Skip to main content

दहशतवादावर प्रॅक्टिकल उपाय भारताकडे आहे का?

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 14/07/2011 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
काल मुंबईवर आतांकवादी हल्ला झाला...नेहमीप्रमाणेच.. खरंतर हे दुर्दैव की 'नेहमीप्रमाणे' हा शब्द वापरावा लागावा! :( आधी बसलेला धक्का, मग दु:ख, मग उद्वेग आणि शेवटी चीड या क्रमाने माझ्या भावना बदलल्या. मग सुरू झाले ते प्रतिक्रीयांचे पूर. "नालायक सरकार" पासून ते "कसाब" आणि "षंढ समाजा"पासून ते "परकीय शत्रु" पर्यंत मी अनेकांना दुषणे दिली. आणि तुमच्या-माझ्यासारख्यांच्या या कोलाहलाचे रुपांतर "सरकार" या आपल्यातील एका संस्थेला टारगेट करण्यात झाले. सरकारचा यावेळी दोष आहे की नाहि हे तूर्त बाजूला ठेवले तरी हे नाकारता येणार नाही सरकार दहशतवादाशी दोन हात करण्यात अयशस्वी ठरलं आहे हे नक्की! पण फक्त सरकार अपयशी ठरलं आहे म्हणून आपण वेगळे राहु शकतो का? सरकार अपयशी ठरलंच मात्र अहेही तितकंच खरं आहे की सरकार आपल्यातूनच बनलंय. तेव्हा, गेल्या अनेक वर्षातील घडामोडी बघता हे स्पष्ट आहे की कोणतेही सरकार असो, आपण भारतीय समाज म्हणून दहशतवादाशी लढण्यात अपयशी ठरलो आहेत. (ज्यात सरकार आले, सरकारी संस्था आल्या व तुम्ही-आम्हीही आलोच) मात्र प्रश्न असा पडतो की या दहशतवादाशी लढायला आपल्याकडे काय योजना आहे? या दहशतवादाशी कसं लढावं? यासाठी काहि उपाय अनेकदा सुचवले जातात उपाय१: बहुतांश अतिरेकी शेजारील देशांतून येतात तेव्हा त्या देशांवर हल्ला करून 'एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकावा'. असं षंढासारखं जिण्यापेक्षा / अश्या भ्याड हल्ल्यात मेल्यापेक्षा युद्धात मेलेलं काय वाईट? किंवा अतिरेकी क्यांपांवर हल्ला करून 'एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकावा' किंवा कसंही करून कोणती तरी 'अग्रेसीव' अ‍ॅक्शन घेऊन 'एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकावा' (मात्र युद्ध करून हा प्रश्न सुटेल की चिघळेल याचे उत्तर चिघळेल असेच येते) उपाय२: चर्चा हाच प्रश्न सोडवण्याचा एकमेव मार्ग आहे. सरकारने विविध घटकांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा. (मात्र अतिरेकी चर्चेस तयार नाहीत, त्यांच्या मागण्या माहित नाहित, असल्याच तर त्या कोणतेही सार्वभौम राष्ट्र मान्य करु शकणार नाही मग चर्चा कसली करायची?) उपाय३: अंतर्गत बचाव (संरक्षण) फळी सक्षम करणे. गुप्तहेर, स्पेशन कमांडोज, प्रगत पोलिसिंग वगैरे वगैरे (काहि प्रमाण योग्य वाटते. मात्र किती व कसे याची उत्तरे नाहीत. शिवाय हा बचावात्मक पवित्रा असल्याने इतके करूनही हल्ला होण्याचा धोका आहेच. अनेकांना भारताने या मुद्द्यावर बचावात्मक होऊ नये असे वाटते) तेव्हा चर्चेसाठी प्रश्न असे आहेतः
  • वरीलपैकी एखादा उपाय तुम्हाला योग्य वाटतो का? नसल्यास तुमच्यामते काय उपाय आहे?
  • दहशतवादाला प्रभावीपणे संपवू शकेल असा प्रॅक्टिकल उपाय मुळात भारतीय समाजाकडे आहे का?

वाचने 29273
प्रतिक्रिया 100

प्रतिक्रिया

उपाय१ खर्चिक ..अव्यव्हारी आहे ...पण सर्वात प्रभव शाली आहे ...पण दह्शत्वाद हा मनातुन नष्ट होनार नाही .. बाहेर च्या ना मारु ...घरातल्यन्चे काय ?? उपाय३ चान्गला आहे पण तु लिहिल्या प्रमाणे " किती व कसे याची उत्तरे नाहीत"

उपाय १ - तो केल्यावरही दहशतवाद नाहीसा होईलच हे सांगता येत नाही. कारण दहशतवादाला आता फक्त भारत पाकिस्तान एवढाच पदर नाही. तसेही हा उपाय शक्य नाही/व्यवहार्य नाही असे माझे मत आहे. उपाय २ व ३ हे एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी म्हणून वापरायला हवेत. उपाय २ मध्ये अतिरेकी चर्चेस तयार नाहीत, त्यांच्या मागण्या माहित नाहित, असल्याच तर त्या कोणतेही सार्वभौम राष्ट्र मान्य करु शकणार नाही मग चर्चा कसली करायची? हे तितकेसे बरोबर नाही. पंजाबच्या स्वातंत्र्याची मागणी मान्य करणे शक्य नव्हते पण चर्चेद्वारा ती मागणीच ड्रॉप करून घेण्यात (उपाय ३ च्या सहाय्याने) यापूर्वी यश मिळालेले आहे. त्याचप्रमाणे भारताला स्वातंत्र्य देण्याची जवळजवळ अशक्य मागणी ब्रिटिशांनी मान्य केली होती. दोन्ही बाजूच्या लवचिकतेवर ते अवलंबून आहे.

In reply to by नितिन थत्ते

>>पंजाबच्या स्वातंत्र्याची मागणी मान्य करणे शक्य नव्हते पण चर्चेद्वारा ती मागणीच ड्रॉप करून घेण्यात (उपाय ३ च्या सहाय्याने) यापूर्वी यश मिळालेले आहे -- पंजाबचा दहशतवाद आणि चालु दहशतवाद यात फार फरक आहे ना? आता "कसे" म्हणुन विचारु नका (ते तुम्हाला माहित आहे असं मानुन चालतो) >>त्याचप्रमाणे भारताला स्वातंत्र्य देण्याची जवळजवळ अशक्य मागणी ब्रिटिशांनी मान्य केली होती -- नितीनरावांची आयडी हॅक झालि कि काय? कि मलाच कळत नाहिये तुम्ही काय म्हणताय ते... (संभ्रमीत) अर्धवटराव

पूर्णपणे सहमत

भारत सध्या उपाय २ आणि ३ दोन्ही ही वापरतोय. पण त्याचे फळ आपण पाहतोच आहे. उपाय १ वर म्हटल्याप्रमाणे जमणार नाही. म्हणजेच चौथाच उपाय शोधायला हवा.

बहुतांश अतिरेकी शेजारील देशांतून येतात तेव्हा त्या देशांवर हल्ला करून 'एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकावा'. म्हणजे नक्की काय करावे. बहुतेकांची अपेक्षा असते की पकिस्तानचे सरकार र्नेस्त्नाबुत केले तर प्रश्न सुटेल. एक क्षण समजून चालू कि तेथील सरकार नेस्तनाबुत केलेले आहे आणि एक मंडलीक सरकार भारताने तेथे बसवलेले आहे किंवा पकिस्तान पूर्णपणे भारताचा भाग झालेला आहे. अशा अवस्थेत निव्वळ तो भूभाग भारताच्या ताब्यात येत नाही तर तेथील नागरीक देखील येतात. अवघ्या पाच किलोमिटर रुंदीच्या गाझा पट्टीचे उदाहरण समोर आहेच. ज्या नागरीकांची मानसीक जडघडण भारत भयावर झालेली आहे ते स्वस्थ बसतील असे नाही. मात्र असे युद्ध अमेरीका इराक युद्धाप्रमाणे असणार नाही. अमेरीकेला अजूनही अफगाणीस्थानवर पूरेसे वर्चस्व मिळवता आलेले नाहिय्ये.

In reply to by एक तारा

केले तर जिंकू आपणच याची गॅरंटी देतो. किंवा साधारणपणे कोणीही देईल. (जिंकले म्हणजे काय? युद्धात कोणीच जिंकत नसतो.. असे क्वोटेबल क्वोट्स आले तर नाईलाज.)

In reply to by गवि

मुलाला आपण (पाहिजे तितकेसे हुशार नसल्याने) परीक्षेत नापास होऊ असे वाटत असते/माहिती असते. म्हणून तो परीक्षेला बसणे टाळतो. त्याचे पालक गावभर सांगतात. मुलगा हुशार आहे फक्त अभ्यास करायला नको. मुलगा हुशार नाही हे पालक कधी मान्य करत नाहीत.

In reply to by गवि

जो पहिले अणु बाँब वापरेल तो जिंकेल असं समजलं तर वावगे नसावे. आणि त्याचा पुरेपुर वापर जर केल्या गेला तर असं होऊही शकते.

