बर्मा फ्रंटवरून........
मित्रहो,
माझ्या मराठालाईट इन्फंट्रीच्या आभ्यासादरम्यान हे एका सैनिकाने त्याच्या प्रेयसीला लिहीलेले पत्र सापडले. त्याचे भाषांतर केले आहे. सैनिकांची मनस्थिती यात बरीच समजून येते. हे पत्र बर्माहून लिहीले आहे.
प्रियतमे,
पंख असते तर तू उडत येथे आली असतीस असे सारखे म्हणतेस, पण खरंच तुला येथे यायला आवडेल का ? तुला आवडेल की नाही हे मला माहीत नाही पण तू येथे आलेले मला आवडणार नाही हे निश्चित. येथे येण्यात धोके आहेत, नाही असे नाही, पण याही पलीकडे काही कारणे आहेत. धोके तर आमच्या आयुष्याचे अविभाज्य घटक आहेत. अतिपरिचय हे द्वेषाचे मुळ असते असे म्हणतात, त्यामुळे आम्हीही धोक्यांचा द्वेष करतो.
तू येथे का येऊ नयेस त्याची कारणे सांगतो. पटल तर बघ.
तुमच्या तिकडे बर्याच जणांना युध्द म्हणजे काय हे माहीत आहे असे वाटते. पण खरेच तसे आहे का ? आणि ते कसे शक्य आहे ? इतक्या दुरुन ते त्यांना कसे समजणार ? कदाचित माझे चुकत असेल पण मला पडलेला हा प्रश्न प्रामाणिक आहे. त्यांना येथे यायला लागावे अशी माझी मुळीच इच्छा नाही. तसा गैरसमजही करुन घेऊ नकोस. ते येथे नसल्यामुळे मला त्यांचा हेवा वाटतोय, किंवा द्वेषबुध्दीने मी हे लिहितोय असेही नाही. खरे तर, जेव्हा स्वर्गातून बॉंबचा वर्षाव होतो, डोळ्यासमोर होणारे मृत्यू आणि विध्वंस निराशेचा खरा अर्थ समजवतात अशा वातावरणात त्यांना येथे यायला लागू नये अशी मी देवापाशी प्रार्थना करतोय. पण त्यांना युध्द म्हणजे काय हे माहीत नाही हे सत्य नाकारण्यात काय अर्थ आहे ? युध्दाचा खरा अर्थ तुम्हाला आमच्याप्रमाणे येथे राहिलात तरच कळू शकेल. तुम्हाला एका छोट्या पण पाण्याने भरलेल्या खंदकात अनेक दिवस अन्नावाचून काढावे लागतील. साप व मलेरियाची भिती कायम तुमच्या मनात असेल. शत्रूपेक्षाही तुम्ही याला जास्त घाबराल. कारण याने तुम्ही थोडे थोडे मरता आणि ते तुम्हाला कळत असते. अशा वेळी कळते की धोके किंवा माणसे ही आपली शत्रू नसून भिती हीच आपली खरी शत्रू आहे.
अशा खंदकात रात्री या जमिनीतल्या भोकात हातपाय हलवण्याचीही भिती वाटते. थोडाजरी आवाज झालातरी शत्रूच्या गोळीला आमंत्रण दिल्यासारखे आहे. एवढेच नाही अशा वेळी मित्रांच्या गोळीलाही आपण बळी पडू शकतो. आघाडीवर जेव्हा काळोख पसरतो तेव्हा कुठलीही हालचाल करायचे धाडस करायचे नसते. अंधार पडला की असाल तेथेच निपचीत पडून रहायचे आणि पुढच्या उजेडाची वाट बघायची एवढेच आपल्या हातात असते. कोणीही कुठल्याही कारणासाठी हालचाल करत नाही. खरंच सांगतोय, कुठल्याही कारणासाठी.
