मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"माझी व्यथा"

वपाडाव · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
चीगोंच्या मार्गाथा वरून आम्हाला आणी एक किस्सा आठवला... आणी हो तो सांगण्यासारखा पण आहे.. त्याची अगोदर पार्श्वभूमी सांगणे गरजेचे आहे. म्हणून हा परिच्छेद !!! टीप: हा भीत-भीत का होईना इतक्या दिवसानंतर पहिला-वहिला लेख (वाटला तर लेख, नाहीतर टवाळगिरी म्हणा) मिपावर टाकतोय, विशाल मनाने ह्याला झोळीत घ्या. आणी काही चुका असतील तर कळवाव्यात. त्याचे झाले असे की, आमचे तीर्थरूप मुळचे पोलीस, शाळा-कोलेज पासून खेळण्याची आवड, अंग-पिंडानेही बळकट, आणी आम्हा भावंडावर तुफ्फ्फान जरब-वचक-दरारा, अगदी नंदनच्या मी सखाराम गटणेतील अप्पांसारखेच !! (अहो म्हणजे जास्त एक्स्प्लेन करावं लागू नये म्हणून, पुन्हा मिपाकर रटाळ नि तेच ते वर्णन म्हणून टोचण देतील), पण कधी-कद्धी म्हणून मार दिला नाही.... (अशी आमची शाळेच्या नववी पर्यन्तची समजूत) आणी पोलीस म्हटल्यावर बांबूच्या काठ्या नि अस्सल चामडी पट्टे (काही जण यालाच "सुंदरी" असे पण संबोधतात) यांची वानवा घरात कधी नव्हतीच... त्यांचा उपयोग मातोश्रींनीच जास्त केला यावर आम्हाला खाऊन राग.. (पोकळ बांबूचे पेकाटात बसलेले फटके अगदी दुष्मनालाही मिळायला नकोत, येणारी सूज लै वाईटटट राव....) बरं ते बाजूला, विषय पिताश्रीवरून मातोश्रींकडे कसा गेला कळतंच नाही.. तर दहावीच्या समर वेकेशनचा (नववीनंतरचा) काळ होता. दुपारी जेवण करून वडील TV चा समाचार घेत होते.. आणी थोड्या वेळाने आम्हाला अभ्यासाला बसण्याचं "फर्मान" जाहीर झालं.. (या गोष्टीचा आम्ही बराच निषेध करायचो पण फायदा नाही झाला कधी) बाहेरच्या खोलीच्या दरवाजातून सूर्यप्रकाश येत होता, नि त्याच्या शेजारीच आमचा टेबल. आतून दरवाजा बंद करण्याची आज्ञा झाली. मी उठून दरवाज्याकडे गेलो, बाहेर डोकावतोय तर तिथे काही मुलं क्रिकेट खेळत होती.मग आतली खबर बात घेऊन(मंडळी झोपी गेली आहेत का हे तपासून?) मी हळुवार दरवाजा लोटून घेतला अन टांगा टाकीत अंगणात पोचलो. काही वेळाने (खेळून पोट भरल्यावर) आम्ही परतून आलो. मग लोटलेला दरवाजा ढकलून पाहतो तर काय, दार पुढे सरकेचना ! काहीतरी अडकले असेल म्हणून पुन्हा एकदा थोड्याशा बळानिशी दार ढकलले, पण व्यर्थ!! सर्व काही ठीक आहे (बहुदा नाहीच?) हे पडताळण्याकरता, डोळे किल्मिले करून, एकदा फटीतून आत डोकावून पहिले. वडील सोफ्यावर झोपले होते, नि आई पण खाली पहुडली होती. पुन्हा एक-एक क्लृप्ती वापरून "दरवाजा कसा उघडावा?" यावर तर्क-वितर्क बांधण्यात माझ डोकं गुंतलं होत. (अर्थातच अभ्यासात कधीच गुंतत नाहीच ते!) तेवढ्यात, माझा तोल जाऊन माझे मुखकमल चौकटीवर आदळले. आमचे फादर, दार उघडून दाराच्या मागे उभे !! ४४० चा का काय झटका लागल्यागत झालं मला?? माझा सावरून उभे