✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

देऊळ.!! तु झोप मी जागा आहे!!

क
किसन शिंदे यांनी
Sat, 11/05/2011 - 16:34  ·  लेख
लेख
गेल्या आठवड्यात पाहिलेल्या रा-वण मुळे डोक्याला बराच मनस्ताप सहन करावा लागला होता त्यामुळेच कि काय? किमान महिनाभर आता कोणताच सिनेमा पहायचा नाही असच ठरवलं होतं, पण गिरिश आणी उमेश कुलकर्णी या जोडीचा देऊळ हा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित होतो आहे म्हटल्यावर मला माझा निर्णय बदलावाच लागला. महाराष्ट्रातलं एक गाव, मंगरूळ!! ज्या गावात दळणवळाणासाठी चांगले रस्ते नाहीयेत, शेतीसाठी लागणार्‍या पाण्याची टंचाई मोठी आहे, चांगलं रुग्णालय नाही, विजेटंचाई अशा समस्या आहेत पण त्याबरोबरच या मागासलेल्या गावात मोबाईल फोन्स, संगणक, रंगीत दुरचित्रवाणी यासारखं तंत्रज्ञान मात्र पोहचलयं यातला विरोधाभास जाणवतो. अशा त्या गावात राहणारा एक साधा-सज्जन देवभोळा तरूण केशा!! आपली हरवलेली 'करडी' गाय शोधता शोधता त्याला माळावर असलेल्या उंबराच्या झाडात त्याला गुरूदेव दत्त दिसतात आणी मग तो हि बातमी संपुर्ण गावभर करतो. तिथून पुढे एक साधं गाव ते एक मोठं तिर्थक्षेत्र असा त्या गावाचा प्रवास सुरू होतो. सुरूवातीला त्याच्या या बोलण्यावर काहिजण विश्वास ठेवतात तर काही जण त्याचं म्हणणं उडवून लावतातं. गावातल्या महिला मंडळात या गोष्टीची चवीचवीने चर्चाही होते. काहितरी नविन करायचं या ध्यासातून तिथले तरूण कार्यकर्ते मग या बातमीचा उपयोग करून घ्यायचं ठरवतात, फोन मेसेजेस, वर्तमानपत्रातील बातम्या याद्वारे दत्तगुरूंच जागृत ठाणं असा आपल्या गावाचा ते व्यवस्थितरित्या प्रचार करतात, याबाबतीत महासंग्राम हा वृत्तपत्रकार त्यांना मदत करतो. सुरूवातीला या सगळ्या गोष्टींना विरोध दर्शवणारे गावाचे प्रमूख भाऊसाहेब वरिष्ठांच्या दबावापुढे झुकतात आणी देऊळ बांधण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देतात. केशा बरोबरच भाऊसाहेब आणी गावातल्या सगळ्यांना समजूतीच्या चार गोष्टी सांगणारे जेष्ठ आणी जाणकार अण्णा मात्र सुरूवातीपासूनच त्या सगळ्यांना समजवतात पण शेवटी त्यांचाही नाईलाज होतो. "" पुढे काय होतं?? देऊळ बांधून होतं का?? भाऊसाहेब आणी अण्णांची नंतरची भुमिका काय असते?? या सगळ्या गोष्टींसाठी देऊळ हा सिनेमा तुम्ही सिनेमागृहातच जाऊन पहायला हवा. गिरिश कुलकर्णीने केशाच मद्ध्यवर्ती पात्र अगदी व्यवस्थितरित्या साकारलयं. चित्रपटाच्या प्रत्येक टप्प्यात त्याने त्याच्यातला अभिनेता अगदी समर्थपणे पेललाय. आतीशा नाईक, विभावरी देशपांडे, उषा नाडकर्णी, ज्योती सुभाष, सोनाली कुलकर्णी यांनी त्यांच्या भुमिकेप्रमाणे योग्य कामं केली आहेत. ह्रषिकेश जोशी, महासंग्राम पत्रकार किशोर कदम, श्रीकांत यादव आणी त्यांच्याबरोबर असलेल्या अभिनेत्यांनी तरूण कार्यकर्ते धम्माल वठवलेत. डॉ.मोहन आगाशेंचा साहेब अगदीच कमी वेळा समोर येतो. हिंदी अभिनेते नसिरूद्दीन शहा हे ही एका दृष्यापुरते अनपेक्षितपणे आपल्या समोर येतात. सर्वात जास्त उत्सूकता होती ती नाना पाटेकरांचा भाऊसाहेब आणी अण्णा असलेल्या दिलीप प्रभावळकर या दोन दिग्गजांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्याची, पण शेवटी शेवटी अगदी छोट्या स्वरूपात का होईना माझी ती इच्छा पुर्ण झाली. अर्थात त्यांनी त्यांच्या भुमिका आपल्या सहजसुंदर अभिनयाने पार पाडल्याच ही गोष्ट वेगळी. "अगदी शुन्य मिनिटात करतो" हा नाना पाटेकरांचा डायलॉग धम्माल आणतो. कंचुकी तंग दाटली उरी, मट्रीअल आत मायीना... आनं माळावर प्रकटला दत्त, पर भाव मनी दाटना.... आध्यात्माचा ताप भारी आनं केशाभोवती जमती नारी... यांसारखे चुरचूरीत संवाद मजा आणतात. कथा, पटकथा आणी संवादांच या तिन्ही आघाड्यावरचं काम गिरीश कुलकर्णीने चांगलच जमवलयं. देवा तुला शोधू कुठं आणी तु झोप तुझा दत्त जागा आहे हि दोन्ही गाणी निदान श्रवणीय तरी आहेत पण त्यातलं आयटम साँग हे मात्र सहनशिलतेच्या पलिकडचं आहे. त्याचे नेमके शब्दचं कानावर पडत नाहीत. एखाद्या चांगल्या पुलाव भातामध्ये अचानक खडा लागावा तसं ह्या आयटम साँग बद्दल माझं मत झालयं अर्थात हे माझं स्वतःच वैयक्तीक मत आहे. मंगेश धाकडेच पार्श्वसंगीत ठिक आहे. सुरूवातीपासून चांगला चाललेला चित्रपट मध्ये थोडासा रेंगाळतो पण शेवट बघण्याची उत्सुकताही तेव्हढीच निर्माण करतो. उमेश कुलकर्णीच दिग्दर्शन वळूच्या तुलनेत थोडसं कमी पडलयं असं जाणवतं. वळू या चित्रपटामुळे गिरिश आणी उमेश कुलकर्णी यांच्याकडून अपेक्षा खुप वाढलेल्या होत्या अगदी तेवढ्या नाही पण त्याच्यापेक्षा थोड्या कमी अपेक्षा या जोडीने नक्कीच पुर्ण केल्यात. एकंदरीत काय तर, एकदा तरी सिनेमागृहात जाऊन देऊळ बघायला हरकत नाही. *** (३/५)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
समाज
जीवनमान
मौजमजा
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
माध्यमवेध
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
39428 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