इथे आलीस तर तुला गार अन्न खायला लागेल. बीन्स, मांस, भाजी हेच रोजचे जेवण असेल. आम्ही त्याचा क्रम बदलून स्वत:चीच फसवणूक करुन घेत असतो. आम्हाला नुकतेच कळले आहे की आता अन्नात थोडा बदल केला जाणार आहे पण आमच्या पर्यंत तो पोहोचणार की नाही हे माहीत नाही. बहुतेक नाहीच.
असे म्हणतात की बदल हे तुमचे आयुष्य चवदार बनवते. ते खरे असेल तर आमच्या आयुष्यातील चव केव्हाच निघून गेली आहे. युध्दभुमीची चव घ्यायला तुम्हाला येथे यायला पाहिजे.
सकाळी डोंगरावर क्षितिजापलिकडे जाणारी विमाने बघायला लागतील. या विमानातले तरूण वैमानिक आपल्या कामगिरीवर, (का मृत्यूला भेटायला) जाताना ती विमाने मोजायला लागतील. एकदा ती मोजलीत की संध्याकाळी त्यातली किती परत आली हे ही तुम्ही मोजायला लागाल. बारा गेली, पाच आली असा हिशेब तुम्हीही करायला लागाल. संध्याकाळी क्षितिजाकडे नजर लाऊन तुम्ही हाच विचार करता, जे आले नाही ते कसे मेले असतील? का जपान्य़ांच्या हातात सापडले असतील ? त्यांना चांगली वागणूक मिळत असेल का? जमिनीवर ते कसे तग धरतील ? खरे काय घडले ते तुम्हाला कधीच कळत नाही. आणि जे जिवंत असतील तर त्यांना त्यांच्या मृत्यूचा अहवाल कसा वाटत असेल ?
तुम्ही सिनेमामधे बघता तसे युध्दभूमीवर सैनिक मरतात का ? मला नाही वाटत. ओठांवर हसू आणि डोळ्यात कर्तव्य बजावल्याची चमक असे कोणी मरत नाही. रणांगणावरचा मृत्यू हा नेहमीच अत्यंत क्लेषकारक आणि हताश असतो. तुम्हाला तेव्हा समजत असते की हाच तो क्षण. जखमी सैनिकांची परत येणारी रांग तुम्ही पाहिली पाहिजे. वेदनेने रडणारे, किंचाळणारे सैनिक हिरोसारखे दिसत नाहीत. त्यांच्या चेहर्यावर मृत्यू माझे काही वाकडे करू शकत नाही असा भाव मुळीच नसतो. ते साधेसुधे अमेरिकन किंवा भारतीय सैनिक असतात. याहून भयंकर म्हणजे एखाद्या सैनिकाच्या डोळ्यातून प्राणज्योत निघून जाते तो क्षण बघायला लागणे. तगडे तरूण सैनिक भयाने थरथर कापताना व रात्री किंचाळून उठलेले बघताना आपलाच थरकाप उडतो. या कणखर माणसांना आपले आयुष्य या पुढे सर्वसाधारण माणसारखे जगता येणार नाही याची कल्पना असते का? त्यांचे आयुष्य खरे तर संपल्यातच जमा आहे. काही सैनिक तर येथे इतके दिवस आहेत की त्यांना घरी गेले काय आणि नाही गेले काय याचा कसलाच फरक पडत नाही. जेव्हा वचानांमागून वचने तोडली जातात तेव्हाच तुमची मनस्थिती अशी होऊ शकते.