राहण्याचा प्रयत्न निष्फळ करीत, डाव्या हाताने एक हात पकडून, (तेंडूलकरने शोईब अख्तरचा चेंडू सीमापार करावा तसा) हात भिरकावून एक श्रीमुखात ठेऊन दिली. (हा प्रसाद काल चोरून चालवायला नेलेल्या गाडीच्या कोपर्यावर झालेल्या धडकेत फुटलेल्या डाव्या हाताच्या साइड ग्लासच्या परिणामार्थ असावा कदाचित !!) अर्धवट उभा असलेला मी, वाण्याच्या दुकानातील मजुराच्या पाठीवरून गोणी जशी गोदामात आदळते, तसा फरशीवर आदळलो. "धाडडडड!" दार लावण्यात आले. माझ्या चमूतील मुलांना, मी आत किती धपाटे खातोय?, हे कळू नये म्हणून!! ती एकंच चपराक एवढी भयानक लागली की, मला खरंच १९४५ साली हिरोशिमा, नागासाकी किती हादरले असेल, याची पुरेपूर अनुभूती झाली. मी अडवाच पडून होतो, कारण उठून बाजूला जाणे शक्य हि नव्हते नि कामाचे पण, फक्त बसणारा मार कमी व्हावा याचीच याचना करत होतो. मोर्चा मला सोडून कुठेही वळणार नव्हता याची खात्री होतीच. पण "वेड्या मनाच्या, वेड्या आशा!" टायगर वूड्सच्या गोल्फ स्टिकला लाजवेल या वेगात, एक लात माझ्या डोळ्यांना पाठीच्या दिशेने येताना दिसली, लगेच तिचा वेग नि तुटणाऱ्या बरगड्यांचे CALCULATION आमच्या तल्लख, चोख बुद्धीने केले, नि मेंदूने मेसेज पाठवला, "याक्षणी वळणे हितकारक ठरेल." डोळे मिटून वळलो आणी हात चेहर्यासमोर धरले, आणी यावेळी फुटबॉल सारखा उडून समोरच्या स्टुलावर पडलो. एव्हाना आई, ताई झोपेतून जागी झालेल्या. धडपड करत आई न ताई आमच्यापर्यंत पोचली. आई फ्रंटफुटवर येऊन फादरचे MEDIUM PACE चेंडू अडवून धरत होती, आणी तिने एकदा माझ्याकडे पाहिलं!! तिच्या डोळ्यात पाणीच तरळलं. माझ्या जब्ड्यांची अवस्था विचित्र झाली होती म्हणे. मी आरशात पाहिलं, तेव्हा मला कळाले की आई का रडत होती? पाठीवरच्या चुकवलेल्या लातेने आमच्या चेहर्याचा CANVAS केला होता, नि मकबूल फिदा हुसेनच्या चित्रात नसतील एवढे रंग उमटीवले होते! खालचा जबडा डावीकडे नि वरचा उजवीकडे झाला होता. आतापस्तोर आमच्या फादरचा राग शांत झाला नि त्येंच लक्ष पण आमच्या थोबडाकडे गेलं. उभ्याउभ्या मला लगेच आमच्या FAMILY DOCTOR कडे नेण्यात आलं. योग्य ती सुश्रुषा करण्यात आली. नि जेवणाची आबाळ, अबबब !! तांदळाची पेज, शेवायांची खीर ती सुधा चमचाने. (दातखिळी वगैरे काही बसली नव्हती, त्यासाठी निदान दाताखाली दात तर यायला हवेत ना....) यापुढची ५ दिवस शाळेत-घरी, शेजारी-पाजारी, गल्ली-बोळात, जाता-येता हा एकंच चर्चेचा विषय होता. ह्याच्या जबड्यात जो दिसतोय तो गुलाबजामून की कालाजामून?? माझ सुजलेल बोळक पाहून शाळेतली पोर तर हनम्या म्हणून हिणवायला लागली. तिथून पुढं आजतागायत कधी आमच्या तीर्थरूपांनी आमच्यावर हात नाही उगारला. (किंबहुना आम्ही त्यांच्यावर ही वेळच येऊ दिली नाही.) नोट: ह्या लिखाणाला क्रमश: नाही. कृपा करून मंडळींनी अजून येऊ द्या ही मागणी धरू नये.