दहशतवाद मुळात ज्या देशांत मूळ धरुन आहे (म्हणजे जगभरात पसरलेले भूमिगत हस्तक नव्हेत.. मूळ रीतसर माहेरघरे..) असे देश कोणत्याही उपायाने बेचिराख (नुसते नष्ट नव्हे) होण्याने सर्वात मोठा इम्पॅक्ट होईल असं वाटतं. हा भीषण उपाय त्या त्या देशातल्या सामान्य निरपराधांचे प्राण घेणार हे नक्कीच..हे बेचिराख होणे आपल्या हातून होईल की आणखी एखाद्या जास्त प्रगत मोठ्या राष्ट्राकडून की मित्रराष्ट्रे वगैरे मॉडेलवर.. माहीत नाही. या बेचिराख झालेल्या जमिनीचे पुढे काय? माहीत नाही. अविचारी अविवेकी वाटला तरी उपाय जालीम आहे हे खरं. हे मॉडेल, आदर्श उत्तर नाही पण उद्देश साध्य होईल असं उत्तर आहे. चर्चेनेही प्रश्न सुटू शकतात. नाही असे मुळीच नाही. पण त्यात मुख्य रोडब्लॉक असे: १) शेकडो अतिरेकी संघटना ग्रॉसली एकसारखे पण इन्डिव्हिज्युअली वेगवेगळे उद्देश घेऊन लढतेय. त्यातही काही एकमेकांचे विरोधक असतीलच. तेव्हा अशावेळी चर्चा किती किती जणांशी करायची आणि मागण्या कोणाच्या मान्य करायच्या. पंजाबात किंवा ब्रिटिशांबाबत शत्रू म्हणा किंवा चर्चेतला प्रतिपक्ष म्हणा, एकमात्र होता म्हणून चर्चा संभवली. २) मागण्या मान्य करण्यात राष्ट्रप्रेम किंवा आणि काही नावाखाली हात आखडते घेऊन "चर्चा करु पण तुमचे काहीच मान्य करणार नाही" असा बाणा चर्चेला निष्फळ ठरवेल. खूप ड्रास्टिक अशी काहीतरी तडजोड करण्याची तयारी ठेवूनच ही भिंत तोडता येईल. नपेक्षा आग्रा..लाहोर.. चालत राहील. याने काय होईल न होईल ते माहीत नाही पण चर्चा आता नुसत्या स्वतःचे षंढत्व /नाकर्तेपणा अधोरेखित करत किंवा कुरवाळत बसण्यापेक्षा अन्य मार्गाकडे चालली आहे हे बघून बरे वाटले. धागाकर्त्याचे अभिनंदन.

In reply to by गवि

बराचसा सहमत आहे. पहिल्या परिच्छेदात काही (युद्धोत्तर) प्रश्नांची उत्तरे माहीत नाही असे आपण म्हटले आहे. म्हणजे ती उत्तरे शोधावी लागतील असे तुम्हाला वाटते हे पाहून बरे वाटले.
शेकडो अतिरेकी संघटना ग्रॉसली एकसारखे पण इन्डिव्हिज्युअली वेगवेगळे उद्देश घेऊन लढतेय. त्यातही काही एकमेकांचे विरोधक असतीलच. तेव्हा अशावेळी चर्चा किती किती जणांशी करायची आणि मागण्या कोणाच्या मान्य करायच्या. पंजाबात किंवा ब्रिटिशांबाबत शत्रू म्हणा किंवा चर्चेतला प्रतिपक्ष म्हणा, एकमात्र होता म्हणून चर्चा संभवली.
पंजाबात आणि ब्रिटिशांबाबतही अनेक पक्ष होते किंवा तसे आहेत असे म्हणून तत्कालीन सरकारांना चर्चा टाळता आली असती. परंतु त्या सरकारांनी तसे केले नाही. काही गटांशी चर्चा करून आणि काही सवलती देऊन त्यातील एखादा गट यशस्वी होत आहे असा भास त्यातल्या लोकांसाठी निर्माण केला गेला. मग पुढच्या वाटाघाटीत तो विशिष्ट गटच लोकाचा पाठिंबा मिळवू लागतो आणि मग चर्चा एकाच गटाशी करावी लागते. ब्रिटिशांनीही असेच काँग्रेसला पुढे आणले. सुरुवातीला यश म्हणजे बंगालची फाळणी रद्द, मग काही सुधारणा, मग काँग्रेसच्या अजून मागण्या वगैरे..... वाटाघाटी करताना आडमुठेपणा नको हे पटले.

In reply to by नितिन थत्ते

पंजाबात आणि ब्रिटिशांबाबतही अनेक पक्ष होते किंवा तसे आहेत असे म्हणून तत्कालीन सरकारांना चर्चा टाळता आली असती. परंतु त्या सरकारांनी तसे केले नाही. काही गटांशी चर्चा करून आणि काही सवलती देऊन त्यातील एखादा गट यशस्वी होत आहे असा भास त्यातल्या लोकांसाठी निर्माण केला गेला
एखाद्या पक्षाशी/विचाराशी चर्चा करणे किंवा न करणे हे पर्याय असु शकतात. मुळात दहशतवाद्यांची काहि मागणी आहे का केवळ दहशत निर्माण करून आपले महत्त्व वाढवणे इतकेच उद्दिष्ट आहे? गेल्या अनेक हल्ल्यांनंतर दहशतवाद्यांनी कोणतीही मागणी केल्याचे ऐकिवात नाही. प्रश्न असा आहे की कोणताही चेहरा, चर्चा करण्यास किमान तयार असलेले नेतृत्त्व / संस्था, ज्यावर चर्चा करायची तो विषय/विचार असे काहिच नसताना चर्चा कशावर आणि कोणाशी करावी? पाकिस्तानशी चर्चा करण्यात काहिच हशील नाहि कारण त्यांचा स्वतःच्या देशातील घटनांवर कंट्रोल राहिलेला नाहि तर तेथील 'सरकार'चा भारतातील घटनांवर कंट्रोल असेल असे वाटत नाही. बाकी उपाय तिसरा अमलांत आणायचा हा पर्याय योग्य कितपत आहे याबद्दल मी साशंक आहे. बचाव भक्कम करताना भारतीय नागरीकांनाही बर्‍याच नियमांना, प्रसंगी स्वात्संत्र्यावर घाला घालणार्‍या नियमांना सामोरे जावे लागेल. हे कितपत योग्य ठरेल? (उदा. फोन टॅपिंग, एमेल स्क्यानिंग वगैरेला मान्यता द्यावी असे वाटते का?)

In reply to by गवि

आयला गवि, तुम्ही फारच वैयक्तिक घेताय का काय षंढत्वाला? अधोरेखित कोण करतंय? वस्तुस्थिती मांडणं म्हणजे कुरवाळणं? उगाच आहे ती जखम तशीच तात्पुरती मलमपट्टी लावून काम करणे याला मुंबई स्पिरीट म्हणतात का? नक्की काय झालंय ते कळाले की पुढची व्यवस्था नीट होऊ शकते. टु द पॉईंट होऊ शकते. असो. मला तरी अंतर्गत सुरक्षा वाढवणे हा म्हणजे पर्याय क्र. ३ योग्य वाटतो. आणि त्या दृष्टीने पावले उचलली गेली पाहिजेत. सुरेश खोपडे यांनी राबवलेल्या मोहल्ला कमिटीचा मार्ग ही चांगला आहे.

In reply to by प्यारे१

आयला गवि, तुम्ही फारच वैयक्तिक घेताय का काय षंढत्वाला? अधोरेखित कोण करतंय? वस्तुस्थिती मांडणं म्हणजे कुरवाळणं? बिलकूलच नाही. पण तीन चार लेख आणि असंख्य प्रतिसाद त्या षंढत्वाभोवतीच फिरत होते म्हणून तो शब्द उचलला. बाकीही शब्द वापरले गेलेत आणि तेही अनेकांकडून.. मूळ रोख हा नागरिकालाच नाकर्ता / न्यूट्रल / बेजबाबदार किंवा आणि काही म्हणा..ठरवण्याकडे दिसला. (तुमचे लिखाण नव्हे. आंजावर अनेक ब्लॉग्जवर असे चालू आहे) उगाच आहे ती जखम तशीच तात्पुरती मलमपट्टी लावून काम करणे याला मुंबई स्पिरीट म्हणतात का? नक्की काय झालंय ते कळाले की पुढची व्यवस्था नीट होऊ शकते. टु द पॉईंट होऊ शकते. हे तर अगदीच मान्य होण्यासारखे आहे आणि याच्या विरोधी मी काहीच म्हटलेलं दिसत नाही. मुळात चर्चा पुढे नेण्यासाठी मी मुद्दे मांडतोय. काही कोणाचंच व्यक्तिगत मत वगैरे खोडून काढण्याचा संबंधच नाही.

एक सिंबॉलीक धाक म्हणून आपण कारगिल च्याच सीमेवरुन पी ओ के मधे आक्रमण करुन आपलाच भुभाग परत मिळवु शकतो.

