Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user सोत्रि
Submitted by सोत्रि on Wed, 11/02/2011 - 16:38
लेखनविषय (Tags)
साहित्यिक
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत
अनुभव
माहिती
आस्वाद
विरंगुळा
'सामना'च्या 2011 दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख. अंकात जागेच्या उपलब्धतेनुसार काही मजकूर गाळला गेला आहे. येथे दिलेला लेख पूर्ण आहे. -------------------------------------------------------------------------------------------------------------------- नुकताच एका मित्राच्या आग्रहामुळे आपल्या सर्वांच्या लाडक्या, अण्णांच्या, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात भाग घ्यायला जे. एम. रोड वर गेलो होतो. नुसतंच घोषणाबाजी करायला बरं का, हे उपोषण वगैरे माझ्या कुपोषित तब्येतीला मानवत नाही. तर तिथे एक घोषणा ऐकली ‘एक दोन तीन चार, बंद करा हा भ्रष्टाचार’. ही घोषणा ऐकली आणि हसून हसून मुरकुंडी वळली. डोळ्यात पाणी येईपर्यंत हसत होतो. बाकीचे आंदोलक ‘अरे! वेडे लोकही आंदोलनात सहभागी होत आहेत, अण्णांचा विजय असो’ असा भाव असलेल्या नजरेने माझ्याकडे बघायला लागल्यावर माझ्या मित्राने मला तिथून जवळजवळ खेचतच घरी आणले. घरी पोहोचे पर्यंत मी आपला हसतच होतो. एक दोन तीन चार, बंद करा हा भ्रष्टाचार! अरे, तो भ्रष्टाचार काय घरच्या फडताळात लपलेले झुरळ आहे झाडू हालवून हुसकावून लावायला? भ्रष्टाचार आपल्या भारतीयांच्या नसानसात भिनला आहे. इतका भिनला आहे की जसे आपण श्वासोच्छ्वास नकळत करतो, लक्षात न ठेवता तसेच आपण भ्रष्टाचार करतो आहोत. बघा हं, म्हणजे, ऑफिसात जाऊन ऑफिसची मालमत्ता वापरून वैयक्तिक कामे करणे, खूप काम करतो आहे असे भासवून पाट्या टाकणे, मुलांना 'नेहमी खरे बोलावे' असे शिकवून 'अरे बाबा घरात नाहीत म्हणून सांगा काकांना' असे सांगणे, ऑफिसात खूप काम आहे उशीर होईल घरी यायला असे सांगून मित्रांबरोबर पार्ट्या झोडणे, दुकानदाराने चुकून एक नोट जास्त दिल्यावर 'जाऊदे असाही लुटतोच तो मला' असा विचार करून ती नोट तशीच दडपवणे हे असले भ्रष्टाचार आपण कळत न कळत दररोज करतोच. मला सांगा, एक दोन तीन चार असे म्हणून हे सगळे बंद होणार आहे का? हे सगळे मी माझ्या लांब नाकवाल्या मित्राला सांगत होतो, ‘ऑन द टेबल’ बरं का, आमच्या आवडत्या बारमधे. त्याचे नाक लांब असल्यामुळे त्याला थेट विधात्याने ज्यात त्यात नाक खुपसायला अवनीवर धाडले आहे असे त्याचे मत आहे. त्यामुळे त्याला बर्यााच आतल्या गोटातल्या गोष्टी माहिती असतात, ह्याचमुळे त्याला मी माझा मित्र कम मार्गदर्शक कम हितचिंतकही मानतो. तोही ती घोषणा ऐकून छप्परफाड हसण्यात मशगुल झाला. आता त्याचे हसणे 7-8 मिनिटे तरी थांबणार नव्हते. त्यामुळे मग मी आजूबाजूला बघायला सुरुवात केली आणि समोरच्या टेबलावर लक्ष गेले. त्या टेबलावर, चिकन