वाचने 9385 वाचनखूण प्रतिक्रिया 51

५० फक्त 15/02/2011 - 12:23
'ह्या लिखाणाला क्रमश: नाही.' हेच बरं झालं, नाहीतर काहि खरं नव्हतं तुझं. असो छोटेखानी लि़खाण आवडले, पण आता बाप झाल्यावर पोराला एवढं मारताना तुझ्या वडिलांच्या मनाला किती वेदना झाल्या असतील ते जाणवतंय. पण हे सुद्धा कळतंय की हे असं सारखं सारखं जाणवायला लागलं ना तर पोरगं हाताबाहेर जाईल. आत्तापासुनच या जाणवणं आणि कळणं यातला मधला मार्ग शोधायचा प्रयत्न करतोय. हर्षद.

टारझन 15/02/2011 - 12:28
मस्त रे वडापाव ... वाक्य रचना सुरुवातीला कळायला अवघड गेली .. :) परंतु नंतर नंतर मजा आली ... मार खाल्ल्याचे नको येऊ देत .. पण बाकी लिखाण जरुर येऊन देत !!

स्वैर परी 15/02/2011 - 13:30
वडापाव राव! इतके सुंदर तर लिहीत आहात! आवडले लिखाण! :)

सूर्यपुत्र 15/02/2011 - 13:37
आमच्या पिताश्रींनी सुद्धा मला भयंकर मारायचे. एकदा मी पहिलीत असतांना काही कारणांमुळे (आणि कारणे पुरविण्यात मी खूपच आघाडीवर) वडील चिडले. मला एकच मुस्काडात अशी भडकावली, की मी हेलिकॅप्टर चा पंखा जेवढ्या जोरात भिंगतो, तेवढ्या स्पीडने फिरलो, आणि डोके धाडकन कपाटाच्या कोपर्‍याला धडकले. आणि भळभळ रक्ताची धार चालू. नंतरचे काही नीट आठवत नाही... तिर्थरूपांनी डॉक्टरकडे नेले आणि टाके घालून आणले. (नंतर काही कारणांमुळे मला एखादी गोष्ट समजली नाही, तर त्यावेळी झालेल्या जखमेमुळे मेंदू वाहून गेलाय अशी मला अजूनही दाट शंका येते.) हा किस्सा खरा आहे. वपाडाव, तुमचा किस्सा डेंजर आहे. अजून येऊ द्यात. ;) -सूर्यपुत्र.

In reply to by वपाडाव

दोन्हीही. पण मेंदू वाहून गेल्याचे मात्र पदोपदी जाणवतेय..... कुठे पाडावच लागत नाहीये... :p -सूर्यपुत्र.

स्वैर परी 15/02/2011 - 13:56
माझ्याही बाबतीत थोडेफार असेच झाले होते! तेव्हा मी तिसरीत होते . आई मला घड्याळ शिकवीत होती. लहान काटा, मोठा काटा, सेकंद काटा.. माझ्या डोक्यात नुसतेच काटे फिरत होते. काही केल्या मला काही तिने विचारलेल्या प्रश्र्नांची उत्तरे देता येत नव्हती. तिला आला राग! ज्या दिवाणाला मी टेकुन बसले होते, त्याच दिवाणाच्या कडेवर मागच्या मागे तिने माझे डोके आपटले .. हीSSSS रक्ताची धार लागली होती. क्षणार्धात शेजारी गोळा करुन तिने मला दवाखान्यात नेले. पण या घटनेचा भविष्यात काही फारसा उपयोग झाला नाही. तिने मारणे सोडले नाही, आणि मी मार खाणे! :)

