मिशन काश्मीर - २ (श्रीनगर)
http://misalpav.com/node/17957 - मिशन काश्मीर - भाग १
*************************************************************
श्रीनगरचा विमानतळ तिरुपतीच्या बस स्टॅण्ड पेक्षा फारसा वेगळा नाही. तसाच गोंधळ तसाच अस्ताव्यस्तपणा. बाहेर पडल्यावर मागे लागणारे तसेच रिक्षावाले / टॅक्सीवाले. हा दोन फरक आहेत. तिरुपतीसारखी डुकरे दिसली नाहीत. तशी ते पुर्ण काश्मीर मध्ये कुठेच दिसली नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सामान गाडीच्या टपावर टाकण्याचे तिरुपतीला कोणी ३० रुपये घेत नाही. ते सुद्धा तुम्ही कुठलीही मदत मागितली नसताना स्वतः मदत करुन. म्हणजे स्वतः होउन तुमच्या हातातुन सामान काढुन घ्यायचे. ते तुम्हीच टॅक्सीपर्यंत नेलेले असते. ते फक्त टपावर चढवायचे आणि मग खुषी मागायची. १० रुपयात कोणी खुष होतच नाही मग तुम्ही अजुन १० रुपये टेकवता तरी खुषी झालेली नसते. मग अजुन १० रुपये. तरी खुष नाही. मग तुम्ही नाद सोडुन देता. अजुन जास्त पैसे दिले असते तर त्या किमतीत एक बॅगच विकत घेता आली असती.
अखेर एकदाचे श्रीनगर शहराकडे जाण्यासाठी निघालो. आम्ही १ मे ला गेलो होतो. त्या दिवशी श्रीनगर मध्ये चोर येतात असे आमचा टॅक्सी ड्रायवर म्हणाला. चोर म्हणजे आमदार / मंत्री गण. काश्मीरी लोकांच्या मते काश्मीर मध्ये ३ प्रकारचे चोर आहेत. काश्मिरी पोलिस. हे सगळ्यात साधे चोर कारण ते काश्मीरचे असतात. मग कश्मीर राजकारणी कारण ते हिंदुस्तानच्या इशार्यावर चालतात आणि सगळ्यात मोठे चोर मिलिटरीवाले कारण ते आम भोळ्या भाबड्या काश्मिरी जनतेवर अत्याचार करतात. तर आम्ही गेलो त्या दिवसापासुन या मधल्या फळीतल्या चोरांच्या कचेर्या श्रीनगरला हलणार होत्या. ६ थंडीचे महिने जम्मु काश्मीरची राजधानी जम्मु ला असते आणि ६ महिने उन्हाळ्यात श्रीनगरला. तसा काश्मीरला उन्हाळा नसतोच. तिथे थंडी असते आणि खुप थंडी असते. उन्हाळा नसतो. उन्हाळा फक्त जम्मुला. जम्मु म्हणजे काश्मीर नव्हे हा नविन शोध सुद्धा श्रीनगर मधलाच. हे म्हणजे विदर्भ/ मराठवाडा म्हणजे महाराष्ट्र नाही असे म्हटल्यासारखे वाटेल. पण काश्मीरी माणसाच्या मते हे असेच आहे. काश्मिरी माणसांची अशी बरीच मते असतात जी आपल्याला विचित्र वाटतात पण ती विचित्र आहेत असे म्हणायचे नाही हे दुसरे सुत्र. काश्मिरी माणसाचा आणि दहशतवादाचा काही संबंध नाही हे मनात सारखे घोळवत राहायचे हे तिसरे सुत्र. कश्मिरी जनतेवर सगळ्यात मोठे चोर खुप अत्याचार करत असतात असा समज करुन घेणे हे चौथे सुत्र आणि आपण हिंदुस्तानी आणि ते काश्मिरी हे समजुन घेणे हे पाचवे सुत्र. ही पंचसुत्री लक्षात ठेवली की तुम्हा काश्मिर मध्ये निवांत फिरु शकता. काही त्रास नाही. कारण तुम्ही ही पंचसुत्री लक्षात ठेवलीत तर दहशतवादी 'हिंदुस्तानी पर्यटकांना' काहीही त्रास देत नाहीत.