मस्त परिक्षण. नक्की बघणार हा

अमोल केळकर
Sat, 11/05/2011 - 16:47 नवीन
मस्त परिक्षण. नक्की बघणार हा सिनेमा :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments

सुरेख

प्रचेतस
Sat, 11/05/2011 - 17:03 नवीन
सुरेख परीक्षण. हा पिक्चर नक्कीच बघणार. किसनद्येवांनी केलेलं हे बहुतेक पहिलेच परीक्षण असावे पण त्यांनी ते आव्हान सुरेखरित्या पेललेय यात शंकाच नाही.
  • Log in or register to post comments

+१

स्पा
Sat, 11/05/2011 - 17:20 नवीन
किसना झकास परीक्षण रे.. जमतंय जमतंय रावणात पैसा उडल्या असल्या कारणाने टीवी वरच शिणुमा बघितल्या जाईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

किसनदेवा, अभिनंदन. नाही

धन्या
Sat, 11/05/2011 - 17:13 नवीन
किसनदेवा, अभिनंदन. नाही म्हटलं पहीलटकरीन सुखरुप सुटली. :) बाकी सिनेमा यथावकाश पन्नास रुपयाला चार सिनेमावाल्या डीव्हीडी मधून पाहण्यात येईलच.
  • Log in or register to post comments

चांगले परीक्षण. चित्रपट बघेन

मृत्युन्जय
Sat, 11/05/2011 - 17:23 नवीन
चांगले परीक्षण. चित्रपट बघेन म्हणतो.
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलं आहेस परीक्षण..

गवि
Sat, 11/05/2011 - 17:32 नवीन
मस्त लिहिलं आहेस परीक्षण.. सिनेमा बघणारच होतो. आता आणखी छान वाटेल..
  • Log in or register to post comments

मस्त हो किसनराव....अश्या

अत्रुप्त आत्मा
Sat, 11/05/2011 - 17:57 नवीन
मस्त हो किसनराव....अश्या सिनेमाच्या बाबतीत मी फस्ट डे,,,फस्ट शो वाला... खराखुरा आशयघन चित्रपट आहे...
  • Log in or register to post comments

पिक्चर नक्की बघेन!

पैसा
Sat, 11/05/2011 - 18:04 नवीन
जमल्यास आयनॉक्समधे (स्पा, ऐकतोयस ना?) नाहीतर टीव्हीवर येईल तेव्हा!
  • Log in or register to post comments

किसनराव, सुंदर परीक्षण...

सुहास झेले
Sat, 11/05/2011 - 18:24 नवीन
किसनराव, सुंदर परीक्षण... जातोय उद्या सकाळी देवळात :) :)
  • Log in or register to post comments

+१ टु धनाजीराव आता ती

५० फक्त
Sat, 11/05/2011 - 18:52 नवीन
+१ टु धनाजीराव आता ती डिव्हिडि लावा बक्षिस म्हणुन
  • Log in or register to post comments

मी उद्याच जाऊन बघतो. - पिंगू

पिंगू
Sat, 11/05/2011 - 21:48 नवीन
मी उद्याच जाऊन बघतो. - पिंगू
  • Log in or register to post comments

देऊळ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 11/05/2011 - 22:11 नवीन
किसनराव, चित्रपटाची ओळख चांगली करुन दिली आहे. देऊळ च्या पेप्रात बातम्या वाचल्या होत्या. चित्रपट बीग बजेट आहे. (आपल्या मराठी चित्रपटाच बजेट किती असतं आणि बीग बजेट म्हणजे किती असो) मराठी चित्रपटातील सर्व उत्तमातले उत्तम कलाकार आहेत आणि एक वेगळ कथानकही देऊळचं आहे म्हणतात. थेट्रात नैच जमलं तर डीव्हीडीवर देऊळ नक्कीच पाहू. धन्यवाद. आणि ते वळूचं कौतुक करु नका राव. मला तर लैच बोर झालं होतं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

ते वळूचं कौतुक करु नका राव.

सोत्रि
Tue, 11/08/2011 - 09:42 नवीन
ते वळूचं कौतुक करु नका राव. मला तर लैच बोर झालं होतं.
+१ अगदी, अगदी! मला तर त्या सिनेमात काय होते तेच कळले नाही :( - (पोळ) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

(पोळ) सोकाजी खॅ खॅ खॅ...

मदनबाण
Tue, 11/08/2011 - 09:58 नवीन
(पोळ) सोकाजी खॅ खॅ खॅ... सोक्या चांगली दुभती गाय धर रे बाबा आता ! ;) (पुर्वीचा मोकाट आणि सध्याचा वेसण घातलेला वळू) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

ते वळूचं कौतुक करु नका राव.