लॉलीपॉपच्या फस्त झालेल्या डीश, चिकन चिली ड्रायची अर्धवट संपलेली डीश, उकडलेली अंडी, उकडलेले शेंगदाणे, शेव, चकली आणि त्याबरोबर इम्पिरिअल ब्लुच्या दोन रिकाम्या झालेल्या चपट्याआणि थम्स अपच्या दोन तीन रिकाम्या बाटल्या असा 'खान-पान'चा अद्भुत संगम झालेला होता. हे दृश्य बघून एकदम चमकलो. भारतीय कुठल्या-कुठल्या प्रकारचे भ्रष्टाचार करतात ह्यावर मी आणि माझ्या लांब नाकावाल्या मित्राने नुकतीच चर्चा केली होती पण भारतीय माणूस दारूचा पण ‘भ्रष्टाचार’ करतो हे माझ्या लक्षातच आले नव्हते. हा दारूचा भ्रष्टाचार म्हणजे ‘खोपडी’ तयार करणे नव्हे किंवा फुग्यांतून दारू शहरां-शहरांत ‘इंपोर्ट – एक्स्पोर्ट’ करणे नव्हे तर चक्क 'दारू पिण्यात' भ्रष्टाचार. तुम्हालाही लांब नाकावाल्या मित्रासारखे छप्परफाड हसावेसे वाटायला लागले ना! दारू पिण्यात कसला आलाय भ्रष्टाचार? असे वाटणे साहजिकच आहे. भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचरण. दारू पिण्यातला हा भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट पद्धतीने दारू पिणे. हे आपण करतो दारूबद्दल तपशीलवार माहिती नसल्यामुळे. आपण बहुतेक भारतीय खिशाला परवडणारी दारू (फक्त) चढण्यासाठी पितो, दारूच्या चवीशी आणि एकंदर दारूच्या तपशिलाशी काही देणे घेणे नसते. चार मित्रांबरोबर बसून सुख दुःख शेअर करण्यासाठी आपणदारूचा आधार घेतो आणि मग अजून एक येऊदे, अजून एक येऊदे असे करत करत आपण दारू पिण्याऐवजी दारूच आपल्याला प्यायला लागते. आपण सरबतं पितो वेगवेगळ्या मोसमात त्या त्या मोसमाला साजेशी, ते आनंद मिळवण्यासाठी, त्या मोसमातल्या मिळणार्याग फळांच्या चवीची अनुभुती घेण्यासाठी, त्या मोसमातल्या वातावरणाला जुळवूनघेण्यासाठी. दारूचेही तसेच असते. दारूचे वेगवेगळे प्रकार हे प्रसंगानुरुप ‘चाखायचे’ असतात. दारू पिण्यापेक्षा अनुभवण्यातच खरी गंमत असते. आता बघा ना, व्हिस्कीचे इतके प्रकार आहेत, सिंगल मॉल्ट आणि ब्लेन्डेड त्यात पुन्हा स्कॉच, आयरिश, बर्बन, कॅनडीअन, जॅपनीज आणि भारतीय अश्या व्हरायटीज. पण असल्या तपशिलांची काहीही तमा न बाळगता 'भर गिलास, कर खलास' असा आपल्या खाक्या असतो. ह्या सगळ्या व्हिस्कींना त्यांची अंगभूत चव असते, गंध असतो, रंग असतो. हा रंग, गंध आणि विशिष्ट चव ओक वृक्षाच्या लाकडापासून बनवलेल्या पिंपात व्हिस्की वर्षानुवर्षे मुरवत ठेवून मेहनतीने आणलेली असते. पिताना त्यांची अनुभुती घ्यायची असते. त्यातला आनंद लुटायचा असतो. पण आपण काय करतो? व्हिस्की कडू-कडू म्हणून, हाय रे कर्मा, तिच्यात कोला सदृश सॉफ्ट ड्रिंक्स (पेप्सी, थंम्स अप, कोक) मिसळून तिची मूळ चवच घालवून टाकतो आणि पितो मद्यार्क (अल्कोहोल) असलेले मादक द्रव्य. हे तर जाऊद्या पण व्हिस्कीला गोड करण्यासाठी मिरिंडा घालून पिणारा महाभाग बघितला आणि तेव्हा 'देवा, हाच दिवस बघण्यासाठी जिवंत ठेवलेस का