तू मजसोबत येशील अशी शक्यता वाटत नव्हती. पण तू पटकन गाडीवर माझ्यामागे सावरून बसलीस. तेव्हा खरे तर माझ्या मनात कल्लोळ उठला होता. तुझं तसं मजसमीप असणं जगावेगळं वाटत होतं. त्यात मौसम ‘घन उतरू आलं...’ अशा झिम्मड पावसाचा. तुला कुठे सोडायचं हे ठरलं नव्हतं. मी तर थेट तुझ्या घरापर्यंत साथसोबत केली असती पण तुझ्या मनात ते जलतरंग होते कुठे? नव्हतेच. मीच आपला सप्तरंगी स्वप्नायुष्य भन्नाटवेगे पळवत चाललो होतो...
रस्ते म्हणजे खड्डेच की. तू माझ्यावर मागून आदळली नाहीस असं होणार नव्हतं. तरीपण तुझाही तोल सावरीत मी बेताने गाडी घेतली आणि माझं ते संयत वागणं पाहून त्या वरच्या मसीहाला माझी दया आलीच. तो भुरभूर करीत बरसू लागला... पुढे पुढे रपरप... अन् नंतर तर धोधोच! मी पुढील बाजूने दे दणादण धारा झेलीत होतो. तू मात्र माझ्या आडोशाने स्वतःला बचावित होतीस. भिजणे तुझ्या मनी नव्हते. मी तर केव्हाच आतपर्यंत भिजलो होतो, प्रेमातही... पावसातही! वारा असा होता, धारा अशा होत्या की कोरडी राहण्याचा तुझा आटोकाट प्रयत्न त्यांच्या बेभानपणापुढे फसत गेला आणि माझ्यासह तूही अगदी नखशिखांत ओली झालीस...
ते भिजणं तुझं वरवरचं होतं तर मी अंतर्बाह्य ओलेता झालो होतो. प्रीतीवर्षावात मी आतमध्येही नाहलो, बाहेरूनही. तू मात्र तशीच कोरडी राहण्याचा अट्टाहास बाळगून होतीस. बाहेर निसर्ग ओलाचिंब होत होता, पण तू फक्त शरीराने भिजणे अनुभवत होतीस. माझं मीपण विसरून मी सर्वस्वी तुझाच झालो होतो, तर तू कधी एकदा आपला थांबा येतो अशा चिंतेत गुंतल्याने भिजपावसाच्या मौजेला पारखी झाली होतीस. घाट पार करतांना येणारी वळणं झोंबरा वारा घेऊन येत गेली आणि तुझं मला बिलगणं ओघाने आलंच की सखी. होय, मी तुला सखी समजत होतो तर तू मला मित्रत्वाच्या नात्यानेच जोखीत होतीस, तोलीत होतीस...
असो.
‘यही सही’ म्हणालो मनातल्या मनात पण तुला काय ऐकू आलं कोण जाणे तू पटकन अचानक बोलून गेलीस, ‘असं वाटतं, हा प्रवास संपूच नये...’
तुझं ते एकच वाक्य माझ्या मनात इतकं झिरपलं की मी आत खोलवर रुजत गेलो, सजत गेलो. त्या वाक्याने माझ्या काळजावर रेखीव नक्षी अशी रेखली की जशी वळवाची पहिली सर उनलेल्या फुफाट्यावर शितलतेची रांगोळी काढते. तुझं बिलगणं मनतळी असं साचत गेलं की जणू एखादा ओहोळ कोरड्या कपारीतून कोसळून जावा, ओसंडून जावा. तुझा स्पर्श असा चिंब करून गेला की जसा काही एखादा कोमल नभ उंच शीतलशा टेकडीवर अलगद रुतावा, आल्हाद करून जावा.
तुला त्या तुझ्या इच्छित स्थळी सोडलं आणि तू मुग्धपणे स्मित करीत नजरेआड झालीस. मी तिथेच त्याच धुवांधार पावसात कितीतरीवेळ तुझ्या पाठमोऱ्या आकृतीला आठवित राहिलो... मागे फिरलो तेव्हा कडकडीत उन पडल्याने मी खडखडीत वाळून गेलो!
तुझं येणंही असंच अवचित येणाऱ्या मृदुल सरीसारखं असायचं. आणि तुझं जाणं? तुझं जाणं पुन्हा मान्सूनसाठी आतुरलेल्या चातकाच्या मनःस्थितीसारखं. तू पुन्हा येशील, पुन्हा बिलगशील, पुन्हा आतपर्यंत झिरपशील अशी वेडी आशा मनी बाळगून मी आजही त्या मान्सूनच्या प्रतिक्षेत जीवनपथाचे विराण वाळवंट मंदगतीने चालतो आहे... चालतो आहे...
(लोकमत 'ऑक्सिजन' १९-०८-२०११. उल्लेखनीय लेखन.)
वाचने
3484
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेच्या ....
+१
+१
In reply to +१ by स्पा
मस्तच
छान लेखन. गारवा आठवला. मी तर
सुंदर लेख
हा प्रतिसाद डॉक्टरसाहेबांचा
In reply to सुंदर लेख by शुचि
हा प्रतिसाद लेख चांगला
In reply to हा प्रतिसाद डॉक्टरसाहेबांचा by धन्या
"शुचि" या आयडी चे लेख न
In reply to हा प्रतिसाद लेख चांगला by शुचि
>> इतर भाषेतील संदर्भ देणे
In reply to "शुचि" या आयडी चे लेख न by धन्या
आणि मला जर काही असे आठवले तर
In reply to >> इतर भाषेतील संदर्भ देणे by शुचि
पटले
In reply to आणि मला जर काही असे आठवले तर by धन्या
उत्तम... खरं तर मी सर्वात
In reply to पटले by शुचि
हाहा ... पण खरच मला शब्द
In reply to उत्तम... खरं तर मी सर्वात by धन्या
सगळ्या चर्चा अशा संपतील तर
In reply to हाहा ... पण खरच मला शब्द by शुचि
उत्तम लेख!
ते भिजणं तुझं वरवरचं होतं तर
व्वा !! अक्षरशः न भिजता ही
अप्रतिम लेखन