Skip to main content

विनील, नक्षलवादा विषयी महत्त्वाचे

लेखक आळश्यांचा राजा यांनी सोमवार, 21/02/2011 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
केवळ लक्ष वेधण्यासाठी नवीन धागा आहे. हेच मी श्रामोंच्या धाग्यावरील प्रतिसादात दिलेले आहे. http://www.youtube.com/watch?v=_11_ufkDP4o इथे मलकनगिरीतील आदिवासी स्वयंस्फूर्तीने विनीलला नक्षल्यांच्या तावडीतून सोडवण्याचा निर्धार करीत असलेले दिसेल.हा त्याच कट ऑफ भागातील व्हिडीओ आहे. मध्यमवयीन आदिवासी स्त्री तीस वर्षांच्या विनीलचा उल्लेख "मोर बापा" - माझा बाप असा करतेय. बघा. जो जनतेचे रक्षण करतो पोषण करतो धारण करतो तोच पिता साक्षात मानावा जन्म देतो निमित्त केवळ हे त्या बाईने कुठे वाचलेले नाही. तरीही तिला हे वाटले. विनीलविषयी. लक्षवेधी असल्याने हा धागा थोड्या वाचनांनंतर उडवला किंवा वाचनमात्र केला तरी चालेल. चर्चा श्रामोंच्याच धाग्यावर चालली तर उत्तम आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 27699
प्रतिक्रिया 97

प्रतिक्रिया

In reply to by नितिन थत्ते

त्यांना नक्षलवादी म्हणणे बंद करायला हवे. म्हणजे विनिल यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले असे न म्हणता डाकूंनी किंवा दरोडेखोरांनी अपहरण केले असे म्हणायला हवे. भुरटे चोर म्हणले तर जास्त योग्य ठरेल का?

In reply to by नितिन थत्ते

त्यांना नक्षलवादी म्हणणे बंद करायला हवे. म्हणजे विनिल यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले असे न म्हणता डाकूंनी किंवा दरोडेखोरांनी अपहरण केले असे म्हणायला हवे. या सगळ्याबरोबर "पडेल तत्त्वज्ञानाच्या" मागे लोक का जातात वगैरे प्रश्न पडणे पण बंद होईल.
श्री थत्ते यांनी हे उपरोधाने म्हटले असावे असा दाट संशय आहे. खुलासा केल्यास बरे होईल. चर्चेसाठी. (उपरोधाची नोंद घेतली जात नसेल तर मजा नाही!)

In reply to by प्रसन्न केसकर

शोषित जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल असलेले प्रेम व आदरभाव हे त्यांचे एकमेव संरक्षक कवच असेल. या सर्व घडामोडींपासुन दुर अंतरावर सुरक्षित असलेल्या आपण आपला वैचारिक पाठिंबा अश्या लोकांना देणे हे देखील त्यामुळेच महत्वाचे आहे.
हे नेमके आहे. बाकी भागाबद्दल किंचित असहमती आहे. म्हणजे, नक्षलवाद नावाचे तत्त्वज्ञान नाही हे पटत नाही. अजून लिहावे ही विनंती.

In reply to by आळश्यांचा राजा

या विषयावर फॅक्टस मिळवणे दुरापास्त कारण तिथे परिस्थिती रोज बदलते. मी वीस वर्षे अभ्यास करुन मिळवलेल्या फॅक्ट्स फक्त मांडतो. ते माझे मुळ काम. इंटरप्रिटेशन करणे सब्जेक्टिव्ह. माझे मत ज्या फॅक्टसच्या आधारे आले त्या मी मांडल्या. त्या सिद्ध करणे सहज शक्य आहे कारण ही डॉक्युमेंटेड हिस्ट्री आहे. ते कुणाला पटो अथवा न पटो. शेवटी ज्याचा त्याचा अभ्यास, ज्याच्या त्याच्या फॅक्ट्स आणि ज्याचे त्याचे इंटरप्रिटेशन. प्रत्येकाला स्वतःचे मत बनविण्याचा अधिकार आहेच. पण तत्वज्ञान नाही असे म्हणताना सपोर्टिंग फॅक्टस मी दिल्या. तत्वज्ञान आहे असा दावा कुणाचा असेल तर त्याच्या सपोर्टिंग फॅक्ट्स त्याने द्याव्यात. माझी अजिबात हरकत नाही. फक्त किमान इतिहासाचा वस्तुनिष्ठ अभ्यास असावा, दहशतवाद म्हणजे नक्की काय ही किमान पुसटशी तरी कल्पना असावी ही अपेक्षा. अर्थातच ही अपेक्षाच आहे. पुर्ण व्हावीच असा आग्रह धरताच येत नाही. पण नक्षलबारी ते रेड कॉरिडॉर हा एका तत्वज्ञानाचा अखंड प्रवास कसा आहे हे कुणी फॅक्ट्स देऊन पटवु शकत असेल तर स्वागतच आहे. अन्यथा मी आधीच (अगदी पहिल्या प्रतिसादात म्हणले तसे) शंका उपस्थित होणे यात कुणालाच काहीच गैर वाटु नये.