रे?' असे कळवळून ओरडावेसे वाटले होते. व्हिस्की हा तसा बराचसा मर्दानी, रांगडा प्रकार. सर्वांचाच तो झेपेल असे नाही. व्हिस्की, जगातल्या सर्वच भागांमध्ये सर्वात जास्त प्यायला जाणारा दारूचा प्रकार आहे. तरीही सर्वत्र खर्याा अर्थाने व्हिस्की पिण्याची पद्धत सारखीच आहे. वर्षानुवर्षे मुरवत ठेवलेली व्हिस्की तशीच म्हणजे ‘नीट’ किंवा ‘स्ट्रेट’ पिऊन तिचा आस्वाद घेण्याची चीज आहे. तिच्यातल्या मद्यार्काच्या प्रमाणामुळे आणि तीव्र(स्ट्रॉन्ग) चवीमुळे ‘नीट’ घेणे तसे जरा अवघडच आहे, ‘कच्च्या (रॉ)’ चवीशी नाळ जुळेपर्यंत. असे असल्यास व्हिस्कीत किंचित पाणी घालून तिला थोडे खुलवून (Bruise) प्राशणं करण्यातला आनंद हा शब्दातीत आहे. पाण्यामुळे चव थोडी सौम्य तर होतेच पण व्हिस्कीचा स्वाद आणि गंध खर्याद अर्थाने खुलून येते आणि थेट इंद्राच्या दरबारात बसून वारुणी चाखल्याची अनुभुती येते. ‘नीट’ घेणे जमत असेल आणि पाणी नको असेल तर व्हिस्की ऑन द रॉक्स घेण्यातही असीम आनंद आहे. ऑन द रॉक्स साठी साधारण 4-5 बर्फाचे खडे ग्लासमध्ये टाकून त्यावरून व्हिस्की ओघळत ओतायची. व्हिस्की बर्फावरून ओघळताना बर्फाचा थंडपणा घेऊन थंड होते आणि बर्फ वितळून थोडे पाणी व्हिस्कीमध्ये मिसळून स्वाद आणि गंध खुलतो. हे जर खूपच कठीण असेल तर सोडा आणि पाणी टाकूनही आस्वाद घेता येऊ शकतो. सोड्यामुळे व्हिस्कीचा स्वाद खुलून येतो. पण सिंगलमॉल्ट सारख्या उच्च दर्ज्याच्या व्हिस्कीत पाणी किंवा सोड्याची भेसळ चव आणि गंध दोन्ही मारून टाकते. तेव्हा सोडा फक्त ब्लेंडेड व्हिस्कीबरोबरच. व्हिस्की कधी प्यायची ह्यालाही महत्त्व आहे. जेवण्याच्या आधी व्हिस्कीचे एक दोन पेग मस्त जठराग्नी प्रज्वलित करतात. रविवारची दुपार, मटण मस्त रटरटून शिजते आहे, त्याचा सुगंध घरात दरवळतो आहे आणि हातात ऑन द रॉक्स व्हिस्की, अशी काही भूक प्रदीप्त होईल की काही विचारू नका. जर भरपूर प्यायची असेल तर मात्र रिकाम्या किंवा अनश्या पोटी पिण्यासारखा दुसरा भ्रष्टाचार नाही. हलके जेवण घेऊनआतड्यांना कामाला लावा आणि मग तुम्ही तुमच्या कामाला लागा. पोट भरलेले असल्यामुळे मद्यार्क शरीरात भिनायला अथवा शोषला जायला वेळ लागतो आणि भरपूर प्रमाणात दारू प्यायली जाऊ जाते. अजून एक करायचे छोटे पेग बनवायचे आणि ‘लंबी रेस का घोडा’ ह्या न्यायाला जगून अगदी हळूहळू पीत जायचे, उगाच ‘भर गिलास, कर खलास’ असे करून पिण्यातली गंमत घालवण्याला काय अर्थ आहे? व्हिस्की खालोखाल जास्त प्रमाणात प्यायला जाणारा प्रकार म्हणजे रम. मस्त पावसात चिंब भिजून ओलेचिंब झाल्यावर शरीराबरोबरच मनालाही उबदार करणारी ही अस्सल चीज. अंगात भिनणार्याब ह्या रमला स्वतःचे अंग असते बरं का. ऊसापासून बनणार्याउ ह्या रमचा स्वाद अंमळ गोडसर असतो. ह्या गोडसर स्वादाबरोबरच अतिशय तीव्र गंध असतो रमला आणि तो रम प्यायच्या आधी उपभोगायचा असतो. रमचाग्लास भरून मनसोक्त