बॅक टु श्रीनगर. मधल्या फळीतले चोर येत असल्यामुळे मुख्य रस्ते बंद होते त्यामुळे आमच्या गाडीवानाने आम्हाला कच्च्या रस्त्यावरुन नेले. आम्ही जीव मुठीत धरुन बसलो होतो. हा नक्की हाउस बोटीत नेतोय की आपल्याला दहशतवाद्यांच्या हवाली करतोय या भितीने. पण गडी खासा बोलका होता. जाताना रस्त्याने चिनार - देवदाराची झाडी दाखवत होता. काश्मिरचे डुज आणि डोण्ट्स आम्हाला समजावुन सांगत होता. काश्मिरी लोक कसे अमनप्रेमी आहेत हे आम्हाला समजावुन सांगत होता. मध्येच एकदा त्याने आतंकवादी बघायचे का म्हणुन विचारले? आम्ही हो म्हणावे की नाही या संभ्रमात पडलो . आधीच हा आपल्याला आडबाजुने अतिरेक्यांकडे नेतो आहे ही भिती होती. आता तर उघडउघड विचारत होता. आम्ही शांत बसणे पसंत केले. अखेर त्यालाच राहवेना. त्याने आपणहुन रस्त्याच्या कडेने एके ४७ घेउन उभे असलेले २ दहशतवादी दाखवले. दोघे मिलीटरीवाले होते. मिलीटरीवालेच खरे दहशतवादी हे आम्हाला पहिल्याच दिवशी मिळालेले ग्यान. त्यानंतर मिलीटरीने काश्मीरची कशी वाट लावली आहे याबद्दल ५ मिनिटांचे एक आख्यान झाले. ही काश्मीरची एकुणच खासियत. कुठलाही काश्मिरी ड्रायवर दोन गोष्टी नक्की विचारणार / ऐकवणार. पहिला प्रश्न विचारणार की काश्मिर आवडले का? आणि दुसरे भाषण देणार की काश्मीर कसे सेफ आहे, 'हिंदुस्तानी मिडीया' कसा अपप्रचार करते, कश्मिरी माणूस कसा अमनप्रेमी आहे वगैरे. इथे आपण हे फक्त ऐकुन घेणे अपेक्षित असते. यावर प्रश्न विचारणे किंवा प्रत्युत्तर देणे अपेक्षित नाही हे समजुन घ्यावे. हा अनुभव नंतर वेळोवेळी आला. एरवी काही त्रास नाही.
बाकी कश्मिरी माणसाची भाषा समजणे हे आपल्या आवाक्याबाहेरचे काम असते. तसे आपल्याला तमिळ, तेलुग, तुळु पण समजत नाही. पण तमिळ, तेलुग, तुळु ऐकताना ही भाषा ओळखीची आहे असेही वाटत नसते. काश्मिरी ऐकताना तसे वाटत राहते. म्हणजे फक्त वाटत राहते. समजत काहीच नाही. कारण काश्मिरी माणसाची भाषा हल्दीरामच्या नवरतन फरसाणासारखी असते. त्यात कश्मिरी , डोगरी, अरबी, पश्तुन, फारसी, हिंदी, उर्दु, पंजाबी अश्या अनेक भाषांचे मिक्स्चर असते आणि त्याला कश्मिरी माणसाच्या अजब हेलाची फोडणी असते. काही कळलेच तर तो केवळ योगायोग समजावा. या भाषांव्यतिरिक्त काही कश्मिरी दुकानदार इंग्रजांपेक्षा फाडफाड शुद्ध इंग्रजी बोलतात. आणि या सगळ्या फरसाणाबरोबर तोंडी लावण्यासाठी तुम्ही कधीमधी मराठी आणि गुजराथी शब्दही ऐकु शकता खासकौन मराठी. कश्मीरला भेट देणारे ७०% पर्यटक महाराष्ट्रीयन असतात. त्यामुळे कश्मिरी लोकांनी "थांबा, स्वस्त आहे, कमी नाही, इकडे या, तिकडे नको, छान आहे" वगैरे शब्द शिकुन घेतले आहेत.