वपाडाव
Tue, 11/08/2011 - 09:59 नवीन
ते वळूचं कौतुक करु नका राव. मला तर लैच बोर झालं होतं.
हात्तिच्या मारी, हितंबी मज्या जोडीला मान्सं हैतच का? मला वाटलं, मी यकटाच करंटा है काय जेला वळु आडौला न्हाइ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

नाही नाही तुला असं एकटं कसं

रेवती
Tue, 11/08/2011 - 22:06 नवीन
नाही नाही तुला असं एकटं कसं सोडू आम्ही?;) मलाही वळू फारसा आवडला नाही. कथा राहू दे पण कोणाचा अभिनयही सहज वाटला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

सगळीकडे एवढी छान छान परीक्षण

किचेन
Wed, 11/23/2011 - 23:43 नवीन
सगळीकडे एवढी छान छान परीक्षण येत होती या पिक्चरची , पण मला काहीच समजला नाही. मला वाटल मीच येडी आहे, पण आता आनंद होतंय मी एकटीच नाहीये! ;) मी पूर्ण पिक्टुरेभर ह्या रेड्याला हिरो म्हणून का घेतला हाच विचार करत होते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

परिक्षण छान लिहिलं आहे. आपली

रेवती
Sat, 11/05/2011 - 22:15 नवीन
परिक्षण छान लिहिलं आहे. आपली मराठी डॉट कॉमवर येईल तेंव्हा पाहता येईल हा सिनेमा.
  • Log in or register to post comments

विभावरी देशपांडे, उषा

आशु जोग
Sat, 11/05/2011 - 22:29 नवीन
विभावरी देशपांडे, उषा नाडकर्णी, ज्योती सुभाष हे लोक आहेत अपेक्षेप्रमाणे हा चित्रपट म्हणजे शहरी कुलकर्णीटाइप लोकांनी काढलेला ग्रामीण चित्रपट आहे का कारण खरा खेडवळ माणूस त्यापासून दूरच राहतो असं निरीक्षण आहे >> आणि ते वळूचं कौतुक करु नका राव. मला तर लैच बोर झालं होतं. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे आपण पुण्यामुंबैकडचे नाही का आमच्यासारखेच खेडवळ दिसताय !
  • Log in or register to post comments

पक्का खेडवळ आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 11/05/2011 - 22:50 नवीन
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे आपण पुण्यामुंबैकडचे नाही का आमच्यासारखेच खेडवळ दिसताय ! मी पक्का खेडवळ हाय. खेंडं सालं आपल्या हाडामासात रुतलेलं हाय बघा. आता त्यो वळू धराला इतकं कुटं टैम लागतो का बघा. आन त्याच्यावर पीच्चर. आपून खेड्यातलं लोक त्या वळुकंडं ढुकुन तरी पाहतो का ? म्हून मला लय बोर झाल्तं बघा. :) शासनानं वळु म्हणजे बैल नै म्हणलं ते कळ्ळ का तुम्हाला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

+१

यकु
Sat, 11/05/2011 - 23:17 नवीन
देऊळ म्हणजे काहीतरी चांगलं कथानक असेल असं वाटलं होतं. पण किसनदेवांनी केलेल्या परिक्षणातून ती आशाही धुळीस मिळाली. सबब आवर्जुन देवळात जाणे नाही. पडलाच दृष्टीला तर पाहू म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टाईप?

पिवळा डांबिस
Sun, 11/06/2011 - 09:33 नवीन
कुलकर्णीटाइप लोकांनी काढलेला ग्रामीण चित्रपट.... कुलकर्णीटाईप लोकांनी म्हणजे? जोगटाईप लोकांनी स्वतःला ग्रामीण समाजाचा वकील समजावं हाच एक मोठा विनोद आहे.... "चिताभस्म सर्वांगासी, लिंपून राहे माझ्याकडे देव माझा, पाहतो आहे...." सुपर जोग#, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

अजुन अक्कल कशी पाज ळली नाही याचेच आश्चर्य वाटत होते..

शाहिर
Tue, 11/15/2011 - 16:54 नवीन
कुलकर्णीटाइप म्हणजे काय ? आणि जोगांचा कुठला टाइप असतो ( 'जोग'वा? ) आणि त्यात शहरी कुलकर्णीटाइप आणि ग्रामिण कुलकर्णीटाइप असे प्रकार असतात का ?? सेन्सिबल लिहा कि काहितरी ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

शाहीर नाव घेतलेला

आशु जोग
Tue, 11/15/2011 - 21:59 नवीन
शाहीर नाव घेतलेला कुलकर्णीटाइप *मिरची
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहिर

छान परिक्षण!

दादा कोंडके
Sat, 11/05/2011 - 23:45 नवीन
चित्रपट बघावाच लागेल.
  • Log in or register to post comments

मस्त!!

मी-सौरभ
Sat, 11/05/2011 - 23:57 नवीन
स्पा, समीर सूर, आणि ईतर परीक्षन लेखकांनो किसन द्येव आता तुमाला ट्फ फाईट देणार असं दिसतयं ;)
  • Log in or register to post comments

नक्की बघेन ( त्यावर दुसरा

शिल्पा ब
Sun, 11/06/2011 - 02:35 नवीन
नक्की बघेन ( त्यावर दुसरा धागा मात्र काढणार नै, काळजी नसावी.
  • Log in or register to post comments