त्यांनी तुमचा एक मारला तर तुम्ही त्यांचे दहा मारा. दहशत हेच दहशतवादाला उत्तर असु शकते. पिसाळलेला कुत्रा आपण मारुनच टाकतो. त्याच्या बरोबर चर्चा करत नाही किंवा तो चावु नये म्हणुन पायाला पॅड लावुन फिरत नाही. सध्या आपला देश चवथा उपाय करतो आहे. ते म्हणजे कुत्रा चावायची वाट पहायची आणि कुत्र्याचा तिव्र शब्दात निशेध करायचा. आपली एकजुट नाही याचा दहशतवादी फायदा घेत आहेत. "सरफरोश" मधे एक छान वाक्य आहे. "त्यांना आपल्या विरुध्द लढण्या साठी माणसे नाही तर फक्त शस्त्र पाठवावी लागतात" जोपर्यंत आपण एकजुट होउन जोरदार प्रत्युत्तर देत नाही तोपर्यंत हे असेच चालणार. सुवर्णमंदीर ऑपरेशन केल्यावर पंजाब दहशतवाद थंडावला हे आपण सोईस्कर विसरलो आहोत. अमेरीकेने काय केले? तो चिमुरडा इस्त्राईल काय करतो? तेच आपणही करायला पाहीजे. परीणामांची चिंता नंतर आधि कॄती पाहीजे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पिसाळलेला कुत्रा आपण मारुनच टाकतो. त्याच्या बरोबर चर्चा करत नाही किंवा तो चावु नये म्हणुन पायाला पॅड लावुन फिरत नाही
अहो पण पिसाळलेल्या कुत्र्याला मारल्यावर त्याचे निमित्त करून किंवा त्याला बघुन इतर कुत्रे पिसाळत नाहित.. दहशतवादी त्याचे निमित्त करून किंवा त्याचा वापर करून अनेक दहशतवादी उभे करतात. मला तरी उपाय१ अयोग्य वाटतो

In reply to by ऋषिकेश

>>अहो पण पिसाळलेल्या कुत्र्याला मारल्यावर त्याचे निमित्त करून किंवा त्याला बघुन इतर कुत्रे पिसाळत नाहित.. दहशतवादी त्याचे निमित्त करून किंवा त्याचा वापर करून अनेक दहशतवादी उभे करतात.>> आपल्याकडे फक्त एकच माणूस नाहिये....ही सर्व मारामारी करायला... दुसरा कुत्रा पिसाळला तर त्याला पण मारायच... आणि तसेही आपण २ नंबर वर आहोत लोकबळाच्या बाबतीत. होवून जाऊंदेत एक्दाच काय ते..... बाकी . .

उपाय १, हा सर्वात घातक आहे. ---- > ज्या देशातुन अतिरेकी येतात त्या देशावर हल्ला करुन जर अतिरेकी पकडण्यास यश आले तरच ह्या उपयाची सफलता आहे, नाहितर फक्त आक्रमण करायचे.. आणि अतिरेकी तेथुन मिळालेच नाहि तर मग काय तेथील सामान्य जनतेला जाळायचे ? आणि यातुन काय मिळणार ? पुन्हा वाचलेले आनखिन नविन आतंकवादी बनणार आणि पुन्हा तेच सुरु राहणार... दहशवादा ला उत्तर दहशदवाद हे वरील उत्तर अतिशय चुकीचे वाटते. आणि आता आपण वापरत असलेलो दहशतवादाला उत्तर आशावाद हे ही चुकीचेच आहे. उपाय ३ हाच आपल्या हातात आहे आणि तो योग्य आहे .. दहशवाद पुर्णपणे रोखण्यात कोणालाही यश कधीच येणार नाहि .. तो कमी करणेच आपल्या हातात आहे. उदाहरणे, दाखले देणे सोपे असते .. मार्ग तयार करुन त्यावर चालणे अवघड असे माझे मत आहे.

In reply to by गणेशा

रक्ताच्या काही ठराविक प्रकारच्या कर्करोगांत "पोटेन्शियल क्युअर" आणि "रिमिशन" असे प्रकार अचिव्ह करण्याचे वेगवेगळे मार्ग असतात. केमोथेरपी करुन कॅन्सरग्रस्त पेशी मारायच्या आणि त्यासोबत काही नॉर्मल पेशींचेही बलिदान द्यायचे आणि अशा मार्गाने आजार "कंट्रोल"मधे ठेवायचा..पुन्हा पेशी वाढल्या की पुन्हा केमो.. परिस्थिती मर्यादेत ठेवण्याचा प्रयत्न.. क्युअर नव्हे.. बोन मॅरो मधे नव्या कॅन्सरपेशींचा कारखाना चालूच... तुम्ही म्हणताय तो असा उपचार झाला. जिथे शक्य आहे तिथे "बोन मॅरो ट्रान्स्प्लांट" अशा उपचाराने दोषग्रस्त पेशींचे मूळ मारण्यासाठी संपूर्ण बोन मॅरो जालीम द्रव्याने मारुन टाकायची आणि तिथे नवीन हेल्दी मॅरो रोपित करुन तिची वाढ होऊ द्यायची. या दुसर्‍या मार्गात सर्वच पेशी बेचिराख होतात पण "क्युअर" किंवा "बरे होणे" या दृष्टीने केलेला हा उपाय असतो. दोन्ही उपचारच आहेत.. आपली ट्रीटमेंट काय हे ठरवताना सगळ्याचाच कॉस्ट बेनिफिट रेशो बघावा लागतो. मुळात म्हणजे ट्रीट्मेंटचे ध्येय ठरवावे लागते. "क्युअर" की "कंट्रोल(ऊर्फ पुल ऑन टिल डेथ..)"

In reply to by गवि

उदाहरण चांगले आहे, पण संपुर्ण पेशिंचा नायनाट करुन ही तोच माणुस जिवंत असतो फक्त नव्या पेशी तेथे असतात. दहशवाद हा रोग अविचारांवर वाढलेला आहे.. आणि विचार/अविचार पुर्णपणे नष्ट करणे आजपर्यंत माणसाला जमलेले नाहि. जर तुम्ही नविन पेशी ट्रांस्प्लांट करत आहात, तर उलट तुमच्या मतेच दहशवादी लोकांचे अविचार बदलुन तेथे सुविचार रुझवले पाहिजे पर्यायी आशावादी मार्ग आहे असे वाटते. (नोट : हा रिप्लाय फक्त आपल्या रिप्ल्याय ला आहे, संपुर्ण थ्रेड ला नाही, आणि कृपया आपल्या मुळ मुद्द्याला उत्तर देणे माझा उद्देश नाहिये.. मला येव्हडेच सांगायचे आहे उदाहरणे अनेक देता येतात.. मार्ग तयार करुन त्यावर चालणे वेगळे.. उदाहरणांना अनेक बाजु असतात.. त्यातील एक शक्यता मी मांडली.. हा तुम्ही जर कॅन्सर झालेल्या व्यक्तीला आणि त्याबरोबर त्याच्या आजुबाजुच्या व्यक्तीला मारणार असला तर तुम्हाला आवडेल का? कदाचीत कॅन्सर न झालेली आणि वाचलेली एखादी व्यक्तीच तुमचा हा नायनाट करण्याच्या उद्देशाने पेटेल ना असे वाटते)

In reply to by गणेशा

पण संपुर्ण पेशिंचा नायनाट करुन ही तोच माणुस जिवंत असतो फक्त नव्या पेशी तेथे असतात. संपूर्ण बोन मॅरो मारुन परत रोपित करण्याच्या प्रक्रियेत तो मनुष्य मेल्यातच जमा असतो. जगण्याचे चान्सेस मरणापेक्षा कमी असतात. म्हणून ही सर्व कल्पना देऊनच हा मार्ग निवडला जातो. दहशवाद हा रोग अविचारांवर वाढलेला आहे.. म्हणूनच कर्करोग, अतएव वेड्या / अविचारी पेशींचे उदाहरण घेतले. हा तुम्ही जर कॅन्सर झालेल्या व्यक्तीला आणि त्याबरोबर त्याच्या आजुबाजुच्या व्यक्तीला मारणार असला तर तुम्हाला आवडेल का? उदाहरणाची अ‍ॅनॉलॉजी कृपया समजून घ्या. पेशींना माणसाचे रुपक म्हणून वापरले आहे. पेशी मारणे = माणसे मारणे. कॅन्सरग्रस्त पेशीसोबरच आजूबाजूची नॉर्मल (चांगली/निरपराध/अविकृत्/विवेकी) पेशीही मारणे अशी समांतर उदाहरणे घेतली आहेत. त्यामुळे माणूस /माणसे मारुन टाकणे हा मुद्दा मधे आणणे उदाहरणाला धरुन नाही.

In reply to by गवि

तुमचा मुद्दा मला कळलेला आहे गवि. आणि त्यामागिल भावनेला/विचारांना मी उत्तर देत नाहिये. मला येव्ह्यडेच म्हणायचे आहे की असा मार्ग प्रॅक्टीकल नाहिये. तो अमलात आणताना सर्व अतिरेकी/माणसे कसे मारले जातील.. आणि असा उपाय आपल्याकडे असु शकत असेन .. तर अतिरेक्यांना पण हाच उपाय आपल्यावर पण वापरता येइलच.. आणि आपण दहशतवादाचा सामना अश्या पद्धतीने करत असु तर आपण दहशवाद्/दहशतवादी कमी न करत वाढवू असे वाटते.