In reply to by स्वैर परी

वपाडाव 15/02/2011 - 14:05
आईच्या मारावर लवकरच एक वेगळा लेख लिहिण्यात येइल. आणी त्याच्या १,२ आव्रुत्त्या पण असतिल. तोपर्यन्त वाचकान्नि संयम बाळगावा.

धमाल मुलगा 15/02/2011 - 15:01
बा पोलिसात असल्याचे फायदे असले तरी एव्हढा एकच तोटा लै डेंजर असतो राव! उगं भडकुन एखाद्या टायमाला घेतला रिमांडमध्ये म्हंजे पार 'मेरी आवाज सुनो'च्या वापरापर्यंत जातंय प्रकरण. नशीब घरात टायरं नसत्यात...नायतर टायरात घालुन बी कुटायला कमी नाय करायचे! आमच्या काकाश्रींनी लहानपणी एकदा घरुन पैसे चोरले शाळेत खाऊ घ्यायला ते कळलं आमच्या फोलिस असलेल्या आजोबांना! मग मधे अधे काय विषयच नाय. सरळ स्टोव्ह पेटवला आन काकाचे दोन्ही तळवे स्टोव्हवर धरले. पुढं म्हणे कित्येक दिवस आजी त्याला भरवायची, आणि रडायची! पण त्यानंतर घरातला सगळा हिशेब काकाच्याच ताब्यात दिला. :) (आता एव्हढा रानटी मार दिला म्हणून वाईट वाटतं, पण अर्थात आमचा काकाश्री काय कमी नाय. निव्वळ इदरकल्याणी! वयाच्या बाराव्या वर्षीच घरातला राकेलचा क्यान घेऊन टांगा जाळायला गेलं होतं म्हाराज!)

वपाडाव 15/02/2011 - 18:08
स्वाती२, श्रीराम गावडे, sneharani, मृत्युन्जय,धमाल मुलगा, हरिप्रिया_,अमोल केळकर,मुलूखावेगळी,अवलिया,गणेशा आपणा सर्वान्चे पुनश्च धन्यवाद....

In reply to by टारझन

विजुभाऊ 15/02/2011 - 16:34
पालक हे विकृत आहेत असं का म्हणायचंय तुम्हाला ? नाईलाजाने हो असेच म्हणावे लागेल. ते त्या क्षणी विकृतच होते .त्यांच्या रागाचा पारा इतका अनावर झालेला होता की त्याना ते काय करताहेत हे कळणे बंद झालेले होते. त्यांच्यातील वत्सल पालक हा चांगले वाइट कळण्याच्या पलीकडे गेलेला होता

In reply to by विजुभाऊ

वपाडाव 15/02/2011 - 16:42
ते त्या क्षणी विकृतच होते
कदाचित त्यावेळी तेच उचित असेल... मला जर समजले असते तर मी सान्गुन नाही का गेलो असतो खेळण्याकरता? आणी म्हणुनच पुढे आम्ही त्याची काळजी घेतली.

In reply to by वपाडाव

धनंजय 15/02/2011 - 22:25
तरी जरा जास्तच वाटते. "धडा शिकवण्यात" तारतम्य हवे. मला वाटते की तुमच्या वडलांनीसुद्धा हा अनुभव गंभीरपणे मनाशी घेतला असावा. तुम्ही पुन्हा असे घडू दिले नाही, पण तरुण मुले थोडीतरी गंमतशीर-अल्लड असतातच ना? (लाथेने तुमच्यातली गंमतच चेचली असेल, तर जबड्यापेक्षा खोल दुखापत म्हटली पाहिजे.) त्या गमती त्यांनीसुद्धा सबुरीने घ्यायला शिकले असावे.

मृत्युन्जय 15/02/2011 - 16:31
आयुष्यात मी फक्त एकदा वडिलांकदुन कानाखाली खाल्ली. वडिलांची सही कॉपी केली तेव्हा. ते सुद्धा कुठल्यातरी फालतू गृहपाठाच्या वहीवर. तेव्हापासुन एक गोष्ट शिकलो, लोच्या करायचा तर किमान मोठा करावा. पकडलो गेलो तरी किमान असल्या आंडुपांडु गोष्टीसाठी पकडलो गेलो असे दु:ख नको व्हायला. हे म्हणजे अगदीच १०० रुपायाची लाच घेताना पालिकेच्या कारकूनाला पकडण्यासारखे झाले होते. बाकी आमच्या पिताश्रींनी कधी मारले नाही. आमच्या शेजारचे मात्र म्हणे मुलाला पंख्याला लटकावून पंखा चालू करायचे. मी त्याला बर्‍याचदा सांगितले की पुढच्या वेळेस अशी शिक्षा करणार असतील तेव्हा सांग मी येइन बघायला म्हणून. पण मित्राने कधी आमंत्रणच दिले नाही. ;)

In reply to by मृत्युन्जय

यशोधरा 15/02/2011 - 17:06
आमच्या शेजारचे मात्र म्हणे मुलाला पंख्याला लटकावून पंखा चालू करायचे. मी त्याला बर्‍याचदा सांगितले की पुढच्या वेळेस अशी शिक्षा करणार असतील तेव्हा सांग मी येइन बघायला म्हणून. पण मित्राने कधी आमंत्रणच दिले नाही. खरं नसावं अशी आशा. असेल, तर भयानक आहे.

In reply to by यशोधरा

मृत्युन्जय 15/02/2011 - 18:09
नाही. खरं आहे. माणूस एरवी प्रचंड शांत होता. अशी शिक्षा देत असतील असे आम्हाला पण वाटायचे नाही पण त्यांच्या बायकोने पण कन्फर्म केल्यावर संशयाला जागा नव्हती. पंखा १ वर चालवतात की ५ वर हे विचारण्याचे धैर्य माझ्या आईवडिलांना झाले नाही बहुधा आणि मी त्यावेळेस एवढा आगाऊ नव्हतो म्हणुन विचारले नाही :)

विजुभाऊ 15/02/2011 - 16:51
लहान मुलाना मारणे हे विकृतच. बरेच पालक बाह्यगोष्टींचा राग मुलांवर काढतात.( उदा ऑफीसातील अपमान वगैरे) किंवा भूतकाळातील एखादा सूड मुलांवर उगवतात मुलाना मारणे ,उपाशी ठेवणे हे जर सौम्य प्रकार म्हणता येतील उदबत्तीचे चटके देणे , गरम तव्याचे चटके देणे , त्यांचेवर लैंगीक अत्याचार करणे , दोरीला बांधून उलटे लटकावणे , रस्त्यावरून फरफटत नेणे वगैरे अनेक छळ केले जातात. मुले वयाने शरीराने ताकदीने लहान असतात म्हणून हे सहन करतात. इमॅजीन कर मुले शक्तीने जर बापा/आइएवढी असतील तर काय बिशाद आहे त्या पालकाची असे वागण्याची. ज्यांचे लहानपण वाईट अवस्थेत गेलेले असते ते पालक मुलांशी थोड्या अधीक कॄर पणे वागण्याची शक्यता असते. हेच नवरा बायकोच्या संदर्भात देखील लागु पडते. ज्या नवर्‍याना लहानपणी आईबापाने भरपुर बदडलेले असते ते नवरे बायकोला मारहाण करण्याची शक्यता जास्त असते. अशा बायका मुलाना मारहाण करण्याची शक्यता जास्त असते. व्यक्त करणे शक्य नसेल तेंव्हा सगळे राग लहान मुलांवरच काढले जातात आमच्या शेजारचे मात्र म्हणे मुलाला पंख्याला लटकावून पंखा चालू करायचे. हा विनोद नाही हा विकृत पणाच. गॅसवरच्या तापत्या तव्यावर झुरळाला ठेवून त्याच्या नाचण्यात आनन्द मानायची विकृती ही याच धर्तीची

In reply to by विजुभाऊ

मुलूखावेगळी 15/02/2011 - 16:57
ज्यांचे लहानपण वाईट अवस्थेत गेलेले असते ते पालक मुलांशी थोड्या अधीक कॄर पणे वागण्याची शक्यता असते.हेच नवरा बायकोच्या संदर्भात देखील लागु पडते.ज्या नवर्‍याना लहानपणी आईबापाने भरपुर बदडलेले असते ते नवरे बायकोला मारहाण करण्याची शक्यता जास्त असते.अशा बायका मुलाना मारहाण करण्याची शक्यता जास्त असते.व्यक्त करणे शक्य नसेल तेंव्हा सगळे राग लहान मुलांवरच काढले जातात
बरोबर आहे. मिपावर तर अशी मारहाण झालेल्यांची यादीच बाहेर येत आहे.

In reply to by विजुभाऊ

वपाडाव 15/02/2011 - 17:52
पालक-पाल्य ही रिलेशन्शिप थोडीशी नाजुकच आहे. विनाकारण दारु पिउन बायको-अपत्यावर हात उगारणे वेगळे नि पाल्य शिस्तित वागावा म्हणुन त्याला बदडणे वेगळे. यामध्ये औफिसातिल तणावामुळे केलेली मारहाण येइलहि.
ज्यांचे लहानपण वाईट अवस्थेत गेलेले असते ते पालक मुलांशी थोड्या अधीक कॄर पणे वागण्याची शक्यता असते. लहानपणी आईबापाने भरपुर बदडलेले असते ते नवरे बायकोला मारहाण करण्याची शक्यता जास्त असते. अशा बायका मुलाना मारहाण करण्याची शक्यता जास्त असते.
पण हे बदला घेण्याचे समीकरण काही पटले नाही. म्हणजे माझ्यावर अत्याचार झाला म्हणुन मी माझ्या बायका-पोरान्ना माराव हे कोण्त्या फिलोसोफित बसत काय माहित? पण जर वेळिच त्यान्नि मला रोखले नसते तर आज चित्र काही वेगळे असले असते. कशाचाही अतिरेक वाइट्ट!!!

sneharani 15/02/2011 - 16:51
छान लिहलय! पुलेशु!

श्रीराम गावडे 15/02/2011 - 17:39
जगात समदुखि माणसे आहेत हे समजुन जरा बरे वाटले. डोळे बंद केले कि अजुनहि एखाद्या मुष्टियोध्ध्दया प्रमाणे गुद्दे मारणारे वडिल आणि कोपरयात असहायपणे उभि राहिलेलि आई आठवते. असो.

इन्द्र्राज पवार 15/02/2011 - 18:51
"....(किंबहुना आम्ही त्यांच्यावर ही वेळच येऊ दिली नाही.)....." ~ हे अंतीम सार सगळ्यात चांगले. तुमच्या वडिलांनी ज्या कारणास्तव दवाखान्यात नेण्यापर्यंत जाण्याची वेळ यावी इतके मारले, ते तसे पाहिले तर अतिशय क्षुद्र म्हणावे लागेल....कदाचित ड्युटीवर झालेल्या एखाद्या प्रसंगामुळे आलेला वैताग शमविण्याची ती प्रक्रियादेखील असू शकेल. पोलिसांच्या नोकरीत असल्याने त्यांच्यावर असले प्रसंग डझनावरी येत असतील...नव्हे येतातच. दहाबारा तासांची अखंड, मध्ये विश्रांतीही नाही, ड्युटी त्यात वरिष्ठांची गुर्मी आणि अपमानस्पद भाषा...जी पोलिस खात्यातच सापडते... कमी वेतन, प्रमोशनच्या जवळपास शून्य संधी....आदी अनेकप्रकारे पोलिस नोकरी-कामाच्या स्वरूपामुळे असमाधानी असू शकतो, त्यामुळे अंगी धगधगत असलेला संताप कुठेतरी उतरावा असे नेहमीच वाटत असते. मग घरी आल्यावर अशी हक्काचे दोन ठिकाणे....पत्नी आणि मुलगा. तुमच्या उदाहरणात खुद्द तुम्हीच सापडला....पण बहुतांशी ठिकाणी हे भोग स्त्रीला भोगावे लागतात. आमच्या जुन्या घराच्या गल्लीत एक पोलिस (ट्रॅफिकचे नव्हते, साहेबांच्या बंगल्यावरील ड्युटीवर असायचे....) आणि त्याचे कुटुंब राहायचे. या पोलिसाचा मुलाप्रती संताप माराच्या रूपाने बाहेर न पडता तो 'शिव्या' च्या रूपाने येत असे. अशा शेलक्या शिव्या तो आपल्या मुलाला देत असे आणि तेही आरडाओरडा करत, की ऐकणार्‍याला कानात बोळे घालून घ्यावे असे वाटे. शेजारील काही ज्येष्ठ मंडळी "अहो मुसळे, घरी मुली आहेत, कशाला इतक्या घाणेरड्या शिव्या देता त्या मुलाला....बास करा की आता !" असे काही म्हणू लागली की, हे मुसळे, "तुमच्या पोराला देतोय का?" असाच वस्स्कन प्रतिप्रश्न करीत. कोण प्रत्युत्तर करणार अशा प्रवृत्तीला? पुढे पोलिस कॉलनीत त्याना जागा मिळाल्यावरच गल्ली शांत झाली. (असो...अनुभवकथनाची शैली छान आहे....पहिलाच प्रयत्न आहे असे वाटत नाही.) इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

वपाडाव 16/02/2011 - 10:04
चोरून चालवायला नेलेल्या गाडीच्या कोपर्यावर झालेल्या धडकेत फुटलेला साइड ग्लास
ही घटना ह्या माराच्या मुळी असावी असा जाणकारान्चा कयास आहे. बाकी मग ह्या प्रकारचा "छळ" माझ्याव्यतिरिक्त अजुन कुणाचाही झाल्याचे पुरावे आढळलेले नाहीत.

रेवती 15/02/2011 - 19:20
लेखनाचा विषय आवडण्यासारखा नसला तरी लेखनशैली आवडली. एवढा मार मिळणार असे स्वप्नात आले असते तरी मी आजारी पडले असते. भावांना प्रसंगानुरुप धपाटे मिळत असत. आजी मात्र माझ्या बाजूने असे. मी दंगेखोर तर अजिबातच नव्हते. ज्या चुका होत असत त्याबद्दल रागावून घेत असे आणि बरेच दिवस रडूबाई होत असे. आजीला माझ्या लग्नाची चिंता आईबाबांपेक्षाही जास्त होती. तिनं सगळ्यांना सक्त ताकिद दिलेली मला न मारण्याबद्दल. चुकून फटका इकडं तिकडं लागला तर लग्न व्हायचं नाही मुलीचं असं म्हणत असे. एकदा न सांगता बाहेर गेल्याबद्दल बाबांनी दोन धपाटे घातले होते त्यानंतर मी कधीही न सांगता बाहेर जात नाही आणि बाहेरून घरी येताना न चुकता फोन करून "मी निघालिये" असे सांगते. आता नवर्‍यालाही ही सवय लागलीये.