सध्या हा चित्रपट "दत्तनाम

मदनबाण
Sun, 11/06/2011 - 09:07 नवीन
सध्या हा चित्रपट ‘फोडा दत्त नाम टाहो’ " या वादग्रस्त गाण्यामुळे चर्चेत आहे ! ( हेच जर इस्लाम विषयक गाणं असतं तर भावना दुखावल्या जातात म्हणुन आधीच बंदी आली असती... हिंदूंना भावना आहेत ?) असो... अधिक बातमी इथे :--- http://goo.gl/YSkXx वरचा ट्रेलर पाहिला... "सो कूल" सोनाली ने उरोज प्रदर्शनाचा वसा घेतलेला दिसतोय ! (०:१९) डर्टी चित्रपटातल्या विद्या बालन नंतर सोनाली ? असा उगाच प्रश्न मनात तरळुन गेला ! विडंबन असलेले गाणं काढल्या नंतरच हा चित्रपट पाहण्या बद्धल विचार केला जाईल.
  • Log in or register to post comments

बातमी वाचली. निव्वळ पब्लिसिटी

विश्वनाथ मेहेंदळे
Sun, 11/06/2011 - 10:48 नवीन
बातमी वाचली. निव्वळ पब्लिसिटी स्टंट आहे. बातमीत म्हटले आहे, " श्री दत्तगुरूंचा ठिकठिकाणी एकेरी नावाने उल्लेख करून त्यांचा अवमानही केला. " या लोकांनी दत्ताची आरती वाचली आहे का कधी ? त्यात एकेरी उल्लेखच आहे. त्यातच कशाला, आपल्याकडे देवाचा उल्लेख एकेरीच करतात. हिंदूंनी पण उठसूट धार्मिक भावना दुखावून घ्यावात की काय ? त्या पण अशा निरर्थक कारणांसाठी? अशा वाय.... लोकांकडे लक्ष देता कामा नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

हिंदूंनी पण उठसूट धार्मिक

मदनबाण
Sun, 11/06/2011 - 11:37 नवीन
हिंदूंनी पण उठसूट धार्मिक भावना दुखावून घ्यावात की काय ? या गाण्यात असे काही शब्द आहेत म्हणे :--- ‘शॉलिंग दत्त’, ‘डार्लिंग दत्त’, ‘हाय हाय दत्त’, ही कुठल्या प्रकारची गीत रचना ? जाता जाता :-- पैगंबरांचे व्यंगचित्र काढले म्हणुन harlie Hebdo नावाच्या वर्तमानपत्र कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. संदर्भ :--- http://www.reuters.com/article/2011/11/03/us-france-fire-magazine-idUSTRE7A26MO20111103
  • Log in or register to post comments

धर्मांधाच्या गोष्टी सोडा हो!!

शिल्पा ब
Sun, 11/06/2011 - 12:13 नवीन
धर्मांधाच्या गोष्टी सोडा हो!! जनावरंच ती!! बोललं की मग तोंड दिसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

गाणे ऐकून प्रतिक्रिया देण्यात

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 11/15/2011 - 23:51 नवीन
गाणे ऐकून प्रतिक्रिया देण्यात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

शिन्देसरकार झक्कास परिक्षण.

मितभाषी
Sun, 11/06/2011 - 12:12 नवीन
शिन्देसरकार झक्कास परिक्षण. पिच्चर बघावाच लागेल.
  • Log in or register to post comments

परिक्षण आवडलं

दत्ता काळे
Sun, 11/06/2011 - 12:21 नवीन
चित्रपट बघणार होतोच, आता तर लवकरच बघणार.
  • Log in or register to post comments

या विषयावर

आशु जोग
Sun, 11/06/2011 - 13:52 नवीन
हे ही पाहण्यासारखे आहे http://tinyurl.com/gram01 http://tinyurl.com/gram02
  • Log in or register to post comments

’देव’ नाही ’देवळा’त ...