कश्मीर मध्ये मधली ४-५ वर्षे फार वाइट गेली. दहशवादाने पर्यटनाची पार वाट लावली. ३७० मुळे बाहेरचे उद्योगधंदे असण्याची शक्यता मावळली आणि दहशतवादामुळे ते धाडस असेही कोण करणार. त्यामुळे पुर्णपणे पर्यटनाधिष्ठीत काश्मिरी इकोनोमी पार कोलमडली. अखेर पर्यटकांवरचे हल्ले थांबले. त्यानंतर राजा राणी ट्रॅव्हल्सच्या राजा पाटलांनी कश्मीर टुर्स आयोजित करायला सुरुवात केली. तेव्हा पर्यटकांच्या गाडीच्या मागे पुढे मिलीटरीच्या गाड्या असायच्या. त्याच सुमारास माझे आज्जी आजोबा अमरनाथच्या यात्रेला गेले होते. दरड कोसळल्यामुळे ते रस्त्यातच अडकले. त्यावेळेस मिलीटरीनेच तंबु ठोकुन त्यांची राहण्याची व्यवस्था करुन दिली. रात्री मध्येच कधीही धडामधूड आवाज यायचे. लोक घाबरुन बाहेर आले की सोल्जर्स शांतपणे त्यांना सांगायचे. चिंता मत करो. कुछ खास नही छोटाही बम था. हम है ना. आप टेंशन मत लो. त्यावेळेस त्या लोकांना खरेखुरे आतंकवादीही दिसले होते. शांतपणे चहा पिउन, एके ४७ लपवत निघुन गेले होते. आता परिस्थिती तशी नाही आहे. आम्ही असताना ७ दिवसात एकही टेररिस्ट अॅक्टिव्हिटी झाली नाही. कुठे बंदुकीच्या फैरी झडल्या नाहीत कुठे बॉम्ब फुटले नाहीत. एकही खराखुरा आतंकवादी दिसला नाही (काश्मिरी ज्यांना आतंकवादी म्हणतात ते मात्र रस्त्यरस्त्यावर होते.)
दहशतवादाने एकेकाळी होरपळलेला काश्मिर आतामात्र थंड झाला आहे. अर्थात तिथल्या हवामानाइतका नाही. श्रीनगर मध्ये हवामान एकदम सुखकारक होते. हाउस बोटीत तर आसपास पाणी असल्यामुळे अजुनच थंड वाटते. हा हाउस बोट एक भन्नाट प्रकार असतो. २५ किमी मध्ये पसरलेल्या दल लेक मध्ये साधारण १२०० हाउसबोटी आहेत आणि जवळच्याच नगिना लेक मध्ये साधारण ८००. दोन्ही मिळुन श्रीनगर मध्ये २००० हाउस बोटी झाल्या. पटत नाही? हे बघा:
हाउसबोटीची अंतर्गत सजावट दृष्ट लागावी इतकी सुंदर असते. मोठी मोठी झुंबरं, उंची गालिचे, भारी लाकडी फर्निचर आपल्याला एकदम राजेशाही वातावरणाची अनुभूती देते.
एक साधारण हाउसबोट बांधण्यासाठी १-२ वर्षे लागतात आणि फार नाही पण साधारण १ खोका खर्ची पडतो. आतल्या सजावटीचा आणि मेंटेनन्सचा खर्च वेगळा. एका हाउसबोट मध्ये २ ते ५ शयनगृहे, छोटेसे स्वयंपाकघर, डायनिंग हॉल आणि दिवाणखाना असतो. पाण्यात उभ्या असणार्या हा महालांच्या आतमध्ये मात्र पाणी वापरायला सक्त मनाई असते. लाकूड खराब होउ नये म्हणुन. त्यामुळे कपडे धुवायचे नाहीत, आंघोळ करायची तर बाथ टब मध्ये बसुन, धुवायचे असेल तर...... जाऊ देत ते तुम्ही तिथे जाल तेव्हा तुम्हाला कळेलच. शिवाय फर्निशिंगला बरेच दिवस पाणी लागत नाही. बाहेर जायचे असेल तर शिकार्यात बसा आणि बाहेर पडा. काश्मिरी माणसासाठी हे सगळे खुपच सोप्पे आहे. तिथे लहान लहान मुले पाठीवर द्प्तर घेउन होडी वल्हवत किनार्यावर पोचुन शाळेत जाताना दिसली. आपल्याला ते शक्य नाही. त्यामुळे पाण्यावरच्या महालात आपण १-२ दिवसांपेक्षा जास्त राहु शकत नाही. एरवी ही हाउसबोटींची इकोनोमी मोठी आहे. पाण्यावर तिकडे आख्खा बाजार तरंगतो. संध्याकाळी शिकार्यावर बसवुन एखादा शिकारेवाला तुम्हाला दल लेकची सफर घडवुन आणेल तर दुसर्या दिवशी तोच शिकारेवाला सकाळी होडीतुन तुम्हाला ताजी ताजी फुले आणि बिया विकताना दिसेलः
दल लेक मधला गाळ उपसुन त्याचाच खत म्हणुन वापर करुन त्यावर फुलं आणि भाज्या पिकवुन त्या पण विकताना दिसेलः
माझी खुप इच्छा होती की काश्मीर की कली सारखी एखादी शर्मिला गालावर गोड खळ्या पाडत आपल्याला फुले विकायला येइल, मग मी तिच्याकडुन सगळीच्या सगळी फुले विकत घेइन. मग ती दुसर्या दिवशी परत येइल. पण मी शम्मी कपूर नसल्यामु़ळे, माझ्या मालकीच कश्मीरमध्ये हाउसबोट किंवा बंगलाच काय साधा शिकाराही नसल्यामुळे आणि आख्ख्या शिकार्यामधली फुले घेण्याची माझी ऐपत नसल्यामुळे मला फुले विकणारे केवळ बाप्येच दिसले.