In reply to by प्रसन्न केसकर

आपल्या वरील (अनेक) प्रतिसादांमधून बरीच नवीन माहिती मिळाली आणि नवा दृष्टीकोनही कळला. एकूण आपले म्हणणे असे दिसते की, "सध्या जे नक्षलवादाच्या नावाखाली घडत आहे त्याचा आणि नक्षलवादी तत्वज्ञान अथवा कम्युनिस्टांशी संबंध नाही." तसे जर असेल तर ज्यांना डावे विचारवंत/डाव्या विचारांशी जवळीक असलेल्या चळवळीत सहभागी आहेत असे म्हणता येईल असे अनेक दिग्गज हे नक्षलवाद्यांना पाठींबा देताना कसे दिसतात? त्यात मग अरुंधती रॉय, मेधा पाटकर, प्रफुल्ल बिडवाई, सारखे अनेक जण येतात. त्यातील एकानेही विनील-माझींच्या बाबतीत तोंड देखील उघडलेले दिसले नाही आणि त्यांच्या एकंदरीत भुमिकांमधे नक्षलवाद्यांचे समर्थनच असते. असे का असावे?

In reply to by विकास

असे माझा वीस वर्षातला फील्ड एक्स्पिरियन्स सांगतो. सर्वप्रथम अश्या गँग आणि गटांना प्रचंड मोठे फंडिंग उपलब्ध होते. त्याचे अंतर्गत सोर्सेस इंद्रराज पवार यांनी स्पष्ट केलेले आहेतच पण त्यातीलही सर्वात महत्वाचे सोर्सेस म्हणजे अंमली पदार्थ व अन्य प्रतिबंधीत गोष्टींची तस्करी (यात दरवर्षी अब्जावधींची उलाढाल होते.), ह्युमन ट्रॅफिकिंग आणि इम्मॉरल ट्रॅफिकिंग (यातही बहुसंख्य गँग्ज व गट, त्यात नक्षलवादी व एलटीटीई यांचीही गणना होऊ शकेल, प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे सामील असतात.) व कॉन्ट्रॅक्ट किलिंग. त्याखेरीज परकीय शक्तींकडुनही अश्या गटांना मोठ्या प्रमाणात फंडिंग होते. या फंडसचा वापर करुन अश्या गँग्ज व गट हजारो फ्रंट ऑर्गनायझेशन्स उघडतात. या फ्रंट ऑर्गनायझेशन्स बहुतेकदा प्रत्यक्षपणे अतिरेकी कायवायात किंवा गुन्ह्यांमधे सामील होत नाहीत परंतु त्यांच्यामार्फत अश्या संघटनांचा उघड अथवा छुपा प्रचार्-प्रसार केला जातो, त्यांच्याबाबत सकारात्मक जनमत तयार केले जाते, सहानुभुतीदार व समर्थक निर्माण केले जातात, मनुष्यबळाची भरती केली जाते, वेळप्रसंगी कारवाईच्या पुर्वतयारीमधे टेहेळणी करणे, लॉजिस्टिक्स पुरवणे अश्या मार्गांनी सहभागही घेतला जातो, फरारी असलेल्या गुन्हेगार व अतिरेक्यांना आश्रय दिला जातो, खटल्यांदरम्यान कायदेशीर मदत उपलब्ध करुन दिली जाते, शासन यंत्रणेविरुद्ध प्रचार केला जातो. या फ्रंट ऑर्गनायझेशन्स जसजश्या प्रस्थापित होतात तसतसे त्यांना स्वतःचे स्टेटस येते, त्यांचे स्वतःचे आंतरदेशीय व आंतरराष्ट्रीय फंडिंग सोर्सेस निर्माण होतात. या फंडसमधला काही भाग सायफन ऑफ करुन गँग व गटाकडे देखील जातो. अश्या फ्रंट ऑर्गनायझेशन्स ओळखणे अत्यंत अवघड असल्याने त्यांच्याबरोबर काम करताना त्यांची लाईन टो करणे अपरिहार्य होते व त्यातुन अनेकदा दहशतवादाचे समर्थन होऊ शकते. दुसरे म्हणजे दुर्गम भागात काम करताना तेथे सुशासन उपलब्ध नसल्याने तेथील सर्व अ‍ॅक्सेस अश्या गटांच्या ताब्यात असु शकतो व त्यामुळे त्यांच्या कारवायांबाबत मौन पाळणे आवश्यक बनते. जर ते केले नाही तर त्या भागात काम करणे शक्य होत नाही. तिसरे कारण म्हणजे बहुतेक सर्व प्रतिष्टित नेते, कार्यकर्ते व बहुतेकदा पत्रकार देखील या गट व गँग्ज, त्यांची कार्यक्षेत्रे व त्यांचे टार्गेट ऑडियन्स यापासुन दुर असतात. त्यांचा ग्रास रुटला संपर्क येतो तो मध्यस्थांमार्फतच. त्यामुळे फील्ड वर्क करताना देखील वस्तुस्थिती लपवुन ठेवुन देखावा उभा करणे शक्य होते व वरवर पाहणार्‍याला तो देखावाच खरा वाटु शकतो. चौथे आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अश्या गँग्ज व गट स्वतःची प्रतिमा जुलुमी शासन यंत्रणेचे विरोधक, शोषितांचे कैवारी, महान ध्येयवादी, तत्वनिष्ठ अश्या प्रकारे निर्माण करत असल्याने त्यांना समर्थन देणे हे फॅशनेबल व प्रतिष्ठेचे ठरते. कोणत्याही प्रस्थापित यंत्रणेत कोणी ना कोणी शोषित, पीडीत असतेच. अश्या गटांची बाजु घेणे म्हणजे शोषितांचा कैवार घेणे असे सर्वच पातळ्यांवर समजले जाते. असे करण्याने एका बाजुला प्रतिष्ठा मिळते आणि त्याचवेळी स्वतःला फंडिंग मिळवणे सुकर जाते. हा मोठाच दबाव असतो.