छोटा डॉन
Sun, 11/06/2011 - 14:14 नवीन
सिनेमा पहाणे ह भक्तिभाव मानला तर सिनेमा थेट्राला 'देऊळ' मानायला हवे आणि आपण ज्या श्रद्धेने ह्या देवळात 'सिनेमाची स्टोरी, चित्रण, गीत-संगीत, नावजलेले कलाकार अणि त्यांनी समर्थपणे पेललेल्या भुमिका' पहायला आणि त्यांचा आस्वाद घ्यायला जातो त्यांना 'देव'च म्हणायला हवे. आपल्या अपेक्षांप्रमाणे सिनेमात सर्व काही असेल तर थेटररुपी देवळात साक्षात 'देवदर्शन' झाल्याचे समाधान लाभते व ह्या देवळाची वारी एक उत्सव होऊन जातो. उमेश कुलकर्णींच बहुचर्चित 'देऊळ' हा सिनेमा खास थेट्रात जाऊन पाहिला असता आम्हाला 'देव नाही देवाळात' असा अनुभव आला. ज्या अपेक्षेने आम्ही देवाचे दर्शन घ्याला गेलो तो देवच तिथे नव्हते, बाकी मंदिराची दिव्यभव्यता आणि जाहिरातीद्वारे सुरु असलेला भक्तीचा जागर मात्र डोळ्यात मावेना इतका प्रचंड होता. हे आमच्यासारख्य भक्तीभावाने सिनेमा पाहणार्‍या पटण्यासारखे नाही, म्हणुनच 'देऊळ'बद्दल आमचे हे ४ शब्द .... ’देऊळ’ हा सिनेमा लोकांना शक्यतो आवडणार नाही. १. लोकांना सत्य दाखवलेले आवडत नाही. २. तगडी स्टारकास्ट घेऊन उगाच शास्त्रापुरते सत्य दाखवणे त्याहुन आवडत नाही. मला ’दुस-या कारणा’मुळे देऊळ तितकासा आवडला नाही. पिक्चर बर्‍यापैकी जमला नाही असे मला म्हणावेसे वाटते. वलयांकित असे मोठ्ठे कलाकार घेऊन आणि त्याचा भरपुर गाजावाजा करुन शेवटी यथातथाच असलेला चित्रपट असे मी ह्याचे वर्णन करेन. पुर्वार्धात हा चित्रपट भयंकर संथ आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर रटाळ वाटला. गाजावाजा करुन मोठ्ठे मोठ्ठे कलाकार घेऊन त्यांना ह्या सिनेमात अक्षरशः वाया घालवले आहे असे वाटते. त्या त्या कलाकाराच्या क्षमतेला न्याय देणारे एकही पात्र ह्या चित्रपटात नाही ... अपवाद गिरीश कुलकर्णींचा केशा आणि दिलीप प्रभावळकरांचा अण्णा. त्यांच्या पात्राची पार्श्वभुमी अथवा घडण चित्रपटात कुठेच ठळकपणे दिसत नाही. वातावरण निमिर्ती आणि पात्र ओळखीसाठी अत्यावश्यक असलेले डिटेलिंग इथे भरकटले आहे, उलट त्या नादात ह्या विषयाशी अगदीच अनावश्यक असलेले प्रसंग उगाच घुसडले गेले आहेत असे वाटले. मी तर असे म्हणेन की ह्या बड्या नावाऐवजी अगदी कुणीही त्या त्या भुमिका सहजपणे करु शकला असता, असे असताना उगाच मोठ्ठी नावे वापरुन, त्यांना यथातथा भुमिका देऊन उगाच 'बिग बजेट' अशी जाहिरात करणे हे पटले नाही. नाना पाटेकर, मोहन आगाशे, किशोर कदम ह्यांना अक्षरशः वाया घालवला आहे. सोनाली कुलकर्णी ह्यांची भुमिका खास आहे म्हणण्यात अर्थच नाही, इनफॅक्ट त्यांच्या व्यक्तिरेखेला तसा वावच नाही, हेच कारण बहुदा सर्वच बड्या नावांबाबत घडते. नसरुद्दिन शहाचे पात्र ह्या सिनेमात 'उगाच' घुसडल्यासारखे वाटते, उगाच २-३ डायलॉक आणि अनावश्यक प्रसंग रचना ह्याने काय मिळाले ते कळत नाही. हां, बड्या नावांची जाहिरात करायची असेल तर मात्रचे आमचे मौन बाबा, त्यातले आम्हाला जास्त समजत नाही. चित्रपटाचे संगीत, गाणी आदी बाबत न बोललेलेच बरे. सध्या जरा वादग्रस्त असलेले 'दत्ताचे गाणे' हे बर्‍यापैकी सत्यपरिस्थीतीच्या जवळ जाणारे आहे आणि नादमधुर नसले तरी गुणगुण्यासारखे वाटले. सिनेमात काही चांगल्या गोष्टी आहेत पण त्या पेलण्यात जरा गडबड झाली आहे. 'एका देवस्थानाचा जन्म' अशी एका व्याख्या करता येण्याजोगा हा चित्रपट आहे, विषयाच्या निवडीला आणि त्यात दाखवलेल्या बर्‍यापैकी डिटेलिंगला फुल्ल नसले तर उत्तम गुण. मात्र ह्याच अनुषंगाने आम्ही वर केलेल्या 'लोकांना सत्य दाखवलेले आवडत नाही' ह्या विधानाबाबत २ शब्द न लिहणे हे ह्या सिनेमावर अन्याय ठरेल. एखाद्या देवस्थानाच्या ठिकाणी जे जे घडते ते ते दिग्दर्शकाने जसे आहे तसे दाखवले आहे. स्थानिक ग्रामस्थांचा संपुर्ण बाजारपेठेवर कब्जा, देवस्थानाच्या निमित्ताने चालणारे अन्य उद्योग-धंदे व त्यालाही असणारी बरकत, सतत येणार्‍या पैशाचा ओघामुळे दिवसेंदिवस 'श्रीमंत' होत जाणारे देवस्थान आणि त्याचे व्यवस्थापक, ह्याच पैशाचा जोरावर देवळाला अजुन 'मोठ्ठे' करण्याची व त्यामार्गे अजुन पैसा कमवण्याची इच्छा, कालांतराने भक्तीभावाला बाजुला सारुन केवळ दिखावा, सारंजाम, भपकेपणा आणि त्यात कमी की काय म्हणुन स्थानिक राजकारणाचा हातभार आदी बाबींबर 'देऊळ' व्यवस्थित भाष्य करतो. खरे तर हे सत्य सर्वांनाच माहित आहे, अशी 'उभारलेली' देवळंही अनेकजणांना माहित असतील, पण ही बाब स्पष्टपणे दाखवण्याचे धाडस केल्याचेही कौतुक आहे. मुर्ती चोरीला गेल्यावर पहिल्यापेक्षा अधिक भारी मुर्ती आणुन येनकेनप्रकारे 'देऊळ' चालु राहिले पाहिजे हा सोसही मस्त दाखवला आहे. ह्या निमित्ताने दिग्दर्शकाने 'देवस्थानाचे बाजारीकरण' ह्यावर बर्‍यापैकी कठोर भाष्य केले आहे असे म्हणायला हकरत नसावी. ह्याच्या जोडीला ग्रामीण भागातले राजकारण, लोकांच्यातला बेरकीपणा, मिडियाची ताकद, ग्रामीण जीवनातला एकंदरीत संथपणा आणि रिकाम्या हाताचे व निवांत डोक्याचे लोक वेळ घालवण्यासाठी काय काय करत असतात हे चांगले दाखवले आहे. उपरोक्त बाबींमुळे चित्रपट बर्‍यापैकी पाहण्यासारखा होतो, पण हे आणि इतकेच दाखवण्यासाठी बड्या नावांची अजिबात गरज नाही हे सत्यही पुन्हा ढळढळीतपणे समोर येते. 'कंचुकी तंग दाटली उरी, मट्रीअल आत मायीना... आनं माळावर प्रकटला दत्त, पर भाव मनी दाटना....' सारख्या संवाद/काव्याची ह्या लेव्हलला आणि चित्रपटात एवढे बडे कलाकार असताना गरज नव्हती, असली स्ट्रॅटेजी बी ग्रेडी चित्रपटाने वापरायची असते, ती तिकडेच शोभून दिसते, अन्यथा उगाच हसे होते, असो. तर एकंदरीत चित्रपट एकदा पाहण्यासारखा आहे, आवर्जुन थेट्रात पाहण्याची गरज नाही, मराठी चित्रपटसृष्टीला मदत करायची असेल तर पाहु शकता, यथावकाश टिव्हीवर येईलच. माझे ह्या चित्रपटाचे एका वाक्यात वर्णन .... बडा घर, पोकळ वासा. असो. - (चित्रपटाबद्दल असामाधानी आणि स्ट्रॅटेजीवर नाराज) छोटा डॉन रेटिंग वगैरे द्यायचे असल्यास : (विषयाची निवड आणि त्यासंदर्भातले काही प्रसंग इत्यांदीमुळे राउंडफिगर ) २ स्टार **
  • Log in or register to post comments