हुंगायचा हा गंध. मग एक एक घोट घेऊन चटकन न गिळता, जिभेवर घोळवत घोळवत प्रत्येक ‘टेस्ट बडला’ स्वाद देत प्यावी ही रम. अश्या प्रकारे प्यायल्यावर अश्या काही चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात की पावसात ओलेचिंब झाल्याचे सार्थक होते आणि पुन्हा एकदा भिजण्याची आस लागून राहते. रमच्या तीव्र गंधामुळे श्वास रोखून झटकन गिळून टाकणारे दर्दीही (?) बघितले आहेत. तेव्हा का पितोस रे बाबा असा प्रश्न विचारायची तीव्र (रमच्या गंधाइतकीच तीव्र) इच्छा झाली होती. पण रम खर्या अर्थाने अनुभवायची तर ‘नीट’च घ्यायला हवी असे काही नाही. तशी घ्यायला जमले तर मग काय हो सोन्याहून पिवळेच. रम सोडा, कोक ह्यांच्या जोडीनेही तेवढाच आनंद देते. व्हिस्कीसारखी शिस्त किंवा औपचारिकता जास्त नाही रमची. फक्त जिभेवर घोळवत घोळवत प्यायची शिस्त पाळली की मग ब्रह्मानंदी टाळी लागलीच म्हणून समजा. बाकीचे श्वेतवर्णिय प्रकार म्हणजे व्हाईट रम, व्होडका, जीन हे सगळे प्रकार बहुतकरून कॉकटेल्स मध्येच जास्त खुलतात आणि परमानंद देतात. त्यांच्या श्वेत रंगामुळे रंगेबिरंगी कॉकटेल्स बनवताना ह्यांचा वापर केला जातो. आपल्याकडे ह्या प्रकाराला तितका लोकाश्रय नाहीयेय. पण ह्या सगळ्या श्वेतवर्णिय दारू प्रकारांचा आस्वाद घ्यायचा तर ‘नीट’ घेण्याशिवाय पर्याय नसतो. श्वेत रंगासाठी हे सगळे प्रकार बरेच फिल्टर केलेले असतात. शिवाय मूळ ज्या धान्यापासून बनवलेले असतात त्यात बरेच स्वाद मिसळलेले असतात आणि ते अजिबात तीव्र नसतात. जसे की जीन मध्ये जुनिपर बेरी ह्या फळाचा स्वाद असतो. व्होडका तर आता असंख्य प्रकारच्या स्वादात मिळते. व्हाईट रम संत्र्याच्या स्वादात मिळते. हे स्वाद जर मुळात अनुभवायचे तर ‘नीट’ घेण्याशिवाय गत्यंतर नसते. तरीही हे सर्व प्रकार सोडा आणि सायट्रस चवीच्या सॉफ्ट ड्रिंक्सबरोबर(च) चवदार लागतात. त्यांच्यात कोक किंवा तत्सम कोलाजन्य पेय मिसळून पिणे म्हणजे कडक चहा बनवून त्या वरून सायीचे दूध घालून पिण्यासारखे आहे. एकंदरीतच कुठलाही दारू प्रकार मूळ स्वाद, रंग आणि गंध ह्यांचा आस्वाद घेऊन पिण्यातच मजा आहे. एक दोन पेन नंतर हळूहळू चित्तवृत्ती प्रफुल्लित व्ह्यायला लागतात. कानाच्या पाळ्यांना मुंग्या येऊनएकदम पिसासारखे हलके वाटायला लागून एक सहजावस्था प्राप्त होते. तिथेच थांबले पाहिजे आणि त्या हलक्या आणि तरल अवस्थेची अनुभुती घेत घेत धुंद व्हायचे असते. आपले हलके झालेले विमान जमिनीपासूनदोन बोटे वर जाण्यातच खरी गंमत, दारू पिण्याचे शुद्ध आचरण, ते आकाशापासून दोन बोटे खाली इतके वर जाऊ देणे म्हणजे दारू पिण्याचे भ्रष्ट आचरण. हाच तो 'दारु पिण्या'तला भ्रष्टाचार. काय पटतेय का आता? पटलं असेल तर चला एक मस्त घोषणा देऊयात, ‘एक दोन तीन चार, बंद करा हा दारूतला भ्रष्टाचार’! चियर्स! :)
  • Log in or register to post comments
  • 13594 views