In reply to by प्रसन्न केसकर

>>सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अश्या गँग्ज व गट स्वतःची प्रतिमा जुलुमी शासन यंत्रणेचे विरोधक, शोषितांचे कैवारी, महान ध्येयवादी, तत्वनिष्ठ अश्या प्रकारे निर्माण करत असल्याने त्यांना समर्थन देणे हे फॅशनेबल व प्रतिष्ठेचे ठरते. येथेच मला प्रश्न पडतो आहे. त्या गटांची प्रतिमा तशी आहे म्हणून मेधा पाटकर वगैरे समर्थन देतात की उलट आहे?

In reply to by नितिन थत्ते

दुर्गम भागात काम करताना येणार्‍या अनेक कंपल्शन्सपैकी एक असावे ते असे मला वाटते. मेधा पाटकर फॅशनेबल म्हणुन काही करण्याएव्हढ्या उथळ मला वाटत नाहीत.

In reply to by प्रसन्न केसकर

प्रसन्न केसकर, हे पोस्टस वाचल्यावर मला असे वाटते की "नक्षलवादाचा उहापोह" अश्या किंवा तत्सम नावाखाली ही माहिती एकत्रीत पोस्ट कर. आत्ता एक पोस्ट, त्याच्यावर मग ब-याच प्रतिक्रीया, मग एक पोस्ट असे स्वरूप आले आहे. ते सलग आल्यास वाचण्या-या जास्त बरे वाटेल असे वाटते.

In reply to by प्रसन्न केसकर

आपल्या अनुभवाविषयी आणि व्यासंगाविषयी आदर आहे. पण आपण "फॅक्ट्स मांडतो फक्त" असे म्हणत इंटरप्रिटेशन मांडत आहात. आपल्या इंटरप्रिटेशनवर विचार करतो आहे.

In reply to by प्रसन्न केसकर

इंद्राच्या "फंडीग"बद्दलच्या पोस्ट नंतर अजून एक छान पोस्ट आहे हा. सर्वप्रथम एक मिथ मनातुन काढणे आवश्यक आहे. ती म्हणजे नक्षलवाद शोषितांना न्याय देतो किंवा ती शोषितांची क्रांती आहे. नक्षलवाद्यांच्या विविध गटांच्या फ्रंट ऑर्गनायझेशन्सनी हेतुपुरस्सर पसरवलेली ही भाकडकथा आहे. नक्षलवाद आदिवासी, शोषित यापैकी कुणालाच न्याय देण्यासाठी नाही. तो प्रस्थापितांनी शोषितांचे पिळवणुक करुन, त्यांना दहशतीखाली ठेऊन स्वतःच्या फायद्यासाठी चालवलेला धंदा आहे. मी सुध्दा हाच मुद्दा मांडायचा प्रयत्न केला होता. http://www.misalpav.com/node/16012#comment-271561 पण तुझ्या इतका प्रभावीपणे मांडु शकलो नसणार म्हणून त्याची दखल घेतली गेली नसणार. बाकी "तथाकथी नक्षलवाद्यांची दहशवाद्यांबरोबरची युती" हा महत्वाचा मुद्दा तु मांडलास त्याबद्दल आभार. हा मुद्दा महत्वाचा असून देखील सगळ्यांच्या लिखाणातून सुटला होता. आता याबद्दलसुध्दा चर्चेत भाग घेणा-या सर्व सभासदांची प्रतिक्रीया वाचायला आवडेल.

हेयर कम्स द ट्रुथ !! बराच वेळ चर्चा वाचुन लोक्स जुने संदर्भ का देत आहेत तेच कळत नव्हत !! धन्स..

एकुणच चर्चा (हीच नव्हे, विनील अपहरण संदर्भातील इतरही धागे) वाचत आहे. नक्षलवाद (खरा/खोटा), माओवाद, रेड कॉरिडोर ह्यासंदर्भातील अत्यल्प आणि बहुतांश ऐकिव माहिती ह्यामुळं चर्चेत भाग घेण्याची लायकी नसल्याने शांतच बसुन होतो. आज वर्तमानपत्रातील 'विनील कृष्णा आणि पवित्र मांझी ह्यांची येत्या ४८ तासात सुटका' ही बातमी वाचून मात्र हायसं वाटलं. आजही 'अपवादांनीच नियम सिध्द होतात' असं ठळकपणे जाणवून देणारे विनील कृष्णा ह्यांच्यासारखे सरकारी अधिकारी आहेत आणि ते खरोखरच मनापासून कामे करण्यासाठी झगडत आहेत ह्याचीही सखोल माहिती ह्या विषयीच्या धाग्यांमुळे कळत गेली. आ.रा., मोडक, आणि माहितगार मंडळींचा अत्यंत आभारी आहे. (मला ठाऊक आहे, सरकारी अधिकार्‍यांबद्दल माझे हे विधान पुर्वग्रहदुषित म्हणा किंवा झोंबणारे म्हणा वाटू शकते. पण माझा नाईलाज आहे. आणि हा ग्रह जरुर बदलला जावा अशी मनोमन प्रार्थना आहेच.) IAS अधिकारी श्री. सचिन जाधव ह्यांच्या पत्रातील
पकडलेले जे नक्षल आता तुझ्या बदल्यात सोडले जातील त्याबद्दल तुलाच आता सगळे जबाबदार धरणार असं वाटत नाही तुला?
ह्या अनुशंगाने मलाही प्रश्न पडलाच की आता अशा सुटका झालेल्या गुन्हेगारांबद्दल सरकार काय करणार? कंदहार अपहरणाच्या बदल्यात सुटलेल्या अजहर मसूद आणि कंपनीने अधिक प्रबळ होऊन देशाला आणखी त्रास दिला. तसं न होण्याची खबरदारी कायदा आणि सुव्यवस्था हयंची जबाबदारी असलेल्यांकडून कशी घेतली जाणार? असे सर्वसामान्य पातळीवरच्या 'layman'ला पडणारे प्रश्न मलाही पडलेच. अर्थात, विनील ह्यांचे कार्य, त्यांना आदिवासींकडून मिळणारे प्रेम व पाठिंबा ह्याबद्दल दुमत नाहीच..आदरच आहे. सुटका झाल्यावर श्री. विनील ह्यांनी ह्या अनुभवांचा वापर करुन अधिकाधिक अधिकार्‍यांना आपल्या मार्गावर चालत हे कार्य सर्वदूर पसरण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करुन हा त्यांचा एकाकी लढा प्रबळ करावा अशी सदिच्छा!

छान चर्चा. 'अक्षर' च्या दिवाळी अंकात विशेष लेखमाला आहे. ''नक्षलवादी : देशद्रोही की गरिबांचे कैवारी'' मेधा पाटकर, जयंत उमराणीकर अरुंधती रॉय, प्रकाश बाळ, एकनाथ साळवे, मीना मेनन, बंधुराज लोणे यांनी वरील विषयासंबधी आपापल्या भुमिका मांडल्या आहेत. जरासा वेळ मिळाला की काही मुद्दे इथे डकवेन म्हणतो. जसे-
नक्षलवाद म्हणजे काय ? त्याची व्याख्या करण्याआधी काही गोष्टी स्पष्ट करायला हव्यात. ७० च्या दशकात नक्षल चळवळ सुरु झाली, चारु मुझुमदारांनी सुरु केली तेव्हा त्याला आदर्शवादाचा पाया होता. त्यांना गरिबांसाठी आंदोलन करायचं होतं, क्रांतीकरायची होती. अनेक हुशार मुलं क्रांतिकारी विचारसणीने प्रेरित होऊन त्यात सामील झाली होती. पण हळूहळू ही चळवळ तशी राहिली नाही. तिचा वैचारिक पाया ठिसूळ झाला आणि तेही वेगळ्या प्रकारचं असेल पण शोषणच करु लागले मुख्य म्हणजे ही मंडळी बुद्धिभेद करण्यात अतिशय हुशार आहेत. आपली चळवळ ही गरिबांसाठीच आहे, अदिवासींची आहे असं ते भासवतात. या चळवळीला ते क्रांती म्हणतात हे थोतांड आहे, नक्षलवादी हे माझ्या दृष्टीने निव्वळ ठग आहेत. [माओवादी सर्वात मोठे शोषक : जयंत उमराणीकर, निवृत्त पोलीस महासंचालक(विशेष अभियान) ]
आणि पुढे माओवाद्यांनी अदिवासी लोकांचा विकास केला आहे काय ? असे प्रश्न विचारतात. शाळा सुरु केल्यात का. रस्ते बांधलेत का. रस्ता केला की तो पोलिसांसाठी आहे असा अप्रप्रचार करायचा..! माओवाद्यांनी कोणते विकासाचे मॉडेल अदिवासींना दिलं आहे. अदिवासींना मूळ प्रवाहात यायची इच्छाच नाही हे नक्षलवाद्यांनी बळजबरीच लादलं आहे. पोलीस भरती असेल आणि जागा शंभर असतील तर दहा हजार मूले तिथे भरतीसाठी येतात. मुलं भरतीसाठी का येतात तर त्यांना त्यातून बाहेर पडायचं आहे. सरकारी नोकरी करु इच्छिना-या तरुणांना माओवादी धमकवतात. तेव्हा ही कोणती विचारसरणी असते वगैरे आशय या अधिका-याच्या लेखनातून उतरतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्यासंदर्भात श्री. जयंत उमराणीकरांचं एक वाक्य आहे, "अशी कोणती क्रांती असते की जी ४० वर्षं चालू आहे?" (शब्द जसेच्या तसे नसतील, चु.भू.दे.घे.) ह्यातच बरंच काही यावं.

In reply to by धमाल मुलगा

;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वरील विषयासंबधी आपापल्या भुमिका मांडल्या आहेत. जरासा वेळ मिळाला की काही मुद्दे इथे डकवेन म्हणतो. जरूर करा. हा अंक वाचला होता, मेनन यांचे रूपांतर रोचक होते. उमराणीकर यांचाही लेख दुसरी बाजू सांगणारा होता.

In reply to by चित्रा

''मला आणखी एका मुद्याचं स्पष्टीकरण इथं द्यायचं आहे. नक्षलवादाच्या सशस्त्र लढ्याचं समर्थन आम्ही करतोय, जे जो आरोप केले जातायत ते खोटे आहेत. फार मोठं लक्षं या नक्षलवादी लढ्यावर सध्या केंद्रित झालं आहे. ही सशस्त्र संघर्षाची सफलता म्हणता येणार नाही, पण एवढंच लढ्याने साधलंय निश्चित. यामधे अदिवासींचं शोषण, सांस्कृतिक आघात, विस्थापन,जागतिक व राष्ट्रीय कंपन्यांची तूट, विषमता हे मुद्दे काहीशा अस्पष्टपणे पुढे आले आहेत'' [हिंसा हा मार्ग नाही : मेधा पाटकर]
नक्षलवादाच्या संदर्भात मेधा पाटकरांच्या लेखातून जाणवते की नक्षलवाद्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने पूर्ण केल्या पाहिजेत. मागण्या मान्य होत नाही म्हणून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा त्यांना तो एक मार्ग आहे असे त्यांना वाटते. असे जरी त्या म्हणत असल्या तरी त्या कुठेतरी नक्षलींच्या समस्यांचे समर्थन करतांना दिसतात. ते समर्थन पाहा-
''कुठेतरी घरातलं पोर जर बंडखोर झालं तर त्याला नुसतं उत्तर देता येत नाही, त्याचा मागचा पुढचा विचार करावा लागतोच. त्या भूमिकेतून नक्षलवादाचं विश्लेषण करावं लागतंय. आणि ते जर करायला गेलो तर लगेच आम्ही नक्षवाद्यांच्या सगळ्याच गोष्टींचे समर्थन करतो असंही म्हटल्या जातं म्हणजे हाही पुन्हा या संघर्षाचा परिपाक आहे''
मेधा पाटकर लेखातून काहीप्रश्न विचारतात जसे की, या माओवाद्यांना सत्ता काबीज करायची आहे का ? सत्तेत आल्यावर राज्य चालवणार काय ? असे काहीही नक्षलींना करायचे नसावे. कारण नक्षलींच्या अत्याचाराच्या कहाण्याही पुढे येताहेत. सत्तेत आले तर व्यवस्था बदलवणार आहेत काय ? असे अनेक प्रश्न त्या विचारतात. उदा. म्हणून माओवादी सत्तेत आल्यावर कसे जागतिकीकरणवादी झाले असे दाखलेही देतात. त्यामुळे नक्षलींच्या संघर्षाचे पुढे काय ? तर त्याला काही दिशा नाही. या सर्व गोष्टींना एकच उपाय तो म्हणजे 'संवाद'. दोन्हीही बाजूने संवाद झाला पाहिजे. अदिवासींचे प्रश्न सरकारच्या माध्यमातून सुटले पाहिजे..इत्यादि..इत्यादि. बाकी, मीना मेनन [माजी नक्षलवादी] ती काय लिहिते ते मात्र लवकरच डकवतो. -दिलीप बिरुटे

कालचा दिवस विनीलच्या हितचिंतकांसाठी मृगजळासारखाच ठरला... तरी देखील माझींची सुटका झाली ही त्यातला त्यात आशादायी बातमी. आता माओवाद्यांनी सुटका केलेल्या नक्षलवाद्यांना त्यांच्या भागात जनतेसमोर द्यावे वगैरे मागण्या असलेले तेलगू भाषेतील पत्र माझींबरोबर पाठवले आहे. Junior engineer Pabitra Mohan Majhi (sporting a red helmet) being taken to the Malkangiri district headquarters after he was released by Maoists at Chitrakonda on Wednesday. (PTI)

विनील अपहरण प्रकरणात मेधा पाटकर यांनी काय भूमिका घेतली अशा स्वरूपाची विचारणा वर काही पोस्टमध्ये झाली आहे. पाटकर यांच्या संपादकत्वाखाली निघणाऱ्या 'आंदोलन शाश्वत विकासासाठी'च्या ताज्या अंकात विनील अपहरणासंबंधात करण्यात आलेली संपादकीय टिप्पणी खाली देतो आहे. (या अंकासाठी संपादन सहाय्य मी करतो - हा माझा हितसंबंध.) -------------------------------------- अपहरणाचे अंजन! विषमता, विकासापासूनची वंचना आणि जीवनस्रोतांवरचे अतिक्रमण ही माओवादी - किंवा हिंसेचं तत्वज्ञान मानणाऱ्या - संघटनांच्या प्रसाराची किंवा त्याच्या जनाधाराची कारणे असतील तर हीच कारणे लोकशाही व्यवस्थेच्या आतूनच बदल घडवत दूर करण्यासाठी जे काही मोजके लोक काम करतात, त्यांच्यापैकी एक असणारे मलकनगिरीचे जिल्हाधिकारी आर. विनील कृष्णा (आणि त्यांच्याबरोबर असणारे अभियंता पवित्र माझी) यांचे माओवाद्यांनी केलेले अपहरण केवळ निषेधार्हच नव्हे तर हिंसेचे तत्वज्ञान सांगणाऱ्यांचा भ्याडपणा उघडा पाडणारेही आहे. सव्वा वर्षापूर्वी विनील मलकनगिरीत आले. या सव्वा वर्षात ते मलकनगिरीच्या मोठया भागात लोकप्रियही झाले. एरवी शासकीय अधिकारी ज्याशिवाय दिसत नसतात, तो फौजफाटा गुंडाळून थेट लोकांमध्ये ते जात. त्यांच्यासमवेत एकत्र बसून प्रश्न जाणून घ्यायचे, ते सोडवायचे; जिथं प्रश्नच अनुचित असेल तिथं तेही स्पष्ट सांगायचे ही त्यांची कार्यपध्दती. आपल्या कामाच्या जोरावर, लोकांचा विश्वास संपादन करून नि:शस्त्र फिरणाऱ्या विनील यांच्या सुटकेसाठी काही हजार आदिवासी मलकनगिरीत जंगलात गेले आणि माओवाद्यांना विनील यांना दुसरीकडे हलवावे लागले. विनील यांच्या सुटकेच्या मागणीसाठी ओरिसात इतरत्रही लोक रस्त्यावर आले, हा त्यांच्या लोकप्रियतेचाच पुरावा आहे. विनील यांच्या अपहरणानंतर माओवाद्यांनी काही मागण्या केल्या. हा मजकूर लिहीतो त्यापैकी आठ मागण्या सरकारने मंजूर केल्या आहेत. विनील यांच्या सुटकेची आशा प्रज्वलित करणारी ही स्थिती. या मागण्यांपैकी तुरुंगात असलेल्या काही माओवाद्यांची सुटका याच्याशी संबंधित मागण्या वगळता इतर मागण्या काय आहेत? माओवादी म्हणून तुरुंगात टाकलेल्या 700 वर आदिवासींची मुक्तता, कोंडा रेड्डी आणि नुकाद्रा या जातींना इतर मागासवर्गीय दर्जा देणे, आंध्रातील पोलावरम हा बहुद्देशीय प्रकल्प थांबवणे, मलकनगिरी आणि कोरापुट जिल्ह्यात विस्थापित झालेल्या आदिवासींना भूमीहक्काचे उतारे देणे, मलकनगिरीतील गावांमध्ये सिंचनाची सोय करणे, तुरुंगात मरण पावलेल्या दोन आदिवासींच्या (त्यांना माओवादी म्हटले गेले आहे) कुटुंबांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे वाढीव भरपाई देणे, माली आणि देवमाली बॉक्साईट खाणींचे नियमन करणे, विकास प्रकल्पांमध्ये आदिवासींचे कमीतकमी विस्थापन आणि विस्थापितांना पुरेशी व न्याय्य भरपाई देणे. माओवाद्यांची सुटका ही यातील मागणी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. पण इतर मागण्यांचे काय? त्या तर सरकारचे मूलभूत कर्तव्य असणाऱ्या आणि सकृतदर्शनी तरी न्याय्य मागण्याच आहेत. त्या मागण्यांसाठी हाती हत्यार घेतले पाहिजे अशी स्थिती का आली असावी? विनील यांचे वेगळेपण हेच की अशी स्थिती येऊ नये यासाठी ते त्यांच्या इतर काही सहकाऱ्यांसारखे झटत होते. या आणि अशा मागण्यांसाठी अहिंसक आंदोलने, संघर्षही होत असतातच. तसे ते जागोजागी सुरू आहेत. अनेकदा त्या संघर्षांना समाजाचे पाठबळ मिळत नसते, ना त्यांच्या गाऱ्हाण्यांचे निराकरण होते. पण हाती हत्यार घेऊन विनील किंवा तत्सम कोणाचे तरी अपहरण केल्यानंतर या मागण्या आठवडयाच्या आत मंजूर होतात. कोणता संदेश यातून जातो आहे? या अपहरणाचा निषेध करतानाच अपहरणापायी माओवाद्यांपुढे गुडघे टेकण्याची वेळ स्वत:वर आणून घेणाऱ्या सरकारचाही निषेधच झाला पाहिजे. कारण ज्या काही मागण्या एरवीही मान्य करून लोकसमुहाला बरोबर घेऊन जाता आले असते तिथे भलत्याच हितसंबंधांच्या रक्षणासाठी सरकारे अडून बसतात, आणि नंतर अशा कोंडीच्या स्थितीत शरणागती पत्करत त्या मागण्या मान्य करून 'हिंसेच्या आधारे प्रश्न सुटतात' या भावनेलाच बळ देतात. अहिंसक मार्गाने चालणाऱ्या संघर्षांना, सरकारमध्ये राहून खऱ्या लोकशाहीचे सरकार आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या विनील यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना बळ देण्यासाठी एक पाऊल उचलण्याची ही सरकारला मिळालेली एक संधी आहे. माओवाद्यांच्या वाजवी मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाचे राष्ट्रीय समन्वयक प्रफुल्ल सामंतरा व कामगार नेते संतोष महापात्रा यांनी ओरिसाच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. माओवाद्यांशी थेट राजकीय चर्चेसाठी पुढाकार घेऊन ओरिसा सरकारने देशापुढे एक उदाहरण घालून द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे तसेच माओवाद्यांनी आपला हिंसेचा मार्ग त्यागून लोकशाही मार्गांचा अवलंब करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. एन्काऊंटरच्या नावाखाली माओवादी ठरवून पोलिसांकडून मारल्या गेलेल्या आदिवासींच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन चौकशीची व माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली तुरुंगात डांबलेल्या जनआंदोलनांच्या कार्यकर्त्यांची त्वरित सुटका करण्याची मागणी त्यांनी केली आहे; त्याचबरोबर त्यांनी भू-आयोगाचीही मागणी केलेली आहे, ज्याद्वारे दोन वर्षांच्या कालावधीत सर्व दलित व आदिवासींना जमिनीचे पट्टे दिले जावेत; शेतीखालील जमीन उद्योगांकडे वळवण्यास पूर्ण मनाई करावी; व नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत पध्दतीने वापर करून विस्थापनविरहित उद्योगांची निर्मिती करण्यास प्रोत्साहन मिळेल. विनीलसारख्यांच्या अपहरणाचे हे अंजन डोळयांत जाऊन सरकारला जाग येईल काय? या प्रश्नाच्या उत्तरावरच देशाचे भविष्य अवलंबून आहे.

In reply to by श्रावण मोडक

"आंदोलन शाश्वत विकासासाठी" या मेधा पाटकरांच्या पत्रकातील लेख/मजकूर येथे दिल्याबद्दल धन्यवाद! त्यांचे नाव मी घेतले होते आणि नंतर प्रसन्न केसकरांना प्रतिसाद देताना मिपा गंडले आणि नंतर वाटले की आता तो विषय मागे राहीला म्हणून परत टाकला नाही. सर्वप्रथम मला त्यांच्या या पत्रकातील भुमिकेबद्दल चांगल्या अर्थाने आश्चर्य वाटले नाही. मेधा पाटकरांची प्रत्येक भुमिका (पटत नाही असे म्हणत नाही पण) जर वाचली, तर कदाचीत मला पटणार नाही. अर्थात भुमिका म्हणताना मला त्यांचे, भुमिकेसंदर्भात/सामाजीक प्रश्नाला उत्तर, असे जास्त म्हणायचे आहे. तरी देखील त्यांच्या हेतूबद्दल कधी शंका येणार नाही. पण त्यांचे नाव मी इतरांबरोबर (अरूंधती रॉय, प्रफुल्ल बिडवाई आणि इतर) घातले ज्यांच्या बद्दल असे म्हणणार नाही...मात्र मेधा पाटकरांच्या बाबतीत, या संदर्भात, "गिल्ट बाय असोसिएशन"होऊ शकते, असे म्हणता येईल.

In reply to by श्रावण मोडक

अहिंसक मार्गाने चालणाऱ्या संघर्षांना सरकारमध्ये राहून खऱ्या लोकशाहीचे सरकार आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या विनील यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना बळ देण्यासाठी
अनेकदा त्या संघर्षांना समाजाचे पाठबळ मिळत नसते, ना त्यांच्या गाऱ्हाण्यांचे निराकरण होते. पण हाती हत्यार घेऊन विनील किंवा तत्सम कोणाचे तरी अपहरण केल्यानंतर या मागण्या आठवडयाच्या आत मंजूर होतात. कोणता संदेश यातून जातो आहे?
स्वतंत्र लेख आहे, तसेच दोन महत्त्वाची आर्ग्युमेंट्स मांडली आहेत. वेगळा धागा काढावा ही विनंती.

In reply to by आळश्यांचा राजा

"...वेगळा धागा काढावा ही विनंती..." ~ सहमत. आता "विनील" हा विषय जरी "फाईल" झाला असला तरी 'नक्षल' हा राहणारच आहे. त्यामुळे आता त्या अनुषंगाने नूतन धाग्यावर चर्चा करणे संयुक्तिक ठरेल. श्री.विकास यानी 'मागण्या आणि त्यांची पूर्तता' यावर जो प्रतिसाद दिला आहे, तोच नवा आणि स्वतंत्र धागा म्हणून घेतल्यास आता त्या अनुषंगाने ही चर्चा पुढे नेता येईल असे वाटते. सबब त्यानी (श्री.विकास) यानी संपादकांनी विनंती करून 'त्या' प्रतिसादास नव्या धाग्याचे रूप द्यावे असे वाटते. इन्द्रा

एक प्रश्न सतत पडला होता की नक्की काय मागण्या होत्या आणि नक्की काय मान्य केले गेले आहे. मात्र याचे उत्तर कुठेच नीटसे मिळत नव्हते. वास्तवीक सरकारने देखील हे अशा वेळेस जाहीर करायला पाहीजे. त्यामुळे फुकाची गोपनीयता राहील्याने जर काही अफवा पसरणार असतील तर थांबू शकतात. शेवटी तेहलका मधे त्यांनी म्हणल्याप्रमाणे शोधपत्रकारीतेचा वापर करत मिळवलेल्या प्रतीतील मजकूर मिळाला ज्यात हे स्पष्ट दिलेले आहे. ते खाली थोडक्यात देत आहे. कंसामधे सरकारने काय म्हणले हे देखील थोडक्यात लिहीत आहे.
  1. काही घटकांचे इतर मागासवर्गीय म्हणून वर्गीकरण करणे.
    (ओरीसा सरकारने २००७ सालीच ही मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे आणि पाठपुरावा देखील केला आहे. परत केला जाईल).
  2. गोदावरीवरील ओरीसा-तेलंगणा भागातील पोलावरम प्रकल्प थांबवा.
    (ह्या प्रकल्पाला ओरीसा सरकारचाच विरोध आहे आणि त्या विरोधात सरकारने आंध्र सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे.)
  3. काही आदीवासींच्या जमिनी या बेकायदेशीररीत्या घेतल्या आहेत त्या त्यांना मिळाव्यात.
    (या संदर्भात काही नक्की करायची गरज आहे कारण आदीवासींसंदर्भात काही कायदे वर्षानुवर्षे धाब्यावर बसवले गेले होते. नंतर झालेल्या विरोधात दोन आदीवासी मारले गेले होते, वगैरे.... सरकारने लक्ष घालायचे मान्य केले आहे)
  4. कोटापडी ते मानेगुडा कालवा (डेव्हलपमेंट?) हवा आहे.
    (सरकारने मान्य केले आहे आणि रु. ५० लाखांची सर्वेक्षण आणि सुरवातीच्या कामासाठी तजवीज केली आहे.)
  5. तुरूंगात मरण पावलेल्या काही कार्यकर्त्यांच्या कुटूंबाला भरपाई.
    (सरकारचे म्हणणे आहे की ते इस्पितळात मरण पावले. त्या विरुद्ध खटला आहे. पण सरकार तो त्यांच्या बाजूने पुढे ढकलणार नाही...)
  6. शीला दी या माओ कमिटी सभासदेस तब्येतीच्या कारणानिमित्त सोडावे.
    (त्यांची तब्येत चांगली नसल्याने त्यांना सरकार सोडणार आहे.)
  7. दोन एकत्रीत मागण्या - खाणकाम थांबवावे आणि आंतर्राष्ट्रीय कंपन्यांशी असलेले त्या संदर्भातील व्यवहार तोडावेत.
    (सरकारने म्हणले आहे की सर्व कायदे काटेकोरपणे पाळले जात आहेत की नाही ते बघितले जाईल, पुढे असे करार कसे करायचे ते बघितले जाईल, पुर्नवसन नीट केले जाईल पण असलेले करार राहतील. माओवाद्यांनी असलेले करार ठेवायला मान्यता दिली आहे.) (माझी टिपण्णी: म्हणजे याच कंपन्यांकडून हेच माओवादी परत पैसे घेण्यास मोकळे असे समजायचे का? नक्की काय साध्य झाले?)
  8. सीताण्णा नामक आदीवासीस अटक झाली आहे त्याला सोडावे.
    (पोलीस रेकॉर्डप्रमाणे झालेली नाही, तरी देखील चौकशी केली जाईल).
  9. बालीमारा धरणासंदर्भात पुर्नवसनासाठी शेतकर्‍यांना भरपाई.
    (सरकारचे म्हणणे आहे की आजपर्यंत काही तक्रारी आल्या नाहीत की भरपाई मिळाली नाही म्हणून. तरी देखील लक्ष घातले जाईल).
  10. नाल्को प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्यांना न्याय दिला जावा.
    (दिला जाईल)
  11. ऑपरेशन ग्रीन हंट थांबवा.
    (जो पर्यंत तुमच्याकडून बेकायदेशीर कृत्ये होत नाहीत, शस्त्रे घेतली जात नाहीत, तो पर्यंत आमच्याकडूनही घेतली जाणार नाहीत).
  12. तुरूंगात असलेल्या अनेक आदीवासींना सोडावे.
    (लहान कारणांसाठी पकडल्या गेलेल्यांना तात्काळ सोडले जाईल. माओ चळवळीशी संबंधीतांबद्दल १५ दिवसांत रिव्ह्यू चालू केले जातील.)
  13. सेंट्रल कमिटी मेंबर्सना सोडून द्या.
    (यासंदर्भातील कायदेशीर प्रक्रीया चालू केली गेली आहे.)
अतिरेक्यांशी वाटाघाटी कराव्यात का वेगळा मुद्दा आहे. पण वरील वाटाघाटींतून स्वतःची माणसे सोडवणे आणि ज्या खाणींना विरोध केला त्यांना एका अर्थी तसेच ठेवायची "परवानगी" देऊन स्वतःचे खंडणी उत्पन्न चालू ठेवायची तजवीज सोडल्यास यातून नक्की ठोस असे काय मिळाले? त्याचा तेथील आदीवासींना नक्की काय फायदा मिळाला?

In reply to by विकास

श्री.विकास यांनी दिलेली ही माहिती सर्वस्वी नव्या धाग्याचा विषय असल्यामुळे त्याना विनंती करीत आहे की त्यानी संपादकांना विनंती करून या प्रतिसादाचे नूतन धाग्यात रूपांतर करावे....म्हणजे त्या अनुषंगाने हा विषय पुढे नेता येईल. माझ्या अंदाजाप्रमाणे सर्वश्री.आ.रा., श्रामो आणि केसकर हेदेखील या मताला पुष्टी देतील. इन्द्रा