डॉन शी सहमत !

स्वतन्त्र
Sun, 11/06/2011 - 15:55 नवीन
वेगळं काहीतरी (विशेषतः मोठे कलाकार असताना )पाहायला मिळालं नाही.पुढे काय होईल ते समजू शकतं.शिवाय अण्णांनी घेतलेली माघार अजिबात पटली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

@डॉनसाहेब

विनायक पाचलग
Sat, 11/12/2011 - 21:40 नवीन
परवा बझ वर तुझे देऊळ बाबतचे हे परिक्षण वाचलेले ...काल पिक्चर पाहिला ... थोडक्यात सांगतो ...अपेक्षा ठेवला तर अपेक्षाभंग आणि काहीही अपेक्षा ठेवल्या नाहीत तर बेस्ट चित्रपट ... सर्व मोठ्या कलाकाराना वाया घालवलेले आहे हे २०० % मान्य ..विभावरी तर २ सीन दिसली फक्त ... पण , त्यानी हे सर्व कलाकार घेतले याचे मला बरे वाटले ..यापुर्वी खुपदा असे झालेले आहे की चांगले विषय असणारे सिनेमे आले ,पण ते क्राऊड पर्यंत गेलेच नाहीत ..जोगवा ,गाभ्रीचा पाऊस (अगदी गंध देखील ) ही त्याची काही उदाहरण ..... पण ,उमेश कुलकर्णीने हा महत्वाचा विषय व्यावसायिक वेष्टनात गुंडाळुन आणला याबद्द्ल त्याला धन्स ... हे सारे लोक नसते तर देऊळ चा विषय बघायला कोण आले असते का ???? पण उपहासाने जावा वा आणखी कशाने .. एकदा थिएटरात जाऊन देऊळ बघाच ..एवढे प्रामाणिकपणे वाटते ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वतन्त्र

’देव’ नाही ’देवळा’त ...

मदनबाण
Sun, 11/06/2011 - 16:22 नवीन
डॉन रावांचे परिक्षण आवडले. :) आज काल सर्वच गोष्टींचा बाजार मांडला जातो... त्यात देव सुटणार कसे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

अगदी मनातलं लिहिलंय डॉनराव...

सुहास झेले
Sun, 11/06/2011 - 17:15 नवीन
आताच बघून आलोय देऊळ... चित्रपटात गिरीश कुलकर्णींचा केशा फक्त आवडला, बाकी सगळं बिघडलंय. नाना आणि दिलीप प्रभावळकरांना अक्षरशः वाया घालवलंय. इतकी हाईप झाली होती ह्या सिनेमाची, म्हणून न राहवून एकटाच गेलो थेटरात... आणि एकटाच गंडलो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

डॉन राव तुमच आणि आमच परीक्षण

माझीही शॅम्पेन
Sun, 11/06/2011 - 21:53 नवीन
डॉन राव तुमच आणि आमच परीक्षण बर्‍याच प्रमाणात सारख आहे . मी किस्नाने लिहिलेल परीक्षण आणि एकही प्रतिकिया ना वाचता खाली लिहिलाय , आता तुम्ही लिहिलेल वाचल्या नंतर सम-विचारी प्रतिक्रियांनी आनंद वाटला.
रेटिंग वगैरे द्यायचे असल्यास : (विषयाची निवड आणि त्यासंदर्भातले काही प्रसंग इत्यांदीमुळे राउंडफिगर ) २ स्टार **
+२.५ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

करेक्ट ...

छोटा डॉन
Mon, 11/07/2011 - 11:05 नवीन
एकदम करेक्ट बोललास सायबा. ह्या विषयावर आपली मते तंतोतंत जुळतात हां, समविचारी प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. अ‍ॅक्च्युअली इथे मी माझे परिक्षण टाकावे की नाही ह्या विचारात होतो, उगाच ते 'सत्यं ब्रुयात प्रियं ब्रुयात,अप्रियं सत्यं न ब्रुया'' आठवले, असो, बरे वाटले जरा .. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