प्रतिक्रिया

Submitted by गवि on गुरुवार, 11/03/2011 - 16:14

In reply to ब्रीझर by इंटरनेटस्नेही

Permalink

ब्रीझर म्हणजे ते लालपिवळं

ब्रीझर म्हणजे ते लालपिवळं साखरपाणी का?
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 11/03/2011 - 16:38

In reply to ब्रीझर म्हणजे ते लालपिवळं by गवि

Permalink

खॅ खॅ खॅ!!!

>>ब्रीझर म्हणजे ते लालपिवळं साखरपाणी का? अगदी अगदी! :D >>अरे पण तू तर आजकाल ब्रीझर मध्येच ओके होतोस ना? तो प्रभाव बाटलीतल्या पेयाचा नसून नुकत्याच भेटलेल्या बाटलीतल्या राक्षसाचा होता. ;) पर्‍यातर न पिताच बहकला होता पुढचे चार पाच दिवस.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 11/03/2011 - 16:41

In reply to खॅ खॅ खॅ!!! by धमाल मुलगा

Permalink

त्यातला क्रॅनबेरी फ्लेवर केवळ

त्यातला क्रॅनबेरी फ्लेवर केवळ लाल रंगाने मोह पडून घेतला. अगागागा.. डांगीअडुळसा कितीतरी चांगलं की त्यापेक्षा..
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 11/03/2011 - 17:37

In reply to त्यातला क्रॅनबेरी फ्लेवर केवळ by गवि

Permalink

डांगीअडुळसा....

Image removed. मेलो तिच्यायला!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on गुरुवार, 11/03/2011 - 17:02

In reply to ब्रीझर by इंटरनेटस्नेही

Permalink

इंट्या, धम्या म्हातारपणाकडे

इंट्या, धम्या म्हातारपणाकडे झुकत चाललेला तरुण आहे.... तुझ्या सारखा नोहे... फुलपाखरी पदार्पण करणारा... -(फुल्ल्टु तरुण असलेला) वप्या
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 11/03/2011 - 17:39

In reply to इंट्या, धम्या म्हातारपणाकडे by वपाडाव

Permalink

हात भाड्या..

म्हातारपणाकडं वगैरे म्हणू नये. अनुभवसिध्दीकडे वाटचाल असं म्हणावं. भारदस्त वाटतं. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक मोडक on गुरुवार, 11/03/2011 - 16:49

Permalink

धागाकर्ता आणी त्यावर प्रतिसाद

धागाकर्ता आणी त्यावर प्रतिसाद देणारे सर्व बेवडे हलकट आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on गुरुवार, 11/03/2011 - 17:05

In reply to धागाकर्ता आणी त्यावर प्रतिसाद by विवेक मोडक

Permalink

आपल्याला हेच म्हणायचंय का?

धागाकर्ता आणी त्यावर प्रतिसाद देणारे सर्व बेवडे हलकट आहेत.
धागाकर्ता आणी त्यावर प्रतिसाद देणारे सर्व हलकट बेवडे आहेत.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on गुरुवार, 11/03/2011 - 17:39

In reply to आपल्याला हेच म्हणायचंय का? by वपाडाव

Permalink

खी खी खी

धागाकर्ता आणी त्यावर प्रतिसाद देणारे सर्व हलकट बेवडे आहेत.
प्रतिसाद देणारे सर्व हलकट बेवडे आहेत, हे ठीक आहे पण धागाकर्ता हलकट का म्हणुन ? - ( सोज्वळ ) सोकाजी :)
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 11/03/2011 - 17:39

In reply to धागाकर्ता आणी त्यावर प्रतिसाद by विवेक मोडक

Permalink

धन्यवाद!

कधी बसुया? :D
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on गुरुवार, 11/03/2011 - 17:40

In reply to धन्यवाद! by धमाल मुलगा

Permalink

सोमवार नंतर कधीही. -

सोमवार नंतर कधीही. - (बैठकोत्सुक) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on गुरुवार, 11/03/2011 - 23:33

Permalink

>> धागाकर्ता आणी त्यावर

>> धागाकर्ता आणी त्यावर प्रतिसाद देणारे सर्व बेवडे हलकट आहेत. धागाकर्ता आणी त्यावर प्रतिसाद देणारे सर्व बेवडे कॉक तेलकट आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by रश्मि दाते on Fri, 11/04/2011 - 19:15

Permalink

मस्त लेख

आणि प्रतीसाद ही आवड्ले
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Fri, 11/04/2011 - 19:46

Permalink

@ सागर ,आनंद अरे थंडीचा

@ सागर ,आनंद अरे थंडीचा मुद्दा ह्यासाठी दिला की त्या वातावरणात दारू शरीरात लवकर चढत नाही. शरीरात पित्त सुद्धा कमी होते.( आपल्याकडे हिवाळा आला की खायची चंगळ असते हा काल तब्येत कमाविण्यासाठी चांगला असतो. ह्या बातावारणात दारू नीट प्यायलेली झेपते. अभक्ष खाल्लेले पचते .युके पेक्षा जास्त विस्की आपल्या एकट्या पंजाबात विकली जाते ) मात्र भारतात मुंबई किवा दक्षिण भारतात उष्ण हवेत सब्जा सारखे पदार्थ शरीरातील दाह कमी व्हावा म्हणून सरबता समवेत पितात .पाण्यात वाळे घालतात. भारतात उन्हाळ्यात गळवे ,घामोळे होतात त्यात अजून नीट विस्की प्यायलो ( जोडीला चमचमीत तेलकट पण चविष्ट जेवण असेल ) तर लिवर चे हाल पाहायला नको. थंड प्रदेशात व जगात कोठेही बियर ही चिल्ड सर्व करतात.( कारण बियर मध्ये अल्कोहोल चे प्रमाण कमी असते. ) ऑन द रॉक च्या मागील तत्व असे आहे. की बर्फाचा खड्यामुळे त्या विस्कीमधील गंध उफाळून येतो.( मात्र स्कॉट लेंड मधील एका ब्रेवरीज ला भेट दिली असता त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की बर्फ जसा विरघळायला लागतो तसे तसे विस्कीची चव बदलते. त्यापेक्षा रामबाण उपाय म्हणजे विस्कीच्या ग्लास मध्ये पाण्याचा हलका हबका म्हणजेच काही थेंब फक्त टाकावेत नी मग तिचा आस्वाद घ्यावा. येथे ब्रेवरीज मधील माझे फोटो टाकण्याचा अनावर मोह होत आहे. पण....) करोना सोबत लिंब आणी मीठ ह्याच्या वापरामागे तेथील दमट व उष्ण हवामानात शरीरातील मिठाचे प्रमाण कमी होते तेव्हा दारू पितांना दि हायद्रेशन होऊ नये म्हणून पितात. भारतात देखील ही प्रथा अनकूल ठरते. कुठल्याही देशातील कपडे ,खान पान संस्कृती ही त्या भवतालच्या वातावरणाशी व पिकणाऱ्या पिकांवर अवलंबून असते. ती लोक अर्धे कच्चे अभक्ष भक्षण करतात म्हणून आपण खाण्यात त्यांचे अनुकरण करत नाही. त्या लोकांनी भारतीय जेवण ,करी स्वतःला हवी तशी ( म्हणजे कितीतरी वेळा करी मध्ये पिठी साखर घालून ) खातात म्हणजे बांगलादेशी मालकीच्या भारतीय उपहारगृहात हे प्रकार सर्र्रास आढळतात.. म्हणून परदेशातील भारतीय जेवण हा अपवाद वगळता आपल्यासाठी नाईट मेयर असते. पण गोरे त्यात खुश असतात. आज त्यांचाकडे वारुणी रूम टेम्प्रेचर ला सर्व करायची असेल ( तर आपल्याकडे ती आपल्या रूम टेम्प्रेचर ला सर्व करून चालत नाही ) ती लोक चीज व ओलीव हे चकणा म्हणून वापरतात तर आपला चकणा झणझणीत असतो. त्यांचाकडे रूम मध्ये हिटर तर आपल्याकडे वातानुकुलीत यंत्रे असतात. हॉलीवूड चे सिनेमे ,कादंबर्या जसेच्या तसे भारतीय रसिकाच्या माथी मारल्यावर त्या पहिल्याच दिवशी राम म्हणतात. मात्र त्यात भारतीय अभिरुची ला झेपेले असे सुयोग्य बदल केले तर ते हिट देखील होतात. ह्यातून काय तो बोध घ्वावा. मात्र परदेशात दारू विषयी माहिती दिली जाते कार्यशाळा होतात. त्यांच्या संस्कृतीत दारू निषिद्ध मनात नसल्याने मुलांना ती कशी प्यावी ह्याचे टेबल मेनर्स शिकवले जातात. आपल्याकडे चोरीचा मामला असतो म्हणून मात्र आजकाल भारतात वाईन कल्चर रुजवण्यासाठी खास कार्यशाळा असतात .आमच्या स्तर अकेडमी सुद्धा विविध मद्यांवर कार्यशाळा घेते .
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Mon, 11/07/2011 - 12:50

In reply to @ सागर ,आनंद अरे थंडीचा by निनाद मुक्काम …

Permalink

बर्फाचा खड्यामुळे त्या

बर्फाचा खड्यामुळे त्या विस्कीमधील गंध उफाळून येतो.
असहमत, गंध 'उफाळून' येत नसावा ;) खुलत असावा.
मात्र स्कॉट लेंड मधील एका ब्रेवरीज ला भेट दिली असता त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली की बर्फ जसा विरघळायला लागतो तसे तसे विस्कीची चव बदलते.
इथे सहमत. कारण बर्फ जसा विरघळायला लागतो तसे व्हिस्कीतील पाण्याचे प्रमाण वाढत जाउन व्हिस्कीची चव बदलते - (कार्यशाळेत हजेरी लावण्याची इच्छा असलेला ) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Tue, 11/08/2011 - 00:31

In reply to @ सागर ,आनंद अरे थंडीचा by निनाद मुक्काम …

Permalink

ओ निनाद मु.पो.

च्याय्ला! कंच्याबी गोस्टिचा इक्ता अभ्यास करावा का? असं म्हंतो मी. (शिकोणी घेताका इचार्नारा) आनंदी गोपाळ
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Tue, 11/08/2011 - 03:57

In reply to ओ निनाद मु.पो. by आनंदी गोपाळ

Permalink

गोपाळ साहेब हा आमच्या हॉटेल

गोपाळ साहेब हा आमच्या हॉटेल मेनेजमेंट च्या शिक्षणातील एक भाग होता. बाकी मकारांमध्ये विशेष रुची असल्याने ह्या विषयाला केवळ अभ्यास न पाहता माझ्या जीवनशैलीचा एक भाग बनवला. भारतातील पहिली महिला बार टेंडर व ह्या शेत्रातील पितामह जिने मुंबईत सर्वप्रथम कॉकटेल कल्चर रुजवले अश्या आमचा शिक्षिका शद्बी बसू ह्यांचा स्तर अकेदेमी मध्ये शिकायला मिळाले. त्यांचामुळे जगभरातील ह्या शेत्रातील प्रसिध्द व्यक्तींशी संबन्ध आला. म्हणून थोडे ह्या विषया बद्दल आपुलकीने लिहितो . सध्या रहात असलेल्या युरोपियन खंडात मद्याला त्यांच्या संस्कृतीत अढळ स्थान आहे. त्यामुळे कधी काळी शिकलेले लक्षात आहे. त्यात सोकाजी सारखी दर्दी माणसे एवढे सुरेख लेख काढतात त्याला आपला खारीचा वाटा ( चकण्या एवढा ) मी लिहितो . बाकी कधीही माझ्या खव मध्ये येऊन धडाका काही प्रश्न असल्यास त्यांचे माझ्या कुवतीनुसार निरसन करेन.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Fri, 11/04/2011 - 23:58

Permalink

निनाद मुक्काम प... फारच

निनाद मुक्काम प... फारच माहितीपूर्ण आणि वेगळा विचार, भान देणारा प्रतिसाद
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com