मी काय म्हणतो की जुन्याकाळी कसे एखादा राक्षस गावाच्या जंगलाच्या हद्दित असला की त्याला आठवडा / चार दिवसाला एक माणूस, गाडाभर अन्न वैग्रे गावकरी पाठवुन देत असत. तसे पाकिस्तानी भयभित जनतेला आणि सरकारला शांत करण्यासाठी आपण प्रत्येक गावातुन / शहरातुन त्यातील प्रत्येक घरातुन एक ५०,००० रुपये आणि ४ माणसे अशी बॉर्डरवरती पाठव जाउ. घरात ४ माणसे नसली तर शेजारच्या घरातुन उरलेली उचलायची. किती फायदे आहेत बघा :- १) दर आठवडा चार दिवसाला हिंदुस्थानी कुत्ते की मौत मरत आहेत हे बघुन भयभीत पाकिस्तानी जनता खूष. २) जनता खूष म्हणून पाकिस्तानी सरकार खूष. ३) हिचा आयडीया आपण चिन बरोबर वापरली की चिन खूष. ४) पाकिस्तान चिन खूष म्हणजे देशात शांतता आणि देशातले लोक खूष. ५) देशातले लोक खूष म्हणजे आपल्या सिमा भगातील लोक खूष. ६) सिमा भागातील लोक खूष म्हणजे तिथे ड्यूटीवर असलेले कर्मचारी खूष. ७) तिथे असलेले कर्मचारी खूष म्हणजे निलकांत खूष. ८) निलकांत खूष म्हणजे मिपाचा सर्वर खूष. ९) मिपाचा सर्वर खूष म्हणहे मिपाकर खूष. लास्ट बट नॉट द लिस्ट १०) ह्यासर्वामुळे जनता सरकारवर खूष आणि जनता सरकारवर खूष म्हणून थत्ते चाचा खूष.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आमच्या वतीने पर्‍यालाच पाठवा. पैसे दुबैवरून मागवू. पर्‍या गेला म्हणजे मिपाकर खूष, मिपाकर खूष म्हणजे... ...म्हणजे ....म्हणजे ...म्हणजे ..म्हणजे ...म्हणजे देशात शांतता.

In reply to by परिकथेतील राजकुमार

सर्वात उत्तम प्रतिसाद, एकदम पटले, पूर्णपणे सहमत .... किंवा थत्ते चाचांनाच पंतप्रधान करून टाकू .... म्हणजे मग आपल्या देशासमोरचे सर्वच प्रश्न सुटतील ( देश शिल्लक राहिला तर) .... :) साहेब विचारतात कि पकिस्तानशी क्रिकेट सामना खेळ्वू शकाल का? आम्ही पामरं विचारतो कि आपण हा पाक्-पुरस्कृत दहशतवाद थांबवू शकाल का?

In reply to by परिकथेतील राजकुमार

मला तर कित्येकदा असा प्रश्न पडतो की आपले राज्यकर्ते मिपा नियमीतपणे वाचत कां नाही?

@ ॠशिकेश , गणेशा, अमेरिकेवर एकच दहशतवादी हल्ला झाला. पण त्याचे उत्तर त्यांनी कसे दीले. अफगाणीस्तान मधे अजुन किती लादेन तयार होतील याची त्यांनी पर्वा केली का? त्यांच्यावर दुसरा हल्ला झाला का? आणि आपल्यावर मागच्या दहा वर्षात किमान २० हल्ले झाले असावे. असे का होते? कारण आपण काहीही करु शकत नाही हे त्यांना पक्के ठाउक आहे. यापध्द्तीने आपल्यावरचे हल्ले दहशतवाद्यांनीच कंटाळुन थांबवले तर थांबतील उपाय ३ ने नव्हे. एवढा मोठा आपला देश. कोट्यावधी लोक रहातात ईथे. हजारो किलोमीटरची सीमा आणि विशाल सागर कुठे कुठे आणि कीती पुरे पडणार आहोत आपण. आणि हल्ला होईल म्हणुन २४ तास ३६५ दिवस सर्तक रहायचे या साठी येणार्‍या खर्चाचा नागरीकांना होणार्‍या त्रासाचा कधी विचार केला आहे? आपल्याच खिशातुन जातील हे पैसे आणि वर आपल्यालाच ताप होईल. स्वतःच्या देशात आपल्याच लोकांकडे सतत संशयाने पहाणे कितपत योग्य आहे? बंदुक स्वस्त असते. बुलेटप्रुफ जॅकेट बंदुकी पेक्षा कीती तरी महाग असते. समोरच्याला जेव्हा तुमच्या कडे बंदुक आहे आणि तुम्ही ती चालवु शकता याची जाणिव असते तेव्हाच तो तुम्हाला वचकुन असतो. डास चावायला लागला की आपण त्याला फटका मारतोच ना. दुसरा आला की त्यालाही मारतो.की सतत मच्छरदाणीत बसुन रहातो? "भित्या पाठी ब्रम्हराक्षस" हे नेहमीच लक्षात असावे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

एवढा मोठा आपला देश. कोट्यावधी लोक रहातात ईथे. हजारो किलोमीटरची सीमा आणि विशाल सागर कुठे कुठे आणि कीती पुरे पडणार आहोत आपण. आणि हल्ला होईल म्हणुन २४ तास ३६५ दिवस सर्तक रहायचे या साठी येणार्‍या खर्चाचा नागरीकांना होणार्‍या त्रासाचा कधी विचार केला आहे? आपल्याच खिशातुन जातील हे पैसे आणि वर आपल्यालाच ताप होईल. स्वतःच्या देशात आपल्याच लोकांकडे सतत संशयाने पहाणे कितपत योग्य आहे? बैलाचा डोळा. अर्थात बुल्ज आय.. परफेक्ट...!! :)

>> डास चावायला लागला की आपण त्याला फटका मारतोच ना. दुसरा आला की त्यालाही मारतो.की सतत मच्छरदाणीत बसुन रहातो? आम्ही एका गालावर डास चावला कि दुसरा गाल पुढे करतो ....

शिवाजी महराजांचे वंशज म्हणवतो आपण, गनिमी काव्याचा वापर करता नाही का येणार ह्या दहशतवादाला ठेचून काढायला? मला कितपत प्रक्टिकली शक्य आहे माहित नाही, पण खरच थेट युद्ध न पुकारता, छुपे हल्ले करून आपण त्यांना नेस्तनाबूत नाही का करू शकत? अमेरिके सारख्या राष्ट्रांशी थेट शत्रुत्व नको आणि आपल्या देशावर सतत टांगती तलवार नको... पण आता सतत शांतपणे सहन करणे नको,एवढं मात्र खर...

काही झाले की भावनेच्या आहारी जाऊन दुसर्‍यांना दोष देण्यापेक्षा आधी स्वतः सुधारा. ज्या देशातल्या लोकांना कुठल्याही प्रकारची शिस्त पाळायची नसेल त्यांनी अवास्तव अपेक्षा ठेवूच नयेत.

१ - अफजल गुरु, कसाब आणि इतर कोणी असतील त्यांना तातडीने फाशी - मुंबई बाँबस्फोटाला आठवडा व्हायच्या आत हे झाले पाहिजे! ह्याने जी शॉक ट्रीटमेंट होणार आहे त्याचे मूल्य फार मोठे आहे, असा अनपेक्षित धक्का हा अतिरेक्यांची मानसिक शक्ती खच्ची करतो. २ - दहशतवाद्यांबरोबर वाटाघाटी नाहीत - नो निगोशिएशन्स! अतिरेकी सापडले की लवकरात लवकर त्यांचा निकाल लावणे हे महत्त्वाचे. वर्षानुवषे खटले चालवण्याने सामान्य माणसाचा व्यवस्थेवरचा विश्वास उडतो. ३ - पाकिस्तान बरोबरचे मैत्रीपूर्ण संबंध कमी करणे - आपण संबंध सुधारायचे जसे प्रयत्न करतो तसेच वेळ पडताच ते ताणूही शकतो हे समजायला हवे. सतत आपणच गळ्यात गळे घालायचे आणि गळे कापून घ्यायचे याला अर्थ नाही. ४ - अंतर्गत बचाव - हा तर सक्षम करायलाच हवा. पोलीस यंत्रणांनी आता महाविद्यालयीन तरुणांना महाविद्यालयात जाऊन अतिरेकी कसे काम करतात, समाजात वावरताना काय काळजी घ्या, संशयास्पद हालचाली कशा टिपा, असे काही आढळल्यास तातडीने काय करा, कुठे संपर्क साधा ह्याबद्दल सविस्तर माहिती दिली पाहिजे. शेवटी पोलीस सगळीकडे पुरे पडू शकत नाहीत. सामाजिक जबाबदारी हा भाग अपरिहार्य आहे आणि येणार्‍या पिढ्यांना किंचित जरी शांत आयुष्य हवे असले तर ह्याला पर्याय नाही. असेच प्रशिक्षण जास्तितजास्त खाजगी आणि सरकारी कर्मचार्‍यांना देणे अत्यावश्यक आहे. आपण सगळेच पोलीस आणि सैन्य यांच्यावर अवलंबून राहून आपले कर्तव्य विसरतो हे आता चालणार नाही. ५ - इयत्ता ९, १०, ११ आणि १२ अशी चार वर्षे लष्करी प्रशिक्षण (उदा, एन्सिसी) सक्तीचे करणे. शिस्त, समन्वय, आज्ञापालन, टीमवर्क, धाडस, प्रसंगावधान अशा गुणांची जोपासना व्हायला हे नक्कीच मदत करते. यातले ४ आणि ५ हे दूरगामी उपाय आहेत परंतु अतिशय आवश्यक आहेत. ----------------------------- पाकिस्तानबरोबर युद्ध हे आता तितकेसे प्रॅक्टिकल राहिलेले नाही. यात केवळ भारत वि पाकिस्तान असे गणित नसून इतरही अनेक देशांचे संबंध येतात. शिवाय पाकिस्तानी सामान्य नागरिक हा अजूनही भारताशी जोडलेला आहे तसेच सीमाभागातला सामान्य भारतीय नागरिकही पाकिस्तानशी जोडलेला आहे हे सत्य नाकारुन चालणार नाही. मूठभर अतिरेक्यांपायी हजारो निरपराधांची राखरांगोळी हा उपाय होऊ शकत नाही!