छोटा डॉन आणी कीसन

निनाद मुक्काम …
Sun, 11/06/2011 - 17:12 नवीन
छोटा डॉन आणी कीसन शिंदे ह्यानी एवढे चांगले लिहिले आहे की अजुन त्यावर काय लिहावे. एवढेच वाटते की जर तुम्ही रा १ थिएटर मधे पाहतात व् पायातील खेटर पडद्यावर फेकून न मारण्या इतका सोशिक पणा अंगी असेल तर त्यामानाने हा मराठी सिनेमा बर्याच सुसह्य ठरावा. सध्या सिनेमा विक्रीचे तंत्र बदलत आहे. भरपूर गाजावाजा करावा नी मल्टी फ्लेक्स मधे पहिल्या वीक मधे सिनेमात दम आहे का नाही हे रसिकांना समजन्या अगोदर गल्ला कमवावा हा फंडा वापरला जात आहे .त्यात गैर काहीच नाही. सीनयर कुलकर्णी सिनेमाची पूर्व प्रसिध्धि करताना एक वृत्तपत्रात काय म्हणते ते पहा फार कमी वेळेला क्रिएटीव्ह प्रोसेस इतकी आनंददायी असते. सगळं जुळून येतं. कष्ट जाणवतही नाहीत. कुणाच्या मनात इगो बिगोचे प्रश्न डोकावत नाहीत. गैरसमज, भांडणं होत नाहीत. मजा येते फक्त कामाची. असं वाटतं.. ऑल इज फेअर इन लव्ह, वॉर अ‍ॅण्ड फिल्म्स लाइक देऊळ.. पुढे अजुन काय म्हणते ते पहा एकटे नानासर म्हणजे अमेरिका असं धरलं. तर बाकीचे दिग्गज कलाकार मिळून आख्खा युरोप! वानगीदाखल नावं घ्यायची. तर दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, ज्योती सुभाष, नासिरुद्दीन शहा, उषा नाडकर्णी.. कुणाकुणाच्या गुणवत्तेला सामोरं जायचं आम्हा पामरांनी. आमच्या आशिया खंडात भरले होते, किशोर कदम, हृषिकेश जोशी, आतिशा नाईक, विभावरी देशपांडे, गिरीश कुलकर्णी, श्रीकांत यादव, शर्वाणी, भक्ती, नेहा, स्मिता तांबे.. देऊळची कास्ट आणि क्रेडिट लिस्ट पाहिली नुसती की लक्षात येईल. हा सिनेमा म्हणजे नुसती मंगल दंगल नाही. तिसरं महायुद्धच आहे चक्क. आता नाना हा अभिनयातील महासत्ता मानला तर आगाशे , शहा ह्यांना दुसर्या गटात मोडून वाद निर्माण करण्याचा एक पर्याय उपलब्ध आहे. सगळ्यात शेवटी पण महायुद् आगीत तेल ओतून जास्त भडकवण्याचा प्रयत्न केला आहे आमचे प्रोडय़ुसर अभिजित घोलप यांच्या ‘देविशा फिल्मस्’नी. पहिलीच फिल्म म्हणून जरा मवाळ वगैरे वागतील. ते नाही. फिल्म उत्तम करण्याचा चंगच बांधला होता त्यांनी. तडजोड वगैरे शब्द त्यांच्या डिक्श्नरीतच नाहीत. स्वत:च रणशिंग फुंकलं त्यांनी. प्रेक्षकहो, आता तुम्हीच पाहा ही जुगलबंदी, लढाई. आम्हाला प्र.चं.ड. धमाल आली. ४ नोव्हेंबरला आम्ही तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये येतो तेव्हा भेटूच.. आमच्या देवळात नक्की या . . . आपल्याला आवडले बुवा सोकु ( जेष्ट ) रोक्स कनिष्ट ( तीचा समुद्र हा गहिरे ह्यांचा सिनेमा फक्त तीच्यासाठी पाहीला .) आणी जातिवंत पुणेरी सौदर्य ( खुपते च्या भागात त्यांनी हा खुलासा केला ) तू नळी वर स्वामी च्या फिती पहायच्या नी जुने दीस आठवावेत. एक प्रश्न मला नेहमी पडतो? कुलकर्णी साच्यामधे ग्रामीण सिनेमे हे फक्त शहरी भागातील लोकांना आवडतात . तर मग ग्रामीण भागातील लोकांना कोणत्या साच्यातील सिनेमे आवडत असावेत ? हे पण जरा सांगावे . कुबल ताई ह्यानी पुनरागम........ न करावे का ? मिलिंद गवळी ह्यांना घेउन सुपर चा हीरो सिनेमा काढावा का ? ८० चा दशकातील ( के साळ पोट दाखवत ) व् चट्टेरी पत्तेरी गणवेशात सुबल ह्यांचा तालावर उद्यानात कवायती करणारे विनोद वीर नव्या पिढीत शोधावेत का ?( रंजना सारखे तर मराठीत ग्रामीण व् शहरी लोकांना एकाच वेळी भावलेले व्यक्तिमत्व शतका मधून एकदाच जन्माला येते .
  • Log in or register to post comments

<<तर मग ग्रामीण भागातील

श्रीरंग
Mon, 11/07/2011 - 00:32 नवीन
<<तर मग ग्रामीण भागातील लोकांना कोणत्या साच्यातील सिनेमे आवडत असावेत ? हे पण जरा सांगावे . कुबल ताई ह्यानी पुनरागम........ न करावे का ? मिलिंद गवळी ह्यांना घेउन सुपर चा हीरो सिनेमा काढावा का ? ८० चा दशकातील ( के साळ पोट दाखवत ) व् चट्टेरी पत्तेरी गणवेशात सुबल ह्यांचा तालावर उद्यानात कवायती करणारे विनोद वीर नव्या पिढीत शोधावेत का ?( एक नंबर!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

>>एक नंबर!! अगदी अगदी !!!