बाकी या दल लेकच्या तरंगत्या बाजारात तुम्हाला पुण्याच्या लक्ष्मी रोडवर मिळणारी हर एक वस्तु मिळु शकेल. किराणा दुकानापासुन, गालिचे आणि शालींपर्यंत सगळे मिळेल. सुकामेव्यापासुन काहवा पर्यंत सगळे मिळेल. न्हाव्यापासुन गॅस सिलेंडरपर्यंत सगळे मिळेल. तुम्हीच बघा म्हणजे झाले:
बाकी हे दल लेक हे सुद्धा एक अजब रसायन आहे. याच्या पाण्याचे स्त्रोतही अनेक आहेत. अंतर्गत झर्यांचे पाणी आहे तसेच झेलमचे पाणीही आहे. पावसाने वाढ होते तशी मुघल गार्डन्स मधले वाहते झरे सुद्धा येथे येउन मिळतात. एकेकाळी हे तळे प्रदुषणमुक्त होते. आज वाढत्या लोकसंख्येमुळे आणि प्रदुषणामुळे दल लेकचे पाणी आपण तोंड धुण्यासाठी किंवा चुळा भरण्यासाठी पण नाही वापरु शकत. दल लेक जगातल्या सर्वात मोठ्या नैसर्गिक तळ्यांपैकी एक आहे. अर्थात याहुन मोठी बरीच तळी आहेत. आपण भुगोलाच्या पुस्तकात वाचले आहे ते. पण तरीही २५ किमीचा परिसर एका तळ्यासाठी अवाढव्यच म्हणायचा. १२ व्या शतकात तर हे तळे ७५ किमीमध्ये पसरले होते म्हणतात. आजही या तळ्यावर लाखाहुन जास्त लोकांची गुजराण होते. आपल्याकडे जशी जमिनीची मालकी आहे तशी कश्मिरी माणसाची दल लेकवरच्या पाण्यावर मालकी आहे. तो त्या पाण्याचा मालक. तिथे त्याने त्याचा शिकारा बांधावा अथवा हाउसबोट. दल लेक मधल्या हाउसबोटीवर बसुन सकाळच्या उगवत्या सुर्याला वंदन करणे आणि सायंकाळच्या मावळत्या सुर्याला टाटा करणे हे दोन्ही सुखावह आहे हे नक्की.
चला आज जरा जास्तच लिखाण झाले. आता मिशन कश्मीर - भाग ३ - श्रीनगर अगेन अजुन १-२ दिवसात.
*************************************************************
http://misalpav.com/node/17957 - मिशन काश्मीर - भाग १
Book traversal links for मिशन काश्मीर - २ (श्रीनगर)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वाह खुप सुंदर लेखन प्रत्येक
आहा
छान
छान लेखमाला....
आता परिस्थिती बदलली आहे असे
सुप्पर
छानच लेखन आणि फोटू! माझं धाडस
हाउस बोट बांधायचा खर्च जरा
मस्त
शब्दचित्रे आवडली. ते बाजाराचे
आणि मुख्य म्हणजे पुढच्या
मदिरा
>>>>>तिथे मदिरेवर बंदी आहे.
मी शोधक नजरेने बघितले असता
लेख आवडला
गेल्या वर्षी
मस्तच!! फोटोही सुंदर आहेत.
छान मस्तच!
मस्त रे, आमच्या ९९ च्या आठवणी
काश्मीरच्या वर्णनाने मला खरच
वा..
नाव वाचुन थोडा कचरतच धागा
नाव वाचुन थोडा कचरतच धागा
जवळपास कोणत्याच
हाहाहाहा. माहिती आहे रे.
लिखाण आणि फोटो आवडले..वाचतोय
छान लेख...फोटो पण
त्यांच्या आय*****
मस्त!!!!!!!!!!
धन्यवाद
सुरेख लिहिलं आहे! मस्त!
सुरेख...
मिशन काश्मीरची ही पुर्ण