In reply to by रेवती

अनामिक 15/02/2011 - 21:58
आता नवर्‍यालाही ही सवय लागलीये. धपाटा खाल्यानंतर की आधीच? (ह. घे. गं तै) हल्ली रंगाशेट दिसत नाहीत मिपावर?

In reply to by अनामिक

रेवती 16/02/2011 - 01:48
धपाटा खाल्यानंतर की आधीच? हे हे हे. तुला कळलं तर..... अरे, मी रंगाच्या मागे लागलिये एका चेस सामन्याचा वृत्तांत लिही म्हणून........

In reply to by रेवती

यशोधरा 16/02/2011 - 09:45
मागे लागलीच आहेस तर ते बुदबळाच्या खेळाचे नियम देवनागरीत रुपांतरीत करुन घेऊन, [रुपांतरीत करुन दिलेही कधीचेच ] ते इथे टाकणार येण्यात होते, त्याचे काय झाले हे ही विचारतेस का?

In reply to by रेवती

वपाडाव 16/02/2011 - 09:51
माझ्या बहिणीला सुधा याच कारणामुळे मार बसत नसावा कदाचित. आणि मातोश्रींची एक समजूत आहे, जखमांचे वण दिसायला लागले कि "मार्क कमी होतील" आणि लग्नाला प्रोब्लेम होईल.. आभारी..

झुळूक 15/02/2011 - 23:34
छान लिहिले आहेस!, पुलेशु! पन वडापाव का वपाडाव?

In reply to by झुळूक

वपाडाव 16/02/2011 - 09:47
काही कारण नव्हते... पण मला असे वाटले की वडापाव हे आधीच कोणीतरी घेतले असावे... आणी आमच्या मित्र मंडळीमध्ये वडापावला "वपाडाव" म्हणण्याची प्रथा असल्याने.... काहीही सम्बोधले तरी हरकत नाही. आपणास जे सोईस्कर वाटेल ते...

सविता 16/02/2011 - 11:16
फारसा मार कधी खाल्लेला आठवत नाही..... म्हणजे उचापती मी बर्‍याच केल्या पण त्या आई-वडिलांपर्यंत पोचू न देण्याइतकी चतुर मी झाले होते, किंवा नशिबाने साथ दिली असे म्हणता येईल. वडील तसे पण शांत्..क्वचितच हात उगारत. आई मात्र चिडली की फटकावत असे. पण मोडेन पण वाकणार नाही..या धर्तीवर मी "मारू नका"..किंवा "चुकले" असे न म्हणता मार खऊन घेत असे आणि कितीही दुखले आणि डोळ्यातून पाणी आले तरी "रडत" नसे....शेवटी आई हताश होत असे. नंतर जरा मोठी झाल्यावर जास्त आगाऊ झाले.... आई मारण्याच्या पवित्र्यात दिसली की ..... तुला माहित आहे..मला लागत नाही..पण मारून तुझा हात दुखेल्..नंतर मलाच चेपुन द्यायला सांगावं लागेल... अशी सुचना पण देऊ लागले!

स्पंदना 16/02/2011 - 20:59
दोन तिनदा वाचला हा लेख पण प्रतिसाद द्यायचा धीर नव्हता होत. गेल्या आठवड्यात पिल्लुला डिव्हिजन सुरु झाली. सुरवात ठीक होती पण मग पुढे दोन नंबर्स चा गोंधळ उडु लागला. शेवटी कधी नाही ते त्याचा अन माझा 'राडा' झाला. परिणामी एक दोन धपके पिलुच्या पाठीत बसले. मी मारल्यावर त्याची जी नजर होती ..राहुदे. तो थर्टीन पर्यन्तचे टेबल्स अगदी पाठ म्हणतो , पण त्या दोन धपक्यानी तो पुन्हा पुन्हा ' फाइव्ह टु झा सिक्सच' म्हणत राहिला . शेवटी मी त्याला 'काम डाउन' हो अन ' सॉरी' म्हंटल्यावर मगच 'फाइव्ह टु झा टेन' झाले.