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 11/08/2011 - 12:54 नवीन
>>एक नंबर!! अगदी अगदी !!! निमुपोज रॉक्स ;-) चोख आणि नेमके सवाल विचारले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

तर मग ग्रामीण भागातील लोकांना

यकु
Sun, 11/06/2011 - 17:29 नवीन
तर मग ग्रामीण भागातील लोकांना कोणत्या साच्यातील सिनेमे आवडत असावेत ? हे पण जरा सांगावे .
ग्रामीण भागातील लोकांना काय आवडत होते/ आवडत नाही ते सांगण्याचा मक्ता माझ्याकडे घेऊन काही गोष्टी सांगतो:- १. ग्रामीण भागातील लोकांना मकरंद अनासपुरेचा अभिनय आवडतो. (कितीही गयागुजरा कथानक असो, त्याची मराठवाडी टोनिंग लोकांना आवडते) २. ग्रामीण भागातील लोकांना निळू फुलेंनी रंगवलेले कित्येक पुढारी, खलनायक आणि सरपंच आवडतात. ३. ग्रामीण भागातील लोकांना श्रीराम लागूंचा पिंजरामधला मास्तर आवडतो ( सिंहासन मधला लागूंचाच अर्थमंत्री आवडत नाही.. हे आवडणे शहरी आणि त्यातल्या त्यात समुद्रपार वस्तीवाल्यांकडे.. अगदी तसंच सामनामधला श्रीराम लागूंचा मास्तरही आवडत नाही.. हां, त्यातच निळू फुलेंनी रंगवलेला हिंदूराव मात्र आवडतो..) ४. ग्रामीण भागातील लोकांना नटरंगमधला अतुल कुलकर्णींचा नाच्या (आणि त्याचा तो मुद्दाम काढलेला पिचका आवाज बिलकुल आवडला नाही) आणि 'वाजले की बारा' मध्ये रेडीमेड पदर, निर्‍या पाडलेली रेडीमेड साडी (पँटीसारखी इलॅस्टीक लावलेली!! ) घातलेलं आवडलेलं नाही.. हां, तिचाच मुरळी असतानाचा डान्स क्या कहने! यात टुरिंग टॉकिजमध्ये ग्रामीण चित्रपटाच्या नावाखाली कसल्याही चित्रपटाला होणार्‍या गर्दीचा विचार केलेला नाही. बाकी आजकालचे मराठी सिनेमे पहात नाही त्यामुळे ग्रामीण अभिनय करणार्‍या नट/नट्यांबद्दल अधिक काही माहित नाही.
  • Log in or register to post comments

'वाजले की बारा' मध्ये रेडीमेड

निनाद मुक्काम …
Wed, 11/09/2011 - 03:39 नवीन
'वाजले की बारा' मध्ये रेडीमेड पदर, निर्‍या पाडलेली रेडीमेड साडी (पँटीसारखी इलॅस्टीक लावलेली!! ) घातलेलं आवडलेलं नाही.. हां, तिचाच मुरळी असतानाचा डान्स क्या कहने! माझ्या मते तुम्हि ज्युनियर कुलकर्णी बद्दल बोलत आहात ती अप्सरा आली ह्या गाण्यात होती. . कारण वाजले की बारा हे गाणे अमृता ने केले आहे व त्यात ती फक्त त्याच एका गाण्यात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

खुपच छान परीक्षण.....

लीलाधर
Sun, 11/06/2011 - 19:47 नवीन
खुपच छान परीक्षण..... दत्त दत्त दत्त दत्ताची गाय, गायीचे दूध आणि दूधाची साय.... निव्वळ अप्रतिम... आखीर वो किसना है....
  • Log in or register to post comments

आज देऊळ चित्रपट पहिला , वरच

माझीही शॅम्पेन
Sun, 11/06/2011 - 21:26 नवीन
आज देऊळ चित्रपट पहिला , वरच परीक्षण मुद्दामन न वाचता काही तटस्थ मुद्दे मांडण्याचा प्रयत्न. चित्रपट तितकासा आवडला नाही हे आधी स्पष्ट करतो १. सुरूवात अतिशय संथ , मधेच गतिमान आणि पुन्हा कथा परत रखडलेली वाटली २. अतिशय पोटेन्षियल असलेली कथा असून त्याची मांडणी परिणामकारक वाटली नाही ३. श्रध्दा आणि सामाजिक जाणीव असा अतिशय परिणामकारक असा संघर्ष लेखकाला आणि दिग्दर्शकाला नीट मांडता आला नाही. त्यामुळे कथा अतिशाय एकांगी मार्गाने वाटचाल करीत राहते. ४. चित्रपटात खूप दिग्गज कलाकार असून ही एकही पात्र निटस उभ करता आल नाही. नाना पाटेकर , मोहन आगाशे आणि दिलीप प्रभावळकर याना अगदी वाया घालवल्या सारख वाटल. आवडलेल्या गोष्टी १. छान चित्रीकरण , यावर बरीच मेहनत घेतलेली वाटली २ सर्व गाणी छान (फक्त एक आयटम गाण तर भलताच टुकार) उपहासनी म्हणायाच तर फक्त मराठी चित्रपटाला प्रोत्साहन म्हणून जरूर बघा ! अवांतर :- जाता जाता हा चित्रपट गणेश थेटरात पहिला , त्याची अवस्था पार दयनिय झाली आहे , पण अस असूनही बाल्कनी चक्क हौसफुल होती ... पण त्या थेटराताला हा शेवटचा चित्रपट अस म्हणून कायमचा निरोप घेतला , ह्या चित्रपट गृहाशी काही आठवणी जुडल्या असल्याने अम्मळ हेलावून गेलो :(
  • Log in or register to post comments

मानसिकता पटली नै..

किसन शिंदे
Mon, 11/07/2011 - 09:05 नवीन
जाता जाता हा चित्रपट गणेश थेटरात पहिला बॉलिवूडचे तद्दन भंगार सिनेमे खिशाचा विचार न करता चांगल्या हायफाय थेटरात जावून पाहतो पण तेच मराठी चित्रपटांच्या बाबतीत मात्र गणेश टॉकिज सारख्या कमी तिकीटातल्या रया गेलेल्या चित्रपट गृहाची वाट पकडतो. परत आपणच मराठी चित्रपटांच्या नावाने शंख करायला मोकळे होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा