पाऊस माझा
प्रत्येकाचं पावसाशी स्वतःचं असं एक नातं असतंच शिवाय ते वेगवेगळ्यावेळी वेगवेगळंही असतं. माझं पावसाशी असलेलं नातं सांगण्याचा हा प्रयत्न.
आजीचा जणू देवघरात
मंत्रपाठसे मंद सुरात
ईशस्तवने मंगल गात
कधी जागवी सुप्रभात
पाऊस माझा पाऊस माझा ||१||
रानावनात घुमवी पावा
हवेत धुंद गंध शिडकावा
लपाछपीचा डाव नवा
भटकंतीला साथी हवा
पाऊस माझा पाऊस माझा ||२||
तृषार्त तप्त रसा दुपारी
जल वर्षता होय गोजिरी
इंद्रधनूचा वेल अंबरी
फुलवी खुलवी प्रीत अंतरी
पाऊस माझा पाऊस माझा ||३||
कधी तरी अन् कातरवेळी
डोह मनाचा निर्मम घुसळी
गतकाळाच्या आठवणींनी
भरतो डोळा माझ्या पाणी
पाऊस माझा पाऊस माझा ||४||
प्रभू चरणी एक मागणी
सरणावरती देता अग्नी
धूर निरंजन मेघ व्हावा
आणि भूवर या बरसावा
पाऊस माझा पाऊस माझा ||५||
वर्गीकरण
अतिसुंदर रचना.
उन्हाळयात पावसाचा गारवा दिला
नगरीनिरंजन - रानावनात घुमवी
खासचं
चिंब!
क्लास!! जियो!!
मस्त
एक औंस ग्रेस +एक औंस महानोर
कधी तरी अन् कातरवेळी डोह
सुरेखच!
अप्रतिम
मनःपूर्वक धन्यवाद!
परत एकदा व्वाह ! निरंजन