
तिथेच जादुगार आला -
हिरमुसलेले तुम्ही दिसता
कोपऱ्यात ह्या का बसला ?'
'आम्ही सारे असे पांढरे -
रंगित नाही, शुभ्र कसे ?'
- एकमुखाने वदले सारे
जादुगार तो मनीं हसे !
मूठ उघडुनी जादुगार तो
रंगित चकती दावितसे
भरभर जादूच्याच छडीने
रंगित चकती फिरवितसे -
फक्त पांढरा रंगच दिसला-
फिरता चकती गरगर ती !
हसू लागले ससे बघुनिया
जादू रंगित चकतीवर ती !
मिसळुन सारे रंग जगीचे
शुभ्र ससे बनलात तुम्ही ,
मुळीच ना तुम्ही बिनरंगी-
बहुरंगी आहात तुम्ही ! '
आनंदाने फिरू लागले
सर्व ससे अवतीभवती -
गुप्त जाहला जादुगार तो
जादुची छडी अन् चकती !
मस्त!!
विदेशां -खूपच मस्त मूठ
विदेशां -खूपच मस्त मूठ
खुप छान कविता अमोल केळकर
छान बालगीत .. आवडले..
अरे वा...
बालकवी, छान कविता आहे बरं
बालकविता छान