In reply to by चतुरंग

मुंबई पोलिस गेल्या ३-४ वर्षांपासून 'अ‍ॅलर्ट मुंबईकर अभियान' राबवत आहेत. मी स्वतः या कार्यक्रमास २००७ व २०१० साली उपस्थित होते. या अभियानांतर्गत पोलिस (बहुधा एक सबइन्स्पेक्टर, आणि चार जणांची टीम) हिंदी, मराठी आणि इंग्रजी या सगळ्या भाषांमधून सामान्य मुंबईकरही थोडीशी 'जाण' वापरून कसा गुन्हेगारी/दहशतवादाशी सामना करू शकतो हे सांगतात. सुरूवातच 'अ‍ॅलर्ट' आणि 'अवेअर' हा फरक सांगून केली जाते. (प्रश्नः असा कोणता खेळ आहे जो जिंकण्यासाठी आपणांस मागे सरकावे लागते? उत्तर प्रतिसादाच्या शेवटी दिले आहे.) छान विनोदांची पखरण करत आणि ओघवत्या शैलीत एका भाषेतून दुसर्‍या भाषेत जात, मुंबईच्या बहुभाषिक लोकांना समजेल आणि त्याचबरोबर माहिती रटाळही होणार नाही याची काळजी घेत हे अभियान चालवले जाते. सिनेमातले प्रसंग पाहून त्यात नक्की काय चुकीचे असते, आणि त्या गोष्टी केल्याने काय होऊ शकते हे ही सांगितले जाते. 'हिरो' बनायला जाऊ नका, फक्त डोकं जाग्यावर असलेला माणूस म्हणून वागल्यानंतर किती धोके टाळले जाऊ शकतात हे त्यांच्या तोंडून खरंच ऐकावं. उदा., गैरसमजः बाँब उचलून दूर मैदानात्/पाण्यात फेकणे (वस्तुस्थिती: तो फेकण्याआधीच फुटला तर?), गैरसमजःमी बाँब घेऊन पळून जातो, एकटाच मरेन पण बाकीचे लोक वाचतील (वस्तुस्थिती: ९३ मधल्या बॉंबमधील वस्तू फुटल्यानंतर ती मधल्या वस्तूंचा वेग साधारण ८००किमी/सेकंद-ही त्यांनीच सांगितलेली माहिती- असतो, त्यामुळे असं करण्यानं काही फायदा नाही; बाँबविरोधी पथकालाच बोलावणं ही हुशारी आहे) आणि असं बरंच काही. फक्त दहशतवादच नाही, तर घरगुती चोर्‍या, साखळ्या लांबवणं यांसारख्या गुन्ह्यात आपण स्वतःच कसे बेजाबदार वागून गुन्हेगारीला आमंत्रण देतो यांची अगदी सहज पटतील अशी रोजच्या जीवनातली उदाहरणे दिली गेली होती. हे अभियान मुख्यतः शाळा, कॉलेजेस आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन चालवले जाते. म्हणजेच, सामान्य नागरिकांपर्यंत ही माहिती पोचवली जातेय. काहीतरी कुठेतरी कमी पडते आहे, पण काहीच केले जात नाही असं नाही. या पोलिस पथकाचं मला विशेष कौतुक करावंसं वाटतं. मी पाहिलेल्या दोन्ही प्रयोगांत इन्स्पे. मसूरकर सूत्रधार होते. त्यांनी संभाषणादरम्यान ते फक्त बीकॉम आहेत आणि तुम्हा इंजिनिअर्स इतकं मला चांगलं इंग्रजी येत नाही असं म्हटलं खरं, पण त्यांची सगळ्याच भाषांवरची पकड, आणि एकूण तयारी खूपच चांगली होती. उगीच सरकारीपणा औषधालाही नव्हता आणि प्रेक्षकांवर अगदी उत्तम प्रभाव पडला होता. प्रश्नाचे उत्तरः रस्सीखेच. उत्तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण प्रश्न ऐकल्यानंतर पटकन आठवत नाही. तात्पर्यः उत्तराबद्दल आपण सगळेच अवेअर असतो, पण अ‍ॅलर्ट असणं त्याहून जास्त महत्वाचं आहे.

In reply to by मस्त कलंदर

हे अभियान चालवले जाते आहे याची माहिती अधिक लोकांपर्यंत कशी पोचवता येईल? मक, इन्स्पेक्टर मसूरकरांची मुलाखत घेऊन मिसळपाववर चढवता येईल का?

In reply to by चतुरंग

सगळेकडे जेव्हा अभियान चालू झाले तेव्हा गफूर काय म्हणाले आणि शाहिद कपूर आला होता याच बातम्या आहेत. मी त्यांचा कार्यक्रम दोन्ही वेळेस -एकदा शिकवते तिथे व दुसर्‍यांदा शिकत होते तिथे-कॉलेजमध्येच पाहिला. त्यांनी त्या वेळेस दिलेल्या माहितीनुसार ते स्वयंस्फूर्तपणे शाळाकॉलेजात आणि गृहसंकुलात जातात. त्यावेळेस त्यांनी काही फोन क्रमांकही दिले होते ज्याद्वारे गुन्ह्याची खबर देता येते, स्वतः निनावी राहूनही माहिती देता येते वगैरे. माझ्याकडे असलेली अर्धवट माहिती आठवून देण्यापेक्षा एक नागरिक (फक्त मुंबईकर म्हणून नाही, आठवा चक दे इंडिया) म्हणून या उपक्रमाची संपूर्ण माहिती मिळवून एक सविस्तर माहिती इथे लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर मराठी व इंग्रजी विकिपिडियावरही त्यासंबंधी पाने तयार करून ती माहिती सर्वांसाठी उपलब्ध करून देता येईल.

In reply to by मस्त कलंदर

अशा प्रकारची व्याख्याने बर्‍याच मोठ्या प्रमाणावर होणे जरूरीचे आहे. त्याला योग्य तो प्रतिसाद जनतेकडून लाभणे हेही तितकेच महत्वाचे. तसे होण्यासाठी अशा उपक्रमांची भरपूर व योग्य तर्‍हेने जाहिरात झाली पाहिजे.

In reply to by प्रदीप

अशा प्रकारची व्याख्याने बर्‍याच मोठ्या प्रमाणावर होणे जरूरीचे आहे. त्याला योग्य तो प्रतिसाद जनतेकडून लाभणे हेही तितकेच महत्वाचे.
कोणास ठाऊक, कदाचित होत असतीलही. किंवा आणखीही बरेच तर्‍हेतर्‍हेचे प्रयत्न शांतपणे, गाजावाजा न करता सतत चालत असणेही शक्य आहे. होते काय, की असे काही घडले, की उच्चरवात 'षंढ! षंढ!!!' करून सार्वजनिक ठिकाणी ओरडण्याची अहमहमिका लागते. त्या कोलाहलात बाकीचे काही ऐकू येत नाही. आणि बाकी सगळे विसरले जाते. (काही उपाययोजना व्हायची असेल, किंवा करता यावी म्हणून किमान काही साधा सकारात्मक विचार जरी करायचा असेल, तर सर्वप्रथम हे बोंबलणे बंद झाले पाहिजे. बोंबलणार्‍यांना 'आपण षंढ आहोत' असे वाटत असेल तर तसे खुशाल वाटो बापडे, नव्हे भाडखाऊ लोकशाहीत तसा तो त्यांचा अधिकारही आहे, पण इतरांनाही आणि देशालाही षंढ ठरवण्याने काहीही विधायक असे साध्य होत नाही. उलट, 'झाला अतिरेकी हल्ला की उठले सगळे भारतीय आणि स्वतःलाच आणि स्वतःच्याच देशाला षंढ म्हणून घेऊ लागले' असे जर होऊ लागले, तर अतिरेक्यांचा त्याहून मोठा विजय नसावा. आपणच आपलेच डीमॉरलायज़ेशन करू लागलो, तर अतिरेक्यांची गरजच काय आहे - फक्त क्याटालिष्ट म्हणून?)

In reply to by पंगा

शेवटच्या परिच्छेदाशी प्रचंड सहमत. "षंढ" या शब्दाच्या पोस्ट्ब्लास्ट सढळ वापराविषयी (प्राजुताईच्या एका कवितेत किंवा पोस्टमधेच नव्हे तर ब्लॉगविश्वात खूप ठिकाणी) अस्वस्थ होऊन हेच दोन दिवस सगळ्या प्रतिसादांतून सांगण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद अर्थात सर्वांना (राज्यकर्ते आणि नागरिक) षंढ म्हणणे ही तात्कालिक निराशेतून आलेली तातडीची प्रतिक्रिया असू शकते. .

In reply to by चतुरंग

लेख वाच्ल्यावर डोळ्यांसमोर वरील १, २, ३ आलेत. सगळ्यात पहिले हे जर झाले तर मग बाकिचा विचार करता येइल. स्वप्निल

In reply to by चतुरंग

५ - इयत्ता ९, १०, ११ आणि १२ अशी चार वर्षे लष्करी प्रशिक्षण (उदा, एन्सिसी) सक्तीचे करणे. शिस्त, समन्वय, आज्ञापालन, टीमवर्क, धाडस, प्रसंगावधान अशा गुणांची जोपासना व्हायला हे नक्कीच मदत करते.
हा उपाय वर वर चांगला वाटत असला तरी भयंकर अतिरेकी आहे. या उपायाने भारताचा इस्राएल व्हायला वेळ लागणार नाही.

In reply to by प्रियाली

लष्करी प्रशिक्षण म्हणजे लगेच मारामारीच झाली पाहिजे असे नव्हे. मी वर जे म्हटले ते सर्व गुण अंगी बाणले जाण्याची नितांत आवश्यकता भारतील समाजाला आहे आणि लष्करी प्रशिक्षणाने ते लवकर साध्य होऊ शकेल असे वाटते. इस्राएली समाजाची आणि भूभागाची निर्मिती आणि मानसिकता संपूर्ण वेगळी आहे त्यामुळे तुलना गैरलागू ठरले.

In reply to by चतुरंग

लष्करी प्रशिक्षण नेमके कोणाला देणार? ज्यांना खुलेआम बंदूका चालवायचे शिक्षण मिळत नाही त्यांच्यासाठी हे शासकीय कॅम्प खुले होण्याची शक्यता विसरली जाते आहे का? एकदा प्रशिक्षित झालेल्यांची फौज इतर कारणांसाठी, इतर मार्गाने वळवून युद्धखोर परिस्थिती निर्माण केली जाण्याची शक्यता विसरली जाते आहे का? तुलना गैरलागू आहे असे नक्कीच वाटत नाही. असो.

In reply to by प्रियाली

म्हणजे तुमच्या मते इस्राएल अतिरेकी देश आहे का?

In reply to by प्रदीप

इस्राएल अतिरेकी असला/ नसला तरी इस्राएलमधली बाकी परिस्थिती इथे आहे का? आज तुम्ही प्रशिक्षण द्याल ते कोणाला? एखाद्या विशिष्ट धर्मीयांना/ पंथियांना/ जातीयवाद्यांना हे शिक्षण देता येणार नाही असे करता येईल असे वाटत नाही. तेव्हा त्या कॅम्पमधून अतिरेकीही प्रशिक्षित होऊन निघणार नाहीत याची खात्री आहे का? इस्राएल हा सतत युद्धाच्या दहशतीत राहणारा देश आहे. कोवळी मुले खांद्यावर बंदूका लटकवून दिसू लागली तर त्यांचा फायदा गैरफायदा ते स्वतः आणि त्यांच्यामार्फत इतर घेणार नाहीत याची खात्री आहे का? विशेषतः आपल्या देशात तर हे होणे कठीण वाटत नाही. .

युद्ध कोणत्याही प्रश्नाचे उत्तर असु शकत नाही...पण तेच जर अघोषित युद्ध असेल तर ? मुळात देशात घडणार्‍या या घटना थांबवण्याची कोणाचीच इच्छा दिसत नाही.इच्छा शक्तीचा पूर्ण आभाव !!! मिळाला ना कसाब ? मग अजुन जिता का ठेवला आहे त्याला ? अमेरिकेने सद्दामला लटकवला होता, तेव्हा त्यांनी दिला होता का कोणाला "पुरावा" ? मग कसाबने असे कोणते पूण्य केले आहे जी त्याला इतका खर्च करुन आपण त्याला जिवंत ठेवले आहे ? इथे आपले नागरिक मात्र स्फोटात ताड ताड मरत आहेत... अजुन मॄत्युने मला कवटाळले नाही किंवा मला कायमचे अपंग केले नाही म्हणुन मी त्यातच आनंद मानायचा की असा दिवस माझ्या आयुष्यात येऊ नये म्हणुन परमेश्वराकडे त्राहीमाम त्राहीमाम करत दिवस कंठत राहिचे ? जे मरतात त्यांच्या जागी जरा क्षणभर स्वत:ला ठेवुन पहा ना... हो ते याच देशातले नागरिक आहेत.मग त्यांच्या जागी तुम्ही असता तर तुमच्या कुटुंबियाची काय स्थिती झाली असती ? विचार करायला भिती वाटते ना ? मग असं का होत आलय अत्ता पर्यंत ? उत्तर एकच :--- इच्छा शक्तीचा पूर्ण आभाव. ते असेच स्फोट करणार आणि आपण असेच पुरावे गोळा करत बसणार... ओबामा प्रशासनाने लादेनला कसे पाकिस्तानात जाउन मारले ? आहे का आपल्या देशात असली धमक ? उत्तर :--- नाही. कारण परत तेच... इच्छा शक्तीचा पूर्ण आभाव. काय प्रतिमा आहे आपल्या देशाची जगात ? भ्रष्टाचारी ? जगात सर्वात जास्त स्त्रीयांवर अत्याचार होणार्‍या देशांत आमचा क्रमांक ४था आहे अशी ? की षंढांचा देश अशी ? वारंवार होणारे हल्ले ही परिस्थीती बदलच नाही आपल्यासाठी, मग माझा देश महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे हे कोणत्या बळावर म्हंटले जाते ? स्वतःच्या देशातील लोकांच्या सुरक्षतेची जवाबदारी ही सरकारची असते,मग ती जवाबदारी पूर्ण होते ? होत असेल तर मग असे स्फोट घडुन लोक मरतात कसे ? दहशतवादी त्याचे निमित्त करून किंवा त्याचा वापर करून अनेक दहशतवादी उभे करतात. हे म्हणजे एका रावणाला ठार मारले तर दुसरा रावण निर्माण होउ नये म्हणुन रामाने त्याच्याशी युद्ध करु नये असे म्हणण्या सारखे आहे. तसेही आपण थोड्या थोड्या संख्येने मारलो जातोच आहोत ना ? मग जे आपल्याला मारत आहेत त्यांना मारुनच का मरु नये ?

नागरिकांनी सजग वगैरे राहणं, पोलिस्-नागरिक पार्टनरशिप हे सगळं म्हणायला ठिक आहे. पण जर पोलिसांनी अतिरेक्याला पकडून दिल्यावरसुध्दा काहीच होत नसेल तर काय डोंबल करणार. कसाब ला फाशी द्या, फाशी द्या म्हणतात पण म्हणे त्याच्या आधी फाशी सुनावलेले ९ लोक अजून रांगेत आहेत, मग डायरेक्ट याला कशी फाशी देणार. न्यायसंस्था अत्यंत अकार्यक्षम आहे. सध्या जवळजवळ अडीच लाख केसेस पेडिंग आहेत. सध्याच्या वेगानं जर न्यायसंस्थेनं काम केलं तर बॅकलॉग भरून काढायला ३०० वर्ष लागतील म्हणे. राहुल गांधी आज म्हणाले की ९९% अतिरेकी हल्ले सिक्युरिटी यंत्रणेनं वेळीच शोधून होउ दिलेले नाहीत. हे जर खरं असेल तर त्या मागच्या हस्तकांना पकडलं असेलच, काय झालं त्यांच? न्यायसंस्थेची कार्यक्षमता, अकौंटेबिलिटी इ.सर्व वाढायला हवी.

२००६ मध्ये लिहिलेले हे माझे मत आजही फारसे बदललेले नाही. दुवा (मी अजूनही कार्यालयात आहे आणि काही कारणाने लेख पेस्ट करता येत नसल्यामुळे दुवाच देत आहे.) क्लिंटन

In reply to by क्लिंटन

दुवा वाचला. बराच प्रॅक्टिकल लेख आहे. परंतु बहुतेक सार्‍या स्वयंघोषित युद्ध निष्णात सेनापतींना पुढील गोष्टी अमान्य असतील किंवा त्या काही फारशा महत्त्वाच्या नाहीत असे ते म्हणतील. १. पुरेशी स्ट्रॅटेजिक+मिलिटरी सुपिरिऑरिटी नाही. २. अमेरिकेची इराकमध्ये ससेहोलपट झाली ३. अमेरिकेने कारवाई करून देखील दहशतवाद काही संपला नाही. ९/११ नंतर (आणि अफगाणिस्तानवर कारवाई केल्यावर) अमेरिकेत दहशतवादी हल्ले झाले नाहीत ही गोष्ट खरी नाही. इस्राएलनेही अशा कारवाया करून दहशतवाद संपला नाही.

In reply to by नितिन थत्ते

नितीन, अमेरिका, इंग्लंड, स्पेन, रशिया, चीन. ऑस्ट्रेलिया आणि अगदी इंडोनेशियाही-- ह्या सर्व देशांत अतिरेकी प्रत्येकी केवळ एकच दुर्घटना मनसोक्त घडवून आणल्यावर सुखासमाधानाने आपापल्या घरोघरी गेले, कामे फते करून आल्यामुळे त्यांच्या सुवाशिनींनी दारातच त्यांच्या मीठमोहरीने ओवाळण्या केल्या, सगळे त्यांच्या मनासारखे आलबेल झाले,.. असे कुणीच भोळसटपणे कुठे म्हटलेले नाही. तुम्ही अमेरिकेत ९/११ नंतरही हल्ले झाल्याचे निदर्शीत करणारा दुवा दिला आहे, तो फसवा आहे. जरा माहिती नीट तपासून घेतलीत तर लक्षात येईल की ह्यातील अनेक घटनांतील परिणामकारकता अनेकपटींनी पहिल्या प्रसंगापेक्षा कमी झालेली आहे. अतिरेकी नवनवे मार्ग काढत रहाणार, त्याचा प्रोअ‍ॅक्टिव्ह प्रकारे मुकाबला कसा करता येईल. ह्याचा विकसित देश विचार करतात. सध्या अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा, अतिरेकी स्वतःच्या शरीरातच बाँब्स 'बसवून' आले, तर काय करता येते, ह्याचा विचार करीत आहे. इस्राएलमधे गेल्या दोन वर्षांत झालेल्या अतिरेकी कारवायांची माहिती इथे द्यावी,त्याच बरोबर गेल्या दहा वर्षांतील तेथील तत्सम घटनांतील बळी गेलेल्यांची आकडेवारीही. तुमच्या ह्या संदर्भातील बर्‍याच लिखाणातून डोकावणारा सिनीसिझम अस्वस्थ करणारा आहे. एकांगी माहिती घातक आहे, डोळस व शक्य तितल्या खुल्या डोक्याने माहिती तपासणे जरूरी आहे.

In reply to by प्रदीप

तुमच्या ह्या संदर्भातील बर्‍याच लिखाणातून डोकावणारा सिनीसिझम अस्वस्थ करणारा आहे. एकांगी माहिती घातक आहे, डोळस व शक्य तितल्या खुल्या डोक्याने माहिती तपासणे जरूरी आहे. दहशतवाद पूर्णपणे थांबवणे जवळजवळ अशक्य आहे परंतु त्याची परिणामकारकता कमी करणे, संख्या कमी करणे, जीवित-वित्तहानी कमी करणे असे उपाय योजले गेलेले आपल्याकडे दिसत नाहीत किंवा योजले गेलेले असले तरी त्याचा परिणाम झालेला दिसत नाही आणि तरीही "विकसित देशातही अजून घटना होतात, मग आमच्याकडेच झाल्यातर कुठे फारसे बिघडले" हा सूर खरोखरच अस्वस्थ करणारा आहे. ही झापडे डोळ्यांवरुन काढलीच पाहिजेत, सत्य स्वीकारल्याखेरीज उपाय सापडणार नाही! -रंगा

In reply to by चतुरंग

सहमत आहे - तुमच्या ह्या संदर्भातील बर्‍याच लिखाणातून डोकावणारा सिनीसिझम अस्वस्थ करणारा आहे. एकांगी माहिती घातक आहे, डोळस व शक्य तितल्या खुल्या डोक्याने माहिती तपासणे जरूरी आहे. त्यांचा उद्देश समजत नाही. त्यांना काय उपाय योजना अपेक्षित आहे ते कुठेही दिलेले नाही. निव्वळ कोणत्याही मुद्द्याला विरोध करून टिआरपी वाढवायचा हाच उद्देश असेल तर प्रश्न मिटला.

In reply to by निनाद

>>त्यांचा उद्देश समजत नाही. त्यांना काय उपाय योजना अपेक्षित आहे ते कुठेही दिलेले नाही. निव्वळ कोणत्याही मुद्द्याला विरोध करून टिआरपी वाढवायचा हाच उद्देश असेल तर प्रश्न मिटला. -- ही आम्हा काँग्रेसी लोकांची खास काँग्रेसी स्टाईल आहे. सत्ता मिळवणे, टिकवणे, राबवणे, या कौशल्याचे हे व्यवच्छेदक लक्षण म्हणा हवं तर... त्यात गैर काहि नाहि. (काँग्रेसी) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

>>-- ही आम्हा काँग्रेसी लोकांची खास काँग्रेसी स्टाईल आहे. सत्ता मिळवणे, टिकवणे, राबवणे, या कौशल्याचे हे व्यवच्छेदक लक्षण म्हणा हवं तर... त्यात गैर काहि नाहि कोंग्रेसी किंवा आमच्या पुणेरी मध्यवस्तीतले भंपक समाजवादी .... त्यांची पण हीच इश्टाईल हाये .... आपलं सर्व भागलेलं असलं की इतरांना भंपक समाजवादी तत्वज्ञानाचे डोस पाजत राहायचं. पण आपल्या नातवांची मुंज करून त्यांच्याबरोबर तीर्थाटन करायच्यावेळेला मात्र हळूच ते समाजवादी तत्वज्ञान विसरून जायचं. परत कोणी त्याबद्दल प्रश्नं केला की ह्यांचं छापील उत्तर तयार "हा आमच्या वैयक्तिक जीवनातला भाग आहे" ( हे उत्तर देण्यात भाजप वाले पण मागे नाहीत). पण हेच जेव्हा इतर सामान्य लोक करत असतात तेव्हा ह्यांना परोपदेशाचे झटके येत असतात. ह्यांना स्वतःला कोणतंच काम नीट्पणे करायला जमत नसतं, सगळ्याचा बट्ट्याबोळ करून टाकणे आणि काही चांगलं काम कोणी करत असेल तर त्यात खो घालणे आणि त्यांना सोयीस्कर बाजू तेवढी उघड करून लोकांचा बुद्धिभेद करणं हे मात्र ह्या भंपकांना चांगलं जमतं

In reply to by प्रदीप

जरा माहिती नीट तपासून घेतलीत तर लक्षात येईल की ह्यातील अनेक घटनांतील परिणामकारकता अनेकपटींनी पहिल्या प्रसंगापेक्षा कमी झालेली आहे. याला +१ http://mr.upakram.org/node/3376#comment-58682 येथे मी हेच सूचित करण्याचा प्रयत्न केला होता. पण अर्थातच प्रदीप यांनी ते अधिक चांगले म्हटलेले आहे. काळजीची कारणे आहेतः http://ibnlive.in.com/news/public-anger-over-mumbai-blasts-justified-cm/... पृथ्वीराज चव्हाणांची ही मुलाखत ऐकली तर काही गोष्टी दिसून येतात - मुख्य म्हणजे त्यांनी ही चूक आहे, लोकांचा राग जस्टिफाईड आहे हे मान्य केले आहे. इतरही बरेच काही म्हटले आहे - उदा. ब्लास्टनंतर पहिली १५ मिनिटे मुख्यमंत्री पोलिसांशी संपर्कात नव्हते. कम्युनिकेशन ब्रेकडाऊन झाले. इ. (हे तर खरेतर काळजीचे आहे, विशेषतः २६/११ नंतर, पण ते असो). पोलिसांना कसल्या परिस्थितीत कामे करावी लागतात याची थोडीफार कल्पना मला आहे. पण म्हणून त्यांच्यावर राग ठेवायचा नाही (विशेषत: सत्ताधारी वर्गावर) ही मला तोंड दाबून बुक्क्यांचा मार देण्याची पद्धत वाटते.

(अधिक सविस्तर आणि गंभिर उत्तर नंतर वेळ मिळाला की देईन...)