युध्दावरची जगातली सगळी पुस्तके किंवा युध्दचित्रपट युध्दभूमीवर काय चालते यावर खराखूरा प्रकाश टाकू शकत नाही. ही पुस्तके तुम्हाला आतडी पिळवटून टाकणार्या भुकेचा अनुभव नाही देऊ शकत. किंवा अनेक दिवस न झोपल्यामुळे वेड लागायची पाळी येते त्याचाही अनुभव नाही देऊ शकत. ओल्याचिंब कपड्यात थंडीत काकडत रायफल कशी पकडायची याचा अनुभव नाही देऊ शकत. या पेक्षाही महत्वाचे म्हणजे भयंकर एकटेपणाचा अनुभव, ते कसा देऊ शकतील ? तुम्ही, आम्ही घरी परतल्यावरची गोड स्वप्ने रंगवत असता पण आम्हाला खरे काय ते माहीत आहे. तिकडे काहीही बदललेले नाही. लोकांना असे वाटते की त्यांना युध्दभूमीवर काय चालते याची पूर्ण कल्पना आहे. त्यांची माहीती ही त्यांच्या मनाचे खेळ आहेत. मला माहीती आहे की माझे शरीर हे या युध्दाने पोखरलेले आहे आणि भिती माझ्या ह्रदयात खोलवर घर करून बसली आहे. मी जेव्हा तिकडे होतो तेव्हा युध्द माझ्यापासून दूर होते आणि मला त्या बद्दल पुस्तकात आणि चित्रपटातून माहीती मिळत होती. पण मला आता ते खरेखूरे कसे असते हे कळले आहे. हे शब्दात आणि कॅमेर्यात पकडता येत नाही त्याचा अनुभवच घ्यावा लागतो.
पण तुला काही चांगल्या गोष्टीही मला सांगितल्या पाहिजेत. संध्याकाळी दिवस मावळायच्या वेळी सैनिक गाणी म्हणतात. आरत्यासुध्दा म्हणतात ज्या मला आजिबात आवडायच्या नाहीत. पण आता त्या ऐकतांना मला बरे वाटते हे खरे आहे. त्या ऐकताना मला घराची, देवळांची, फुलांची आठवण येते. संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी असणारी शांतता मनाला एक प्रकारची हवीहवीशी वाटणारी हुरहुर लावून जाते आणि गत आयुष्यातील सर्व चांगल्या आठवणी मनात गर्दी करतात. त्या गाण्यांमुळे मी माणसात परततो.
तू येथे आलीस तर येथील सुर्यास्त तुला खूपच आवडेल. त्यावेळी ढगातून डोकावणार्या, न संपणार्या डोंगराच्या निळसर रांगाही तुला आवडतील. नजर पोहोचेल तेथपर्यंत हे डोंगर धुक्यात वेढलेले तुला दिसतील. येथील सरळसोट, आकाशाशी स्पर्धा करणारे वृक्ष तुला भारावून टाकतील. जमिनीवर मऊ पानांचा गालिचा तुला चालण्याचे आमंत्रण देईल तर पहाटे दरीतून वरती येणार ढग तुला आपल्या कवेत घेतील. जेथे कोणीही पाऊल टाकलेले नाही अशा जागी पाय ठेवण्यातला अनामिक आनंद तुला येथेच उपभोगायला मिळेल.
मला आता थोडा वेळ आहे आणि स्वप्नच बघायची असतील तर ती चांगल्या गोष्टींचीच बघितलेली बरी.
मला जिवंत रहायचे असेल तर ती स्वप्न बघायलाच पाहिजेत.
तुझाच,
ऑस्कर
जयंत कुलकर्णी.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अप्रतिम पत्र
युद्धभुमी कशी असते त्याची
भयंकर आहे
पत्र भयानक आहे..
+१
++ १
+१
+१
सामान्य सैनिकाचे असामान्य
खूप सुंदर आहे. आपले विशेष
खरय
+१ अगदि खर.... तरिहि म्हणेन,
एका अतिशय सुंदर पत्राचा
पत्राचा अनुवाद केल्याबद्दल
अनुवाद मन हेलावुन गेला !
+१.. खुप छान अनुवाद
उत्तम
कल्पना नव्हती
पत्र वाचले. अनुवाद करून इथे
श्री. जयंत कुलकर्णी, काय
उत्तम
चांगला विषय
बर्माफ्रंटवर लिहाकि मग अजून.
भावले...
हा धागा वर काढल्याबद्दल
हा धागा वाचायचा राहिला
निशब्द
कशाला जूने उकरून काढताय ?
आम्हाला
भयंकर!!! केवळ सत्ताधीशांच्या
सामान्य सैनिकाचे असामान्य
जयहिंद