उपाय क्र. १ बहुधा आत्यंतिक निराशेपोटी सुचवला जातो. 'काँग्रेसला जहाल उतारा' अशा गर्जना करीत सत्तेवर आलेल्या पक्षाने अतिरेक्यांच्या संदर्भात ओढवून घेतलेली नामुष्की ह्यामागे असावी. पण शांतपणे विचार केल्यास एका बाजूस आपण व दुसर्‍या बाजूस अमेरिका, इस्राएल अथवा चीन ह्यांच्यात राजकीय व इतर अनेक अंगानी बराच फरक आहे, हे पाहता येते, मग हा विचार पोरकट वाटतो, तेव्हा तो सोडून देऊ. उपाय क्र २: ऋषिकेशने नितीन ह्यांच्या प्रतिसादावर उत्तर दिले आहे, त्याच्याशी बहुतांशी सहमत आहे. जर्रा जगाकडे पाहू... अतिरेक्यांशी चर्चा इतर देशात कोण व कुठे करते आहे, ह्याचे कुणी उदाहरण द्यावे!! अमेरिका. चीन. युरोपिय देश, रशिया, ऑस्ट्रेलिया.. वगैरेंचे सोडून देऊ, अगदी इंडोनेशियाही 'जेम्मा' शी कसल्याही वाटाघाटी करीत नाही! तेथील सरकार अत्यंत खंबीरपणे 'जेम्मा'शी मुकाबला करीत आहे, असे दिसून येते. नितीन ह्यांनी अशा चर्चांच्या संदर्भात पंजाब व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ब्रिट रणनितीची उदाहरणे दिली आहेत. मला वाटते ही दोन्ही आपापल्या कारणांनी गैरलागू आहेत. पंजाबातील अतिरेक्यांचा थयथयाट चर्चांनी थांबला नाही, तिथे त्यांना जेव्हा शस्त्रास शस्त्राने उत्तर मिळाले तेव्हा सरकारला विजय मिळाला. हे करतांना अर्थात स्थानिक जनतेची सहानुभूति सरकारने जिंकली होती, हे महत्वाचे आहे. कारण मला वाटते मुख्य फुटीर लढ्यास भारतातील शिखांना, विशेषतः पंजाबातील शिखांना, विशेष उत्साह नव्हता, जेव्हा सरकार ठाम, खर्‍या अर्थाने लढाऊ पाऊले उचलत आहे असे पंजाबातील जनतेच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी धैर्याने सरकारला मदत केली. भारतीय स्वातंत्र्यलढा वेगळ्या काळात लढला गेला, तेव्हा दहशतवाद इतका बोकाळला नव्हता. तसेच मुख्य म्हणजे त्या लढयातील एक प्रमुख घटक-- भारतीय काँग्रेस पक्ष-- अहिंसेने लढा उभारत होता. सध्याच्या जहाल दहशतवाद्यांशी-- मग ते अनेक पंथांचे असले तरी-- तेव्हाच्या लढ्याशी तुलना अप्रस्तुत होय. आणि अगदी चर्चा करायचीच असेल, तर सरकारने अतिरेक्यांशी प्रथम आपले वर्चस्व गाजवले पाहिजे, म्हणजे चर्चेत लीव्हरेज प्राप्त होईल. थोडक्यात पराभूत परिस्थितीत चर्चा करता कामा नये. आपण (म्हणजे आपली सरकारे) नेहमी पराभूत मनस्थितीत असल्यासारखी वाटतात. दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुंबईवरील हल्ल्यानंतर आपल्याला राजकीय पटलावर बरेच काही करता आले असते. तेव्हा त्या हल्य्यामागे कुठला देश आहे, ह्याविषयी जागतिक स्तरावर कसलाही संशय नव्हता, आपल्यास ती माही संधि उपलब्ध झाली होती. किमानपक्षी आपण त्यावेळी पाकिस्तानाशी राजनैतिक संबंध खालच्या पातळीवर नेणे रास्त होते, तसे आपण काहीच केले नाही. आपण केली ती निव्वळ खलितेबाजी. पाकिस्तानाने (बहुधा आपली राजकीय हिम्मत व्यवस्थित ओळखून) वेळ मारून नेली. आपल्या सर्वच मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. तरीही आपण संबध 'पूर्ववत' करण्याच्या प्रयत्नात आत गुंतलो आहोत. 'घालीन लोटांगण' चे जागतिक स्तरावरचे प्रयोग करणारे खेळ्ये म्हणून आपली ख्याति आपण अजून अधोरेखित करीत आहोत. उपाय क्र. ३: मला जे म्हणायचे होते तेच चतुरंगांनी त्यांच्या प्रतिसादात लिहीले आहे. मुख्य म्हणजे सरकारने स्वत:ची यंत्रणा अधिकाधिक सज्ज करावी, पोलिसांना अधिक सक्षम करावे, (अजूनही आपले सर्वच शिपाई केवळ लाठ्याकाठ्याच घेऊन गस्त घालत असतात काय?). शिस्तीमुळेच राष्ट्र मोठे होत नसते हे खरे, पण राष्ट्र मोठे होण्यात शिस्तीचा मोठा भाग असतो, आपल्याकडे सर्वच पातळीवर -- सरकारी व समाजातही-- ह्याचा बर्‍यापैकी अभाव आहे. सार्वजनिक ठिकांणी शिस्त अंगी बाणवणे अत्यंत जरूरीचे आहे, आणि ती शिस्त ("डोळ्यात तेल घालून" वगैरे) निव्वळ अशा घटना घडून गेल्याबर एक नी- जर्क रिअॅक्शन म्हणून नसावी, तर अगदी सदैव २४/७ सर्वत्र असावी,. अशी सध्याची निकड आहे. आणि ह्यात सगळ्यात समाजाचा सक्रिय सहभाग असावा. अमेरिका, इंग्लंड इत्यादि देशांनी अतिरेकींचा वेळीच अटकाव करण्यासाठी जरूर तिथे कायद्यात बदल करून, पोलिसी व तत्सम सुरक्षा- यंत्रणेशी संबंधित संस्थाच्या अधिकारात काही वाढी केल्या; अतिरेकी कारवायांच्या खटल्यांसाठी वेगळी कोर्टे निर्माण केली. ९/११ नंतर अमेरिकेत, लंडनमधील २००५ साली झालेल्या बाँब्सफोटांनंतर इंग्लंड येथे, स्पेन, जर्मनी, व इतर पष्चिम युरोपातील देशांत, तसेच गेली निदान दोनेक वर्षे तरी इस्राएलमधे कसल्याही अतिरेकी दुर्घटना घडलेल्या नाहीत, त्यातील काही घटना होता होता वाचल्या, त्या तेथील सरकारी यंत्रणेच्या परिणामकारक हालचालींमुळे तसेच जनतेच्याही जागरूकतेमुळे. ह्याविषयी बर्‍याच बातम्या आलेल्या आहेत, कुणास संशय असल्यास दुवे देता येतील. विकसित देशांत जे घडू शकते ते तितक्याच प्रमाणात आपल्याकडेही घडावे, असे वाटणे नैसर्गिक असले तरी वास्तवास धरून नाही. तेव्हा अशा छोट्या घटना होत राहतील, पण त्यांतून आपले सरकार व समाज काही शिकलो तरी ते पुरे आहे.

In reply to by प्रदीप

उपाय क्र. १ बहुधा आत्यंतिक निराशेपोटी सुचवला जातो. ...तेव्हा तो सोडून देऊ. अंशतः सहमत. तरी देखील संसद हल्यानंतर जसे सैन्य सीमेपाशी गोळा केले गेले तसे परत करायला (आणि या वेळेस अमेरीकेच्या दबावात न येता) पाक विरोधात कारवाई करायला काही हरकत नाही असे वाटते. मूळ चर्चाप्रस्तावातील - उपाय२: चर्चा हाच प्रश्न सोडवण्याचा एकमेव मार्ग आहे. सरकारने विविध घटकांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा. अर्थातच ऋषिकेशने म्हणल्याप्रमाणे चर्चा कसली करायची? पण त्यांच्यात फोडा-झोडा करता आले तर त्याचा अनधि़कृत पातळीवर उपयोग करावा. (अर्थात सरकारने ते प्रत्यक्ष करू नये असे वाटते.). पंजाबच्या अतिरेक्यांच्या संदर्भात प्रदीप यांनी म्हणल्याप्रमाणे शस्त्रास्त्रांनी तसेच भारताच्या बाजूच्या (खलीस्तानच्या विरोधातील) पंजाबी जनतेमुळे आणि त्यांच्या देखील हातात शस्त्रे दिल्याने, समित्या स्थापल्याने शक्य झाले. भारतीय स्वातंत्र्ययुद्धातील सशस्त्र क्रांतिकारकांना दहशतवाद्यांच्या पंगतीत केवळ अहींसेचे अतिरेकीच बसवू शकतात. क्रांतिकारकांनी सामान्यांनाच काय पण अगदी ब्रिटीश सरकारमधील देखील उठसुठ कुणालाही मारण्याचा उद्देश ठेवलेला नव्हता अथवा लंडन मध्ये वाटेल तसे चौकाचौकात बाँब फोडले नव्हते. असो. शिस्तीमुळेच राष्ट्र मोठे होत नसते हे खरे, पण राष्ट्र मोठे होण्यात शिस्तीचा मोठा भाग असतो, आपल्याकडे सर्वच पातळीवर -- सरकारी व समाजातही-- ह्याचा बर्‍यापैकी अभाव आहे. सहमत. ...त्या तेथील सरकारी यंत्रणेच्या परिणामकारक हालचालींमुळे तसेच जनतेच्याही जागरूकतेमुळे. अमेरीकेत ९/११ नंतर अतिरेकी हल्ले झाले पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत कारण सामान्य माणसांमुळे आणि त्यांच्या प्रसंगावधानामुळे. उ.दा. शू बाँबर, अंडरवेअर बाँबर अथवा टाईम्स स्क्वेअर मधील बाँब उडवण्याचा प्रयत्न... एक निरीक्षण काल बातम्या पहात असताना लक्षात आले. बाँब उडालेल्या जागी, पोलीस अधिक शोधण्यास हिंडत होते. त्यातील एकाच्याच अंगात बुलेटप्रूफ जॅकेट दिसले. इतरांच्या नाही. यात पण साहेबालाच फक्त मान इतरांच्या माना उडाल्या तरी हरकत नाही असा प्रकार आहे का?

In reply to by प्रदीप

प्रतिसाद पटला. आणखी एक. बाँबस्फोट झाले की, त्या आधी आणि नंतरही अनेकदा 'आपण आणि ते' अशी विभागणी दिसते. ठाण्यातून डोंबिवलीला ट्रेनने जातानाही ही विभागणी दिसते. ही विभागणी, दरी जेवढी कमी होईल तेवढा आपल्यालाच फायदा आहे. आतून जेवढा कमी पाठींबा तेवढी सुरक्षितता जास्त. शरीराची प्रतिकारशक्ती वाढेल तेवढी (शस्त्र या) औषधाची गरज कमी पडेल. जास्त शस्त्र, शिस्त आणि जास्त प्रमाणात पोलिस म्हणजेच्च सुरक्षेची हमी नव्हे.